live
मुख्यपृष्ठ
१७/१०/२५
अडचण हीच देणगी / Difficulties are gifts
१५/१०/२५
अडचण हीच देणगी / Difficulties are gifts
नंतरच्या सोमवारी जेसन स्टीव्हन्सच्या जीवन नाट्याच्या पुढच्या भागाचा विचार केला,तेव्हा मी जरा अंदाजच करीत राहिलो होतो,हे मी कबूल करतो.माझ्या अगदी जुन्या आणि खूप प्रिय असलेल्या मित्राने त्याच्या मृत्यूनंतरही एका तरूणाच्या जीवनावर असा परिणाम करीत जावं याचे मला मोठे नवल वाटले.ठरलेल्या वेळी मिस हेस्टिंग्ज जेसनला घेऊन कॉन्फरन्स रूममध्ये आली.आणि दरमहा नियतीशी होणाऱ्या सामन्यासाठी मला घेऊन गेली.जेसन जास्त समंजस वाटला,त्याचा आत्मविश्वासही वाढलेला दिसला.
असा तो चार महिन्यांपूर्वी नव्हता. मिस् हेस्टिंग्ज आणि मला त्यानं अभिवादन केलं आणि आमच्या धाडसी सफरीच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली.
पडद्यावर रेड स्टीव्हन्सची छबी साकारली. नेहमीप्रमाणं जेसननं आजवरचे टप्पे यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्याचं अभिनंदनात्मक कौतुक केलं.कळकळीनं तो बोलायला लागला,"जेसन, आयुष्य खूपशा अंतर्विरोधांनी भरलं आहे.
जसजसं जगणं लांबतं तसतसं जीवन हा एक मोठा विरोधाभास असल्याचं जाणवतं.पण तितकंच दीर्घ जगलात आणि तेवढाच कसून शोध घेतलात तर या गोंधळात एक अघटित सुसूत्रता दिसते.
"माझ्या मृत्यूपत्रातली तुला द्यावयाची सर्वोत्तम देणगी म्हणून जी आहे तिचा भागच म्हणजे तुला एकेक धडा शिकवतोय.
सर्वसाधारणपणे माणसांना अडचणींना तोंड देतदेतच,मार्ग काढत काढत, संकटांशी सामना करत करत जगायचे असते.तसे करतांनाच ती हे धडे शिकतात.जे जे आव्हान आपण परतवून लावतो ते ते शेवटी आपल्याला ताकद देऊन जातं."माझी एक मोठी चूक झाली.तुझ्यासकट मी कित्येकांना अशा अडचणींपासून निवारा दिला.तुमच्या भल्याबद्दलच्या चुकीच्या कल्पनेमुळे मी जीवनाच्या प्रश्नांना भिडण्याचं तुमचं सामर्थ्यच हिरावून घेतलं.मी तुमच्या आजूबाजूला त्या प्रश्नांना फिरकूच दिलं नाही.
"दुदैवाने मनुष्यजात कायम एका पोकळीत राहू शकत नाही,अंड्यातून बाहेर पडायला पक्ष्याला धडपड करावी लागते.एखादा सद्हेतूने अंड फोडून देतो,आणि पिल्लासाठी वाट काढतो.त्याला वाटतं. पक्षावर मी केवढे उपकार केले ! खरं पाहता त्यानं पक्षाला दुबळ बनवून ठेवलेलं असतं.आणि परिसराशी दोन हात करायची त्याची शक्तीच नाहीशी होते.
पक्षाला मदत करण्याऐवजी त्यानं त्याची हानीच केलेली असते.आज ना उद्या परिसरातून त्याच्यावर काही आघात होणार आणि तेव्हा त्या पक्षाजवळ त्याच्याशी सामना करण्याचे सामध्ये रहाणार नाही.एरव्ही अशा अडचणीवर तो सहज मात करू शकला असता.
"लहान समस्यांना सामोरं जायला मिळालं नाही, तर जरासे मोठे प्रश्नही आपला घात करतात.हे समजलं म्हणजे आपण अडचणींना आपल्या आयुष्यात टाळत नाही.तर त्यांचा आव्हान म्हणून स्वीकार करतो आणि त्यामुळे आयुष्यात यशस्वी होतो." रेड स्टीव्हन्स थांबला आणि त्यानं थेट कॅमेऱ्याकडे बघितलं.प्रश्नांना सामोरं जात समृद्ध केलेल्या जीवनामुळे त्याच्यात जो ठाम आत्मविश्वास आला होता,तो त्याच्या त्या दृष्टीतून आम्हाला स्पष्ट दिसत होता.
रेडनं बोलणं चालू ठेवलं."जेसन,घड्याळाचे काटे मागे फिरवून भूतकाळात जाऊन ज्या ज्या तुझ्यासमोरच्या अडचणी मीच सोडवल्या त्या तू स्वतःसोडवण्याची संधी मी तुला देऊ शकत नाही. वास्तविक तू तुझ्या अडचणी सोडवाव्यात असा वाव मी तुला द्यायला हवा होता.आपणा दोघांना मी त्या काळात घेऊन जाऊ शकलो असतो,तर मी तसं केलं असतं.पण आता तो पर्याय माझ्यापुढे नाही. अडचणी,अडथळे,समस्या यांच मोल शिकवण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
"तू या बाबतीत अगदी अनभिज्ञ आहेस,म्हणून तुला आता उशीर न करता,विनाविलंब शिकायचं आहे.तुझ्या पुढे जे प्रश्न आहेत,त्यांना तोंड देण्याची तुझी तयारी नाहीये.पुढील तीस दिवसांत तू ही तयारी करशील.या महिन्यात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात असलेली माणसे त्यांच्या अडचणींवर कशी मात करत आहेत,ते तू शोधायचं आहे.एक बालक,एक युवक,एक प्रौढ आणि एक वृद्ध,जो की प्रत्येकजण एका कठीण अडचणीमध्ये आहे.तू अशा चार विविध माणसांना शोधायचस.एवढ्यानं भागणार नाही,तर मिस्टर हॅमिल्टनकडे येऊन त्या त्या माणसाच्या विशिष्ट परिस्थितीत तो जसा वागतोय त्यामुळे तुला काय धडा सापडला ते सांगायचंस,
"आपण स्वतःच्या अडचणींपासून काही शिकलो म्हणजे जीवनाशी आपण दोन हात करू शकतो. जेव्हा आपण इतरांच्या अडचणींपासून काही शिकतो तेव्हा आपण एकंदर जीवनावर मात करू शकतो."मी तुला शुभेच्छा देतो.आणि पुढच्या महिन्यात पुन्हा आपण भेटू अशी मी आशा करतो."
व्हिडिओ टेप संपली तरी जेसन पडद्याकडे बघतच बसला,तो हळूच उठून दरवाजाच्या दिशेने चालू लागला.त्यानं दरवाजा उघडला आणि तो थबकला. माझ्याकडे आणि मिस रेस्टिंग्जकडे वळून म्हणाला,
"मी कसून प्रयत्न करून तुम्हाला मग भेटतो."जातांना आपल्यामागे त्यानं दरवाजा लावून घेतला.माझ्याकडे वळून मिस् हेस्टिंग्ज म्हणाली,"हा उपक्रम यशस्वी व्हायला लागलाय.त्याच्या वागण्यात फरक पडलाय,असं वाटतंय मला. तुम्हाला काय वाटतं ?"
मी उत्तर दिलं,"मला वाटतं,तुझं बरोबर आहे अशी आशा करूया.कारण जसंजसं दूरवर जावं नं तसतसा रस्ता चढावाचा होत जातो,अशी माझी धारणा आहे."
पुन्हा एकदा मी जेसनची वाट बघू लागलो.त्यानं नीट सारं केलं असेल अशी मला आशा वाटू लागली माझ्या मुलाला शिशुवर्गात पहिल्यांदा पाठवलं त्या दिवशी मला जसं वाटलं तसं मला वाटायला लागलं.महिना संपायला तीन दिवस उरले असतांनाच जेसननं फोन करून मिस् हेस्टिंग्ज बरोबर वेळ ठरवून घेतली.दुसऱ्या दिवशी सकाळी मला मिस हेस्टिंग्ज सांगत आली,की तो फार फिकिरीत होता आणि चाचरत असल्यासारखा दिसतोय.सगळं छान झालं असावं याची आशा करण्यापलिकडे मी काही करू शकत नव्हतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेसनला घेऊन मिस् हेस्टिंग्ज माझ्या ऑफिसमध्ये ठरलेल्या वेळी आली. जेसनला एक खुर्ची दाखवून दुसरीत ती बसली. जेसन गप्प बसला होता.मी त्याच्याकडे पाहिलं.तो मला शांत आणि समजुतदार वाटला,मी मनाशी कबूल केलं.शेवटी मी म्हटलं,"जेसन,पुन्हा तुला भेटायला आनंद होतोय मला.तुझ्या प्रगतीचा अहवाल तू आणला असशील." मान वर करून जेसनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला,"मलाही तसं वाटतंय.'
मांडीवर घडी घातलेल्या आपल्या हातांकडे त्यानं पाहिलं आणि जरा वेळ घेऊन तो म्हणाला,"काही ना काही अडचणीत असलेल्या चार वेगवेगळ्या वयाच्या लोकांना मला गाठायचं होतं हे मला ठाऊक होतं.मी मुलापासून सुरूवात केली.मला दोन आठवडे काहीच हाती लागल नाही.मी इतका वैतागलो.की एक दिवस दुपारी सरळ बागेत फिरायला गेलो.
"मला स्वतःचीच कीव आली.वाटल एव्हढं सगळं केल्यावर मला वारसा म्हणून माझ्या चुलत आजोबांनी जी सर्वोत्तम देणगी ठेवली आहे.तिला मुकावं लागतंय की काय?
"शेवटी मी एका बाकाच्या एका टोकावर बसकण मारली.
बाकाच्या दुसऱ्या टोकावर एक आई बसली होती.तिची मुलगी झोपाळ्यावर खेळत होती. तिच्याकडे ती बघत होती.ती आई म्हणाली,की ती छोटी मुलगी खरोखरच विस्मयकारक होती,असं तिला वाटत होतं.माझ्या त्या निराश अवस्थेमुळे की काय मी एरवी जसा तिला प्रतिसाद दिला असता, तसा दिला नाही.तिच्या त्या झोपाळ्यावर खेळणाऱ्या सहा-सात वर्षांच्या मुलीत मला तर काहीच विस्मयकारक दिसत नसल्यांच मी तिला सांगितलं.
"तिनं मला सांगितलं,"एकतर मी तिची आई नाही. मी असायला हवं होतं.दुसर म्हणाजे मी आयुष्यात बघितलेली सर्वात जास्त विस्मयकारक ती मुलगीच आहे.मी सेंट कॅथरिन हॉस्पिटलमध्ये स्वयंसेविका म्हणून काम करते.गंभीर दुखण्याचे बळी असलेल्या रोग्यांचे आयुष्य सुखावह करण्याचा एक उपक्रम आहे,त्यांत मी काम करते.एमिली असाध्य अशा कर्करोगाने आजारी आहे. तिच्यावर कित्येक शस्त्रकिया झाल्यात.तिचं अर्ध आयुष्य वेदनेशी झगड्यात,
रूग्णालयातच गेलंय.तिला विशेष इच्छा कसली आहे,आम्ही ती पुरी करू,असं तिला सांगितल्यावर तिनं बागेत दिवसभर खेळण्यात घालवायची तिची इच्छा असल्याचं सांगितलं. आम्ही तिला म्हटलं की "खूप मुलांना डिस्नेलँड, नाहीतर सुमद्रकिनारा नाहीतर कुठलातरी चेंडूच खेळ खेळायला जायचं असतं.त्यावर ती नुस्ती हसली आणि म्हणाली,"ते तर छानच असेल,पण मला बागेतच जाऊन दिवस घालवायचा आहे." "तिनं पुढं सांगितलं,की एमिलीनं रूग्णालयातल्या सगळ्यांच्या मनाला स्पर्श केला आहे आणि त्या सर्वांच्या आयुष्यात चांगला फरक पडला आहे. तेवढ्यात झोका थांबवून गवतावरून चालत येत एमिली आम्हां दोघांमध्ये येऊन बसली.माझ्याकडे बघत तिनं जे स्मित केलं त्याचा विसर पडणे अशक्य.तिचं नांव एमिली आहे,आणि ती दिवसभर बागेत खेळायला आली आहे असंही तिनं संगितलं.
माझापण बागेतला तिच्यासारखा खास दिवस आहे का असं तिनं…अपुरे..
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!!..सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल …
सारासारविवेकाचा वापर करूनच अडचणी टाळता येतात.आयुष्यातल्या अडचणींचा अनुभव घेतल्यानेच तर चांगला सारासारविवेक करता येतो.
१३/१०/२५
सैनिक राण्या / warrior queen
११/१०/२५
गांधीजींचे गुरु / Guru of Gandhiji
सर फिरोझशहांना पाहिल्यावर मला हिमालयाची आठवण झाली तर लोकमान्य टिळक हे मला महासागरासारखे वाटले. पण गोपाळ कृष्ण गोखले मला गंगानदीसारखे वाटले. हिमालय अनुल्लंघ्य आहे, महासागर तरून जाणे अत्यंत कठीण आहे पण गंगामाता मात्र कोणालाही आपल्या आईसारखीच वाटते.
- महात्मा गांधी
गांधीजींचे गुरु,नामदार गोपाळ कृष्ण गोखले,आचार्य अत्रे,
गांधी नावाचे महात्मा,संपादक-रॉय किणीकर,सहाय्यक -अनिल किणीकर
'भारत सेवक समाजा'चे संस्थापक,महात्मा गांधींचे गुरू आणि घटनावादी राजकारणाचे महान प्रणेते नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी मधुमेहाच्या विकाराने पुणे येथे आपल्या 'समाजा'च्या वास्तूत निधन पावले. तो दिवस आम्हाला अगदी ठळकपणे अजून आठवतो आहे.कारण त्यावेळी आम्ही 'फर्ग्यूसन कॉलेज'मध्ये पहिल्या वर्षात नुकतेच प्रविष्ट झालो होतो.गोखल्यांच्या निधनाची वार्ता ऐकताच आम्ही काही विद्यार्थी तडक धावतच 'भारत सेवक समाजा'त गेलो.तेथे गोखल्यांच्या गौरवर्ण आणि सुंदर पण निश्चेष्ट देहाचे अंत्यदर्शन आम्ही अगदी जवळून घेतले.जिवंतपणी आम्ही गोखल्यांना कधीच पाहिले नव्हते.किंवा त्यांचे भाषणही कधी ऐकले नव्हते.आम्हांला घडलेले तेच त्यांचे पहिले नि शेवटचे दर्शन.त्यानंतर गोखल्यांची जी विराट अंत्ययात्रा पुणे शहरातून निघाली तिच्यात लक्षावधी लोक सामील झाले.
जिवंतपणी पुणेकरांनी गोखल्यांची फारशी कदर केली नव्हती; पण त्यांच्या पार्थिव देहाला निरोप देण्यासाठी ओंकारेश्वराच्या स्मशानात जो अमर्याद जनसमुदाय त्यावेळी जमला होता,तो पाहिल्यानंतर पुणेकरांनी आपल्या पूर्वीच्या उपेक्षेची संपूर्ण भरपाई करून टाकली अशीच सर्वांची खात्री झाली.लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले ह्यांच्या मधले राजकीय वितुष्ट त्या काळी अगदी विकोपाला गेले होते.आदल्याच आठवड्यात "तुमच्या आमच्या गवऱ्या आता ओंकारेश्वरावर गेल्या आहेत,"असे वैतागाने टिळकांनी गोखल्यांना उद्देशून उद्गार काढले होते.ते इतक्या तडकाफडकी अक्षरशः खरे ठरतील असे कोणालाच वाटले नव्हते,म्हणून व्याकूळ अंतःकरणाने लोकमान्य टिळक सिंहगडावरून धावत आले आणि गोखल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी श्रोत्यांच्या काळजांना पीळ पाडणारे भाषण केले.सर रामकृष्ण भांडारकरांसारख्या वयोवृद्ध विद्वानानेसुद्धा गोखल्यांना श्रद्धांजली वाहिली.आमच्या शेजारी राम गणेश गडकरी बसले होते.त्यांनी कागदाच्या तुकड्यावर तेथल्या तेथे पुढील ओळी भराभर लिहिल्या.
साऱ्या शहर पुण्याई काळवंडली कां ही?
आनंदाची माया हांसत खेळत कुठेच कां नाही?
भारतसेवा - मंडल - सदनांभवती उदास वदनांनी अश्रूची पुष्करिणी केली का? काय जाहली हानी ? श्री फर्ग्युसन मंदिरि शोकाचा पूर लोटला कां हां? हे भिंतीचे दगडही रडूनी म्हणती सारखेच का? हा! हा!
त्या दिवसाचे सारे स्मरण अगदी काल घडल्यासारखे आम्हाला आता आहे.टिळक आणि गोखले हे त्या काळी महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे सूर्य-चंद्र होते.भारताला स्वराज्य मिळावे म्हणून देशातल्या ज्या दोन राजकीय प्रवृत्तींचे द्वंद्वयुद्ध त्या काळी चालू होते,त्यांचा टिळक - गोखले हा एक द्वंद्व समास होता.टिळकांवाचून गोखल्यांना शोभा नव्हती आणि गोखल्यांवाचून टिळकांना तेज नव्हते.दोघांच्या विचारसरणींमध्ये जेवढा विरोध होता,तेवढेच साम्य होते.
१८८४ साली वयाच्या अठराव्या वर्षी पुण्याच्या 'डेक्कन कॉलेज' मधून गोखले बी.ए. झाले आणि लागलीच आपटे आगरकर टिळक ह्यांनी स्थापन केलेल्या 'फर्ग्युसन कॉलेज' मध्ये महिना पाऊणशे रुपयांवर आजन्म सेवक झाले.
कॉलेजमध्ये टिळक आणि गोखले गणितच शिकवीत असत.पुढे नव्वद साली टिळक कॉलेजातून बाहेर पडले.तरी देखील 'सार्वजनिक सभे'च्या राजकीय कार्यात दोघेही काही काळ एकत्र वावरत होते.गोखले हे वयाच्या एकविसाव्या वर्षी 'सार्वजनिक सभे'चे चिटणीस होते एवढेच नव्हे,तर 'सभे' च्या इंग्रजी त्रैमासिकाचे ते संपादकही होते.पुढे 'सार्वजनिक सभे'तील रानडे-टिळक पक्षाचे मतभेद विकोपाला गेले तेव्हा रानडे पक्षीय मंडळी 'सार्वननिक सभे'तून बाहेर पडली आणि त्यांनी पुण्यात 'डेक्कन सभा' नावाची दुसरी एक राजकीय संस्था स्थापन केली.तिचे गोखले हे चिटणीस झाले.
आगरकरांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या 'सुधारका'च्या इंग्रजी विभागाचे गोखले हे चार वर्षे संपादक होते.'केसरी' आणि 'सुधारक' ह्यांचा एकमेकांवर नेहमी शाब्दिक भडीमार चालू असे. त्यामुळे टिळक आणि गोखले ह्यांचे राजकीय मतभेद एकसारखे वाढत गेले तरीदेखील १९९५ मध्ये पुणे काँग्रेसचे अधिवेशन जे भरले,त्याचे सरचिटणीस दिनशा एदलजी वाच्छा होते आणि त्याचे दुय्यम चिटणीस टिळक आणि गोखले हे दोघेजण होते.त्यानंतर मात्र उभयतांमधील राजकीय अंतर इतके वाढत गेले की,पुन्हा ते शेवटपर्यंत एकत्र कधीही येऊ शकले नाहीत.
१८९४ सालापासून गोखले ह्यांनी काँग्रेसच्या राजकारणाला सर्वस्वी वाहून घेतले.त्यावर्षी लाहोर काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष दादाभाई नौरोजी,एम. पी.हे पुण्यास आले असताना नागरिकांनी त्यांची हिराबागेपर्यंत घोड्याच्या गाडीतून मोठी मिरवणूक काढली.त्या गाडीत गोखल्यांना बसावयाला जागा नव्हती तरी देखील ते मोठ्या आनंदाने गाडीच्या कोचमनशेजारी बसले.एवढा काँग्रेसबद्दलचा त्यांचा उत्साह अगदी शिगोशीग उचंबळत होता.न्या. रानडे आणि गणेश व्यंकटेश जोशी ह्यांच्या मार्गदर्शकत्वाखाली गोखले ह्यांनी अर्थशास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यास करून त्यात पराकाष्ठेचे प्रभुत्व मिळविले.त्यामुळे १८९७ साली वेल्बी कमिशनपुढे भारताच्या वतीने साक्ष देण्यासाठी इंग्लंडमध्ये त्यांनाच पाठवण्यात आले.ते त्यावेळी अवघे एकतीस वर्षाचे होते.
कमिशनने त्यांना वेडेवाकडे नि आडवेतिडवे प्रश्न विचारून त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. पण गोखले ह्यांनी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला बिनचूक उत्तरे देऊन त्यांची भंबेरी उडविली.त्यांच्या साक्षीत त्यांनी भारतीय अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्त्वाच्या गोष्टींचे विश्लेषण केले.हिंदी सैन्याची घटना आणि त्यावर होणारा खर्च ह्यांची त्यांनी चांगलीच हजेरी घेतली.कर देणाऱ्या जनतेपेक्षा गोऱ्या नोकरशाहीच्या हितसंबंधांना जास्त महत्त्व देण्याच्या आणि वरिष्ठ नोकऱ्यांमधून हिंदी लोकांना वगळण्याच्या सरकारी धोरणावर त्यांनी कडक टीका केली.ह्याच सुमारास पुणे शहरात प्लेगची भयंकर साथ चालू होती.त्यावेळी सोल्जर लोकांनी नागरिकांवर जे अत्याचार केले,त्यांची भयानक वर्णने पुण्यातील गोखल्यांच्या काही मित्रांनी पत्रातून त्यांना विलायतेला कळविली.त्यामुळे गोखल्यांचा संतापही अनावर झाला.त्यांनी त्या पत्राच्या आधारावर 'मँचेस्टर गार्डियन' मध्ये कडक लेख लिहून हिंदुस्थानातल्या गोऱ्या सैनिकांची निर्भत्सना केली.त्यामुळे इंग्लंडमध्ये नि हिंदुस्थानात खूपच खळबळ उडाली.पुढे गोखले जेव्हा परत हिंदुस्थानात आले तेव्हा गोऱ्या सैनिकांवर त्यांनी विलायतेला केलेल्या आरोपांचा मुंबई सरकारने त्यांना जाब विचारला.पण ज्यांनी गोखल्यांना ही माहिती पुरविली होती,त्यांनी पुरावा देण्याच्या बाबतीत अक्षरशः 'शेपट्या' घातल्या.तेव्हा गोखल्यांना सरकारची माफी मागण्यावाचून दुसरे गत्यंतरच नव्हते.
त्यांच्या त्या माफीमुळे त्यांच्या टीकाकारांनी त्यांच्यावर खूपच गहजब केला.पण मित्रांनी विश्वासघात केल्यानंतर कोणत्याही सभ्य आणि स्वाभिमानी माणसाने तोच मार्ग पत्करला असता.
गोखले 'सुधारक' पंथाचे असल्याने आणि त्यानंतर वारंवार हे इंग्लंडला गेलेले असल्याने त्यांच्या टीकाकारांनी त्यांच्या आहाराविहाराबद्दल नाना तहेच्या अफवा पसरवलेल्या होत्या.पण इंग्लंडच्या पहिल्या वारीत त्यांच्या बरोबर दिनशा एदलजी वाच्छा होते.'गोखल्यांच्या आठवणी'त ते लिहितात, "He never forgot that he was a Hindu, who could not touch an egg or even smell a fish. His food consisted of bread, butter, vegetable soup and fruits. He would not touch a spoonful of pudding for fear it might be made of eggs." इंग्लंडमध्ये असताना ते नारिंगी रंगाची जरीची पगडी डोक्याला घालून हिंडत.त्यामुळे ते सर्वांच्या आकर्षणाचा विषय झाले होते.विलायतेत पहिल्या वेळी ते तीनच महिने राहिले.पण ह्या तीन महिन्यांत त्यांनी जॉन मोर्ले,आयरिश होमरूल पक्षाचे पेते जॉन रेडमंड,सर विल्यम वेडरबर्न,टी. पी.ओकॉनर,सर विल्यम हंटर ह्या मोठमोठ्या मुत्सद्द्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी हिंदी राजकारणावर सविस्तर चर्चा केली.
दादाभाई नौरोजींच्या तर त्यांच्या रोजच्या बैठकी होत होत्या.
इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वामधे आमूलाग्र फरक झाला. १९०१ मध्ये ते 'मुंबई कायदेमंडळा'त निवडून आले. तेथे गोखल्यांच्या अमोघ इंग्रजी वक्तृत्त्वाचे प्रथम दर्शन झाले.१९०१ मध्ये मुंबई जमीन महसूल कायदा दुरुस्तीचे एक विधेयक सरकारने आखले होते.ते तहकूब करावे म्हणून सर फिरोजशहा मेहतांनी ठराव मांडला.त्याला पाठिंबा देताना गोखल्यांनी एवढे जबरदस्त भाषण केले की सरकारला ते विधेयक मागेच घेणे भाग पडले. १९०२ मधे 'व्हॉईसरॉयच्या कौन्सिल'मधे बिनसरकारी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. छत्तिसाव्या वर्षी गोखल्यांना हा बहुमान मिळाला. सतत सहा वर्षे ते त्या कौन्सिलमध्ये होते.
त्यावेळी लॉर्ड कर्झन हे व्हॉईसरॉय होते.१९०२ पासून तो १९०८ पर्यंत सतत सात वर्षे गोखल्यांनी जी अर्थसंकल्पावर भाषणे केली,तो अर्थशास्त्राच्या व्यासंगाचा,तर्कशुद्ध निर्भय टीकेचा नि वक्तृत्वाचा उच्चांक होता.भारतीय राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांना ही भाषणे आजही वाचल्याखेरीज गत्यंतर नाही.बजेट कसे तयार करावे आणि त्यातील शिलकी रकमा कशा खर्च कराव्यात ह्याचे झणझणीत धडे त्यांनी सरकारला त्या भाषणातून दिलेले होते. स्वतःचा संयम न सोडता,एकही वावगे अक्षर न उच्चारता,डोळे पांढरे होईपर्यंत सरकारला कसे ठोसे लगावावेत ह्यांचे जणू काही प्रात्यक्षिकच गोखल्यांनी ह्या भाषणातून दिलेले आहे.१९ सप्टेंबर १९०२ साली त्यांनी 'फर्ग्युसन कॉलेज' चा निरोप घेतला त्यावेळचे त्यांचे भाषण अत्यंत हृदयद्रावक होते.त्या भाषणात त्यांनी समुद्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या एका माणसाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले,"तो माणूस त्या किनाऱ्यावरील आपल्या झोपडीत सुखाने राहात होता.पण त्याचे सारे लक्ष त्या अफाट समुद्राकडे लागलेले होते.एक दिवस त्याचे ते वेड अनावर झाले.तो होडीत बसला आणि सरळ समुद्राच्या प्रवासाला निघाला.तशी माझी आज स्थिती झाली आहे.ह्या कॉलेजात मी सुखासमाधानाने रहात आहे.पण माझे सारे लक्ष सार्वजनिक जीवनाच्या त्या तुफान आणि चंचल सागरावर खिळलेले आहे.माझा 'आतला आवाज' त्या मार्गाने तू जा असे मला सांगतो आहे.म्हणून देशकल्याणासाठी कर्तव्यबुद्धीने मी ह्या कॉलेजचा निरोप घेतो आहे.ह्या देशात फर्ग्युसन कॉलेजपेक्षा दुसरी पुष्कळ कॉलेजे असतील.पण परांजपे आणि राजवाडे ह्यांच्या त्यागाने ह्या संस्थेभोवती जे तेजोवलय निर्माण झाले आहे,ते अपूर्व आहे."
अवघ्या तीस रुपये महिना पेन्शनवर गोखले सेवानिवृत्त झाले.१९०५ साल हे गोखल्यांच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे.त्यावर्षी १२ जून रोजी त्यांनी पुण्याला 'भारत सेवक' समाजाची स्थापना केली.नवा भारतवर्ष निर्माण करण्यासाठी त्यागी आणि व्यासंगी समाजसेवकांचा एक आश्रम स्थापन करण्याची गोखल्यांची ही कल्पना जितकी अभिनव तितकीच प्रभावी होती.ह्यावरून त्यांच्या महान द्रष्टेपणाची कल्पना येते.ह्याच वर्षी व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन ह्यांनी बंगालची फाळणी करून साऱ्या भारतवर्षावर जणू काही एक बाँबगोळाच टाकला.ह्या फाळणीतून स्वातंत्र्यवादी आणि राष्ट्रवादी आंदोलनाचा जन्म झाला.ब्रिटिश मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार ही नवीन अस्त्रे भारतीय जनतेला त्यामुळे प्राप्त झाली. 'वन्दे मारतम्' ही राष्ट्रगीताची गर्जना देशाच्या कानाकोपऱ्यांतून निनादू लागली.लॉर्ड कर्झनच्या दडपशाहीचा वरवंटा साऱ्या देशाच्या डोक्यावरून फिरू लागला.तेव्हा भारतातील राजकीय परिस्थिती इंग्लंडमधल्या मुत्सद्द्यांना आणि जनतेला समजावून सांगण्यासाठी गोखले आणि लाला लजपत राय विलायतेला गेले.विलायतेमध्ये गोखल्यांनी आकाशपाताळ एक केले.पन्नास दिवसांत घसा फाटेपर्यंत त्यांनी पंचेचाळीस व्याख्याने दिली.शेवटी परत येताना बोटीवर त्यांना आपल्या घशावर शस्त्रकर्म करणे भाग पडले. मुंबईत आणि पुण्यात त्यांचा प्रचंड सत्कार झाला. त्या सत्कारात लोकमान्य टिळक सामील झाले. साहजिकच त्या वर्षी वाराणसी येथे भरणाऱ्या राष्ट्रीय सभेच्या विसाव्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी गोखले ह्यांचीच निवड झाली.
त्यावेळी गोखले ह्यांचे वय अवघे एकोणचाळीस वर्षाचे होते,इतका तरुण अध्यक्ष काँग्रेसला कधीच मिळाला नाही.मागेही नाही अन् पुढेही नाही (१९२९ साली नेहरू लाहोर काँग्रेसचे पहिल्याने अध्यक्ष झाले.त्यावेळी त्यांना एकेचाळिसावे वर्ष चालू झाले होते).वाराणसी काँग्रेसचे त्यांचे अध्यक्षीय भाषण अत्यंत ज्वलज्जहाल आणि तडफदार झाले.भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी लॉर्ड कर्झनची औरंगजेबाशी तुलना केली.नंतर बंगालच्या फाळणीचे त्यांनी वाभाडे काढले.ब्रिटिश मालावर बंगालने घातलेल्या बहिष्काराचे त्यांनी समर्थन केले.स्वदेशीचा पुरस्कार हा देशभक्तीचा परमोच्च आविष्कार आहे असा तिचा गौरव केला. सेक्रेटरी ऑफ स्टेट मोर्ले ह्यांनी भारताचा कसा विश्वासघात केला ते सांगितले.काँग्रेसचा ध्येयवाद काय आहे आणि तिला कोणकोणत्या सुधारणा ताबडतोब हव्यात त्याची रूपरेषा सांगितली.आणि भारताच्या भवितव्याचे न्या.रानडे ह्यांनी जे चित्र रेखाटलेले होते,त्याचे दिग्दर्शन करून त्यांनी आपले भाषण संपविले.वाराणसी काँग्रेसनंतर गोखल्यांची राजकीय उंची देशामध्ये शतपटीने वाढली.१९०६ च्या डिसेंबरमध्ये कलकत्ता येथे दादाभाई नौरोजी ह्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन भरले.
त्यात बंगालच्या फाळणीमुळे खवळलेल्या जहाल मताच्या काँग्रेस तरुणांनी खूपच वादळ माजविले. कदाचित त्याच वर्षी काँग्रेसचे अध्यक्षपद लोकमान्य टिळकांना मिळाले असते.पण बाबू सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्यांना आडवे आले.
तथापि,सर फिरोजशहा मेहता,सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि अनेक मवाळ मताचे पुढारी ह्यांचा त्या अधिवेशनात अपमान झाला. त्यांना बोलू दिले नाही.ह्या अधिवेशनात 'स्वराज्य, बहिष्कार,
स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण' ही जी देशोद्धाराची चतुःसूत्री मान्य करण्यात आली,तिचे जनक गोखलेच होते.१९०७ साली गोखल्यांनी संयुक्तप्रांत आणि पंजाब ह्या भागात दौरा काढून स्वदेशी, हिंदू - मुसलमान ऐक्य आणि विद्यार्थ्यांची कर्तव्ये यावर काँग्रेसची भूमिका काय आहे हे निरनिराळ्या शहरात व्याख्याने देऊन समजावून सांगितले आणि प्रचलित राजकीय परिस्थितीबाबत लोकमत जागृत केले.
अलिगढमधल्या मुसलमान जनतेने त्यांचा प्रचंड सत्कार केला.१९०८ साली सुरतेच्या अधिवेशनात काँग्रेसचे तारू फुटले आणि टिळक पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडला.त्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या कार्याला गोखल्यांनी स्वतःला वाहून घेतले.पुढे लवकरच ते दक्षिण आफ्रिकेत गेले आणि गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मोहिमेला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला.१९०९ च्या काँग्रेस अधिवेशनात तर गांधीजींच्या सत्याग्रहाची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि त्यांचे मूलभूत तत्त्वज्ञान काव्यमय भाषेत सांगून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.१९०९ ते १९१४ पर्यंत मध्यवर्ती कायदेमंडळ हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते.१९१४ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेला जहाल पक्ष आणि आत असलेला मवाळ पक्ष ह्यांचे फिरून ऐक्य करण्याचा प्रयत्न झाला. प्रारंभी त्या प्रयत्नाला गोखल्यांचा पाठिंबा होता. पण टिळक काँग्रेसमध्ये आल्यानंतर पुन्हा त्याच जुन्या कटकटी वाढतील आणि कार्यनाश होईल म्हणून गोखल्यांनी नंतर आपला पाठिंबा काढून घेतला.त्यामुळे टिळक-गोखले ह्यांच्या पक्षांमधले वितुष्ट भलतेच विकोपाला गेले आणि त्याच वातावरणात काळाने गोखल्यांवर अकस्मात झडप घालून देशाची अपरिमित हानी केली.गांधीजींनी ज्यांना गुरू मानले,ते गोखले असामान्य कोटीतले, स्वार्थत्यागी,चारित्र्यसंपन्न आणि ज्वलज्जहाल देशभक्त होते ह्यात काय शंका ? देशसेवेचे असिधाराव्रत स्वीकारणारे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याचे पालन करणारे ते आदर्श भारत - सेवक होते.सरकारने देऊ केलेली 'सर' पदवी त्यांनी लाथाडली एवढेच नव्हे तर व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीत जाण्यासही त्यांनी नकार दिला.इंग्रजी भाषेतले त्यांचे वक्तृत्व म्हणजे त्यांचे महान सामर्थ्य होते.त्यांच्या वक्तृत्वात वेग होता,गती होती,तेज होते;पण आरडाओरडा आणि धांगडधिंगा नव्हता.अर्थशास्त्र हा त्यांच्या वक्तृत्वाचा पाया.वस्तुस्थिती हे त्यांच्या वक्तृत्वाचे सामर्थ्य. प्राचीन इतिहासाला किंवा भूतकाळातील सुवर्णयुगाला आवाहन करून श्रोत्यांच्या भावना प्रक्षुब्ध करण्याच्या भानगडीत ते कधीही पडत नसत.त्यांचा युक्तिवाद
सुस्पष्ट,तर्कशास्त्र अभेद्य आणि पुरावे अचूक असत. टीकाकारांना निरुत्तर करण्याचे जबर सामर्थ्य त्यांच्या वक्तृत्वात असे.न्या रानड्यांसारख्या साधुपुरुषाचे ते सच्छिष्य (अतिशय चांगले असे शिष्य) होते.परमेश्वरावर त्यांचा पूर्ण भरवसा होता. म्हणून वाराणसी काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणाच्या अखेर ते म्हणाले."सर्व भविष्यकाळ आपल्या डोळ्यांना स्पष्टपणे दिसत नाही,म्हणून निराश होण्याचे कारण नाही."
"Our times are in His hand Who said 'A whole I planned.' Youth shows but half; Trust God, see all nor be afraid!"
९/१०/२५
वायू आणि सजीव / Gases and living things
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत उत्क्रांतिवाद निर्माण व्हायला योग्य पार्श्वभूमी निर्माण झाली होती.त्यापूर्वी आणखीही काही गोष्टी माणसाच्या लक्षात यायला लागल्या होत्या.एका बाजूला जेव्हा बायॉलॉजीमध्ये स्पिशीजचं योग्य त-हेनं वर्गीकरण होत होतं,त्याच वेळी दुसऱ्या बाजूला रसायनशास्त्रातलीही काही गुपितं माणसाला उलगडायला लागली होती. रसायनशास्त्रज्ञ आता रसायनशास्त्राचं ज्ञान सजीवांना तसंच सजीवांशी संबंधित निर्जीव गोष्टींनाही कसं लागू पडेल याचा विचार करत होते.पूर्वी रसायनशास्त्रानं सजीवांच्या शरीरात अन्नपचन कसं होतं ते शोधायचा प्रयत्न केलेला होता.कारण पचनसंस्था ही त्या मानानं अभ्यास करायला आणि आतमध्ये डोकावून पाहायला सोपी होती.
पचन हे शरीराच्या टिश्यू (उती) किंवा पेशींच्या आत घडणारी गोष्ट नाही.पचन हे माणसाला उघड्या डोळ्यांनी दिसू शकणाऱ्या आणि तोंडावाटे सहज पोहोचू शकणाऱ्या नळीसारख्या डायजेस्टिव्ह कॅनालमधून होतं.त्यामुळे शरीरातल्या इतर क्रियांपेक्षा पचनक्रिया समजायला सोपी होती.बोरेलीनं सांगितल्याप्रमाणे पचन ही घुसळण्यासारख्या यांत्रिक पद्धतीनं होणारी गोष्ट असावी की साल्व्हियसनं सांगितल्याप्रमाणे ती पाचक रसांमुळे होणारी रासायनिक प्रक्रिया असावी हा सतराव्या शतकातल्या वैज्ञानिकांना पडलेला गहन प्रश्न खरं तर अजून सुटला नव्हता.
फ्रेंच वैज्ञानिक रेने अँटोनी फर्कोल्ट दे रुमर (Rene Antoine Ferchault de Reaumer) (१६८३ ते १७५७) यानं पुन्हा हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं एक ससाणा पकडून तो पाळला.न पचलेलं अन्न परत ओकून टाकायची ससाण्यांची सवय असते.आता त्यानं धातूच्या पोकळ नळीत मांसाचा तुकडा घातला आणि त्या नळीला तारांनी बंद करून टाकलं.त्यामुळे मांस तर या नळीतून बाहेर येणं शक्य नव्हतं,पण पोटातले पाचक रस मात्र नळीत शिरू शकत होते.आता त्यानं ही नळी आपल्या पाळलेल्या ससाण्याला गिळायला लावली. अपेक्षेप्रमाणे थोड्या वेळानं ससाण्यानं उलटी करून ती नळी बाहेर काढून टाकली. जेव्हा रेने रुमरनं त्या नळीच्या आतलं मांस बाहेर काढून पाहिलं,तेव्हा ते त्याला थोडंसं विरघळलेलं दिसलं.याचाच अर्थ अन्नाचं पचन हे रासायनिक क्रियांद्वारे होतं हे दिसून येत होतं.रेनेनं आपले निष्कर्ष पुन्हा वेगळ्या प्रकारे प्रयोग करून पुन्हा तपासून पाहायचे ठरवले.आता त्यानं आपल्या ससाण्याला नुसताच स्पंज खायला घातला.थोड्या वेळानं ससाण्यानं तो स्पंज बाहेर काढून टाकला.अपेक्षेप्रमाणे त्या स्पंजनं ससाण्याच्या पोटातले पाचक रस शोषून आपल्यासोबत बाहेर आणले होते.आता रेनेनं हा स्पंज पिळून घेतला आणि त्यातला रस अन्नाच्या तुकड्यांमध्ये मिसळला. थोड्या वेळानं रेनेनं पाहिलं तर तो रस त्यात मिसळलेलं अन्न हळूहळू विरघळत होतं असं लक्षात आलं.आणि या प्रयोगानं अन्नपचन ही रासायनिक प्रक्रिया असावी यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं.आता संजीवांच्या शरीरक्रियेत रसायनशास्त्राला नव्यानंच महत्त्व प्राप्त व्हायला सुरुवात झाली होती.
अठराव्या शतकात हेल्मोंटनं वायूंचा अभ्यास सुरू केला होता.यातून सजीवांच्या जगण्यासाठी वायूंची आवश्यकता होती हे समजायला लागलं होतं.
इंग्लिश वनस्पतिशास्त्रज्ञ आणि रसायनतज्ज्ञ स्टीफन हेल्स (Stephen Hales) (१६७७ ते १७५१) हा यावर अभ्यास करत होता.१७२७ मध्ये त्यानं वनस्पतींच्या वाढीचा आणि त्यांच्यातल्या द्रवाच्या दाबाचा अभ्यास केला.त्यानं प्लँट फिजिओलॉजीचा पाया घातला होता.झाडं फक्त पाण्यावरच वाढतात असं त्याचं मत झालं होतं.याशिवाय वेगवेगळ्या वायूंचा अभ्यास करणाराही तोच पहिला होता.कार्बन डाय ऑक्साइडचा शोध त्यानंच लावला.
वायू (Gas) ही कल्पना १७ व्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आली होती.गॅलिलिओच्या समकालीन असलेला डच रसायनशास्त्रज्ञ जाँ बाप्टिस्टा फॉन हेल्मोंट(१५७७-१६४४) यानं मांडली. 'केओस' या ग्रीक शब्दावरून 'गॅस (Gas)' हा शब्द त्याला सुचला. निरनिराळ्या प्रकारचे वायू अस्तित्वात असतात हे हेल्मोंटला ठाऊक होतं.
बीअर आणि वाइन यांच्या किण्वन (फर्मेंटेशन) प्रक्रियेतून वायू बाहेर पडतो हे हेल्मोंटला माहीत होतं.किण्वन प्रक्रियेसाठी डच भाषेत 'जिस्टेन' ('gisten') असा शब्द आहे.वायू वाफेपेक्षा निराळी आहे असं त्याला सुचवायचं होतं.वाफ थंड केली की ती लगेच द्रवात रूपांतरित होते,पण वायू मात्र रूपांतरित होत नाही असं हेल्मोंटला सांगायचं होतं.अर्थात,वायूही द्रवरूपात जाऊ शकतात हे त्याच्या काळी माहीतच नव्हतं.ही गोष्ट १९ व्या शतकात शक्य झाली.जर्मन भाषेत 'घेईस्ट (Geist)' असा शब्द आहे.या शब्दाचा अर्थ 'मन किंवा आत्मा (spirit)' असा होतो.त्यावरून हेल्मोंटला 'गॅस' हा शब्द सुचला असावा असंही एक मत आहे.कार्बोनेट आणि धातू आम्लात टाकले की वायू तयार होतात याचा अंदाज हेल्मोंटला होता.हवा ही दोन भागांची मिळून तयार झाली आहे आणि त्यापैकी एक भाग ज्वलनाला मदत करून संपतो तर दूसरा तस करत नाही हे लक्षात आल्यावर हेल्मोंटन या वाफेला 'गॅस' असं नाव दिलं.सुरुवातीला या नव्या शब्दाकडे अनेक वर्षं कुणीच लक्ष दिलं नाही.पुढं १७८९ मध्ये लिव्हायेजेनं हा शब्द प्रचारात आणला.
'गॅस' असं नामकरण करणारा हा हेल्मोंट नेमका कोण होता? जॉ बाप्तिस्टा फॉन हेल्मोंटचा जन्म १५८० साली बेल्जियममधल्या ब्रसेल्समध्ये झाला.त्यानं लॅटिन आणि ग्रीक भाषांचा अभ्यास केला. जेझूईट धर्मगुरूंनी चालवलेले काही अभ्यासक्रम तो शिकला.त्यानं विद्यापीठाची पदवी घेतली नाही,कारण त्याचा कोणताही उपयोग नाही असं त्याचं मत होतं.त्यानं शेवटी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि १५९९ साली फिजिशियन म्हणून मान्यता मिळवली.त्यानं काही वर्षं इंग्लंड,फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंड या ठिकाणी घालवली.पण शेवटी तो ब्रसेल्सला स्थायिक झाला.१६४४ साली तिथंच त्याचा मृत्यू झाला.हेल्मोंटनं गॅस सध्या आपण ज्या अर्थानं वापरला जातो त्या अर्थानं वापरला नव्हता.त्याच्या म्हणण्यानुसार गॅस हा एकच पदार्थ असतो.प्रत्येक पदार्थात गॅस हा असतोच.पदार्थाला उष्णता दिल्यावर त्यातून गॅस बाहेर पडतो.हे स्पष्ट करण्यासाठी हेल्मोंटनं २८ कि.ग्रॅम कोळसा जाळला. त्यातून त्याला अर्धा किलो राख मिळाली. त्याच्या मतानुसार उरलेला कोळसा हा गॅस स्वरूपात बाहेर पडला.हाच 'गॅस' बीअरमधूनही बाहेर पडतो असंही त्याच्या लक्षात आलं.हा 'गॅस' म्हणजे चक्क आपल्याला परिचित असलेला 'कार्बन डाय ऑक्साइड' !
हवा ही अनेक प्रकारच्या वायूंचं मिश्रण आहे हे पूर्वी माहीत नव्हतं.फार पूर्वीपासूनच लोकांना वायूचा एकच प्रकार माहीत होता ती म्हणजे हवा ! कुजण्याच्या प्रक्रियेत किंवा फर्मेंटेशनमध्ये (किण्वन क्रियेत) जे नवे नवे वायुरूप पदार्थ तयार होत असत ते म्हणजे हवेचेच प्रकार आहेत असं लोकांना वाटायचं.आपल्या सभोवती असलेल्या वातावरणातला हवा ही एकसंध आहे की मिश्र पदार्थ ? वातावरणातल्या हवेचे घटक कोणते? असे प्रश्न १८व्या शतकात अनेकांच्या डोक्यात घोळायचे.हे वायूचे घटक शोधण्याच्या नाट्यात अनेक पात्रं विज्ञानाच्या रंगमंचावर अवतीर्ण झाली. अनेक चुकीच्या संकल्पना पुढे आल्या. त्यातूनच नवीन विचारांना चालना मिळाली आणि त्यातून १८व्या शतकाच्या उत्तरार्धात हायड्रोजन,नायट्रोजन आणि ऑक्सिजन या वायूंचा शोध ही रसायनशास्त्राच्या विकासाच्या दृष्टीनं एक महत्त्वाची घटना ठरली.
स्टीफन हेल्स या वैज्ञानिकानं १८ व्या शतकाच्या सुरुवातीला हवेच्या स्थितिस्थापकत्वाचा अभ्यास सुरू केला आणि हवा हा स्थितिस्थापक प्रवाही पदार्थ असून त्यातले अणू निराळे करता येतात. शिवाय,पुष्कळ घन पदार्थातही निरनिराळे वायू भरलेले असतात असं त्यानं दाखवलं.
पुढं जोसेफ ब्लॅकनं हेल्सच्या दिशेनंच अधिक संशोधन करून पुष्कळ वायूंची वजनं काढली.त्यानं कार्बोनिक अॅसिडच्या वायूंच्या गुणधर्माचाही शोध लावला.या वायूला तो स्थिर हवा म्हणत असे.त्यानं असं दाखवलं की मॅग्नेसिया अल्बा आणि खडूला उष्णता दिल्यास त्यातून ही स्थिर हवा बाहेर पडते.पुढे १७५७ साली त्यानं असं सिद्ध केलं,की द्राक्षं आंबवून केलेल्या दारूतून जे बुडबुडे निघतात त्यात हा कार्बोनिक अॅसिडचा वायू असतो.हे सिद्ध करण्यासाठी त्यानं हे बुडबुडे चुन्याचं पाणी असलेल्या बाटलीत सोडलं आणि ते मिश्रण खूप जोरजोरानं हलवलं.त्यामुळे चुन्याचं पाणी आणि कार्बोनिक अॅसिडचा वायू अगदी मिसळून गेले आणि एक पांढरा साका तळाशी बसला.तो 'साका' म्हणजेच 'कॅल्शियम कार्बोनेट' किंवा 'खडू'! या प्रयोगावरून त्याला दुसरा प्रयोग सुचला. ब्लॅकनं वारा फुंकण्याच्या भात्याच्या तोंडाशी जळता कोळसा ठेवून त्यातून निघणारा वायू चुन्याचं पाणी असलेल्या काचेच्या नळीत सोडला आणि ते मिश्रण खूप जोरानं हलवलं.त्याबरोबर वरीलप्रमाणेच पांढरा साका तळाशी बसला. अर्थातच,त्यामुळे कोळसा जळताना निघणारा वायू हा कार्बोनिक अॅसिडचा वायू आहे हे सिद्ध झालं.नंतर ब्लॅकला चुन्याच्या निवळीत काचेच्या नळीतून तोंडानं फुंकल्यासही खडू तयार होतो असं आढळलं.त्यामुळे मनुष्य किंवा कोणताही प्राणी श्वासोच्छ्वास करताना कार्बोनिक अॅसिडचा वायू सोडतो हे नक्की झालं. आता आपण याला कार्बन डाय ऑक्साइड म्हणतो.रॉबर्ट बॉइल आणि न्यूटनचा बोलबाला असलेल्या काळात जॉन मेयो या १६४३ साली लंडनमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचं वायूसंबंधीचं काम थोडंसं दुर्लक्षितच राहिलं. त्यानं कायद्याची पदवी घेतली होती.पण कायदेकानून वगैरे भानगडीत न पडता त्यानं उपजीविकेसाठी वैद्यकाचा मार्ग चोखाळला.
त्याच सुमारास वयाच्या पंचविशीत असताना त्यानं श्वसनावर एक शोधनिबंध लिहिला.त्याला फारच कमी आयुष्यमान लाभलं.वयाच्या सदतिसाव्या वर्षी त्याचं निधन झालं.रॉबर्ट बॉइलचा समकालीन असलेल्या जॉन मेयोनं पदार्थाच्या ज्वलनाविषयी सांगताना वातावरणातल्या घटकांविषयी सांगितलं होतं.ते घटक कोणते असतात हे याबद्दल मात्र तो सांगू शकला नाही.मेयोनं स्पष्टपणे सांगितलं,की वातावरणात दोन प्रकारचे वायू असतात.एक वायू ज्वलनाला आणि जगण्याला मदत करतो तर दुसरा करत नाही.धातू जाळले की हा हवेतला घटक त्यांच्याशी बांधला जातो. हा सॉल्टपीटरमध्येही (पोटॅशियम नायट्रेट / KNO₂) असतो असंही जॉन मेयोच्या लक्षात आलं होतं.
स्टीफन हेल्स या ब्रिटिश धर्मोपदेशकानंही वायूसंबंधी बरेच प्रयोग केले. तो वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. त्यानं वनस्पतींवर प्रयोग केले.झाडामधून द्रव आणि वायू कसे वाहतात यावर त्यानं प्रयोग केले.प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे मोजून त्याची नोंद केली पाहिजे यावर त्याचा भर होता.न्यूटनचा त्याच्यावर पुष्कळच प्रभाव होता.
म्हणूनच मोजमाप करायला तो पहिली पसंती द्यायचा. तो म्हणत असे, "आपण प्रत्येक गोष्ट ही आकडे, मोजमापं आणि वजनं या भाषेत मांडली पाहिजे." त्यानं आकडेमोड करण्याच्या आपल्या या पद्धतीला 'स्टॅटिक्स' असं नाव दिलं.वनस्पतींवर केलेलं प्रयोग आणि आकडेमोड त्यानं आपल्या 'व्हेजिटेबल स्टॅटिक्स' या १७२३ प्रकाशित झालेल्या पुस्तकात दिली आहे. १८३३ मध्ये त्यानं 'हेमस्टॅटिक्स' हे आणखी एक पुस्तक प्रसिद्ध केलं.
सजीव अच्युत गोडबोले अमृता देशपांडे मधुश्री पब्लिकेशन
रक्तदाब मोजणारा तो पहिलाच होता.त्यानं तीन घोड्यांचा रक्तदाब मोजला आणि त्याची नोंद केली.श्वसनावाटे जाणाऱ्या वायूंवर त्यानं पुष्कळ काम केलं.श्वसनावाटे कोणते वायू शरीरात जातात हे समजून घेण्यात त्याला रस होता.
हेल्सच्या मते वायू हे एकतर मुक्त वायुरूपात असतात किंवा एखाद्या रासायनिक पदार्थाशी बद्ध असतात.वायू हा प्राण्यांमध्ये,वनस्पतींमध्ये आणि खनिजांत सर्वत्र बांधलेल्या स्थितीत असतो.