(संन्यासी पीटर…) रोमन चर्चची संघटना मानवजातीला आशीर्वादरूप व्हावी म्हणून करण्यात आलेली होती.
शांतीच्या निशाणाखाली साऱ्या जगाचे एकीकरण करण्याचा तो ऐतिहासिक कालातील पहिला प्रयत्न होता.चर्चचे पहिले पहिले काही पाद्री व धर्मादेशक खरोखरच देवाचे लोक होते.
नम्रता,सहिष्णुता,निःस्वार्थ जनसेवा,या गोष्टी त्यांच्या जीवनात भरलेल्या दिसत.
ते गॅलिलीच्या थोर दैवी धर्म संस्थापकांचे सच्चे अनुयायी भासत.या अनेक शतकांच्या इतिहासात कॅथॉलिक चर्चने कित्येकदा तरी अन्यायाविरुद्ध न्यायाची बाजू घेतलेली आहे,द्वेष सोडून शांतीची घोषणा केली आहे व युद्धातील विनाशाऐवजी सौंदर्यनिर्मितीवर भर दिला आहे.
पण चर्चचे वरचे पदाधिकारी मात्र नेहमीच हृदयातील देवाचा आवाज ऐकत नसत.त्यांचे दुसरे धंदे असत.बिशप व पोप पुष्कळदा क्षुद्र राजकारणात रंगून जात.पृथ्वीवर न्यायाचे राज्य करण्याऐवजी आपले खिसे सोन्याने कसे भरतील, एवढेच ते पाहत.त्यांच्या हाती चर्च हे दुसऱ्यांना अमानुषपणे छळण्याचे,मारण्याचे व त्यांच्यावर जुलूम करण्याचे साधन मात्र झाले.शार्लमननंतरच्या पाचशे वर्षांचा इतिहास हा मानवजातीच्या इतिहासातला अत्यंत किळसवाणा व लज्जास्पद भाग होय.या काळात चर्चमध्ये सतत स्पर्धा व मत्सरच दिसतात,धर्मवेडेपणास ऊत आलेला दिसतो आणि कत्तली, लुटालुटी व ख्रिश्चन आणि मुसलमान यांमधील धर्मयुद्धे यांचा सुळसुळाट झालेला दिसतो.या पाच शतकांचा इतिहास निरनिराळ्या इतिहासकारांनी निरनिराळ्या दृष्टींनी लिहिलेला आहे.अनेकांनी त्याची ओढाताण केली आहे.या विद्रूप व भेसूर काळाच्या इतिहासावरील रक्ताचे डाग,
त्याच्याभोवती दिव्य तेजोवलये निर्मून लपविण्याचे प्रयत्न कित्येकांनी केले आहेत.वेल्ससुद्धा आपल्या 'जगाच्या इतिहासाची रूपरेषा' या ग्रंथात मध्ययुगासमोर जणू भक्तिभावाने गुडघे टेकताना आढळतो.तो म्हणतो, "ख्रिश्चन चर्चने पवित्र युद्धाच्या नावाने लोकांतील उत्कट भावनांचे संघटित एकीकरण केले,ही फारच मोठी गोष्ट होती. हे काम महत्त्वाचे व फारच चांगले होते. ही 'पवित्र युद्धां' ची चळवळ पेटविणारा पीटर नामक ख्रिश्चन यती होता.तो रक्तपिपासू कोल्हा असूनही वेल्सला जणू हिब्रू प्रेषितच वाटतो! ती धर्मयुद्धे वाचून,त्या हकिकती ऐकून वेल्स नाचू लागतो,
उत्साहाने वेडावून जातो व लिहितो,या काळाचा इतिहास मोठा आकर्षक आहे.लेखणीवर बसून या इतिहास क्षेत्रात खूप रमावेसे वाटते. युरोपजवळ काही ध्येय आहे,असे या काळातच आपणास प्रथम आढळते.युरोपला आत्मा आहे,ही गोष्ट या काळातच प्रथम दिसून येते."
वेल्सला जे 'ध्येय' व जो 'आत्मा' या काळात दिसल्याचा भास झाला,त्याची वास्तविक किंमत काय आहे हे पाहू या.या काळाचे बिनचूक चित्र मी हे थोडक्यात देतो.या मारामाऱ्यांचे सविस्तर वर्णन कंटाळवाणे होईल.मी तर या गोष्टींकडे गंभीरपणे पाहूच शकत नाही.पण जरा फेरफटका मारून येऊ या.या धर्मयुद्धातील पहिले युद्ध उद्भवण्याचे कारण प्रथम पाहू या.शार्लमनने चाबूक मारून नाखूश व हट्टी युरोपला नवधर्माची दीक्षा दिली होती,जुना धर्म लोपला होता व चर्चचे बडे बडे अधिकारी दिवसेंदिवस व्यभिचारी व अधःपतित होत होते. काही उदारात्मे त्या काळीही होतेच.खऱ्या भक्तिप्रेमाने रंगलेले,ख्रिस्ताला शोभेसे काही सौम्य व शांत लोक या काळातही आढळतातच.
पण अशा लोकांना चर्चमध्ये महत्त्वाचे स्थान नसे. क्षुद्र प्रवृत्तीचीच माणसे बहुधा अधिकाराच्या जागांकडे ओढली जात असतात.धकाधकी करणारे,पुढे घुसणारे,
अहंमन्य,स्वार्थपरायण लोकच सत्तेसाठी हपापलेले असतात.त्यांना झगडे करण्यात कसलीही दिक्कत वाटत नाही.वाटेल ते करायला ते तयार असतात,बिलकूल मागेपुढे पाहत नाहीत.असे लोकच पुष्कळदा चर्चमधल्या बड्या बड्या जागांवर निवडून येत.बहूतेक सर्व पोप मूर्तिमंत पापात्मेच असत.प्राचीन रोमन सम्राटांप्रमाणे पोपही भराभर धर्माच्या गादीवर येत व पुष्कळांचे खून होत.कोणाकोणांवर विषप्रयोगही होत.पोप सहावा स्टीफन,पोप बारावा जॉन,पोप सहावा अलेक्झांडर वगैरे दाखवून देतात की,सत्य हे कादंबरीहूनही विचित्र व कुरूप असू शकते.जरा गंभीर वृत्तीच्या इतिहासकारांनी अनुल्लेखाने या पापात्म्यांच्या दुष्कृत्यांची जगाला विस्मृती पाडली आहे;किंवा रोमन उत्तारे टाळून 'त्यांची कृत्ये जगजाहीर होणार नाहीत' याबद्दल काळजी घेतली आहे.या पोपांची ख्रिश्चन धर्माला न शोभणारी दुष्कृत्ये पुन्हा जिवंत करून सांगणे ठीक होणार नाही;व त्याचा काही उपयोगही नाही.यांचे खासगी जीवन कादंबरीकारास करमणुकीचे वाटेल;पण इतिहासकाराला त्याचा काडीचाही उपयोग नाही. एक गोष्ट आपण ध्यानात घेऊ या की,असल्या लोकांच्या द्वेषमत्सरातूनच रोमन कॅथॉलिक चर्च व ग्रीक चर्च यांच्यामध्ये भीषण मतभेद माजले ! मुळात ख्रिश्चन धर्मातील काही मतभेदांवरच हे दोन्ही संप्रदाय उभे होते;पण पुढे दोन्ही बाजूंस वैयक्तिक महत्त्वाकांक्षा उभ्या राहिल्या. इ.स. १०५४मध्ये रोमन चर्चच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रीक चर्चच्या पदाधिकाऱ्यांना कह्यात ठेवता येत नाही असे पाहून ग्रीक चर्च धर्मबाह्य ठरविले व "ग्रीक चर्चचे सारे पाद्री कायमचे नरकात पडतील."असे उद्घोषिले.ग्रीक चर्चही स्वस्थ बसले नाहीच.त्यानेही त्याच प्रकारे उत्तर दिले.क्रूसेडस् या नावाने जो विनाशाचा भीषण भोवरा पुढे सारखा फिरू लागला.त्यात मिसळलेल्या अनेक प्रवाहांपैकी ग्रीक चर्च व रोमन चर्च यांतील भांडण हा मुख्य प्रवाह होता.क्रूसेडरमधील पहिले युद्ध म्हणजे केवळ ख्रिश्चनांचा मुसलमानांवरील हल्ला नसून त्यात ग्रीक चर्चला शरण आणण्याचाही डाव होता.
क्रूसेड्सचे दुसरे एक कारण म्हणजे,नॉर्मन लोकांनी केलेल्या स्वाऱ्यांमुळे सर्वत्र उत्पन्न झालेली अशांतता तद्वतच बेदिली.हे नॉर्मन लोक युरोपच्या पूर्वेस व पश्चिमेस सर्वत्र लोंढ्याप्रमाणे पसरले.युरोपातील आधीच लोकसंख्या खूप वाढलेल्या देशांत नॉर्मनांची आणखी गर्दी झाली.त्यांनी हजारो घरेदारे बळकावली.त्यामुळे घरादाराला मुकलेले लोक युरोपभर भटकत होते.ते आशियावर स्वारी करून परधर्मीयांना त्यांच्या घरातून हुसकून द्यायला अधीर झाले होते.ते या कामासाठी तयारच होते.तिसरे कारण युरोप व आशिया यांमधील व्यापारी स्पर्धा,क्रूसेडसूच्या नेत्यांना जेरुसलेम क्षेत्र ख्रिश्चनांस सुरक्षित करावे, असे तर वाटत होतेच; पण त्याहीपेक्षा युरोपच्या व्यापारासाठी जग बिनधोक करावे, असे अधिक तीव्रतेने वाटत होते. क्रूसेडस् करणारांना हाच हेतू अधिक उदात्त वाटत होता.
चौथे कारण म्हणजे,पोप दुसरा अर्बन याची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा,आपले जरा डळमळीत झालेले आसन भक्कम करावे असे त्याच्या मनाने घेतले.त्यासाठी त्याने आपल्याभोवती गुंड व पुंड जमवून त्या बाजारबुणग्या लुटारूंना 'धर्मयुद्ध' दिले. तो त्यांना म्हणाला,"तुम्ही तिकडे पूर्वेकडील ज्यू वगैरे विधर्मीयांना ठार कराल तर प्रभू तुम्हांस सर्व पापांपासून मुक्त करील."अशा रीतीने पोप म्हणजे जणू ईश्वराचा शापच झाला! पोप ही चर्चच्या इतिहासातील एक अत्यंत शक्तिसंपन्न व्यक्त झाली.
शेवटचे कारण यती पीटर याचा असहिष्णू स्वभाव.अमीन्सचा भिक्षू पीटर हा पहिल्या क्रूसेडचा आत्मा तो बुटका व अर्धवट होता.त्याने पहिल्या क्रूसेडमध्ये प्राण ओतला.त्यानेच धर्मयुद्धाचे ध्येय दिले.
भिक्षु पीटर हा अकराव्या शतकातला कॅटो होता. कॅटोने कार्थेज धुळीला मिळविण्यासाठी रोमनांना चिथावले,
उठविले;पीटरने 'जेरुसलेम ताब्यात घ्या' अशी ख्रिश्चनांस चिथावणी दिली.दोघेही…(मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,
अनुवाद-साने गुरुजी, मधुश्री पब्लिकेशन)अतिशयोक्तीने बोलणारे व शापवाणी उच्चारण्यात प्रवीण होते.पीटर,पोप दुसरा अर्बन याजकडे गेला व त्याने त्याला 'जेरुसलेममधले तुर्की मुसलमान ख्रिश्चन यात्रेकरूंचा अपरंपार छळ करतात',
असे सांगितले.ते अगदीच खोटे होते असे नव्हे.अकरावे शतक म्हणजे धार्मिक छळाचेच शतक म्हणा ना! सारे जग द्वेषाच्या वावटळीत सापडले होते. मुसलमान ख्रिश्चनांची,तर ख्रिश्चन मुसलमानांची कत्तल करीत होते आणि ज्यूंची कत्तल तर काय, सर्वच करीत ! न्यायासाठी शस्त्र घेण्याला योग्य असे खरोखर कोणाचेच हात नव्हते.सारेच अपराधी व दोषी,सारेच खुनी व गुन्हेगार ! पण पोपने एकांगी दृष्टी ठेवली व ख्रिश्चनांच्या पापांकडे डोळेझाक करून मुसलमानांना मात्र धडा शिकविण्याची पवित्र प्रतिज्ञा केली.त्याने इ.स. १०९५ मध्ये क्लमांड येथे धर्मसभा बोलाविली व ती पुढे जळजळीत द्वेषाचे प्रवचन केले.ते साऱ्या दुष्ट भावना जागृत करणारे व मुसलमानांबद्दल सर्वांस चीड आणणारे भाषण होते.तो म्हणाला,"तुम्ही या पवित्र युद्धात भाग घ्याल तर तुम्ही ईश्वराचीच कृपा मिळवाल असे नव्हे,तर ऐहिक दृष्टीनेही तुमचा फायदाच होईल.मेल्यानंतर ईश्वराचे राज्य,इहलोकी भरपूर लूट ! हे युद्ध अशा रीतीने दोन्ही लोकी फायदेशीर आहे.पॅलेस्टाईन म्हणजे समृद्ध व संपन्न देश.दुधा-तुपाने,
मनाने व द्राक्षांचे भरलेला देश..
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!