* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१६/११/२५

शांतमनाचा स्पायनोझा / Spinoza of peace

स्वतःविषयी युरोपीय पंडितांनी चांगले लिहावे-बोलावे यासाठी चौदावा लुई लाचलुचपती देत होता.पण स्पायनोझाला तो पेन्शन द्यावयास तयार होता.अट एकच होती.या ज्यू तत्त्वज्ञान्याने आपले पुढचे पुस्तक लुईला अर्पण केले पाहिजे.पण ज्याच्याविषयी स्पायनोझाला आदर वाटत नसे त्याची खुशामत करण्याइतका क्षुद्रमती तो नव्हता.तो प्रामाणिक होता. त्याला आत्मवंचना करावयाची नसल्यामुळे त्याने लुईचे म्हणणे नम्रपणे;पण निश्चितपणे नाकबूल केले.


(अ‍ॅमस्टरडॅम येथील शांतमना स्पायनोझा,मानवजातीची कथा हेन्री थॉमस,अनुवाद-साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन)


याच सुमारास जर्मनीतील एक राजा कार्ल लुडविग याने स्पायनोझाला हीडलबर्ग येथील विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाची जागा देऊ केली,पण एका अटीवर.'स्टेटच्या प्रस्थापित धर्मावर त्याने कधी टीका करता कामा नये.

स्पायनोझाने ती जागा साभार नाकारली.उपाशी राहावे लागले तरी हरकत नाही.पण सत्यच बोलायचे असे त्याने ठरवले.त्याच्यासमोर असल्या सुवर्णसंधी नाचत असता त्याला खरोखरच अर्धपोटी राहावे लागत होते.पैसे समोर खुळखुळत होते तरी त्याने ते नाकारले.कधीकधी तो गव्हाच्या अगर दुसऱ्या कसल्या पिठाची नुसती कांजी पिऊनच दिवस काढी.चव यावी म्हणून तो तीत थोडे बेदाणे व थोड्या मनुका टाकी.अजिबात उपाशी राहण्याचा प्रसंग येऊ नये यासाठी त्याला पै न् पै जपून खर्चावी लागे.चांगले व पोटभर अन्न तर मिळत नव्हतेच; पण बौद्धिक श्रम मात्र भरपूर होत असल्यामुळे त्याला क्षय होणार असे दिसू लागले.पण ईश्वरप्रेमाने मस्त असणारा हा निग्रही तत्त्वज्ञानी राजांचे साह्य नाकारीत होता.तशीच निकटवर्ती मित्रांचीही मदत स्वीकारीत नव्हता.दुसऱ्यांची श्रद्धा व दुसऱ्याचे पैसे घेणे म्हणजे जणू अधर्म असे त्याला वाटे.पोटासाठी तो चश्म्याच्या काचा घासून देई व मिळणाऱ्या फुरसतीच्या वेळात आपले विचार अधिक स्वच्छ व सतेज करी.कसे जगावे हे दुसऱ्यांना शिकविण्यासाठी तो आपले विचार घाशी व स्वतःला जगता येण्यासाठी चश्म्यांच्या काचा घाशी.


अशा अभंग व अविचल चारित्र्याचे लोक इतिहासात फार विरळा ! त्याचा आत्मा अत्यंत बलवान होता.तो अगदी एकाकी असा राहत होता.त्याच्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्याच्या धर्मबांधवांनी त्याला बहिष्कृत केले होते.त्याने कोणताही पंथ (वा चर्च) न पत्करता स्वतःचा सर्व चर्चेस् व सायनागॉग ज्याच्या पोटात येऊ शकतील असा स्वतंत्र विश्वव्यापक धर्म निर्माण केला. त्याला सर्व विश्वात विश्वंभर भासत होता.तो बंडखोर होता.पण त्याचे बंड विशिष्ट प्रकारचे होते.त्याच्या बहिणीने त्याचा वारसा लुबाडला होता.त्याने तिला कोर्टात खेचले व खटला जिंकला.पण पुन्हा सारी इस्टेट त्याने तिलाच परत दिली.


कन्फ्यूशियसप्रमाणे त्यालाही अपकारांवर वा अपायांवर रागावण्यास मुळीच वेळ नव्हता.अपकार वा अपाय करणाऱ्यांवर रागावण्याइतका क्षुद्र तो नव्हता.तो स्वतःचा इतका अधःपात होऊ देत नसे.दुसऱ्यांवर रागावण्याइतका खाली तो कधीही येत नसे.अ‍ॅमस्टरडॅम येथील ज्यू धर्मोपदेशकांनी त्याच्यावर बहिष्कार घातला व 'याच्याशी संबंध ठेवू नका.याला एखाद्या कुत्र्याप्रमाणे वागवा.'असे त्यांनी सर्व ज्यूंना आज्ञापिले,तरी त्यांच्यावर न रागावता स्पायनोझा त्यांना सोडून व आपली जात सोडून निघून गेला.'ज्यू राबींना जे मोलवान वाटत आहे. त्याचे ते रक्षण करीत आहेत.मला ते बहिष्कृत न करतील तर स्वतःच्या धर्माशी प्रतारणा केल्याचे पाप त्यांना लागेल.पण ज्यू धर्मोपदेशकांचे वर्तन त्यांच्या धर्मकल्पनेनुसार योग्य असले,तरी माझे वर्तनही माझ्या विचारसरणीनुसार योग्यच आहे व मी वागलो तसा न वागतो तर माझ्या हातून माझ्या आत्म्याची फसवणूक झाली असती.'अशी त्याची विचारसरणी असल्यामुळे ज्यूंनी त्याची ताबडतोब केलेली हकालपट्टी त्याच्या मते तर्कदृष्ट्या योग्यच होती.तो आता एकटाच राहिला. धर्महीन लोकांत फेकला गेला.त्याचा ज्यूंच्या धर्मावरचा विश्वास साफ उडाला होता.


ज्यूंनी बहिष्कृत केल्यावर त्याने आपले मूळचे 'वरुच' नाव बदलून 'बेनेडिक्ट' केले.स्पायनोझाचे तत्त्वज्ञान कब्बालाच्या गूढवादावर उभारलेले आहे व त्याचे नीतिशास्त्र जगातील प्रॉफेट्सच्या लिखाणांपासून मिळालेल्या स्फूर्तीतून जन्माला आले आहे.


धर्माभ्यासात तो ग्रॅज्युएट झाला.पण पास होताना जास्तीतजास्त अपमान त्याच्या वाट्यास आला. धर्माभ्यासानंतर त्याने लॅटिनच्या व इतर धर्मोपदेशकांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आरंभिला.व्हॅन डेन नामक डच पंडित त्याला लॅटिन शिकवीत असे. एन्डे भाषाकोविद व व्युत्पत्ति

शास्त्रज्ञ होता.धर्माच्या बाबतीत तो नास्तिक होता.पुढे काही वर्षांनी चौदाव्या लुईची त्याच्यावर अवकृपा झाली व त्याला सार्वजनिकरीत्या फाशी जाण्याचा मान लाभला.


व्हॅन डेन एन्डेची मुलगी स्पायनोझाला शिकण्यात मदत करीत असे.स्पायनोझा तिच्या मार्गदर्शनाचे लॅटिनच नव्हे तर प्रेमही शिकला.आपण ज्यू आहोत हे विसरून त्याने तिला लग्न करण्याची विनंती केली.तेव्हा तिने त्याचे ज्यूपण त्याच्या ध्यानी आणून दिले व स्वतःच्या कर्करिंग नामक दुसऱ्या एका विद्यार्थ्याशी लग्न केले.तो तिच्याच धर्माचा असून हँबूर्ग येथे त्याचा फायदेशीर धंदा होता.


प्रेमाचा हा असा अनुभव आला.त्यामुळे तो शहाणा झाला व आपल्या विफल प्रेमापासून अमूर्तच्या प्रेमाकडे वळला.त्याने प्लेटो,स्टोइक व एपिक्युरियन पंथांचे तत्त्वज्ञानी,त्याचप्रमाणे त्याच्या वेळेपर्यंत झालेले सर्व तत्त्वज्ञानी वाचून काढले.


गिऑर्डानो ब्रूनो हा विश्वी विश्वंभर मानणारा होता.त्याच्या तत्त्वज्ञानाचा स्पायनोझावर बराच परिणाम झाला.ब्रूनोला नवीन विचार करणारा म्हणून जाळण्यात आले.तसेच डेकार्टासच्या गणितातील अमूर्त तत्त्वांनीही तो आकृष्ट केला गेला.सनातनी विचार प्रकट करण्याबद्दल डेकार्टसला राजा महाराजांकडून मानसन्मान मिळाले होते.स्पायनोझाचे

मन अतिशय विशाल होते.तो जे जे वाची ते सर्व स्वतः पचवून टाकी.शेवटी,त्याचे तत्त्वज्ञान एक प्रकारचा ज्यू गूढवादच झाले.त्याला प्लेटोच्या विचारांचाही रंग होता.एपिक्युरसच्या संशयवादाचीही थोडीशी छटा होती.व इटालियन हुतात्मा ब्रूनो यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानानेही त्याला थोडा आकार दिला होता. फ्रेंच तत्त्वज्ञानी डेकार्टस याच्या गणिती परिभाषेतून स्पायनोझाचे तत्त्वज्ञान जगासमोर मांडले गेले. स्पायनोझाने आपली सारी पुस्तके सिसरोनियन लॅटिनमध्ये लिहिली.

त्याच्या बुद्धीइतकी विशाल व व्यापक बुद्धी इतिहासात फारच कचित दिसते.पण स्पायनोझाचे नीतिशास्त्र वर लिहिण्याप्रमाणे इसापचे नीतिशास्त्र होते.


वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आपले जन्मगाव अ‍ॅमस्टरडॅम सोडून तो लंडन शहराजवळच्या हिन्स्बर्ग उपनगरात येऊन राहिला.येथे प्राचीन इझायल ऋषीप्रमाणे तो शरीरश्रमाने पोटाला मिळवी व उरलेला वेळ जीवनाचे,तसेच ईश्वराचे कोडे उलगडण्यात घालवी जीवनाचा अर्थ काय,याचा विचार करीत तो बसे. आपसात लढणाऱ्या कोळ्यांची भांडणे पाहून त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागत,गाल ओले होते.होता होईतो तो कधी प्रक्षुब्ध होत नसे. ₹पण मालकिणीने त्याच्या खोलीतील कोळिष्टके झाडून टाकली,तर मात्र त्याला जरासा राग येई.कोळ्यांच्या जाळ्यांकडे पाहत असता तो मनात आपल्या तत्त्वज्ञानाचे चिंतन करीत बसे.त्याचे पहिले पुस्तक धर्मावर होते.त्याचे नाव (A Treatise on Religion and Politics.) त्यात त्याने बायबलवर टीका केली होती.जुन्या करारातील ईश्वराला रजा देऊन त्याने स्वतःच्या नव्या करारात अधिक दयाळू प्रभू निर्माण केला.स्पायनोझाचे हे नवे पुस्तक,हा त्याचा नवा करार म्हणजेच त्याचे सुप्रसिद्ध नीतिशास्त्र होय. भूमितीच्या पद्धतीने स्पायनोझाने लिहिलेले हे बायबल आहे.अध्यात्म गणितात बसविण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे.हा अदृश्य जगाचा फोटो आहे.हे शाश्वततेच्या सांगाड्यात बसवलेले जीवनाचे चित्र आहे.


कोणीतरी म्हटले आहे की,अध्यात्मशास्त्राचा अभ्यास म्हणजे अंधाऱ्या खोलीत तिथे नसलेले मांजर शोधीत बसण्यासारखे आहे.पण दुसरे काही म्हणतात की,ज्ञात जगाच्या अभ्यासाइतकाच अज्ञात जगाचा अभ्यासही महत्त्वाचा आहे आणि आजचे अध्यात्मच उद्याचे सृष्टिशास्त्र होईल.

शास्त्रज्ञ पाऊल टाकण्यास भितात,तिथे आपण वारंवार घुसू पाहत असतो हे तत्त्वज्ञानी कबूल करतात.पण त्यांचे म्हणणे असे असते की, तत्त्वज्ञान्यांनी ज्या अंधारात उड्या मारल्या.त्याचेच फळ म्हणजे विज्ञानातील मोठमोठे शोध.अंधारातील त्या उड्यांतूनच विज्ञान जन्मले आहे.


तत्त्वज्ञानाची प्रत्यक्ष उपयुक्तता किती आहे या वादात न शिरता स्पायनोझाच्या अध्यात्मसिंधूत आपण बुडी घेऊ या.पण आपण फार पुढे मात्र जावयाचे नाही.बुडणार नाही इतपतच खोल पाण्यात आपण जायचे.प्रत्यक्ष सृषष्टीच्या किनाऱ्यापासून फार दूर जायचे नाही. किनारा डोळ्यांसमोर ठेवायचा असे ठरवून या समुद्रात शिरू या.बुडी घेऊ या.आपणा सर्वांना नेहमी सोडवावेसे वाटणारे दोन प्रश्न स्पायनोझासमोरही होते.कोणते बरे प्रश्न ?


१. या जगात आपणास कोणी जन्माला घातले ?


२. येथे आपण काय करायचे?


या प्रश्नांची उत्तरे मिळावी म्हणून तो ईश्वराचे स्वरूप तपासू लागला.ईश्वराचे स्वरूप,विश्वाची रचना,मानवाचे मन या तिहींचे पर्यालोचन त्याने सुरु केले.तो अशा निर्णयाला आला की,ईश्वरात सारे आहे व ईश्वर सारे व्यापून आहे.ईश्वर म्हणजे सृष्टी निर्माण करणारे परम ज्ञान,त्या ज्ञानाने उत्पन्न होणारे हे जगही तोच आहे. परमेश्वर म्हणजे सनातन स्त्रष्टा,चिरंजीव व अमर कलावान.

काळाच्या खटक खटक करणाऱ्या भव्य मागावर सृष्टी,चंद्र,सूर्य ताऱ्यांचे व नाना ज्योतिर्गोलांचे तेजस्वी वस्त्र तो विणीत असतो व स्वतःच ते पांघरतो.हे दृश्य विश्व म्हणजे प्रभूचे शरीर आहे आणि विश्वाला चालना देणारी प्रेरणा,अंतःशक्ती व अंतःस्फूर्ती म्हणजे त्या प्रभूचे मन.पण शास्त्रज्ञ 'वस्तू व वस्तूंतील शक्ती एकरूप आहेत.' असे म्हणतो.त्याप्रमाणेच प्रभूचे हे शरीर व त्याचे मन एकरूप आहेत.दुसऱ्या शब्दांत हेच सांगावयाचे झाले,तर ईश्वर म्हणजेच हे अनंत विश्व व अनंत ज्ञान.ईश्वर म्हणजेच विश्व प्रत्येक पर्णात,मातीच्या प्रत्येक कणात, प्रत्येक प्राणिमात्रात मग तो कितीही क्षुद्र असो व सर्व चराचरात परमात्मतत्त्व आहे.


ईश्वराची दिव्यता चराचरातील अणुरेणूत आहे.आकाशातील अत्यंत तेजोमय गोल व पृथ्वीवरील एखादा भिकारी दोघांचीही या सृष्टीच्या महाकाव्यांत सारखीच जरुरी आहे.सृष्टीच्या महाकाव्यात ही दोन्ही अक्षरे सारखीच महत्त्वाची आहेत.


हे विश्वाचे महाकाव्य त्या अनंत ज्ञानाचे फळ आहे. मानवाच्या क्षुद्र इच्छा व त्याचे क्षुद्र कायदे यांना अनुसरून हे विश्वकाव्य रचण्यात येत नसते.ईश्वरी मनोबुद्धी व मानवी मनोबुद्धी यात बिलकुल साम्य नाही. जीवनाच्या नाटकात प्रभूने जे संविधानक योजलेले असेल ते आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचे आहे.ते केवळ मानवाची दृष्टी ठेवून निर्मिलेले नाही.मानवाने त्यावर बरे की वाईट हा निर्णय देत बसू नये.नाक चष्मा ठेवण्यासाठी आहे असे म्हणणे अगर डासांनी चावावे म्हणून हातपाय आहेत असे म्हणणे जितके वेडेपणाचे, तितकेच हे विश्व आमच्यासाठी निर्मिलेले आहे असे म्हणणे हेही वेडेपणाचे आहे. मानवांनी आपल्या मर्यादित ज्ञानाने ईश्वराच्या अनंत ज्ञानावर आक्षेप घेऊ नये.


स्पायनोझाच्या मते ईश्वर हा एखादा लहरीनुसार वागणारा सृष्टीचा हुकूमशहा नसून तो जणू दैवी चित्कळा आहे.

स्पायनोझाचा ईश्वर कोठे स्वर्गात बसलेला नाही… राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…

१४/११/२५

पैल तो गे काऊ / Pail to gay cow

्तरीचा दिवा


हिवाळ्यातील अशीच एक सायंकाळ.मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी साऱ्या पर्वताच्या रांगा देदीप्यमान दिसू लागतात.हळूहळू तो सोन्याचा गोळा पर्वताआड दिसेनासा होतो.कावळे चार, तीन, दोनच्या थव्यांनी दशदिशांतून परतू लागतात. गावच्या मध्यावर मारुतीचं देऊळ आहे.देवळापुढे पिंपळाचा मोठा पार.मोठा पार.हा पिंपळ फार जुना आहे.

काकागार ते हेच.इथं रोज सायंकाळी हजारो कावळे जमतात.सारा गाव त्या कावळ्यांच्या कॉव कॉवने दुमदुमतो.काही वेळातच हा हलकल्लोळ एका विलक्षण गतीनं अंधारात विरून जातो.कसं शांत,अद्भुत वाटतं.दुरून घरादारातील दिव्यांची उघडझाप दिसते.लामण दिवा विझू नये म्हणून हाताचा आसरा करून एखादी सुतनू लगबगीने एका दारातून दुसऱ्या दाराकडे जाताना दिसते. माझ्या बालमनावर कोरलेले हे ध्वनिचित्र कधीही पुसट होत नाही.अंतरीचा हा दिवा कधीही मालवला नाही.


हिरव्या दुलईत


बागेत हिरव्या दुलईत कावळे झोपी गेले आहेत. मध्यरात्र झाली असेल.एका वृक्षावरील कावळ्यांचा थवा अचानक जागा झाला.त्यांच्या पंखांच्या फडफडीने वातावरणात विलक्षण अस्वस्थता पसरली.त्यांच्या कॉव-कॉव या आवाजाने सारे वातावरण निनादित झाले.इतर वृक्षांवरील कावळ्यांना देखील जाग येते आणि एकच कोल्हाळ माजतो.रात्रीच्या गर्भातील हा त्यांचा आवाज दिवसा ऐकू येणाऱ्या स्वरापेक्षा कितीतरी भिन्न आहे. 


लाडीगोडी


प्रेमिकांच्या गाठीभेटीसाठी वसंत ऋतूसारखा काळ नाही.रात्री लहान असल्या तरी असा कुठं डोळा लागतो तोच पहाटेचे आगमन होते.अंथरुणावर पडल्या पडल्या उघड्या खिडक्यांच्या जाळीतून बागेत पाहता येते.पहाटेचा गार वारा वाहू लागतो. प्रेमी युगुलांची ती गोड सलज्ज कुजबूज विरहापूर्वीची ती लाडीगोडी आणि अचानक कसला तरी मोठा आवाज कानी पडतो.वाटते की, आपणास अशा अवस्थेत कुणी पाहिलं तर नसेल ! हत् तिच्या ! हा तर बागेत उडणाऱ्या कावळ्याचा आवाज.


परभृत


कावळ्यांचा आवाज एरवी मोठा कर्कश.परंतु अंड्यावर बसलेल्या कावळीचा खोल आवाज पर्वतमालांतून ज्यानं ऐकला असेल,तो त्या गूढ निळाईनं झाकलेल्या पर्वतमालांच्या गर्भागारातून येणाऱ्या आवाजानं रोमांचित होईल.त्याच वेळी कोकिळ गाऊ लागतात.मध्येच त्या कावळींच्या घरट्यावरून ससाण्यासारखी झेप घेत कुहुकुहू करीत उडू लागतात.कावळे त्यांचा पाठलाग करीत असतात.

कोकिळेला गाता येत नाही.कंठातून घळघळणाऱ्या आवाजानं त्या नरांना साद घालू लागल्या.कावळ्याचे घरटे हेरताच त्यांनी कोल्हाळ माजविला.


शांत काकागार


बाहेर रिमझिम वर्षत आहे.पर्वतमालावर हळूवार जाणाऱ्या मेघात सारी जनश्री लपली आहे. खिडकीजवळ वेताच्या खुर्चीवर बसून या दृश्याकडे पाहात बसलो आहे.खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याची गार झुळूक शरीरावर रोमांच उभे करीत आहे. कुंपणाच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांनी चोची वर करून माना आखडून धरल्या आहेत व पंख पसरले आहेत.जणू त्यांना सुळावर चढविलं आहे असं वाटतं.

काकागारदेखील आता काही काळ शांत राहील.


आनंददायी कावळे


वैशाख महिना.नदीकाठचे कळंब,जांभळी, रस्त्याच्या दुतर्फा असलेले लिंब,नांदुरकी,शेतावरची आंब्याची झाडं यांवर कावळ्यांनी घरटी बांधावयास सुरुवात केली आहे.एकेका झाडावर ३-४ खोपी दिसतात.कावळी आनंदानं कोटरात बसून नादमधुर कुर्रर्रर्र असा आवाज करीत आहे.त्यांचा अनुनय-प्रियाराधन-चौर्यरत चालला आहे. कावळ्यांचं पोषण करणाऱ्या अशा निष्कंटक वृक्षांवर त्यांनी खोपी केली की त्या वर्षी चांगला पाऊस पडायचा.जिकडे तिकडे आबादी आबाद असे.परंतु एखाद्या वर्षी सावर-पांगारा-बाभूळ अशा काटेरी झाडांवर किंवा सुकलेल्या वृक्षांवर त्यांची कोटरे दिसू लागायची.रात्री-अपरात्री ती झोपेत बरळायची.त्यांना दुःस्वप्नं तर दिसत नसतील ना? कारण असे आवाज दिवसा कधीही ऐकू यायचे नाहीत आणि पुढे अवर्षण पडायचे.


पिलावरील पाखर ( जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी,

नागपूर….)


नदीचं पात्र खोल होतं.त्या काठाला लागून अर्जुनसादड्याचं वेडं वाकडं वाढलेलं झाड वर्षानुवर्षे नदीच्या पुराला तोंड देत उभं होतं. एखाद्या वर्षी सारा वृक्षच नदीच्या पाण्याखाली बुडून जाई.त्या विक्राळ प्रवाहात त्याचा शेंडा तेवढा वर दिसावयाचा.त्या वर्षी कावळ्यानं त्यावर घरटं केलं.खूप पाऊस पडला. पूर आलेल्या नदीच्या तीरावरील झाडावरच्या घरट्यात आपल्या पिलाचं रक्षण कसे होईल या विचारानं वृती एकाग्र झाल्यामुळे स्व-नासाची पर्वा न करणारी एकाकी कावळी पुराबरोबर वाहून गेली.


गॅलिलीच्या जीझस् ने आपल्या शिष्याला उद्देशून काढलेले अंतिम निरोपाचे शब्द

" I am with you always
even unto the end of the world " 

"मी नेहमी तुझ्याबरोबर आहे
अगदी जगाच्या शेवटी "

"Jagācyā śēvaṭāparyanta mī nēhamīca āpalyābarōbara āhē."

" जगाच्या शेवटापर्यंत मी नेहमीच आपल्याबरोबर आहे."


मला भेटलेली एक सुंदर स्त्री!


एका संध्याकाळी सगळी कामं  आटोपुन मंदिराबाहेरील एका आडबाजुच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती.  घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणुन मोबाईल काढला.... बघतो तो हँग झालेला... बापरे बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे  करायचे? मोबाईल चालु करण्याचा खटाटोप चालु झाला... वैताग आला... मोबाईल काही सुरु होईना .... 


काय करावं या विचारांच्या  तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगर्या आवाजात कुणीतरी विचारलं, कोण हाय ...? मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघुन भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी.... 


आधी घाबरलो पण नंतर चिडुन विचारलं , काय बाई हि काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येवुन अशी अंगावर हात ठेवतेस ... घाबरलो ना मी...! 


तशी म्हणाली, आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती, या टायमाला मी हितंच बसुन भाकर खाती... मापी करा, मी जाती दुसरीकडं ... मी ओशाळलो, म्हटलं, नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे... 


तिला बघुन अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो डोळे कशानं गेले? म्हणाली, लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली, नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, 17 वर्साची व्हते मी तवा.... 


अरेरे ! तुमच्या आईबापाच्या  आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे , आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर हि वेळ नसती आली... बेअक्कल असतात लोकं... मी सहज बोलुन गेलो. यावर मला वाटलं माझ्याच सुरात सुर मिसळुन ती आता त्यांना शिव्या शाप देईल, पण नाही, ती म्हणाली, नाय वो कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं... खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटुन आपटुन माजा बाप गेला ...त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं... डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्या पेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया ... हसत म्हणाली...


वाईटातुन सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती हि बाई ?


तरी मी म्हणालो, मग भगताचं काय ... ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ? 


म्हणाली, आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं  त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त ... माज्या नशीबाचे भोग हुते ते ... त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई... कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई... ! डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणुनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात... आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल...?

Intention is important behind every action या वाक्याचा सार या बाईने किती सहज सांगीतला ...!!!


पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहिही न बघता कशा राहु शकला? 


म्हणाली, न बघता? काय बघायचं राहिलंय ... आवो सगळं बगुन मनात साटवलंय .... वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय,  पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय .... तुमी काय बगीतलं ह्यातलं ...? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ? 


तीच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे ! 


आज्जी तुमचं लग्न ....? चाचरत मी विचारलं... आज्जी म्हणाली, झालं हुतं की,  त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला .... पदरात एक पोरगी टाकली, त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती ... म्हणलं चला चांगलं दिवस आलं ... पन त्योबी दोन वर्षातच गेला...... बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला.... ! 


आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? आज्जी भकास हसली,म्हणाली, तीच्या विसाव्या वर्षी ती गेली तीच्या बापामागं त्याला शोधायला ... आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील .... स्वर्गात म्हणं नाचगाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा..... असं म्हणुन आज्जी हसायला लागली... 


पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना.... इतकं सगळं भोगुनही हि इतकी निर्विकार ! 


आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा ? 


कुणाचाच न्हाई, परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला... आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ... भाकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु....दोष कुनाला द्यायचा न्हाई... वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काहि कारणच नाही... 


ते कसं आज्जी मला नाही समजलं ...


ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन... आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी  बोलता येतंय ना मला ??? 


काय बोलावं मलाच कळेना, या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? वयामुळं हा पोक्तपणा आला असेल कि, भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ? 


काहिही असो एव्हढ्या सुंदर विचाराची, वाईटातुन चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!! 


डाॕ.अभिजीत सोनवणे,डाॕक्टर फाॕर बेगर्स






१२/११/२५

सामने,युद्ध,देव ! / Front,war,God !

होतं:आणि यानं त्यांचं अन्न शोधायचं क्षेत्रही कमी होत होतं. २५.१०.२५ ,या लेखातील शेवटचा दुसरा भाग..


नुसती माघार घेणं हा पराभव नव्हता.एखादे वेळी माघार घेऊन पराभव टाळणं,विजय मिळवणं,हेही जमलं असतं.आपली कुमक कमी अंतरावरून आणि लवकर येणार;शत्रूला मात्र दुरून येणारी कुमक उशिरानं मिळणार:हे चांगलंच होतं.पण अन्न मिळायचं क्षेत्र कमी होण,हे मात्र मोठं नुकसान होतं.मुळात पायवाट वारुळाची लोकसंख्या घटत असल्यानं त्यातल्या मुंग्यांना हा त्रासही फार वाटला नाही.वारुळाजवळच्या कमी क्षेत्रातच अन्न शोधूनही वारूळ जगू शकत होतं.आता सामने बंद करून शांततेचा काळ भोगणं पायवाट-वारुळाला मोहवू लागलं.पण मुंग्यांची वारुळं अशी स्थिरावलेली शांतता कायम राखू शकत नाहीत.एक वारूळ जिंकत जातं,दुसरं हरत जातं.तीन आठवडे पायवाट-वारूळ मागे सरकत होतं. शेवटी स्पर्धेचं मैदान अगदी वारुळाच्या पायथ्याशी आलं.

आता ओढा-मुंग्या शड्डू ठोकत नव्हत्या,की ताकद दाखवत नव्हत्या.त्या थेट पायवाट-वारुळावर तुटून पडत होत्या.हेही पायवाट-वारुळातल्या मुंग्यांना सुचायला हवं होतं.दर स्पर्धेत,दर सामन्यात ओढा-मुंग्या जास्तजास्त आक्रमक होत होत्या.धक्के देणं वाढलं होतं.पायवाट-मुंग्यांभोवती रिंगणं आवळली जात होती. कधीतरी ही आक्रमकता स्पर्धा-सामन्यावर न थांबता युद्धात बदलणार होती.शांततेचा उंबरठा ओलांडून ओढा-मुंग्या रणभूमीत उतरणार होत्या.एकदा पायवाट-मुंग्या मीटरभर सज्ज उभ्या असताना ओढा-अभिजन मुंगीनं उंबरठा ओलांडला.भेटलेल्या पहिल्याच पायवाट-मुंगीवर तिनं विषारी द्रव्य फवारलं.


सोबत भीती दाखवणाऱ्या फेरोमोन्सचाही मारा केला. आता तिच्या शेजारच्या ओढा-मुंग्या चेकाळल्या,आणि त्यांनीही पायवाट-मुंग्यांवर हल्ला चढवला.एका द्वंद्वयुद्धाची दोन,दोनाची चार,अशी झपाट्यानं मारामारी पसरत गेली.काही पायवाट-मुंग्या हल्ल्याला तोंड देऊ लागल्या,तर काही मागे जाऊन आणखी मुंग्यांना रणमैदानाकडे बोलावू लागल्या.आता दिखाऊ वागणूक संपली.

कोणतीच मुंगी ताठ उभी राहून उंची वाढवेना, की पोट फुगवून आकार वाढवेना.आता एकमेकींवर चढून आपल्या करवतीसारख्या जबड्यांनी शत्रूचे पाय, शत्रूची शिंगं तोडायचा प्रयत्न होऊ लागला.कवच नसलेल्या भागांना दंश करून विषाचा मारा होऊ लागला.जखमी आणि मेलेल्या शत्रूची खांडोळी उडवली जाऊ लागली.लवकरच सगळं क्षेत्र मेलेल्या आणि जायबंदी मुंग्यांनी भरून गेलं.बहुतेक मेलेल्या मुंग्या पायवाट-वारुळाच्या होत्या.त्यांच्यात राणीची सेवा करणारी,नंतर वारूळ सावरायला मदत करणारी अभिजन मुंगीही होती.तिला ओढा-मुंग्यांनी मारून तिचे तुकडे केले होते.


आता बहुतेक पायवाट-मुंग्या पळून वारुळात जाऊन बसल्या.बाहेर राहिलेल्या सगळ्या मारल्या गेल्या.त्या ओढा-मुंग्यांचं अन्न झाल्या.

एखादा नाकतोडा किंवा सुरवंट खाल्ला जावा,तशाच मेलेल्या शत्रु-मुंग्याही खाल्ल्या गेल्या.युद्धाची मोहीमच अन्न कमावण्याची मोहीमही झाली.केवळ युद्धातल्या विजयामुळे नव्हे,तर एरवीही असे स्वजातिभक्षण झालंच असतं.


पराभूत पायवाट-मुंग्यांना आपण आपल्या माय-वारुळाच्या जास्तजास्त जवळ ढकलले जातो आहोत,हे समजत होते.त्यातून पराभव किती भीषण आहे,हेही समजत होते.अखेर वारुळाच्या तोंडाजवळचे काही इंच सांभाळणंही अशक्य झालं,तेव्हा आसपासची माती,काडीकचरा गोळा करून पायवाट-मुंग्यांनी आपल्या वारुळाचं दार बंद केलं.आता पायवाट वारूळ पूर्ण वेढ्यात वारुळाच्या बाहेरचा सारा भाग तपासत, नोंदत फिरत होत्या.काही जास्त होतं,आणि तेही भूमिगत तळघरासारखं किंवा बंकरसारखं.ओढा-मुंग्या शूर,जास्त चौकस मुंग्या तर वारुळापलीकडचा भागही तपासायला गेल्या.आता वेढ्यातल्या पायवाट मुग्या अधूनमधून बाहेर पडून अन्न शोधायला धडपडायच्या.पण जवळच्या क्षेत्रात ओढा-मुंग्यांनी काही अन्न शिल्लक ठेवलंच नव्हतं.आणि पायवाट मृग्यानी दूर जायचा प्रयत्न केला, की त्यांना पकडून,मारून,खाऊन टाकायला ओढा मुग्या सज्जच होत्या.आता पायवाट मुग्यांची उपासमार व्हायला लागली. आधी त्यांनी राखीव अन्नसाठे संपवले.मग संगोपन दालनातील अळ्या आणि कोष खाल्ले गेले.स्वतःच्या धाकट्या बहिणींना मारून प्रौढ बहिणींची पोटं भरली. अखेर तर अंगातली चरबी सोडून काहीच पोषक द्रव्यं उरली नाहीत.


बाहेर ओढा-मुंग्यांनी पायवाट-मुंग्यांचं जुनं सर्व क्षेत्र तपासलं.जुन्या राजवटीचे सर्व अवशेष,जुन्या सर्व खुणा संपवल्या गेल्या.जुन्या पायवाट क्षेत्रभर शेवटच्या लढाईच्या फेरोमोन-खुणा होत्या.कुठे धोक्याची सूचना देणारी रसायनं होती,तर कुठे लढाईला चलायचा आग्रह करणारी.ही सगळी रसायनं आपोआपच नष्ट होत होती, आणि ओढा-मुंग्याही शत्रूच्या या खुणा पुसून टाकत होत्या.पायवाट वारुळात मुंग्या इकडून तिकडे,तिकडून इकडे धावत होत्या.त्यानं काहीच साधलं जात नव्हतं. पण ही सगळी धावपळ मूलप्रवृत्तीतून केली जात होती. एक शेवटचा प्रयत्न म्हणून सर्वांनी बाहेर पडायचं.काही थोड्या मुंग्या जिवंतपणी वेढा फोडून निघाल्या,


एकत्र झाल्या.तर कुठेतरी नव्या जागी वारूळ घडवता येईल, अशी शक्यता मुंग्यांना त्यांचे जीन्स सुचवत होते.पण हे जमायला वेढा फोडणाऱ्यांमध्ये,वाचणाऱ्यांमध्ये खरीखुरी राणी असणं आवश्यक होतं.सैनिक-राणी पुरी पडणार नव्हती.या कडोनिकडीच्या काळात काही वयस्क मुंग्यांना एक वेगळी ऐतिहासिक घटना आठवत होती.ती घडली तेव्हा सध्या वारुळात असणाऱ्या बहुसंख्य मुंग्यांचे जन्मही झाले नव्हते.त्या वेळी सूर्य जोमानं तळपत होता. पायवाट-राणी सातत्यानं अंडी देत होती.संगोपन-दालनं खात्यापित्या अंड्यांनी भरलेली होती.

कामकरी मुंग्या तरुण वयातच दूरदूर जाऊन अन्न गोळा करत असायच्या.आणि अशा काळात,आकाशात ढगही नसताना माथ्यावर सूर्य क्षणभर दिसेनासा झाला जसा झटक्यानं दिसेनासा झाला,तसाच झटक्यात परत दिसायला लागला.आणि हा लपंडाव बराच वेळ होत राहिला.मुंग्यांच्या अंधूक दृष्टीला लांबोळक्या,उंच वस्तू दिसत होत्या.त्यांच्या सावल्या दिसत होत्या.या वस्तू होत्या झाडांसारख्याच;पण त्या हलत होत्या!


त्यांचे आवाजही वेगळेच होते.किडे-मकोडे,खारी आणि सरडे,पक्षी, या सगळ्यांच्या आवाजांपेक्षा वेगळे आवाज ही हलती झाडं काढत होती.आवाज लहानमोठे होत होते.वेगवेगळ्या झाडांजवळून आवाज निघत होते.


आवाज जसे वेगळे होते.तसेच वासही वेगळे होते. उंचावरून येणारे हे विचित्र अशा घटनांचा अनुभव नव्हता.वादळ,पावसाची थैमानं त्यांना आठवत होती.हे मात्र फार वेगळं होतं.काही मुंग्या घाबरून वारुळात पळून गेल्या काहींनी मात्र शौर्यानं या हलत्या झाडांवर हल्ला केला.झालं होतं असं.माणसांचं एक कुटुंब पिकनिकसाठी जंगलात आलं होतं,आणि निष्काळजीपणानं त्यांनी पायवाट वारुळाजवळ जेवायचं ठरवलं होतं! उन्हं कलायला लागली.आणि मुंग्यांना हलती झाडं गेल्याचं जाणवलं.ते विचित्र आवाजही बंद झाले,आणि ते अनोळखी वासही मंदावत गेले.जरा वेळानं वारुळातल्या मुंग्या परत बाहेर पडू लागल्या.त्यांना त्या प्रचंड हलत्या झाडांना साजेसंच विचित्र दृश्य दिसलं.अनेक मुंग्या जमिनीवर चेंगरलेल्या, सपाट अवस्थेत मरून पडल्या होत्या.पण यापेक्षा विचित्र म्हणजे,सगळीकडे अन्नाचे कण पडले होते. काही साध्या मुंग्यांच्या आकाराचे होते,तर काही लाखो पटीनं मोठे होते.वेगळंच अन्न होतं,ना बियांसारखं,ना कीटकांच्या शरीरांसारखं.पण जे काही होतं,ते शुद्ध आणि सघन होतं.

त्यात प्रथिनंही होती,स्निग्ध पदार्थही होते,आणि साखरेचे प्रकारही होते.एरवी मुंग्यांना 'मावा' किड्यांची विष्ठा अन्न म्हणून फार चवदार वाटत असे. कीटकांची शरीरं अत्यंत पौष्टिक वाटत असत.हे स्वर्गीय अन्न त्या दोन्हींपेक्षा चविष्ट आणि पौष्टिक होतं. माणसांनी त्यांच्या पिकनिकचा सर्व कचरा पायवाट-वारुळा शेजारीच टाकला होता.तरुण मुंग्यांना ही घटना आठवत नव्हती.त्यांनी ती भोगली नव्हती.वयस्क मुंग्यांना मात्र गेल्या वर्षीची ती विचित्र आणि अन्न देणारी घटना आठवत होती. पूर्ण वारुळाच्या स्मरणसाठ्याचा विचार केला,तर ती घटना पुसट,

स्वप्नासारखी आणि चमत्कारिक रूपात आठवत होती.


वारूळ-महाप्राण्याच्या वयस्क भागाला ती हलती झाडं नेहमीच्या त्यांच्या विश्वाबाहेरची वाटत होती.माणसांना देवांचे व्यवहार जसे भासतात तसा हा प्रकार.माणसांना जसे देव हे काहीतरी एकाएकी मारणारे,अन्न देणारे जीव वाटतात,तसे वारुळाला हे जीव वाटत होते.कोणास ठाऊक,ते जीव काही दृष्टीनं मुंग्यांचे उपकारी दोस्त असतील.आणि या संकटाच्या काळात ते पुन्हा वारुळाच्या मदतीला धावून येतील.


सगळ्याच मुंग्यांचा या दैवी मदतीवर विश्वास नव्हता. काही मुंग्यांना वाटायचं,की वाऱ्यावादळानं जसे अन्नकण येतात,मुंग्या मरतात,

तशीच ती घटना होती. पण ती फारदा न घडल्यानं दैवी वाटत होती.आणि त्या हलत्या झाडांना मुंग्यांशी घेणंदेणं नव्हतं;ना मारक,ना तारक.आणखी काही मुंग्यांचा तर,असं काही घडलं होतं,यावरच विश्वास नव्हता.थोड्याशा मुंग्यांना तो सगळा काही म्हाताऱ्या मुंग्यांमुळे उपजलेला भ्रम वाटत होता;प्राचीन काळाबद्दलचं स्वप्नरंजन !


पायवाट-वारुळातला भाव असा दुःखानं,भीतीनं रडारड करण्याचा तरी होता;नाहीतर देव मदतीला येतील,अशा आशेचा तरी.वेढ्यात अडकलेली,मरू घातलेली प्रजा होती,ती.तिला एकत्र बांधून ठेवणारी,हेतू पुरवणारी व्यवस्था नव्हती.सुट्या मुंग्यांपासून समाज घडवणारी यंत्रणा नव्हती.अन्न गोळा करा.अंड्यांची आणि अळ्यांची काळजी घ्या,राणीभोवती राखणदारांची फळी उभारा;असे कोणतेच फेरोमोन-संदेश नव्हते. सैनिक-राणीचे फेरोमोन-संदेश वारुळाला सांधून ठेवण्याइतके सबळ नव्हते.

वारुळाला जोडणाऱ्या कड्या विरघळल्या होत्या.आणि बाहेर ओढा-शत्रू उभा होता.


शेवटी उरली भीती आणि फक्त भीती.आता मारू किंवा मरू करत बाहेर पडायचं,किंवा वारुळात कुढत मरायचं.शत्रूला फसवणं,घाबरवणं, धमकावणं,मारणं,वारूळ मजबूत करणं,नवं वारूळ उभारणं,सगळ्या शक्यता संपल्या होत्या.

१०/११/२५

कुटुंब एक देणगी / Family is a gift

काहीजण मस्त कुटुंबामध्ये जन्मतात.इतरांना असं कुटुंब तयार करावं लागतं.नाहीतर सापडावं लागतं.कुटुंबाचं सभासदत्व असेल तर ते अनमोल असतं फक्त प्रेम,एवढीच ताची मागणी असते.


दुसऱ्या दिवशी जेसन,मिस् हेस्टिंग्ज आणि मी कॉन्फरन्स रूममध्ये मासिक सभेसाठी जमलो. अशी सभा आता आनंददायी परिपाठ बनला होता.आमच्या ठरलेल्या जागी आम्ही बसलो.येत्या महिन्यात कश्याबद्दल बरं बोललं जाईल,याचा विचार करण्यात मी गढ़लो असतांनाच मिस् हेस्टिंग्जने व्हिडिओ टेप सुरू केली.


रेड स्टीव्हन्सनं प्रसन्नपणे शुभेच्छा दिल्या."हॅलो, अडचणी -एक देणगी हा धडा शिकल्याबद्दल अभिनंदन.हा धडा तुला आयुष्यभर उपयोगी पडेल. आपल्या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाचा हा सहावा महिना.या महिन्यात कुटुंब म्हणजे काय असतं ते तू समजून घ्यायचं आहेस आणि त्याची कदर राखायला सुरूवात करायची.


"जेसन,मला माहित आहे,सध्या आपलं कुटुंब अगदी विस्कळीत झालं आहे.अगदी जेवढं होता येईल तेवढं जास्तीतजास्त ते विस्कळीत झालंय. तसं व्हायला मीच पूर्णतःजबाबदार असल्याची मी कबुली देतो.पण कुटुंबाची सुस्थिती किंवा अधोगती दोन्ही आपल्याला धडा देऊ शकतात.आपल्या कुटुंबाकडून आपल्याला जे शिकायचं,ते शिकता येतं किंवा दुर्दैवाने नको ते शिकलं जातं.जगातल्या सगळ्या तरूणांमधून मी तुला निवडलंय.हे जबाबदारीचं काम तुझ्यासाठी माझ्यातर्फे मिस्टर हॅमिल्टननं करावं अशी मी योजना केली. तुझ्यासाठी का,तर तू माझा पुतण नातू म्हणून.हे कसं ते सांगण कठीण आहे पण तुला समजलं पाहिजे,असं मला वाटतं.


"कुटुंबाकडून आपल्याला आपली पाळेमुळे,आपला वारसा,आपला भूतकाळ मिळत असतो. आपल्याला भविष्याकडे,एखादा डाइव्हर जशी घेईल,तशी झेप घ्यायला लागणारा स्प्रिंगबोर्ड कुटुंबाकडूनच मिळत असतो.कुटुंबाच्या बंधा इतका सबळ बंध या जगात दुसरा नाही.हा बंध केवळ प्रेमामुळे असतो.आणि जोवर या प्रेमाला आपण अग्रक्रम देतो तोवर कुठल्याही दबावापुढे आपण नत होत नाही.


"कुटूंब सर्व प्रकारच्या आकारात आणि आकारमानात असतात.हे तू लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.काही नशीबवान लोक ते ज्या कुटुंबात जन्मले,त्याचा एक हिस्सा म्हणून जन्मभर राहतात.जेसन तुझ्यासारखे काही जण मात्र एका विशिष्ट परिस्थितीमुळे नावापुरतेच एका कुटुंबाचे असतात.

अशा लोकांना मात्र एक कुटुंब पुढाकार घेऊन तयार करावं लागतं."हे तुला विचित्र वाटेल, पण मी तुला जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ते या महिन्याअखेरपर्यंत तुला समजायला लागेल.या महिन्यात तू,मिस्टर हॅमिल्टन आणि मिस हेस्टिंग्ज आणखी एका सहलीला जाल.ज्या लोकांना कोणी नातेवाइक नाहीत अशांना तू भेटशील आणि अशाप्रकारे कुटुंब आपल्याला काय देतं याचं महत्त्व तू शिकशील.

"महिन्याच्या शेवटी तू मिस्टर हॅमिल्टनना,कुटुंब एक देणगी असते.याबद्दल तुला काय कळलंय ते सांगायचे आहे."


"या सहलीबद्दल मिस्टर हॅमिल्टन तुला सविस्तरपणे सांगेलच आणि हा उद्देश जर सफल झाला तर पुढच्या महिन्यात आपण भेटूच."


जेसन माझ्याकडे वळून म्हणाला,"मला वाटतंय, आपण कुठं जाणार,काय करणार,कुणाला भेटणार याबद्दल तुम्ही मला काहीच सांगणार नाही,बरोबर ?" मी हसून म्हटलं,"वेळच्या वेळी सगळं कळेल रे बेटा.तुला गरज असेल तेवढंच आणि गरज असेल तेव्हांच सांगायचं अशा मला सूचना आहेत."


मध्येच मिस् हेस्टिंग्ज म्हणाली,"उद्या सकाळी साडेसात वाजता तुझ्या घरून गाडीतून आम्ही तुला घेऊन जाऊ.

सगळी व्यवस्था झालेली आहे तासन् तास आपल्याला गाडीतून प्रवास करायचाय.इथं बोस्टनमध्ये जशी आहे तसल्याच हवेत तुला महिनाभर राहायचंय.त्याची तयारी ठेव."


दुसऱ्या दिवशी सकाळी मिस् हेस्टिंग्ज आणि मी एका मोठ्या आरामदायी गाडीत मागच्या सीटस्वर स्थानापन्न झालो.या कामगिरीसाठी खास एक धट्टाकट्टा माणूस निवडला होत.

जेसनच्या प्रासादतुल्य घरासमोर आम्ही थांबलो.ते त्याच्या चुलत आजोबांनी एका ट्रस्टमार्फत त्याच्यासाठी विकत घेतलं होतं.आमचा ड्रायव्हर,जेसन आणि त्याच सामान घ्यायला पुढच्या दाराशी गेला. थोड्याच वेळात तो ड्रायव्हर हातात सहजपणे दोन सुटकेसेस घेऊन येतांना मी पाहिला.

त्याच्यामागून जेसन येत होता,जेसन त्या धिप्पाड माणसासमोर बुजलेला दिसला.त्यानं जेसनसाठी मागचं दार उघडलं.तेव्हा मला आणि मिस हेस्टिंग्जला बघून त्याला जरा हायसं वाटलं,


जेसननं विचारलं,या भूतलावरचा हा कोण धिप्पाड माणूस ?


खुशीत मिस हेस्टिंग्जनं उत्तर दिलं,"तो ना! तू नेथन बद्दल बोलतोयस ना ? या सहलीसाठी मुद्दाम निवडलेला तो एक छान तरूण आहे."


जेसननं विचारलं,"याचा अर्थ काय ?"


मिस हेस्टिंग्ज नुसतंच हसली आणि तिनं कॉफीचा एक घोट घेतला.मी वळून जेसनशी हस्तांदोलन केलं,त्याला अभिवादन केलं,"सुप्रभात जेसन ! बरोबर वेळच्यावेळी सगळं तुला नीटपणे कळेल.तू आता मागे टेकून आरामात बस आणि मुक्कामाचं ठिकाण जसजसं जवळ येईल तसतसं मी तुला सगळं सविस्तर सांगेन."


बोस्टनच्या बाहेर पडल्यावर पूर्व मॅसेच्युसेट्स आणि न्यू हॅम्पशायर राज्यांमधून गाडी जातांना आम्हाला खूप मौज वाटत होती.आम्ही उत्तरेकडे वळून सागर किनाऱ्याने जाऊ लागलो,तेव्हा मी जेसनला या सहलीबद्दल उलगडून सांगायला सुरूवात केली.


"लवकरच आपण मेन राज्यात प्रवेश करूएका खाजगी जंगलातून आपण काही तास,प्रवास करू. मग आपण 'रेड स्टीव्हन्स मुलांचे वसतीगृहात' पोहोचू.पुढच्या महिनाभर त्यांचा बदलीवर आलेला पालक म्हणून तू काम करशील.

त्यामुळे तिथल्या नेहमी काम करणाऱ्या पालक माणसाला अगदी वाजवी असलेली सु‌ट्टी मिळेल.आणि सहा ते सोळा वयोगटातल्या छत्तीस मुलांशी ओळख करून घेण्याची संधी तुला मिळेल."


बुचकळ्यात पडलेल्या नजरेनं माझ्याकडे बघून जेसन म्हणाला,"मला वाटलं मला कुटुंबाबद्दल शिकायचंय.अनाथ मुलांच्या एका घोळक्यात राहून मी कुटुंबाबद्दल शिकावं असं त्या म्हाताऱ्याला वाटलं तरी कसं ?"


मी उत्तरलो,"तो म्हातारा माणूस,आत्ता सहज नेमकेपणाने तू जसा त्याचा उल्लेख केलास,त्यानं तीस वर्षांपूर्वी हे वसतीगृह सुरू केलं आणि तेव्हापासून त्यानंच त्याला पैसा पुरवला.त्याला त्याची खडान्खडा माहिती होती.आणि तुला जो धडा देण्याचं त्यानं ठरवलंय तो तुला इथं नक्कीच मिळेल.तू खुल्या मनानं रहावं,म्हणजे तू बरोबर कुटुंबाबद्दलचा धडा शिकशील,अशी मी उमेद करतो." जेसन तोंडातल्या तोंडात पुटपुटला, "अर्थहीन वाटतंय मला हे सगळं."


मी म्हटलं,"मी तुला एवढंच सांगतो की तू एका विलक्षण महिन्यात आहेस.तुझा चुलत आजोबा मरण पावल्यावर मी या संस्थेच्या बोर्डाचा चेअरमन झालो.मी आणि मिस हेस्टिंग्ज महिनाभर इथल्या ऑफिसमध्ये असू.काही देणगीदारांचे बघायचंय आणि पुढच्या वर्षीच्या अंदाजपत्रकाचाही विचार करायला हवाय."


थोड्या वेळानं आम्ही मुख्य रस्ता सोडून एका खडबडीत रस्त्याला लागलो.एक साधीशी पाटी दिसली.त्यावर लिहिलं होतं,'रेड स्टीव्हन्सचं मुलांसाठी घर'.थोड्या वेळानं आमच्या वाकबगार ड्राइव्हरनं ती प्रशस्त गाडी एका आवारात थांबवली. जेवणघर,झोपायची जागा,शिकण्याची जागा, व्यायामशाळा आणि कार्यालय अशा विविध इमारतींनी ते आवार वेढलेलं होतं.


नेथन त्या आलिशान गाडीच्या बाहेर आला आणि आम्हां तिघांना बाहेर येण्यासाठी त्यानं मागचं दार उघडलं.तो डिकीतून सामान उतरवत होता तेव्हा रहायच्या जागेचा दरवाजा सताड उघडला आणि एक मुलांचा मोठा घोळका नेथनकडे येऊन त्याच्याभोवती गलका करायला लागला.

काहींना धरून त्यानं हवेत उडवलं,कहींना थोपटलं,तर काहींना उरापोटाशी धरलं.ती मुलं सारखी त्याला हाक मारत होती आणि त्याला पाहून त्यांना फारच आनंद झाला होता.


शेवटी एकदाचा तो अतिउत्साही स्वागतसोहळा पार पडला आणि नेथन अशा सुरात बोलला की ज्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नव्हतं."मंडळी आता आपल्या रहायच्या जागेकडे जाऊ या आपण. सगळं काही ठिकठाक आहे ना ते पाहूया,कारण हा महिनाभर नवीन पालक आहेत."


मुलांनी ताबडतोब प्रतिसाद दिला आणि ती त्यांच्या झोपायच्या जागेकडे पळून गेली.सहजपणे नेथननं सगळं सामान उचललं आणि आम्हांला तो रहायच्या जागेकडे घेऊन गेला.दोन्ही भिंतीत बसवलेल्या खाटांच्या रांगा आणि दर दोन खाटांमध्ये एकेक छोटं कपाट होतं.


नेथननं पहिल्या खाटेवर जेसनचं सामान ठेवलं आणि म्हणाला,"या घरी तुमचं स्वागत असो. पुढच्या तीस दिवसांसाठी हा तुमचा राजवाडा असेल.मिस्टर हॅमिल्टन आणि मिस हेस्टिंग्ज


कार्यालयाच्या इमारतीला लागून असलेल्या सदनिकेत राहतील." जेसनकडे वळून नेथन म्हणाला,"सामान काढून तुम्ही लावून घ्यावं असं मला वाटते.नंतर मग इथल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला लागतील "


वीसेक मिनिटांमध्ये जेवणघरात भेटायचं आम्ही सर्वांनी ठरवलं,ऑफिस जवळच्या सर्व सोयी असलेल्या दोन सदनिका नेथननं आम्हांला दाखवल्या.ठरलेल्या वेळी आम्ही जेवायच्या खोलीत एका लांब टेबलाच्या टोकाशी जमून बसलो.काही डझनभर मूल रांगेनं आत आली आणि त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या जागांवर बसली. उत्साहान ती मुल बोलत होती आणि टेबलाशी बसलेल्या आम्हां नवख्या माणसांबद्दल त्यांना उत्सुकता वाटत होती.


थोड्या वेळातच,डोळ्यात भरेल अशी छाप पाडणारी उंची असणारा नेथन उठून उभा राहिला. कमीतकमी सहा फूट आठ इंचापर्यंत उंची असणार असा मी अंदाज केला.मुलं गप्प झाली आणि नेथन बोलायला लागला.


"मुलांनो तुम्हांला माहित आहेच की तुमच्या वसतीगृहाचा पालक - ब्रेड - एक-महिन्याच्या रजेवर जात आहे.

त्याच्याजागी जेसन स्टीव्हन्स काम बघतील.नेथन जेसनकडे वळून म्हणाला, "जेसन,कृपया उभे रहा,"


जेसन उभा राहिला आणि एका सुरात सगळी मुलं म्हणाली,"हाय जेसन."


जेसन घसा साफ करून चाचरत बोलला."हाय" आणि पट्‌कन तो परत खाली बसला.


मुलांना उद्देशून नेथन बोलला:मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्जसुद्धा आपल्याबरोबर पुढील महिनाभर असतील.

मिस्टर स्टीव्हन्स सोबत जेव्हा बोर्ड ऑफ डायरेक्टरांची मीटिंग झाली,तेव्हा हे दोघे आल्याचं तुम्हाला आठवत असेल.ही भली माणसं इथं आपल्यात आहेत,हे आपलं भाग्य आहे.नंतर नेथन नतमस्तक झाला आणि त्यानं समोर आलेल्या अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सगळ्या मुलांनी त्याचे अनुकरण केले आणि जेवण संपेपर्यंत सर्व आदबशीर आणि नम्रतेने वागले.आमचं जेवण झालं.जेसननं नेथनला विचारल "तू या आधी इथं आला होतात?"


नेथन हसून बोलला,तुला खर मानायलाच हवं,मी इथं पहिल्यांदा आलो,तेव्हा ह्या टेबलापासच्या सर्वात लहान मुलापेक्षाही लहान होतो.मी अनेक अनाथालयातून बाहेर काढलेला मुलगा होतो.पण माझ्या लहानपणाच्या रम्य आठवणी सगळ्या इथल्याच आहेत."


"तू इथं काम करतोस,किंवा कसं?" जेसननं विचारलं.दूरून ऐकू येणाऱ्या ढगांच्या मंद गडगडाटासारखं नेथनचं हसणं होतं,तसं हसून तो म्हणाला, "हो आणि नाही.म्हणजे काय आहे की लोकांच्या दृष्टने न्यू इंग्लड पेटिअट्स या फुटबॉल संघासाठी खिंड लढवणं हे माझं मुख्य काम आहे. पण सीझन संपला रे संपला की मी इथे येतो आणि जे जे जरूर पडेल ते ते काम करतो."


जेसनला धक्का बसल्याबारखं वाटलं,तो म्हणाला, "सॉरी हं.मला वाटलं तू फक्त त्या अलिशान गाडीचा ड्रायव्हर आहेस."


नेथन म्हणाला,"आज तरी मी तोच आहे.आणि ते काम करण्यात मला अभिमान आहे.उद्या मी कदाचित मुख्य राखणदार असेन किंवा इथला शिस्त राखणारा होईन.


आम्ही मोठे होत असतांना रेड स्टीव्हन्सकडनं एक गोष्ट शिकलो.ती म्हणजे जे जे करण्याची जरूरी असते ते ते करणे शहाणपणाचे असते."


जेसननं विचारलं, "ठीक आहे.पण मी इथे काय करायचंय ?"


नेथननं उत्तर दिलं,मिस्टर स्टीव्हन्सनं मिस्टर हॅमिल्टनमार्फत ज्या सूचना दिल्या आहेत त्यांच्यावरून असं दिसतं की मुलांच्या मदतीनं तुझं काय कार्य आहे ते आपोआप उमगत जाईल.बरं, आता जेवण आटपलंय तर मी मिस्टर हॅमिल्टन आणि मिस हेस्टिंग्जना घेऊन कार्यालयाकडे जातो. पुढच्या वर्षीच्या अंदाजपत्रकाची चर्चा करायची आहे.तू तुझं स्वतःचं प्रशिक्षण चालू कर."


आपल्या भल्या थोरल्या पंजानं नेथननं जेसनच्या पाठीवर थाप मारली आणि मिस हेस्टिंग्जला आणि मला घेऊन तो जेवणाच्या खोलीतून बाहेर पडला. आम्ही दरवाज्यातून बाहेर पडत असतांना,जेसन आम्हाला उद्देशून बोलतांना ऐकलं "जरा पहा ना, मला काहीच अंदाज येत नाहीये.मी कधीच असा मुलांच्या संपर्कात आलेलो नाही."


अंगणातून कार्यालयाच्या इमारतीकडे जात असतांना टेबलाभोवतीची ती छोटी मुलं हसताना आम्हालां ऐकू आलं.


पुढच्या वर्षासाठी लागणारं अंदाजपत्रकाचं आणि कायदेशीर बाबींचे काम मी आणि मिस हेस्टिंग्जन पुढील महिनाभरात उरकलं.प्रत्येक दिवशी जेसनचं कसं चाललंय ते बघण्याची संधी खूपदा मिळायची, नेथनही आम्हाला सांगत होताच.


सुरूवातीचे काही दिवस जेसनला अगदी परक्यासारखं वाटलं.पण लवकरच तीन डझन मुलाचा बाप,भाऊ,शिक्षक आणि मित्र या भूमिकांमध्ये तो शिरू आणि वावरू लागला. शेवटच्या दिवशी नेथन आमचं सामान त्या आलिशान गाडीत रचत होता.तेव्हा जेसनचा निरोप घ्यायला एकेक मुलगा येत होता.उरापोटाशी घेणं चाललं होतं,डोळ्यात पाणी येत होतं आणि जेसनला कितीतरी आहेर मिळाले.त्या वस्तू मुलांच्या दृष्टिने फार मौल्यवान होत्या.निरनिराळ्या आकाराचे दगड,

चार पानांचं क्लोव्हर (वाटाण्याच्या जातीची एक प्रकारची रानवेल),ॲरोहेड,असं बरंच काही.अंगणातून नेथननं गाडी बाहेर काढून खडबडीत रस्त्यावर नेली,तेव्हा जेसन मुलं दृष्टीआड होईपर्यंत वळून वळून हात हलवत होता.परत बोस्टनकडे जाणारी पक्की सडक लागेपर्यंत आम्ही गप्प बसून होतो." ( सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल )


शेवटी जेसन बोलला,"काय आश्चर्य आहे बघा.या कोणाही मुलाला कुटुंब नाहीये.पण प्रत्येकाला माझ्यापेक्षा जास्तच कुटुंबाबद्दलची माहिती होती. मला वाटतं,प्रेमभावनेतून परस्परांशी संबंधित रहाणं म्हणजे कुटुंब रक्ताच्या नात्यानं जोडलेलं असणं हा त्या मानानं गौण मुद्दा आहे."


आलिशान गाडीचा भोंगा वाजला.नेथननं आनंदानं मोठी आरोळी ठोकली.(अशी आरोळी फुटबॉल मैदानावरच ऐकण्यात येते) तो मोठ्यानं बोलला, "शेवटी जमलं तुला.तू इथं आलास तेव्हा मला अगदी निरूपयोगी वाटलास.पण तू रेड स्टीव्हन्सचा नातेवाईक म्हणून आम्हाला मनातून आशा वाटत होती.त्याचं काय आहे ? तू एका मोठ्या कुटुंबातलाच आहेस जसा मी आहे."



८/११/२५

दीनजन  / Dinjan

' भिकारी' हा शब्द अनेकदा आपल्या वाचनात येतो, अनेकदा आपल्या बोलण्यात येतो आणि अनेकदा ऐकण्यात ही येतो. एखाद्यासाठी "भिकारी" हा शब्द वापरणे म्हणजे त्याला अत्यंत तुच्छ लेखणं, असं मला वाटतं. आपण जरा सुस्थितीत आहोत म्हणून लगेच दुसऱ्याला "भिकारी"असं लेबल लावणे कितपत योग्य आहे ? 


आपल्यापैकी प्रत्येकावर या आधीच्या आयुष्यामध्ये,कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव,

कोणाकडून काहीतरी "मागावं" लागलं आहे,"याचना" करावी लागली आहे,"अजीजी" करावी लागली आहे.... याचा आपल्याला विसर पडतो. 


"याचना" करण्याचा काळ कुणाचा अगदी कमी असतो तर कोणाचा लांबतो... ! 


अशी याचना करण्याचा काळ लांबलेल्यांना लगेच "भिकारी" असं लेबल लावणं योग्य नव्हे.  


जे खरच नाईलाजास्तव,केवळ जीव जगवण्यासाठी याचना करत आहेत त्यांच्या बाबतीतच मी हे लिहित आहे. बाकी ज्यांनी भीक मागण्याचा धंदा केला आहे त्यांच्यावर काय बोलणार ?


असो,अशा नाईलाजाने याचना करावी लागणाऱ्या या समाजाला "भिकारी" न म्हणता आणखी कोणता शब्द वापरता येईल ?याच्या मी सतत विचारात असायचो. 


असा शब्द की जो टोचणार नाही... बोचणार नाही, पण अर्थही सांगेल...! 


मी काम करायला सुरुवात केल्यापासून "भिक्षेकरी" आणि "याचक" हा शब्द प्रयोग सुरू केला.बऱ्यापैकी प्रमाणात याला यश मिळालं,खूप ठिकाणी आता "भिक्षेकरी" आणि "याचक" या शब्दांचा उपयोग होतो परंतु अजूनही म्हणावे तितके हे शब्द रुळले नाहीत. 


"भिक्षेकरी" आणि "याचक" या व्यतिरीक्त आणखी कोणता शब्द यांच्यासाठी वापरला जाईल,जो मराठीत आणि हिंदीतही अर्थ तर सांगेल, परंतु जास्त टोचणार नाही, ₹बोचणार नाही हा विचार करत असताना मला "दीनजन" असा शब्द सुचला. 


मराठी किंवा हिंदीत लिहिताना, बोलताना "दीनजन" हा शब्द "भिकारी" या शब्दास नक्कीच पर्याय ठरेल. 


इथून पुढे शक्यतोवर "भिकारी" हा शब्द न वापरता त्याऐवजी *"दीनजन"* हा शब्द सर्वांनी वापरावा असं मी या समाजाचा प्रतिनिधी म्हणून नम्र आवाहन करतो. 


नाईलाजाने भीक मागणारा हा गट म्हणजे समाजाच्या हाताला असणारं,करंगळीला चिकटुन लोंबकळणार सहावं बोट ! तसं पाहिलं तर हे बोट कुणाच्या विशेष उपयोगाचं नसतं,तरीही त्याची आपल्यालाच काळजी घ्यावी लागते. कारण कसं ही असलं तरी ते आपल्या शरीराचाच एक भाग असतं... ! तसंच, समाजाच्या हाताला असणाऱ्या या सहाव्या बोटाची म्हणजेच या "दीनजनांची" काळजी घेणं,आधार देणं हे समाजाचंच कर्तव्य आहे.परंतु काळजी घेणं,आधार देणं म्हणजे 2 - 5 रुपये भीक म्हणून देणं किंवा एखादा बिस्कीटचा पुडा देणं,आणि एखाद वेळेस जेवण देणं नव्हे.... 


यामुळे फुकट मागण्याची वृत्ती आणखी वाढते.... 


नवनवीन भिक्षेकरी यामुळे आणखी तयार होतात. ज्यांना मुळीच काम करायचं नाही,सोप्या मार्गानं सर्व हवंय ते लोक मग आवर्जुन अशा फुकट गोष्टी घ्यायला निर्लज्जपणे पुढं येतात... 


आणि आपणच मग कांगावा करतो,'श्शी... "भिकारी" किती वाढले आहेत ना... ?' 


आपल्या अशा "भीक" देण्यामुळे आपण त्यांच्यातल्या काम करण्याच्या वृत्तीचा, स्वाभिमानाचा नकळतपणे खुन करतो,कायमचं त्यांना अपंग बनवतो,परावलंबी बनवतो....


यांना स्वावलंबी केलं तरच ते भीक मागणं सोडतील,समाजात येतील. 


भीक देण्याऐवजी "दीनजन" स्वावलंबी होतील अशा प्रकारची मदत करणे त्यांना आवश्यक आहे. 


वजनकाटा घेवून देणे,चहा विकण्यासाठी Thermos देणे किंवा कमी भांडवलात एखादा व्यवसाय सुरू करून देणे अशा अनेक बाबी आहेत.असो,सर्वांनाच हे करण्यास वेळ मिळणार नाही याची मला जाण आहे.  


शिवाय समाजाबरोबरच शासनाचाही यात सहभाग लागणार आहे. 


तुर्तास हातात असलेल्या दोनच गोष्टी करूया... 


१. कोणत्याही स्वरूपात भीक देणं थांबवूया. 


२. "भिकारी" हा शब्द हद्दपार करून त्याऐवजी "भिक्षेकरी" किंवा "याचक" किंवा *"दीनजन"* असा शब्दप्रयोग करण्यास सुरुवात करू या... !


आपल्या माहितीसाठी सविनय सादर... !!!


नेहमीप्रमाणे रस्त्यावर फिरत असताना काल फुटपाथवर मला एक तरुण जोडपं दिसलं.येता जाता लोक त्यांना 2- 5 रुपये देत होते. एकूण अवतारावरून भिक्षेकरी या गटातील ते वाटत नव्हते. मांडीवर सात-आठ वर्षांचा एक मुलगा.जवळ जाऊन पाहिलं तर जोडप्याच्या डोळ्यातील ज्योती हरवल्या होत्या. ₹दोघांनाही दिसत नव्हतं.शेजारी बसून सर्व चौकशी केली. यांना आणखी एक बारा वर्षाची मुलगी आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही पाहू शकतात आणि दोघेही होस्टेल मध्ये राहतात.सध्याच्या साथ रोगात मुलं घरी आहेत. हे चौकोनी कुटुंब पुण्यातल्या एका झोपडपट्टीमध्ये खोली घेऊन राहतं. 


पुर्वी हे जोडपं काही बाही विकून आपलं पोट भरत होते,परंतु साथ रोगाच्या या काळामध्ये सर्वस्व बुडालं आहे.खोली भाडे,अन्नधान्य व इतर बाबी धरून कुटुंबाचा खर्च महिना पाच हजार रुपये इतका आहे.(काही लोकांच्या एका वेळच्या पार्टीचा खर्च !) कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्यामुळे, पोरांचे जीव जगवण्यासाठी रस्त्यात बसून "मागण्याशिवाय" आता काहीही पर्याय उरला नाही. लहान लेकरांसाठी हे आईबाप "याचक" झाले आहेत... ! याचना करण्यापलीकडे सध्या तरी काही मार्ग यांच्या पुढे नाही...


ज्यांना दिसतच नाही अशांना नोकरी कोण देणार ? 


व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी भांडवल कोण देणार ? 


ज्यांची वाटच हरवली आहे त्यांना कोण मार्ग दाखवणार ?


यांची कथा आणि व्यथा मांडेनच पुन्हा कधीतरी स्वतंत्रपणे... !!! 


सध्या त्वरित उपाय म्हणून,जोपर्यंत हे कुटुंब स्वावलंबी होत नाही तोपर्यंत या कुटुंबाला दत्तक घेत आहोत


यात खालील बाबी करण्याचे योजले आहे. 


१. सध्या त्यांना एक नवीन वजनकाटा दिला आहे. भीक देण्यापेक्षा लोक येऊन वजन करतील आणि यांना सन्मानाने पैसे मिळतील. 


२. रस्त्यावर विक्री होतील अशा वस्तू त्यांना देऊन कायमस्वरूपी व्यवसाय टाकून देणार आहोत. 


३. व्यवसायाची घडी बसेपर्यंत संपूर्ण कुटुंबाचा तीन महिन्यांचा खर्च उचलणार आहोत. 


४. मुलगा आणि मुलीला शिक्षणाची फी आणि हॉस्टेलचा खर्च काहीही नसला तरीसुद्धा शैक्षणिक दृष्ट्या इतर अनेक बाबी मुलांना लागतच असतात. या इतर बाबींची जबाबदारी घेणार आहोत. 


होळीमध्ये यांची सर्व दुःख जळून जावोत... 


आणि येत्या रंगपंचमीला यांच्या आयुष्यात अनेक उत्तम उत्तम रंगांची उधळण होवो अशी प्रार्थना करतो ! 


यानिमित्ताने आपणाही सर्वांना पुनश्च प्रणाम ! कारण,ही जबाबदारी घेण्याची हिंमत आणि ताकद केवळ आपल्यामुळेच मला मिळाली आहे..मी ऋणी आहे आपला ! केवळ आपला एक प्रतिनिधी म्हणून मी रस्त्यावर हे काम करत आहे, याचं खरं श्रेय आपणास आहे.!!! 


गप्पा मारताना त्या लहान मुलाला मी मांडीवर घेऊन बसलो होतो. उठताना त्याला खाऊ दिला आणि निघालो तेव्हा जाताना म्हणाला 'टाटा मामा'...! 


त्याच्या या दोनच शब्दांनी त्याने मला वेग-वेगळ्या नात्यांमध्ये अडकवलं. 


हि नाती सांभाळण्याचा जरूर प्रयत्न करेन !!!


डाॕ.अभिजीत सोनवणे,भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर

२८ मार्च 2021…