नंतरच्या सोमवारी जेसन स्टीव्हन्सच्या जीवन नाट्याच्या पुढच्या भागाचा विचार केला,तेव्हा मी जरा अंदाजच करीत राहिलो होतो,हे मी कबूल करतो.माझ्या अगदी जुन्या आणि खूप प्रिय असलेल्या मित्राने त्याच्या मृत्यूनंतरही एका तरूणाच्या जीवनावर असा परिणाम करीत जावं याचे मला मोठे नवल वाटले.ठरलेल्या वेळी मिस हेस्टिंग्ज जेसनला घेऊन कॉन्फरन्स रूममध्ये आली.आणि दरमहा नियतीशी होणाऱ्या सामन्यासाठी मला घेऊन गेली.जेसन जास्त समंजस वाटला,त्याचा आत्मविश्वासही वाढलेला दिसला.
असा तो चार महिन्यांपूर्वी नव्हता. मिस् हेस्टिंग्ज आणि मला त्यानं अभिवादन केलं आणि आमच्या धाडसी सफरीच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली.
पडद्यावर रेड स्टीव्हन्सची छबी साकारली. नेहमीप्रमाणं जेसननं आजवरचे टप्पे यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्याचं अभिनंदनात्मक कौतुक केलं.कळकळीनं तो बोलायला लागला,"जेसन, आयुष्य खूपशा अंतर्विरोधांनी भरलं आहे.
जसजसं जगणं लांबतं तसतसं जीवन हा एक मोठा विरोधाभास असल्याचं जाणवतं.पण तितकंच दीर्घ जगलात आणि तेवढाच कसून शोध घेतलात तर या गोंधळात एक अघटित सुसूत्रता दिसते.
"माझ्या मृत्यूपत्रातली तुला द्यावयाची सर्वोत्तम देणगी म्हणून जी आहे तिचा भागच म्हणजे तुला एकेक धडा शिकवतोय.
सर्वसाधारणपणे माणसांना अडचणींना तोंड देतदेतच,मार्ग काढत काढत, संकटांशी सामना करत करत जगायचे असते.तसे करतांनाच ती हे धडे शिकतात.जे जे आव्हान आपण परतवून लावतो ते ते शेवटी आपल्याला ताकद देऊन जातं."माझी एक मोठी चूक झाली.तुझ्यासकट मी कित्येकांना अशा अडचणींपासून निवारा दिला.तुमच्या भल्याबद्दलच्या चुकीच्या कल्पनेमुळे मी जीवनाच्या प्रश्नांना भिडण्याचं तुमचं सामर्थ्यच हिरावून घेतलं.मी तुमच्या आजूबाजूला त्या प्रश्नांना फिरकूच दिलं नाही.
"दुदैवाने मनुष्यजात कायम एका पोकळीत राहू शकत नाही,अंड्यातून बाहेर पडायला पक्ष्याला धडपड करावी लागते.एखादा सद्हेतूने अंड फोडून देतो,आणि पिल्लासाठी वाट काढतो.त्याला वाटतं. पक्षावर मी केवढे उपकार केले ! खरं पाहता त्यानं पक्षाला दुबळ बनवून ठेवलेलं असतं.आणि परिसराशी दोन हात करायची त्याची शक्तीच नाहीशी होते.
पक्षाला मदत करण्याऐवजी त्यानं त्याची हानीच केलेली असते.आज ना उद्या परिसरातून त्याच्यावर काही आघात होणार आणि तेव्हा त्या पक्षाजवळ त्याच्याशी सामना करण्याचे सामध्ये रहाणार नाही.एरव्ही अशा अडचणीवर तो सहज मात करू शकला असता.
"लहान समस्यांना सामोरं जायला मिळालं नाही, तर जरासे मोठे प्रश्नही आपला घात करतात.हे समजलं म्हणजे आपण अडचणींना आपल्या आयुष्यात टाळत नाही.तर त्यांचा आव्हान म्हणून स्वीकार करतो आणि त्यामुळे आयुष्यात यशस्वी होतो." रेड स्टीव्हन्स थांबला आणि त्यानं थेट कॅमेऱ्याकडे बघितलं.प्रश्नांना सामोरं जात समृद्ध केलेल्या जीवनामुळे त्याच्यात जो ठाम आत्मविश्वास आला होता,तो त्याच्या त्या दृष्टीतून आम्हाला स्पष्ट दिसत होता.
रेडनं बोलणं चालू ठेवलं."जेसन,घड्याळाचे काटे मागे फिरवून भूतकाळात जाऊन ज्या ज्या तुझ्यासमोरच्या अडचणी मीच सोडवल्या त्या तू स्वतःसोडवण्याची संधी मी तुला देऊ शकत नाही. वास्तविक तू तुझ्या अडचणी सोडवाव्यात असा वाव मी तुला द्यायला हवा होता.आपणा दोघांना मी त्या काळात घेऊन जाऊ शकलो असतो,तर मी तसं केलं असतं.पण आता तो पर्याय माझ्यापुढे नाही. अडचणी,अडथळे,समस्या यांच मोल शिकवण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
"तू या बाबतीत अगदी अनभिज्ञ आहेस,म्हणून तुला आता उशीर न करता,विनाविलंब शिकायचं आहे.तुझ्या पुढे जे प्रश्न आहेत,त्यांना तोंड देण्याची तुझी तयारी नाहीये.पुढील तीस दिवसांत तू ही तयारी करशील.या महिन्यात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात असलेली माणसे त्यांच्या अडचणींवर कशी मात करत आहेत,ते तू शोधायचं आहे.एक बालक,एक युवक,एक प्रौढ आणि एक वृद्ध,जो की प्रत्येकजण एका कठीण अडचणीमध्ये आहे.तू अशा चार विविध माणसांना शोधायचस.एवढ्यानं भागणार नाही,तर मिस्टर हॅमिल्टनकडे येऊन त्या त्या माणसाच्या विशिष्ट परिस्थितीत तो जसा वागतोय त्यामुळे तुला काय धडा सापडला ते सांगायचंस,
"आपण स्वतःच्या अडचणींपासून काही शिकलो म्हणजे जीवनाशी आपण दोन हात करू शकतो. जेव्हा आपण इतरांच्या अडचणींपासून काही शिकतो तेव्हा आपण एकंदर जीवनावर मात करू शकतो."मी तुला शुभेच्छा देतो.आणि पुढच्या महिन्यात पुन्हा आपण भेटू अशी मी आशा करतो."
व्हिडिओ टेप संपली तरी जेसन पडद्याकडे बघतच बसला,तो हळूच उठून दरवाजाच्या दिशेने चालू लागला.त्यानं दरवाजा उघडला आणि तो थबकला. माझ्याकडे आणि मिस रेस्टिंग्जकडे वळून म्हणाला,
"मी कसून प्रयत्न करून तुम्हाला मग भेटतो."जातांना आपल्यामागे त्यानं दरवाजा लावून घेतला.माझ्याकडे वळून मिस् हेस्टिंग्ज म्हणाली,"हा उपक्रम यशस्वी व्हायला लागलाय.त्याच्या वागण्यात फरक पडलाय,असं वाटतंय मला. तुम्हाला काय वाटतं ?"
मी उत्तर दिलं,"मला वाटतं,तुझं बरोबर आहे अशी आशा करूया.कारण जसंजसं दूरवर जावं नं तसतसा रस्ता चढावाचा होत जातो,अशी माझी धारणा आहे."
पुन्हा एकदा मी जेसनची वाट बघू लागलो.त्यानं नीट सारं केलं असेल अशी मला आशा वाटू लागली माझ्या मुलाला शिशुवर्गात पहिल्यांदा पाठवलं त्या दिवशी मला जसं वाटलं तसं मला वाटायला लागलं.महिना संपायला तीन दिवस उरले असतांनाच जेसननं फोन करून मिस् हेस्टिंग्ज बरोबर वेळ ठरवून घेतली.दुसऱ्या दिवशी सकाळी मला मिस हेस्टिंग्ज सांगत आली,की तो फार फिकिरीत होता आणि चाचरत असल्यासारखा दिसतोय.सगळं छान झालं असावं याची आशा करण्यापलिकडे मी काही करू शकत नव्हतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेसनला घेऊन मिस् हेस्टिंग्ज माझ्या ऑफिसमध्ये ठरलेल्या वेळी आली. जेसनला एक खुर्ची दाखवून दुसरीत ती बसली. जेसन गप्प बसला होता.मी त्याच्याकडे पाहिलं.तो मला शांत आणि समजुतदार वाटला,मी मनाशी कबूल केलं.शेवटी मी म्हटलं,"जेसन,पुन्हा तुला भेटायला आनंद होतोय मला.तुझ्या प्रगतीचा अहवाल तू आणला असशील." मान वर करून जेसनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला,"मलाही तसं वाटतंय.'
मांडीवर घडी घातलेल्या आपल्या हातांकडे त्यानं पाहिलं आणि जरा वेळ घेऊन तो म्हणाला,"काही ना काही अडचणीत असलेल्या चार वेगवेगळ्या वयाच्या लोकांना मला गाठायचं होतं हे मला ठाऊक होतं.मी मुलापासून सुरूवात केली.मला दोन आठवडे काहीच हाती लागल नाही.मी इतका वैतागलो.की एक दिवस दुपारी सरळ बागेत फिरायला गेलो.
"मला स्वतःचीच कीव आली.वाटल एव्हढं सगळं केल्यावर मला वारसा म्हणून माझ्या चुलत आजोबांनी जी सर्वोत्तम देणगी ठेवली आहे.तिला मुकावं लागतंय की काय?
"शेवटी मी एका बाकाच्या एका टोकावर बसकण मारली.
बाकाच्या दुसऱ्या टोकावर एक आई बसली होती.तिची मुलगी झोपाळ्यावर खेळत होती. तिच्याकडे ती बघत होती.ती आई म्हणाली,की ती छोटी मुलगी खरोखरच विस्मयकारक होती,असं तिला वाटत होतं.माझ्या त्या निराश अवस्थेमुळे की काय मी एरवी जसा तिला प्रतिसाद दिला असता, तसा दिला नाही.तिच्या त्या झोपाळ्यावर खेळणाऱ्या सहा-सात वर्षांच्या मुलीत मला तर काहीच विस्मयकारक दिसत नसल्यांच मी तिला सांगितलं.
"तिनं मला सांगितलं,"एकतर मी तिची आई नाही. मी असायला हवं होतं.दुसर म्हणाजे मी आयुष्यात बघितलेली सर्वात जास्त विस्मयकारक ती मुलगीच आहे.मी सेंट कॅथरिन हॉस्पिटलमध्ये स्वयंसेविका म्हणून काम करते.गंभीर दुखण्याचे बळी असलेल्या रोग्यांचे आयुष्य सुखावह करण्याचा एक उपक्रम आहे,त्यांत मी काम करते.एमिली असाध्य अशा कर्करोगाने आजारी आहे. तिच्यावर कित्येक शस्त्रकिया झाल्यात.तिचं अर्ध आयुष्य वेदनेशी झगड्यात,
रूग्णालयातच गेलंय.तिला विशेष इच्छा कसली आहे,आम्ही ती पुरी करू,असं तिला सांगितल्यावर तिनं बागेत दिवसभर खेळण्यात घालवायची तिची इच्छा असल्याचं सांगितलं. आम्ही तिला म्हटलं की "खूप मुलांना डिस्नेलँड, नाहीतर सुमद्रकिनारा नाहीतर कुठलातरी चेंडूच खेळ खेळायला जायचं असतं.त्यावर ती नुस्ती हसली आणि म्हणाली,"ते तर छानच असेल,पण मला बागेतच जाऊन दिवस घालवायचा आहे." "तिनं पुढं सांगितलं,की एमिलीनं रूग्णालयातल्या सगळ्यांच्या मनाला स्पर्श केला आहे आणि त्या सर्वांच्या आयुष्यात चांगला फरक पडला आहे. तेवढ्यात झोका थांबवून गवतावरून चालत येत एमिली आम्हां दोघांमध्ये येऊन बसली.माझ्याकडे बघत तिनं जे स्मित केलं त्याचा विसर पडणे अशक्य.तिचं नांव एमिली आहे,आणि ती दिवसभर बागेत खेळायला आली आहे असंही तिनं संगितलं.
माझापण बागेतला तिच्यासारखा खास दिवस आहे का असं तिनं…अपुरे..
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!!..सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल …
सारासारविवेकाचा वापर करूनच अडचणी टाळता येतात.आयुष्यातल्या अडचणींचा अनुभव घेतल्यानेच तर चांगला सारासारविवेक करता येतो.