* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: प्राणवायूचा शोध / The discovery of oxygen

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

६/११/२५

प्राणवायूचा शोध / The discovery of oxygen

प्रिस्टले लहानपणी बाटलीत कोळी टाकून बाटलीचं बूच घट्ट बंद करीत असे करायचा.बाटलीत कोळ्याऐवजी वनस्पती टाकली तर? प्रिस्टलेला एक नवा विचार सुचला.प्रिस्टलेनं बंद तोंडाच्या भांड्यात सुरुवातीला असणारा वायू काढून टाकून त्यात पुदिन्याची वनस्पती ठेवून भांड्याचे तोंड पूर्णपणं बंद केलं.प्रिस्टलेची अपेक्षा कोल्ळ्याप्रमाणेच वनस्पती मरून जाईल.पण दहा दिवसांनंतरही पुदिन्याची वनस्पती चक टवटवीत होती आणि त्या भांड्यात पेटती मेणबत्तीही अधिक तेजाने प्रज्वलित होत होती.प्रिस्टलेनं मेणबत्ती विझल्यावर त्या भांड्यात ५-६ दिवसांनी पुन्हा पेटती मेणबत्ती टाकल्यावर ती अधिक तेजानं प्रज्वलित होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं.१७७२ च्या उन्हाळ्यापर्यंत प्रिस्टलेला निरनिराळ्या वनस्पतीमध्ये पेटती मेणबत्ती अधिक प्रज्वलित होत असल्याचं लक्षात आलं.मग पालक ही वनस्पती दोन दिवसांत हा वायू तयार करत असल्याचं प्रिस्टलेनं या प्रयोगानं सिद्ध केलं.

प्रिस्टलेनं मग अजून एक प्रयोग केला.पेटती मेणबत्ती हवाबंद डब्यात ठेवली.पण ही मेणबत्ती मात्र लगेच विझली.हवाबंद डब्यात पेटती मेणबत्ती ठेवल्यावर ती चटकन विझते,असा प्रिस्टलेनं निष्कर्ष काढला.त्याच हवाबंद डब्यात जिवंत उंदीर ठेवला असता तोही ५ सेकंदात मेल्याचं त्यानं पाहिलं. त्यानं पुन्हा एक जिवंत उंदीर हवाबंद डब्यात ठेवला आणि त्याच्या बरोबर एक छोटं रोपही प्रिस्टलेनं त्याच हवाबंद डब्यात ठेवलं.पण या वेळी उंदीर मेला नाही. उंदराला जिवंत ठेवणारा कुठलासा पदार्थ वनस्पतींमध्ये असला पाहिजे असा तर्क प्रिस्टलेनं केला.हे लगेच प्रिस्टलेनं आपला मित्र बेंजामिन फ्रैंकलिनला कळवलं आणि आपल्या या शोधामुळे लोक झाडं तोडायची थांबतील असंही बेंजामिन फ्रैंकलिनला प्रिस्टलेनं लिहिलं.यावरून सर्वच वनस्पती हा वायू तयार करत असल्याचा पुरावा त्याला मिळाला. त्यामुळे सर्व प्राणी श्वास घेऊनसुद्धा त्यांना जिवंत ठेवणारा हवेतला घटक का संपत नव्हता या प्रश्नाचं उत्तर प्रिस्टलेला सापडलं.


या महत्त्वाच्या शोधाबद्दल रॉयल सोसायटीनं प्रिस्टलेला 'कॉपले' पदक देऊन सन्मानित केलं.हे पदक म्हणजे त्या काळातले नोबेल पारितोषिकच होतं.प्रिस्टलेनं आपल्या या प्रयोगाची हकिकत पॅरिसला जाऊन लव्हायेजेला कळवली.लव्हायेजेला या प्रयोगाचं महत्त्व ताबडतोब पटलं.पण प्रिस्टले मात्र दिशाभूल अवस्थेत होता.तो लव्हायेजेला पुनःपुन्हा फ्लॉजिस्टॉनविरहित हवा असंच सांगत राहिला.त्याला आपल्या शोधाचं महत्त्वच जणू कळलं नाही.१७८०मध्ये लॉर्ड शेलबर्नशी न पटल्यामुळे प्रिस्टले आपल्या कुटुंबाबरोबर बर्मिंगहॅममध्ये स्थायिक झाला.काही विज्ञानप्रेमी मंडळींनी ७८० साली बर्मिंगहॅममध्ये एक चर्चामंडळ चालू केलं.या मंडळाचं नाव 'ल्युनार सायटी' असं होतं. मंडळाच्या खास विनंतीवरून प्रिस्टले ल्युनार सोसायटीचा सभासद झाला. दर महिन्याच्या सोमवारी बर्मिंगहॅममध्ये रात्रीच्या जेवणाच्या निमित्तानं मंडळाचे सभासद एकत्र जमत जमायचे.या सभासदांमध्ये जेम्स वॉट,इरॅस्मस डार्विन अशी त्या काळची नामांकित संशोधक मंडळी होती.मंडळाचं काम सहा तास चालायचं त्यात जेवणाखेरीज नानाविध विषयांवर चर्चा चालायची.सभासद मंडळी आपले नवे विचार,कल्पना दिलखुलासपणे मांडायचे.या सभासदांमध्ये जे श्रीमंत सभासद होते ते प्रिस्टलेला त्याच्या प्रयोगासाठी आर्थिक मदत करायचे.प्रिस्टले प्रयोगापुरता लागणाराच पैसा सभासदांकडून घ्यायचे.त्याचे सर्व शोध मुक्त असायचे. प्रिस्टलेनं आपल्या शोधापासून आर्थिक फायदा घेण्याचा विचारसुद्धा केला नाही.याच काळात त्यानं प्रसिद्ध केलेले शोधनिबंध हे सर्व फ्लॉजिस्टॉन सिद्धान्ताच्या बाजूने होते.


पण लवकरच प्रिस्टलेच्या शांत आयुष्यात अचानक वादळी घडामोडीला सुरुवात झाली.प्रिस्टले फ्रेंच राज्यक्रांतीपासून दूर असूनही त्यात ओढला गेला. प्रिस्टलेनं आपल्या लेखनाद्वारे फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव या तीनही तत्त्वांचा हिरिरीनं प्रचार केला.धर्मसत्ता आणि राजा आणि त्याचा कारभार यांचे एकमेकांपासून फारकत करण्याची कल्पना प्रिस्टलेनं उचलून धरली.पण त्यामुळे इंग्लंडमधल्या पुढाऱ्यांशी त्याचे खटके उडायला लागले. इंग्लिश पार्लमेंटचा एक सभासद एडमंड बर्कनं प्रिस्टलेवर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तो देत असलेल्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या पाठिंब्याबद्दल धिक्कार केला.फ्रेंच राज्यक्रांतीची चळवळ जसजशी आगेकूच करायला लागली तसं तिनं हिंसक वळण घेतलं.त्यामुळे अधिकाधिक ब्रिटिश नागरिक फ्रेंच चळवळीला दिलेला आपला पाठिंबा काढून घ्यायला लागले.अखेर फ्रेंच राज्यक्रांतीच्या दुसऱ्या स्मृतिदिनी १४ जुलै १७९१ इंग्लंडमधल्या जनतेनं चिडून मोठ्या जमावानं प्रिस्टलेच्या राहत्या घरावर हल्ला केला. 


या हल्ल्यात जमावानं प्रिस्टलेच्या घराची पूर्ण नासधूस केली.

घरातल्या खुर्चा,टेबल,कपाट,इतर लाकडी सामान यांची मोडतोड केली.घराचं तळघर पूर्ण रिकामं केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिस्टलेच्या ग्रंथालयातली पुस्तकं फाडून चोळामोळा करून टाकली.प्रिस्टलेच्या प्रयोगशाळेतल्या उपकरणांचा नाश केला आणि त्याचं संपूर्ण घरच पेटवून दिलं.प्रिस्टलेच्या संशोधनाच्या नोंदी असणारी टिपणवही जमावानं फाडून टाकली.या अपरिमित नुकसानीची जाणीव प्रिस्टलेला अखेरपर्यंत होत राहिली.सुदैवानं यातून प्रिस्टले आणि त्याचं कुटुंब मात्र वाचलं.हा गोंधळ चालू असतानाच प्रिस्टले आणि त्याचं कुटुंब गाव सोडून गेल्यामुळे ते जिवंत राहू शकले. बर्मिंगहॅम सोडून ते सर्व जण प्रथम इंग्लंडला आले. इंग्लंडमधले लोक प्रिस्टलेला देशद्रोही आणि ख्रिस्ती धर्माचा विरोधक समजायला लागले.त्याच्याविरुद्ध व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आली.त्याचा पुतळा जाळण्यात आला.रॉयल सोसायटीतले लोकसुद्धा प्रिस्टलेला टाळायला लागले.


त्याच्याकडून रॉयल सोसायटीचा राजीनामा घेण्यात आला.त्याच्या मुलांना नोकऱ्या मिळेनाशा झाल्या.अखेर १७९४ मध्ये प्रिस्टलेनं 'सॅम्पसन' नावाच्या जहाजातून मायभूमी सोडून अमेरिकेला कूच केलं.तो जेव्हा न्यूयॉर्कमध्ये पोचला तेव्हा तिथल्या राजकारणी,शास्त्रज्ञ आणि धर्मोपदेशकांनी त्याचे भव्य स्वागत केलं.प्रिस्टलेची तीनही मुलं अगोदरच पेनसिल्व्हेनिया संस्थानातल्या नॉर्दबरलँडमध्ये स्थायिक झाली होती. प्रिस्टलेला नॉर्दबरलँडचा चर्चचा प्रमुख आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात रसायनशास्त्राचा प्राध्यापक अशी दहेरी नेमणूक देण्यात आली.

प्रिस्टलेचा स्नेही बेंजामिन फ्रैंकलिन यानं फिलाडेल्फिया शहराची कवाडं त्याच्यासाठी कायमची उघडी करून दिली.प्रिस्टलेची अमेरिकन स्वातंत्र्यवीर थॉमस जेफरसन यांच्याशीही चांगली ओळख झाली.एकदा अमेरिकेचा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यानंही प्रिस्टलेला चहापानासाठी आमंत्रण दिलं होतं.प्रिस्टलेनं आपल्या अंतापर्यंत (१८०४) नॉर्दबरलँडमध्येच कायमचं वास्तव्य केलं.तिथं त्यानं आपली प्रयोगशाळाही उभारली.तो निरनिराळ्या ठिकाणी व्याख्यानासाठी जायला लागला.सध्या प्रिस्टलेचं राहतं घर हे संग्रहालय म्हणून जतन करून ठेवण्यात आलं आहे.१९५२ सालापासून पेनसिल्व्हेनियामधल्या डिक्सन कॉलेजनं मानवजातीला उपकारक ठरणाऱ्या शोधांना वार्षिक प्रिस्टले पदक देणं सुरू केलं.


या ऑक्सिजन शोधनाट्यात आणखी एका व्यक्तीचं योगदान दुर्लक्षून चालणार नाही तो म्हणजे कार्ल विल्हेम शील !! निसर्गात आढळणारी जास्तीत जास्त मूलद्रव्यं शोधण्याचा मान त्याच्याकडे जातो. त्यानं एकूण सहा मूलद्रव्यं- फ्लोरीन (१७७१), क्लोरीन (१७७४), मँगेनीज (१७७४), बेरियम (१७७४), मॉलिब्डेनम (१७७८) आणि टंगस्टन (१७८१) यांचा शोध लावला. शिवाय, स्वतंत्रपणे संशोधन करून ऑक्सिजनचाही शोध लावला. 


त्यानं अनेक रासायनिक संयुगांचा शोध लावला. त्याची यादी बरीच मोठी आहे.त्यात हायड्रोजन फ्लोराइड, सिलिकॉन फ्लोराइड,

टार्टरिक आम्ल,सायट्रिक आम्ल,युरिकआम्ल,लॅक्टिक आम्ल,

ग्लिसेरॉल,अशा अनेक संयुगांचा समवेश होतो. एकाच माणसानं हे सर्व शोधून काढलं हे पाहून थक्क व्हायला होतं. 'हवा आणि अग्नी यावरचा रासायनिक प्रबंध' हा आपला ग्रंथ शीलनं १७७५ मध्येच लिहिला. पण प्रसिद्ध झाला तब्बल दोन वर्षांनी ! पण यापैकी अनेक शोध लागल्यानंतर त्यानं ते प्रसिद्धच केले नाहीत आणि मग इतरांनीच त्याच्यानंतर शोध लावून ते प्रसिद्ध केले आणि त्या त्या शोधांवर आपल्या नावाचं शिक्कामोर्तब केलं. आणि शील मात्र तसाच राहिला.

यामुळे प्रसिद्ध वैज्ञानिक आणि विज्ञान लेखक आयझेंक असिमॉव्ह त्याला 'हार्डलक शील' असंच म्हणत असे !


शील हा एका व्यापाऱ्याचा मुलगा होता. ९ डिसेंबर १७४२ साली स्वीडनमध्ये जन्मला. तब्बल अकरा भावंडांमध्ये हा सातवा ! शाळेत लक्ष लागेना म्हणून त्याला एका औषधविक्रीच्या दुकानात शिकाऊ म्हणून ठेवण्यात आलं.फावल्या वेळात तो रसायनशास्त्रावरची पुस्तकं वाचायचा आणि प्रयोगसुद्धा करून पाहायचा. त्या औषधविक्रीच्या दुकानात त्यानं शिकाऊ म्हणून १७६५ पर्यंत काम केलं.नोकर म्हणून पुढे दुसऱ्या एका औषधविक्रीच्या दुकानात १७६५ ते १७६८ पर्यंत त्यानं चांगल्या पदावर काम केलं.१७७५ साली लवकरच त्यानं आपल्या पहिल्या शोधाची हकिकत स्वीडनमधल्या उप्साला विद्यापीठातला रसायनशास्त्रज्ञ बर्गमन याला कळवली.याच उप्साला विद्यापीठात कार्लोस लिनियस वनस्पती विभागात कार्यरत होता. कार्लोस लिनियस वनस्पतीच्या वर्गीकरणाच्या कामासाठी खूपच प्रसिद्ध होता. शीलनं बर्गमनला कळवलेला शोध म्हणजे दारूच्या पिंपातल्या बुरशीपासून वेगळे केलेलं टार्टरिक आम्ल ! या शोधापासून त्याच्या संशोधनकार्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासून मरेपर्यंत सारखा तो नवनवे शोध लावून प्रसिद्ध करत होता.त्याच्या अतिकाम करण्याच्या आणि प्रत्येक रासायनिक संयुगाची चव घेऊन बघण्याच्या सवयीनं तब्येत ढासळली.

त्यामुळेच १७८६ साली अवघ्या ४४ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.विविध कार्बनी संयुगांचं विघटन करून शीलनं ऑक्सिजन उर्फ ज्वालाग्राही हवा मिळवली होती.शीलची खात्री होती ही ज्वालाग्राही हवा नेहमीच्या हवेचा घटक आहे.शीलनं आपला ज्वालाग्राही हवेचा शोध लावला,त्या वेळी प्रिस्टलेच्या प्रयोगाबद्दल त्याला काहीच कल्पना नव्हती.खेदाची गोष्ट ही की शीलचे निष्कर्ष फार उशिरा प्रसिद्ध झाले!!


पण फ्लॉजिस्टॉन संकल्पनेला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वायूंच्या गोंधळाला कायमची मूठमाती देण्याचं काम केलं ते अँटोनी लव्हायेजे यानं! 


समाप्त..।