माझ्या लहानपणी पावसाळा आणि सुरुवातीचे थंडीचे दिवस वगळता,सोलापुरात आमच्या कुटुंबातील सारे जण रात्री घराच्या माळवदावर झोपत असू.त्या काळात मी रोज पहाटे अभ्यासाला उठत असे.रात्री झोपताना मी आईला सांगे,
'मला पहाटे उठव.'
आई मला पहाटे हाक मारी.
'अरे ऊठ.बघ ती शुक्राची चांदणी उगवली.'
त्या वेळी पहाटेचे सुमारे चार वाजलेले असत.मी त्या चांदणीकडं एकदा डोळे भरून पाहूनच अभ्यासाला सुरुवात करी,तो पार शुक्राच्या चांदणीचा रंग धुवट होईपर्यंत.नंतर उजाडलेलं असे.
दिवाळीत,नाताळात आणि उन्हाळ्याच्या सुटीत मी माझ्या बहिणीच्या गावी नळदुर्गजवळच्या दस्तापूरला बैलगाडीनं जाई.सोलापूरहून सकाळी निघालं,की नळदुर्गला पोहोचेपर्यंत दिवस मावळे.बरोबर आणलेली शिदोरी खाऊन रात्री तिथल्या देवळासमोरच्या वडाखाली मुक्काम असे.त्या वेळी झोप येईपर्यंत मी झाडाच्या पानोळ्यांतून आभाळातील चांदण्यांकडं पाही. रामा गाडीवानाला पहाटे जाग येई.तेव्हा शुक्राची चांदणी क्षितिजावर उगवलेली असे.किती तेजस्वी दिसे ती ! वाटे,'घन तमीं शुक्र बघ राज्य करी' नदीच्या खोल पात्रात तिचं प्रतिबिंब पडलेलं असे.एकदा आभाळाकडं अन् एकदा नदीकडं पाहात मी मनात विचार करी,यात अधिक सुंदर कोण दिसतंय ?
जुंपलेल्या गाडीत बसलं,की ती चालू लागे.बैलाच्या गळ्यातील घुंगुरघंटांच्या नादात गाडी पहाटेच्या वेळी माळरानातून चाललेली असे.गाडीत मांडी घालून मी शुक्राच्या सुंदर चांदणीकडं पाहात राही.माळरानातली पहाटेची वेळ मोठी अद्भुतरम्य असते.धरती गोल आहे, हे माळरानाइतकं अन्यत्र कुठं जाणवत नाही.वर निळं आकाश.आकाशात सहस्रावधी ग्रह-तारे प्रकाशत असतात.त्या सर्वांमध्ये शुक्राची चांदणी आपलं लक्ष अधिक वेधते.बालपणापासून या शुक्राच्या चांदणीशी असं नातं जुळलं,ते वाढत्या वयाबरोबर दृढ होत गेलं. कॉलेजमध्ये असताना कित्येकदा मी माळकरीण आत्याच्या गावाबाहेरील शेतावर सुटीच्या दिवशी गेलो, तर दिवसभर माळरानात भटकून रात्री तिथल्या वस्तीवरच मुक्कामाला राही.
शेतात ज्वारीचं पीक उभं असे.वाऱ्याच्या झुळकेबरोबर क्षणोक्षणी ज्वारीच्या घाटांच्या पात्यांचा सळसळ आवाज येई.शेकोटी पेटवून तिच्यासमोर आत्या जागत बसलेली असे.मधूनच कोल्हेकुई ऐकू येई.त्यामुळं माझी झोप चाळवे.मनात अकल्पित भीती उभी करी.आत्या मला हाक मारी,
'अरे,पहाट झाली,बघ.शुक्राची चांदणी उगवली.असा बाहेर तरी ये.' मी शेकोटीपुढं बसून त्या चांदणीकडं अनिमिष नेत्रांनी पाहात राही.आत्या आपल्या गोड आवाजात अभंग म्हणत असायची.
पहाटे उठायची बालपणी जडलेली ती सवय मी आयुष्यभर जोपासली.
दोन वर्षं मी दक्षिणेतील कोइमतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये शिकत होतो.पावसाळा सोडला,तर बाकी आठ महिने आमचं वास्तव्य जंगलातील राहुटीत असे.त्या वेळी देखील मला पहाटे जाग यायची.सारे विद्यार्थी आपापल्या राहुटुत गाढ झोपलेले असत.कित्येकांचा झोपेत घोरण्याचा आवाज येई,माझ्या सोबत्याला जाग येणार नाही,याची काळजी घेत मी राहुटीच्या बाहेर येई आणि खुर्चीवर बसून जंगलातील वृक्षांच्या छतावर उगवलेल्या शुक्राच्या चांदणीकडं पाहात राही.
 जंगलाभोवतालच्या स्वच्छ वातावरणामुळं आकाशाचा रंग जांभळा दिसे.त्या जांभळ्या नभोवितानातील चांदणीच्या अलौकिक सौंदर्याकडे मी ध्यानमग्न होऊन पाहात राही.ही माझी जणू एक प्रकारची ध्यान-धारणाच होती !परंतु त्यामुळं पक्षिनिरीक्षणासाठी जी शांत चित्तवृत्ती लागते, तिचा न कळत मला लाभ झाला.
शुक्राची चांदणी पहाटेला पूर्वेकडे बरेच दिवस दिसते. कधी सायंकाळी पश्चिमेस दिसते.दर वीस महिन्यांत नऊ महिने शुक्राची चांदणी पहाटेला पूर्वेकडं दिसते. सायंकाळच्या शुक्राच्या चांदणीला आदिवासी 'जेवणतारा' म्हणतात.म्हणजे ती उगवून मावळेपर्यंत त्यांची रात्रीची जेवणं उरकलेली असतात.शुक्राची चांदणी केव्हा सूर्यास्तानंतर थोडा वेळ आणि केव्हा सूर्योदयापूर्वी पहाटे दिसते,याची मी नोंद केलेली आहे.
पहाटे उगवणाऱ्या शुक्राच्या चांदणीनं मला भुरळ पाडली,त्याचप्रमाणे संधिप्रकाशात दिसणाऱ्या या चांदणीनं आकर्षित केलं आहे.संधिप्रकाशासमयी मी एखाद्या उंच डोंगरावर जाऊन उभा राही.हळूच मिणमिणती शुक्राची चांदणी क्षितिजावर डोकावू लागे. या संधिप्रकाशात तिच्या आगळ्यावेगळ्या लावण्याचा मला प्रत्यय येई.वाढत्या अंधाराबरोबर तिचं सौंदर्य वाढत जाई.रात्री प्रकाशणाऱ्या ताऱ्यांमध्ये शुक्रासारखा तेजस्वी व सुंदर असा दुसरा तारा नाही.म्हणून पाश्चात्त्य लोकांनी याला 'सौंदर्याची खाण' व 'देवता' अशा अर्थाचं 'व्हीनस' हे नाव दिलं आहे.गुरूही तेजस्वी आहे,पण त्याचं तेज शुक्रापेक्षा कमी आहे. हे दोघंही जवळजवळ असले म्हणजे जे रम्य दृश्य दिसतं,ते अवर्णनीय असतं.
नंतरच्या आयुष्यात शुक्राच्या चांदणीचं सौंदर्य न्याहाळण्याचा छंदच लागला.जंगलातील मार्गानं सायंकाळी जाताना ती समोरच उगवलेली दिसायची. साऱ्या वाटभर तिची सोबत असे.कधी कधी पहाटे वनविश्रामगृहाच्या व्हरांड्यातून ती स्पष्ट दिसायची.
ताऱ्यांचा प्रकाश दिसत नाही म्हणतात.परंतु घनदाट जंगलातील वृक्षांच्या छतावर ताऱ्यांचा सौम्य व शीतल प्रकाश पडलेला असतो.कित्येकदा पहाटेच्या वेळी मी वनमार्गानं पायी हिंडे.बांबूच्या बेटातील मोरपिशी फांद्यांआडून शुक्राची चांदणी दिसे.तिच्या सौम्य आल्हाददायक प्रकाशात मोरपंखी सावल्या जमिनीवर पडलेल्या असत.फक्त हे सारं कोमल मनानं अनुभवायची इच्छा हवी.
शुक्राच्या चांदणीच्या मी किती आठवणी सांगू? त्यातलं किती विसरावं,किती सांगावं । नवेगावबांध सरोवर आणि इटियाडोह जलाशयांच्या काठी या चांदणीच्या दर्शनासाठी मी पहाटेच्या वेळी हिंडत असे.अतिसौम्य प्रकाश पाण्यावर पडलेला आणि त्यात दिसणारं तिचं सुंदर प्रतिबिंब.जणू एखादी जलवंतीच वाटायची. जलाशयात पडलेली तिची पडछायाच आकाशातील चांदणीपेक्षा देखणी दिसे.
चैत्रात पिंपळ वृक्षाला सोन्याची पानं लागत.कधी रात्री, तर कधी पहाटेच्या समयी जंगलातील विशाल पिंपळ वृक्षाच्या गोपुरातून शुक्राची चांदणी डोकावे. पिंपळाचं आणि या चांदणीचं काही तरी सख्य असावं. वाटे,पऱ्या या चांदणीवरून अलगद या सोन्याच्या पिंपळावर उतरत असाव्यात.
असाच अद्भुत गूढतेचा अनुभव मला दरेकस्सा
नजीकच्या जंगलातील दलदलीवर येई.मी पहाडावरच्या उंच प्रशस्त शिळांवर बसून समोरच्या चांदणीकडं पाही.तिचं अलौकिक सौंदर्य असलेलं प्रतिबिंब दलदलीत पडलेलं दिसे.त्या दलदलीच्या खोलीला अंत नाही.पाताळापर्यंत ती भेदीत गेलेली. चांदणीपासून दिसते न दिसते,अशी प्रकाशाची वाट पार दलदलीपर्यंत रेखीत गेलेली.त्या वाटेवरून यक्षिणी आणि किन्नरी ये-जा करीत असल्याचा भास होई. माझ्या सोबतीला असलेला दल्लू गोंड भीतियुक्त आवाजात म्हणायचा,(पाखरमाया,मारुती चितमपल्ली,
साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी,नागपूर )
"साब,आता चलू या परत.ही जागा झपाटलेली आहे. सदान्कदा इथं काहीबाही दिसल्याचे भास होतात.एक दिवस तुम्ही आपला जीव गमावून बसाल,अन् बलामत माझ्यावर येईल.पुढच्या वेळेला मी तुमच्याबरोबर येणार नाही."परंतु कुठल्या तरी अज्ञात ओढीनं आम्ही परत परत तिथं जात असू.दल्लू प्रत्येक वेळी मला हाच सल्ला देई.
मेळघाटाच्या सरहद्दीवर वाहणाऱ्या तापी नदीच्या काळ्याशार डोहात शुक्राच्या चांदणीचं प्रतिबिंब मी अनेक वेळा पाहिलं.त्या वेळची गूढता हुदाळ्याच्या शिशुलीनं द्विगुणीत होई.कृष्णामाई आणि गोदावरी यांच्या घाटांवर बसून या चांदणीकडं पाहण्यात एक अलौकिक आनंद मी अनुभवला.सागरकिनाऱ्यावरील पुळणीवर बसून तिच्याकडं पाहण्यात एक आगळा-
वेगळा सौंदर्यानुभव येतो.तसाच प्रत्यय नारळी-
पोफळींच्या झावळ्यांतून ती डोकावत असताना येतो.मला नेहमी वाटे,माझ्या सुप्त मनातील सौंदर्यभावना या शुक्राच्या चांदणीनं तर जागी केली नाही ना? तिच्याकडं दुर्बीण लावली तर ती कधी कधी चंद्रकोरीसारखी वाटे.कधी अर्धचंद्राकार,तर कधी पूर्ण चंद्राकार दिसे.हा चमत्कार पाहून ती प्रतिचंद्र आहे काय असा भास होई.चंद्र म्हणावा,तर लहान दिसते. चंद्रासारखे डाग तिच्यावर दुष्टीस पडत नाहीत,
आकाशाच्या सौंदर्यावर प्रेम करणाऱ्या बालकवींच्या नजरेतून शुक्राची चांदणी सुटली,तरच नवल. 'शुक्रोदय' या कवितेत ते म्हणतात-
दिव्याच्या मागुनि चाले - विश्व,खरें कळुनी आलें; 
केंद्र त्या सौंदर्याचा - शुक्र नभीं उगवे साचा 
मुकुट कळ्यांचा दिव्य शिरीं - पीतांबर परिधान करी, तेज विखुरलें चोहिंकडे - पुष्पांवर गगनीं उघडें...
आकाशाकडं पाहिलं असता ज्याकडं लक्ष जायचं,असं शुक्रासारखं तेज आश्चर्यानंदकारक झालं नसेल आणि इतर ताऱ्यांपेक्षा या तेजाची गती काही निराळी आहे (म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या भाषेत हा ग्रह आहे.)
असं प्राचीन ऋषींच्या लक्षात आलं नसेल,हे संभवनीय दिसत नाही. प्राचीनतम वेदसूक्तं ज्या काळी झाली, त्या काळीच ही गोष्ट त्यांच्या लक्षात येऊन गुरू व शुक्र यांच्या ठायी त्यांनी देवत्व कल्पिलं,अश्विनौ म्हणून जे देवताद्वय वेदांत प्रसिद्ध आहेत, त्यांची मूळ कल्पना गुरू-शुक्रावरूनच उद्भवली.दर वीस महिन्यांत नऊ महिने पहाटे पूर्वेस शुक्र दिसतो.त्यात बहुधा प्रत्येक खेपेस सुमारे दोन-तीन महिने गुरू त्याच्या जवळ असतो.त्यात काही दिवस तर फारच जवळ असतो.पुढं शुक्राची गती जास्त असल्यामुळं गुरू त्याच्या मागं म्हणजे पश्चिमेस राहून उत्तरोत्तर शुक्राच्या अगोदर उगवू लागतो व काही दिवसांनी शुक्र पहाटेस उगवत आहे,तोपर्यंत गुरू पश्चिमेस अस्त पावण्याची वेळ आलेली असते.म्हणजे त्यानं सगळ्या आकाशाचं भ्रमण केलेलं दिसतं.गुरू आणि शुक्र एकत्र आहेत.अशा वेळी त्याविषयी अश्विनत्वाची कल्पना झाली असावी आणि पुढं त्यापैकी एक (शुक्र) नेहमी सूर्याजवळ असतो आणि दुसरा (गुरू) सर्व आकाशात फिरतो,हे पाहून पुढील कल्पना आली असावी-
ईर्मान्यद्वपुषे वपुश्चक्रं रथस्य ये मथुः ॥ 
पर्यन्या नाहुषा युगा महारजांसि दीयथः ॥
(ऋ.सं. ५.७३.३. पा. २३)
- हे अश्वी हो,तुम्ही आपल्या रथाचं एक तेजस्वी चक्र सूर्याच्या ठिकाणी त्याच्या शोभेकरिता नियमित करिते झाला (आणि) दुसऱ्या चक्राने... तुम्ही... लोकांभोवती फिरता.
यात एक 'तेजस्वी चक्र सूर्याच्या ठायी ठेविते झाला' हे शुक्राला फार उत्तम रीतीनं लागू पडतं,तर 'दुसऱ्या चक्रानं भुवनाभोवती फिरता' हे गुरूला चांगलं लागू पडतं (भारतीय ज्योतिषशास्त्र पा. ६५).
ऋतुमानाप्रमाणं शुक्राचा रंग बदलत असल्याचा उल्लेख वराहमिहिरानं बृहत्संहितेत केला आहे. तसेच,तो त्यांची लक्षण फळंही सांगतो :
शिखिभयमनलाभे शस्त्रकोपश्च रक्ते कनकनिकषगौरे व्याधयो दैत्यपूज्ये । 
हरितकपिलरूपे श्वासकासप्रकोपः पतति न सलिलं खाद्भस्मरूक्षासिताभे ॥ - (९-४४)
- म्हणजे जर शुक्राचा वर्ण अग्नीसमान असेल,तर अग्नीपासून;रक्तासमान असेल,तर शस्त्रापासून आणि कसोटीवर घासलेल्या सुर्वणरखांसारखा असेल,तर रोगांपासून भय असतं.पोपटाप्रमाणे पिवळसर असेल, तर श्वास आणि कास रोगाची उत्पत्ती होते आणि भस्माप्रमाणं रुक्ष वा काळा असेल,तर अवर्षण पडते.
जंगलातील माझ्या घरातील खिडकीतून तर ही चांदणी पहाटे डोकावताना दिसे.मी लिहिण्याच्या तयारीत असे. लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मी एकदा तिच्याकडं ध्यानमग्न होऊन पाही.नंतर मी मनात विचार करायचा, की आता लिहिताना ती माझ्याकडं सौहार्दपूर्वक पाहात आहे.शांती आणि सौंदर्य यांनी मला ती भारून टाकी. माझं अंतःकरण ज्ञानमय होई.वाटे,की ती माझ्याकडं युगानयुगं अशीच कृपादृष्टीनं पाहात राहील.
जीवन सुंदर आहे.मृत्यूदेखील सुंदर असणार ! पहाटेच्या वेळी गुरू-शुक्र आकाशातील आपल्या नक्षत्रनेत्रांनी माझ्याकडं स्नेहानं पाहात आहेत,अशा शांत नक्षत्रवेळी एखाद्या नक्षत्रविकासी पुंडरिक पुष्पाप्रमाणं आपले नेत्र मिटावेत,अशी माझी इच्छा आहे.