तुपाने,मधाने व द्राक्षांनी भरलेला देश.जे कोणी परधर्मीयांपासून पॅलेस्टाईन जिंकून घेतील. त्यांच्यात ती जमीन वाटली जाईल.तर धर्मयुद्ध करा." हे भाषण ऐकून जमलेल्या कोल्ह्याकुत्र्यांनी जिभा चाटावयास सुरुवात केली.ते एकदम म्हणाले, "ईश्वराचीच अशी इच्छा आहेसे दिसते." या थोर युद्धासाठी निघण्याच्या तयारीला ते लागले.
पीटर या लोकांच्या टोळीचा नेता झाला.तो शरीराने खुजा,
बुद्धीने अप्रगल्भ व मनाने संकुचित आणि असंस्कृत होता.त्याचे चारित्र्यही तिरस्कारणीय होते. तो केसाळ झगा वापरी व पायात काहीच घालीत नसे.त्याच्या डोक्यावरचे केस पिंजारलेले असत.ही खुनशी स्वारी गाढवावर बसे.गाढवाला तो पवित्र मानी.त्याच्या हातात एक लाकडी क्रॉस असे.हा पीटर फ्रान्समध्ये व जर्मनीत सर्वत्र हिंडला.
चर्चमध्ये,रस्त्यांत,कोपऱ्याकोपऱ्यांवर त्याने प्रचाराचा धुमधडाका उडविला.गिबन म्हणतो, "पीटरजवळ बुद्धी नव्हती,युक्तिवादही नव्हता.पण ही उणीव भरून काढण्यासाठी तो पदोपदी ख्रिस्ताचे नाव उच्चारी,मेरी व देवदूत यांचे उल्लेख करी व या सर्वांबरोबरच आपले बोलणे होत असते. असे सांगे." १०९६ च्या वसंत ऋतूंत त्याने जवळजवळ एक लाख लोकांचा तांडा जमा केला. त्यात बहुतेक सारे भिकारी,डाकू व गळेकापू होते. तो त्या सर्वांच्या अग्रभागी होता.एक पवित्र हत्ती व एक मेंढी त्या सर्वांपुढे चालत,या गोष्टीवरूनच त्याच्या बुद्धीची प्रगल्भता दिसून येते.मेंढीच्या मार्गदर्शकत्वाखाली निघालेले लोक ! अशा थाटात पीटर ख्रिश्चन नसणाऱ्या सारासीन मुसलमानांस ठार करण्याच्या अती थोर ध्येयासाठी निघाला.
त्याला दिसून आले की,सारासीन अजून बरेच दूर असले,तरी मारामारी जवळच आहे.ज्यूंची कत्तलही त्याला इष्टच होती.
त्यांचा देव ख्रिश्चनांचा देव थोडाच होता? म्हणून त्याने आधी ज्यूविरुद्धच क्रूसेड सुरू केले.जिथे जिथे तो जाई तिथे तिथे ज्यूंची वस्ती असली,तरी तो त्या सर्वांची कत्तल करी,व नंतर 'शान्तिः शान्तिः शान्तिः !' असे म्हणे.त्याचे साथीदार ते पवित्र युद्धवाले स्त्री-पुरुष, मुले, कोणालाही शिल्लक ठेवीत नसत.
ज्यूंना कोठेही जाता येत नसे.कारण या वेताळांचे लोंढे चोहोकडून धो धो करीत येत.क्वचित कोणी ज्यूंनी सर्व संपत्ती देऊ केली,तर एखादा बिशप त्यांच्या रक्षणार्थ पुढे येई;पण तोही ज्यूंची धनदौलत बळकावल्यावर पुन्हा त्या अकिंचनांना क्रूसेडर्सच्याच हवाली करी. ट्रीव्हज् शहरी ज्यू तेथील बिशपच्या दारी आश्रयासाठी गेले;पण बिशप राजवाड्याचे सर्व दरवाजे बंद करून घेऊन गच्चीवरून म्हणाला, "नीचांनो,हतपतितांनो,तुमचीच पापे तुमच्यावर उलटली आहेत.तुम्ही ईश्वराच्या पुत्राची निंदा केली आहे, माता मेरी हिची अवहेलना केली आहे.जा. मरा." या हतभागी ज्यूंनी कधी कधी तर अलौकिक धैर्य दाखविले! कत्तली करणाऱ्या या माथेफिरूंचा हा रक्ताळ धर्म स्वीकारण्यापेक्षा कितीतरी ज्यू शांतपणे मरणाला तयार होत.
नाझरेथ येथील त्या शांतिमूर्ती येशूचा संदेश क्रूसेडर्सना कळला होता;एवढेच नव्हे,तर ते तो कृतीतही आणीत होते.
एका मध्ययुगीन बखरीत पुढील वर्णन आहे : "शांतीच्या ईश्वराला हाक मारून जणू या बाया धैर्याने पदर बांधून उभ्या राहत;आपल्या हातांनी आपली मुलेवाळे ठार मारीत व नंतर स्वतःला ठार मारीत.पुष्कळ पुरुषही धैर्याचा अवलंब करून प्रथम आपल्या बायकांस ठार मारीत;मग मुले-बाळे व नोकर-चाकर यांसही ठार करीत.कोमल स्वभावाच्या व शांत वृत्तीच्या सतीही आपली मुले ठार मारीत.परस्परांवर प्रेम जडलेली व विवाहबद्ध होऊ इच्छिणारी तरुण जोडपी खिडक्यांतून बाहेर पाहत व म्हणत,"हे प्रभो,तुझ्या नावाचे पावित्र्य राखण्यासाठी हे पाहा आम्ही काय करीत आहोत!"
आणि रक्ताचा पूर वाहू लागे ! स्त्रियांचे रक्त पुरुषांच्या रक्तात,तसेच आई-बापांचे रक्त मुलांच्या रक्तात मिसळे,
भावांचे रक्त बहिणींच्या रक्ताला,तर गुरुजनांचे शिष्याच्या रक्ताला मिळे ! त्या एकाच दिवशी अकराशे जीवांचे हनन झाले." ज्यू धर्मोपदेशक यिट्लॅक बेन अशेर याच्या कन्येची वीर व करुण रसांनी भरलेली कथा कोणी ऐकली आहे का? अशी कहाणी जगात कोणासही ऐकावयास मिळाली नसेल,
ज्यू धर्मोपदेशक येहुदा याची शूर व निर्भय पत्नी आपल्या मित्रांना विनवून म्हणाली "माझी चार मुले आहेत,ती ख्रिश्चनांच्या हाती जिवंतपणी पडता कामा नयेत.ते माझ्या बाळांना डाकू,गळेकापू बनवतील;त्यापेक्षा ती मरू देत,
ईश्वराच्या नावाच्या पावित्र्यार्थ बळी जाऊ दे." पण जेव्हा एका मित्राने एका मुलास ठार करण्यासाठी सुरा उगारला,तेव्हा ती तरुण माता दुःखाने हंबरडा फोडून,कपाळ आपटून घेऊन व छाती पिटून म्हणाली,"प्रभो,कुठं आहे तुझी प्रेमळ दया व उदार आणि वत्सल करुणा?" नंतर ती निराशेने आपल्या मित्रांस म्हणाली,"या मुलांना एकमेकांच्या डोळ्यांसमोर तरी नको रे मारू ! आरॉनच्या समक्ष ऐझॅकला मारू नको,ऐकला आरॉनचं मरण दिसता कामा नये.तो पाहा ना आरॉन दूर गेला!" मग तिने ऐझॅकला हातात घेतले.तो लहान व दिसण्यास कोवळा व सुकुमार होता.तिने त्याला ठार मारून त्याचे रक्त भांड्यात धरावे,तसे आपल्या बाह्यात घेतले.
आरॉनने हे दुरून पाहिले.तो एका पेटीमागे लपू पाहत होता.त्या बाईला बेला व याड्रोना नामक दोन सुंदर लहान मुली होत्या.त्यांनी आपण होऊन धार लावलेले सुरे आईच्या हाती आणून दिले व खाली माना घालून आईने आपले हनन करावे म्हणून त्या तिच्यासमोर वाकल्या.रॅचेलने अशा रीतीने ऐझॅक व दोन मुली यांचे बलिदान करून उरलेल्या आरॉनला हाक मारली, 'बाळ,कुठे आहेस तू? मी नाही हो तुला वाचवू शकत !' असे म्हणून तिने त्याला पेटीमागून ओढले व त्याचाही देवाला बळी दिला.
तिच्या पतीने त्या चार सुकुमार मुलांचे बलिदान पाहून तलवारीवर पडून आत्मबलिदान केले.त्याची आतडी बाहेर आली.त्यांतून रक्त वाहत होते.त्या बाईने एकेका बाहीत दोन-दोन मुले लपविली.ती तिथे बसून विलाप करीत असता क्रूसेडर्स त्या खोलीत आले व गर्जले, "ज्यू डाकिणी,दे सगळे धन,बाह्यांत लपवून ठेवतेस काय?" पण झडती घेता बाह्यांत त्यांना ती मृत बाळे दिसली.एकाच घावासरशी त्यांनी तिलाही मुलांच्या भेटीला पाठविले.एकच घाव आणि ती मेली! किंकाळी फोडण्यासही तिला वेळ नव्हता.
ख्रिस्ताच्या नावाने युद्धे पुकारणाऱ्या ख्रिश्चनांच्या हृदयात अशी ही 'दैवी धीरोदात्त' प्रेरणा होती. एच.जी.वेल्स या इतिहासलेखकाला ज्या ध्येयामुळे व युरोपातील ज्या आत्मदर्शनामुळे उचंबळून आले ते ध्येय व तो आत्मा यांचे स्वरूप एवंविध होते. इ.स.१०९६ मध्ये पहिल्या क्रूसेडची ही भीषण लाट अशा प्रकारे युरोपभर पसरली.भिक्षू पीटर याचे सैनिक केवळ ज्यूंनाच मारीत असे नव्हे;तर ते आपल्या ख्रिश्चन बांधवांनाही लुटीत.
या सैनिकांपैकी पुष्कळ तर जेरुसलेमपर्यंत गेलेही नाहीत.
त्यांनी आपले लहान लहान जथ्थे केले.हे जथ्थे युरोपभर प्रार्थना व लूटमार करीत आपली जीवने पवित्र करते झाले.
याच ध्येयाला त्यांनी सारे जीवन वाहिले.काही मूठभर लोक जेरुसलेमकडे गेले,पण तुर्कानी त्यांचा फत्रा उडविला !
पहिल्या क्रूसेडची दुसरी तुकडी आली.तिच्यात जरा अधिक वरच्या दर्जाचे व कडक शिस्तीचे लोक होते. पण हृदयातील दुष्टता मात्र तीच होती.त्यांनी मुसलमानांपासून जेरुसलेम जिंकून घेतले.ब्रिटिश ज्ञानकोशात 'क्रूसेडस्'बाबत लिहिताना अर्नेस्ट बार्क म्हणतो,ख्रिश्चनांनी केलेली कत्तल केवळ अमानुष होती ! रस्त्यातून रक्ताचे पाट वाहत होते. रक्तप्रवाहातून घोडेस्वार दौडत होते.रात्रीच्या वेळी आनंदाने अश्रू ढाळीत क्रूसेडर्स तेथील ख्रिस्ताच्या थडग्याजवळ गेले व त्यांनी आपले रक्ताने माखलेले हात प्रार्थनेसाठी जोडले.त्या दिवशी १०९७ च्या जुलैमध्ये पहिले क्रूसेड संपले.
यानंतर आणखी आठ क्रूसेडस् म्हणजे धर्मयुद्धे जवळजवळ दोनशे वर्षे चालली होती.नेहमी तेच ते रानटी व राक्षसी प्रकार! ज्यू,ख्रिश्चन, मुसलमान यांच्या कत्तली व लुटालुटी ! या क्रूसेडरांपैकी काही थोडे उदात्त ध्येयवादाने प्रेरित झाले असतील,नव्हे, होतेही.त्यांच्या मनात काहीतरी गूढ आंतरिक प्रेरणा स्फुरलेली होती.या जगात ख्रिश्चन धर्माला कोठेही अडथळा होऊ नये,असे त्यांना वाटे.प्रत्येक युगात काही मूर्ख;पण ध्येयवादी लोक असतातच; त्याचप्रमाणे गूढ वृत्तीचे व उत्कट भावनांचे सारासीन मुसलमानांसाठी जग निष्कंटक करू इच्छित होते.कत्तली केल्यामुळे इतर माणसे सुधारतात,
अधिक चांगली होतात,असे या वेडपटांना वाटत असते.पण हे स्वप्नात वावरणारे ध्येयवादी लोक महत्त्वाकांक्षी व स्वार्थी लोकांच्या हातची बाहुली बनतात.हे ध्येयवादी लोक युद्धाभोवती एक तेजोवलय निर्माण करतात व घाणेरड्या कर्मांवर पावित्र्याचा पोशाख चढवितात! युद्ध धार्मिक असो वा व्यापारी असो,त्यात असे काही ध्येयात्मे असल्यामुळे एखादा कवी मग त्या युद्धावर महाकाव्यही लिहितो.पण अशी काव्ये वा असे पोवाडे होऊनही लाखो निरपराध लोकांची कत्तल काही थांबत नाही.घरेदारे लुटली जातातच! मग ती काव्ये काय चाटायची? त्यामुळे एखाद्या धर्मवेड्या माणसाच्या हातातील तलवारीने छिन्नविछिन्न झालेल्या बालकाला काय कमी वेदना होतात ? केवळ स्वार्थी व हडेलहप्प माणसाने मारलेल्या मुलालादेखील होतात! क्रूसेड्सध्ये मूठभर धर्मवेडे गूढवादी लोकही होते,
एवढ्यामुळेच काही त्या युद्धांना पावित्र्य येत नाही! ती युद्धे माणुसकीस काळिमा फासणारी,निंद्य व लाजिरवाणीच ठरतात ! ख्रिश्चन चर्चलाच नव्हे; तर साऱ्या मानवजातीलाच या लांच्छनास्पद युद्धांचा कलंक लागतो.