काहीजण मस्त कुटुंबामध्ये जन्मतात.इतरांना असं कुटुंब तयार करावं लागतं.नाहीतर सापडावं लागतं.कुटुंबाचं सभासदत्व असेल तर ते अनमोल असतं फक्त प्रेम,एवढीच ताची मागणी असते.
दुसऱ्या दिवशी जेसन,मिस् हेस्टिंग्ज आणि मी कॉन्फरन्स रूममध्ये मासिक सभेसाठी जमलो. अशी सभा आता आनंददायी परिपाठ बनला होता.आमच्या ठरलेल्या जागी आम्ही बसलो.येत्या महिन्यात कश्याबद्दल बरं बोललं जाईल,याचा विचार करण्यात मी गढ़लो असतांनाच मिस् हेस्टिंग्जने व्हिडिओ टेप सुरू केली.
रेड स्टीव्हन्सनं प्रसन्नपणे शुभेच्छा दिल्या."हॅलो, अडचणी -एक देणगी हा धडा शिकल्याबद्दल अभिनंदन.हा धडा तुला आयुष्यभर उपयोगी पडेल. आपल्या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाचा हा सहावा महिना.या महिन्यात कुटुंब म्हणजे काय असतं ते तू समजून घ्यायचं आहेस आणि त्याची कदर राखायला सुरूवात करायची.
"जेसन,मला माहित आहे,सध्या आपलं कुटुंब अगदी विस्कळीत झालं आहे.अगदी जेवढं होता येईल तेवढं जास्तीतजास्त ते विस्कळीत झालंय. तसं व्हायला मीच पूर्णतःजबाबदार असल्याची मी कबुली देतो.पण कुटुंबाची सुस्थिती किंवा अधोगती दोन्ही आपल्याला धडा देऊ शकतात.आपल्या कुटुंबाकडून आपल्याला जे शिकायचं,ते शिकता येतं किंवा दुर्दैवाने नको ते शिकलं जातं.जगातल्या सगळ्या तरूणांमधून मी तुला निवडलंय.हे जबाबदारीचं काम तुझ्यासाठी माझ्यातर्फे मिस्टर हॅमिल्टननं करावं अशी मी योजना केली. तुझ्यासाठी का,तर तू माझा पुतण नातू म्हणून.हे कसं ते सांगण कठीण आहे पण तुला समजलं पाहिजे,असं मला वाटतं.
"कुटुंबाकडून आपल्याला आपली पाळेमुळे,आपला वारसा,आपला भूतकाळ मिळत असतो. आपल्याला भविष्याकडे,एखादा डाइव्हर जशी घेईल,तशी झेप घ्यायला लागणारा स्प्रिंगबोर्ड कुटुंबाकडूनच मिळत असतो.कुटुंबाच्या बंधा इतका सबळ बंध या जगात दुसरा नाही.हा बंध केवळ प्रेमामुळे असतो.आणि जोवर या प्रेमाला आपण अग्रक्रम देतो तोवर कुठल्याही दबावापुढे आपण नत होत नाही.
"कुटूंब सर्व प्रकारच्या आकारात आणि आकारमानात असतात.हे तू लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.काही नशीबवान लोक ते ज्या कुटुंबात जन्मले,त्याचा एक हिस्सा म्हणून जन्मभर राहतात.जेसन तुझ्यासारखे काही जण मात्र एका विशिष्ट परिस्थितीमुळे नावापुरतेच एका कुटुंबाचे असतात.
अशा लोकांना मात्र एक कुटुंब पुढाकार घेऊन तयार करावं लागतं."हे तुला विचित्र वाटेल, पण मी तुला जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ते या महिन्याअखेरपर्यंत तुला समजायला लागेल.या महिन्यात तू,मिस्टर हॅमिल्टन आणि मिस हेस्टिंग्ज आणखी एका सहलीला जाल.ज्या लोकांना कोणी नातेवाइक नाहीत अशांना तू भेटशील आणि अशाप्रकारे कुटुंब आपल्याला काय देतं याचं महत्त्व तू शिकशील.
"महिन्याच्या शेवटी तू मिस्टर हॅमिल्टनना,कुटुंब एक देणगी असते.याबद्दल तुला काय कळलंय ते सांगायचे आहे."
"या सहलीबद्दल मिस्टर हॅमिल्टन तुला सविस्तरपणे सांगेलच आणि हा उद्देश जर सफल झाला तर पुढच्या महिन्यात आपण भेटूच."
जेसन माझ्याकडे वळून म्हणाला,"मला वाटतंय, आपण कुठं जाणार,काय करणार,कुणाला भेटणार याबद्दल तुम्ही मला काहीच सांगणार नाही,बरोबर ?" मी हसून म्हटलं,"वेळच्या वेळी सगळं कळेल रे बेटा.तुला गरज असेल तेवढंच आणि गरज असेल तेव्हांच सांगायचं अशा मला सूचना आहेत."
मध्येच मिस् हेस्टिंग्ज म्हणाली,"उद्या सकाळी साडेसात वाजता तुझ्या घरून गाडीतून आम्ही तुला घेऊन जाऊ.
सगळी व्यवस्था झालेली आहे तासन् तास आपल्याला गाडीतून प्रवास करायचाय.इथं बोस्टनमध्ये जशी आहे तसल्याच हवेत तुला महिनाभर राहायचंय.त्याची तयारी ठेव."
दुसऱ्या दिवशी सकाळी मिस् हेस्टिंग्ज आणि मी एका मोठ्या आरामदायी गाडीत मागच्या सीटस्वर स्थानापन्न झालो.या कामगिरीसाठी खास एक धट्टाकट्टा माणूस निवडला होत.
जेसनच्या प्रासादतुल्य घरासमोर आम्ही थांबलो.ते त्याच्या चुलत आजोबांनी एका ट्रस्टमार्फत त्याच्यासाठी विकत घेतलं होतं.आमचा ड्रायव्हर,जेसन आणि त्याच सामान घ्यायला पुढच्या दाराशी गेला. थोड्याच वेळात तो ड्रायव्हर हातात सहजपणे दोन सुटकेसेस घेऊन येतांना मी पाहिला.
त्याच्यामागून जेसन येत होता,जेसन त्या धिप्पाड माणसासमोर बुजलेला दिसला.त्यानं जेसनसाठी मागचं दार उघडलं.तेव्हा मला आणि मिस हेस्टिंग्जला बघून त्याला जरा हायसं वाटलं,
जेसननं विचारलं,या भूतलावरचा हा कोण धिप्पाड माणूस ?
खुशीत मिस हेस्टिंग्जनं उत्तर दिलं,"तो ना! तू नेथन बद्दल बोलतोयस ना ? या सहलीसाठी मुद्दाम निवडलेला तो एक छान तरूण आहे."
जेसननं विचारलं,"याचा अर्थ काय ?"
मिस हेस्टिंग्ज नुसतंच हसली आणि तिनं कॉफीचा एक घोट घेतला.मी वळून जेसनशी हस्तांदोलन केलं,त्याला अभिवादन केलं,"सुप्रभात जेसन ! बरोबर वेळच्यावेळी सगळं तुला नीटपणे कळेल.तू आता मागे टेकून आरामात बस आणि मुक्कामाचं ठिकाण जसजसं जवळ येईल तसतसं मी तुला सगळं सविस्तर सांगेन."
बोस्टनच्या बाहेर पडल्यावर पूर्व मॅसेच्युसेट्स आणि न्यू हॅम्पशायर राज्यांमधून गाडी जातांना आम्हाला खूप मौज वाटत होती.आम्ही उत्तरेकडे वळून सागर किनाऱ्याने जाऊ लागलो,तेव्हा मी जेसनला या सहलीबद्दल उलगडून सांगायला सुरूवात केली.
"लवकरच आपण मेन राज्यात प्रवेश करूएका खाजगी जंगलातून आपण काही तास,प्रवास करू. मग आपण 'रेड स्टीव्हन्स मुलांचे वसतीगृहात' पोहोचू.पुढच्या महिनाभर त्यांचा बदलीवर आलेला पालक म्हणून तू काम करशील.
त्यामुळे तिथल्या नेहमी काम करणाऱ्या पालक माणसाला अगदी वाजवी असलेली सुट्टी मिळेल.आणि सहा ते सोळा वयोगटातल्या छत्तीस मुलांशी ओळख करून घेण्याची संधी तुला मिळेल."
बुचकळ्यात पडलेल्या नजरेनं माझ्याकडे बघून जेसन म्हणाला,"मला वाटलं मला कुटुंबाबद्दल शिकायचंय.अनाथ मुलांच्या एका घोळक्यात राहून मी कुटुंबाबद्दल शिकावं असं त्या म्हाताऱ्याला वाटलं तरी कसं ?"
मी उत्तरलो,"तो म्हातारा माणूस,आत्ता सहज नेमकेपणाने तू जसा त्याचा उल्लेख केलास,त्यानं तीस वर्षांपूर्वी हे वसतीगृह सुरू केलं आणि तेव्हापासून त्यानंच त्याला पैसा पुरवला.त्याला त्याची खडान्खडा माहिती होती.आणि तुला जो धडा देण्याचं त्यानं ठरवलंय तो तुला इथं नक्कीच मिळेल.तू खुल्या मनानं रहावं,म्हणजे तू बरोबर कुटुंबाबद्दलचा धडा शिकशील,अशी मी उमेद करतो." जेसन तोंडातल्या तोंडात पुटपुटला, "अर्थहीन वाटतंय मला हे सगळं."
मी म्हटलं,"मी तुला एवढंच सांगतो की तू एका विलक्षण महिन्यात आहेस.तुझा चुलत आजोबा मरण पावल्यावर मी या संस्थेच्या बोर्डाचा चेअरमन झालो.मी आणि मिस हेस्टिंग्ज महिनाभर इथल्या ऑफिसमध्ये असू.काही देणगीदारांचे बघायचंय आणि पुढच्या वर्षीच्या अंदाजपत्रकाचाही विचार करायला हवाय."
थोड्या वेळानं आम्ही मुख्य रस्ता सोडून एका खडबडीत रस्त्याला लागलो.एक साधीशी पाटी दिसली.त्यावर लिहिलं होतं,'रेड स्टीव्हन्सचं मुलांसाठी घर'.थोड्या वेळानं आमच्या वाकबगार ड्राइव्हरनं ती प्रशस्त गाडी एका आवारात थांबवली. जेवणघर,झोपायची जागा,शिकण्याची जागा, व्यायामशाळा आणि कार्यालय अशा विविध इमारतींनी ते आवार वेढलेलं होतं.
नेथन त्या आलिशान गाडीच्या बाहेर आला आणि आम्हां तिघांना बाहेर येण्यासाठी त्यानं मागचं दार उघडलं.तो डिकीतून सामान उतरवत होता तेव्हा रहायच्या जागेचा दरवाजा सताड उघडला आणि एक मुलांचा मोठा घोळका नेथनकडे येऊन त्याच्याभोवती गलका करायला लागला.
काहींना धरून त्यानं हवेत उडवलं,कहींना थोपटलं,तर काहींना उरापोटाशी धरलं.ती मुलं सारखी त्याला हाक मारत होती आणि त्याला पाहून त्यांना फारच आनंद झाला होता.
शेवटी एकदाचा तो अतिउत्साही स्वागतसोहळा पार पडला आणि नेथन अशा सुरात बोलला की ज्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नव्हतं."मंडळी आता आपल्या रहायच्या जागेकडे जाऊ या आपण. सगळं काही ठिकठाक आहे ना ते पाहूया,कारण हा महिनाभर नवीन पालक आहेत."
मुलांनी ताबडतोब प्रतिसाद दिला आणि ती त्यांच्या झोपायच्या जागेकडे पळून गेली.सहजपणे नेथननं सगळं सामान उचललं आणि आम्हांला तो रहायच्या जागेकडे घेऊन गेला.दोन्ही भिंतीत बसवलेल्या खाटांच्या रांगा आणि दर दोन खाटांमध्ये एकेक छोटं कपाट होतं.
नेथननं पहिल्या खाटेवर जेसनचं सामान ठेवलं आणि म्हणाला,"या घरी तुमचं स्वागत असो. पुढच्या तीस दिवसांसाठी हा तुमचा राजवाडा असेल.मिस्टर हॅमिल्टन आणि मिस हेस्टिंग्ज
कार्यालयाच्या इमारतीला लागून असलेल्या सदनिकेत राहतील." जेसनकडे वळून नेथन म्हणाला,"सामान काढून तुम्ही लावून घ्यावं असं मला वाटते.नंतर मग इथल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला लागतील "
वीसेक मिनिटांमध्ये जेवणघरात भेटायचं आम्ही सर्वांनी ठरवलं,ऑफिस जवळच्या सर्व सोयी असलेल्या दोन सदनिका नेथननं आम्हांला दाखवल्या.ठरलेल्या वेळी आम्ही जेवायच्या खोलीत एका लांब टेबलाच्या टोकाशी जमून बसलो.काही डझनभर मूल रांगेनं आत आली आणि त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या जागांवर बसली. उत्साहान ती मुल बोलत होती आणि टेबलाशी बसलेल्या आम्हां नवख्या माणसांबद्दल त्यांना उत्सुकता वाटत होती.
थोड्या वेळातच,डोळ्यात भरेल अशी छाप पाडणारी उंची असणारा नेथन उठून उभा राहिला. कमीतकमी सहा फूट आठ इंचापर्यंत उंची असणार असा मी अंदाज केला.मुलं गप्प झाली आणि नेथन बोलायला लागला.
"मुलांनो तुम्हांला माहित आहेच की तुमच्या वसतीगृहाचा पालक - ब्रेड - एक-महिन्याच्या रजेवर जात आहे.
त्याच्याजागी जेसन स्टीव्हन्स काम बघतील.नेथन जेसनकडे वळून म्हणाला, "जेसन,कृपया उभे रहा,"
जेसन उभा राहिला आणि एका सुरात सगळी मुलं म्हणाली,"हाय जेसन."
जेसन घसा साफ करून चाचरत बोलला."हाय" आणि पट्कन तो परत खाली बसला.
मुलांना उद्देशून नेथन बोलला:मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्जसुद्धा आपल्याबरोबर पुढील महिनाभर असतील.
मिस्टर स्टीव्हन्स सोबत जेव्हा बोर्ड ऑफ डायरेक्टरांची मीटिंग झाली,तेव्हा हे दोघे आल्याचं तुम्हाला आठवत असेल.ही भली माणसं इथं आपल्यात आहेत,हे आपलं भाग्य आहे.नंतर नेथन नतमस्तक झाला आणि त्यानं समोर आलेल्या अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सगळ्या मुलांनी त्याचे अनुकरण केले आणि जेवण संपेपर्यंत सर्व आदबशीर आणि नम्रतेने वागले.आमचं जेवण झालं.जेसननं नेथनला विचारल "तू या आधी इथं आला होतात?"
नेथन हसून बोलला,तुला खर मानायलाच हवं,मी इथं पहिल्यांदा आलो,तेव्हा ह्या टेबलापासच्या सर्वात लहान मुलापेक्षाही लहान होतो.मी अनेक अनाथालयातून बाहेर काढलेला मुलगा होतो.पण माझ्या लहानपणाच्या रम्य आठवणी सगळ्या इथल्याच आहेत."
"तू इथं काम करतोस,किंवा कसं?" जेसननं विचारलं.दूरून ऐकू येणाऱ्या ढगांच्या मंद गडगडाटासारखं नेथनचं हसणं होतं,तसं हसून तो म्हणाला, "हो आणि नाही.म्हणजे काय आहे की लोकांच्या दृष्टने न्यू इंग्लड पेटिअट्स या फुटबॉल संघासाठी खिंड लढवणं हे माझं मुख्य काम आहे. पण सीझन संपला रे संपला की मी इथे येतो आणि जे जे जरूर पडेल ते ते काम करतो."
जेसनला धक्का बसल्याबारखं वाटलं,तो म्हणाला, "सॉरी हं.मला वाटलं तू फक्त त्या अलिशान गाडीचा ड्रायव्हर आहेस."
नेथन म्हणाला,"आज तरी मी तोच आहे.आणि ते काम करण्यात मला अभिमान आहे.उद्या मी कदाचित मुख्य राखणदार असेन किंवा इथला शिस्त राखणारा होईन.
आम्ही मोठे होत असतांना रेड स्टीव्हन्सकडनं एक गोष्ट शिकलो.ती म्हणजे जे जे करण्याची जरूरी असते ते ते करणे शहाणपणाचे असते."
जेसननं विचारलं, "ठीक आहे.पण मी इथे काय करायचंय ?"
नेथननं उत्तर दिलं,मिस्टर स्टीव्हन्सनं मिस्टर हॅमिल्टनमार्फत ज्या सूचना दिल्या आहेत त्यांच्यावरून असं दिसतं की मुलांच्या मदतीनं तुझं काय कार्य आहे ते आपोआप उमगत जाईल.बरं, आता जेवण आटपलंय तर मी मिस्टर हॅमिल्टन आणि मिस हेस्टिंग्जना घेऊन कार्यालयाकडे जातो. पुढच्या वर्षीच्या अंदाजपत्रकाची चर्चा करायची आहे.तू तुझं स्वतःचं प्रशिक्षण चालू कर."
आपल्या भल्या थोरल्या पंजानं नेथननं जेसनच्या पाठीवर थाप मारली आणि मिस हेस्टिंग्जला आणि मला घेऊन तो जेवणाच्या खोलीतून बाहेर पडला. आम्ही दरवाज्यातून बाहेर पडत असतांना,जेसन आम्हाला उद्देशून बोलतांना ऐकलं "जरा पहा ना, मला काहीच अंदाज येत नाहीये.मी कधीच असा मुलांच्या संपर्कात आलेलो नाही."
अंगणातून कार्यालयाच्या इमारतीकडे जात असतांना टेबलाभोवतीची ती छोटी मुलं हसताना आम्हालां ऐकू आलं.
पुढच्या वर्षासाठी लागणारं अंदाजपत्रकाचं आणि कायदेशीर बाबींचे काम मी आणि मिस हेस्टिंग्जन पुढील महिनाभरात उरकलं.प्रत्येक दिवशी जेसनचं कसं चाललंय ते बघण्याची संधी खूपदा मिळायची, नेथनही आम्हाला सांगत होताच.
सुरूवातीचे काही दिवस जेसनला अगदी परक्यासारखं वाटलं.पण लवकरच तीन डझन मुलाचा बाप,भाऊ,शिक्षक आणि मित्र या भूमिकांमध्ये तो शिरू आणि वावरू लागला. शेवटच्या दिवशी नेथन आमचं सामान त्या आलिशान गाडीत रचत होता.तेव्हा जेसनचा निरोप घ्यायला एकेक मुलगा येत होता.उरापोटाशी घेणं चाललं होतं,डोळ्यात पाणी येत होतं आणि जेसनला कितीतरी आहेर मिळाले.त्या वस्तू मुलांच्या दृष्टिने फार मौल्यवान होत्या.निरनिराळ्या आकाराचे दगड,
चार पानांचं क्लोव्हर (वाटाण्याच्या जातीची एक प्रकारची रानवेल),ॲरोहेड,असं बरंच काही.अंगणातून नेथननं गाडी बाहेर काढून खडबडीत रस्त्यावर नेली,तेव्हा जेसन मुलं दृष्टीआड होईपर्यंत वळून वळून हात हलवत होता.परत बोस्टनकडे जाणारी पक्की सडक लागेपर्यंत आम्ही गप्प बसून होतो." ( सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल )
शेवटी जेसन बोलला,"काय आश्चर्य आहे बघा.या कोणाही मुलाला कुटुंब नाहीये.पण प्रत्येकाला माझ्यापेक्षा जास्तच कुटुंबाबद्दलची माहिती होती. मला वाटतं,प्रेमभावनेतून परस्परांशी संबंधित रहाणं म्हणजे कुटुंब रक्ताच्या नात्यानं जोडलेलं असणं हा त्या मानानं गौण मुद्दा आहे."
आलिशान गाडीचा भोंगा वाजला.नेथननं आनंदानं मोठी आरोळी ठोकली.(अशी आरोळी फुटबॉल मैदानावरच ऐकण्यात येते) तो मोठ्यानं बोलला, "शेवटी जमलं तुला.तू इथं आलास तेव्हा मला अगदी निरूपयोगी वाटलास.पण तू रेड स्टीव्हन्सचा नातेवाईक म्हणून आम्हाला मनातून आशा वाटत होती.त्याचं काय आहे ? तू एका मोठ्या कुटुंबातलाच आहेस जसा मी आहे."