* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

६/१/२६

प्रसिद्ध राजा चौदावा The famous King XIV

पुन्हा एकदा कवीच्या वातावरणातून खाली उतरून राजांकडे वळू या.सतराव्या शतकात युरोपातील राज्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा व घोडचुका यांमुळे युरोपीय संस्कृती जणू नष्टप्राय झाली ! शेक्सपिअरनंतरच्या पिढीने अत्यंत रक्तपाती असे धार्मिक युद्ध पाहिले.प्रॉटेस्टंट आणि कॅथॉलिक राजे आपापल्या प्रजेची तीस वर्षे कत्तल करीत होते. 'ईश्वराच्या अती थोर वैभवासाठी' आपापले देश या राजांनी उजाड व उद्ध्वस्त केले.हे तीस वर्षे चाललेले युद्ध १६४८ साली संपले.सारे मध्ययुरोप जणू ओसाड झाले होते.

भुकेलेली माणसे व भुकलेले लांडगे मेलेल्या घोड्यांच्या प्रेतासाठी परस्परांशी लढत होते. 


जर्मनीची लोकसंख्या एक कोटी साठ लक्ष होती ती साठ लक्षांवर आली.पश्चिम जर्मनीतील पॅलेटिनेट स्टेट अठ्ठावीस वेळा लुटले गेले.बोहेमियातील तीस हजार गावे भस्मीभूत झाली.


वेस्टफॅलिया येथील तहाने तीस वर्षांचे युद्ध संपले.पण या युद्धाने कशाचाही निर्णय झाला नाही.कॅथॉलिक पोपशी निष्ठावंत राहिले.

प्रॉटेस्टंट ल्यूथरची पूजा करीत राहिले.मध्ययुरोपातील राजे खाटीकखाना चालवत असता इकडे इंग्लंडमध्ये पहिला जेम्स मॅकिआव्हिलीच्या शिकवणीप्रमाणे अनियंत्रित सत्ता स्थापू पाहत होता.


प्रजेच्या हक्कांपेक्षा राजाची सत्ता अधिक असते असे दाखवू पाहत होता.तो म्हणे, "ईश्वर काय करू शकेल हे विचारणे जसे निंद्य अधार्मिक आणि नास्तिकपणाचे, तद्वतच राजा काय करू शकेल हे विचारणेही प्रजेला शोभत नाही.ते लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे होय." जेम्सचा मुलगा पहिला चार्लस् गादीवर आला तेव्हा त्याने पित्याच्या उपदेशानुसार वागण्याचे नक्की ठरवले.

इंग्लंडचा अनियंत्रित राजा होणे हे त्याचे ध्येय होते.सर्व सत्ता आपल्या हाती असावी असे त्याला वाटत होते.त्याने पार्लमेंट बरखास्त केले.जमीनदार व व्यापारी राजाचा उद्धटपणा व अनियंत्रित हडेलहप्पीपणा पाहून संतापले.राजाची अनियंत्रित सत्ता सहन करायला ते बिलकूल तयार नव्हते.राज्यकारभारात आपणास सत्ता असलीच पाहिजे असा हट्ट त्यांनी धरला,राजा ऐकेना. तेव्हा या अतिरेकी राजाविरुद्ध त्यांनी बंड केले व त्याला कैद करून शेवटी त्याचे डोके उडवले.


पण इंग्रजांना जुन्या सवयी टाकून देणे कठीण होते. ऑलिव्हर क्रॉम्वेलच्या नेतृत्वाखाली रिपब्लिक स्थापण्याचे थोडेफार यत्न झाले.पण इंग्रज जनतेलाच राजा असावा असे पुन्हा वाटू लागले.नवा राजा आला. पण त्याची सत्ता अनियंत्रित राहिली नाही.राजे लोक धडा शिकले होते.पार्लमेंटशी शत्रूत्व करण्याचे धाडस त्यांनी पुन्हा केले नाही.त्या वेळेपासून इंग्लंड राजशाही रिपब्लिक झाले.राजाचा मुकुट केवळ एक निरुपद्रवी अलंकार म्हणून राहिला.वास्तविक,त्याची आवश्यकताही नव्हती.


(फ्रेंच राजांपैकी अती प्रसिद्ध राजा चौदावा लुई,हेन्री थॉमस,अनुवाद -सानेगुरुजी, मधुश्री पब्लिकेशन)


पण फ्रान्समध्ये अनियंत्रित राजसत्तेची कल्पनाच अधिक दृढावली फ्रेंच राजांनी पौर्वात्य सम्राटांप्रमाणे हुकूमशाही सुरू केली.ते प्रजेचे अनिर्बंध स्वामी होते. सारी प्रजा जणू गुलाम ! प्रजेतील गुलामीची विषमताच जणू त्यांनी नष्ट केली.सारेच दुर्बल व अगतिक प्रजानन या अनियंत्रित फ्रेंच राजांपैकी सर्वांत जास्त दिमाखखोर चौदावा लुई हा होता.


चौदावा लुई हा एकंदरीत कार्यक्षम व लायक राजा होता.

आपल्याजवळ दैवी सामर्थ्य आहे,असे त्याला वाटे. त्याला आपण पृथ्वीवरचे देवच आहोत असा भास होई, तो आपणास सूर्यदेव म्हणवी सूर्यदेव अपोलो याच्याप्रमाणे आपण या मर्त्यलोकी प्रकाश,वैभव व आनंद आणणारे आहोत असे तो म्हणे,त्याला वाटे की, ईश्वराने हे जग जे निर्मिले आहे,ते त्यात आपण आपल्या वैभवाने व दिमाखाने मिरवावे म्हणूनच होय.


त्यांचे पुष्कळसे समकालीन लोक त्याच्या दिमाखाने दिपून जात व त्याला खरोखरच अवतारी मानीत. आजही त्याच्या नावाभोवती तेजोवलय आहे.त्याचा एक अगदी अर्वाचीन चरित्रकार लुई बरट्रांड लिहितो, "चौदावा लुई हा सर्वांहून थोर फ्रेंच मनुष्य होऊन गेला. तो सर्वश्रेष्ठ फ्रेंचमन होय." लुई बरट्रांडचे मन मध्ययुगीन आहे.घमंडेनंदन व आदळआपट करणारे लोक त्याला आवडतात.हा चरित्रकार एके ठिकाणी लिहितो, "ग्रीसचा होमर,रोमचा व्हर्जिल,इंग्लंडचा शेक्सपिअर,इटलीचा डान्टे,जर्मनीचा गटे,तसा फ्रान्सचा चौदावा लुई." अशा प्रकारे लुईची अत्यंत स्तुती करून फ्रान्समधील थोर थोर कवी,शास्त्रज्ञ व व तत्त्वज्ञ यांपेक्षाही आपण चौदाव्या लुईला का श्रेष्ठ मानतो याची कारणे तो देतो.तो म्हणतो,"चौदावा लुई हा दैवी राजा होता. फ्रान्समध्ये त्याच्यासारखा दैवी मनुष्य जन्मला नाही. त्याने सारे आयुष्य युद्धात घालवले. त्याचे युद्धावर जितके प्रेम होते, तितके कोणाचेही नव्हते." चौदावा लुई युद्धाच्या वातावरणात वाढला.तीस वर्षांचे युद्ध संपण्यापूर्वी आठ वर्षे म्हणजे १६३८ साली तो जन्मला.युद्धातील विजय म्हणजे परम ऐश्वर्य असे त्याला शिकवण्यात आले होते.बुद्धप्रिय राष्ट्रांतील विकृत व विपरीत नीती त्याच्या बालमनावर ठसविण्यात आली होती.गुप्त कारस्थाने,खोटे बोलणे,फसवणूक,स्वार्थ,हाव इत्यादी ध्येये त्याच्यासमोर ठेवण्यात आली होती.या विचारांवर तो पोसला गेला होता.त्याच्या चरित्रकार बरट्रांड लिहितो,'लहानपणापासून आपले विचार व आपल्या भावना लपविण्याची आनुवंशिक कला त्याला साधली होती.

आपले स्वरूप लपवून ठेवण्याची गोष्ट अत्यंत फायदेशीर व आवश्यक असते.राजामधला सर्वांत मोठा गुण म्हणजे आपले स्वरूप समजू न देणे हा होय.'आपण मोठे झाले पाहिजे असे लहानपणापासूनच त्याला वाटू लागले होते. 


'तू कोणीतरी मोठा आहेस' असे त्याला लहानपणापासून शिकवण्यात येत होते.त्याची जीवनातील सर्वांत मोठी महत्त्वाकांक्षा हुशार,धटिंगण होणे ही होती.त्याच्या शिक्षकांनी त्याच्यासाठी नाना प्रकारचे लढाऊ खेळ शोधून काढले होते.त्याचे सारे बालपण भांडणांत व मारामाऱ्या करण्यात गेले.त्याचा स्वभाव वाघासारखा होता.ला पोर्ट नावाचा त्याचा एक नोकर होता. वयाच्या तेराव्या वर्षी हे लुई महाशय कसे होते,याचे गमतीदार शब्दचित्र त्याने रंगवले आहे.ला पोर्ट लिहितो, "आम्ही माँटेरोहून कॉबल येथे गेलो.तिथे लुईने आपल्या धाकट्या भावाला आपल्या शय्यागारात निजण्यास सांगितले.सकाळी दोघे भाऊ जागे झाले.चौदावा लुई आपल्या भावाच्या अंथरुणावर थुंकला.तोही लुईच्या अंथरुणावर थुंकला,लुई रागावून भावाच्या तोंडावर थुंकला.तेव्हा तो धाकटा भाऊ उडी मारून लुईच्या अंथरुणावर गेला व त्याने तिथे लघुशंका केली.लुईनेही तोच प्रकार भावाच्या अंथरुणावर केला...!" असा हा तेरा वर्षांचा लुई होता. आणि त्या वेळेस लुई राजा झाला होता. पाचव्या वर्षीच तो गादीवर बसला होता. पण चौदा वर्षांचा होईपर्यंत त्याला राज्याभिषेक करण्यात आला नव्हता.


त्याला राज्याभिषेक होईपर्यंत राज्यकारभार त्याची आईच पाहत होती.कार्डिनल माझारिन त्याला शिकवीत होता.हा इटालियन कार्डिनल लुईच्या आईचा प्रियकर होता.कार्डिनल माझारिन मोठा साहसी व नास्तिक होता.त्याची महत्त्वाकांक्षा पोप होण्याची होती. तो स्वतः अती हुशार,लफंग्या व दांभिक होता.त्याने तरुण लुईला दंभाचे परिपूर्ण शिक्षण दिले.तो लुईला सांगे, "मोठमोठ्या सरदार घराण्यांतील लोकांना कस्पटासमान,पायावरील धुळीप्रमाणे मान.दरबारातील सरदार-दरकदारांशी कधीही अधिक परिचय ठेवू नको. लोक कृपेची याचना करतील,तेव्हा चेहरा कठोर कर. मनातील भाव कधीही प्रकट न करता जणू अनाकलनीय गूढ.यातच खरा राजेपणा आहे.सर्व कारभार गुप्तपणे कर.

कोणालाही कसलीही दाद लागू देऊ नको.शाब्दिक वचने भरपूर द्यावीत;पण ती पूर्ण मात्र कधीही करू नयेत.'वचने किं दरिद्रता?' "


हा कार्डिनल माझारिन मॅकिआव्हिलीच्या राजनीतीवर पूर्ण विश्वास ठेवणारा होता.त्याने आपल्या या छात्राला या सैतानी विद्येत तरबेज केले.मॅकिआव्हिलीच्या वचनांनी भरलेली एक वहीच्या वही त्याच्याजवळ होती. तिच्यातील सर्वांत प्रमुख वचन हे होते; 'राजांची पूजा केली पाहिजे.त्यांची इच्छा म्हणजेच कायदा!' शुद्धलेखन लिहावयास शिकवणाऱ्या त्याच्या पंतोजींनी हे वाक्य त्याच्याकडून पुन्हा-पुन्हा घोटून घेतले होते.


बाळपणी लुईची बुद्धिमत्ता सामान्य मुलांच्या बुद्धिमत्तेहून कमी दर्जाची होती.पण माझारिनने लुईच्या हृदयात सुंदर वस्तूंविषयीची प्रीती निर्मिली,माझारिन हा इटालियन होता.त्याचे शिक्षण स्पेनमध्ये झाले होते आणि आता तो फ्रेंच संस्कृतीही आत्मसात करू पाहत होता.तो सौंदर्योपासक होता.संगीत व मूर्तिकला यांच्यावर त्याची भक्ती होती.रेशीम व फिती,आरसे व रत्ने,चित्रे व पुस्तके या सर्वांचा तो शौकीन होता,तो जरा डॅडी म्हणजे नवाबी वृत्तीचा होता.

इटालियन भिक्षुणींना तो स्वतःसाठी नाना सुंगधी उटणी व तेले करावयास लावी.या सुंगधी उटण्यांचा व तेलांचा उपयोग तो केवळ स्वतःसाठीच नव्हे;तर आपल्या दोन आवडत्या माकडांसाठीही करी.पण त्याच्यामध्ये असला नबाबीपणा असला,तरी एकंदरीत तो सौंदर्याचा प्रेमी होता यात शंकाच नाही.सौंदयोपासना हा त्याचा जणू धर्म होता !जगातील अत्यंत सुंदर असा कलासंग्रह त्याच्याजवळ होता.मरताना 'हा सारा कलासंग्रह सोडून जाण्याची पाळी आपल्यावर येणार;हे एकच दुःख त्याला वाटत होते.


माझारिन मेला तेव्हा राजा तेवीस वर्षांचा होता.तो या कार्डिनलजवळच सौंदर्यप्रेम शिकला होता.सारा फ्रान्स देश त्याने म्युझियम बनवला.ठायीठायी त्याने बागा, राजवाडे व संत-मंदिरे निर्माण केली.देशभर एक प्रकारचे कृत्रिम सौंदर्य दरवळू लागले.

राजदरबारात स्त्री-पुरुष पावडरी फासून,रंग लावून,उंची पोषाख घालून,आढ्यतेने व आदबीने हिंडत.खातापिताना अत्यंत नाजूक हावभाव करीत,साधे वाक्य बोलावयाचे असले, तरी त्यात मोठमोठे शब्द योजीत.साधेपणा जणू संपला व कृत्रिमता म्हणजेच जणू कला व जीवन असे झाले. राजाने उत्तमोत्तम कवी व नाटककार,

तत्त्वज्ञानी व शास्त्रज्ञ,तसेच उत्कृष्ट आचारी आपल्या दरबारी बोलावले.एखादा प्रेमळ धनी आपल्या कुत्र्यांशी वागतो, तसा तो सर्वांशी वागे.आपल्या भोजनाच्या टेबलावरील तुकडे तो त्यांना प्रेमाने देई व त्यांचा कंटाळा आला म्हणजे कचरा फेकावा त्याप्रमाणे त्यांना दूर फेकी.


ज्याप्रमाणे पंडितांना व कलावंतांना,त्याचप्रमाणे राजशाही वारांगनांनाही तो वागवी.त्याच्या पुष्कळच वारांगना होत्या.क्षणभर तो त्यांना वागणुक देई आणि मग लाथ मारी.लुईला देव मानणारे त्याचे काही चरित्रकार तो स्त्रियांच्या बाबतीत असा बेछूट वागणारा नव्हता,असे दाखविण्याची खटपट करीत असतात व त्याची प्रेमप्रकरणे पुष्कळ असली,तरीही तो विवेकी पती होता असे सांगत असतात.त्याचा चरित्रकार बरट्रांड लिहितो, 'अगदी खासगी बाबतीतील बारीकसारीक गोष्टींबद्दल वाचक क्षमा करणार असतील तर मी सांगतो की,आपल्या एखाद्या प्रिय पात्राजवळ अत्यंत कामासक्तीने रंगलेला असताही तो आपल्या पत्नीपासून सर्व रात्र काही दूर राहत नसे.त्या रमणीला सोडून शेवटी संयमाने तो पत्नीकडे येईच.' केवढा उदार व उदात्त राजा !


"मला आपले विकार आवरत नाहीत."असे तो पुष्कळदा आपल्या आईला सांगे व म्हणे,"मला याची लाज वाटते!" पण हे विचार व या वासना आवरण्याचा यत्नच त्याने कधी केला नाही.व्हर्सायलिस येथील तो प्रसिद्ध आरसेमहाल तो भव्य प्रासाद त्याने बांधला.

येथेच तो आपल्या प्रियकरणींची करमणूक करी.त्यांच्याबरोबर कामक्रीडा करी.नाचरंग खेळे,मेजवान्या देई.या त्या विषयोपभोगांतील वैभव प्राचीन रोमन सम्राटांच्या वैभवापेक्षाही अधिक असे.एकदा एका मेजवानीच्या प्रसंगी त्याच्याजवळच्या तरवारीचे म्यान इतक्या हिऱ्यांनी भरलेले होते की,ज्या सोन्यात ते हिरे बसवलेले होते ते सोने दिसणेही मुश्कील झाले होते.ही सौंदर्योपासना,ही सुखे,हे विलास या सर्वांसाठी लुईला अपरंपार खर्च करावा लागे.शेतकऱ्यांची दैना करून त्याने फ्रान्सचे वैभव वाढवले. अधिक उदात्त जगाचा पैगंबर जो डिडरो त्याने एक सुंदर प्रसंग रेखाटला आहे.आपल्या आजोबांना हेन्रीलौदावा लुई आपला व्हर्सायलिसचा प्रासाद दाखवीत आहे.


चौदावा लुईही मेलेला असून त्याचे भूत तो राजवाडा आजोबांना दाखवीत असता तो वृद्ध राजा राजवाडधाकडे बघतो व त्यानंत चुक् चक् करून नापसंतीदर्शक मान हालवून म्हणतो, "बाळ,राजवाडा छान आहे,सुंदर आहे यात शंकाच नाही.पण गोनेसी येथील शेतकऱ्यांची घरे कशी आहेत ते पाहावेसे वाटते." त्या भव्य राजवाड्याच्या आसपास राहणारे शेतकरी पेंढ्यांवर निजत,त्यांना राहण्याला घर नसे, त्यांच्या पोटात भाकर नसे,हे लुईला व हेन्रीला कळते तर त्यांना काय वाटले असते ?


आपल्या या भरमसाठ खर्चाच्या विलासोपभोगांसाठी लागणाऱ्या पैशांकरिता लुई सर्वांवर कर बसवी. मोठमोठ्या सरदारांपासून तो किसान कामगारांपर्यंत सर्वांवर तो करांचा बोजा लावी.पण सरदार बिथरले, तेव्हा त्याने सारा बोजा सामान्य रयतेवरच टाकला. आपल्या सार्वजनिक भाषणांतून तो गरिबांबद्दल अपार सहानुभूती दाखवी.तो एकदा म्हणाला,"शिपायांपेक्षा मजुरांचा उपयोग अधिक असतो."तो दुसऱ्या एका प्रसंगी म्हणाला,"किसान व कामगार यांच्यावर माझे फार प्रेम आहे."तो त्यांच्यावर प्रेम करी व त्यांना चिरडून टाकण्यासाठीही शक्य ते सर्व करी.त्याने शेतकऱ्यांची इतकी पिळवणूक केली की,शेवटी शेतकरी गुराढोरांप्रमाणे गवत खाऊ लागले.दुसऱ्यांबद्दल त्याला यत्किंचितही सहानुभूती वाटत नसे. राजाने आपल्या हृदयात दयेला थारा देता कामा नये, असे त्याचे मॅकिऑव्हिली मत होते.धनी गुलामांवर चालवितो, तशी राजाने प्रजेवर हुकूमत चालवावी असे तो म्हणे. प्रजेबद्दल तो फक्त तिरस्कारच व्यक्त करी. जणू खालच्या योनीतील पशू समजूनच तो त्यांना वागवी.शौचाला बसल्या बसल्या तो मुलाखती देई व उघड्यावर एनिमा घेई. 'आजूबाजूची माणसे म्हणजे कावळे,

चिमण्या व पशुपक्षी त्यांची कदर कशाला? त्यांची कशाची लाज?' असे जणू त्याला वाटे.एकदा सामान्य मनुष्य कुत्रा समोर असता जसे हे विधी बिनदिक्कत करील तसे माणसे समोर आली तरी लुई करी.त्याची स्तुतिस्तोत्रे गाणारा चरित्रकार बरट्रांड म्हणतो, 'त्याचे हरएक कृत्य राजाला शोभेसे असे काहीही करताना आपण मोठा भूपाल आहोत. थोर राजा आहोत हे तो कधीही विसरत नसे


तो स्वतःला दैवी समजे,अर्थात परिणामतः दुसऱ्यांस तुच्छ मानी,तो स्वतःला अधिक चाहत असे.म्हणून दुसऱ्यांचा तिरस्कार करी.

दुसऱ्यांचा तिरस्कार ही आत्मस्तुतीची निषेधक बाजू होती.तो स्वतःच्या मोठेपणाचा पुजारी होता.स्वतःला देव समजून तो आपला मानसन्मान करून घेई प्राचीन जगज्जेत्या सम्राटांच्या पावलांवर पावले टाकून जाण्यास तो उत्सुक होता.प्राचीन रोमन साम्राज्याचे पुनरुज्जीवन करून पोप व आपण अशी ईश्वराची दोन रूपे कल्पून आपण दोघांनी राज्य करावे,असे त्याचे स्वप्न होते.स्पेन व नेदरलँड दोहोंविरुद्ध त्याने सारखेच आक्रमक युद्ध चालविले होते.चाळीस वर्षे चाललेल्या या युद्धाने त्याने स्वतःसाठी वैभव मिळविले.पण राष्ट्राला मात्र भिकारी केले. फ्रान्सची विपन्नावस्था झाली.प्रजेने भावना पेटून लढण्यासाठी उठावे म्हणून प्रचार करण्याला तो धर्मोपदेशक पाठवी.हे धर्मोपदेशक प्रवचने देत व सांगत, "राजांसाठी मरणे हे शेतकऱ्यांचे कर्तव्य होय.प्रजेचा हा धर्म होय.' अँबे थेसॉ नामक एक धर्मोपदेशक लिहितो, 'तरुणांना काहीतरी करावयाला हवे असते. म्हणून फ्रान्सला युद्धाची जरुरी आहे.' फ्रान्समधील तरुण मरण-मारणाहून अन्य काहीतरी करू इच्छित असले, तरी त्यांना तसे कोण करू देणार? बिशप बोसो याची घोषणा होती की, 'राजाला युद्ध करावेच लागले तर ते त्याने पूर्ण शक्तीने करावे, सारी शक्ती एकवटून करावे... राजाचे वैभव व यश म्हणजेच देशाचे भूषण!' पण या राजाने किंवा या अ‍ॅबट बिशपांनी शत्रूच्या गोळ्यांसमोर आपली शरीरे उभी केल्याचा पुरावा मात्र आम्हाला तरी माहीत नाही.चौदावा लुई आपल्या देशात तर आपला मोठेपणा वाढवीत होताच.तेथील कवी, लेखक,धर्मोपदेशक या साऱ्यांना तर त्याने आपले भाट बनविले होतेच.पण इतर तटस्थ राष्ट्रांतील हुशार लेखकांनाही लाच वगैरे देऊन त्याने त्यांना स्वतःची स्तुतिस्तोत्रे गावयास लावली. 'चौदावा लुई हा अत्यंत थोर रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन राजा आहे.सर्व मोठ्या उत्सवप्रसंगी त्याचे स्मरण करा,त्याचे भले चिंता.' असे इतर देशांतील लेखकही सांगत.लुई लढाईवर विश्वास ठेवी.तितकाच लाचलुचपतीवरही.तो इतर देश लढाईने जिंकू पाही तद्वतच पैशानेही आणि त्याच्या या द्विविध प्रचारापायी शेतकऱ्यांना मात्र भिकारी व्हावे लागे.


लष्करी वैभवासाठी हे जे पशुत्व,मूर्खत्व व कापट्य दाखविले जाई,त्याविरुद्ध क्वचित कोठे आवाज निघतच नसे असे नाही.

१६७५ साली मार्चच्या पाचव्या तारखेस राजा व त्याचे सारे दरबारी बसले असता पाद्री मास्कारॉन याने सर्वांसमोर युद्धविरोधी प्रवचन दिले. तो म्हणाला, "एखादा सामान्य चोर एकटा करतो,तीच गोष्ट एखादा मोठा योद्धा सैन्य घेऊन करतो.चोराहून वेगळे त्याच्यामध्ये काय आहे? एक लहान चोर, दुसरा मोठा चोर!"पण तेवीसशे वर्षांपूर्वी जेरुसलेमच्या राजाने जसे जेरेमियाच्या असल्याच शब्दांकडे दुर्लक्ष केले.तसेच चौदाव्या लुईनेही या शब्दांकडे दुर्लक्ष केले.लढवय्ये वीर अजून शांतिदूतांची भाषा ऐकण्यास उत्सुक नव्हते. चौदाव्या लुईने १७०७ पर्यंत आपली विजययुद्धे चालविली होती.त्याने थोडासा नवीन प्रदेश मिळविला. पण त्यासाठी स्वतःचे लाखो लोक बळी दिले!


चौदावा लुई मोठा श्रद्धाळू कॅथॉलिक होता.तो प्रॉटेस्टंटना छळी.त्याने कित्येकांना हद्दपार केले.दरसाल गुडफ्रायडे दिवशी बारा दरिद्री लोकांना बोलावून तो त्यांचे चरण प्रक्षाळी व मग वर्षाचे उरलेले ३६४ दिवस तो त्यांना उपाशी मरू देई.


बाहत्तर वर्षे राज्य करून लुई १ सप्टेंबर १७१५ रोजी मेला.क्षुद्र व साध्या गोष्टींतही कृत्रिमतेने कसे वागावे,हे त्याने दरबारी लोकांना शिकवले होते.त्याने दरबारी लोकांत कृत्रिमतेची कलावृत्ती निर्मिली,तर प्रजेत अनियंत्रित राज्यसत्तेविरुद्ध चीड उत्पन्न केली.

तिचेच पुढे पाऊणशे वर्षांच्या अल्पावधीत फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये पर्यवसान झाले…समाप्त


४/१/२६

५.५ कार्बनी संयुगं / 5.5 Organic compounds

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम (लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी) हा सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही गोष्टींना लागू होतो,हे आता सर्वमान्य झालं होतं. याचाच अर्थ शेकोटीतली लाकडं आणि सजीव प्राणी हे दोघंही ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय ऑक्साइड निर्माण करतात.त्याचप्रमाणे विश्वातल्या सगळ्याच सजीव आणि निर्जीव गोष्टी या एकाच पदार्थापासून तयार झालेल्या आहेत असाही विचार आता पुढे यायला लागला होता.


आपल्याला दिसणारे समुद्र,जमीन आणि हवा हे घटक तर अनेक शतकांपासून न बदलणारे आहेत. पाणी तापवलं तर त्याची वाफ होते,पण वाफ थंड झाली की तिचं पुन्हा पाणी होतं.धातू वितळवता येतात आणि ते पुन्हा स्थायू रूपातही आणता येतात.म्हणजेच या क्रिया रिव्हर्सिबल आहेत.पण सजीवांपासून निर्माण झालेले साखर,कागद,तेल असे पदार्थ एकदा तापवले,जाळले किंवा त्यांच्यावर काही प्रक्रिया केल्या तर ते पदार्थ जळून जातात आणि पुन्हा त्यांच्या मूळ रूपात येत नाहीत.हाच तर सजीवांमधल्या आणि निर्जीवांमधल्या घटकांमध्ये फरक असेल का? सजीव आणि निर्जीव सारख्याच मूळ मूलद्रव्यांपासून (इलिमेंट्स) निर्माण झालेले असले तरी सजीव आणि निर्जीव यांचे मूळ घटक (म्हणजे संयुगं / कंपाऊंड्स) हे वेगळे असावेत का?


स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉन्स जॅकॉब बर्झेलियस (Jons Jakob Berzelius) (१७७९ ते १८४८) यानं या प्रश्नावर बराच विचार केला.बझेलियस हा वैज्ञानिक रसायनशास्त्रामध्ये रॉबर्ट बॉइल,जॉन डाल्टन आणि लव्हायेजे या वैज्ञानिकांच्या तोडीचा मानला जातो.रसायनशास्त्राचा पाया घालणाऱ्या वैज्ञानिकांपैकी तो महत्त्वाचा वैज्ञानिक होता.त्याला 'फादर ऑफ स्वीडिश केमिस्ट्री' असंही म्हणतात. लहान असतानाच बर्झेलियसचे वडील वारले.ते शाळेत शिक्षक होते.नंतर आईनं दुसरं लग्न केलं. तेव्हा सावत्र वडिलांनी बर्झेलियसला विज्ञान शिकवलं आणि त्याबद्दल गोडी लावून दिली.


मोठा झाल्यावर बर्झेलियस मेडिकल स्कूलमध्ये गेला.तिथे तो कार्ल शीलचे प्रयोग पुनःपुन्हा करून पाहत असे.यादरम्यान त्यानं अनेक नामवंत रसायनतज्ज्ञांच्या हाताखाली काम केलं आणि धातू, वायू, द्रव,अ‍ॅसिड,अल्कली,पाणी आणि काच या सगळ्या पदार्थांचे गुणधर्म शिकून घेतले.हे सगळं करताना त्यानं प्रामाणिकपणे अभ्यास करून खूप मेहनतीनं ज्ञान मिळवलं होतं.आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं मेडिकल प्रॅक्टिस सुरू केली.पण त्यापेक्षा त्याला रसायनशास्त्रात जास्त रस वाटत होता.त्याचे आपले स्वतःचे प्रयोग चालूच होते. इंग्लंडमध्ये जाऊन त्यानं हंफ्रे डेव्ही,जेम्स वॉट, थॉमस यंग,विल्यम हर्षेल याही नावाजलेल्या वैज्ञानिकांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या होत्या.


सजीवांपासून मिळालेल्या पदार्थांना ऑर्गेनिक सबस्टन्स म्हणावं आणि निर्जीवांपासून मिळालेल्या पदार्थांना इनऑर्गेनिक सबस्टन्स म्हणावं असं १८०७ मध्ये सुचवलं.

इनऑर्गेनिक पदार्थ हे ऑर्गेनिक पदार्थांपासून निर्माण करणं शक्य आहे, पण त्या उलट म्हणजे इनऑर्गेनिक पदार्थांपासून ऑर्गेनिक पदार्थ मिळवणं हे कोणत्याही सजीव मध्यस्थाशिवाय अशक्य आहे असं त्यानं सुचवलं.


इनऑर्गेनिक पदार्थांपासून ऑर्गेनिक पदार्थ तयार करण्यासाठी जी ऊर्जा किंवा जे बल लागतं ते फक्त जिवंत ऊतींमध्येच असतं असंही त्यानं सांगितलं होतं.पुढे त्यानं रसायनशास्त्रात इतरही अनेक शोध लावले.त्याच्या शोधांबद्दल त्याला रॉयल सोसायटीनं कॉपले मेडलही दिलं होतं. हे सगळं करताना त्याला लग्न करायला आणि आपलं कुटुंब वाढवायला वेळ नाही मिळाला.शेवटी वयाच्या ५६ व्या वर्षी १८३५ साली त्यानं एका स्वीडिश कॅबिनेट मंत्र्याच्या २४ वर्षीय एलिझाबेथ पॉपियस नावाच्या मुलीशी लग्न केलं. पण त्या आधीपासूनच त्याला गाऊटच्या आजारानं गाठलं होतं.त्यातच त्याचा नर्व्हज ब्रेक डाऊन झाला. त्याला कधीकधी नैराश्याचे झटकेही यायचे. ७ ऑगस्ट १८४८ साली त्याचा मृत्यू झाला.


पुढे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सजीवांच्या शरीरात तयार होणाऱ्या रसायनांचा अभ्यास पुढे गेला.प्रयोगशाळेत आणि कारखान्यांमध्ये कृत्रिमरीत्या ऑर्गेनिक कंपाऊंड्स तयार व्हायला लागले.आणि ऑर्गेनिक पदार्थ कशाला म्हणायचं या प्रश्नानं पुन्हा डोकं वर काढलं, त्यानंतर कार्बनी संयुगांच्या रसायनशास्त्राला ऑर्गेनिक केमिस्ट्री म्हटलं जायला लागलं आणि कार्बन नसलेल्या संयुगांच्या रसायनशास्त्राला इनऑर्गेनिक केमिस्ट्री म्हटलं जायला लागलं.आता याचा सजीव आणि निर्जीवांशी काहीही संबंध राहिला नाही.


एकोणिसाव्या शतकातल्या रसायनशास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत तयार केलेली ऑर्गेनिक संयुगं त्या मानानं साधी होती.पण सजीव टिश्यूमध्ये अजूनही इतर इतकी अनेक गुंतागुंतीची रसायनं होती,की ती कृत्रिमरीत्या तयार करता येतील असं एकोणिसाव्या शतकातल्या वैज्ञानिकांना वाटतच नव्हतं.

ऑर्गेनिक संयुगं ही आपल्याला कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत तयार करता येणार नाहीत असं सगळ्यांना वाटत असतानाच,

बर्झेलियसचा सहायक आणि लायबिग या वैज्ञानिकाचा मित्र असलेल्या व्योलर यानं चक्क २२ फेब्रुवारी १८२८ रोजी आपल्याला इनऑर्गेनिक पदार्थांपासून ऑर्गेनिक पदार्थ बनवणं शक्य आहे आणि मी आताच काही इनऑर्गेनिक रसायनांपासून युरिया हे ऑर्गेनिक रसायन तयार करण्यात यशस्वी झालो आहे असं कळवलं आणि त्यानं खरंचच इनऑर्गेनिक पदार्थांपासून युरिया तयार केला होता. 


यातून त्यानं आपण कृत्रिमरीत्या इनऑर्गेनिक पदार्थांपासून ऑर्गेनिक पदार्थ बनवू शकत नाही हा समज तर खोडून काढलाच,पण त्याचबरोबर त्यानं अनेक कृत्रिम रसायनं तयार करण्यासाठी आश्वासक दिलासा दिला.यानंतर कृत्रिम रंग,अत्तरं आणि चक्क प्लॅस्टिकपर्यंत माणसानं मजल मारली ती यामुळेच ! आता सजीवांच्या शरीरातल्या संयुगांना ऑर्गेनिक संयुगं म्हणतात आणि ती आकारानं खूप मोठी आणि क्लिष्ट (कॉम्प्लेक्स) असतात यावर आता शंका घेण्यासारखं काही उरलं नव्हतं.याही संयुगांचे पुढे तीन गट झाले.त्यांना आता बायोमोलेक्युल्स म्हणू या.त्यात विल्यम प्राऊट (William Prout) (१७८५ ते १८५०) नावाच्या वैज्ञानिकानं खूपच महत्त्वाचं संशोधन केलं आहे.सजीवांमध्ये होणाऱ्या पचन आणि चयापचय यांच्या संशोधनासाठी आणि रसायनशास्त्रातल्या मूलद्रव्यांच्या ऑटोमिक वेट वरच्या संशोधनासाठी ओळखला जातो.


प्राऊट हा एडिंबरो विद्यापीठातून डॉक्टरकीची पदवी घेऊन बाहेर पडला होता.तो पचनाच्या आणि मूत्रविकारांवर चांगले उपचार करण्यासाठी प्रसिद्ध होता. १८१५ ते १८२७ या दरम्यान त्यानं फिजिओलॉजीमध्ये बरंच संशोधन करून अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले.प्राण्यांच्या गॅस्ट्रिक ज्यूसेस (जाठररस) मध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड असतं,त्यामुळे पचन ही रासायनिक क्रिया आहे.हे सांगणारा प्राऊट हा पहिलाच होता.त्यानंच युरीनमधून पहिल्यांदा युरिया वेगळा केला होता. पुढे त्यानं युरिनरी आणि डायजेस्टिव्ह पॅथॉलॉजीवरही एक पुस्तक लिहिलं होतं.


पण या सगळ्यांपेक्षाही महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे प्राऊटनं सजीवांमध्ये सापडणाऱ्या या संयुगांची काबर्बोहायड्रेट्स,

प्रोटीन्स आणि लिपिड्स अशा गटांत विभागणी केली.

साखर,स्टार्च,सेल्युलोज असे पदार्थ कार्बोहायड्रेट्समध्ये येत होते.कार्बोहायड्रेट्स हे कार्बन,हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांपासून तयार होत होते.


सजीव,अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे, मधुश्री पब्लिकेशन


दुसरा प्रकार,लिपिडही असाच कार्बन,हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच मूलद्रव्यांपासू तयार होत होता.पण या गटात सगळी तेल येत होतं. कार्बोहायडेट्समध्ये लिपिडापेक्षाऑक्सिजनचं प्रमाण जास्त होतं आणि कार्बोहायडेट्स ही काही प्रमाणात तरी पाण्यात विरघळत होती.लिपिड्स पाण्यात अजिबात विरघळत नव्हती.


आणि तिसरा प्रकार म्हणजे प्रोटीन्स हे कार्बोहायडेटस आणि लिपिड्स यापेक्षा बरेच गुंतागुंतीचे होते.प्रोटीन्समध्ये कार्बन,हायड्रोजन आणि ऑक्सिजनशिवाय नायट्रोजन आणि सल्फर ही मूलद्रव्यंही होती.ते साधारणपणे पाण्यात विरघळत होते पण तापवल्यावर त्यांच्या गुठळ्या (कोॲग्युलेट) होत होत्या.सुरुवातीला प्रोटीन्सना अल्ब्युमिन्स हे नाव दिलं होतं.कारण अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये (एग व्हाइट) मिळणारं प्रथिन हे सहजपणे उपलब्ध होणारी गोष्ट होती आणि लॅटिनमध्ये त्याला अल्ब्युमिन म्हणतात.


१८३८ मध्ये डच रसायनशास्त्रज्ञ गेरार्ड जोहानेज मल्डर (Gerardus Johannes Mulder) (१८०२ ते १८८०) यानं या अल्ब्युमिनस पदार्थांचं महत्त्व ओळखलं आणि त्यांना ग्रीक भाषेत खूप महत्त्वाचा किंवा अग्रक्रमाचा या अर्थाचा असणारा प्रोटीन हा शब्द आपल्या शोधनिबंधात पहिल्यांदाच वापरला. बहुतांश प्राणी आपल्याला लागणारं प्रोटीन हे वनस्पतींपासूनच घेतात हे त्यानं सांगितलं होतं. पण नंतर प्राणी हे वनस्पतींपासून मिळालेल्या प्रोटीनचं आपल्या शरीरात अमायनो अ‍ॅसिड्समध्ये रूपांतर करतात आणि मग त्यापासून पुन्हा आपल्याला हव्या त्या प्रोटीनमध्ये रूपांतर करतात हे नंतर कळलं.त्यानं पुढे अल्ब्युमिन,केसिन आणि फायब्रिन या प्रोटीन्सवर काम करून प्रोटीन्सचे रासायनिक गुणधर्म काय असावेत याबद्दलही लिहून ठेवलं होतं.


ऑर्गेनिक केमिस्ट्रीचं वाढतं ज्ञान आता पुन्हा सजीवांची उत्क्रांती कशी झाली असावी या प्रश्नाचंही उत्तर शोधायला मदत करत होती.कारण सगळ्याच प्रकारच्या सजीवांमध्ये कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि प्रोटीन्स हीच तीन मूळ रसायनं किंवा संयुगं आढळत होती.अर्थात, यात बारीकसारीक बदल होते,पण मुख्य घटक हेच होते हे मात्र निश्चित.यातूनच पुढे रसायनशास्त्रज्ञांना या कार्बोहायड्रेट्स,

लिपिड्स आणि प्रोटीन्स ही रसायनं त्यांच्या मूळ बिल्डिंग ब्लॉकमध्ये रूपांतरित करता येतात हेही लक्षात आलं.म्हणजे असं की कोणतंही कार्बोहायड्रेट हे त्याच्या मूळ साखरेत,

लिपिड हे त्याच्या मूळ फॅटी अ‍ॅसिडमध्ये आणि प्रोटीन त्याच्या मूळ अमायनो अ‍ॅसिडमध्ये रूपांतरित करता येतं,हे आता लक्षात आलं होतं. या मूळ पदार्थाना बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतात.आणि एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो किंवा वनस्पतिजन्य पदार्थ खातो. मग पचनाच्या प्रक्रियेमध्ये त्या प्राण्यानं खाल्लेले कार्बोहायड्रेट्स,लिपिड्स किंवा प्रोटीन्स मूळ बिल्डिंग ब्लॉक्समध्ये सुटे होतात आणि नंतर पुन्हा हव्या त्या प्रकारामध्ये बांधले जातात


या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्या प्रकारचे सजीव वेगवेगळे दिसत असले तरी रासायनिकदृष्ट्या एकच आहेत असा एक दृष्टिकोन तयार व्हायला लागला. त्यामुळेच उत्क्रांतीमध्ये एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होणं शक्य आहे असंही आता वाटायला लागलं होतं. यातून आता उत्क्रांती ही संकल्पना मूळ धरायला लागली होती.


हा भाग संपला…!



२/१/२६

नक्षत्रांचे देणे / Giving of Nakshatras

माझ्या भावरम्य आठवणी उंच डोंगरावरून दिसणारे नक्षत्रांनी भरलेले निळे आभाळ आणि त्यात विरून जाणाऱ्या समुद्र गाजाविषयीच्या आहेत.अगदी लहान होतो तेव्हापासून पावसाळा वगळता,मी नक्षत्रांखालीच झोपलोय.त्या वेळी मला माहीत नव्हते की,नक्षत्रेदेखील आवाज करतात. सारे आभाळ त्या ध्वनीने निनादून जाते.


वन्य प्राण्यांची शिकार सोडून भंडारीत राहणारा निरगू गोंड जंगलातल्या कंदमुळे व फळांवरच गुजराण करीत होता,

झोपडीसमोरच्या आगोट्याजवळ बाज टाकून आभाळातल्या नक्षत्राकडे पाहात तो झोपी जायचा.तेव्हा त्याने सांगितले की नक्षत्रे रात्रभर शिकार करीत असतात आणि त्याला त्यांच्या शिकारीच्या वेळचा 'छा,छौ' असा आवाज ऐकू येतो.


जंगलाचे देणं,मारुती चितमपल्ली, प्रकाशक - साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर


हा आवाज मला लहानपणापासून माहीत होता. नंदीवाला,

वैदू व पारधी आपली कुत्री घेऊन माळरानात शिकार करताना पाहिली आहेत.त्या वेळी झुडपे आणि गवतात लपलेले सावज शोधून काढण्यासाठी कुत्र्याला 'छा' म्हणताच तो आपले कान टवकारायचा.डोळे चमकवायचा.नाक जमिनीला हुंगत आणि 'छौ' म्हणताच तो चपळतेने शिकारीचा मागोवा घेऊ लागायचा.


मला नेहमीच आश्चर्य वाटायचं की जगभर रूढ असलेल्या ह्या शब्दाचे मूळ कोठे असावं ! माझ्या अनेक शिकारी मित्रांना या आवाजाविषयी विचारले.आता मला समजलं त्या आवाजाचं मूळ आदिवासींमध्ये आहे.आणि आदिवासी व कुत्र्यांना तो आवाज थेट नक्षत्रापासून मिळालाय.


ताऱ्यांच्या समूहाला नक्षत्र म्हणतात.हे तारे रेषांनी जोडले की त्याचे एक काल्पनिक चित्र तयार होते.हे चित्र कोणी पक्ष्याचे,

कोणी जनावराचे,कोणी माणसाचे,असे आपापल्या कल्पनेनुसार मानतात. त्या अनुषंगाने त्या तारकापुजाला नाव दिले जाते. नक्षत्रांची बरीच नावे पशु-पक्ष्यांची आहेत.


नक्षत्र उदयाला येते त्या काळाचा संबंध प्राण्याच्या आचरणाशी आहे की काय हा माझ्या संशोधनाचा विषय आहे.त्या अनुषंगाने जंगलात राहणाऱ्या अनेक आदिवासींना मी भेटलोय,त्यांच्याबरोबर नक्षत्रांविषयी बोलताना रात्र-रात्र जागलोय.पण प्रत्येक वेळी त्यांनी नवनवीन माहिती दिली.ती कुठल्याही ग्रंथात माझ्या तरी वाचण्यात आली नाही.नुकताच नाशिक जिल्ह्यातील पेठ,हरसूल व सुरगाणा ह्या जंगलात राहणाऱ्या कोकणा,वारली व कोळ्यांना भेटलो.माझा मुक्काम पेठच्या वनविश्रामगृहात होता.तो बांधून आता ५०-६० वर्षे झाली असावीत.निरोप पाठविल्याप्रमाणे आवारी गुरुजी तिथं माझी वाट पाहातच होते.अहोरात्र जंगलात राहणाऱ्या ह्या माणसानं पशु-पक्ष्यांचा अभ्यास केलाय.लोकगीते गोळा केली आहेत.


विश्रामगृहासमोरच्या माळावर उभे राहिले की, समोर अप्रतिम देखावा दिसतो.सह्याद्री पर्वताच्या एकामागून एक दिसणाऱ्या निळ्या रांगा शेवटी क्षितिजात विलीन होतात.त्यावरची हिरवी वने, पाचूसारखे दिसणारे माळ,पश्चिमेला उद्ध्वस्त गढीचे अवशेष आणि त्यावर बिजेची चंद्रकोर.ही चंद्रकोर दिसावी म्हणून तर कुणा रसिकानं ती गढ़ी तिथं बांधली नसेल ना! मी त्या सुंदर चंद्रकलेकडे पाहात राहिलो.जिकडे-तिकडे एक अद्भुत गूढ शांतता.अंधार पडू लागला तशी समोरच्या माळावरील वाघोली गावातील दिव्यांची माळ दिसू लागली.

विश्रामगृहाच्या व्हरांड्याचा मध्यभाग जरा वाढवून तिथे षट्‌कोनी पागोड्याचे छप्पर केलेले आहे.तिथल्या वेताच्या खुर्चीवर बसून आवारी गुरुजी व मी समोरच्या नक्षत्रांविषयी बोलत होतो. मी विचारलं,


'गुरुजी, नक्षत्रांची नावं एकतर पशू,पक्षी किंवा शिकारी आणि निसर्गातील घडामोडींशी संबंधित आहेत.असं का ? त्या प्राण्याचं आणि निसर्गाचं नक्षत्रांशी काय नातं असावं?'


'साहेब,असा संबंध असेलही पण त्याविषयी मी कधी विचार केला नाही.'त्यांच्या विचाराला चालना देण्यासाठी मी म्हणालो-


'मृग नक्षत्र हा हरीण वर्गातील प्राण्यांचा विणीचा काळ.'


'होय साहेब,आता आलं माझ्या ध्यानात.आर्द्राला आम्ही आदिवासी आडदरा म्हणतो.उन्हाळ्यात दिसणाऱ्या दऱ्या पावसाळ्यात मात्र नजरेआड होतात.त्या जणू लपून राहतात.

जिकडे तिकडे हिरवेगार होते.खराट्यासारख्या दिसणाऱ्या झुडपांना पालवी फुटते.भूमीतील कंदांच्या पानांची लवलव दिसू लागते.पालवलेली झाडं आंघोळ केल्याप्रमाणे स्वच्छ दिसू लागतात आणि खोरी हिरवळीचा आल्हाददायक आकार घेऊन उभ्या राहतात.'


'अन् पुनर्वसूला काय म्हणतात?' मी.


'आम्ही राजकुवर- म्हणजे राजपुत्र म्हणतो.ह्या नक्षत्राचा पाऊस झाला तर चांगला पडतो.नाही तर नाहीच.एखाद्या राजविशी म्हणजे राजकुमाराच्या लहरीप्रमाणे !


तर पुष्य म्हणजे कुलीम कुवर.कुलीम म्हणजे शेती.शेतीलायक पाऊस पडल्यामुळे कुणब्याच्या कुवराना-मुलाबाळांना आनंद होतो.ती आनंदानं नाचत बागडत असतात.'


त्यानंतर येतो आसलक - आश्लेषा.ह्या नक्षत्राचा पाऊस चांगलाच आसडून पडतो.पण तो कसा? थोडा वेळ.आम्ही इरले वा पाणघोंगडं अंगावर घेतो त्या वेळी पावसाचा घडवड आवाज येतो आणि पडतो न पडतो तोच बंद होतो. पुन्हा इरलं काढून बाजूला ठेवावं लागतं.'


मघा नक्षत्रात तर खूप पाऊस पडतो.नाही तर उघाड असते.

डोंगरावर टेकलेले आभाळ उंच जातं.त्यातून बगळे उडू लागतात.


मचा तर मघा


नाही तर बघा


निघतील बगा.


बगा म्हणजे बगळे.'मग पूर्वेकडून पावसाला सुरुवात होते.पण पावसाची झड इतक्या जोरात येते की, थोड्या वेळातच ओहोळ,नदी व नाल्यांना पूर येतो. म्हणून ते पूर्वा नक्षत्र.'


'पावसाच्या सुरुवातीला विणीच्या ओढीनं प्रवाहाच्या उलट दिशेनं छलांग मारीत गेलेले मासे आणि खेकडे वाहणाऱ्या शांत प्रवाहाबरोबर आपल्या पिलाबाळांसह खाली उतरू लागतात. म्हणून ते उत्तरा नक्षत्र.'


हस्त-चित्राला आम्ही हत्ती-चित्ता म्हणतो.पहाडात उंच गवत वाढतं आणि अधूनमधून होणाऱ्या वादळी पावसानं छातीएवढं वाढलेलं उंच गवत जमिनीवर आडवं होतं.वाटतं की त्यावर हत्ती लोळला आहे.चित्ता बरसला की चित्तिणीला पिलं होतात.नर चित्ता तसा क्रूरच.बोक्याप्रमाणे तोही चित्तिणीची पिलं खातो.त्याच्या भीतीनं चित्तीण माणसाच्या वस्तीजवळच्या झुडपी जंगलात आसरा घेते.तिथं कधी डुकरांची पिलं तर कधी सशांवर पिलांना पोसते.अधूनमधून गावातील एखादी शेळी किंवा वासरू मारायलादेखील भीत नाही


'स्वातीला स्वहाती म्हणतो.'


न समजून मी विचारलं,


'म्हणजे काय ?'


'देवाचे हात देवाची करणी अन् नारळात पाणी,तसं पेठजवळ असणा-या दमण नदीवरील पापड पातळ डोह,मालेगाव पिंपळनजीक शिंबर चोंड नाला आणि मोहपाडाजवळील जोळदा डोहाकाठच्या वाळूत शिंपला व शिंपी दि लागतात.'


'गुरुजी, म्हणजे त्यात नर-मादी असतात की काय?'


'होय,शिंपला नर असतो.तर मादीला शिंपी म्हणतात.'


'नर व मादीत ओळखण कशी?' मी.


'सांगतो,शिंपला हा थोडासा चौकोनी.त्याला कोपरे असतात.शिंपी आकारानं दीर्घ वर्तुळाकार असते.'


'मोती शिंपल्यात तयार होतो की शिंपीत ?'


'शिंपल्यात.त्या वेळी काहीशी उन्हें पडलेली असतात.शिंपले व शिंपीत जीव असतो.ती डोहातून काठावरच्या वाळूत येतात.अचानक पावसाचे थेंब पडतात त्या वेळी ज्या शिंपल्यांची तोंड उघडी असतात त्यात पावसाचे थेंब पडून त्याचा मोती होतो.शिंपल्यात अंड्यातल्या बलकासारखा द्रव असतो.त्यात लिबलिबीत अशी गोळी असते. मोत्यासाठी शिंपल्या गोळा करणारा कोळी ती गोळी काढून चटकन आपल्या तोंडात टाकतो. थोड्या वेळानं ती गोठते.नंतर ती बाहेर काढतो.पूर्ण टणक व्हायच्या आत सुई टोचून त्याला छिद्र पाडतो.ह्या भागात तुरीएवढ्या आकाराचे मोती मिळतात.सर्वच शिंपल्यात मोती तयार होत नाहीत. देव आपल्या हातांनी एखाद्याच शिंपल्यात मोती निर्माण करतो.'


'कार्तिक महिन्यात एखाद्या वर्षी विशाखा नक्षत्रात शेताच्या बांधातून उंदराची खूप पिलावळ जन्माला येते.उंदीर त्या वर्षी शेतातील पिकाची नासाडी करतात.असं होतं न होतं,तोच मांजऱ्या म्हणजे मार्गशीर्ष नक्षत्रात मांजराची बरीच वीण होते आणि ही मांजरे शेतीची नासधूस करणाऱ्या उंदरांच्या संख्येचं नियंत्रण करतात.जणू काय मांजराच्या धाकानं उंदीर निघून जातात.'


'रोहिणी नक्षत्रात रोही- म्हणजे नील गाईला पिलं होतात.रोहित म्हणजे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे स्थलांतर करून तळ्यावर उडताना दिसू लागतात.


रेवती नक्षत्रात रातवा पक्षी चिकूर चुक्-चिकूर चुकू करून एकमेकांना साद पालतात.हा त्यांचा घरटी करून अंडी घालण्याचा हंगाम.कोकण भागात ह्या पक्ष्याला अतिशय समर्पक सुंदर नाव आहे.'


"कोणतं?'


रेवती.'


'खरंच किती छान आहे नाव.'


समाप्त..।



३१/१२/२५

शंकर  / Shankar

फक्त वाड्यातल्या माईंना सांगेन इतर कुणालाच सांगणार नाही'असं सांगून शंकरने तिचा कसा होता तसा तिला परत करत तिची बोळवण केली.


यशाच्या गावात पाण्याचा मोठा दुष्काळ.शेटजींच्या पूर्वजांनी गावाबाहेर बांधलेल्या तलावातलं पाणी आटून तलाव आता कोरडा झाला की,गावातल्या विहिरी आणि आडही आटायचे.त्यामुळे वर्षभर वाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आडाचं पाणी कमी होऊन खारं व्हायचं.मग पिण्याच्या पाण्याचे हाल व्हायचे.

पाण्याच्या ह्या त्रासामुळे वार्षिक परीक्षा आटोपल्यावर माई-बापू मुलांना दोन महिन्यांसाठी ठाण्याला थोरल्या अशोककडे घेऊन जात.कधी कधी मंदा-मुक्ताच्या परीक्षा बापू शाळेतल्या मास्तरांना सांगून लवकर आटोपून घेत असत.


मुलांचं ठाण्याला जाणं म्हणजे मोठीच प्रोसेस असायची. नेहमीच्या सवयीप्रमाणे माई भाजणी-मेतकूट-सातूच्या पिठापासून सगळं बरोबर घ्यायच्या.कपड्यांचे-अंथरुणा-पांघरुणाचे जड डागही असत.अशावेळी शंकरचा रोल खूप महत्त्वाचा असायचा.पॅकिंगचं काम शंकर करायचा.बापूंच्या ओसरीवरच्या सतरंजीत बरंचसं सामान 'होल्डऑल' सारखं बांधून शंकर ते चहाटाने घट्ट बांधायचा.

हे करताना वळकटीवर बसून ताकदीने चाट बांधणारा घामाघूम शंकर पाहून यशाला नेहमी तालमीतल्या हौद्यात झटापट करणाऱ्या पहिलवानांची आठवण होत असे.जाण्याचा दिवस ठरला की,बापू शंकरला दररोज वेळेवर येण्याची आठवण करून द्यायचे.स्टेशन गावापासून साडेचार मैल दूर होतं.सगळं सामान बाबूच्या तांग्यात बसवून त्यावर आडणीवरच्या शंखासारखं मुलांना बसवायचं काम बाबू तांगेवाल्याच्या मदतीने शंकरच करी.


एका वर्षी नेहमीप्रमाणे मंडळी ठाण्याला जायला निघाली.शंकर पोहचवायला म्हणून आलाच होता.त्याने त्याची सायकल दुरुस्तीला टाकल्याने तो भाड्याची सायकल घेऊन स्टेशनपर्यंत आला होता.माई शंकरला सहज म्हणाल्या,"अरे शंकर,इथे तू होतास म्हणून बरं झालं.आता मनमाडला मात्र आमची फार धावपळ होणार!"


"तर मग मनमाडपर्यंत येतो ना!" म्हणत शंकर गाडीत चढलादेखील.तो असल्यामुळे मनमाडला सगळ्यांचाच गाडीत प्रवेश सुखकर झाला.सगळ्यांना चढवत असताना शंकर अजून गाडीतच होता.त्यामुळे 'लवकर उतर,शंकरभाऊ,लवकर उतर' असा मुलांनी एकच गिल्ला केला.शंकर मात्र शांत होता.

म्हणाला,"आता मी ठाण्यापर्यंत येतो म्हणजे सामान उतरवायला तुम्हाला त्रास होणार नाही!"


शंकरचं बोलणं ऐकून बच्चेकंपनी खूश झाली.विशेषतः यशा.

त्याच्या गप्पांमुळे भुसावळ पॅसेंजरचा तो कंटाळवाणा प्रवास आता सुखकर होणार होता आणि झालंही तसंच.गप्पांची मैफल जमली.

आजूबाजूचे सहप्रवासीही शंकरचं बोलणं उत्सुकतेने ऐकत होते. विषयांवर विषय निघत गेला अन् शंकरने वाड्यातल्या मारवाडी भाडेकरूंची गंमत सांगायला घेतली.


वाड्यात राहणारं हे मारवाडी कुटुंब किमान पंचवीस जणांचं भक्कम कुटुंब होतं.चार भाऊ आणि त्यांची कुटुंबं गुण्यागोविंदाने राहत होती.त्यांची स्वतःची एकूण मुलंच दहाबारा होती.त्याशिवाय शिकायला म्हणून खेडेगावातून आलेली नातेवाईक मुलं वेगळीच. शंकरकडे केस कापायला म्हणून त्यांची फेरी महिन्यादोनमहिन्यांनी व्हायची.सगळ्या मुलांच्या कटिंगचा कार्यक्रम एकाच दिवशी व्हायचा.ह्या कुटुंबाचं गावात किराणामालाचं सगळ्यात मोठं दुकान होतं. चारी भाऊ त्यांच्या त्यांच्या सवडीनुसार गल्ल्यावर बसून मग कटिंग करायला येत.


दुसऱ्या दिवशी शंकर त्यांच्या किराणामालाच्या दुकानात चक्कर मारी.


"बाबाजी,कालच्या कटिंगचे पैसे ?"


बाबाजींनी डोकी तासलेली मुलं काल पाहिलेली असत. ते गल्ल्यातून शंकरला पैसे काढून देत.दोनचार तासांनी शंकर परत जाई.तोवर गल्ल्यावर दुसरा भाऊ बसलेला असे.


"मामाजी, कटिंगचे पैसे?"


गल्ल्यावर बसलेल्या भावाकडूनही शंकर पैसे घेई. एवढ्या मोठ्या दुकानाच्या पैशातून थोडे आपल्याला मिळाले तर त्यांना काय फरक पडतो अशी परत वर मखलाशी !


शंकरच्या गप्पा चालू असताना कोपऱ्यावरच्या दरवाजातून तिकिट-तपासनीस डब्यात शिरला.त्याला पाहून माई-बापूंसह सगळेच हादरले.कारण शंकरने आयुष्यात रेल्वेचं तिकीट काढलं नव्हतं.आताही नाही, हे सगळ्यांनाच ठाऊक होतं.

शंकर मात्र एकदम शांत होता.पण त्याचा एक डोळा तिकिट तपासनिसाच्या हालचालीवर होता.कारण तीनचार बेंचपलीकडे एका पंचवीसेक वर्षांच्या तरुणाला त्याने विदाऊट तिकीट पकडल्यावर शंकर विजेसारखा उठला.त्या तरुणाची कॉलर धरून त्याला उठवलं आणि दोनचार फटके दिले ठेवून.हे करताना त्याच्या तोंडाचा पट्टा जोरजोरात चालू होताच.


"हरामखोर साले.फुकटचा प्रवास करतात.लाजा वाटत नाहीत ह्यांना ! रेल्वेची सेवा पाहिजे पण त्याचे पैसे द्यायला नकोत.

सरकारने कुठून आणायचे ? एक प्रकारचे देशद्रोहीच आहेत हे!"


असं म्हणत शंकरने आणखी एक दणका त्याच्या पाठीत घातला.धिप्पाड शंकरचं हे रौद्ररूप पाहून त्या तरुणाबरोबरच तिकिट तपासनीसही गांगरला.तोच शंकरकडे त्या तरुणासाठी रदबदली करायला लागला.


"अहो,शांत व्हा.पुढच्या स्टेशनवर उतरेल तो आणि ह्यापुढे तिकीट काढून प्रवास करील.हो की नाही रे ?"


त्या तरुणानेही होकारार्थी मान हलवली.शंकर स्वतःच्या जागेवर येऊन बसला तरी तणतणतच होता. माई-बापूंसह सगळे त्याच्याकडे हतबुद्ध होऊन बघत होते.तिकिट-तपासनिसाने त्या सगळ्यांची तिकिटं तपासली पण शंकरला काही तिकीट विचारलं नाही. उलट त्याच्याकडे छान सुहास्य नजरेने बघत त्याला राम राम करून तो पुढे सरकला.


ठाणं आल्यावर शंकरने सामानासकट सगळ्यांना सुखरूप अशोकच्या हवाली केलं.अशोकच्या आग्रहास्तव त्याच्या घरी तो चार दिवस राहिला.त्याने भाड्याने घेतलेली सायकल गावच्या स्टेशनवरच राहिली होती.तिची मुलांनाच चिंता,

त्याबद्दल त्याला छेडलं तर म्हणाला,"एवढ्या छोट्याशा गोष्टीबद्दल विचार करून आजची मजा किरकिरी करायची नसते !अर्थात तिकीट नसताना रेल्वेत समोरून तिकिट तपासनीस येणं हेदेखील त्याला किरकोळ वाटतं तर भाड्याच्या सायकलचं काय ! ती तर खरंच फारच क्षुल्लक गोष्ट वाटत असणार त्याला.


शंकर ठाण्याला असताना अशोक आणि त्याच्या दोन लहान बहिणी उषा आणि विजू ह्यांनीसुद्धा ऑफिसला दांडी मारली होती.हे सगळे लहानपणचे सवंगडी.शंकर आल्यामुळे त्यांच्या रूटीनमध्येही त्यांना जरा चेंज झाला होता.एकदा माईंनी जेवताना त्याला वाढायचा आग्रह केला.त्यावरून गोष्ट निघाली.


शंकर सांगू लागला -


शंकरचा बालाजी नावाचा मामेभाऊ गावातच राहत होता.शंकरच्याच दुकानात कामही करत होता आणि बँडपथकात ड्रमदेखील वाजवत होता.बालाजी काही वर्ष मुंबईला राहिला होता. त्याला त्याच्या वागण्या-बोलण्यातून तसं दाखवून द्यायला आवडायचं.तसा त्याचा नेहमी प्रयत्न असायचा.


एकदा एका खेड्यात एका खूप मोठ्या बागाईतदाराच्या मुलाचं लग्न होतं.शंकर आणि बालाजी ज्या बँडपार्टीत होते त्यांना लग्न वाजवण्याची सुपारी मिळाली होती. त्या गावात जाताना बालाजी सगळ्यांसमोर थोड्याशा आढ्यतेने म्हणाला,


"असं श्रीमंतांच्या घरचं लग्न वाजवायचं म्हणजे माझ्यापुढे धर्मसंकट उभं राहतं.कारण मला गोड पदार्थ अजिबात आवडत नाहीत आणि जबरदस्तीने खावे लागले तर मळमळायला लागतं."


शंकरने ही गोष्ट लक्षात ठेवली.अर्थात बालाजी गोड पदार्थ आवडीने खातो हे शंकरला माहीत होतं.पण तो त्यावेळी मुद्दामच काही बोलला नाही.ठरल्याप्रमाणे बँडपथक लग्नाला गेलं.लग्नात आणि वरातीत बँड वाजवून झाल्यावर व्याह्यांच्या पंक्तीनंतर बँडपथकातली मंडळी जेवायला बसली.बँडवाल्यांवर खूश झालेले यजमान स्वतः जातीने वाढप्यांवर देखरेख करत होते. जेवणाचा बेत मोठा नामी होता.पंचपक्वान्नं होती. जिल्ह्यातले नामांकित आचारी स्वैपाकाला बोलावलेले होते.पंक्तीत मुद्दाम शंकर बालाजीच्या शेजारी बसला. एक एक वाढपी येऊन वाढायला लागला.पाकाने भरलेले मोठ्ठाले गुलाबजाम घेऊन वाढपी आला.ते पाहून बालाजीच्या तोंडाला चांगलंच पाणी सुटलं.वाढपी जवळ आला आणि शंकर स्वतःचं पान सोडून बालाजीच्या पानावर जवळजवळ आडवाच झाला आणि "अहो,ह्याला नका वाडू,हयाला त्रास होतो..." असं कळवळून सांगू लागला.


यजमान जवळ येऊन म्हणाले, "अहो,एक तरी चवीसाठी घेऊ द्या..." "अजिबात नको.गोड खाल्ल्यानंतर ह्याला मळमळतं.परत जेवण झाल्यावर आम्हाला एसटीने निघायचंय.प्रवासात त्रास नको व्हायला."


मिष्टात्र घेऊन येणाऱ्या प्रत्येक वाढप्याच्या वेळी शंकरने असाच प्रकार केला.


बालाजीच्या पानात भाजीपोळीशिवाय काहीच दिसेना. सगळ्यांची जेवणं होत आली.शेवटी बालाजीचा संयम संपला.तो शंकरच्या कानात अजीजीने म्हणाला,


"शंकरभाऊ,मला गोड आवडतं.आता वाढप्यांना थांबवू नको.त्या दिवशी हुशारी दाखवायला म्हणून तसं बोललो..."


त्यानंतर मात्र शंकरने वाढप्यांना अडवलं नाही. बालाजीला गोड खाऊ दिलं.


शंकर ठाण्याला असताना गप्पांच्या ओघात हरीचा विषय निघाला.हरी यशाच्या नात्यातलाच होता आणि ठाण्यातच राहत होता.साधारण अशोकच्याच वयाचा असल्याने तो गप्पा मारायला घरी येत असे.हरी स्वभावाने चांगला होता.पण त्याला कुठलीही गोष्ट जरा वाढवून-चढवून सांगायची खोड होती.अशोक हरीचा उल्लेख 'नव्याण्णवबादी' असा करायचा.म्हणजे हरीच्या नव्याण्णव गोष्टी आपण बाद धरायच्या आणि एकच गोष्ट खरी मानायची.


हरी आपण कसे शूर आहोत,कधीच कुणाला कसे घाबरत नाही,प्रसंगावधानी तर कसे नंबर एकचे आहोत हे छाती फुगवून सांगत असे.हरी मूळचा नासिकचा. तिथे त्याच्या हातून एक अतिशय किरकोळ गुन्हा झाला होता.एवढी एक गोष्ट माहीत असणं शंकरला पुरेशी होती.तो अशोकला म्हणाला,


"आज रात्री आपण हरीकडे जाऊ या.मी त्याच्या सगळ्या फुशारक्या बाहेर काढतो!"


रात्री शंकर,अशोक,उषा आणि विजू हरीच्या खोलीवर गेले.त्या तिघांना बाहेरच उभं करून शंकर एकटाच आत गेला.आत जाताच शंकरने हरीची गचांडी पकडून थोडी हिसडली आणि तो आवाज चढवून म्हणाला,


"नासिकला गुन्हा करून इथे येऊन लपून बसलास काय? पोलीस म्हणजे कोण वाटले ?आमचे हात फार लांब असतात.आमच्या पंजातून कुणीच सुटू शकत नाही!"असं म्हणून शंकरने आपल्या राकट हाताने हरीचं मनगट गच्च पकडलं.


ह्या अचानक हल्ल्याने हरी बावचळला.तो शंकरला ओळखत नव्हता.खराच पोलीस आपल्या दारावर आला आहे असं वाटून तो चांगलाच घाबरला.अगदी रडकुंडीला येऊन गयावया करायला लागला.


"शेजाऱ्यांना पोलीस आले म्हणून कळेल,हळू बोला हो..." म्हणून विनवण्या करायला लागला.तेव्हा शंकरने त्या तिघांना हाक मारून आत बोलावलं.तेव्हापासून हरीने ह्या तिघांपुढे कधीही बढाया मारल्या नाहीत.


यशाच्या गावाजवळच अनकाईचा किल्ला आहे.गडावर जागृत शंकराचं देवस्थान आहे.श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तिथे मोठी जत्रा भरते.यशा पाचसहा वर्षांचा असतानाची गोष्ट.गल्लीतल्या बरोबरीच्या सगळ्या मुलांनी घरच्यांच्याबरोबर कधी ना कधी अनकाईच्या यात्रेला हजेरी लावलेली होती.एकटा यशाच राहिला होता.ना त्याने अनकाई पाहिली ना अनकाईची जत्रा. त्यामुळे मुलं त्याच्यासमोर मुद्दामच यात्रेचं रसभरीत वर्णन करीत.तसतशी अनकाईला जाण्याची यशाच्या मनातली आस वाढत असे.


एका श्रावणी सोमवारी शंकर अनकाईला जाणार असल्याचं समजल्यावर यशा त्याच्यामागे लागला. सुरुवातीला शंकरबरोबर पाठवायला माई तयारच नव्हत्या.


"शंकर,तू सतरा पिंपळावरचा मुंजा ! तुला पावलापावलावर ओळखीचे लोक भेटणार.तुझं यशाकडे लक्ष राहणार नाही.त्यात यशापण थोडासा वांड.त्यामुळे तुझ्याबरोबर पोराला पाठवायला माझं मन काही धजावत नाही..."


"माई,तुम्ही काही काळजी करू नका.मी यशाला फुलासारखा जपेन." अशी शंकरने माईंना पुन्हा पुन्हा खात्री दिल्यानंतर अखेर माई यशाला शंकरबरोबर पाठवायला राजी झाल्या.


सकाळी सकाळी यशा,शंकर आणि बालाजी एसटीने अनकाईला निघाले.जाताना उत्साहाच्या भरात यशा त्या दोघांबरोबर झपाझप चालत होता.मात्र गडावर जाईपर्यंत तो थकून गेला.वरती गेल्यावर देवाचं दर्शन घेतलं आणि मग शंकर-बालाजीबरोबर तो उत्साहाने यात्रेत भटकला.खाली जायची वेळ झाली तोपर्यंत दुपारचं ऊन खूप चढलं होतं.आता यशाला एक पाऊल उचलणंही जड जाऊ लागलं.त्याने शंकरभाऊला सांगितलं,


भाऊ,मला अजिबात चालवत नाही आता..."


शंकरने क्षणभर विचार केला आणि म्हणाला,


"यशा,आता ह्यापुढं गड उतरेपर्यंत तू एकही सबुद बोलायचा नाहीस.कुनी काही विचारलं तरी उत्तर द्यायचं नाहीस.समजलं ?"


यशाने मुकाटपणे मान हलवली.शंकरने खाली उतरण्याच्या वाटेवर एका गर्दीच्या ठिकाणी यशाला आणलं आणि दिलं सोडून.थोडा बाजूला जाऊन तो जरा मोठ्यानेच बालाजीला म्हणाला,


"पोरगं हरवलेलं दिसतंय... बरोबर कुनी नाही..." एवढं बोलून तो आणि बालाजी बाजूला जाऊन उभे राहिले. यशाभोवती घो घो माणसं जमली.लोक नाव काय, कुठला वगैरे प्रश्न विचारत होते पण यशा मुक्यासारखा गप्प उभा होता.बायाबापड्या यशाच्या अलाबला काढू लागल्या.


'मुकं दिसतंय गं बाई पोर...'


'चांगल्या घरचं दिसतंय लेकरू...'


'आता काय करावं...'


'त्याची मायपण त्याला शोधत असेल...'


असे विविध उद्‌गार ऐकून यशाला आपोआपच रडू यायला लागलं.आजूबाजूच्या मंडळींनी यशाचं तोंड आणि खिसे गुडदाणी,रेवड्या,गुडीशेव ह्यांनी भरून टाकले.एसटी स्टँड जवळच्या पोलीस स्टेशनवर यशाला घेऊन जायचं ठरलं.आजूबाजूच्या बाप्यांनी यशाला खांद्यावर घेतलं अन् हातोहात गडाखाली आणलं.एसटी स्टँड जवळ आल्यावर इकडे तिकडे बघत असलेला शंकर पुढे आला आणि म्हणाला,


"ह्या पोराला मी वळखतो.माझ्या बाजूच्याच गल्लीत ह्याचं घर हाय."


यशाला ज्यांनी उचलून आणलं होतं त्यांनी 'ह्या माणसाला ओळखतोस का ?' म्हणून यशाला विचारलं. यशाने मान हलवून होकार दिला.शंकरने यशाला सोबत घेतलं.मध्ये इतकी वर्षं गेली... शंकरही गेला.पण त्या दिवशी यशाला मुक्याचं सोंग करायला सांगणाऱ्या शंकरच्या आठवणीने आज यशाचे शब्द संपतात आणि यशा मुका होतो !


समाप्त….।