* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: दीनजन  / Dinjan

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

८/११/२५

दीनजन  / Dinjan

' भिकारी' हा शब्द अनेकदा आपल्या वाचनात येतो, अनेकदा आपल्या बोलण्यात येतो आणि अनेकदा ऐकण्यात ही येतो. एखाद्यासाठी "भिकारी" हा शब्द वापरणे म्हणजे त्याला अत्यंत तुच्छ लेखणं, असं मला वाटतं. आपण जरा सुस्थितीत आहोत म्हणून लगेच दुसऱ्याला "भिकारी"असं लेबल लावणे कितपत योग्य आहे ? 


आपल्यापैकी प्रत्येकावर या आधीच्या आयुष्यामध्ये,कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव,

कोणाकडून काहीतरी "मागावं" लागलं आहे,"याचना" करावी लागली आहे,"अजीजी" करावी लागली आहे.... याचा आपल्याला विसर पडतो. 


"याचना" करण्याचा काळ कुणाचा अगदी कमी असतो तर कोणाचा लांबतो... ! 


अशी याचना करण्याचा काळ लांबलेल्यांना लगेच "भिकारी" असं लेबल लावणं योग्य नव्हे.  


जे खरच नाईलाजास्तव,केवळ जीव जगवण्यासाठी याचना करत आहेत त्यांच्या बाबतीतच मी हे लिहित आहे. बाकी ज्यांनी भीक मागण्याचा धंदा केला आहे त्यांच्यावर काय बोलणार ?


असो,अशा नाईलाजाने याचना करावी लागणाऱ्या या समाजाला "भिकारी" न म्हणता आणखी कोणता शब्द वापरता येईल ?याच्या मी सतत विचारात असायचो. 


असा शब्द की जो टोचणार नाही... बोचणार नाही, पण अर्थही सांगेल...! 


मी काम करायला सुरुवात केल्यापासून "भिक्षेकरी" आणि "याचक" हा शब्द प्रयोग सुरू केला.बऱ्यापैकी प्रमाणात याला यश मिळालं,खूप ठिकाणी आता "भिक्षेकरी" आणि "याचक" या शब्दांचा उपयोग होतो परंतु अजूनही म्हणावे तितके हे शब्द रुळले नाहीत. 


"भिक्षेकरी" आणि "याचक" या व्यतिरीक्त आणखी कोणता शब्द यांच्यासाठी वापरला जाईल,जो मराठीत आणि हिंदीतही अर्थ तर सांगेल, परंतु जास्त टोचणार नाही, ₹बोचणार नाही हा विचार करत असताना मला "दीनजन" असा शब्द सुचला. 


मराठी किंवा हिंदीत लिहिताना, बोलताना "दीनजन" हा शब्द "भिकारी" या शब्दास नक्कीच पर्याय ठरेल. 


इथून पुढे शक्यतोवर "भिकारी" हा शब्द न वापरता त्याऐवजी *"दीनजन"* हा शब्द सर्वांनी वापरावा असं मी या समाजाचा प्रतिनिधी म्हणून नम्र आवाहन करतो. 


नाईलाजाने भीक मागणारा हा गट म्हणजे समाजाच्या हाताला असणारं,करंगळीला चिकटुन लोंबकळणार सहावं बोट ! तसं पाहिलं तर हे बोट कुणाच्या विशेष उपयोगाचं नसतं,तरीही त्याची आपल्यालाच काळजी घ्यावी लागते. कारण कसं ही असलं तरी ते आपल्या शरीराचाच एक भाग असतं... ! तसंच, समाजाच्या हाताला असणाऱ्या या सहाव्या बोटाची म्हणजेच या "दीनजनांची" काळजी घेणं,आधार देणं हे समाजाचंच कर्तव्य आहे.परंतु काळजी घेणं,आधार देणं म्हणजे 2 - 5 रुपये भीक म्हणून देणं किंवा एखादा बिस्कीटचा पुडा देणं,आणि एखाद वेळेस जेवण देणं नव्हे.... 


यामुळे फुकट मागण्याची वृत्ती आणखी वाढते.... 


नवनवीन भिक्षेकरी यामुळे आणखी तयार होतात. ज्यांना मुळीच काम करायचं नाही,सोप्या मार्गानं सर्व हवंय ते लोक मग आवर्जुन अशा फुकट गोष्टी घ्यायला निर्लज्जपणे पुढं येतात... 


आणि आपणच मग कांगावा करतो,'श्शी... "भिकारी" किती वाढले आहेत ना... ?' 


आपल्या अशा "भीक" देण्यामुळे आपण त्यांच्यातल्या काम करण्याच्या वृत्तीचा, स्वाभिमानाचा नकळतपणे खुन करतो,कायमचं त्यांना अपंग बनवतो,परावलंबी बनवतो....


यांना स्वावलंबी केलं तरच ते भीक मागणं सोडतील,समाजात येतील. 


भीक देण्याऐवजी "दीनजन" स्वावलंबी होतील अशा प्रकारची मदत करणे त्यांना आवश्यक आहे. 


वजनकाटा घेवून देणे,चहा विकण्यासाठी Thermos देणे किंवा कमी भांडवलात एखादा व्यवसाय सुरू करून देणे अशा अनेक बाबी आहेत.असो,सर्वांनाच हे करण्यास वेळ मिळणार नाही याची मला जाण आहे.  


शिवाय समाजाबरोबरच शासनाचाही यात सहभाग लागणार आहे. 


तुर्तास हातात असलेल्या दोनच गोष्टी करूया... 


१. कोणत्याही स्वरूपात भीक देणं थांबवूया. 


२. "भिकारी" हा शब्द हद्दपार करून त्याऐवजी "भिक्षेकरी" किंवा "याचक" किंवा *"दीनजन"* असा शब्दप्रयोग करण्यास सुरुवात करू या... !


आपल्या माहितीसाठी सविनय सादर... !!!


नेहमीप्रमाणे रस्त्यावर फिरत असताना काल फुटपाथवर मला एक तरुण जोडपं दिसलं.येता जाता लोक त्यांना 2- 5 रुपये देत होते. एकूण अवतारावरून भिक्षेकरी या गटातील ते वाटत नव्हते. मांडीवर सात-आठ वर्षांचा एक मुलगा.जवळ जाऊन पाहिलं तर जोडप्याच्या डोळ्यातील ज्योती हरवल्या होत्या. ₹दोघांनाही दिसत नव्हतं.शेजारी बसून सर्व चौकशी केली. यांना आणखी एक बारा वर्षाची मुलगी आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही पाहू शकतात आणि दोघेही होस्टेल मध्ये राहतात.सध्याच्या साथ रोगात मुलं घरी आहेत. हे चौकोनी कुटुंब पुण्यातल्या एका झोपडपट्टीमध्ये खोली घेऊन राहतं. 


पुर्वी हे जोडपं काही बाही विकून आपलं पोट भरत होते,परंतु साथ रोगाच्या या काळामध्ये सर्वस्व बुडालं आहे.खोली भाडे,अन्नधान्य व इतर बाबी धरून कुटुंबाचा खर्च महिना पाच हजार रुपये इतका आहे.(काही लोकांच्या एका वेळच्या पार्टीचा खर्च !) कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्यामुळे, पोरांचे जीव जगवण्यासाठी रस्त्यात बसून "मागण्याशिवाय" आता काहीही पर्याय उरला नाही. लहान लेकरांसाठी हे आईबाप "याचक" झाले आहेत... ! याचना करण्यापलीकडे सध्या तरी काही मार्ग यांच्या पुढे नाही...


ज्यांना दिसतच नाही अशांना नोकरी कोण देणार ? 


व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी भांडवल कोण देणार ? 


ज्यांची वाटच हरवली आहे त्यांना कोण मार्ग दाखवणार ?


यांची कथा आणि व्यथा मांडेनच पुन्हा कधीतरी स्वतंत्रपणे... !!! 


सध्या त्वरित उपाय म्हणून,जोपर्यंत हे कुटुंब स्वावलंबी होत नाही तोपर्यंत या कुटुंबाला दत्तक घेत आहोत


यात खालील बाबी करण्याचे योजले आहे. 


१. सध्या त्यांना एक नवीन वजनकाटा दिला आहे. भीक देण्यापेक्षा लोक येऊन वजन करतील आणि यांना सन्मानाने पैसे मिळतील. 


२. रस्त्यावर विक्री होतील अशा वस्तू त्यांना देऊन कायमस्वरूपी व्यवसाय टाकून देणार आहोत. 


३. व्यवसायाची घडी बसेपर्यंत संपूर्ण कुटुंबाचा तीन महिन्यांचा खर्च उचलणार आहोत. 


४. मुलगा आणि मुलीला शिक्षणाची फी आणि हॉस्टेलचा खर्च काहीही नसला तरीसुद्धा शैक्षणिक दृष्ट्या इतर अनेक बाबी मुलांना लागतच असतात. या इतर बाबींची जबाबदारी घेणार आहोत. 


होळीमध्ये यांची सर्व दुःख जळून जावोत... 


आणि येत्या रंगपंचमीला यांच्या आयुष्यात अनेक उत्तम उत्तम रंगांची उधळण होवो अशी प्रार्थना करतो ! 


यानिमित्ताने आपणाही सर्वांना पुनश्च प्रणाम ! कारण,ही जबाबदारी घेण्याची हिंमत आणि ताकद केवळ आपल्यामुळेच मला मिळाली आहे..मी ऋणी आहे आपला ! केवळ आपला एक प्रतिनिधी म्हणून मी रस्त्यावर हे काम करत आहे, याचं खरं श्रेय आपणास आहे.!!! 


गप्पा मारताना त्या लहान मुलाला मी मांडीवर घेऊन बसलो होतो. उठताना त्याला खाऊ दिला आणि निघालो तेव्हा जाताना म्हणाला 'टाटा मामा'...! 


त्याच्या या दोनच शब्दांनी त्याने मला वेग-वेगळ्या नात्यांमध्ये अडकवलं. 


हि नाती सांभाळण्याचा जरूर प्रयत्न करेन !!!


डाॕ.अभिजीत सोनवणे,भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर

२८ मार्च 2021…