* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मित्र एक देणगी / Friends a donation 

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२/८/२५

मित्र एक देणगी / Friends a donation 

सोन्याचा हिशोब मांडणाऱ्यापेक्षा मित्र जोडत जाणारा माणूसच खराखुरा श्रीमंत….!!


दुसऱ्या दिवशी सकाळी जेसन येऊन कॉन्फरन्स रूममध्ये वाट पहात बसला असल्याचं मला मागरिटनं सांगितलं.काम आणि पैसा या प्रदेशातली त्याची यशस्वी फेरी झाल्यावर त्याच्या धुमसत राहाण्यामध्ये सुधारणा झाली असेल अशी मला आशा वाटली होती.पण कॉन्फरन्स रूममध्ये आल्या आल्याच तसं काही नसल्याचं मला लगेच लक्षात आलं.मी खाली बसण्याच्या आतच त्यानं माझ्यावर टिकेची सरबत्ती सुरू केली.


"हे बघा,ह्या सगळ्या झंझटातून मला कशाला जायला लावताय ? हास्यास्पद आहे हे.मृत्यूपत्राची प्रत तुमच्याजवळ आहे.मला वारसा म्हणून काय मिळणार ते तुम्हाला ठाऊक असणारच.या केरकचऱ्याला चिवडत बसण्याचं टाळून आपण मूळ मुद्यालाच पोचू या ना ? बॉटमलाइन पर्यंतच पोचू सरळ."


जेसनकडे पाहून मी स्मित केलं.आणि म्हणालो, "सुप्रभात जेसन.तुला भेटून छान वाटलं.तुझ्या थोर काकांच्या पैशाबद्दलच्या धड्यानंतर या प्रक्रियेबद्दलची तुझी समज वाढली असेल अशी मला आशा वाटली होती."


मी हळूहळू उभा राहिलो.ऐंशी वर्षांचे वय झाल्यावर हे नेहमीचेच होऊन जाते.मी त्याच्याकडे रोखून पाहिलं, एक जज म्हणूनच्या कारकिर्दीत तसं बघून मी यशस्वी झालो होती.मी म्हणालो,

"तुझ्यापुढे दोन आणि दोनच पर्याय आहेत गड्या.रेड स्टीव्हन्सनं तुझ्यासाठी सांगून ठेवलेल्या प्रक्रियेतून तू जायचं तरी,किंवा आत्ताच्या आत्ताच तू त्यातून बाहेर पडू शकतोस.पण मी तुला एक गोष्ट सांगतो,तुझ्या वागण्यामुळे तुझ्या चुलत आजोबांनी तुला जी सर्वोत्तम देणगी ठेवली आहे ती घालवण्याच्या तू फार जवळ येऊन ठेपला आहेस."


जेसन खुर्चीत मागे रेलून बसला आणि त्यानं सुस्कारा सोडला.

"ठीक आहे,चालू ठेवू या आपण हे.बोला,पुढचं काय ?"


मागरिटनं खोका आणून माझ्या पुढ्यात ठेवला.मी टेप बाहेर काढली.आणि मागरिटन ती व्हिडिओ प्लेअर मध्ये टाकली.तिनं तो चालू केला. "जेसन,तुझ्या पहिल्या भेटीतच मिस्टर हेमिल्टन हा माझा अगदी जवळचा मित्र असल्याचं तू ऐकलंस.


अर्थ न समजताच मित्र हा शब्द साळढाळपणे वापरला जातो.हल्ली ओळखीच्या कोणाही परिचिताला लोक मित्र म्हणतात.माझ्या एवढा जगलास आणि खरेखुरे मित्र मोजायला दोन्ही हातांची बोटे लागायला लागली तर स्वतःला नशीबवान समज.


"जेसन,तुला मी आत्ता जी गोष्ट सांगणार आहे ती मी जिवंत असेपर्यंत कोणाला न सांगण्याचं ठरवलं होतं. आता तू माझ्या मृत्युनंतर हे पाहातो आहेस आणि सोबत माझ्या विश्वासातला एकजण आहे.मला सांगताना निर्धास्त वाटतंय.तुला ठाउक आहेच की पंचाहत्तरावा वाढदिवस उलटून जाईपर्यंत मी जगलो. आणि बऱ्याच लोकांच्या दृष्टीनं दीर्घ आणि निरामय आयुष्य होतं ते.परंतु कायम ही स्थिती होती असं मात्र नाही.


"मला आठवतंय,मी अठेचाळीस वर्ष नुकतीच ओलांडली असताना गंभीर दुखण्यानं आजारी झालो होतो.नक्की काय झालंय,त्याचं निदान डॉक्टरांना करता येईना.म्हणून त्यांनी देशभरातून तज्ज्ञ आणले.अखेर निदान एका दुर्मिळ किडनीच्या रोगाचं झालं,की जो असाध्य होता.त्यावर एकच आशा होती ती त्या काळात नवीनच निघालेल्या किडनी रोपणाच्या शस्त्रक्रियेची.


"आता तुला हे लक्ष्यात घेतलं पाहिजे की हा सगळा अश्रुतपूर्व प्रकार होता आणि किडनी काढून मिळणं त्या काळात हल्लीच्या सारखं सहज शक्य नसे.मी हॅमिल्टनला बोलावून घेतलं.(तो माझा नेहमीच वकील राहिलेला आहे) आणि त्याला देशभर किडनीचा शोध घ्यायला सांगितलं.मी पुरताच घाबरून गेलो होतो, विशेषज्ञ तर बोलून गेला होता की रोपण केलं नाही तर मी काही आठवड्यांचाच सोबती होतो.दोन दिवसांनी मला पूर्व किनाऱ्याकडून एक किडनी मिळत असल्याचं मिस्टर हॅमिल्टननं सांगितलं आणि माझ्या जीवात जीव आला."शस्त्रक्रिया यशस्वी झाली हे तुझ्या लक्षात आलं असेलच.मला माझं अर्ध,

प्रौढावस्थेतलं आयुष्य मिळालं. ज्याचा तुला अंदाज करता येणार नाही याची मला खात्री आहे,आणि आजपावेतो हे इतर कुणालाही माहीत नाही की मिस्टर हॅमिल्टनने शोधून आणलेली किडनी त्याची स्वतःची होती."


पडद्यावरचा रेड पाणी प्यायला थांबला आणि जेसन माझ्याकडे अविश्वासाने बघायला लागला.मोठ्या पडद्यावर रेडचं बोलणं पुढे सुरू झाल.या जगात अशा घटनेचा उलगडा एकाच गोष्टीनं होतो आणि ती म्हणजे मैत्री.जेसन मला ठाऊक आहे की तुला वाटतं की तुला खूप मित्र आहेत.पण खरं म्हणजे असे खूप जण आहेत की ज्यांना केवळ तुझा पैसा किंवा त्याच्या साह्याने विकत घेता येतील त्या गोष्टी हेच हवं असतं.गस् कॉल्डवेलच्या बरोबर जेवढा काळ तू घालवलास तो काळ सोडला तर तू आयुष्यात एकही दिवस काम केलं नाहीयेस.आणि काही उत्पादक म्हणावं असंही काही तुझ्या हातून घडलं नाहीये.पार्टीमध्ये इतरांची करमणूक करणारा तू तर पार्टीची जान असायचास आणि सहजपणे त्या कंपूतल्या टवाळांना पैसे पुरवणारा तू एक कूळ होतास.(अन् त्यांना तू सहजपणे मित्र म्हणतोस).


"पुढचे तीस दिवस तू विचार करून निरीक्षण करण्यात घालवावीस.या अवधीत खरीखुरी मैत्री कशाला म्हणायचं याची तत्त्वं तू मनाशी ठरवायची आणि मग मिस्टर हॅमिल्टनला तुझी तत्त्वं लागू पडणाऱ्या खऱ्याखुऱ्या मैत्रीचं एक उदाहरण सांगायचं.चांगल्या मैत्रीची समज येऊन तू ती जोपासलीस तर तुझ्या जीवनाचा स्तर खूप उंचावेल,यापरते अन्य जीवनात काही नाही."


व्हिडिओ टेप संपली.आणि जेसन विचारात गढून गेला. शेवटी पुटपुटला,"मला समजत नाहीये.म्हणजे..."


मी मधेच म्हणालो,"तुला समजत नाहीये हे ठाऊक आहे मला,पण तोच तर मुद्दा आहे.मला एवढीच आशा वाटते की तुझ्या चुलत आजोबांचे शब्द तू विसरणार नाहीस आणि तुझ्या हिताचा विचार केला तर महिन्याच्या अखेरपर्यंत तुला जरा समजायला लागेल.मी तुझ्या रिपोर्टची वाट बघतो." मी कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडलो आणि जेसन स्टीव्हन्स या तरूणाला त्याच्या गृहपाठाचा विचार करायला सोडून दिले.


पुढच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिस् हेस्टिंग्जनं माझ्या ऑफिसात येऊन सांगितलं की जेसननं आगाऊ वेळ ठरवून घेतली आहे.आणि तो तासाभरात हजर होणार आहे.मी रेलून खुर्चीत बसल्या बसल्या रेड स्टीव्हन्सचा,माझ्या जीवलग मित्राचा विचार करत होतो. ज्यांनी स्वतः कधी अनुभवलं नाही अशांना खास करून मैत्रीचा खोलवर रूजत जाणारा विचार कसा तुम्ही शिकवणार याची मला शाश्वती नव्हती.रेड स्टीव्हन्सनं जेसनवर जे जिकिरीचं काम सोपवलं होतं.त्यात तो कितपत यशस्वी होतो याबाबत मी चांगलाच साशंक होतो,किंबहुना दुःशंकच होतो.


कॉन्फरन्स टेबलशी आम्ही जमलो तेव्हा मिस हेस्टिंग्ज आणि मी गप्पच होतो.आम्ही दोघं जेसनची अभिव्यक्ती, त्याची रीत यांच निरीक्षण करत होतो.त्याच्या मनावर दडपण असल्या सारखं वाटत होतं.आम्हाला अभिवादन केल्यासारखं करत तो पुटपुटला, "मला वाटतं... मला म्हणायचं... मला की नाही...".


त्याला रोखत मिस् हेस्टिंग्ज म्हणाली,"मैत्रीची भावना तुला कितपत उमजली आहे याचा मिस्टर हॅमिल्टनला आज तू अहवाल द्यायचा असं आपलं ठरलयं."


जेसननं साशंकपणे माझ्याकडे पाहिलं आणि मान हलवून मी त्याला हसून प्रोत्साहन दिलं.


न त्यानं सुरूवात केली."या महिन्यात मी मैत्रीवर खूप विचार केला आणि मैत्रीची व्याख्या करतांना त्याची काही तत्त्वं मला सापडली.

मैत्रीमध्ये निष्ठा,बांधिलकी यांच्याबरोबर दुसऱ्याच्या सुखदुःखात आपली समरसता असते,एवढं मला आज म्हणता येतंय.

यापलिकडचं हे खरंतर असतं.पण शब्दात सांगणं कठीण आहे.


"टेक्ससमध्ये काम करत असतांना गस् कॉल्डवेलने मला एक गोष्ट सांगितली ती मी तुम्हाला माझ्या तत्त्वांचं उत्तम उदाहरण म्हणून सांगू शकतो.त्यानं सांगितलं की तो आणि अंकल रेड यांनी गुराढोरांच्या व्यवसायास सुरूवात केली तेव्हा दोघांच्या रँचेसमध्ये मैलोन मैल अंतर होतं.त्याच दक्षिणोत्तर पसरलेल्या पट्ट्यात इतर रँचेस् होती.प्रत्येक वसंत ऋतुत सर्व रँचेसमध्ये जे राऊण्डअप म्हणतात ते व्हायचं.म्हणजे असं की सगळी नवी वासरं एकत्र करून त्यांच्यावर मालकीच्या खुणा केल्या जायच्या.नवी वासरं म्हणजे आधीच्या राऊण्डअप नंतरची वासरं."मला मिस्टर कॉल्डवेल नं सांगितलं की छोटी वासर नेहमी आपापल्या आयांच्या मागेमागे जात असतात.प्रत्येक रँचच्या मालकांच्या हजेरीतच आई आणि वासर यांच्यावर एकसारखी खूण केली जाते.


"असं दिसतंय की सुरूवाती सुरूवातीला अंकल रेड रँचर म्हणून यशस्वी होईल की नाही याची मिस्टर कॉल्डवेलला फिकीर वाटत होती.गस् नं त्याच्या असलेल्या वासरांपैकी काही वासरांवर अंकल रेडची खूण केली.अशानं त्यानं अंकल रेडला तीस वासरं जास्त दिली होती.असं मला त्यानं सांगितलं.


"पण राऊंडअपच्या शेवटी जेव्हा गसनं आपल्या गुरांची मोजदाद केली तेव्हा तीस वासरं कमी असण्या ऐवजी त्याच्याकडे उलट पन्नास जास्तच होती.तो बुचकळ्यात पडला."या घटनेबाबत तो बरीच वर्षं गोंधळातच होता पण एकदा त्याचा उलगडा झाला.तेव्हा मिस्टर कॉल्डवेल आणि अंकल रेड एकदा मासेमारी करायला गेले होते.अंकल रेडनं त्याला सांगितल की त्यांनी सुरूवात केली तेव्हा गस् ला कसा काय व्यवसाय जमेल,अशी त्याला फिकीर होती.

त्याला शेजारी आणि मस्त मित्र असलेला गस् गमवायचा नव्हता म्हणून त्यानं अगोदरच तीसएक वासरांवर गस् कॉल्डवेलची खूण केली होती."जेसन थांबला आणि मी आणि मागरिटकडे त्यानं संमतीसाठी पाहिलं. त्यानं पुढं बोलणं चालू ठेवलं. "गस् कॉल्डवेलनं अंकल रेडबाबत मला सांगितलेली ही गोष्ट मला समजलेली मैत्रीची तत्त्वं उत्तम प्रकारे दाखवते.अशी मैत्री जमायला खूप वर्ष जावी लागतात हे मला कळलंय पण मला वाटतं ती अगदी वसूल होत असली पाहिजेत."तुम्हाला माहित आहेच की मागच्या महिन्यात मला ब्रायन भेटला,तेव्हा त्याची रस्त्याच्या कडेला गाडी बिघडली होती.त्याच्या गाडीला नवीन इंजिन बसवायला मी मदत केली होती.तेव्हापासून आम्ही खूप गोष्टी एकत्रितपणे केल्या.मला वाटतं की एक दिवस गस् कॉल्डवेल आणि अंकल रेडसारखे आम्ही मित्र होऊ."


(सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल स्वाधारित कलासामग्री- डॉन बिलिंग्ज,अनुवाद-दिशा केळकर)


जेसननं माझ्याकडे रोखून पाह्यलं आणि तो म्हणाला, "आणि मला उमेद आहे की तुम्ही जसे रेड स्टीव्हनसचे मित्र होतात तसा मी एक चांगला मित्र होईन."


मी हसत हसत जेसनला म्हणालो,"मला खात्री वाटते की तू आयुष्यभर पुरेल असा मैत्रीच्या भावनेचा धडा शिकला आहेस.मी तुला इतकंच सांगतो की मैत्रीखातर आपण जे जे करतो त्याचं फळ कैकपटीनं मिळतं."


रेड स्टीव्हन्स आणि गस् कॉल्डवेल यांच्यामधली ती गोष्ट सांगितल्याबद्दल मी जेसनचे आभार मानले पन्नासेक वर्षांपासून मला माहीत आहे की ती दोन उत्तम माणसं, उत्तम मित्र होते.गस् कॉल्डवेलनं सांगितलेली गोष्ट उत्तम मैत्रीचं आणखी एक उदाहरण होतं.मिस् हेस्टिंग्ज जेसनला घेऊन कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडली.आणि जुन्या आठवणीत बुडालेला मी एकटाच राहीलो.मी खुर्चीत मागे टेकून बसलो आणि रेड स्टीव्हन्स माझा जन्मभराचा दोस्त,त्याच्या आठवणी येतच राहिल्या.अगदी सहजगत्या आमची मैत्री जमली. आणि ही दोस्ती पुढे इतकी गहिरी बनेल याची आम्हाला सुरूवातीला कल्पनाही नव्हती.


मित्र कसं व्हावं हे समजायची जेसनची आत्ताच कुठे सुरूवात होती.मला वाटायला लागलं की रेड स्टीव्हन्स आणि मी जसा मैत्रीचा आनंद अनुभवला तसा जन्मभर मैत्रीचा आनंद जेसनला मिळो.