* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

६/११/२५

प्राणवायूचा शोध / The discovery of oxygen

प्रिस्टले लहानपणी बाटलीत कोळी टाकून बाटलीचं बूच घट्ट बंद करीत असे करायचा.बाटलीत कोळ्याऐवजी वनस्पती टाकली तर? प्रिस्टलेला एक नवा विचार सुचला.प्रिस्टलेनं बंद तोंडाच्या भांड्यात सुरुवातीला असणारा वायू काढून टाकून त्यात पुदिन्याची वनस्पती ठेवून भांड्याचे तोंड पूर्णपणं बंद केलं.प्रिस्टलेची अपेक्षा कोल्ळ्याप्रमाणेच वनस्पती मरून जाईल.पण दहा दिवसांनंतरही पुदिन्याची वनस्पती चक टवटवीत होती आणि त्या भांड्यात पेटती मेणबत्तीही अधिक तेजाने प्रज्वलित होत होती.प्रिस्टलेनं मेणबत्ती विझल्यावर त्या भांड्यात ५-६ दिवसांनी पुन्हा पेटती मेणबत्ती टाकल्यावर ती अधिक तेजानं प्रज्वलित होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं.१७७२ च्या उन्हाळ्यापर्यंत प्रिस्टलेला निरनिराळ्या वनस्पतीमध्ये पेटती मेणबत्ती अधिक प्रज्वलित होत असल्याचं लक्षात आलं.मग पालक ही वनस्पती दोन दिवसांत हा वायू तयार करत असल्याचं प्रिस्टलेनं या प्रयोगानं सिद्ध केलं.

प्रिस्टलेनं मग अजून एक प्रयोग केला.पेटती मेणबत्ती हवाबंद डब्यात ठेवली.पण ही मेणबत्ती मात्र लगेच विझली.हवाबंद डब्यात पेटती मेणबत्ती ठेवल्यावर ती चटकन विझते,असा प्रिस्टलेनं निष्कर्ष काढला.त्याच हवाबंद डब्यात जिवंत उंदीर ठेवला असता तोही ५ सेकंदात मेल्याचं त्यानं पाहिलं. त्यानं पुन्हा एक जिवंत उंदीर हवाबंद डब्यात ठेवला आणि त्याच्या बरोबर एक छोटं रोपही प्रिस्टलेनं त्याच हवाबंद डब्यात ठेवलं.पण या वेळी उंदीर मेला नाही. उंदराला जिवंत ठेवणारा कुठलासा पदार्थ वनस्पतींमध्ये असला पाहिजे असा तर्क प्रिस्टलेनं केला.हे लगेच प्रिस्टलेनं आपला मित्र बेंजामिन फ्रैंकलिनला कळवलं आणि आपल्या या शोधामुळे लोक झाडं तोडायची थांबतील असंही बेंजामिन फ्रैंकलिनला प्रिस्टलेनं लिहिलं.यावरून सर्वच वनस्पती हा वायू तयार करत असल्याचा पुरावा त्याला मिळाला. त्यामुळे सर्व प्राणी श्वास घेऊनसुद्धा त्यांना जिवंत ठेवणारा हवेतला घटक का संपत नव्हता या प्रश्नाचं उत्तर प्रिस्टलेला सापडलं.


या महत्त्वाच्या शोधाबद्दल रॉयल सोसायटीनं प्रिस्टलेला 'कॉपले' पदक देऊन सन्मानित केलं.हे पदक म्हणजे त्या काळातले नोबेल पारितोषिकच होतं.प्रिस्टलेनं आपल्या या प्रयोगाची हकिकत पॅरिसला जाऊन लव्हायेजेला कळवली.लव्हायेजेला या प्रयोगाचं महत्त्व ताबडतोब पटलं.पण प्रिस्टले मात्र दिशाभूल अवस्थेत होता.तो लव्हायेजेला पुनःपुन्हा फ्लॉजिस्टॉनविरहित हवा असंच सांगत राहिला.त्याला आपल्या शोधाचं महत्त्वच जणू कळलं नाही.१७८०मध्ये लॉर्ड शेलबर्नशी न पटल्यामुळे प्रिस्टले आपल्या कुटुंबाबरोबर बर्मिंगहॅममध्ये स्थायिक झाला.काही विज्ञानप्रेमी मंडळींनी ७८० साली बर्मिंगहॅममध्ये एक चर्चामंडळ चालू केलं.या मंडळाचं नाव 'ल्युनार सायटी' असं होतं. मंडळाच्या खास विनंतीवरून प्रिस्टले ल्युनार सोसायटीचा सभासद झाला. दर महिन्याच्या सोमवारी बर्मिंगहॅममध्ये रात्रीच्या जेवणाच्या निमित्तानं मंडळाचे सभासद एकत्र जमत जमायचे.या सभासदांमध्ये जेम्स वॉट,इरॅस्मस डार्विन अशी त्या काळची नामांकित संशोधक मंडळी होती.मंडळाचं काम सहा तास चालायचं त्यात जेवणाखेरीज नानाविध विषयांवर चर्चा चालायची.सभासद मंडळी आपले नवे विचार,कल्पना दिलखुलासपणे मांडायचे.या सभासदांमध्ये जे श्रीमंत सभासद होते ते प्रिस्टलेला त्याच्या प्रयोगासाठी आर्थिक मदत करायचे.प्रिस्टले प्रयोगापुरता लागणाराच पैसा सभासदांकडून घ्यायचे.त्याचे सर्व शोध मुक्त असायचे. प्रिस्टलेनं आपल्या शोधापासून आर्थिक फायदा घेण्याचा विचारसुद्धा केला नाही.याच काळात त्यानं प्रसिद्ध केलेले शोधनिबंध हे सर्व फ्लॉजिस्टॉन सिद्धान्ताच्या बाजूने होते.


पण लवकरच प्रिस्टलेच्या शांत आयुष्यात अचानक वादळी घडामोडीला सुरुवात झाली.प्रिस्टले फ्रेंच राज्यक्रांतीपासून दूर असूनही त्यात ओढला गेला. प्रिस्टलेनं आपल्या लेखनाद्वारे फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव या तीनही तत्त्वांचा हिरिरीनं प्रचार केला.धर्मसत्ता आणि राजा आणि त्याचा कारभार यांचे एकमेकांपासून फारकत करण्याची कल्पना प्रिस्टलेनं उचलून धरली.पण त्यामुळे इंग्लंडमधल्या पुढाऱ्यांशी त्याचे खटके उडायला लागले. इंग्लिश पार्लमेंटचा एक सभासद एडमंड बर्कनं प्रिस्टलेवर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तो देत असलेल्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या पाठिंब्याबद्दल धिक्कार केला.फ्रेंच राज्यक्रांतीची चळवळ जसजशी आगेकूच करायला लागली तसं तिनं हिंसक वळण घेतलं.त्यामुळे अधिकाधिक ब्रिटिश नागरिक फ्रेंच चळवळीला दिलेला आपला पाठिंबा काढून घ्यायला लागले.अखेर फ्रेंच राज्यक्रांतीच्या दुसऱ्या स्मृतिदिनी १४ जुलै १७९१ इंग्लंडमधल्या जनतेनं चिडून मोठ्या जमावानं प्रिस्टलेच्या राहत्या घरावर हल्ला केला. 


या हल्ल्यात जमावानं प्रिस्टलेच्या घराची पूर्ण नासधूस केली.

घरातल्या खुर्चा,टेबल,कपाट,इतर लाकडी सामान यांची मोडतोड केली.घराचं तळघर पूर्ण रिकामं केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिस्टलेच्या ग्रंथालयातली पुस्तकं फाडून चोळामोळा करून टाकली.प्रिस्टलेच्या प्रयोगशाळेतल्या उपकरणांचा नाश केला आणि त्याचं संपूर्ण घरच पेटवून दिलं.प्रिस्टलेच्या संशोधनाच्या नोंदी असणारी टिपणवही जमावानं फाडून टाकली.या अपरिमित नुकसानीची जाणीव प्रिस्टलेला अखेरपर्यंत होत राहिली.सुदैवानं यातून प्रिस्टले आणि त्याचं कुटुंब मात्र वाचलं.हा गोंधळ चालू असतानाच प्रिस्टले आणि त्याचं कुटुंब गाव सोडून गेल्यामुळे ते जिवंत राहू शकले. बर्मिंगहॅम सोडून ते सर्व जण प्रथम इंग्लंडला आले. इंग्लंडमधले लोक प्रिस्टलेला देशद्रोही आणि ख्रिस्ती धर्माचा विरोधक समजायला लागले.त्याच्याविरुद्ध व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आली.त्याचा पुतळा जाळण्यात आला.रॉयल सोसायटीतले लोकसुद्धा प्रिस्टलेला टाळायला लागले.


त्याच्याकडून रॉयल सोसायटीचा राजीनामा घेण्यात आला.त्याच्या मुलांना नोकऱ्या मिळेनाशा झाल्या.अखेर १७९४ मध्ये प्रिस्टलेनं 'सॅम्पसन' नावाच्या जहाजातून मायभूमी सोडून अमेरिकेला कूच केलं.तो जेव्हा न्यूयॉर्कमध्ये पोचला तेव्हा तिथल्या राजकारणी,शास्त्रज्ञ आणि धर्मोपदेशकांनी त्याचे भव्य स्वागत केलं.प्रिस्टलेची तीनही मुलं अगोदरच पेनसिल्व्हेनिया संस्थानातल्या नॉर्दबरलँडमध्ये स्थायिक झाली होती. प्रिस्टलेला नॉर्दबरलँडचा चर्चचा प्रमुख आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात रसायनशास्त्राचा प्राध्यापक अशी दहेरी नेमणूक देण्यात आली.

प्रिस्टलेचा स्नेही बेंजामिन फ्रैंकलिन यानं फिलाडेल्फिया शहराची कवाडं त्याच्यासाठी कायमची उघडी करून दिली.प्रिस्टलेची अमेरिकन स्वातंत्र्यवीर थॉमस जेफरसन यांच्याशीही चांगली ओळख झाली.एकदा अमेरिकेचा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यानंही प्रिस्टलेला चहापानासाठी आमंत्रण दिलं होतं.प्रिस्टलेनं आपल्या अंतापर्यंत (१८०४) नॉर्दबरलँडमध्येच कायमचं वास्तव्य केलं.तिथं त्यानं आपली प्रयोगशाळाही उभारली.तो निरनिराळ्या ठिकाणी व्याख्यानासाठी जायला लागला.सध्या प्रिस्टलेचं राहतं घर हे संग्रहालय म्हणून जतन करून ठेवण्यात आलं आहे.१९५२ सालापासून पेनसिल्व्हेनियामधल्या डिक्सन कॉलेजनं मानवजातीला उपकारक ठरणाऱ्या शोधांना वार्षिक प्रिस्टले पदक देणं सुरू केलं.


या ऑक्सिजन शोधनाट्यात आणखी एका व्यक्तीचं योगदान दुर्लक्षून चालणार नाही तो म्हणजे कार्ल विल्हेम शील !! निसर्गात आढळणारी जास्तीत जास्त मूलद्रव्यं शोधण्याचा मान त्याच्याकडे जातो. त्यानं एकूण सहा मूलद्रव्यं- फ्लोरीन (१७७१), क्लोरीन (१७७४), मँगेनीज (१७७४), बेरियम (१७७४), मॉलिब्डेनम (१७७८) आणि टंगस्टन (१७८१) यांचा शोध लावला. शिवाय, स्वतंत्रपणे संशोधन करून ऑक्सिजनचाही शोध लावला. 


त्यानं अनेक रासायनिक संयुगांचा शोध लावला. त्याची यादी बरीच मोठी आहे.त्यात हायड्रोजन फ्लोराइड, सिलिकॉन फ्लोराइड,

टार्टरिक आम्ल,सायट्रिक आम्ल,युरिकआम्ल,लॅक्टिक आम्ल,

ग्लिसेरॉल,अशा अनेक संयुगांचा समवेश होतो. एकाच माणसानं हे सर्व शोधून काढलं हे पाहून थक्क व्हायला होतं. 'हवा आणि अग्नी यावरचा रासायनिक प्रबंध' हा आपला ग्रंथ शीलनं १७७५ मध्येच लिहिला. पण प्रसिद्ध झाला तब्बल दोन वर्षांनी ! पण यापैकी अनेक शोध लागल्यानंतर त्यानं ते प्रसिद्धच केले नाहीत आणि मग इतरांनीच त्याच्यानंतर शोध लावून ते प्रसिद्ध केले आणि त्या त्या शोधांवर आपल्या नावाचं शिक्कामोर्तब केलं. आणि शील मात्र तसाच राहिला.

यामुळे प्रसिद्ध वैज्ञानिक आणि विज्ञान लेखक आयझेंक असिमॉव्ह त्याला 'हार्डलक शील' असंच म्हणत असे !


शील हा एका व्यापाऱ्याचा मुलगा होता. ९ डिसेंबर १७४२ साली स्वीडनमध्ये जन्मला. तब्बल अकरा भावंडांमध्ये हा सातवा ! शाळेत लक्ष लागेना म्हणून त्याला एका औषधविक्रीच्या दुकानात शिकाऊ म्हणून ठेवण्यात आलं.फावल्या वेळात तो रसायनशास्त्रावरची पुस्तकं वाचायचा आणि प्रयोगसुद्धा करून पाहायचा. त्या औषधविक्रीच्या दुकानात त्यानं शिकाऊ म्हणून १७६५ पर्यंत काम केलं.नोकर म्हणून पुढे दुसऱ्या एका औषधविक्रीच्या दुकानात १७६५ ते १७६८ पर्यंत त्यानं चांगल्या पदावर काम केलं.१७७५ साली लवकरच त्यानं आपल्या पहिल्या शोधाची हकिकत स्वीडनमधल्या उप्साला विद्यापीठातला रसायनशास्त्रज्ञ बर्गमन याला कळवली.याच उप्साला विद्यापीठात कार्लोस लिनियस वनस्पती विभागात कार्यरत होता. कार्लोस लिनियस वनस्पतीच्या वर्गीकरणाच्या कामासाठी खूपच प्रसिद्ध होता. शीलनं बर्गमनला कळवलेला शोध म्हणजे दारूच्या पिंपातल्या बुरशीपासून वेगळे केलेलं टार्टरिक आम्ल ! या शोधापासून त्याच्या संशोधनकार्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासून मरेपर्यंत सारखा तो नवनवे शोध लावून प्रसिद्ध करत होता.त्याच्या अतिकाम करण्याच्या आणि प्रत्येक रासायनिक संयुगाची चव घेऊन बघण्याच्या सवयीनं तब्येत ढासळली.

त्यामुळेच १७८६ साली अवघ्या ४४ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.विविध कार्बनी संयुगांचं विघटन करून शीलनं ऑक्सिजन उर्फ ज्वालाग्राही हवा मिळवली होती.शीलची खात्री होती ही ज्वालाग्राही हवा नेहमीच्या हवेचा घटक आहे.शीलनं आपला ज्वालाग्राही हवेचा शोध लावला,त्या वेळी प्रिस्टलेच्या प्रयोगाबद्दल त्याला काहीच कल्पना नव्हती.खेदाची गोष्ट ही की शीलचे निष्कर्ष फार उशिरा प्रसिद्ध झाले!!


पण फ्लॉजिस्टॉन संकल्पनेला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वायूंच्या गोंधळाला कायमची मूठमाती देण्याचं काम केलं ते अँटोनी लव्हायेजे यानं! 


समाप्त..।

४/११/२५

प्राणवायूचा शोध / The discovery of oxygen

यानंतर जवळपास अर्ध्या शतकानं कॅव्हेंडिशच्या काळातच आणखी एक धर्मोपदेशक शास्त्रीय संशोधनाच्या कार्यात चुरशीनं झटत होता.तो म्हणजे जोसेफ प्रिस्टले (Joseph Pristley) (१७३३ ते १८०४)! यानं हा विषय पूढे नेला.त्यानं १७७४ मध्ये ऑक्सिजनचा शोध लावला.हा वायू श्वासाद्वारे आत घेतला की छान वाटतं आणि उंदीरही ऑक्सिजनच्या जारमध्ये ठेवल्यावर उत्साही होतात हे त्याच्या लक्षात आलं.

त्यानंतर वनस्पतींमुळे वातावरणातल्या ऑक्सिजनची पातळी वाढते हेही त्यानं दाखवून दिलं. पुढे वनस्पती ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेतात ही गोष्ट फक्त प्रकाशातच होते असं डच डॉक्टर जाँ इंगेनहाऊझ (Jan Ingenhuosz) (१७३० ते १७९९) यानं दाखवून दिलं.


जोसेफचा जन्म इंग्लंडमधल्या लीड्स शहराजवळच्या फील्डहेड या लहानशा गावी २४ मार्च १७३३ या दिवशी झाला.त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षी आईचा मृत्यू झाल्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं.प्रिस्टलेची रवानगी त्याच्या चुलत नातेवाइकाकडे झाली.त्यांनीच त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्याचा सांभाळ केला. जोसेफ लहानपणी अतिशय तल्लख बुद्धीचा विद्यार्थी होता.छोट्या जोसेफला कोळ्यासारखे लहान किडे बाटलीत भरून बाटली बुचानं घट्ट बंद करून तो कोळी किती काळ जगतो हे बघण्याची एक खोड होती. बाटलीत बंद केल्यावर कुठलाही प्राणी जास्त काळ जगत नाही हे मुलांना आणि शास्त्रज्ञांना चांगलंच माहीत होतं.पण हे नेमकं कशामुळे होतं? त्याच्या श्वसनामुळे बाटलीतली हवा संपल्यानं की ते काहीतरी न दिसणारा विषारी पदार्थ बाटलीत सोडत असल्यानं,हे कळत नव्हतं.याचं उत्तर जोसेफलाच पुढं मिळालं.त्यानं फ्रेंच,जर्मन,

इटालियन आदी भाषांवर प्रभुत्व मिळवलं होतं.त्याच्या काकूनं जोसेफचं नाव १७५२ मध्ये धार्मिक शिक्षण देणाऱ्या 'डॅवेन्ट्री' अकादमीत घातलं.तिथे त्यानं थोडं यांत्रिक शिक्षण आणि फ्रेंच,अरेबिक,जर्मन आदी भाषांचं शिक्षण घेतलं.१७५२ मध्ये या संस्थेची पदवी घेतल्यानंतर चेशायरमधल्या एका छोट्याशा चर्चेमध्ये पाद्री म्हणून जोसेफला नोकरी मिळाली.मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून मासिक खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी जोसेफ एका शाळेत शिक्षकाचीही नोकरी करायचा आणि खासगी शिकवण्याही घ्यायचा. 


कालांतरानं १७६१ साली चेशायरमधल्या वॉरिंग्टन अकादमीत भाषा शिक्षक म्हणून त्याची नेमणूक झाली.तिथेच त्याचा रसायनशास्त्राशी पहिला संबंध आला. तिथं होणाऱ्या डॉ.टर्नर याच्या रसायनशास्त्रावरच्या व्याख्यानांना तो आवडीनं नियमितपणे हजेरी लावायचा. काही काळानं त्यानं स्वतःच प्रयोग करून पाहायलाही सुरुवात केली.त्यानं तिथंच सहा वर्ष रसायनशास्त्र आणि वीज यांचा अभ्यास केला.त्यामुळे स्थानिक शास्त्रज्ञांत तो चांगलाच ओळखला जायला लागला. वॉरिंग्टनला असतानाच त्यानं लग्न केलं. त्या दरम्यानच अमेरिकेतल्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुरू असलेल्या चळवळींना युरोपातल्या देशांचा पाठिंबा मिळावा म्हणून बेंजामिन फ्रैंकलिन इंग्लंडमध्ये आला होता.बेंजामिन फ्रैंकलिन हे अत्यंत प्रभावी आणि हरहुन्नरी अमेरिकन व्यक्तिमत्त्व होतं.एक मुद्रक,पत्रकार,लेखक,

राजकारणी,मुत्सद्दी,अमेरिकेच्या संस्थापक जनकांपैकी एक अशा सगळ्याच क्षेत्रात फ्रैंकलिननं आपला ठसा उमटवला होता.

त्याच्याच सूचनेवरून प्रिस्टलेनं 'विद्युतशास्त्राचा इतिहास (हिस्टरी ऑफ इलेक्ट्रिसिटी)' नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला.या पुस्तकामुळे रॉयल सोसायटीनं प्रिस्टलेला आपल्या संस्थेचा सभासद म्हणून निवडलं.शिवाय, एडिनबर्ग विद्यापीठानं त्याला डॉक्टरेट पदवीही बहाल केली.


या सगळ्यामुळे प्रिस्टलने अमेरिकन स्वातंत्र्य चळवळीला आपला हार्दिक पाठिंबा जाहीर केला.बेंजामिन फ्रैंकलिनबरोबर प्रिस्टलचे आपल्या हयातभर अतिशय स्नेहपूर्ण असे संबंध टिकून होते. अर्धवेळ धर्मगुरू आणि अर्धवेळ वैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या प्रिस्टलेला १७६७ मध्ये लीड्समधल्या मिल हिल चर्चचा प्रमुख पाद्री म्हणून काम देण्यात आलं. चर्चच्या धर्मगुरूनं विज्ञानात भरीव योगदान देणं आणि ही दोन परस्परविरोधी टोकं एकत्र येणं हे बरेच वेळेला घडलेलं आहे.याचं उत्तम उदाहरण म्हणजे ग्रेगॉर मेंडेलचं आनुवंशशास्त्रातलं योगदान. मेंडेलनं धर्मगुरू म्हणून काम करत असताना चर्चच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेत वाटाण्याच्या झाडावर संशोधन करून आनुवंशिकतेचे नियम शोधले.दुसर उदाहरण जॉर्ज लेमात्रे या बेल्जियममधल्या धर्मगुरूचं.लेमात्रे म्हणाला, "सत्य जाणून घेण्याचे दोन मार्ग आहेत. मी दोन्ही मार्गांचा अवलंब केला." त्यानं चक्क आइन्स्टाईनच्या समीकरणावरून विश्व प्रसरण पावत आहे आणि विश्वाचा उगम एका प्रारंभिक बिंदूतून झाला हे सांगितलं.यावर आइन्स्टाईननं लेमात्रेला म्हटलं होतं, "तुझं गणित बरोबर आहे,पण त्यातलं भौतिकशास्त्र मात्र भयंकर आहे." मिल हिलला असतानाच प्रिस्टलेनं रॉयल सोसायटीला त्यानं विद्युत शाखेत आणि प्रकाशाबाबत केलेल्या प्रयोगांचं वर्णन एकूण पाच शोधनिबंधांतून कळवलं.जोसेफ प्रिस्टलेचं घर हे पिण्याची दारू बनवणाऱ्या जेक्स आणि नेलच्या कारखान्याच्या शेजारी होतं.काही लोकांना दारूच्या वासानंच ती चढते.

किमानपक्षी आपली आवडती दारू पिण्याची तल्लफ तरी येते.पण प्रिस्टलेचं काही औरच! दारूचा आंबूस वास सोडणाऱ्या या कारखान्यानं प्रिस्टलेच्या वायूंच्या अभ्यासाला खरीखुरी चालना दिली.प्रिस्टलेनं चक्क कारखान्याच्या मालकाकडे दारूच्या रांजणातून बाहेर पडणारा वायू रासायनिक परीक्षणासाठी मागितला.कारखान्याचा मालक त्याची मागणी ऐकून ताडकन उडालाच.एक धर्मगुरू दारूच्या कारखान्यात येतो काय आणि दारू वगैरे काही न मागता दारूच्या रांजणातून बाहेर पडणारा वायू कसल्याशा प्रयोगासाठी मागतो काय,याचंच मालकाला आश्चर्य वाटलं.मालकाकडून परवानगी मिळताच प्रिस्टलेनं छोट्या छोट्या बरण्यांमधून वायू जमा करून त्याची तपासणी करण्यास सुरुवात केली. दारूच्या कारखान्यात जाऊन तिथला वायू जमा करून तो तपासण्याचं धर्मगुरू प्रिस्टलेचं हे मुलखावेगळं काम पाहून लोक त्याला "तुम्ही ख्रिस्ती धर्मगुरू आहात की जादूटोणा करणारे मांत्रिक?" असं चक्क विचारायला लागले.पण प्रिस्टले मात्र अशा प्रश्नांकडे सपशेल दुर्लक्ष करायचा.तो आपल्या प्रयोगांमध्ये गुंग असायचा.प्रिस्टलेनं दारूच्या राजणांतून निघालेल्या वायूचं निरीक्षण केल्यावर त्याच्या रांजणातून बाहेर पडणाऱ्या वायूमध्ये पेटता कागद धरला तर तो चक्क विझतो'असं त्याच्या लक्षात आलं.


प्रिस्टलेनं हा वायू तयार करण्याच्या दुसऱ्या पद्धती शोधून काढल्या.मग हा वायू दुसऱ्या कोणत्या पद्धतीनं तयार करता येईल का असा विचार त्याच्या डोक्यात घोळायला लागला.मग त्यानं आपल्या घराच्या प्रयोगशाळेत त्यानं हा वायू तयार करून बघितला. प्रिस्टलेनं तयार केलेला हा वायू म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड हे आता आपण जाणतोच.हा वायू काही प्रमाणात पाण्यात विरघळवण्यात त्याला यश आलं. त्याला आज आपण 'सोडावॉटर' म्हणतो.या संशोधनाबद्दल प्रिस्टलेला सुवर्णपदक बहाल करण्यात आलं.यानंतर प्रिस्टलेनं अनेक वायू वेगळे करण्यात यश मिळवलं.त्यानं हायडोजन क्लोराइड आणि अमोनिया वायू तयार केला.अमोनिया वायूचं विघटन करून त्यापासून हायड्रोजन आणि नायट्रोजन वेगळे करण्यात यश मिळवलं.त्याचदरम्यान १७७२ मध्ये इंग्लंडमधला राजकारणी लॉर्ड शेलबर्ननं प्रिस्टलेला आपल्या खासगी ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून वार्षिक २५० पौंड पगारावर नोकरी देऊ केली.आपल्या मुलांचा खासगी शिक्षक म्हणून प्रिस्टलेची नेमणूक केली.शिवाय,

ग्रंथपालाच्या नोकरीबरोबरच शेलबर्ननं त्याच्या संशोधनासाठी प्रयोगशाळेचीही जोड देऊ केली. 


लंडनमध्ये विलशायर परगण्यात राहायची सोय लॉर्ड शेलबर्ननं केली.प्रिस्टलेनं आठ वर्ष केलेली घधर्मगुरूची नोकरी सोडून लॉर्ड शेलबर्ननं देऊ केलेली ग्रंथपालाची नोकरी स्वीकारली.या काळातच प्रिस्टलेनं त्याचं पुस्तक 'हवेवरचे प्रयोग' या नावानं प्रसिद्ध केलं.या कामातून निवृत्त झाल्यावर शेलबर्ननं प्रिस्टलेला दरमहा काही रक्कम पेन्शन म्हणून देण्यास सुरुवात केली.आपल्या आयुष्यातलं वायूंवरचं महत्त्वाचं संशोधन प्रिस्टलेनं इथंच केलं.

प्रिस्टले त्यानं शोधलेल्या सर्व वायूंना 'हवा' असं म्हणायचा.त्यानं नायट्रस हवा (नायट्रिक ऑक्साइड), आम्लारी हवा (अमोनिया),आम्लधर्मी हवा (हायड्रोक्लोरिक आम्ल),

फ्लॉजिस्टॉनविरहित नायट्रस हवा (नायट्रस ऑक्साइड),

वायट्रोलिक हवा (सल्फर डाय ऑक्साइड) अशा निरनिराळ्या हवेचा शोध लावला. (सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन.)


पण प्रिस्टलेचा सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे त्यानं १७७४ साली लावलेला ऑक्सिजन वायूचा शोध ! त्यानं यासाठी वापरलेली पद्धत तशी साधीच होती. त्यानं एक बारा इंच व्यासाचं बहिर्गोल भिंग घेऊन त्याच्या साहाय्यानं सूर्यकिरण निरनिराळ्या पदार्थावर एकवटण्यास सुरुवात केली.सूर्याच्या उष्णतेनं त्या पदार्थातून कोणते वायू बाहेर पडतात हे तपासण्यास सुरुवात केली.त्यानं मर्क्युरिक ऑक्साइड हे संयुग एका चंबूत घेतलं.चंबूचं दुसरं टोक पारा असलेल्या दुसऱ्या भांड्यात घेऊन त्यावर एक काचेची नलिका उलटी ठेवली.त्यानंतर बारा इंच व्यासाचं भिंग बाहेरून खोलीत येणाऱ्या सूर्यकिरणांच्या झोतात उभं केलं.हे किरण भिंगातून आरपार होताच ते चंबूतल्या मर्क्युरिक ऑक्साइडवर केंद्रित केले.या प्रयोगादरम्यान 'मक्युरिक ऑक्साइडला उष्णता पुरवताच त्यातून मोठ्या प्रमाणात वायू बाहेर टाकला जात असल्यानं चंबूतल्या पाऱ्याची मूळची पातळी झपाट्यानं खाली येते'असं प्रिस्टलेला स्पष्टपणे लक्षात आलं.१७७४ च्या सुमारास पी बेयन या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञानं पाऱ्याचं हवेत ज्वलन केलं तर त्याचं वजन वाढून एका ताम्रवर्णी संयुगात रूपांतर होतं,तर या संयुगाला उष्णता दिली तर त्याचं शुभ्रवर्णी संयुगात रूपांतर होत असल्याचं दाखवलं होतं हे दाखवून दिलं.पण त्यानं अधिक प्रयोग केले नाहीत.या वायूमध्ये पेटती मेणबत्ती धरताच प्रिस्टलेला ती अधिक प्रखरपणे जळते असं आढळलं.त्यामुळे प्रिस्टलेनं या वायूला 'फ्लॉजिस्टॉनविरहित हवा' असं नाव दिलं. कारण फ्लॉजिस्टॉन सिद्धान्तानुसार मेणबत्तीचं अधिक प्रखरपणे जळणं म्हणजेच जास्त फ्लॉजिस्टॉनचा वापर जळण्यासाठी होणं.अर्थातच,राहिलेला भाग म्हणजे फ्लॉजिस्टॉनविरहित हवा ! प्रिस्टले या उष्णतेविषयीच्या फ्लॉजिस्टॉन सिद्धान्ताचा पुरस्कर्ता होता.प्रत्येक घटनेचं स्पष्टीकरण तो या सिद्धान्तानुसारच करायचा.हा सिद्धान्त चुकीचा आहे हे त्याच्या गावीही नव्हतं.या वायूचा श्वसनासाठी उपयोग करताच प्रिस्टलेला नेहमीपेक्षा अधिक हुशारी वाटली.


….अपुरे…!! उर्वरीत भाग पुढील लेखामध्ये..



२/११/२५

तुझं की माझं ? Yours or mine?

मी दुसऱ्या प्रकरणात झाडांच्या भाषेबद्दल बोललो आहे. आपल्याला त्रासदायक कीटकांच्या भक्षकांना झाडं गंधाचा वापर करून आमंत्रण देतात.पण बर्ड चेरीचे झाड याहीपेक्षा एक वेगळा डावपेच वापरतं.
त्यांच्या पानात मकरंदाचे इंद्रिय असतात,
ज्यातून फुलांसारखे गोड द्रव्य ते सोडतात.बहतांश उन्हाळा झाडात घालवणाऱ्या मुंग्यासाठी हे द्रव्य असते.माणसांप्रमाणे त्यांनासुद्धा कधीकधी गोड खाऊपेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं.आणि त्यांची ही भूक सुरवंट भागवतात. 

ते करताना मुंग्या बर्ड चेरीच्या झाडाला सुरवंटांपासून मुक्त करतात.पण दर वेळेस झाडाला ईप्सित असतं तेच होतं असं नाही.सुरवंट तर फस्त होतात,पण त्यांना गोड द्रव्य कमी पडलं तर मात्र मुंग्या अफिड खायला सुरुवात करतात.मगाशी म्हटल्याप्रमाणे हे कीटक पानांमधून द्रव्य काढत असतात.मुंग्या आपल्या संवेदनाग्राने त्यांना गोंजारून जास्त द्रव्य बाहेर काढू लागतात.बार्क बीटल कीटक झाडांना धोकादायक असतो.तो अशक्त झाड शोधून काढून पोखरायला सुरुवात करतो. 'सर्वच घेईन किंवा काहीच नाही' या तत्त्वाने जाणारा हा कीटक आहे. हा एक कीटक झाडावर यशस्वीरीत्या आक्रमण करतो आणि मग आपल्या इतर बांधवांना गंधाने आमंत्रण देतो किंवा असंही होऊ शकतं की झाड त्या एका कीटकाला मारून टाकतं आणि इतरांपर्यंत संदेश पोचत नाही. झाडातल्या कॅम्बियम मिळवण्याकडे त्यांचं लक्ष असतं.साल आणि लाकडाच्यामध्ये कॅम्बियमचा फरक असतो.इथं झाडाची वाढ होते कारण याच्या आतल्या बाजूला लाकडाच्या पेशी तयार होतात आणि दुसऱ्या बाजूला सालाच्या पेशी. 

कॅम्बियममध्ये साखर आणि खनिजे भरलेली असतात.आपत्कालीन परिस्थितीत आपल्यालाही हे खाता येते. वसंत ऋतूमध्ये तुम्ही याचा प्रयोग करू शकता. वादळामध्ये पडलेल्या एखाद्या स्प्रूस झाडाचे साल चाकूने फाडा.नंतर उघड्या पडलेल्या खोडाच्या लांब पट्टया कापा.कॅम्बियमची चव राळ असलेल्या गाजरासारखी असते.यात भरपूर पोषण असते.बार्क बीटलना म्हणूनच हे आवडते आणि झाडाच्या सालामध्ये बोगदा करून ते आपली अंडी याच्याजवळच घालतात.इथून अळ्या बाहेर पडल्या की त्यांना भक्षकांपासून संरक्षण मिळते आणि भरपूर पोषणही. बार्क बीटलपासून बचाव करण्यासाठी स्प्रूस टरपीन आणि फेनॉल तयार करते.याने बार्क बीटल मरतात.हे अपयशी ठरले तर झाड चिकट राळ बाहेर काढून त्यांना त्यात अडकवते.पण स्वीडनमधील काही संशोधकांना असे दिसले आहे की,हे बीटल अशा डावपेचांपासून स्वतःचा बचाव करून घेतात.आणि पुन्हा एकदा बुरशी मदतीला धावून येते.बीटलच्या शरीरावर बुरशी उगवते आणि भोक पाडत असताना बुरशी सालावर जाऊन इथे पोचून ते स्प्रूसचे रासायनिक बचावाचे निष्क्रिय पदार्थात रूपांतर करून निकामी करते.सालात भोक पाडण्याच्या बीटलच्या वेगापेक्षा जास्त वेगाने बुरशी वाढते आणि बीटलपेक्षा एक पाऊल पुढे असते.म्हणजे बारके बीटल जिथे जातील त्याच्या आधीच पूर्ण क्षेत्र सुरक्षित झालेले असते.आता त्यांची संख्या वाढण्यास कोणतीच बाधा येत नाही आणि काही काळातच हजारो अळ्या बाहेर पडतात व सशक्त झाडेही कमकुवत होतात.पण ही गोष्ट प्रत्येक वृक्षाला सहन होते,असं नाही.मोठी शाकाहारी जनावरं मात्र एवढं कौशल्य दाखवत नाहीत.त्यांना दिवसाकाठी भरपूर अन्न खावं लागतं,
पण खोल जंगलात अन्न मिळणं सोपं नसतं.इथे सूर्यप्रकाश नसल्यामुळे तळाला फारशी हिरवाई नसते आणि लज्जतदार पालवी उंच असल्यामुळे तिथंपर्यंत ते पोचू शकत नाही.आणि त्यामुळे सर्वसाधारण अशा परिसंस्थेत हरणे कमी असतात.एखादं मोठं झाड वठलं की मगच त्यांना संधी मिळते.असं होताच सूर्यप्रकाश इथं पोचतो आणि थोड्या काळासाठी तरी जंगली झुडपं आणि गवत वाढू लागते.अशा क्षेत्रात जनावरं धावून येतात.इथं मोठ्या प्रमाणात चराई होते आणि नवीन रोपटी वाढू शकत नाहीत.सूर्यप्रकाश म्हणजे साखर,आणि त्यामुळे चराई करणाऱ्या प्राण्यांना तरुण झाडं आकर्षित करतात. 

खोल जंगलाच्या अंधारात नवीन कोंबांना सूर्यप्रकाश मिळत नाही.त्यांना जिवंत ठेवण्यासाठी जे अन्न लागतं ते त्यांच्या पालकांकडून मुळांच्याद्वारे दिले जाते.
साखरेपासून वंचित राहिलेले कोंब कणखर आणि कडवट बनतात आणि म्हणून हरण त्यांच्यावर चराई करत नाहीत.पण सूर्यप्रकाश मिळताच नवीन कोंब फुटू लागतात.प्रकाश संश्लेषण सुरू होते आणि त्यांची पालवी जाड व रसरशीत होऊ लागते. 

कोंबांमध्ये भरपूर पोषण भरते आणि त्या छोट्या रोपांवर भरभरून कळ्या फुटतात.हे असेच अपेक्षित आहे,कारण पुढच्या पिढीला लवकरात लवकर उंची गाठून तो सूर्यप्रकाश पुन्हा बंद करायचा असतो.पण या सगळ्यांमध्ये हरणांचं लक्ष वेधलं जातं आणि असा लज्जतदार खाऊ त्यांना सोडता येत नाही.पुढील काही वर्ष हरणं आणि रोपटी यांच्यात अशीच स्पर्धा चालू राहील.हरणाचं तोंड आपल्या मुख्य खोडापर्यंत पोचू शकणार नाही इतकी उंची ते छोटे बीच,ओक आणि फरची रोपटी झटपट गाठू शकतील का?

 सर्वसाधारणपणे हरणं सगळी झुडपं फस्त करत नाहीत.त्यामुळे काही रोपटी शिल्लक राहतात आणि त्यांची वाढ आकाशाकडे सुरू होते.ज्या रोपट्यांचे मुख्य खोड खाऊन टाकलेले असते ते मात्र वाकलेलेच वाढते.स्पर्धेत मागे पडली जातात आणि कालांतराने खूप इजा झालेली रोपटी सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे मरून जातात आणि पुन्हा मातीत जैविक माल म्हणून मिसळतात.याबाबतीत हनी फंगस बुरशीचे फळ म्हणजे छत्री,ही आपल्या आकाराच्या मानाने खूपच धोकादायक आहे. याच्या छत्र्या यूरोप आणि उत्तर अमेरिकेत वठून पडलेल्या झाडावर उगवलेल्या दिसतात.मध्य युरोपमध्ये याच्या सात प्रजाती आहेत पण सर्व प्रजाती झाडांना त्रासदायक असतात.ते मायसिलीयम,म्हणजे त्यांच्या तंतूच्या जाळ्याने फर,बीच आणि ओक वृक्षांच्या मुळात शिरतात.तिथून त्या खोड आणि सालीमध्ये शिरतात आणि आपल्या छत्र्या बाहेर काढतात.कॅम्बियम मधून ते मुख्यतः साखर आणि पोषणद्रव्ये आपल्या जाड काळ्या धाग्यासारख्या अवयवातून घेतात.बुटाच्या लेस सारखे दिसणारे हे अवयव बुरशीच्या जगात वैशिष्ट्यपूर्ण आहेत.पण हनी फंगस फक्त साखरेवर थांबत नाही. त्याची जशी वाढ होते तसे लाकूडही खाल्ले जाते आणि झाड कुजायला सुरुवात होते.कालांतराने ते झाड मरून जाते.ब्लूबेरी आणि हेदर या बुटक्या रानटी झाडांच्या कुळातील पाईनसॅप नावाची वनस्पती जास्त सूक्ष्मपणे कार्यरत असते.या वनस्पतीला एक साधं दिसणारं फिक्कट तपकिरी फूल असतं,तिच्यामध्ये हिरवं रंगद्रव्य नसतं.ज्या वनस्पतीत हिरवा रंग नाही त्याच्यामध्ये क्लोरोफिल नाही आणि प्रकाशसंश्लेषण करण्याची क्षमताही नाही.म्हणजे पाईनसॅप ही वनस्पती अन्नासाठी पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असते.झाडांच्या मुळांना मदत करणाऱ्या 'मायकोरायझल' या झाड आणि बुरशी यांमधल्या सहजीवी जाळ्याबरोबर ती स्वतःला धूर्तपणे जोडून घेते.आणि प्रकाशसंश्लेषण करत नसल्यामुळे जंगलातल्या स्प्रूसच्या खूप अंधारी भागातही वाढू शकते.बुरशी आणि झाडाच्या मुळांमधून ती स्वतःसाठी पोषणद्रव्ये शोषून घेत राहते. 'स्मॉल काऊ व्हीट' सुद्धा पाईनसॅप सारखेच करते,पण जरा पवित्रपणाचे ढोंग आणून.यालासुद्धा स्प्रूस आवडतं आणि मुळांपाशी असणाऱ्या बुरशी मुळांमधल्या जाळ्यात ते शिरतं. आमंत्रण नसलेल्या पाहुण्यासारखे तिथे पोचून ताव मारतं.या वनस्पतीचे जमिनीवरचे अवयव साध्या पानांसारखे हिरवे असतात आणि थोडंफार प्रकाशसंश्लेषण करून साखर बनवू शकतात.पण फार थोडं अन्न ते बनवतात आणि जवळजवळ पूर्णपणे अन्नासाठी दुसऱ्यांवरच अवलंबून राहतात.ही थोडी हिरवी पानं ही जंगलाला फसवण्यासाठी केलेलं ढोंग असतं,बरं का!जीवसृष्टीला झाडांकडून फक्त खाद्य नाही तर बरंच काही मिळतं.जनावरांकडून छोट्या झाडांचा वापर अंग खाजवण्यासाठी केला जातो. 

उदाहरणार्थ,नर हरणांना दरवर्षी त्यांच्या शिंगावर येणारे वेलवेटसारखे कातडे काढून टाकावे लागते.
यासाठी ते एक छोटे लवचीक पण धडधाकट झाड शोधतात.पुढले अनेक दिवस जोपर्यंत सर्व कातडं निघून जात नाही तोपर्यंत ते आपले शिंग झाडाला घासत बसतात. यानंतर त्या झाडाची साल इतकी खराब होते की,बहुतेकदा झाड मरून जातं.

जंगलामध्ये जे काही वेगळे किंवा वैशिष्टपूर्ण असेल, नेमकी तीच झाडं हरणांना पसंत पडतात.मग ते स्प्रूस, बीच,पाईन असो किंवा ओक,असे का कोणास ठाऊक? कदाचित तुकडे पडून गेलेल्या सालाचा सुवास त्यांना धुंद करणारा वाटत असेल.माणसांचेही काही वेगळे नाही.आपल्यालाही दुर्मिळ गोष्टीच साठवून ठेवायच्या असतात.

पण जर झाडाच्या खोडाचा व्यास चार इंचाहून अधिक असला तरच त्या उतावळ्या हरणांचा त्रास झाडांना सहन करता येतो.त्यांचं खोड मजबूत आणि स्थिर झालेलं असतं,त्यामुळे हरणांच्या शिंग घासण्याने ते वाकत नाही.पण आता हरणांना याहून काही वेगळं हवं असतं.सर्वसाधारणपणे हरणं जंगलात चराईला येत नाहीत कारण त्यांना गवत पसंत असते.हरणांच्या कळपाला लागेल इतकं गवत काही जंगलात मिळत नाही.म्हणूनच हरिण उजाड माळरान पसंत करतं. 

नदीच्या खोऱ्यात मैदानात भरपूर गवत वाढतं,पण अशा खोऱ्यातून माणसांचं वास्तव्य असतं.इथे प्रत्येक चौरस यार्ड घरासाठी किंवा शेतीसाठी वापरला जातो. आणि म्हणूनच दिवसा हरणं जंगलात जातात आणि रात्री हळूच बाहेर पडतात.शाकाहारी जीव असल्यामुळे त्यांना आपल्या अन्नातून तंतूंची जरूर असते आणि म्हणूनच काही मिळाले नाही की त्यांच्याकडून झाडाची सालं खाल्ली जातात.
उन्हाळ्यात जेव्हा झाडामध्ये भरपूर पाणी असते तेव्हा त्याचं साल सोलून खाणं तसं सोपं असतं.फक्त खालच्या जबड्यात असलेले पुढचे कापणारे दात वापरून ते झाडावरून पट्ट्या काढू शकतात.
हिवाळ्यात जेव्हा झाडं वामकुक्षी करतात आणि साल कोरडं असतं तेव्हा हरणं फक्त त्याचे काही तुकडे काढू शकतात. आणि झाडाला हे त्रासदायक तर असतंच पण त्यांच्या जीवाला धोका ही पोचतो. या उघड्या जखमांमधून मोठ्या प्रमाणात बुरशी आत शिरते आणि झाडाला झालेली जखम भरून काढता येत नाही. जर हे झाड एखाद्या दाट जंगलात शांतपणे वाढत असलं तर त्याला हा आघात पचवता येतो. त्यांच्या खोडाची घडण सूक्ष्म वळ्यांपासून झालेली असल्यामुळे लाकडाची घनता जास्त असते आणि कणखर असते. यामुळे बुरशीला आत शिरणे सोपे नसते.मी अशी झाडं पाहिली आहेत.त्यांना एखादं दशक लागतं,पण ते अशा जखमा भरून काढतात.
पण आमच्या व्यावसायिक लागवडीच्या जंगलात मात्र असं होत नाही.इथं त्यांची वाढ झपाट्याने होते आणि खोडातली वळी मोठी असतात.म्हणून लाकडामध्ये भरपूर हवा असते.हवा आणि आर्द्रता एकत्र आली की बुरशींची मजा आणि मग जखम झालेली झाडं कालांतराने मोडतात.जखमा जर छोट्या असतील तर मात्र त्या बुजवणं झाडांना शक्य होतं.

समाप्त…

३१/१०/२५

तुझं की माझं ? Yours or mine?

जंगलाची परिसंस्था एका अतिशय नाजूक संतुलनात असते.इथल्या प्रत्येक सजीवाची एक भूमिका असते आणि परिसंस्थेमध्ये प्रत्येकाचा एक वैशिष्ट्यपूर्ण कोनाडा असतो.निसर्गाचे वर्णन अनेकदा असे केले जाते.पण दुर्दैवाने हे अचूक नाही.कारण झाडांच्या खाली जंगलाचे नियम चालतात.प्रत्येक प्रजातीची जिवंत राहण्याची धडपड असते आणि आपल्याला लागेल ते तो दुसऱ्यांकडून घेत राहतो.प्रत्येक जण तसा निर्दय असतो.पण ही व्यवस्था कोलमडत नाही कारण गरजेपेक्षा जास्त ओरबाडणाऱ्यांपासून इथे संरक्षण असते.याच बरोबर प्रत्येक सजीवाला एक जनुकीय मर्यादा असते.गरजेपेक्षा जास्त घेणारा सजीव हा परिसंस्थेत परतफेड करत नाही.त्यामुळे त्याला जगण्यासाठी जे लागते ते खलास करून तो स्वतःही तग धरू शकत नाही.

 बहुतांश प्रजातींमध्ये काही अंगभूत आचरण असते,
ज्यामुळे जंगलाचा ओरबडा होऊ शकत नाही.याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 'जे' (नीलकंठ प्रजातीचा पक्षी) नावाचा पक्षी.हा पक्षी ओक आणि बीच वृक्षाच्या या बिया खातो.पण अनेक बिया तो जमिनीत पुरून ठेवतो.यामुळे पुन्हा या झाडांची रोपटी तयार होऊन जंगलाची वाढ होऊ शकते.तुम्ही जेव्हा एखाद्या उंच,अंधाऱ्या जंगलातून चालता तेव्हा ते किराणा
मालाच्या दुकानात चालण्यापेक्षा फार वेगळे नसते.
इथंही भरपूर मेवा असतो - निदान जनावरं,
बुरशी आणि सूक्ष्मजीवांसाठी तरी असतो.साखर,
सेल्युलोज, लिग्निन आणि कर्बोदके मिळून एका झाडात लक्षावधी कॅलरीज (उष्मांक) असतात.त्याच बरोबर मौल्यवान खनिजे आणि पाणीही असते.मी किराणा मालाचं दुकान म्हटले का?नाही,याचे अधिक योग्य वर्णन म्हणजे अतिशय सुरक्षित असे गोदाम,
कारण इथं कोणीही जाऊन काहीही घेऊ शकत नाही.दरवाजा बंद आहे आणि साल जाड आहे.
त्यामुळे जर तुम्हाला तिथला गोड खाऊ घ्यायचा असेल तर त्यासाठी एक आराखडा हवा. समजा तुम्ही सुतार पक्षी (वूडपेकर) आहात.

|या पक्ष्याला एक विशिष्ट शारीरिक रचना लाभलेली असते.त्यामुळे त्याची चोच काही प्रमाणात वाकू शकते आणि डोक्याचा स्नायू धडक पचवू शकतात. हा पक्षी डोकेदुखी न होता झाडांवर वारंवार चोच्या मारू शकतो.वसंत ऋतूमध्ये जेव्हा झाडाच्या खोडातून पाणी वर पोचवलं जात असतं,तेव्हा त्यावर ताव मारण्यासाठी सुतार पक्ष्यांच्या काही प्रजाती छोट्या फांद्यांवर बारीक भोके पाडून या रसाचे सेवन करतात.यांना 'सॅपसकर' म्हणतात. हाडांच्या या जखमेतून रक्तस्राव होतो.पण झाडाचे रक्त काही भीतीदायक नसते.ते पाण्यासारखेच असते.पण रक्त गेल्यावर आपल्याला जसा त्रास होतो तसाच झाडालाही होतो.आणि याच द्रव्यावर सॅपसकर सुतार पक्ष्यांचा डोळा असतो.जोपर्यंत सुतार पक्षी फार जास्त भोकं करत नाही,तोपर्यंत झाडाला जखमांची फार काळजी नसते,ती सहन करायची ताकद असते.
कालांतराने जखमा भरून निघतात आणि झाडाच्या सालावर मुद्दाम केलेल्या सजावटीसारखे रूप येते.

अफिड (यांना झाडाच्या उवा किंवा ग्रीनफ्लाय म्हटले जाते) हा सुतार पक्ष्यापेक्षा फार आळशी असतो.महत कष्टाने उगीच उडून झाडाला भोकं पाडण्यापेक्षा तो स्वतःचे तोंड झाडांच्या नसांमध्ये किंवा सुयांमध्ये घुसवत ठेवतो आणि द्रव्य शोषून घेतो.इतर कोणीही पिऊ शकत नाही इतके द्रव्य त्याला पिता येते.झाडाचे प्राणद्रव्य या कीटकाच्या शरीरात शिरते आणि दुसऱ्या बाजूने मोठ्या थेंबाच्या रूपात बाहेर येते.अफिडना अशा प्रकारे भरपूर पेयपान करावे लागते कारण या द्रव्यात अत्यल्प प्रथिने असतात.प्रथिने अफिडना वाढण्यासाठी आणि प्रजननासाठी गरजेचे असते. या द्रव्याला ते गाळून घेतात आणि कर्बोदक आणि साखर न वापरता बाहेर सोडतात त्यामुळे अफिडची लागण झालेल्या झाडांच्या खाली चिकट हनीड्यू द्रव्य पडत राहते.कदाचित तुम्ही कधीतरी आपली गाडी अफिडची लागण झालेल्या मेपलच्या झाडाखाली ठेवली तर थोड्या वेळातच गाडीची काच चिकट झालेली तुम्हाला जाणवेल.

प्रत्येक झाडाला असे द्रव्य शोषणारे वैशिष्ट्यपूर्ण कीटक असतात.फर ३ (बाल्सम ट्विग अफिड), स्प्रूस (हिरवा स्प्रूस अफिड),ओक (ओक पानाचा फायलोक्सेरा),आणि बीच (वूली बीच अफिड) पूर्ण जंगलात शोषण आणि विष्ठा विसर्जन चालू असतं. झाडांची पान खाणाऱ्या जनावरांची जागा पक्की असल्यामुळे इतर प्रजाती अतिशय कष्टाने जाड सालीला भोक पाडून आतले द्रव्य घेण्याच्या मागे लागतात.सालीतून पोषण मिळविणारे वूली बीच स्केल सारखे कीटक आपल्या मेणचट चंदेरी-पांढऱ्या लोकरीने पूर्ण खोडाला वेटोळे घालू शकतात.
आपल्याला खरूज झाल्यावर जसा त्रास होतो,तसाच त्रास या कीटकांमुळे झाडालाही होतो. या जखमा भरून यायला वेळ लागतो आणि खोडावर त्याचे वर्ण शिल्लक राहतात.असे झाल्यावर बुरशी आणि सूक्ष्म जीव त्यात शिरतात आणि झाड खचत जाऊन शेवटी मरतं.त्यामुळे यांच्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी झाड रासायनिक पदार्थ तयार करतं,यात काहीच आश्चर्य नाही.अशी आक्रमणं होत राहणार असतील तर आपले साल जाड असण्याचा झाडाला फायदा होतो.असं करून झाडं काही वर्ष तरी सुरक्षित राहतात.पण केवळ या कीटकांचा संसर्ग हा एकच प्रश्न त्यांच्यासमोर नसतो.द्रव्य शोषणारे कीटक आपली भूक शमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडातले पोषणद्रव्य काढून घेतात.एक चौरस यार्ड जंगलातून झाडांच्या पोषणद्रव्यांतून शेकडो टन साखर हे कीटक काढून घेऊ शकतात.त्यामुळे झाडं आपला पोषणाचा साठा गमावून बसतात आणि येणाऱ्या वर्षी त्यांची वाढ कमी होते.पण काही जनावरांना मात्र हे शोषण करणारे कीटक उपयुक्त ठरतात.लेडीबगच्या आळ्या अफिड आवडीने खातात.तसेच जंगली मुंग्यांना अफिडने सोडलेले हनीड्यू द्रव्य इतके आवडते की ते चक्क अफिडच्या पार्श्वभाग चाटतात.

(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे नअनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)

आपल्या संवेदनाग्रांनी अफिडला गोंजारून ते अफिडला जास्त वेगाने हनीड्यू काढून घेण्यासाठी उद्युक्त करतात.दुसऱ्या कोणाला हनीड्यूची चाहूल लागू नये म्हणून ते अफिडचे संरक्षणही करतात. जंगलामध्येसुद्धा पाळीव प्राणी आहेत ! मुंग्यांना जास्त झालेला हनीड्यू वाया जात नाही.अफिड लागलेल्या झाडाभोवती सांडलेल्या चिकट हनीड्यूवर बुरशी आणि सूक्ष्मजीव लगेच येतात आणि तिथे काळी बुरशी जमा होते.मधमाशांनाही अफिडने सोडलेले हनीड्यू आवडते.थोडंसं तिथच शोषून बाकीचं त्या आपल्या पोळ्यात घेऊन जातात.पोळ्यात ते परत बाहेर काढतात आणि त्याचाच जंगली मध बनतो.जरी फुलातल्या मकरंदाशी संबंध नसला तरीही ग्राहकांना हा मध फारच आवडतो.गॉल मिज आणि वास्प कीटक थोडे मार्मिक असतात.पानांना भोक पाडण्यापेक्षा ते पानांना प्रोग्रॅम (नकळत सूचना देणे) करतात. यासाठी प्रथम ते बीच किंवा ओकच्या पानांवर आपली अंडी घालतात.त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या या झाडाचे द्रव्य शोषून घेतात.असे करताना त्यांच्या लाळेतील रसायने बाहेर आल्यामुळे पान त्यांच्याभोवती एक सुरक्षा कवच बनवायला लागते. बीज वृक्षात हे कवच टोकदार असते आणि ओक वृक्षाचे गोलसर.पण दोन्ही प्रकारच्या कवचात राहणाऱ्या कीटकांना त्यांच्या भक्षकांपासून संरक्षण मिळते.उन्हाळ्याच्या आधी पान गळून पडते आणि वसंत ऋतू आला की आतल्या आळ्या कोशातून बाहेर पडतात.यांची लागण बीच वृक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात होते पण झाडाला त्याचा त्रास होत नाही.

सुरवंटांची गोष्ट वेगळीच असते.त्यांचा डोळा झाडाच्या पोषणद्रव्यावर नसतो त्यांना तर पूर्ण पान हवं असतं.
जर सुरवंटं जास्त नसतील तर झाड लक्ष देत नाही.
पण यांच्या संख्येत वाढ आणि घट चालूच असते.
माझ्या जंगलात एकदा काही ओक वृक्षांवर प्रचंड प्रमाणात सुरवंट झाले होते.ही झाडं एका दक्षिणमुखी उतारावर होती.त्या जूनमध्ये मला असं दिसलं की,
वृक्षांची नवीन पालवी पूर्णपणे नाहीशी झाली होती.झाडं थंडीत पानझड झाल्यासारखी दिसत होती.
माझ्या जीपमधून मी उतरलो तेव्हा मला वादळी पावसासारखा गडगडाट ऐकू आला. पण आकाश तर निरभ्र होते म्हणजे हा आवाज हवामानाचा नव्हता.
नाही.झाडावरून लाखो सुरवंटांची काळीकाळी विष्ठा माझ्या डोक्यावर आणि खांद्यावर टपकत होती.शी! हे दृश्य पूर्व आणि उत्तर जर्मनीच्या मोठ्या पाईन जंगलातूनही दिसते.व्यावसायिक लागवडी होणारी एकसुरी जंगलं फुलपाखरू 'नन' आणि 'पाईन लूपर'
सारख्या पतंगांच्या घाऊक प्रजननाला संधी देते.
त्यांच्या जीवनचक्राच्या शेवटी मात्र झाडं आजारी पडतात आणि मग त्यांची संख्या एकदम रोडावते.जून महिन्याअखेर झाडावरची पानं संपली की मग सुरवंटांची विष्ठा पडायची थांबते.आता झाडांना आपली सर्व शक्ती पणाला लावून पुन्हा पालवी उगवायची असते.याला तशी अडचण येत नाही.काही आठवड्यानंतर सुरवंटांच्या चराईचे नामोनिशाण दिसत नाहीत,पण झाडाची वाढ मात्र मर्यादित होते.यावर्षी झाडाची वाढ कमी झाल्याचे खोडामधील अरुंद झालेल्या वाढीच्या चक्तीतून दिसून येते.जर सलग दोन-तीन वर्ष सुरवंटांची संख्या वाढली तर मात्र झाड अशक्त होऊन वठून जाते.जंगलात फुलपाखरांच्या अळ्यांबरोबर सूचीपर्णी सॉफ्लाईजसुद्धा असतात. 'सॉ' म्हणजे करवतीने कापणे.या माशा चक्क झाडाची उती कापतात आणि त्यात आपली अंडी घालतात. झाडांना त्यांच्या आळ्यांची जितकी भीती असते तितकी प्रौढ माशांपासून नसते.अळ्यांच्या इवल्याशा तोंडातून दिवसाला बारा सूचीपर्ण खाल्ली जातात आणि लवकरच झाडाला धोका निर्माण होतो.. 

अपूर्ण उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..

२९/१०/२५

शुक्राची चांदणी / Moonlight of Venus

माझ्या लहानपणी पावसाळा आणि सुरुवातीचे थंडीचे दिवस वगळता,सोलापुरात आमच्या कुटुंबातील सारे जण रात्री घराच्या माळवदावर झोपत असू.त्या काळात मी रोज पहाटे अभ्यासाला उठत असे.रात्री झोपताना मी आईला सांगे,

'मला पहाटे उठव.'
आई मला पहाटे हाक मारी.
'अरे ऊठ.बघ ती शुक्राची चांदणी उगवली.'

त्या वेळी पहाटेचे सुमारे चार वाजलेले असत.मी त्या चांदणीकडं एकदा डोळे भरून पाहूनच अभ्यासाला सुरुवात करी,तो पार शुक्राच्या चांदणीचा रंग धुवट होईपर्यंत.नंतर उजाडलेलं असे.

दिवाळीत,नाताळात आणि उन्हाळ्याच्या सुटीत मी माझ्या बहिणीच्या गावी नळदुर्गजवळच्या दस्तापूरला बैलगाडीनं जाई.सोलापूरहून सकाळी निघालं,की नळदुर्गला पोहोचेपर्यंत दिवस मावळे.बरोबर आणलेली शिदोरी खाऊन रात्री तिथल्या देवळासमोरच्या वडाखाली मुक्काम असे.त्या वेळी झोप येईपर्यंत मी झाडाच्या पानोळ्यांतून आभाळातील चांदण्यांकडं पाही. रामा गाडीवानाला पहाटे जाग येई.तेव्हा शुक्राची चांदणी क्षितिजावर उगवलेली असे.किती तेजस्वी दिसे ती ! वाटे,'घन तमीं शुक्र बघ राज्य करी' नदीच्या खोल पात्रात तिचं प्रतिबिंब पडलेलं असे.एकदा आभाळाकडं अन् एकदा नदीकडं पाहात मी मनात विचार करी,यात अधिक सुंदर कोण दिसतंय ?

जुंपलेल्या गाडीत बसलं,की ती चालू लागे.बैलाच्या गळ्यातील घुंगुरघंटांच्या नादात गाडी पहाटेच्या वेळी माळरानातून चाललेली असे.गाडीत मांडी घालून मी शुक्राच्या सुंदर चांदणीकडं पाहात राही.माळरानातली पहाटेची वेळ मोठी अद्भुतरम्य असते.धरती गोल आहे, हे माळरानाइतकं अन्यत्र कुठं जाणवत नाही.वर निळं आकाश.आकाशात सहस्रावधी ग्रह-तारे प्रकाशत असतात.त्या सर्वांमध्ये शुक्राची चांदणी आपलं लक्ष अधिक वेधते.बालपणापासून या शुक्राच्या चांदणीशी असं नातं जुळलं,ते वाढत्या वयाबरोबर दृढ होत गेलं. कॉलेजमध्ये असताना कित्येकदा मी माळकरीण आत्याच्या गावाबाहेरील शेतावर सुटीच्या दिवशी गेलो, तर दिवसभर माळरानात भटकून रात्री तिथल्या वस्तीवरच मुक्कामाला राही.

शेतात ज्वारीचं पीक उभं असे.वाऱ्याच्या झुळकेबरोबर क्षणोक्षणी ज्वारीच्या घाटांच्या पात्यांचा सळसळ आवाज येई.शेकोटी पेटवून तिच्यासमोर आत्या जागत बसलेली असे.मधूनच कोल्हेकुई ऐकू येई.त्यामुळं माझी झोप चाळवे.मनात अकल्पित भीती उभी करी.आत्या मला हाक मारी,

'अरे,पहाट झाली,बघ.शुक्राची चांदणी उगवली.असा बाहेर तरी ये.' मी शेकोटीपुढं बसून त्या चांदणीकडं अनिमिष नेत्रांनी पाहात राही.आत्या आपल्या गोड आवाजात अभंग म्हणत असायची.

पहाटे उठायची बालपणी जडलेली ती सवय मी आयुष्यभर जोपासली.

दोन वर्षं मी दक्षिणेतील कोइमतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये शिकत होतो.पावसाळा सोडला,तर बाकी आठ महिने आमचं वास्तव्य जंगलातील राहुटीत असे.त्या वेळी देखील मला पहाटे जाग यायची.सारे विद्यार्थी आपापल्या राहुटुत गाढ झोपलेले असत.कित्येकांचा झोपेत घोरण्याचा आवाज येई,माझ्या सोबत्याला जाग येणार नाही,याची काळजी घेत मी राहुटीच्या बाहेर येई आणि खुर्चीवर बसून जंगलातील वृक्षांच्या छतावर उगवलेल्या शुक्राच्या चांदणीकडं पाहात राही.

 जंगलाभोवतालच्या स्वच्छ वातावरणामुळं आकाशाचा रंग जांभळा दिसे.त्या जांभळ्या नभोवितानातील चांदणीच्या अलौकिक सौंदर्याकडे मी ध्यानमग्न होऊन पाहात राही.ही माझी जणू एक प्रकारची ध्यान-धारणाच होती !परंतु त्यामुळं पक्षिनिरीक्षणासाठी जी शांत चित्तवृत्ती लागते, तिचा न कळत मला लाभ झाला.

शुक्राची चांदणी पहाटेला पूर्वेकडे बरेच दिवस दिसते. कधी सायंकाळी पश्चिमेस दिसते.दर वीस महिन्यांत नऊ महिने शुक्राची चांदणी पहाटेला पूर्वेकडं दिसते. सायंकाळच्या शुक्राच्या चांदणीला आदिवासी 'जेवणतारा' म्हणतात.म्हणजे ती उगवून मावळेपर्यंत त्यांची रात्रीची जेवणं उरकलेली असतात.शुक्राची चांदणी केव्हा सूर्यास्तानंतर थोडा वेळ आणि केव्हा सूर्योदयापूर्वी पहाटे दिसते,याची मी नोंद केलेली आहे.

पहाटे उगवणाऱ्या शुक्राच्या चांदणीनं मला भुरळ पाडली,त्याचप्रमाणे संधिप्रकाशात दिसणाऱ्या या चांदणीनं आकर्षित केलं आहे.संधिप्रकाशासमयी मी एखाद्या उंच डोंगरावर जाऊन उभा राही.हळूच मिणमिणती शुक्राची चांदणी क्षितिजावर डोकावू लागे. या संधिप्रकाशात तिच्या आगळ्यावेगळ्या लावण्याचा मला प्रत्यय येई.वाढत्या अंधाराबरोबर तिचं सौंदर्य वाढत जाई.रात्री प्रकाशणाऱ्या ताऱ्यांमध्ये शुक्रासारखा तेजस्वी व सुंदर असा दुसरा तारा नाही.म्हणून पाश्चात्त्य लोकांनी याला 'सौंदर्याची खाण' व 'देवता' अशा अर्थाचं 'व्हीनस' हे नाव दिलं आहे.गुरूही तेजस्वी आहे,पण त्याचं तेज शुक्रापेक्षा कमी आहे. हे दोघंही जवळजवळ असले म्हणजे जे रम्य दृश्य दिसतं,ते अवर्णनीय असतं.

नंतरच्या आयुष्यात शुक्राच्या चांदणीचं सौंदर्य न्याहाळण्याचा छंदच लागला.जंगलातील मार्गानं सायंकाळी जाताना ती समोरच उगवलेली दिसायची. साऱ्या वाटभर तिची सोबत असे.कधी कधी पहाटे वनविश्रामगृहाच्या व्हरांड्यातून ती स्पष्ट दिसायची.
ताऱ्यांचा प्रकाश दिसत नाही म्हणतात.परंतु घनदाट जंगलातील वृक्षांच्या छतावर ताऱ्यांचा सौम्य व शीतल प्रकाश पडलेला असतो.कित्येकदा पहाटेच्या वेळी मी वनमार्गानं पायी हिंडे.बांबूच्या बेटातील मोरपिशी फांद्यांआडून शुक्राची चांदणी दिसे.तिच्या सौम्य आल्हाददायक प्रकाशात मोरपंखी सावल्या जमिनीवर पडलेल्या असत.फक्त हे सारं कोमल मनानं अनुभवायची इच्छा हवी.

शुक्राच्या चांदणीच्या मी किती आठवणी सांगू? त्यातलं किती विसरावं,किती सांगावं । नवेगावबांध सरोवर आणि इटियाडोह जलाशयांच्या काठी या चांदणीच्या दर्शनासाठी मी पहाटेच्या वेळी हिंडत असे.अतिसौम्य प्रकाश पाण्यावर पडलेला आणि त्यात दिसणारं तिचं सुंदर प्रतिबिंब.जणू एखादी जलवंतीच वाटायची. जलाशयात पडलेली तिची पडछायाच आकाशातील चांदणीपेक्षा देखणी दिसे.

चैत्रात पिंपळ वृक्षाला सोन्याची पानं लागत.कधी रात्री, तर कधी पहाटेच्या समयी जंगलातील विशाल पिंपळ वृक्षाच्या गोपुरातून शुक्राची चांदणी डोकावे. पिंपळाचं आणि या चांदणीचं काही तरी सख्य असावं. वाटे,पऱ्या या चांदणीवरून अलगद या सोन्याच्या पिंपळावर उतरत असाव्यात.

असाच अद्भुत गूढतेचा अनुभव मला दरेकस्सा
नजीकच्या जंगलातील दलदलीवर येई.मी पहाडावरच्या उंच प्रशस्त शिळांवर बसून समोरच्या चांदणीकडं पाही.तिचं अलौकिक सौंदर्य असलेलं प्रतिबिंब दलदलीत पडलेलं दिसे.त्या दलदलीच्या खोलीला अंत नाही.पाताळापर्यंत ती भेदीत गेलेली. चांदणीपासून दिसते न दिसते,अशी प्रकाशाची वाट पार दलदलीपर्यंत रेखीत गेलेली.त्या वाटेवरून यक्षिणी आणि किन्नरी ये-जा करीत असल्याचा भास होई. माझ्या सोबतीला असलेला दल्लू गोंड भीतियुक्त आवाजात म्हणायचा,(पाखरमाया,मारुती चितमपल्ली,
साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी,नागपूर )

"साब,आता चलू या परत.ही जागा झपाटलेली आहे. सदान्कदा इथं काहीबाही दिसल्याचे भास होतात.एक दिवस तुम्ही आपला जीव गमावून बसाल,अन् बलामत माझ्यावर येईल.पुढच्या वेळेला मी तुमच्याबरोबर येणार नाही."परंतु कुठल्या तरी अज्ञात ओढीनं आम्ही परत परत तिथं जात असू.दल्लू प्रत्येक वेळी मला हाच सल्ला देई.

मेळघाटाच्या सरहद्दीवर वाहणाऱ्या तापी नदीच्या काळ्याशार डोहात शुक्राच्या चांदणीचं प्रतिबिंब मी अनेक वेळा पाहिलं.त्या वेळची गूढता हुदाळ्याच्या शिशुलीनं द्विगुणीत होई.कृष्णामाई आणि गोदावरी यांच्या घाटांवर बसून या चांदणीकडं पाहण्यात एक अलौकिक आनंद मी अनुभवला.सागरकिनाऱ्यावरील पुळणीवर बसून तिच्याकडं पाहण्यात एक आगळा-
वेगळा सौंदर्यानुभव येतो.तसाच प्रत्यय नारळी-
पोफळींच्या झावळ्यांतून ती डोकावत असताना येतो.मला नेहमी वाटे,माझ्या सुप्त मनातील सौंदर्यभावना या शुक्राच्या चांदणीनं तर जागी केली नाही ना? तिच्याकडं दुर्बीण लावली तर ती कधी कधी चंद्रकोरीसारखी वाटे.कधी अर्धचंद्राकार,तर कधी पूर्ण चंद्राकार दिसे.हा चमत्कार पाहून ती प्रतिचंद्र आहे काय असा भास होई.चंद्र म्हणावा,तर लहान दिसते. चंद्रासारखे डाग तिच्यावर दुष्टीस पडत नाहीत,

आकाशाच्या सौंदर्यावर प्रेम करणाऱ्या बालकवींच्या नजरेतून शुक्राची चांदणी सुटली,तरच नवल. 'शुक्रोदय' या कवितेत ते म्हणतात-

दिव्याच्या मागुनि चाले - विश्व,खरें कळुनी आलें; 
केंद्र त्या सौंदर्याचा - शुक्र नभीं उगवे साचा 
मुकुट कळ्यांचा दिव्य शिरीं - पीतांबर परिधान करी, तेज विखुरलें चोहिंकडे - पुष्पांवर गगनीं उघडें...

आकाशाकडं पाहिलं असता ज्याकडं लक्ष जायचं,असं शुक्रासारखं तेज आश्चर्यानंदकारक झालं नसेल आणि इतर ताऱ्यांपेक्षा या तेजाची गती काही निराळी आहे (म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या भाषेत हा ग्रह आहे.)
असं प्राचीन ऋषींच्या लक्षात आलं नसेल,हे संभवनीय दिसत नाही. प्राचीनतम वेदसूक्तं ज्या काळी झाली, त्या काळीच ही गोष्ट त्यांच्या लक्षात येऊन गुरू व शुक्र यांच्या ठायी त्यांनी देवत्व कल्पिलं,अश्विनौ म्हणून जे देवताद्वय वेदांत प्रसिद्ध आहेत, त्यांची मूळ कल्पना गुरू-शुक्रावरूनच उद्भवली.दर वीस महिन्यांत नऊ महिने पहाटे पूर्वेस शुक्र दिसतो.त्यात बहुधा प्रत्येक खेपेस सुमारे दोन-तीन महिने गुरू त्याच्या जवळ असतो.त्यात काही दिवस तर फारच जवळ असतो.पुढं शुक्राची गती जास्त असल्यामुळं गुरू त्याच्या मागं म्हणजे पश्चिमेस राहून उत्तरोत्तर शुक्राच्या अगोदर उगवू लागतो व काही दिवसांनी शुक्र पहाटेस उगवत आहे,तोपर्यंत गुरू पश्चिमेस अस्त पावण्याची वेळ आलेली असते.म्हणजे त्यानं सगळ्या आकाशाचं भ्रमण केलेलं दिसतं.गुरू आणि शुक्र एकत्र आहेत.अशा वेळी त्याविषयी अश्विनत्वाची कल्पना झाली असावी आणि पुढं त्यापैकी एक (शुक्र) नेहमी सूर्याजवळ असतो आणि दुसरा (गुरू) सर्व आकाशात फिरतो,हे पाहून पुढील कल्पना आली असावी-

ईर्मान्यद्वपुषे वपुश्चक्रं रथस्य ये मथुः ॥ 
पर्यन्या नाहुषा युगा महारजांसि दीयथः ॥
(ऋ.सं. ५.७३.३. पा. २३)

- हे अश्वी हो,तुम्ही आपल्या रथाचं एक तेजस्वी चक्र सूर्याच्या ठिकाणी त्याच्या शोभेकरिता नियमित करिते झाला (आणि) दुसऱ्या चक्राने... तुम्ही... लोकांभोवती फिरता.

यात एक 'तेजस्वी चक्र सूर्याच्या ठायी ठेविते झाला' हे शुक्राला फार उत्तम रीतीनं लागू पडतं,तर 'दुसऱ्या चक्रानं भुवनाभोवती फिरता' हे गुरूला चांगलं लागू पडतं (भारतीय ज्योतिषशास्त्र पा. ६५).

ऋतुमानाप्रमाणं शुक्राचा रंग बदलत असल्याचा उल्लेख वराहमिहिरानं बृहत्संहितेत केला आहे. तसेच,तो त्यांची लक्षण फळंही सांगतो :

शिखिभयमनलाभे शस्त्रकोपश्च रक्ते कनकनिकषगौरे व्याधयो दैत्यपूज्ये । 
हरितकपिलरूपे श्वासकासप्रकोपः पतति न सलिलं खाद्भस्मरूक्षासिताभे ॥ - (९-४४)

- म्हणजे जर शुक्राचा वर्ण अग्नीसमान असेल,तर अग्नीपासून;रक्तासमान असेल,तर शस्त्रापासून आणि कसोटीवर घासलेल्या सुर्वणरखांसारखा असेल,तर रोगांपासून भय असतं.पोपटाप्रमाणे पिवळसर असेल, तर श्वास आणि कास रोगाची उत्पत्ती होते आणि भस्माप्रमाणं रुक्ष वा काळा असेल,तर अवर्षण पडते.

जंगलातील माझ्या घरातील खिडकीतून तर ही चांदणी पहाटे डोकावताना दिसे.मी लिहिण्याच्या तयारीत असे. लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मी एकदा तिच्याकडं ध्यानमग्न होऊन पाही.नंतर मी मनात विचार करायचा, की आता लिहिताना ती माझ्याकडं सौहार्दपूर्वक पाहात आहे.शांती आणि सौंदर्य यांनी मला ती भारून टाकी. माझं अंतःकरण ज्ञानमय होई.वाटे,की ती माझ्याकडं युगानयुगं अशीच कृपादृष्टीनं पाहात राहील.

जीवन सुंदर आहे.मृत्यूदेखील सुंदर असणार ! पहाटेच्या वेळी गुरू-शुक्र आकाशातील आपल्या नक्षत्रनेत्रांनी माझ्याकडं स्नेहानं पाहात आहेत,अशा शांत नक्षत्रवेळी एखाद्या नक्षत्रविकासी पुंडरिक पुष्पाप्रमाणं आपले नेत्र मिटावेत,अशी माझी इच्छा आहे.