अॅरन रॅल्स्टन हा भटका गिरिप्रेमी एके दिवशी कल्पनातीत संकटात सापडतो आणि त्याच्यासमोर उभे ठाकतात काही जीवघेणे प्रश्न.अमेरिकेतल्या एका कॅनियनच्या घळीत १२७ तासांची एकाकी झुंज देत मृत्यूला भेटून आलेल्या अॅरनची गोष्ट वाचायलाही हिंमत हवी.
२६ एप्रिल २००३.अॅरन रॅल्स्टन हा २७ वर्षांचा भटका तरुण युटामधल्या कॅनियनलँड्स नॅशनल पार्कमधल्या ब्ल्यू जॉन कॅनियनकडे निघाला आहे.अॅरनला गिर्यारोहणाचं,सायकल
स्वाऱ्यांचं आणि एकूणच भटकण्याचं वेड आहे.त्यामुळे इंजिनियर असूनही सध्या तो एका गिर्यारोहण संस्थेत काम करतोय.सोमवार ते शुक्रवार काम करायचं आणि शनिवारी सायकल ट्रकमध्ये घालून दऱ्याखोऱ्यांत भटकायला जायचं हा त्याचा नेहमीचा शिरस्ता.हाही शनिवार त्याला अपवाद नाही.आधी रस्त्यावर ट्रक आणि नंतर कॅनियनलँड्स पार्कमध्ये सायकल लावून तो ब्ल्यू जॉन कॅनियनच्या तोंडापर्यंत चालत येतो.ही कॅनियन त्याला बऱ्याच दिवसांपासून खुणावते आहे.त्यामुळे वाटेत भेटलेल्या त्याच्यासारख्याच दोन भटक्या पोरींसोबत एका नव्या ठिकाणी गिर्यारोहणाला जाण्याचा मोह टाळून तो एकटाच ठरल्यानुसार कॅनियनमध्ये उतरतो.
कॅनियनमधल्या घळीत उतरायचं,आसपास भटकायचं, जमलं तर संध्याकाळी परतायचं किंवा वाटल्यास तिकडेच ट्रकमध्ये मुक्काम ठोकायचा,असा त्याचा प्लॅन.कॅनियनलँड्स नॅशनल पार्क हे अमेरिकेतल्या अतिशय भव्य आणि सुंदर ठिकाणांपैकी एक मानलं जातं. ५००० वर्षांपूर्वीची भित्तिचित्रं इथे जतन केलेली आहेत. शेकडो एकरांवर पसरलेली लालसर खडकांची जमीन आणि त्यात पाताळात घेऊन जाणाऱ्या घळी.या घळींमध्ये उतरताना थोड्या वेळातच अॅरनची तंद्री लागते.सगळं जग मागे पडतं.आई-वडील,
घर,काम, मित्र,थोड्या वेळापूर्वी भेटलेल्या भटक्या मुली..सगळं सगळं.या एकतानतेच्या ओढीनेच तर तो दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकत असतो.घळ अतिशय निरुंद असते.एका वेळी दोन किंवा कधी कधी एखादाच माणूस मावेल एवढीच जागा.एके ठिकाणी अॅरनला बस टायरच्या आकाराचा एक भला मोठा दगड घळीत अडकून राहिलेला दिसतो.घळीच्या पायथ्याशी उतरण्यासाठी पायरी म्हणून वापर करायला हा दगड त्याला चांगला वाटतो.तो दगड डळमळीत नाही ना याची तो आधी चाचपणी करतो आणि खात्री पटल्यावर त्या दगडावर ओणवा होऊन एखाद्या छतावरून उतरल्यासारखा खाली उतरू लागतो.तेवढ्यात ते घडतं..अॅरन दगडावरून खाली जात असतानाच दगड जागचा हलतो आणि अॅरन सोबतच तो खाली कोसळू लागतो.काय होतंय ते कळल्यावर अॅरन प्रतिक्षिप्त क्रियेतून त्या दगडापासून दूर जायचा प्रयत्न करतो.त्यामुळे दगड त्याच्या डोक्यावर कोसळण्यापासून वाचतो खरा,पण अॅरनचा उजवा हात दगड आणि घळीच्या भिंतीमध्ये अडकतो.
या धक्क्यामुळे अॅरन पूर्ण बधिर होऊन जातो.हे काय घडलं,हेच त्याला कळत नाही.त्याची पहिली प्रतिक्रिया जे झालं ते नाकारण्याची असते... 'हे खरं नाही.असं घडणं शक्य नाही.हे नक्कीच एखादं वाईट स्वप्न असणार.पण तसं असेल तरी फारच वाईट आहे ते..' पण जेव्हा त्याला कळतं की हे स्वप्न नाही,तेव्हा बधिरतेचं रूपांतर पॅनिकमध्ये होतं.त्याचं शरीर सगळा जोर लावून अडकलेला हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं,पण हात जागचा हलत नाही.उलट,अॅरन च्या धडपडीमुळे दगड आणखी घट्ट बसतो.मनगटापासून डोक्यापर्यंत एकच कळ जाते.त्याच्या लक्षात येतं,की आपल्या वजनाच्या चौपट-पाचपट असणाऱ्या या दगडाने आपल्याला पूर्ण अडकवून टाकलं आहे.कुणाच्या तरी मदतीशिवाय इथून हलणं अशक्य आहे. तरीही वेगवेगळ्या ठिकाणांहून जोर लावून दगड हलतो का किंवा दगडाच्या तावडीतून हात सोडवता येतो का हे बघण्याचा तो प्रयत्न करत राहतो; पण व्यर्थ.सुदैवाने त्याच्या हातातून रक्तस्राव होत नाही आणि आश्चर्य म्हणजे वेदनाही असह्य नसतात.कदाचित मानसिक धक्क्यामुळे त्याला त्या जाणवत नसतात.
दहा-पंधरा मिनिटांनी अॅरन या धक्क्यातून थोडा सावरतो.या अपघातात आणखी काय काय झालंय हे तो बघायला लागतो.
त्याचा डावा पाय आणि डावा हात सोलवटून निघालेला असतो.
डावा हात सुजायलाही लागलेला असतो.सगळं अंग घामाने निथळत असतं. पुढचा काहीही विचार करण्याआधी पाणी प्यायला हवं, अशा जाणिवेतून पाठीवर लटकणाऱ्या पाण्याच्या पिशवीची नळी तो तोंडात घालतो,तर लक्षात येतं,या गोंधळात ती पिशवी फाटून सगळं पाणी सांडून गेलं आहे.सॅकमध्ये पाण्याची आणखी एक बाटली असते. पण एक हात अडकलेला असताना सॅक काढायची कशी? हातातलं बाकीचं सामान अॅरन दगडावर काढून ठेवतो आणि सॅकचे पट्टे सोडवून त्यातली पाण्याची बाटली बाहेर काढतो.आपण काय करतोय हे लक्षात येण्याआधी बाटलीतलं जवळपास निम्मं पाणी त्याने पिऊन टाकलेलं असतं.
आपली सुटका कधी होईल माहिती नाही,तोवर आपल्याला आहे ते पाणी पुरवायला हवं,हे लक्षात आल्यावर तो स्वतःवरच चरफडतो.'अॅरन हा काही साधासुधा अपघात नव्हे.तू अशा ठिकाणी अडकला आहेस की जिथे कोणीही इतक्यात कडमडेल अशी शक्यता नाहीये. तुझ्या जिवावर बेतलं आहे. काळजी घे..' असं तो स्वतःला काहीसं चिडून सांगत राहतो.
त्याचं म्हणणं खरंच असतं.कॅनियनलँड्स पार्कमध्ये येणाऱ्यांची संख्या तशी फारशी नसते.त्यातल्या नेमक्या ब्ल्यू जॉन कॅनियनमध्ये आणि त्यातूनही तो अडकलेल्या भागात कोणी येईल ही शक्यता तर फारच धूसर. एवढंच काय,त्याच्या लक्षात येतं,की आपण कुठे चाललो आहोत हे या वेळी आपण कुणालाच सांगितलेलं नाही.एकट्याने फिरायला जाण्याआधी आपल्या प्रवासाचे सगळे तपशील कुणा ना कुणाला सांगून जायला हवेत,हा पहिला नियम न पाळण्याची घोडचूक त्याने केलेली असते.गेल्या दोन दिवसांत आपलं कुणाकुणाशी काय बोलणं झालं ते स्कॅन करायचा प्रयत्न अॅरन करतो,पण आपण कुणापाशी ब्ल्यू जॉन कॅनियनचा उल्लेख केलेला त्याला आठवत नाही.याचा अर्थ आपण सोमवारी कामावर वेळेत पोहोचलो नाही की तिथल्या मॅनेजरचा रूममेटला किंवा घरी फोन जाईल तेव्हाच आपलं काही तरी बरंवाईट झालेलं असण्याची शक्यता आहे हे लोकांना कळेल;
मग आपण कुठे गेलो असू याचा तपास लावणं आणि मग प्रत्यक्ष शोध घेणं आणखी लांब.पण तोवर ? दोन बर्गर आणि पाव लिटरहून थोडं जास्त पाणी एवढ्यावर आपण किती काळ टिकाव धरू शकू? शनिवारची दुपार झालेली असते.'खाणं आणि पाणी यांचा विचार करता जास्तीत जास्त सोमवार दुपारपर्यंत आपण टिकाव धरू शकतो.तोवर सुटका झाली नाही तर मात्र आपण जगण्याची शक्यता फारच कमी आहे. पर्याय आहे तो हात तोडण्याचा;पण ते केवळ अशक्यच. मग फक्त मृत्यूची वाट बघत राहायचं.हा विचार आल्यावर त्याचं मन बंड करून उठतं.'नाही, मी मरणार नाही.मला जगायचं आहे.यातून बाहेर पडायचा काही तरी मार्ग असेलच.मी तो शोधेन आणि बाहेर पडेन.' या विचारासरशी त्याला थोडा हुरूप येतो. इंजिनियरिंगमधला एखादा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करावा तसं तो आपली परिस्थिती समोर ठेवून विचार करू लागतो.काय केलं की हा प्रचंड दगड,किंचित का होईना,हलेल याचा विचार करणं गरजेचं असतं.अॅरनला एक कल्पना सुचते.
त्याच्याकडे वेळप्रसंगी असावी म्हणून ठेवलेली स्विस नाइफ असते.'त्याचा छिन्नीसारखा वापर करून हाताजवळच्या दगडाचे कपचे काढले तर तो या बेचक्यातून सुटेल का ? आपल्या हाताने दगडाचं किती ओझं पेललेलं असेल? किती कपचे उडवले की आपलाहात निघून दगड भिंतीवर जाऊन स्थिरावेल ? करून बघायला काय हरकत आहे,'असं म्हणत अॅरन सॅकमधून स्विस नाइफ बाहेर काढतो.एक हात अडकलेला असल्यामुळे कोणतीही कृती करायची म्हटलं की त्यासाठी त्याला बरीच खटपट करावी लागते. पण त्याला इलाज काय असतो?डाव्या हाताने स्विस नाइफ वापरणंही सोपं नसतं.डाव्या हाताने जोर लावून दगडावर वार करायचे,पण त्याच वेळी उजव्या हाताला जखम होऊन द्यायची नाही.सगळी शक्ती लावून तो ते काम सुरू करतो.बराच वेळ मन एकाग्र करून तो दगडावर मारत राहतो,पण अगदी छोटे कण बाहेर पडण्याखेरीज त्याचा दगडावर जवळपास काहीही परिणाम होत नाही.'अॅरन हात कापल्याशिवाय तुझी इथून सुटका होणार नाही.'तो स्वतःशीच ओरडून बोलतो.हे शब्द उच्चारून त्यातली भयानकता कमी होते का हेच जणू अॅरन चाचपत असतो.
'नाही,मला माझा हात कापायचा नाहीय.'
'पण तसाही तुझा हात मेलेला आहे.इथून सुटका झाली तरी तो अॅम्प्युट करण्याशिवाय पर्याय नाहीये.'त्याचं मन दोन्ही बाजूंनी बोलत असतं.
पण बोथट स्विस नाइफने हात कापण्याच्या विचारानेही अॅरनच्या छातीतून कळ उठते.त्यापेक्षा हे बिनउपयोगाचं काम बरं,असं म्हणत तो हात चालवत राहतो.निष्क्रिय राहून भलभलते विचार करण्यापेक्षा हे काम करत राहणं चांगलं असं त्याला वाटतं.आपण पूर्ण हतबल नसून आपल्या हातात काही तरी नियंत्रण आहे असं तो मानत राहतो.आपण अडकलोय याचा आपण विचारच करायला नको.या दगडाच्या कपच्या काढणं हेच आपलं सध्याचं काम आहे असं मानायला काय हरकत आहे? या शब्दांनी त्याच्या मनाची समजूत पटते; पण थोडाच वेळ.लवकरच संध्याकाळ होते.अॅरनला घळीतून दिसणारा आभाळाचा तुकडा काळवंडायला लागतो.ढगही दाटून येतात.रात्र अशा छोट्याशा सापटीत आणि तेही एक हात अडकलेल्या अवस्थेत घालवायची, या विचाराने अॅरनच्या मनावर निराशेचं मळभ दाटून येतं. या दगडाला नेमका मीच सापडलो.आतापर्यंत किती ट्रेकर्स इथे येऊन गेले असतील,पण मी त्यावर चढायला आणि हा जागचा हलायला... काय पण माझं नशीब आहे! अंगावरच पडला असता तर विषय तरी संपला असता! पण असं जायबंदी करून देव माझी परीक्षा का घेतोय ?' नाना विचार त्याच्या मनात येऊ लागतात.पण येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय गत्यंतर नसतं.
उरलेल्या पाण्यातला अर्धा घोट पिऊन रात्रीशी सामना करण्याच्या तयारीला लागतो.रात्र पडते तस त्या घळीतल तापमान झपाट्याने उतरू लागतं.डास आणि आणखी कसकसले किडे भोवती घोंघावायला लागतात.उभं राहून राहून पायाला रग लागलेली असते.अशा स्थितीत झोप लागणं अशक्य असतं,पण तरीही किमान बसता येण्याजोगी काही सोय करता येईल का याचा अॅरन विचार करू लागतो.
त्याच्याकडे रॅपलिंगचं सामान असतं.दोर,कॅरॅबिनर्स, अँकर्स,हुक सगळं काही.मनातली निराशा बाजूला सारून तो या प्रॉब्लेमची उकल करण्याच्या मागे लागतो. थोडा वेळ निरीक्षण केल्यावर दगड जिथे दुसऱ्या बाजूला भिंतीला टेकलेला असतो तिथे अँकर करण्याची कल्पना त्याला सुचते.बराच वेळ खटाटोप करून अखेर पाय वर करून बसता येईल अशी दोरीची सीट तो तयार करतो.
पायावरचं वजन कमी झाल्यावर त्याला थोडा दिलासा मिळतो.अर्थात पंधरा मिनिटांतच त्याला त्याही स्थितीत त्रास व्हायला लागतो.पुढची रात्र तो थोडा वेळ बसून,थोडा वेळ उभा राहत आणि बराचसा वेळ स्विस नाइफने दगड फोडत काढतो.
थंडीशी सामना करण्यासाठीही ती हालचाल गरजेचीच असते.सकाळी सूर्याची किरणं घळीत येतात आणि अॅरनच्या चित्तवृत्ती पुन्हा थोड्या उल्हसित होतात.तो नव्या जोमाने दगड फोडण्याच्या कामी लागतो.मनातल्या मनात पुन्हा एकदा आपल्या संकटाचा अभ्यास करायला घेतो.आपण पुरेसा विचारच केला नाही आणि त्यामुळे एखादा उपाय सुचायचा राहून गेला तर काय, अशी भीती त्याला वाटत असते.दगड हलवल्याशिवाय आपली सुटका होणार नाही.कपचे काढून दगड हलायला तयार नसेल तर आपल्यालाच दगड हलवता येणं शक्य आहे का,त्याच्या मनात येतं.आपण दोराचा उपयोग करून पायांवरचा ताण कमी केला.
तसाच दोरीचा पुलीसारखा वापर करून दगड उचलता येऊ शकतो का?अॅरनमधला इंजिनियर जागा होतो.
आपल्याला दगड अख्खा उचलायचा नाहीय.दगड दोन इंच जरी हलला तरी आपण हात बाजूला काढून घेऊ शकतो.नाही तरी आपण अडकलेलोच आहोत,तर हाही प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे,असं म्हणत (तो म्हणजे अॅरन) कामाला लागतो.
( मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन,पुणे)
दगडाचे कच्चे-पक्के दुवे समजून घेत वेळाकाळाचं भान हरपून तो सगळ्या साहित्यानिशी दगडाला भिडतो जवळपास तीन तास काम केल्यानंतर दगडाभोवती दोरीचा अँकर टाकण्यात त्याला यश येतं.या यशाबद्दल तो स्वतःला एक बक्षीस देऊ करतो.ठरलेल्या वेळेआधी काही थेंब पाणी पिण्याची सवलत ! आता फक्त दोर ओढून पाहणं बाकी असतं. तो पूर्ण ताकदीनिशी दोर ओढतो,पण काहीच घडत नाही.तो भला थोरला दगड किंचितही जागचा हलत नाही.पण एवढ्यात हार जाणं त्याला मान्य नसतं.त्यामुळे पुढचे दोनेक तास जीव खाऊन तो प्रयत्न करत राहतो,पण परिणाम शून्य.
तेवढ्यात अचानक त्याला बाहेरून कसला तरी आवाज येतो.
अचानक त्याचं काळीज उसळी घेतं.तो कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो.दगडांवर बुटांच्या थापा पडताहेत असं त्याला जाणवतं.कुणी तरी येतंय..तो खच्चून ओरडतो,"वाचवा, वाचवा!" काहीच घडत नाही. थोडा वेळ थांबून तो कानोसा घेतो.आवाज येतच असतात.तो पुन्हा ओरडतो,शिरा ताणून ओरडतो. कोणीच ओ देत नाही,पण आवाज मात्र अजूनही येतच असतो.लक्ष देऊन पाहिल्यावर त्याच्या लक्षात येतं की घळीतल्या बिळांमध्ये एक उंदीर पळापळ करतो आहे.मघाशी उसळून वर आलेलं त्याचं मन पुन्हा मान टाकतं. त्याच्या मनात येतं,आपण उगीचच आशा धरून बसलोय.आपला अंत इथे,या घळीमध्ये होणं ठरलेलं असणार.
आणखी एका दिवसात आपल्याकडचा अन्नपाण्याचा साठा संपेल.
मग हळूहळू आपला मरणाकडे प्रवास सुरू होईल.फक्त मृत्यू कसा येईल तेवढंच काय ते रहस्य.खरोखर मृत्यू आला तर तो कसा येईल,हा विचारही अॅरनला भारून टाकतो.
डीहायड्रेशनमुळे आपला एकेक अवयव निकामी होत जाईल का? की आपल्या किडन्या खराब होतील? किडनी निकामी झाली की नेमका काय त्रास होतो? आपल्याला खूप वेदना होतील का? प्रत्यक्ष प्राण जायला किती काळ लागेल? त्यापेक्षा ग्लानी येऊन त्यातच मरण आलं तर बरं.की तेवढ्यात पाऊस पडायला लागला आणि ही घळ पाण्याने भरून गेली तर पाण्यात गुदमरून आपला जीव जाईल ? रविवारी दुपार होते.घळीत अडकून चोवीस तास उलटलेले असतात.सगळ्या पर्यायांचा विचार करून झाल्यावर अॅरनच्या लक्षात येतं की आपली आपण सुटका करून घ्यायची असेल तर हात कापण्याला पर्याय नाही. त्याच्या स्विस नाइफमध्ये दोन चाकू असतात.त्यातल्या मोठ्या चाकूची धार दगड फोडून फोडून त्याने आणखी बोथट केलेली असते.त्यामानाने छोट्या चाकूला थोडी जास्त धार असते.पण कितीही धारदार चाकू असला तरी त्याने हाताचं हाड कापलं जाणार नाही हे अॅरनला माहीत असतं.पण त्याचं एक मन म्हणत असतं,'प्रयत्न तर करून बघ.
प्रयत्नच केला नाहीस तर इथेच मरून जाशील.' तर दुसरं मन अॅरनसमोर नाना शंका समोर उभ्या करत असतं : 'समजा हात कापणं जमलंच…
राहिलेला शेवटचा भाग…पुढील लेखामध्ये…