निसर्गशिबिराच्या राहुट्या नदीपासून दोन किलोमीटर दूरवर उभ्या होत्या.आठ ते सोळा वयोमान असलेल्या वीस मुलामुलींनी त्या शिबिरात भाग घेतला होता.हे सारे जण पहिल्यांदाच जंगलात आले होते.या जंगलाच्या दर्शनानं ते भारावून गेले होते.एका राहुटीत रमेश व सुरेश ही जुळी भावंडं रात्री झोपली होती.
मध्यरात्रीनंतर रमेशला जाग आली.त्यानं राहुटीची समोरची कनात उघडली. बाहेर जिकडेतिकडे चंद्राचा प्रकाश पडला होता. समोरचं घनदाट जंगल,पऱ्यांचं वास्तव्य असलेल्या एखाद्या किल्ल्यासारखं दिसत होतं.साग,धावडा, साजा,बिजा इत्यादी झाडांचे सरळसोट बुंधे एखाद्या खांबाप्रमाणे दिसत होते.
झुडपांवर चंद्रप्रकाशाचे कवडसे पडल्यामुळे तिथे प्रकाशाची नाजूक नक्षी उमटलेली होती.दोन झाडांच्या बुंध्यांना जोडलेल्या देवकोळ्याच्या अजस्त्र जाळीत पडलेले दवाचे थेंब रत्नांसारखे चमकत होते.या साऱ्या दृश्यामुळे रमेशला जणू रानभूल झाली.
तो अंथरुणावरून उठला.पायांत बूट घातले.
हातात कोयता घेतला व त्यानं पाऊलवाटेनं जंगलाची वाट धरली.त्याच्या हालचालीनं सुरेशलाही जाग आली होती.तो देखील रमेशच्या मागून जाऊ लागला.या सात-आठ दिवसांच्या मुक्कामात जंगलातून येणाऱ्या पशुपक्ष्यांच्या आवाजांची ओळख त्याला झाली होती.त्या रात्री रमेश अंथरुणावर पडल्या पडल्या त्याचे डोळे मिटू लागले.तेव्हा एखाद्या अंगाईगीताप्रमाणे पखमांजराचा आवाज येऊ लागला.तेव्हा त्याला कधी झोप लागली हे कळलंदेखील नव्हतं.
आता जंगलातील पाऊलवाटेनं जात असता कांचनमृगाचा टाहो ऐकू येत होता.मध्येच सांबर ओरडे.नदीकडे जाणाऱ्या या वाटेवर झाडांची कमान उभी होती.अंजिरी रंगाच्या सावल्यात चांदीची नाणी पसरावीत तसे चंद्रप्रकाशाचे कवडसे दिसत होते चांदण्या रात्री जंगल कधीच शांत नसतं.सारं वातावरण अद्भुत अशा संगीतानं भरलं होतं.चांदीच्या घंटेसारखी हळुवार किणकिण ऐकू येत होती.
रातकिड्याचं संगीत ऐकू येत होतं.झाडांच्या ढोलीतील वृक्षमंडूक गात होते.मध्येच रानपिंगळ्याचा आवाज येई.प्रत्येक झाडाची वृक्षदेवता असते.ती त्या झाडाचं संरक्षण करते. त्याचं संगोपन करते.अशा सात झाडांवरच्या वृक्षदेवतांनी पाहिलं की,दोन अजाण व निष्पाप बालकं नदीकडे जात आहेत.या जंगलात अशा रात्री त्यांना पावलोपावली धोका होता.त्या सात देवतांनी त्या बालकांवर पाखरमाया धरली.त्या बालकांच्या नकळत त्या देवता एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात होत्या.बालकांनी भीतीनं वर पाहिलं, तर फक्त पानापानांतून सळसळ ऐकू येत होती.ती नदीकिनारी पोचली.नदीचं वाळवंटी पात्र दिसत होतं.त्यातून चांदीच्या पाटाप्रमाणे रुंद पात्रातून नदीचा संथ प्रवाह वाहत होता.पात्रात अधूनमधून मोठमोठ्या काळ्या शिळा विखुरल्या होत्या. इतक्यात चंदेरी वर्णाची एक मासोळी उंच उडी घेऊन किनाऱ्यावर पडली.काठावर उभ्या असलेल्या झाडांच्या काळ्यानिळ्या सावल्या पाण्यावर पडल्या होत्या.नदीतून संथ वाहणाऱ्या पाण्याचं गूढ गुंजन ऐकू येत होतं.ती पुढे पाऊल टाकणार इतक्यात कुठूनतरी आवाज आला,"पुढे जाऊ नका!" आश्चर्यचकित होऊन त्यांनी वर,
खाली अन् समोर पाहिलं.त्यांना तो आवाज त्यांच्या आईच्या आवाजासारखा वाटला. 
त्यांना वाटलं,आपण स्वप्नात तर नाही ना! क्षणातच ती नदी अन् तिच्या काठचं जंगल जणू जिवंत झाल्यासारखं वाटलं.
निळावंती - मारुती चितमपल्ली - साहित्य प्रसार केंद्र सिताबर्डी नागपूर
एवढ्यात काळे,पिवळे वेटोळे पट्टे असलेला रंगीबेरंगी रिबिनीसारखा साप त्यांना दिसला.तो झुडपातून नदीकडे चालला होता.त्यानं आपल्या द्विजिभा बाहेर काढल्या.पाण्याला स्पर्श करून काही थेंब तोंडात घेतले अन् अंधाराची वाट धरली. मोठ्या शिळेखाली बसलेला बेडूक टुणकन उडी मारून त्यांच्या दिशेने आला व पायाजवळ आदळला.तो बेडूक आपल्या मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागला.बेडूक दिसायला गलेलठ्ठ व कुरूप असला तरी त्याचे डोळे मात्र सुंदर होते. त्यात सोनेरी चमक होती.
नंतर तो टुणटुण उड्या मारत चंदेरी वाळूतून जंगलकाठच्या अंधारात गुडूप झाला.इतक्यात एका हुदळ्याच्या मादीनं पाण्यातल्या एका शिळेवर उडी घेतली.एक दीर्घ शीळ मारताच पलीकडच्या काठावर असलेल्या पिलांनी तिच्याकडे धाव घेतली.ती अवखळ पोरं पाण्यातून डुंबत डुंबत आईकडे आली. 
नदीच्या काठावर उतरती दरड होती.आई व तिची दोन पिलं त्या उतरत्या दरडीचा उपयोग घसरगुंडी
सारखा करून बराच वेळ खेळत होती. असे प्राणी त्यांनी प्राणिसंग्रहालयात पाहिले होते.
जंगलातील सगरीवरून एक भेकर थांबत थांबत येत होतं.त्याचे टपोरे डोळे चंद्रप्रकाशात चमकत होते.मध्येच ते आपले कान आवाजाचा कानोसा घेण्यासाठी चारी दिशांनी खालीवर फिरवत होतं. बऱ्याच वेळानं ते पाणी पिण्यासाठी आलं.त्याच्या मुखातून ओघळणारी पाण्याची धार एखाद्या चांदीच्या तारेसारखी चमकत होती.नाकपुड्या फेंदारून त्यानं आजूबाजूच्या आवाजाचा कानोसा घेतला.रमेश व सुरेश कितीतरी वेळ अगदी स्तब्धपणे उभे राहून त्याच्याकडे बघत होते. येणाऱ्या वासामुळे त्या भेकराला त्यांची चाहूल लागली.अगदी कुत्रं भुंकावं तसं ते ओरडलं आणि क्षणार्धात आलं तसं जंगलात नाहीसं झालं.हुदळ्या आणि भेकर निघून गेल्यावर ते दोघे नदीची दरड चढून जिथे वळण होतं तिथे आले.तिथल्या कळकाच्या बेटातील काही कळक ओणवून नदीच्या पाण्याला स्पर्श करीत होते.
ते दोघे नदीच्या वाळवंटाकडे पाहत होते.इतक्यात कोल्ह्याएवढा एक प्राणी त्यांच्या दिशेने येत असलेला त्यांना दिसला.त्यांनी प्राणिसंग्रहालयात पाहिलेल्या चांदी अस्वलासारखा तो दिसत होता.
काळा रंग आणि पाठीवरून पांढरा पट्टा पार तोंडापर्यंत गेलेला. त्याच्या मागून आणखी एक चांदी अस्वल व तिची दोन पिलं येताना दिसली.हे सारं कुटुंब नदीच्या पात्रातील वाळूवर आल्यावर डोकं जमिनीवर टेकवून कोलांट्या मारण्याचा खेळ खेळू लागलं. क्षणभर दोघांना आश्चर्य वाटलं.जनावरंदेखील माणसासारखीच खेळतात तर ! नंतर ते सारं कुटुंब जंगलात निघून गेलं.
रमेश जागच्याजागी स्तब्ध उभा राहिला.सहा फूट लांबीचा एक साप वळणं घेत पाण्याकडे जात होता.त्याचं शेपूट निमुळतं होतं.तोंड पसरट होतं. त्याला कसलीतरी चाहूल लागली तसा त्यानं फणा उगारला.तेव्हा रमेशला कळलं,की तो नाग आहे.
 तो भयंकर विषारी असतो,हे त्याला ऐकून माहीत होतं. बराच वेळ तो फुसफुसत होता.दंश करण्याची त्याची इच्छा नव्हती.काही वेळानं त्या दोघांच्या बाजूनं वळसा देऊन तो नदीकडे निघून गेला.ते नदीच्या उंच दरडीवर उभे राहून समोर पाहत होते.नदीचं पात्र चांदण्यात चमकत होतं.पलीकडे घनदाट जंगलाची भिंत उभी होती.नवीन पालवी फुटलेल्या पिंपळ वृक्षाची पानं सोन्यासारखी चमकत होती.वीस-पंचवीस फुटांवर झुडपाच्या जाळीतून बिबट्या डोकावला.
तो पिवळसर रंगाचा असून त्याच्या सर्वांगावर काळे ठिपके होते.तो झुडपातून बाहेर आला तसं त्याचं सर्वांग चांदण्यात चमकू लागलं.तो त्या मुलांसमोर उभा राहिला. 
शिबिरातील वनाधिकाऱ्यानं त्यांना सांगितलं होतं की,वाघ किंवा बिबट्या दिसला की घाबरून पळू नका.एखाद्या झाडाच्या आडोशानं स्तब्ध,शांतपणे उभे राहा.अशी रानटी जनावरं त्यांच्या वाटेला गेल्याशिवाय कोणावर हल्ला करीत नाहीत.
बिबट्यानं एक पाऊल उचललं.पुन्हा जमिनीवर टेकवलं.एकदा इकडेतिकडे नजर टाकली.शेपटी इकडून तिकडे हालवली.एक डरकाळी फोडली. तसे ते दोघे गर्भगळीत झाले.त्यांची हृदयं वेगानं धडकू लागली.त्यांचं एकएक स्पंदन घड्याळाच्या टिक्ऽटिक्ऽऽ प्रमाणे ऐकू येत होते.
इतक्यात एक चमत्कार घडला.निमुळते पंख असलेल्या सात वृक्षदेवतांनी त्या मुलांच्या भोवती फेर धरला.त्यांना कळेना की या कोण आहेत.त्या दिसायला पऱ्यांसारख्या दिसत होत्या.बिबट्या त्यांना ओळखत होता.अनेक वेळा त्यानं या देवतांना पाहिलं होतं.तो त्यांच्याकडे पाहत होता. शेपटी इकडून तिकडे हालवत होता.
कितीतरी तास ते दोघे देवतांच्या फेऱ्यात होते. शेवटी बिबट्यानं तिथून काढता पाय घेतला. नदीकाठच्या जंगलातून चालत असताना मध्येच तो मागे तोंड वळवून पाहत असे.एकदम त्यानं झुडपात उडी घेतली व तो दिसेनासा झाला.
त्या सात वृक्षदेवता त्यांना म्हणाल्या, "चला मुलांनो, आता परतू या." पहाटे ते दोघे आपल्या राहुटीत प्रवेश करून झोपी गेले.त्यांच्याविषयी कोणालाच काही कळलं नाही. कारण त्यांच्या सांगण्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता.