खरं तर पायवाट-वारूळ मरायला टेकलं होतं.एखादं वारूळ जगणं,त्यानं नव्या वारुळाला जन्म देणं,हे सगळं आकड्यांच्या खेळातून ठरत असतं.त्याबाबतचा नियम सोपाही आहे,आणि कठोरही.वाढा,नाहीतर मरा ! सततची लोकसंख्यावाढ,संगोपन दालनांमध्ये जास्त मुंग्या उत्पन्न होत राहणं,यावरच वारूळ या महाप्राण्याचा ताळेबंद ठरतो.सगळ्या मुंग्यांची सगळी वागणूक या एका बाबीवरच बेतलेली असते.कारण सोपं आहे. मोठी वारुळं जास्त वेगानं वाढतात.नव्या राजकुमारी घडवणं, नर घडवणं,हेही मोठ्या वारुळांमध्ये जास्त घडतं.अर्थातच मोठ्या वारुळांपासून नवी वारुळं घडणंही जास्त प्रमाणात होतं.वारूळ जोमदार असणं-नसणं,हे त्या वारुळातल्या राणीच्या जीन्सप्रमाणे ठरतं. 
जोमदार वारुळांपासून नवी वारुळं जास्त घडतात,तर कमी जोमदार वारुळांपासून नवी वारुळं कमी घडतात.एकूण मुंग्यांच्या प्रजातीचा विचार केला,तर तिच्या प्रजेत जोमदार वाढीचे जीन्स पिढी-दर-पिढी वाढत जातात. उलट टोकाला जोमदार वाढ न घडवणारे जीन्स कमी होत जाऊन अखेर नष्ट होतात.तर पायवाट-वारुळाच्या मुंग्यांना उमगलं,की आपली राणी मेली.आपलं वारूळ वाढणं थांबलं.पण साध्या मुंग्यांमधले फेरोमोन-संदेश चालू होतेच.अन्न सापडणं,आजार,अन्नसाठा,साऱ्यांची चर्चा होतच राहिली.रोज सकाळी उठून कामकरी मुंग्या अन्न शोधायला बाहेर पडतच राहिल्या.राणी जिवंत असतानाचा जोम,जोश मात्र संपला.राणी मरण्याच्या आधीही तिची तब्येत काही आठवडे खालावत होतीच.
('वारुळ पुराण',माधवगाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )
या अनारोग्यामुळे राणीकडून येणारे फेरोमोन-संदेशही बदलले होते.ती अंडी कमी देत होती.अंड्यांपासून होणाऱ्या अळ्यांची संख्या घटत होती.अंडी वाहन नेणाऱ्या अळ्यांचं संगोपन करणाऱ्या कामकऱ्यांना जास्तीजास्त मोकळा वेळ मिळत होता.अन्नासाठी भटकणाऱ्यांची संख्याही रोडावत होती.या सगळ्या आता कमी काम असलेल्या मुंग्याचे फेरोमोन-संदेशही बदलत होते.यांचा सर्वांत महत्त्वाचा परिणाम झाला वारुळातल्या तरुण सैनिक मुंग्यांवर,एरवी वारुळातच राहणाऱ्या,फारतर दारावर गस्त घालणाऱ्या या मुंग्या, आकारानं कामकऱ्यांपेक्षा मोठ्या.यांची डोकी स्नायूंनी लगडलेली असतात.जबड्यांच्या कडा धारदार असतात. भरपूर स्नायूमुळे जबडे कचकन चावे घेऊ शकतात, अगदी शत्रूचे तुकडे पाडण्याइतक्या जोरानं.
सगळ्या वारुळाचं रक्षण करणारा बलदंड मुंग्याचा प्रकार असतो तो.वय वाढलं की या सैनिकांना बाहेर जावं लागतं.मोठे अन्नसाठे राखण,इतर वारुळाच्या मुंग्यांना घाबरवण, मारणं,अन्नाची ने-आण करण्याच्या वाटांवर गस्त घालणं,अशी कामं करावी लागतात.
तरुणपणी मात्र त्यांना वारुळातच राहावं लागतं,राणीच्या आसपास.
आणि त्यांच्यात पाचसात गर्भाशय असतात.
त्यांच्यातून त्या अंडी देऊ शकतात.विशिष्ट फेरोमोन-संदेश या लढवय्या माद्यांना 'आई' बनवू शकतात.
राणीच्या शरीरातून येणारे फेरोमोन-संदेश मंदावले,आणि तरुण लढवय्यांना ते जाणवलं.
शिंगांमधून मंदावलेल्या राणी-संदेशांना मुंग्यांच्या मेंदूपर्यंत पोचता आलं,आणि मेंदूंनी डोक्याच्या भागातल्या एंडोक्राइन ग्रंथींना कामाला लावलं.या ग्रंथींमधून निघणाऱ्या हॉर्मोन्समुळे लढवय्यांची गर्भाशयं वाढू लागली.बारीक कणांसारख्या अंडबीजांचा गर्भाशयाबाहेर जाण्याचा प्रवास सुरू झाला.गर्भाशय सोडेपर्यंत अंड्यांची वाढही पूर्ण झाली.
ज्या तरुण लढवय्यांमध्ये हे बदल घडू लागले,त्यांची अंडी देण्याची क्षमता आजवर राणीच्या फेरोमोन-संदेशामुळे बंद पडलेली होती.आता राणी नसल्यामुळे त्या जननक्षम झाल्या व त्यांनी आपली नेहमीची राखणदारीची कामं बंद केली.त्या अंडी, अळ्या आणि कोषांच्या संगोपन दालनाजवळ जाऊन राहू लागल्या.
राणीचे शेवटचे अवशेष हटवले गेले,आणि या नव्या सैनिक-राण्या अंडी देऊ लागल्या.वारुळाला नव्यानं चालना मिळायची ही शेवटची आशा होती.
आसपासच्या कामकरी मुंग्यांनी या नव्या सैनिक-
राण्यांचा अधिकार मान्य करून त्यांची सेवा सुरू केली. ही सहनशीलता म्हणजे वारुळाच्या स्थितीतल्या प्रचंड बदलाची खूण होती.राणी जिवंत असताना इतर कोणी अंडी द्यायचा प्रयत्न केला असता,तर कामकऱ्यांनी, सैनिकांनी या पुंड नव्या राणीवर हल्ला करून तिची खांडोळी उडवली असती.मुंग्यामधला हा अगदी मूलभूत नियम आहे.की एक निरोगी राणी असताना वारुळात इतर कोणालाही अंडी देण्याची.
प्रजनन करण्याची मनाई आहे.कोण्या मुगीन अंडी देण तर दूरच,ती अंडी देऊ शकते असं जरी कळलं,तर तिचा छळ केला जातो. कामकरी मुंग्या तिला अन्न देत नाहीत,तिच्या अंगाखांद्यावर चढून तिचे पाय आणि शिंग ओढली जातात.तिला दंश करून जखमी केलं जातं किंवा मारलं जातं.तिच्यावर विषारी रसायनांचा फवारा मारला जातो. या सगळ्यांतूनही तिनं अंडी घातलीच,तर ती खाऊन टाकली जातात.पण एकदा का राणी मेली,की मग काही मूठभर सैनिक-राण्यांनी अंडी घालणं वारुळातल्या इतर मुंग्यांना चालतं !
आता सैनिक-राण्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली.सगळ्या सैनिक-राण्या संगोपन-दालनांजवळ जायला धडपडायला लागल्या,आणि तिथे पोचल्यावर अंड्यांच्या जवळ जायला धडपडायला लागल्या.
एकमेकींच्या अंगावर चढून त्या इतरांचे पाय,शिंगं पकडायला लागल्या.स्पर्धक पकडीत आली,की तिला संगोपन-दालनापासून दूर ओढत न्यायला लागल्या.
राणी मुंगीचं राज्य असताना या सैनिक-मुंग्यांना एकमेकींची ओळख पटत असे,ती फक्त "आपल्या वारुळातली आपली बहीण" एवढीच.आता त्यांना सुट्या स्पर्धक 'व्यक्ती' ओळखू यायला लागल्या.
अशी ओळख पटल्याशिवाय स्पर्धा शक्यच नसते.
हळूहळू स्पर्धक सैनिक-राण्यांमध्ये श्रेणी ठरली.ही मोठी,ती धाकटी असा क्रम ठरला.सर्वांत सबळ सैनिक-राणीच अंडी देणार,आणि इतर साऱ्या
नेहमीची सैनिकी काम करणार,असं आपोआप ठरत गेलं.एकूण अंडी देणं राणी-मुंगीच्या काळातल्या जोमानं होत नव्हतं.वारुळाची प्रजा पूर्वीइतक्या जोमाने वाढत नव्हती.पण जी वाढ होत होती,ती पद्धतशीर,शिस्तबद्ध तन्हेनं होत होती.या मुख्य सैनिक राण्यांची अंडी देण्याची क्षमता राणी-मुंगीच्या क्षमतेइतकी नव्हती. प्रत्येक सैनिक-राणीचा अंड्यांचा साठा लहानसाच होता.एकेक जण आपली सगळी अंडी द्यायची,आणि नवी सैनिक मुंगी तिची जागा घ्यायची.राणीच्या मृत्यूने ओढवलेली आपत्ती स्पर्धेतून,सैनिक-राण्यांच्यात क्रम ठरून पुढे ढकलली गेली.पायवाट वारुळाला आपली मुंग्याची जात कशी घडली, कशामुळे टिकली,याचा इतिहास माहीत नव्हता.आपली सध्याची स्थिती कशी आहे,हेही वारुळाला नेमकेपणान माहीत नव्हतं.मग आपण टिकून राहण्यासाठी काय कराव.हे तरी कसं ठरवलं जात असे? आणि हे ठरवणं महत्त्वाचं तर आहेच.त्यात चूक झाली तर वारूळच नष्ट होणार.पण पायवाट-वारूळ मूर्ख नव्हतं.त्याला, त्यातल्या सुट्या मुंग्यांना बरंच काही समजत असे.मुंग्या म्हणजे काही बारीक कणांसारखे रोबॉट्स नसतात, जमिनीवर सैरावैरा पळणारे.प्रत्येक मुंगीचा मेंदू माणसाच्या मेंदूच्या एक-दशलक्षांशच असतो.पण येवढ्याशाच बुद्धीनंही बरीच कामे करता येतात.
बुद्धिमत्ता मोजायच्या एका प्रयोगात उंदरांना चक्रव्यूहासारखा वळणावळणांचा रस्ता शिकायला किती वेळ लागतो,ते मोजतात.उंदरांचे मेंदू मुंग्यांच्या कैकपट असतात.पण मुंग्याही उंदरांसारख्या वाटा शिकू शकतात;वेळ मात्र दुप्पट लागतो.मुंग्या पाच वेगवेगळ्या जागांना जोडणारे रस्ते आठवणीत साठवू शकतात. एखादी नवी जागा शोधताना भरपूर वळणं घेत, चुकतमाकत गेलेली मुंगी ती जागा सापडल्यावर मात्र थेट सरळ रेषेत पुन्हा वारुळाकडे परत येऊ शकते, एवढी बुद्धी मुंग्यांना असते.मुंग्यांना स्वतःच्या वारुळाचा वास तर ओळखू येतोच,पण काही प्रकारच्या मुंग्यांना केवळ वासांनी रेखलेल्या वाटांपैकी एखादी वाट आपण आधी चाललो आहोत का,हे ओळखता येतं.म्हणजे वारुळाच्या वासासोबत स्वतःचाही वास ओळखू येतो.
आणि वारुळातल्या सगळ्या मुंग्यांचं सगळं ज्ञान एकत्र पाहिलं,तर कीटकांच्या विश्वात वारुळं चांगलीच ज्ञानी आणि हुषार असतात.वारुळाला बांधून ठेवणारी,एकत्र करणारी राणी मेल्यावर हे सगळं ज्ञान वापरत,सगळी हुषारी वापरत पायवाट-वारूळ पुन्हा मार्गी लागलं.
राणी-मुंगीची जागा पहिल्या सैनिक राणीनं घेतली आणि वारूळ पुन्हा सुरळीत जगू लागलं.अंडी दिली जायला लागली.नवी प्रजा घडायला लागली.संगोपन दालनं अळ्यांनी भरली.कामकरी मुंग्या नव्या सैनिक राणीचा वास ओळखून कामाला लागल्या.अन्न गोळा होऊ लागलं.वारुळाची शिस्त नव्यानं घडवली गेली.
या 'नवी घडी,नवा राज'या व्यवस्थेच्या घडवणुकीत एक कामगार-अभिजन प्रकारची मुंगी होती.एकूण कामकरी मुंग्यापैकी सहाएक टक्के मुंग्या या अभिजन मुंग्या इतर कामकऱ्यापेक्षा वेगानं हालचाल करायच्या.
त्या नवी काम करायला सुरुवात करायच्या.काम नेटानं आणि जोमानं करायच्या.काम संपेपर्यंत त्या हटायच्या नाहीत. इतर कामकरी मुंग्या अभिजनांना कामांमध्ये मदत करायच्या.वारुळाचं आयुष्य वाढवण्यात या महत्त्वाच्या असायच्या;नुसत्याच चळवळ्या नसायच्या.
नवी व्यवस्था घडवणारी मुंगी राणीच्या अखेरच्या दिवसांमध्ये तिची सेवा करणाऱ्यांपैकी होती.ती इतर अभिजन-कामकऱ्यांसारखीच उत्साही आणि जोमदार होती.नवी सैनिक-राणी अंडी द्यायला लागल्यावर ही वारुळाच्या प्रवेशद्वाराजवळ गेली.सैनिक मुंग्या राणी व्हायला धडपडत असल्यानं रक्षणव्यवस्था ढिली पडली होती.नवं अन्न शोधायला जाणाऱ्या कामकरी मुंग्या सुस्तावल्या होत्या.तर आता ही एकटीच नवं अन्न शोधायला गेली.आधी वारुळाजवळ,आणि मग दूरदूर चकरा मारत ती अन्न शोधत होती.अन्न सापडलं,की इतर कामकऱ्यांना ती कामाला लावायची.
पण राणीशिवायचं वारूळ फार काळ जगू शकतच नव्हतं.वारुळाच्या आनुवंशिकतेनं एक विचित्र गोष्ट घडवली होती.कामकरी मुंग्यांचा निःस्वार्थ परोपकार आनुवंशिक.फेरोमोन-संदेश आणि ते देण्याघेण्याची इंद्रियंही आनुवंशिक.तशीच हीपण आनुवंशिक बाब होती.इतिहासातल्या सर्व प्रकारच्या,सर्व प्रजातीच्या मुंग्यांमध्ये हा गुण होता;तसाच पायवाट वारुळातही.हा गुण असा सांगता येईल : संभोगातून फळणारी अंडीच फक्त माद्यांना जन्म देतील,मग त्या राण्या असोत, सैनिक असोत,अभिजन असोत की साध्या कामकरी मुंग्या असोत.संभोगाशिवाय घडलेली सर्व अंडी मात्र नरांनाच जन्म देतील;फक्त माद्यांशी संभोग करणाऱ्या; इतर कोणतंही काम न करता येणाऱ्या नरांनाच.आणि सैनिक राण्यांनी कधी संभोग केलेलाच नव्हता.त्यांची अंडी फक्त नरांनाच जन्म देऊ शकत होती.आणि नरांचा वारूळ चालवण्यात काडीचाही उपयोग नसतो. नरांपाशी फक्त राजकुमारी शोधायला मोठे डोळे असतात,संभोगासाठी मोठी जननेंद्रियं असतात,आणि फार कामं करायची नसल्यानं बारकासा मेंदू पुरतो. उड्डाण,राजकुमारीला शोधणं,गाठणं,फळवणं,की संपलं नराचं काम.आणि यांपैकी कोणतंच काम वारुळासाठी नसतं.ती सगळी कामं फक्त नवी वारुळं घडताना उपयोगी असतात.नरांना उड्डाणाशिवाय संभोग करता येत नाही,आणि सैनिक राण्यांना उडता येत नाही.
एखाद्या शोकान्त महाकाव्याप्रमाणे राणी मुंगीच्या मृत्यूनंतरच्या घटना घडत गेल्या.जर याच काळात हवामान अनुकूल असलं,तर संभोग उड्डाणं होतील. पायवाट-वारुळातले नर आपल्या किंवा इतर वारुळांमधल्या राजकुमारींना गाठून संभोग करतील. पायवाट वारुळाचे जीन्स इतर नव्या वारुळांमध्ये जाऊन पोचतील.एकूण मुंगी प्रजातीच्या उत्क्रांतीला यानं काही लहानशी मदतही होईल.पायवाट वारूळ मात्र स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकणार नाही.त्या महाप्राण्याचा मृत्यू काहीही करून टाळता येत नाही.मृत्यूही शांतपणे येणार नाही.एकेक सैनिक,
अभिजन, कामकरी मुंगी मेल्याशिवाय वारूळ मरणार नाही. आसपासच्या वारुळांना पायवाट-वारूळ मेल्याचं कळेल.ते या मरू घातलेल्या वारुळाची अंगांगं खायला युद्ध पुकारतील.आणि पायवाट वारुळाला हे युद्ध कधीच जिंकता येणार नाही.राणीचं नेतृत्व नसलेल्या पायवाट वारुळाला इतर वारुळं संपवून टाकतील.