पुन्हा एकदा कवीच्या वातावरणातून खाली उतरून राजांकडे वळू या.सतराव्या शतकात युरोपातील राज्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा व घोडचुका यांमुळे युरोपीय संस्कृती जणू नष्टप्राय झाली ! शेक्सपिअरनंतरच्या पिढीने अत्यंत रक्तपाती असे धार्मिक युद्ध पाहिले.प्रॉटेस्टंट आणि कॅथॉलिक राजे आपापल्या प्रजेची तीस वर्षे कत्तल करीत होते. 'ईश्वराच्या अती थोर वैभवासाठी' आपापले देश या राजांनी उजाड व उद्ध्वस्त केले.हे तीस वर्षे चाललेले युद्ध १६४८ साली संपले.सारे मध्ययुरोप जणू ओसाड झाले होते.
भुकेलेली माणसे व भुकलेले लांडगे मेलेल्या घोड्यांच्या प्रेतासाठी परस्परांशी लढत होते.
जर्मनीची लोकसंख्या एक कोटी साठ लक्ष होती ती साठ लक्षांवर आली.पश्चिम जर्मनीतील पॅलेटिनेट स्टेट अठ्ठावीस वेळा लुटले गेले.बोहेमियातील तीस हजार गावे भस्मीभूत झाली.
वेस्टफॅलिया येथील तहाने तीस वर्षांचे युद्ध संपले.पण या युद्धाने कशाचाही निर्णय झाला नाही.कॅथॉलिक पोपशी निष्ठावंत राहिले.
प्रॉटेस्टंट ल्यूथरची पूजा करीत राहिले.मध्ययुरोपातील राजे खाटीकखाना चालवत असता इकडे इंग्लंडमध्ये पहिला जेम्स मॅकिआव्हिलीच्या शिकवणीप्रमाणे अनियंत्रित सत्ता स्थापू पाहत होता.
प्रजेच्या हक्कांपेक्षा राजाची सत्ता अधिक असते असे दाखवू पाहत होता.तो म्हणे, "ईश्वर काय करू शकेल हे विचारणे जसे निंद्य अधार्मिक आणि नास्तिकपणाचे, तद्वतच राजा काय करू शकेल हे विचारणेही प्रजेला शोभत नाही.ते लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे होय." जेम्सचा मुलगा पहिला चार्लस् गादीवर आला तेव्हा त्याने पित्याच्या उपदेशानुसार वागण्याचे नक्की ठरवले.
इंग्लंडचा अनियंत्रित राजा होणे हे त्याचे ध्येय होते.सर्व सत्ता आपल्या हाती असावी असे त्याला वाटत होते.त्याने पार्लमेंट बरखास्त केले.जमीनदार व व्यापारी राजाचा उद्धटपणा व अनियंत्रित हडेलहप्पीपणा पाहून संतापले.राजाची अनियंत्रित सत्ता सहन करायला ते बिलकूल तयार नव्हते.राज्यकारभारात आपणास सत्ता असलीच पाहिजे असा हट्ट त्यांनी धरला,राजा ऐकेना. तेव्हा या अतिरेकी राजाविरुद्ध त्यांनी बंड केले व त्याला कैद करून शेवटी त्याचे डोके उडवले.
पण इंग्रजांना जुन्या सवयी टाकून देणे कठीण होते. ऑलिव्हर क्रॉम्वेलच्या नेतृत्वाखाली रिपब्लिक स्थापण्याचे थोडेफार यत्न झाले.पण इंग्रज जनतेलाच राजा असावा असे पुन्हा वाटू लागले.नवा राजा आला. पण त्याची सत्ता अनियंत्रित राहिली नाही.राजे लोक धडा शिकले होते.पार्लमेंटशी शत्रूत्व करण्याचे धाडस त्यांनी पुन्हा केले नाही.त्या वेळेपासून इंग्लंड राजशाही रिपब्लिक झाले.राजाचा मुकुट केवळ एक निरुपद्रवी अलंकार म्हणून राहिला.वास्तविक,त्याची आवश्यकताही नव्हती.
(फ्रेंच राजांपैकी अती प्रसिद्ध राजा चौदावा लुई,हेन्री थॉमस,अनुवाद -सानेगुरुजी, मधुश्री पब्लिकेशन)
पण फ्रान्समध्ये अनियंत्रित राजसत्तेची कल्पनाच अधिक दृढावली फ्रेंच राजांनी पौर्वात्य सम्राटांप्रमाणे हुकूमशाही सुरू केली.ते प्रजेचे अनिर्बंध स्वामी होते. सारी प्रजा जणू गुलाम ! प्रजेतील गुलामीची विषमताच जणू त्यांनी नष्ट केली.सारेच दुर्बल व अगतिक प्रजानन या अनियंत्रित फ्रेंच राजांपैकी सर्वांत जास्त दिमाखखोर चौदावा लुई हा होता.
चौदावा लुई हा एकंदरीत कार्यक्षम व लायक राजा होता.
आपल्याजवळ दैवी सामर्थ्य आहे,असे त्याला वाटे. त्याला आपण पृथ्वीवरचे देवच आहोत असा भास होई, तो आपणास सूर्यदेव म्हणवी सूर्यदेव अपोलो याच्याप्रमाणे आपण या मर्त्यलोकी प्रकाश,वैभव व आनंद आणणारे आहोत असे तो म्हणे,त्याला वाटे की, ईश्वराने हे जग जे निर्मिले आहे,ते त्यात आपण आपल्या वैभवाने व दिमाखाने मिरवावे म्हणूनच होय.
त्यांचे पुष्कळसे समकालीन लोक त्याच्या दिमाखाने दिपून जात व त्याला खरोखरच अवतारी मानीत. आजही त्याच्या नावाभोवती तेजोवलय आहे.त्याचा एक अगदी अर्वाचीन चरित्रकार लुई बरट्रांड लिहितो, "चौदावा लुई हा सर्वांहून थोर फ्रेंच मनुष्य होऊन गेला. तो सर्वश्रेष्ठ फ्रेंचमन होय." लुई बरट्रांडचे मन मध्ययुगीन आहे.घमंडेनंदन व आदळआपट करणारे लोक त्याला आवडतात.हा चरित्रकार एके ठिकाणी लिहितो, "ग्रीसचा होमर,रोमचा व्हर्जिल,इंग्लंडचा शेक्सपिअर,इटलीचा डान्टे,जर्मनीचा गटे,तसा फ्रान्सचा चौदावा लुई." अशा प्रकारे लुईची अत्यंत स्तुती करून फ्रान्समधील थोर थोर कवी,शास्त्रज्ञ व व तत्त्वज्ञ यांपेक्षाही आपण चौदाव्या लुईला का श्रेष्ठ मानतो याची कारणे तो देतो.तो म्हणतो,"चौदावा लुई हा दैवी राजा होता. फ्रान्समध्ये त्याच्यासारखा दैवी मनुष्य जन्मला नाही. त्याने सारे आयुष्य युद्धात घालवले. त्याचे युद्धावर जितके प्रेम होते, तितके कोणाचेही नव्हते." चौदावा लुई युद्धाच्या वातावरणात वाढला.तीस वर्षांचे युद्ध संपण्यापूर्वी आठ वर्षे म्हणजे १६३८ साली तो जन्मला.युद्धातील विजय म्हणजे परम ऐश्वर्य असे त्याला शिकवण्यात आले होते.बुद्धप्रिय राष्ट्रांतील विकृत व विपरीत नीती त्याच्या बालमनावर ठसविण्यात आली होती.गुप्त कारस्थाने,खोटे बोलणे,फसवणूक,स्वार्थ,हाव इत्यादी ध्येये त्याच्यासमोर ठेवण्यात आली होती.या विचारांवर तो पोसला गेला होता.त्याच्या चरित्रकार बरट्रांड लिहितो,'लहानपणापासून आपले विचार व आपल्या भावना लपविण्याची आनुवंशिक कला त्याला साधली होती.
आपले स्वरूप लपवून ठेवण्याची गोष्ट अत्यंत फायदेशीर व आवश्यक असते.राजामधला सर्वांत मोठा गुण म्हणजे आपले स्वरूप समजू न देणे हा होय.'आपण मोठे झाले पाहिजे असे लहानपणापासूनच त्याला वाटू लागले होते.
'तू कोणीतरी मोठा आहेस' असे त्याला लहानपणापासून शिकवण्यात येत होते.त्याची जीवनातील सर्वांत मोठी महत्त्वाकांक्षा हुशार,धटिंगण होणे ही होती.त्याच्या शिक्षकांनी त्याच्यासाठी नाना प्रकारचे लढाऊ खेळ शोधून काढले होते.त्याचे सारे बालपण भांडणांत व मारामाऱ्या करण्यात गेले.त्याचा स्वभाव वाघासारखा होता.ला पोर्ट नावाचा त्याचा एक नोकर होता. वयाच्या तेराव्या वर्षी हे लुई महाशय कसे होते,याचे गमतीदार शब्दचित्र त्याने रंगवले आहे.ला पोर्ट लिहितो, "आम्ही माँटेरोहून कॉबल येथे गेलो.तिथे लुईने आपल्या धाकट्या भावाला आपल्या शय्यागारात निजण्यास सांगितले.सकाळी दोघे भाऊ जागे झाले.चौदावा लुई आपल्या भावाच्या अंथरुणावर थुंकला.तोही लुईच्या अंथरुणावर थुंकला,लुई रागावून भावाच्या तोंडावर थुंकला.तेव्हा तो धाकटा भाऊ उडी मारून लुईच्या अंथरुणावर गेला व त्याने तिथे लघुशंका केली.लुईनेही तोच प्रकार भावाच्या अंथरुणावर केला...!" असा हा तेरा वर्षांचा लुई होता. आणि त्या वेळेस लुई राजा झाला होता. पाचव्या वर्षीच तो गादीवर बसला होता. पण चौदा वर्षांचा होईपर्यंत त्याला राज्याभिषेक करण्यात आला नव्हता.
त्याला राज्याभिषेक होईपर्यंत राज्यकारभार त्याची आईच पाहत होती.कार्डिनल माझारिन त्याला शिकवीत होता.हा इटालियन कार्डिनल लुईच्या आईचा प्रियकर होता.कार्डिनल माझारिन मोठा साहसी व नास्तिक होता.त्याची महत्त्वाकांक्षा पोप होण्याची होती. तो स्वतः अती हुशार,लफंग्या व दांभिक होता.त्याने तरुण लुईला दंभाचे परिपूर्ण शिक्षण दिले.तो लुईला सांगे, "मोठमोठ्या सरदार घराण्यांतील लोकांना कस्पटासमान,पायावरील धुळीप्रमाणे मान.दरबारातील सरदार-दरकदारांशी कधीही अधिक परिचय ठेवू नको. लोक कृपेची याचना करतील,तेव्हा चेहरा कठोर कर. मनातील भाव कधीही प्रकट न करता जणू अनाकलनीय गूढ.यातच खरा राजेपणा आहे.सर्व कारभार गुप्तपणे कर.
कोणालाही कसलीही दाद लागू देऊ नको.शाब्दिक वचने भरपूर द्यावीत;पण ती पूर्ण मात्र कधीही करू नयेत.'वचने किं दरिद्रता?' "
हा कार्डिनल माझारिन मॅकिआव्हिलीच्या राजनीतीवर पूर्ण विश्वास ठेवणारा होता.त्याने आपल्या या छात्राला या सैतानी विद्येत तरबेज केले.मॅकिआव्हिलीच्या वचनांनी भरलेली एक वहीच्या वही त्याच्याजवळ होती. तिच्यातील सर्वांत प्रमुख वचन हे होते; 'राजांची पूजा केली पाहिजे.त्यांची इच्छा म्हणजेच कायदा!' शुद्धलेखन लिहावयास शिकवणाऱ्या त्याच्या पंतोजींनी हे वाक्य त्याच्याकडून पुन्हा-पुन्हा घोटून घेतले होते.
बाळपणी लुईची बुद्धिमत्ता सामान्य मुलांच्या बुद्धिमत्तेहून कमी दर्जाची होती.पण माझारिनने लुईच्या हृदयात सुंदर वस्तूंविषयीची प्रीती निर्मिली,माझारिन हा इटालियन होता.त्याचे शिक्षण स्पेनमध्ये झाले होते आणि आता तो फ्रेंच संस्कृतीही आत्मसात करू पाहत होता.तो सौंदर्योपासक होता.संगीत व मूर्तिकला यांच्यावर त्याची भक्ती होती.रेशीम व फिती,आरसे व रत्ने,चित्रे व पुस्तके या सर्वांचा तो शौकीन होता,तो जरा डॅडी म्हणजे नवाबी वृत्तीचा होता.
इटालियन भिक्षुणींना तो स्वतःसाठी नाना सुंगधी उटणी व तेले करावयास लावी.या सुंगधी उटण्यांचा व तेलांचा उपयोग तो केवळ स्वतःसाठीच नव्हे;तर आपल्या दोन आवडत्या माकडांसाठीही करी.पण त्याच्यामध्ये असला नबाबीपणा असला,तरी एकंदरीत तो सौंदर्याचा प्रेमी होता यात शंकाच नाही.सौंदयोपासना हा त्याचा जणू धर्म होता !जगातील अत्यंत सुंदर असा कलासंग्रह त्याच्याजवळ होता.मरताना 'हा सारा कलासंग्रह सोडून जाण्याची पाळी आपल्यावर येणार;हे एकच दुःख त्याला वाटत होते.
माझारिन मेला तेव्हा राजा तेवीस वर्षांचा होता.तो या कार्डिनलजवळच सौंदर्यप्रेम शिकला होता.सारा फ्रान्स देश त्याने म्युझियम बनवला.ठायीठायी त्याने बागा, राजवाडे व संत-मंदिरे निर्माण केली.देशभर एक प्रकारचे कृत्रिम सौंदर्य दरवळू लागले.
राजदरबारात स्त्री-पुरुष पावडरी फासून,रंग लावून,उंची पोषाख घालून,आढ्यतेने व आदबीने हिंडत.खातापिताना अत्यंत नाजूक हावभाव करीत,साधे वाक्य बोलावयाचे असले, तरी त्यात मोठमोठे शब्द योजीत.साधेपणा जणू संपला व कृत्रिमता म्हणजेच जणू कला व जीवन असे झाले. राजाने उत्तमोत्तम कवी व नाटककार,
तत्त्वज्ञानी व शास्त्रज्ञ,तसेच उत्कृष्ट आचारी आपल्या दरबारी बोलावले.एखादा प्रेमळ धनी आपल्या कुत्र्यांशी वागतो, तसा तो सर्वांशी वागे.आपल्या भोजनाच्या टेबलावरील तुकडे तो त्यांना प्रेमाने देई व त्यांचा कंटाळा आला म्हणजे कचरा फेकावा त्याप्रमाणे त्यांना दूर फेकी.
ज्याप्रमाणे पंडितांना व कलावंतांना,त्याचप्रमाणे राजशाही वारांगनांनाही तो वागवी.त्याच्या पुष्कळच वारांगना होत्या.क्षणभर तो त्यांना वागणुक देई आणि मग लाथ मारी.लुईला देव मानणारे त्याचे काही चरित्रकार तो स्त्रियांच्या बाबतीत असा बेछूट वागणारा नव्हता,असे दाखविण्याची खटपट करीत असतात व त्याची प्रेमप्रकरणे पुष्कळ असली,तरीही तो विवेकी पती होता असे सांगत असतात.त्याचा चरित्रकार बरट्रांड लिहितो, 'अगदी खासगी बाबतीतील बारीकसारीक गोष्टींबद्दल वाचक क्षमा करणार असतील तर मी सांगतो की,आपल्या एखाद्या प्रिय पात्राजवळ अत्यंत कामासक्तीने रंगलेला असताही तो आपल्या पत्नीपासून सर्व रात्र काही दूर राहत नसे.त्या रमणीला सोडून शेवटी संयमाने तो पत्नीकडे येईच.' केवढा उदार व उदात्त राजा !
"मला आपले विकार आवरत नाहीत."असे तो पुष्कळदा आपल्या आईला सांगे व म्हणे,"मला याची लाज वाटते!" पण हे विचार व या वासना आवरण्याचा यत्नच त्याने कधी केला नाही.व्हर्सायलिस येथील तो प्रसिद्ध आरसेमहाल तो भव्य प्रासाद त्याने बांधला.
येथेच तो आपल्या प्रियकरणींची करमणूक करी.त्यांच्याबरोबर कामक्रीडा करी.नाचरंग खेळे,मेजवान्या देई.या त्या विषयोपभोगांतील वैभव प्राचीन रोमन सम्राटांच्या वैभवापेक्षाही अधिक असे.एकदा एका मेजवानीच्या प्रसंगी त्याच्याजवळच्या तरवारीचे म्यान इतक्या हिऱ्यांनी भरलेले होते की,ज्या सोन्यात ते हिरे बसवलेले होते ते सोने दिसणेही मुश्कील झाले होते.ही सौंदर्योपासना,ही सुखे,हे विलास या सर्वांसाठी लुईला अपरंपार खर्च करावा लागे.शेतकऱ्यांची दैना करून त्याने फ्रान्सचे वैभव वाढवले. अधिक उदात्त जगाचा पैगंबर जो डिडरो त्याने एक सुंदर प्रसंग रेखाटला आहे.आपल्या आजोबांना हेन्रीलौदावा लुई आपला व्हर्सायलिसचा प्रासाद दाखवीत आहे.
चौदावा लुईही मेलेला असून त्याचे भूत तो राजवाडा आजोबांना दाखवीत असता तो वृद्ध राजा राजवाडधाकडे बघतो व त्यानंत चुक् चक् करून नापसंतीदर्शक मान हालवून म्हणतो, "बाळ,राजवाडा छान आहे,सुंदर आहे यात शंकाच नाही.पण गोनेसी येथील शेतकऱ्यांची घरे कशी आहेत ते पाहावेसे वाटते." त्या भव्य राजवाड्याच्या आसपास राहणारे शेतकरी पेंढ्यांवर निजत,त्यांना राहण्याला घर नसे, त्यांच्या पोटात भाकर नसे,हे लुईला व हेन्रीला कळते तर त्यांना काय वाटले असते ?
आपल्या या भरमसाठ खर्चाच्या विलासोपभोगांसाठी लागणाऱ्या पैशांकरिता लुई सर्वांवर कर बसवी. मोठमोठ्या सरदारांपासून तो किसान कामगारांपर्यंत सर्वांवर तो करांचा बोजा लावी.पण सरदार बिथरले, तेव्हा त्याने सारा बोजा सामान्य रयतेवरच टाकला. आपल्या सार्वजनिक भाषणांतून तो गरिबांबद्दल अपार सहानुभूती दाखवी.तो एकदा म्हणाला,"शिपायांपेक्षा मजुरांचा उपयोग अधिक असतो."तो दुसऱ्या एका प्रसंगी म्हणाला,"किसान व कामगार यांच्यावर माझे फार प्रेम आहे."तो त्यांच्यावर प्रेम करी व त्यांना चिरडून टाकण्यासाठीही शक्य ते सर्व करी.त्याने शेतकऱ्यांची इतकी पिळवणूक केली की,शेवटी शेतकरी गुराढोरांप्रमाणे गवत खाऊ लागले.दुसऱ्यांबद्दल त्याला यत्किंचितही सहानुभूती वाटत नसे. राजाने आपल्या हृदयात दयेला थारा देता कामा नये, असे त्याचे मॅकिऑव्हिली मत होते.धनी गुलामांवर चालवितो, तशी राजाने प्रजेवर हुकूमत चालवावी असे तो म्हणे. प्रजेबद्दल तो फक्त तिरस्कारच व्यक्त करी. जणू खालच्या योनीतील पशू समजूनच तो त्यांना वागवी.शौचाला बसल्या बसल्या तो मुलाखती देई व उघड्यावर एनिमा घेई. 'आजूबाजूची माणसे म्हणजे कावळे,
चिमण्या व पशुपक्षी त्यांची कदर कशाला? त्यांची कशाची लाज?' असे जणू त्याला वाटे.एकदा सामान्य मनुष्य कुत्रा समोर असता जसे हे विधी बिनदिक्कत करील तसे माणसे समोर आली तरी लुई करी.त्याची स्तुतिस्तोत्रे गाणारा चरित्रकार बरट्रांड म्हणतो, 'त्याचे हरएक कृत्य राजाला शोभेसे असे काहीही करताना आपण मोठा भूपाल आहोत. थोर राजा आहोत हे तो कधीही विसरत नसे
तो स्वतःला दैवी समजे,अर्थात परिणामतः दुसऱ्यांस तुच्छ मानी,तो स्वतःला अधिक चाहत असे.म्हणून दुसऱ्यांचा तिरस्कार करी.
दुसऱ्यांचा तिरस्कार ही आत्मस्तुतीची निषेधक बाजू होती.तो स्वतःच्या मोठेपणाचा पुजारी होता.स्वतःला देव समजून तो आपला मानसन्मान करून घेई प्राचीन जगज्जेत्या सम्राटांच्या पावलांवर पावले टाकून जाण्यास तो उत्सुक होता.प्राचीन रोमन साम्राज्याचे पुनरुज्जीवन करून पोप व आपण अशी ईश्वराची दोन रूपे कल्पून आपण दोघांनी राज्य करावे,असे त्याचे स्वप्न होते.स्पेन व नेदरलँड दोहोंविरुद्ध त्याने सारखेच आक्रमक युद्ध चालविले होते.चाळीस वर्षे चाललेल्या या युद्धाने त्याने स्वतःसाठी वैभव मिळविले.पण राष्ट्राला मात्र भिकारी केले. फ्रान्सची विपन्नावस्था झाली.प्रजेने भावना पेटून लढण्यासाठी उठावे म्हणून प्रचार करण्याला तो धर्मोपदेशक पाठवी.हे धर्मोपदेशक प्रवचने देत व सांगत, "राजांसाठी मरणे हे शेतकऱ्यांचे कर्तव्य होय.प्रजेचा हा धर्म होय.' अँबे थेसॉ नामक एक धर्मोपदेशक लिहितो, 'तरुणांना काहीतरी करावयाला हवे असते. म्हणून फ्रान्सला युद्धाची जरुरी आहे.' फ्रान्समधील तरुण मरण-मारणाहून अन्य काहीतरी करू इच्छित असले, तरी त्यांना तसे कोण करू देणार? बिशप बोसो याची घोषणा होती की, 'राजाला युद्ध करावेच लागले तर ते त्याने पूर्ण शक्तीने करावे, सारी शक्ती एकवटून करावे... राजाचे वैभव व यश म्हणजेच देशाचे भूषण!' पण या राजाने किंवा या अॅबट बिशपांनी शत्रूच्या गोळ्यांसमोर आपली शरीरे उभी केल्याचा पुरावा मात्र आम्हाला तरी माहीत नाही.चौदावा लुई आपल्या देशात तर आपला मोठेपणा वाढवीत होताच.तेथील कवी, लेखक,धर्मोपदेशक या साऱ्यांना तर त्याने आपले भाट बनविले होतेच.पण इतर तटस्थ राष्ट्रांतील हुशार लेखकांनाही लाच वगैरे देऊन त्याने त्यांना स्वतःची स्तुतिस्तोत्रे गावयास लावली. 'चौदावा लुई हा अत्यंत थोर रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन राजा आहे.सर्व मोठ्या उत्सवप्रसंगी त्याचे स्मरण करा,त्याचे भले चिंता.' असे इतर देशांतील लेखकही सांगत.लुई लढाईवर विश्वास ठेवी.तितकाच लाचलुचपतीवरही.तो इतर देश लढाईने जिंकू पाही तद्वतच पैशानेही आणि त्याच्या या द्विविध प्रचारापायी शेतकऱ्यांना मात्र भिकारी व्हावे लागे.
लष्करी वैभवासाठी हे जे पशुत्व,मूर्खत्व व कापट्य दाखविले जाई,त्याविरुद्ध क्वचित कोठे आवाज निघतच नसे असे नाही.
१६७५ साली मार्चच्या पाचव्या तारखेस राजा व त्याचे सारे दरबारी बसले असता पाद्री मास्कारॉन याने सर्वांसमोर युद्धविरोधी प्रवचन दिले. तो म्हणाला, "एखादा सामान्य चोर एकटा करतो,तीच गोष्ट एखादा मोठा योद्धा सैन्य घेऊन करतो.चोराहून वेगळे त्याच्यामध्ये काय आहे? एक लहान चोर, दुसरा मोठा चोर!"पण तेवीसशे वर्षांपूर्वी जेरुसलेमच्या राजाने जसे जेरेमियाच्या असल्याच शब्दांकडे दुर्लक्ष केले.तसेच चौदाव्या लुईनेही या शब्दांकडे दुर्लक्ष केले.लढवय्ये वीर अजून शांतिदूतांची भाषा ऐकण्यास उत्सुक नव्हते. चौदाव्या लुईने १७०७ पर्यंत आपली विजययुद्धे चालविली होती.त्याने थोडासा नवीन प्रदेश मिळविला. पण त्यासाठी स्वतःचे लाखो लोक बळी दिले!
चौदावा लुई मोठा श्रद्धाळू कॅथॉलिक होता.तो प्रॉटेस्टंटना छळी.त्याने कित्येकांना हद्दपार केले.दरसाल गुडफ्रायडे दिवशी बारा दरिद्री लोकांना बोलावून तो त्यांचे चरण प्रक्षाळी व मग वर्षाचे उरलेले ३६४ दिवस तो त्यांना उपाशी मरू देई.
बाहत्तर वर्षे राज्य करून लुई १ सप्टेंबर १७१५ रोजी मेला.क्षुद्र व साध्या गोष्टींतही कृत्रिमतेने कसे वागावे,हे त्याने दरबारी लोकांना शिकवले होते.त्याने दरबारी लोकांत कृत्रिमतेची कलावृत्ती निर्मिली,तर प्रजेत अनियंत्रित राज्यसत्तेविरुद्ध चीड उत्पन्न केली.
तिचेच पुढे पाऊणशे वर्षांच्या अल्पावधीत फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये पर्यवसान झाले…समाप्त