* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३/१२/२५

अक्षय्यतेचा नियम / Law of Inexhaustibility

आणि लव्हायेजेनं 'खडूचे आम्ल'असं नाव दिलेली 'बद्ध हवा' हा चौथा प्रकार असे ते हवेचे प्रकार होते. जोसेफ ब्लॅकन याचा शोध २५ वर्ष अगोदर लावला होता.काही काळानंतर शास्त्रज्ञ 'ही श्वसनाद्वारे घेता येणारी हवा सर्व आम्लाचा मुख्य भाग आहे' अशा निष्कर्षापर्यंत आले.हा दृष्टिकोन नंतर चुकीचा दाखवला गेला तो हायड्रोक्लोरिक आम्लाच्या उदाहरणाद्वारे.मात्र १७७९ मध्ये लव्हायेजेनं आम्ल निर्माण करणारा अशा अर्थी ग्रीक शब्दावरून 'ऑक्सिजन' हे नाव सुचवलं. ग्रीकमध्ये 'ओक्सु' म्हणजे आम्ल आणि 'जीन' म्हणजे बनवणारा. लव्हायेजेनं ऑक्सिजनाचा कार्बनबरोबर संयोग होऊन 'स्थिर हवा' (कार्बन डाय ऑक्साइड) तयार होते' असं दाखवलं.लव्हायेजेनं १७८७ मध्ये या वायूला 'कार्बोनिक आम्ल वायू' असं नाव दिलं. लव्हायेजेनं दुसऱ्या एका प्रयोगात हिरा ऑक्सिजनच्या सान्निध्यात जाळला असता त्याचे कार्बन डाय ऑक्साइडमध्ये रूपांतर होते असं दाखवून दिलं.खरं पाहता साधारण १७० वर्षांपूर्वी शील,

प्रिस्टले आणि लव्हायेजेच्या अगोदर पोलिश किमयागार मायकल सँडिवोगसनं नत्र किंवा चिली सॉल्टपीटर ३३६ अंश तापमानाला तापवून त्यापासून 'नत्र हवा' म्हणजेच ऑक्सिजन मिळवला होता. 'माणूस पृथ्वीवर निर्माण झाला आणि इथल्या हवेवर तो जगतो,कारण त्या हवेत जगण्यासाठी अन्न अस्तित्वात आहे' असं त्यानं लिहून ठेवलं आहे.

सँडिवोगसला हवा ही वायूंचं मिश्रण आहे याचा अंदाज होता.रॉबर्ट बॉइलचा समकालीन असलेल्या जॉन मेयोनं दाखवून दिलं होतं,की नत्र हवा श्वासावाटे आत घेतल्यावर रक्ताला लाल रंग येतो.हीच नत्र हवा ज्वलनाला मदत करते आणि श्वसनावाटे प्राण्याच्या रक्तात जाते.'शुद्ध ऑक्सिजन थेरपी' म्हणून जास्त प्रमाणावर वापरण्याचा विचार सुचला तो थॉमस बेडोस याला. १७९८ साली त्यानं ब्रिस्टॉल येथे एक संस्थाच उभी केली आणि या कामासाठी हम्फ्रे डेव्हीला नियुक्त केलं. पण शुद्ध ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा न झाल्यानं बेडोसनं १८०२ मध्ये ही संस्था बंद केली. कमी प्रमाणातला ऑक्सिजन जसा धोकादायक असतो तसा जास्त प्रमाणातला ऑक्सिजन पण धोकादायक असतो.

हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नियंत्रित प्रमाणात दिला जातो.लव्हायेजे निसर्गाला एक रासायनिक प्रयोगशाळाच म्हणत असे."या निसर्गाच्या प्रयोगशाळेत सतत नवीन पदार्थ तयार होतात आणि त्यांचे विघटनही होते" असं तो म्हणायचा.लव्हायेजे रसायनशास्त्राच्या प्रयोगात इतका बुडालेला असायचा की 'जीवन म्हणजे एक रासायनिक प्रक्रिया आहे' असं त्यानं लिहून ठेवलं होतं.ऑक्सिजनचा शोध लागताच आणखी काही रहस्यांचा उलगडा झाला.


पृथ्वीवरच्या वातावरणात सगळीकडे ऑक्सिजन आढळतो.

वातावरणात ऑक्सिजनची सातत्यानं निर्मिती होते,तसंच त्याचा सातत्यानं वापरही होत असतो.


त्यामुळे वातावरणातल्या ऑक्सिजन सजीवांकडे आणि तिथून पुन्हा वातावरणात असं चक्र चालूच असतं.ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून,इतर अनेक मूलद्रव्यांशी आणि संयुगांशी त्याचा संयोग होतो.ऑक्सिजन हा रेण्वीय ऑक्सिजन,पाणी,कार्बनडाय ऑक्साइड आणि असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात आढळतो.प्रकाशसंश्लेषण क्रियेत

ऑक्सिजनची निर्मिती होते तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यांसारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. 


ज्वलनशील हवेचं ज्वलन होत असताना भांड्यात ओलावा निर्माण होत असल्याचं अनेकांनी नोंदवून ठेवलं होतं.याचा पद्धतशीर पाठपुरावा हेन्री कॅव्हेंडिशनं केला.आपल्या प्रयोगशाळेतल्या काचेच्या पोकळ नळ्या हायड्रोजन आणि चॉक्सिजन यांनी भरल्या.या मिश्रणातून त्यानं विद्युत ठिणगी धाडताच आतल्या बाजूला धुकं तयार होत असल्याचं आढळलं.सतत १० वर्ष कॅव्हेंडिशनं हे प्रयोग केले आणि काटेकोर मोजमाप करून तयार होणाऱ्या धुकं आणि हवेचं मोजमाप केलं.१७८४ साली रॉयल सोसायटीला कॅव्हेंडिशनं आपले निष्कर्ष धाडले.त्याचे निष्कर्ष असे होते दोन भाग हायड्रोजन (कॅव्हेंडिश त्याला फ्लॉजिस्टॉन म्हणायचा.) आणि एक भाग ऑक्सिजन (कॅव्हेंडिश त्याला फ्लॉजिस्टॉनविरहित हवा म्हणायचा.) यांचा संयोग घडून येताच त्यापासून पाणी तयार होते. १७८३ साली जेम्स वॉट यानंसुद्धा पाण्याचे घटक यावर आपला शोधनिबंध प्रकाशित केला.


स्थिर हवा आणि ज्वालाग्राही हवा कालांतरानं पृथ्वीच्या वातावरणात आढळली.पण पूर्वी हवेला अभिजात वायूचाच एक प्रकार समजण्यात यायचा. वातावरणातली हवा ही अनेक प्रकारच्या वायूंच्या मिश्रणातून बनली आहे हे कोणाच्या गावीही नव्हतं. प्राचीन काळापासून माणसाला सॉल्टपीटर आणि नायट्रिक आम्ल ही नायट्रोजनची संयुगं ठाऊक होती. त्यामधून पडणाऱ्या तपकिरी रंगाच्या वाफाही माणसाच्या नजरेस आल्या होत्या. पण त्यापासून नायट्रोजन वायुरूपात वेगळा करणं त्या वेळेला अर्थातच अशक्य होतं.साधारण १७७६च्या सुमारास हेन्री कॅव्हेंडिशनं आणि जोसेफ प्रिस्टलेनं निरनिराळ्या वायूंमध्ये विद्युत विमोचनाचे कोणते परिणाम घडून येतात ते तपासायला सुरुवात केली. त्याला हवेचे 'साधी हवा,ज्वालाग्राही हवा आणि स्थिर हवा' असे तीनच प्रकार माहीत होते.या प्रयोगातून निष्पन्न असं काहीच झालं नाही.पण दमट हवेतून वीज सोडली असता नायट्रिक आम्ल मिळतं असं त्याच्या लक्षात आलं. पुढे = १७७७ मध्ये 'मी हवेचा एक नवा प्रकार तयार केला असून तिला 'विषारी हवा' किंवा गुदमरवणारी हवा' असं नाव दिलं आहे' असं कॅव्हेंडिशनं प्रिस्टलेला खासगी पत्राद्वारे कळवलं. ही हवा तयार करण्यासाठी कॅव्हेंडिशनं नेहमीच्या हवेला तप्त कोळशावरून पुनःपुन्हा नेलं आणि मिळालेली स्थिर हवा अल्कली द्रव्यामार्फत पुन्हा शोषून घेतली.यातून उरणारा भाग म्हणजे 'गुदमरवणारी हवा,' कॅव्हेंडिशनं यावर अधिक संशोधन केलं नाही.जे सापडलं ते प्रिस्टलेला कळवून मोकळा झाला. 


प्रिस्टले त्याच सुमारास दुसऱ्या प्रयोगात गुंतल्याने त्यानं कॅव्हेंडिशचं पत्र फारसं गांभीर्यानं घेतलं नाही. प्रिस्टलेनं धातूंच्या सान्निध्यात अनेक ज्वालाग्राही पदार्थ जाळले.

त्यामध्ये जीस्थिर हवा मिळाली ती चुन्याच्या निवळीच्या साहाय्यानं वेगळी केली. 


प्रिस्टलेला असं आढळलं,की या साऱ्या प्रकारात हवेचे आकारमान घटते.पण प्रिस्टलेनं जे काही बघितलं ते स्पष्ट करण्यासाठी फ्लॉजिस्टॉन सिद्धान्ताचा आधार घेतला.

'धातूच्या भाजण्याच्या क्रियेत जे काही होते ते फ्लॉजिस्टॉनमुळेच होते' अशी प्रिस्टलेला खात्री होती.ही हवा उरते त्यात फक्त फ्लॉजिस्टॉनच उरतो म्हणून प्रिस्टले त्या हवेला 'फ्लॉजिस्टॉनयुक्त हवा' असं म्हणायचा. धातूच्या भाजण्याच्या क्रियेत उपकरणातला ऑक्सिजन धातूशी संयोग पावतो आणि नायट्रोजन उरतो हे आज आपण सांगू शकतो.पण प्रिस्टलेनं केवळ अज्ञानामुळे त्या हवेला फ्लॉजिस्टॉनयुक्त हवा म्हणे.आपल्याला नक्की काय सापडलं ते प्रिस्टलेला कळलंच नाही.पुढे जेव्हा ऑक्सिजन शोधला गेला तेव्हाच या नव्या वायूचं स्वरूप स्पष्ट झालं.


नायट्रोजनच्या शोधाचं श्रेय डॅनियल रुदरफोर्ड याला दिलं जातं.त्यानं कॅव्हेंडिश आणि प्रिस्टले यांनी केलेलेच प्रयोग परत करून बघितले. त्यानं निःसंदिग्धपणे नायट्रोजनचे गुणधर्म १७७२ च्या एका प्रबंधात सांगितले.हा वायू चुन्याच्या निवळीत किंवा अल्कलीमध्ये शोषला जात नाही. आणि तो श्वसन किंवा ज्वलनासाठीही उपयुक्त नाही. डॅनियल रुदरफोर्डनं या वायूला 'अशुद्ध हवा' असं नाव दिलं.या वायूला निश्चित असं नाव आणि चिन्ह लव्हायेजे आणि इतर शास्त्रज्ञांनी रासायनिक नावांची परिभाषा तयार केली तेव्हा दिलं. 'नायट्रोजेनिअम' या लॅटिन शब्दावरून सॉल्टपीटर तयार करणारे या अर्थी 'नायट्रोजन' हे नाव या वायूला दिलं.


डॅनियल रुदरफोर्डचा १७४९ साली एडिनबर्गमध्ये जन्म झाला.त्याचे वडील जॉन रुदरफोर्ड एडिनबर्ग विद्यापीठात वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक होते. डॅनियल रुदरफोर्डही एडिनबर्ग विद्यापीठात वैद्यकशास्त्र शिकला.पण त्याला सर्वात जास्त रस होता ते रसायनशास्त्रात आणि वनस्पती विज्ञानात ! १७८६ साली एडिनबर्ग विद्यापीठातच त्याची वनस्पती विज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.त्याच साली रॉयल बॉटनिक गार्डनचा प्राध्यापक जॉन होपच्या निधनानंतर त्याच्या जागी डॅनियल रुदरफोर्डची नेमणूक झाली. ही दोन्ही पदं डॅनियल रुदरफोर्डनं आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे १८१९ पर्यंत भूषवली.डॅनियल रुदरफोर्डला रसायनशास्त्रात रस उत्पन्न झाला तो त्याचा शिक्षक जोसेफ ब्लॅकमुळे ! त्यावेळी जोसेफ ब्लॅकचे प्रयोग चालले होते ते हवेच्या गुणधर्माबाबत ! एका काचेच्या बरणीत मेणबत्ती पेटवली की ती थोड्या वेळानं विझत असल्याचं त्याला आढळलं.एरवी मेणबत्ती पेटवल्यावर त्यातलं मेण जळत राहतं.मेण संपूर्ण जळून संपून गेल्यानंतरच मेणबत्ती विझते. पण या बरणीत मेणबत्ती मेण संपल्यानं विझत नव्हती तर ती मध्येच विझत होती.आता आपल्याला ही अतिशय साधी गोष्ट वाटते. पण शास्त्रज्ञांना कुठलीही घटना साधी वाटत नाही. हे असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यानं मेणबत्ती जळल्यानंतर तयार होणारा धूर किवा वायू काळजीपूर्वक बाहेरची हवा आत न येऊ देता एका द्रवात मिसळला.पण तरीसुद्धा काचेच्या बरणीत ठेवलेली मेणबत्ती पेटत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं,साहजिकच आता काचेच्या बरणीत मेणबत्ती जळल्यानंतर तयार होणारा घर किंवा वायू नाही हे आता स्पष्ट होत होतं.कारण जोसेफ ब्लॅकनं तो घर किंवा वायू या आधीच एका द्रवात विरघळून काढून टाकला होता.बरणीच्या हवेत अजून एक घटक आहे जो ज्वलनाला मदत करीत नाही असं जोसेफ ब्लॅकच्या लक्षात आलं.मग त्यानं हा प्रश्न डॅनियल रुदरफोर्डला सोडवायला सांगितला.


डॅनियल रुदरफोर्डनं एका बरणीत उंदराला कोंडून ठेवलं आणि बरणीत बाहेरून हवा जाणार नाही अशा पद्धतीनं घट्ट बंद केली.त्या बरणीत त्यानं एक मेणबत्ती आणि फॉस्फरस ते विझेपर्यंत जाळले. बरणीतली हवा काळजीपूर्वक त्यानं एका आम्लारी धर्मी द्रवातून जाऊ दिली.त्याचा उद्देश हा होता, की मेणबत्तीच्या ज्वलनामुळे तयार होणारी हवा शोषून घेतली जाईल.आता बरणीत उरलेल्या हवेत मेणबत्ती विझते आणि उंदीरही मरतो असं डॅनियल रुदरफोर्डच्या लक्षात आलं.

अर्थात,ही उरलेली हवा ज्वलनाला मदत करत नाही आणि त्यात प्राणीही जगू शकत नाहीत.१७७२ साली डॅनियल रुदरफोर्ड आणि ब्लॅकनं आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले.पण याचं स्पष्टीकरण त्यांनी फ्लॉजिस्टॉन सिद्धान्ताच्या आधारे देण्याचा प्रयत्न केला.उंदराचे श्वसन आणि मेणबत्ती तसंच फॉस्फरसचं जळणं यामुळे जी हवा निर्माण झाली तिलाच 'बद्ध हवा' असं नाव दिलं गेलं.याबरोबरच त्यातून फ्लॉजिस्टॉन बाहेर पडला असं रुदरफोर्डनं म्हटलं.

रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार बरणीत आता फक्त फ्लॉजिस्टॉन शिल्लक राहिला आहे. रुदरफोर्डनं या हवेला 'बद्ध हवा' तर प्रिस्टलेनं याला 'फ्लॉजिस्टॉनमय' हवा असं नाव दिलं.शील आणि कॅव्हेंडिश दोघंही याच हवेचा अभ्यास करत होते. १७८९ साली लव्हायेजेनं या वायूला 'अझोट' असं नाव सुचवलं.ग्रीकमध्ये अझुटोस म्हणजे 'जीवनविरहित.' या वायूच्या सान्निध्यात प्राणी जगत नाहीत.तो नायटर या पदार्थाचा एक भाग आहे.नायटर म्हणजे 'सॉल्टपीटर.'त्याचं रासायनिक नाव पोटॅशियम नायट्रेट.पोटॅशियम नायट्रेट हे 'गन पावडर'मध्ये वापरतात.फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ जीन अँटोनी चॅप्टल (१७५६-१८३२) यानं त्याच्या आपल्या १७९० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात या वायूचा सर्वप्रथम 'नायट्रोजन' असा उल्लेख केला. हा शब्द त्यानं ग्रीकमधल्या 'नायट्रॉन' किवा 'नायटर' या शब्दावरून घेतला.नायटोजन हे ग्रीक शब्दाचं इंग्रजीतलं रूप.या नायट्रोजनचं वातावरणातलं एक चक्र आहे.इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे आणि तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही. 


बहतेक सजीवांना मुक्त स्थितीतला नायट्रोजन वापरता येत नाही.नायट्रोजनचं रूपांतर वातावरणीय,औद्योगिक तसंच जैविक प्रक्रियेद्वारे नायटेट आणि नायट्राइट या संयुगात होतं. सजीवांनी वापरलेला नायट्रोजन सजीव मृत झाल्यावर त्याचे अवशेष,उत्सर्जित पदार्थ यांचं विघटन होऊन त्यातून अमोनिया मुक्त होतो. थोडक्यात,वातावरणातल्या मुक्त नायट्रोजनचं सजीवांत उपयुक्त अशा नायट्रोजन संयुगात आणि सजीव मृत झाल्यावर पुन्हा नायट्रोजन वायूत रूपांतर होतं.हे चक्र अखंड चालू असतं,१८०७ मध्ये थॉमस यंग (Thomas Young) (१७७३ ते १८२९) यानं ज्या ज्या गोष्टींतून काहीतरी कार्य होऊ शकतं त्या त्या गोष्टी ऊर्जा वापरतात हे सांगून ऊर्जा (एनर्जी) हा शब्द पहिल्यांदाच वापरला.खरं तर एनर्जी हा शब्द ग्रीक 'काम करणं' या अर्थाच्या शब्दावरून आलेला आहे.


एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या भौतिकशास्त्रामध्ये ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात कशी रूपांतरित करता येते किंवा होते याचा बराच अभ्यास झाला. १८४० च्या दरम्यान ब्रिटनचा जेम्स ज्यूल आणि जर्मनीचे ज्यूलियस मेयर आणि हर्मन हेल्महोल्टझ हे किमान तिघे वैज्ञानिक ऊर्जा अक्षय्यतेच्या संकल्पनेपर्यंत आले होते. या संकल्पनेनुसार कोणतीही ऊर्जा दुसऱ्या कोणत्याही ऊर्जेत रूपांतरित करता येते, पण एकूण ऊर्जा कायम तितकीच राहते. कोणत्याही प्रक्रियेत एकूण ऊर्जा कधीही कमी किंवा जास्त होत नाही.


सजीव प्राणी सतत आपल्या अन्नातून ऊर्जा मिळवत असतात,पण वनस्पती मात्र फक्त पाणीच घेतात.पण फक्त पाण्यापासून वनस्पती आपली पानं,फुलं,फळं निर्माण करू शकत नाहीत. थोडक्यात,प्राणी आणि वनस्पती यांच्या फिजिओलॉजीज वेगळ्या असतात असं वाटत होतं.वनस्पती प्राण्यांसारखा श्वासोच्छ्वास करत नाहीत.पण प्रकाश असल्याशिवाय त्या वाढूही शकत नाहीत असं लक्षात आलं होतं.खरं तर पृथ्वीवरच्या ऊर्जेचा स्रोत हा सूर्यापासून येणारा प्रकाश आणि उष्णता हा आहे हे मेयरनं सांगितलं होतं आणि हीच ऊर्जा कोणत्या तरी स्वरूपात सगळ्या सजीवांमध्ये संक्रमित होत असावी असंही मेयरला वाटत होतं.म्हणजेच सूर्यापासून ऊर्जा वनस्पतींमध्ये येते आणि वनस्पतींमधून प्राण्यांमध्ये येते.याचाच अर्थ ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सजीव आणि निर्जीव अशा सगळ्याच गोष्टींना लागू होतो,हे आता लक्षात आलं होतं. ...( समाप्त )

१/१२/२५

अक्षय्यतेचा नियम / Law of Inexhaustibility

फ्रेंच वैज्ञानिक अँटोनी लॉरेंट लव्हायेजे (Antoine Laurent Lavoisier) (१७४३ ते १७९४) हा अठराव्या शतकातला सगळ्यात महान केमिस्ट होता.त्यानं रसायनशास्त्रात अचूक मोजमापांचं महत्त्व लक्षात घेऊन कम्बशनची (ज्वलन) थिअरी निर्माण केली.विशेष म्हणजे ही थिअरी तेव्हापासून आजतागायत तशीच स्वीकारली गेली आहे.या थिअरीत कम्बशन हे ऑक्सिजनच्या सान्निध्यात होणारं रासायनिक ज्वलनच आहे हे त्यानं सांगितलं होतं.शिवाय त्यानं हवेत ऑक्सिजनशिवाय नायट्रोजनही असतो,तो ज्वलनाला मदत करत नाही हेही दाखवलं.लव्हायेजेची ही थिअरी सजीवांनाही लागू होत होती.जी गोष्ट ज्वलनाला लागू होते तीच गोष्ट उंदरालाही लागू पडते.बंद बरणीत एक मेणबत्ती जाळली तर त्यातला ऑक्सिजन वापरला जातो आणि कार्बन डाय ऑक्साइड तयार होते.कार्बन डाय ऑक्साइड हा त्या मेणबत्तीतल्याच पदार्थांपासून तयार होतो.


तसंच सजीवांच्या बाबतीतही हे लागू पडतं.बंद बरणीतला उंदीरही जिवंत असेपर्यंत ऑक्सिजन वापरतो आणि कार्बन डाय ऑक्साइड बाहेर टाकतो.उंदराच्या शरीराला लागणारा ऑक्सिजन संपत जातो आणि त्याच्या शरीरात तयार होणारा कार्बन डाय ऑक्साइड बरणीत जमा होतो.तर वनस्पतींच्या दृष्टीनं पाहिलं तर त्या कार्बन डाय ऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. म्हणजेच वनस्पती आणि प्राणी एकमेकांना पूरक आहेत.हे दोघंही मिळून वातावरणातल्या वायूंचा समतोल कायम सांभाळतात.यामुळेच वातावरणातला ऑक्सिजन कायम २१% राहतो आणि कार्बन डाय ऑक्साइड ०.०३% राहतो.


मेणबत्ती आणि उंदीर हे दोघंही ऑक्सिजन वापरतात आणि कार्बन डाय ऑक्साइड हवेत सोडतात हे बघून लव्हायेजेला माणसाच्या श्वसनाची तुलना कम्बशनशी (ज्वलन) करावीशी वाटली.सजीवाच्या शरीरात होणारं श्वसन आणि बाहेर होणारं ज्वलन यांची तुलना करावीशी वाटणं आणि त्यात साधर्म्य दिसणं ही खरंच विचारांची फार मोठी झेप होती.त्याला असं वाटलं की सजीव प्राणी ज्या प्रमाणात ऑक्सिजन वापरतो त्या प्रमाणात उष्णताही निर्माण करत असावा.हे सिद्ध करण्यासाठी त्यानं प्रयोगही सुरू केले.यातूनच पुन्हा एकदा सजीव आणि निर्जीव या दोन्ही गोष्टींना निसर्गाचे सारखेच नियम लागू होत असावेत का हा मुद्दा ऐरणीवर आला.


एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात भौतिकशास्त्राचीही प्रगती झाली.त्यामुळेही लव्हायेजेच्या विचारांना पाठिंबा मिळाला.या दरम्यान अनेकांनी उष्णता या भौतिक परिमाणाचा अभ्यास करायला सुरुवात केली होती.त्यातून वाफेच्या इंजिनाचं महत्त्व वाढलं.त्यातून उष्णतेचा उपयोग करून गाडी चालवणं,गती,प्रकाश, इलेक्ट्रिसिटी,चुंबकत्व या भौतिकशास्त्रातल्या अनेक संकल्पना अभ्यासल्या जायला लागल्या.लव्हायेजेनं आपल्या पूर्वीची पिढी आणि समकालीन शास्त्रीय माहिती एकत्र करून बरोबर अर्थ लावला आणि नवीन पारिभाषिक शब्द तयार केले आणि वर्गीकरण करून माहितीला शास्त्रीय रूप दिलं.लव्हायेजेनं रसायनशास्त्रात खूप मोलाची भर घातली आणि म्हणूनच त्याला 'आधुनिक रसायनशास्त्राचा जनक' म्हणतात.


रासायनिक अभिक्रियांमधलं द्रव्याच्या अक्षय्यतेचं तत्त्व सूत्रबद्ध केलं,मूलद्रव्य आणि संयुगं यातला फरक स्पष्ट केला,रासायनिक संज्ञा देण्याची आधुनिक पद्धत शोधून काढली आणि रासायनिक संशोधनामध्ये परिमाणात्मक पद्धतीचा वापर करायला लव्हायेजेनं प्रथम सुरुवात केली.


अँटोनी लव्हायेजे हा २६ ऑगस्ट १७४३ ला पॅरिसमधल्या एका श्रीमंत घराण्यात जन्मला. लव्हायेजे त्याचा घराण्यातला एकुलता एक मुलगा. त्याचे वडील एक श्रीमंत जमीनदार आणि व्यापारी होते.आपल्या मुलानं कायद्याचा अभ्यास करून मोठेपणी एक निष्णात कायदेपंडित व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती.त्यानुसार लव्हायेजेनं आपलं कायद्याचं शिक्षण पॅरिसमधील मॅझेरीन या कॉलेजातून घेऊन वकिलीची सनदही मिळवली. कायद्याची पदवी घेतल्यानंतर लव्हायेजेला त्या वेळच्या उत्तम वकिलांच्या गटात सहजच प्रवेश मिळाला.मात्र लव्हायेजेचा खरा कल कायद्यापेक्षा विज्ञानाकडेच अधिक होता.कॉलेजात असताना लव्हायेजे रसायनशाखेचे प्राध्यापक बोरादेलिया यांची व्याख्यानं ऐकण्यासाठी नियमित जायचा.या व्याख्यानांच्या वेळी जी प्रात्यक्षिकं होत व्हायची ती लव्हायेजेला भारी आवडायची.

यातूनच लव्हायेजेनं भावी आयुष्यात वैज्ञानिक होण्याचं ठरवून टाकलं. पण वकील म्हणून प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा लव्हायेजेनं पॅरिसमधल्या प्रतिष्ठित विज्ञान अकादमीत विज्ञानाचा अधिक अभ्यास करण्यासाठी १६६८ साली प्रवेश घेतला.त्यानं घरीच प्रयोगशाळा स्थापन करून त्यात अनेक शास्त्रीय उपकरणं ठेवली.


या प्रयोगशाळेचा फायदा घेण्यास सर्व शास्त्रषज्ञास त्यानं मोकळीक दिल्यानं त्यालाही अनेक मोठ्या शास्त्रज्ञांच्या परिचयाचा लाभ झाला.१७६८ मध्ये 'फ्रेंच अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस' या संस्थेत लव्हायेजेची 'सह'रसायनशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाली.१७८५ मध्ये लव्हायेजे या संस्थेचा संचालक आणि १७९१ मध्ये कोषपाल झाला.लव्हायेजेला १७६८च्या सुमारास त्याच्या आईच्या इस्टेटीतून काही वाटा मिळाला.हा पैसा लव्हायेजेनं भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरला.त्यानं 'जनरल फार्म' नावाची आर्थिक व्यवहार बघणारी कंपनी काढली. त्याचं मुख्य काम म्हणजे शेतकऱ्याकडून मीठ आणि तंबाखू यांसारख्या पदार्थांवर कर गोळा करून तो सरकार दरबारी जमा करणे.


इ.स.१७७४ मध्ये लव्हायेजे आणि जोसेफ प्रिस्टले (१७३३-१८०४) यांची पॅरिसमध्ये भेट झाली. ऑक्टोबर १७७४ मध्ये प्रिस्टलेनं आपल्या संशोधनाबद्दल लव्हायेजेला कळवलं.त्या वेळेस प्रिस्टलेनं पाऱ्याचं लाल भस्म तापवल्यानंतर खलनक्रियेला अधिक मदत करणारी हवा तयार होते आणि ती श्वसनासाठी सामान्य हवेपेक्षा पाच ते सहापट जड असते असं सांगितलं.प्रिस्टलेनं तिला 'डिफ्लॉजिस्टिकेटेड हवा (ज्वलन तत्त्व-विरहित हवा)' असं नाव दिलं.लव्हायेजेनं ताबडतोब रेड मर्क्युरिक ऑक्साइडवर प्रयोग सुरू केले.१७७५च्या एप्रिलमध्ये 'अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स'ला लव्हायेजेनं आपले निष्कर्ष कळवले.लव्हायेजेनं काटेकोरपणे प्रयोग केल्यानंतर ज्वलनक्रियेमध्ये आणि धातूंच्या भस्मीकरणामध्ये सामान्य हवेच्या दिलेल्या घनफळामधल्या फक्त काही भागाचाच वापर झाला आणि ती प्रिस्टलेनं शोधलेली नवीन हवा असल्याचं अनुमान काढलं.'साऱ्या पदार्थांचं वजन ज्वलनाअंती वाढतं' असा निष्कर्ष त्यानं काढला. या अभिक्रियांमध्ये हवा भरपूर प्रमाणात लागते हे पाहून लव्हायेजेनं 'हवा ही वेगवेगळ्या वायूंचे मिश्रण असून हे वायू निरनिराळ्या गुणधर्माचे असतात.त्यापैकी काही भाग ज्वलनास उपयुक्त असून तो जळणाऱ्या पदार्थाशी संयोग पावतो आणि 'हवा ज्वलनाला उपयुक्त असते ती श्वसनक्रियेशी फारच अनुकूल असते' असे निष्कर्ष काढले.(सजीव,अमृता देशपांडे,अच्युत गोडबोले,मधुश्री पब्लिकेशन) १७७७ साली प्रसिद्ध केलेल्या 'मेणबत्तीचं हवेतलं ज्वलन' या आपल्या शोधनिबंधात लव्हायेजेनं चार प्रकारच्या हवेचा उल्लेख केला होता.हवेचा पहिला प्रकार म्हणजे वातावरणातली हवा ज्यात आपण राहतो आणि जी श्वासावाटे घेतो ती हवा.प्रिस्टलेनं नामकरण केलेली 'डिफ्लॉजिस्टिकेटेड हवा (ज्वलन तत्त्व-विरहित हवा)' म्हणजेच वातावरणातल्या हवेच्या एकचतुर्थांश श्वसनासाठी उपयुक्त असलेली शुद्ध हवा हा हवेचा दुसरा प्रकार.

रुदरफोर्डनं उल्लेख केलेली,पण त्यावेळी या हवेचे अन्य गुणधर्म माहीत नसलेली 'अझोट हवा' हा तिसरा प्रकार.


(उर्वरित शिल्लक भाग पुढील लेखामध्ये) 






२९/११/२५

कामशास्त्राचा अवलिया रिचर्ड बर्टन / Richard Burton,the master of sex 

माझा दृष्टिकोन नेहमीच थोडा जास्तच वेगळा राहिला आहे.मार्क फ्रॉस्ट ( आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार अज्ञाताचा शोध घेत फिरणाऱ्या अवलियांच्या कहाण्या अर्थात हटके भटके,लेखक निरंजन घाटे,प्रकाशक समकालीन प्रकाशन या पुस्तकातील १७ कहाण्या आपण वाचल्या,आजची ही शेवटची कहाणी.. तुम्ही हळूहळू अखंड पुस्तक वाचलेत.अधूनमधून तुम्ही स्वतःची पाठ थोपटायला हवी.कारण तुम्ही जे करू शकणार नाही असं काही लोकांना वाटत होतं,त्या गोष्टी तुम्ही करून दाखविले आहे.त्यामुळे स्वतःचा अभिमान बाळगा.आज तुम्ही जिथे आहात तिथे येण्यासाठी तुम्ही आजवर बराच संघर्ष केलाय. या गोष्टींची दखल घेतल्याने तुम्हाला समाधान मिळेल आणि तुमची ऊर्जा वाढेल.) मागील लेखावरून पुढे..। केलं,पण ईस्ट इंडिया कंपनीने त्याला परवानगी नाकारली.बर्टन रजेवर असला तरी ईस्ट इंडिया कंपनीचा नोकर होता.कंपनीच्या मते हा प्रकल्प फारच धोकादायक होता.मात्र,कंपनीने अरबी भाषेचा अभ्यास करण्यासाठी बर्टनला एक वर्षाची रजा देण्याचं मान्य केलं,बर्टनने ही रजा आपली योजना राबवण्यासाठीच घालवली.त्याने आता आपल्या योजनेत बदल करून जो प्रवास करायचा ठरवला तो त्याच्या पूर्वनियोजित योजनेपेक्षा अधिक धोकादायक होता.त्याने एंप्टी क्वार्टर पार करून पुढे बिगर मुस्लिमांना प्रवेशबंदी असलेल्या मक्का आणि मदिना या इस्लामी पवित्र स्थळांमध्ये जायचं मनाशी ठरवलं होतं.या वेळीही बर्टनने पुन्हा मिर्झा अब्दुल्ला हे नाव धारण केलं.या स्थळांना भेट देणाऱ्या वार्षिक तीर्थयात्रेत त्याने स्थान मिळवलं.आचार,

विचार,भाषा, उच्चार यांत थोडीशी जरी चूक झाली तरी दगडाने ठेचून मारून टाकण्याचीच शिक्षा मिळू शकते याची त्याला पूर्ण कल्पना होती.असला उद्योग यापूर्वी कुणी केला नव्हता आणि त्यानंतरही कुणी केलेला नाही. बर्टनने ही यात्रा यशस्वीरित्या पार पाडली,याचं कारण त्याचं भाषाप्रभुत्व,

इस्लामी चालीरीतींचा सूक्ष्म अभ्यास आणि त्याचा असाधारण धाडसी स्वभाव.त्याच्या या साहसाने त्याला जागतिक कीर्ती मिळवून दिली.काबाचं जवळून दर्शन घेणारा तो एकमेव बिगरइस्लामी गृहस्थ आहे.बर्टन अरबस्तानातून निघून थोड्या काळासाठी कैरोत थांबला.रजा संपताच तो मुंबईत परतला.मुंबईत त्याने 'पर्सनल नॅरेटिव्ह ऑफ अ पिलग्रिमेज टु एल-मदिना अँड मक्का' हा ग्रंथ तीन खंडांत लिहून पूर्ण केला.रजेनंतर नोकरीवर रुजू न होण्यासाठी त्याने लवकरच दुसरं कारण शोधलं.त्याने कंपनीकडे तेव्हा सोमालियात असलेल्या आणि नंतर इथिओपियात गेलेल्या प्राचीन 'हरार' या शहराचा शोध घेण्याची मोहीम काढायचा प्रस्ताव सादर केला.या शहरात तोपर्यंत कुणीही युरोपियन व्यक्ती गेलेली नव्हती.काही युरोपियन प्रवाशांनी तसा प्रयत्न जरूर केला होता,पण त्यात ते अपयशी झाले होते. त्या वेळी मुंबई इलाख्याच्या कार्यकारी सभेतले एक सदस्य जेम्स ग्रँट लुम्सडेन हे बर्टनला मित्र मानत होते.त्यांच्या प्रयत्नांमुळेच कदाचित हा प्रस्ताव विनाविलंब मान्य केला गेला.१ ऑक्टोबर १८५४ या दिवशी बर्टन मुंबईहून जहाजातून एडनला पोहोचला.इथे तो महिनाभर थांबला.हरारच्या प्रवासासाठीची माहिती मिळवणं आणि तयारी करणं यासाठी त्याने या काळात परिश्रम घेतले.मोहिमेच्या पूर्वतयारीत कुठलीही कसूर ठेवणं त्याला मान्य नसे.मोहिमेचं निम्मं यश पूर्वतयारीत असतं,असं तो म्हणत असे.त्या महिन्याभरात सोमालियाची किनारपट्टी त्याने नजरेखालून घातली.मग सोमालिया, सोमाली जमाती आणि त्यांच्या चालीरीती यांची त्याने सर्व प्रकारे माहिती मिळवली.यात दंतकथा,आधीच्या प्रवाशांच्या आठवणी यांचाही समावेश होता.एडनमध्ये व्यापाराकरता येणाऱ्या सोमालींकडून एडनच्या वेश्यावस्तीत अनेक सोमाली तरुणी वेश्याव्यवसायाकरता दरवर्षी येतात,ही माहिती मिळताच तो त्या वेश्यांना भेटला.


या सोमाली मुलींकडून त्याला 'स्त्रियांच्या सुंतां' बद्दलची (शिश्निकाछेदनाबद्दलची) माहिती मिळाली. मुस्लिमांमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा पाळली जात होती.सुंता न केलेल्या मुलींना अशुद्ध मानलं जात असे आणि अशा स्त्रीच्या पोटी जन्माला आलेली मुलं म्हणजे तिच्यासाठी अपमानास्पद गोष्ट समजली जायची.सुंता केलेल्या मुलींच्या लग्नानंतरच्या यातना किती मरणप्राय असतात याचं वर्णन करताना बर्टन आपला नेहमीचा तटस्थपणा सोडून अतिशय तीव्र शब्दांत या प्रथेची निंदा करतो.

पाश्चात्त्य मानवशास्त्रज्ञांना बर्टनच्या नोंदी प्रसिद्ध होईपर्यंत अशा प्रथेची अत्यल्प कल्पना होती.केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर त्यांनी या प्रथेबद्दल लिहायचं टाळलं होतं.बर्टनच्या नोंदी प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रथेला अधिकृतरीत्या शास्त्रीय ग्रंथांतून जागा मिळू लागली. 'अरेबियन नाइट्स' या आपल्या पुस्तकाच्या पाचव्या खंडात चारशे पंचाहत्तराव्या रात्रीनंतर या प्रथेबद्दलचं विस्तृत टिपण बर्टनने लिहिलं आहे.ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस एका अरब व्यापाऱ्याच्या वेषात बर्टन एडनहून आपल्या नियोजित मोहिमेसाठी निघाला.सोमालीलँडच्या किनाऱ्यावरील प्रीला या बंदरात तो उतरला.तिथेच त्याने वाटाडे,उंट आणि पुढील प्रवासाला लागणारा शिधा गोळा करण्यासाठी महिनाभर मुक्काम ठोकला.

इथे सोमाली जनसामान्यांच्या चालीरीती आणि भाषेबरोबरच स्थानिक सोमाली महिलांचा त्याचा अभ्यास सुरूच होता.

१८५५च्या फेब्रुवारीपर्यंत ही कष्टप्रद मोहीम संपवून बर्टन एडनला परतला.एडनहून तो इंग्लंडला पोहोचला तेव्हा क्रिमियन युद्ध सुरू झालं होतं.त्याने या युद्धात आघाडीवर जाण्यासाठी अर्ज केला.त्या वेळचे ब्रिटिश सेनानी लॉर्ड रॅग्लान यांचा इंडियन आर्मीतल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर अजिबातच विश्वास नव्हता.तरीही ईस्ट इंडिया कंपनीने त्याला या युद्धात लढण्यासाठी रजा दिली आणि बर्टन क्रिमियाला जाणाऱ्या जहाजात बसला.तुर्की गैरसैनिकी घोडदळात तो सामील झाला.या तुर्की घोडदळाचं नेतृत्व बेंगॉल आर्मीचे एक कर्नल बीटसन करत होते.या बेशिस्त घोडदळात इतका गोंधळ होता,की त्यांच्यामुळे युद्धकार्यात अडथळेच जास्त येत होते.सहा महिन्यांमध्येच कंटाळून या घोडदळाला रामराम ठोकून बर्टन इंग्लंडला परतला. इंग्लंडला परतल्यावर त्याने 'फर्स्ट फुटस्टेप्स इन ईस्ट आफ्रिका ऑर अ‍ॅन एक्स्प्लोरेशन ऑफ हरार' हे पुस्तक लिहिलं. १८५६ साली प्रसिद्ध झालेल्या त्याच्या या ग्रंथात त्याने सोमाली स्त्रियांवर एक अख्खं प्रकरण लिहिलेलं आहे.हे पुस्तक त्याने लुम्सडेन या त्याच्या मित्राला कृतज्ञतापूर्वक अर्पण केलं आहे.काही काळानंतर बर्टन परत आफ्रिकेत जायचा विचार करू लागला.आफ्रिकेचा शोध घेणाऱ्या प्रत्येक भूसंशोधकाचं स्वप्न त्याला आता खुणावत होतं.हे स्वप्न म्हणजे नाईल नदीच्या उगमस्थानाचा शोध.याच काळात त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या इझाबेल अरुंडेलबरोबर त्याचा साखरपुडा पार पडला. इ. स. १८५६ मध्येच त्याने नव्या मोहिमेची योजना नक्की केली.या मोहिमेसाठी त्याला खूपच मदत मिळू लागली होती.ईस्ट इंडिया कंपनीने त्याला दोन वर्षांची भरपगारी रजा मंजूर केली होती.तो मुंबईला पोहोचला.

मोहिमेसाठीची शिधासामग्री आणि इतर साधनं जमवून आपल्या जॉन स्पेके नावाच्या सहकाऱ्याबरोबर त्याने मुंबई सोडली आणि तो झांजीबारला पोहोचला.झांजीबार हा त्याचा मुख्य तळ असणार होता.इथून त्याची नाईलचा उगम शोधण्याची मोहीम सुरू होणार होती.झांजीबारमधील त्या सहा महिन्यांमध्ये बर्टनने तो पुढे ज्या भागात प्रवास करणार होता त्या भागाचा इतिहास, भूगोल तिथल्या चालीरीती,बोलीभाषा,प्राणी,वनस्पती आणि हवामान यांची माहिती तर गोळा केलीच;पण त्याचबरोबर स्थानिकांच्या नैतिकतेच्या कल्पना समजावून घेतल्या.हा शेवटचा मुद्दा अनोळखी भूप्रदेशात फार महत्त्वाचा ठरतो. झांजीबार बेटाबद्दलच्या त्याच्या नोंदी त्याने ग्रेट ब्रिटनच्या 'रॉयल जिओग्राफिकल सोसायटी'ला पाठवल्या. त्या कुणाच्या चुकीने मुंबईच्या 'रॉयल एशियाटिक सोसायटी'मध्ये पोहोचल्या हे कळायला मार्ग नाही,पण त्या तिथेच बरीच वर्षं पडून होत्या.

अखेरीस इ. स. १८७२ मध्ये या नोंदींवर आधारित 'झांजीबार सिटी,आयलंड कोस्ट' हे पुस्तक प्रसिद्ध झालं.


बर्टन आणि त्याचा सहकारी स्पेके शेवटी जून १८५७ ला झांजीबारहून नाईल नदीचा उगम शोधण्याच्या मोहिमेला निघाले.बर्टन हा चांगला प्रशासक नाही हे या मोहिमेने सिद्ध केलं.स्वतःवरचा प्रचंड विश्वास आणि कर्तबगारीचा अभिमान यामुळे तो जे निर्णय घ्यायचा ते त्याच्या सहकाऱ्यांना आणि मदतनीसांना तो ऐन वेळी सांगायचा.त्या निर्णयांची कारणमीमांसाही तो कधी करत नसे.त्यामुळे संघभावना निर्माण करण्यात तो अपयशी ठरत असेच,पण त्यामुळे काही वेळा गोंधळही निर्माण व्हायचा.त्याच्या उद्धटपणामुळे त्याचे सहकारी खरं तर वैतागले होते.स्पेकेने तर बर्टनशी बोलणंच थांबवलं होतं. या मोहिमेत दोघांनी मिळून 'लेक टांगानिका'चा शोध लावला. त्यानंतर बर्टन तापाने वारंवार आजारी पडू लागला.म्हणून त्याला मोहीम अर्धवट सोडून इंग्लंडला परतावं लागलं.स्पेकेने मात्र ही मोहीम पुढे चालूच ठेवली.लेक व्हिक्टोरियातूनच नाईल नदी उगम पावते हे त्याला सिद्ध करायचंच होतं. आपल्याला सोडून स्पेके ही मोहीम पुढे नेतोय याची बोच बर्टनच्या मनात कायमची राहून गेली. इंग्लंडला परतल्यानंतर त्याने विश्रांती घेता घेता 'द लेक रिजन्स ऑफ सेंट्रल आफ्रिका' हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. स्पेके नाईलचा उगम शोधायचा प्रयत्न करत असताना ब्रिटनमध्ये स्वस्थ बसून राहणं बर्टनला पटणारं नव्हतं. अस्वस्थ बर्टनने मग नवी योजना आखली.त्याने परत आजारपणाच्या रजेचा अर्ज केला.

सामान्य माणसं आजारपणाची रजा विश्रांतीसाठी आणि उपचारांसाठी घेतात.बर्टन ही रजा नवे भूप्रदेश बघणं, एखादी नवी भाषा शिकणं आणि स्वतःच्या ज्ञानात भर घालणं यासाठी वापरत असे.खरं तर बर्टनचा साखरपुडा झालेला होता; पण लग्नासाठी न थांबता तो अमेरिकेत पोहोचला.इथे प्रथम तो सॉल्ट लेक सिटीत गेला.मॉर्मन पंथीयांचं हे शहर त्या पंथाचा संस्थापक ब्रिगहॅम यंगने इ. स. १८४७ मध्ये वसवलं होतं.अमेरिकेत बर्टनने 'स्टेज कोच'मधून (बग्गी) भरपूर प्रवास केला. स्थानिक अमेरिकी आदिवासींना (रेड इंडियन) तो भेटला.त्यांच्या चालीरीती,

राहण्याच्या पद्धती वगैरेंच्या नोंदीही त्याने ठेवल्या.मॉर्मनांच्या बहुपत्नित्वाबद्दलही त्याने बरंच काही लिहून ठेवलंय.अमेरिकेतून परतल्यावर २२ जानेवारी १८६१ या दिवशी वयाच्या चाळिसाव्या वर्षी बर्टन विवाहबद्ध झाला.याच वेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातून त्याचं नाव वगळण्यात आलं. कारण १८५८मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य रॉयल आर्मीमध्ये सामावून घेतलं गेलं.त्यांच्या नियमात रिचर्डच्या रजा बसत नव्हत्या.वडिलोपार्जित घर असलं तरी वेगवेगळ्या मोहिमांचा खर्च केल्यामुळे बर्टनने काहीच रोख रक्कम शिल्लक ठेवलेली नव्हती. मग आर्थिक बाजू सावरण्यासाठी त्याने पश्चिम आफ्रिकेतील 'फर्नांडो पो' आणि 'दाहोमी' या ठिकाणी परराष्ट्रखात्यात राजदूत म्हणून नोकरी केली. ही ठिकाणं मलेरिया,पीतज्वराच्या प्रादुर्भावाने अतिशय धोकादायक समजली जातात.नोकरी करत असतानाही तो नायजेरिया, काँगो,अंगोला इ.ठिकाणी जाऊन आला. तिथल्या लोकांचं निरीक्षण करून त्यावर त्याने लिखाणही केलं.इथल्या वास्तव्यात त्याने लहान मुलांना 'हिजडा' बनवण्याच्या पारंपरिक क्रूर प्रथेचाही अभ्यास केला आणि त्यातील बारकाव्यांसहित त्याची आपल्या पुस्तकात नोंद केली.अशा प्रकारचा मुलांचा व्यापार रोखण्यासाठी त्याने आपल्यापरीने बरेच प्रयत्नदेखील केले.तेथील राजाला भेटून ही प्रथा थांबवण्याची विनंती केली;पण त्याला यश आलं नाही.पुढे तिथून त्याची बदली काही काळासाठी ब्राझीलला झाली.शेवटी इ. स. १८६४ मध्ये तो इंग्लंडला परतला.बर्टन इंग्लंडमध्ये राहायला आला त्या वेळी त्रेचाळीस वर्षांचा होता. आयुष्यभर त्याने जे कष्ट उपसले त्यामुळे त्याच्या प्रकृतीवर चांगलाच दुष्परिणाम झाला होता. ब्राझीलमध्ये कार्यरत असताना त्याला जडलेला आजार त्याची पाठ सोडायला तयार नव्हता.यानंतरच्या त्याच्या सर्व भटकंतीत त्याची पत्नी सतत सावलीसारखी त्याच्याबरोबर वावरली.दक्षिण अमेरिकी भूखंडामध्ये ब्राझीलचा अंतर्भागातील भटकंती तसंच अर्जेंटिना,

पेरूपॅराग्वेत नोकरी आणि भटकंती केल्यावर तो दमास्कसला गेला. तिथून आइसलंड,पुन्हा आफ्रिकेत गोल्डकोस्टशिवाय इतरही अनेक ठिकाणं त्याने पालथी घातली.त्यानंतर त्याने केलेल्या लिखाणात तो जोश ती खदखद नव्हती.त्याच्या पूर्वीच्या लिखाणाच्या तुलनेत हे लेखन फारच आळणी होतं.त्याचं खरं लेखन ते जेव्हा 'त्रिएस्ते'मध्ये राहायला लागले तेव्हा सुरू झालं.त्रिएस्तेमध्ये बर्टनने 'वन थाउजंड अँड वन अरेबियन नाइट्स'च्या भव्य लेखनाला सुरुवात केली. जगभरातल्या कामशास्त्रावरच्या साहित्याचा अनुवाद या पुस्तकात केला गेला आहे.हे लेखन सटीप असून दहा खंडांत आहे.या लेखनावर प्रचंड टीका झाली तरी ते अमाप खपलं.

त्यातून त्याला अकरा हजार स्टर्लिंग पौंड उत्पन्न मिळालं.

आजही या ग्रंथाच्या नवनव्या आवृत्त्या बाजारात येतात. अनेक देशांत,अनेक भाषांत त्याची भाषांतरं झाली, आजही होत आहेत.मुख्य म्हणजे यातल्या स्त्रिया जे लैंगिक स्वातंत्र्य उपभोगतात त्यामुळे व्हिक्टोरिया राणीच्या कालखंडातील सनातनी नैतिक कल्पनांना हादरा बसला आणि स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे काय हे ब्रिटिश स्त्रियांना प्रथमच लक्षात आलं.


आज बर्टनने केलेल्या 'अनंगरंग रतिशास्त्र','अरेबियन नाइट्स' आणि 'दपफ्र्युम्ड गार्डन' यांच्या अनुवादांमुळेच तो लोकांच्या स्मरणात आहे.बर्टनची मक्का आणि मदिनेची वारी,टांगानिका सरोवराचा शोध आणि इतरही अनेक बाबींमुळे त्याला कीर्ती मिळाली;पण हे तीन अनुवाद म्हणजे त्याची कायमस्वरूपी स्मारकं आहेत.१९ ऑक्टोबर १८९० रोजी रिचर्ड बर्टनचं निधन झालं. त्यानंतर पुढचे सोळा दिवस नवऱ्याची बदनामी होईल या भीतीने त्याच्या खानदानी ब्रिटिश पत्नीने,इझाबेलने,त्याच्या कागदपत्रांचे गड्ढे, त्याच्या नोंदी आणि त्याने गोळा केलेली सगळी ग्रंथसंपदा नष्ट केली.आपल्या नवऱ्याची लैंगिक विकृती या लेखनाच्या स्वरूपात प्रकट होते,हे लेखन कपोलकल्पित आहे,असं समजून बर्टन यांचं जेवढं लेखन सापडलं ते तिने जाळून टाकलं.यात 'द पफ्र्युम्ड गार्डन'च्या अनुवादाचा कच्चा खर्डाही होता.मृत्यूच्या आदल्याच दिवशी रिचर्डने 'द पफ्र्युम्ड गार्डन्स'चं हस्तलिखित प्रकाशकाच्या स्वाधीन केलं होतं म्हणून ते वाचलं.पुढे या घटनेचं वर्णन 'ब्रिटिश मानवशास्त्रीय इतिहासातील सर्वांत काळा दिवस' असं केलं गेलं. इझाबेलने रिचर्डच्या स्मरणार्थ त्याच्या कबरीवर संगमरवराची एक छत्री उभारली.लंडनच्या नैऋत्य भागातल्या मॉर्टलेक कबरस्थानात ही छत्री अजूनही उभी आहे इझाबेलला मात्र तिचा नवरा त्याच्या अफाट लिखाणामुळे अमर झालाय हे कधी उमगलंच नाही. •


समाप्त.. धन्यवाद..!!


२७/११/२५

कामशास्त्राचा अवलिया रिचर्ड बर्टन / Richard Burton, the master of sex

नैतिक-अनैतिकतेच्या गुंत्यात अडकून न पडता आपल्या मर्जीनुसार जीवन जगणारे सर रिचर्ड बर्टन हे आयुष्याच्या अखेरपर्यंत जगभर भटकत राहिले. निरनिराळ्या देशांतील शारीरिक संबंधांबाबतच्या असंख्य अनिष्ट प्रथा त्यांनी पहिल्यांदा जगासमोर आणल्या.अशा या जगावेगळ्या 'इरॉटिक ट्रॅव्हलर' बद्दल…(कामशास्त्राचा अवलिया अभ्यासक रिचर्ड बर्टन,हटके - भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन)


एकोणिसाव्या शतकात इंग्लडच्या समाजमनावर व्हिक्टोरियन चालीरीतींचा जबरदस्त पगडा होता. संस्कृतीच्या नावाखाली लोकांच्या वागण्याबोलण्यावर अनेक निर्बंध टाकले गेले होते.

शारीरिक संबंधांबाबत जाहीरपणे बोलणंदेखील असभ्य मानलं जात होतं, त्याविषयीची माहिती गोळा करणं तर दूरच राहिलं. अशा वातावरणात सर रिचर्ड बर्टन नावाचा एक इंग्रज अवलिया मात्र जगभर भटकंती करत याच विषयाची आश्चर्यकारक माहिती गोळा करून जगापुढे मांडत होता.त्यांनी सेक्सबाबतच्या जगभरातल्या अनेक प्रथा, चालीरीती,धारणा यांची बारकाव्यां -

सहित निरीक्षणं नोंदवली.समलिंगी संबंध,तसंच मुस्लिम समाजात असलेल्या स्त्रियांची सुंता करण्याच्या अघोरी पद्धतीसारख्या अनेक प्रथा अस्तित्वात आहेत हे जगाला प्रथमच कळलं ते सर बर्टन यांच्या निरीक्षणांवरूनच. आज या घटनेला सुमारे दीडशेहून अधिक वर्ष लोटली आहेत आणि आता कुठे जागतिक पातळीवर त्या अघोरी प्रथेविरुद्ध आवाज उठवला जात आहे.


सर रिचर्ड बर्टन यांनी निरनिराळ्या देशांतील दुर्गम भागात भटकंती केली.त्यांना या देशांमधल्या अनेक भाषा त्यातल्या बारकाव्यांसह अस्खलितपणे येत होत्याच,पण त्या भाषांतील साहित्याशीही त्यांचा परिचय होता.ते ज्या भागात जात तिथली स्थानिक भाषाही झटकन आत्मसात करत आणि स्थानिकांतलेच एक बनून राहत.

स्थानिक लोक त्यांना आपल्यातला एक मानून त्यांच्याशी निःसंकोच गप्पा मारत असत.त्यामुळे त्या भूभागातील स्त्री-पुरुष संबंधांतले बारकावे त्यांना अवगत होत.बर्टन त्या सर्व चालीरीती नोंदवून त्या जपून ठेवत असत.अफाट स्मरणशक्ती,तटस्थ दृष्टीने केलेलं निरीक्षण,बारकावे टिपण्याची वृत्ती आणि भावनात्मक वृत्तीचा अभाव यामुळे त्यांच्या नोंदी अतिशय अचूक असत.त्यांच्या अशा अनेक नोंदींचं संपादित संकलन म्हणजे एडवर्ड ली यांनी संपादित केलेलं 'द इरॉटिक ट्रॅव्हलर' हे पुस्तक. (त्यांनी जगभरातल्या कामशास्त्रावरचं साहित्य जमवून त्याचा अनुवादही पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे.हे प्रचंड गाजलेलं पुस्तक म्हणजे 'द अरेबियन नाइट्स' हा महाखंड.

त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना पाश्चात्त्य जगात 'कामशास्त्राचा पहिला अनुवादक' तसंच 'सेक्युअल अँथ्रॉपॉलॉजिस्ट' अशीही प्रसिद्धी मिळाली आहे.)


'द इरॉटिक ट्रॅव्हलर' या पुस्तकातून सर रिचर्ड बर्टन यांचं आयुष्य उलगडत जातं तेव्हा 'सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असतं' याचीच प्रचिती येते.रिचर्ड फ्रान्सिस बर्टनचा जन्म १९ मार्च १८२१ या दिवशी लंडन इथे झाला.त्याचे वडील लेफ्टनंट कर्नल जोसेफ नेटरव्हिल बर्टन यांना तीन मुलं.रिचर्ड सर्वांत मोठा.कर्नल बर्टन अत्यंत निर्भीड,स्पष्टवक्ते, तत्त्वनिष्ठ आणि वृत्तीने भटके होते.एका ठिकाणी फार काळ राहणं त्यांना आवडत नसे.या सर्व गुणांची देणगी त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला वारसा म्हणून दिली होती.याच गुणांमुळे कर्नलसाहेबांना त्यांची सैन्यातली नोकरी गमवावी लागली होती.त्यांनी अपुऱ्या माहितीवर केवळ वरिष्ठ सांगतात म्हणून राणीविरुद्धच्या व्यभिचाराच्या खटल्यात साक्ष द्यायला नकार दिला होता.कर्नल बर्टननी वरिष्ठांची आज्ञा पाळली नाही म्हणून ड्यूक ऑफ वेलिंग्टननी त्यांना निम्म्या पगारावर सक्तीने निवृत्त करण्याची आज्ञा दिली.सुदैवाने कर्नल बर्टनच्या पत्नीला,मार्था बेकरला,माहेरहून खूप संपत्ती वारसाहक्काने मिळाली होती,त्यामुळे कर्नलसाहेब आरामात जगू शकले.


रिचर्डच्या भटकंतीला बालवयातच सुरुवात झाली. त्याचे आई-वडील फ्रान्समध्ये स्थायिक झाले.रिचर्ड आणि त्याच्या भावंडांचं औपचारिक शिक्षण झालंच नाही.तसंच त्यांच्या जगण्याला शिस्तही नव्हती. जसजसं वय वाढू लागलं तसतसे रिचर्ड आणि त्याचे भाऊ अधिकाधिक बेदरकार जीवन जगू लागले. समाजाला सत्याची कदर नसते,त्यांना देखावा महत्त्वाचा वाटतो,या निष्कर्षाप्रत रिचर्ड फार लहान वयातच पोहोचला होता.फ्रान्समध्ये काही वर्षं राहिल्यानंतर तिथे सुरू असलेल्या राजकीय उलाढालींमुळे बर्टन कुटुंब पुन्हा इंग्लंडमध्ये परतलं. तोपर्यंत रिचर्डने फ्रेंच भाषा आत्मसात केलेली होती.


बर्टन कुटुंब इंग्लंडमध्ये असताना रिचर्डला कांजिण्या झाल्या आणि कर्नलसाहेबांनी त्यांचा मुकाम परत फ्रान्समध्ये हलवला.तिथून एका वर्षातच ते इटलीस राहायला गेले.तिथेही ते स्थिरावले नव्हतेच.पण इटलीतल्या या मुक्कामात रिचर्ड आणि एडवर्ड या दोन्ही भावांनी इटालियन भाषेवरही प्रभुत्व मिळवलं.


इटलीतल्या वास्तव्याने रिचर्डला इतके विविध अनुभव दिले,की इतर सामान्य माणसाला त्याच्या संपूर्ण आयुष्यभरातदेखील एवढा अनुभव मिळणं कठीणच. त्या वेळी रिचर्ड फक्त सोळा वर्षांचा होता,इटलीतल्या नेपल्समध्ये कॉलऱ्याची साथ होती,त्या वेळी या दोन भावांनी साथीत मेलेल्यांची प्रेतं हातगाड्यांवर रचून त्या गाड्या स्मशानात नेण्याचं काम केलं होतं. नेपल्समध्येच असताना दोघांनी घराजवळच असलेल्या वेश्यागृहाची माहिती काढली आणि ते तिथे नियमित भेटी देऊ लागले.भावांच्या या बेदरकारपणामुळे त्यांचा वेश्यांबरोबरचा पत्रव्यवहार कर्नल

साहेबांच्या हातात सापडला.ते खवळले आणि त्यांनी नेपल्स सोडायचा निर्णय घेतला.ते आधी प्रॉव्हेन्स इथे,नंतर पिरनीज पर्वतराजीतील पाऊ या खेड्यात राहायला गेले. पाऊ हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलं तरी तो स्मगलरांचा अड्डा होता.त्या स्मगलरांच्या संपर्कात यायला या बंधूंना वेळ लागला नाही.तिथे येणाऱ्या पर्यटक मुलींना पटवणं हाही उद्योग या बंधूंनी आवडीने केला.आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन चर्चच्या सेवेत दाखल करावं,असा एक अजब निर्णय या वेळी कर्नलसाहेबांनी घेतला.वडिलांच्या या निर्णयामुळे रिचर्ड ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात दाखल झाला.ग्रीक आणि लॅटिन शिकवणाऱ्या त्या महाविद्यालयात रिचर्डच्या पूर्वानुभवाचा उपयोग नव्हता.व्यावहारिक जगाचं ज्ञान,इंग्रजी-फ्रेंच आणि इटालियन बोलीभाषा अस्खलितपणे बोलता येणं,बुद्धिबळ आणि तलवारबाजीत प्रावीण्य यांचा नि ऑक्सफर्ड विद्यापीठाचा मेळ बसणं तसं अवघडच होतं. तोपर्यंतच्या आयुष्यात त्याचा आणि शिस्तीचाही कधी संबंध आलेला नव्हता,त्यामुळे लवकरच त्याची ऑक्सफर्ड विद्यापीठातून हकालपट्टी झाली.


विद्यापीठातून बाहेर पडल्यावर काय करायचं हा प्रश्न रिचर्डने स्वतःच सोडवला.त्या काळात रिचर्ड अरेबिक भाषेचा अभ्यासही करत होता.याच दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये झालेल्या पराभवात बरेच अधिकारी गमावले असल्याने कंपनीने सैन्यभरती सुरू केली होती.हे रिचर्डला कळलं तेव्हा त्याने पाचशे पौंड एवढी रक्कम भरून बाँबे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये कमिशन्ड अधिकारी म्हणून नोकरी मिळवली.

लगेचच त्याने हिंदुस्तानी भाषा शिकण्यास सुरुवातही केली.चार महिन्यांच्या सागरी प्रवासानंतर, जून १८४२ मध्ये झुपकेदार मिश्यांचा हा रुबाबदार आणि देखणा अधिकारी मुंबई बंदरात उतरला.इथे आल्या आल्या काही दिवसांतच इथल्या इंग्रज अधिकाऱ्यांशी त्याचे खटके उडू लागले,याचं कारण रिचर्ड भारतीय वेश्यांच्या वस्तीत उघडपणे वावरायचा.

त्याने कुणाच्या लक्षात येणार नाही अशा त-हेने हे उद्योग करायला ब्रिटिश समाजाची हरकत नव्हती;पण कुठलीही गोष्ट चोरून करायची हे रिचर्डला मान्य नव्हतं.


भारतात आलेल्या सैन्याधिकाऱ्याला इथे आल्यावर सहा महिन्यांच्या आत हिंदुस्थानी भाषेची परीक्षा पास होणं आवश्यक असे.रिचर्ड त्या परीक्षेत पहिला आला.नंतर त्याने गुजराती आणि मराठी भाषेतही प्रावीण्य मिळवलं.


याच सुमारास सर चार्ल्स नेपियरनी सिंध प्रांत जिंकून घेतला होता.१८४४ च्या सुरुवातीस रिचर्डची रेजिमेंट सिंधला रवाना झाली.त्याला कराचीत मुख्य कचेरीत असलेल्या सिंधच्या सर्वेक्षण विभागात नियुक्ती मिळाली.इथे त्याने भारतीय चालीरीतींची नोंद ठेवायला सुरुवात केली.सामान्य भारतीयांचं जीवन हा त्याचा आवडीचा विषय बनला.


त्याचा रंग युरोपियन गोरा नव्हता.त्यातच त्याच्या भटकंतीमुळे तो रापला होता.त्यामुळे आणि भाषाप्रभुत्वामुळे स्थानिक बनून वावरणं त्याला सहज जमून जात होतं.त्याने कराचीमध्ये तीन विविध वस्तू भांडारं उघडली.या दुकानांमध्ये काम करत असताना तो गिऱ्हाइकांशी संवाद साधायचा.त्यामुळे त्याच्याजवळ माहितीचा खजिनाच जमा झाला.स्थानिक चालीरीती, सण-उत्सव,रस्त्यावरचे जादूगार आणि भटके यांच्याकडून धार्मिक माहितीबरोबरच लैंगिक समजुती, कामोत्तेजकं,युनानी औषधं,वैदूंची झाडपाल्याची औषधं यांची माहिती त्याने मिळवली.या नोंदींवर आधारित 


त्याचं पहिलं पुस्तक इ. स. १८५१ मध्ये प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकाचं शीर्षक होतं,'सिंध अँड द रेसेस देंट इनहॅबिट द व्हॅली ऑफ इंडस, वुईथ द नोटिसेस अँड द टोपोग्राफी अँड हिस्टरी ऑफ द प्रॉव्हिन्स'. या पुस्तकात आणि नंतरही इतर पुस्तकांमध्ये बर्टनने एक नोंद वारंवार केल्याचं दिसून येतं. 


सिंध प्रांतातल्या स्त्रियांच्या निरीक्षणावरून बर्टनने म्हटलं आहे,की उष्ण आणि आर्द्र हवामानाच्या भूप्रदेशातील पर्वतराजीजवळ राहणाऱ्या स्त्रिया या त्या भागातील पुरुषांपेक्षा जास्त कामातुर आणि भावनिक असतात,तर थंड भूप्रदेशात नेमकी याउलट परिस्थिती दिसून येते.(त्यासाठी त्याने कुठलाही पुरावा दिलेला नसला तरी त्याच्या या निरीक्षणावर तो शेवटपर्यंत ठाम होता.) सिंध प्रांतातल्या समजुती, विशेषतःवशीकरणासाठी करण्यात येणाऱ्या जा‌देटोण्यावर बर्टनने या पुस्तकातील बरीच पानं खर्च केली असून त्यासाठीचे तांत्रिक विधी आणि मंत्रही दिले आहेत.

'सिंधी स्त्रिया दिसायला सुंदर असल्या तरी हिंदुस्तानात त्यांच्या चालचलणुकीबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही,' असं सांगून त्या कारणाने होणाऱ्या खूनखराब्याची काही उदाहरणंही तो देतो.सिंधसह वायव्य हिंदुस्तानातल्या पुरुषांकडून वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कामोत्तेजकांचं बारकाव्यांसह वर्णनही त्याने केलं आहे.. स. १८४५ मध्ये सर चार्ल्स नेपियरना कराचीत पुरुष वेश्यागृहं आहेत असं कळलं.सर चार्ल्सनी 'याची सत्यता तपासून पाहावी'असं मध्यस्थामार्फत बर्टनला सुचवलं. तशी लेखी सूचना मात्र बर्टनला मिळाली नव्हती.त्याने त्याच्या नेहमीच्या पद्धतशीरपणे त्या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली.तो 'मिर्झा अब्दुल्ला बशिरी' नावाचा एक व्यापारी बनून कराचीला पोहोचला. मिळालेल्या माहितीवर आधारित एक तपास अहवाल त्याने मुंबईस १८४७ मध्ये पाठवला.दुर्दैवाने त्या वेळी सर चार्ल्स राजीनामा देऊन मायदेशी परतले होते. त्यांची जागा घेतलेले गृहस्थ फारच सोवळे आणि सनातनी वृत्तीचे होते.हा अहवाल वाचून ते संतापले. त्यांनी रिचर्ड बर्टनच्या बडतर्फीचा हुकुमनामा जारी केला.बर्टन सैन्यात अधिकारी होता.त्यामुळे सैन्यातली त्याची हकालपट्टी जरी लगेच झाली नसली तरी त्याच्या एकूण सैनिकी कारकिर्दीवर मात्र याचा वाईट परिणाम झालाच.मात्र,बर्टनचा अहवाल म्हणजे समलिंगी संबंध आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक वापराचा पहिला शास्त्रशुद्ध अभ्यास मानला जातो. बर्टन जगात जिथे जिथे गेला तिथे तिथे सर्व जमातींत त्याला या प्रकारचे लैंगिक संबंध आढळून आले.या निरीक्षणांवर त्याने 'टर्मिनल एसे' नावाचा एक प्रबंध लिहिला, जो पुढे त्यानेच लिहिलेल्या 'द अरेबियन नाइट्स' या प्रसिद्ध महाखंडातल्या दहाव्या भागात समाविष्ट केला गेला.सिंधमध्ये असताना वयाच्या पंचविसाव्या वर्षी बर्टनला कॉलरा झाला.त्या वेळी तो मरता मरता वाचला.


यातून सुधारण्यासाठी त्याला बराच काळ विश्रांती घेणं भाग होतं.त्यामुळे त्याला दोन वर्षांची रजा मंजूर करण्यात आली.या आजारपणाच्या रजेत विश्रांतीसाठी त्याला उटकमंड इथे सरकारी खर्चाने पाठवण्यात आलं. तेव्हा उटकमंड मद्रास इलाख्यात होतं.तिकडे त्रिवेंद्रममार्गे जायचं त्याने ठरवलं.त्याला वाटेत गोवा लागलं.गोव्याच्या सौंदर्याची भुरळ त्याला पडलीच.तो तिथे काही काळासाठी थांबला.इथे त्याला एक पोर्तुगीज मुलगी भेटली.ती 'काझा द मिसेरीकॉर्डिया' या कॉन्व्हेंटमध्ये नन होती.तिला उत्तम लॅटिन येत होतं. मुख्य म्हणजे तिला मठात जोगीण बनून राहायचा कंटाळा आला होता.लॅटिन शिकता शिकवता या दोघांनी गोव्यातून पळून जाण्याचं ठरवलं.बर्टनने स्वतः ही योजना आखून यशस्वीही केली.यानंतर चार वर्षांनी त्याने त्याच्या गोव्यातील वास्तव्यावर एक पुस्तक लिहिलं.'गोवा अँड द ब्लू माउंटन्स ऑर सिक्स मंथ्स ऑफ सिक लीव्ह' हे १८५१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्या पुस्तकाचं नाव. या पुस्तकात बर्टनने त्या पलायनाची घटना जशीच्या तशी न लिहिता ती एका अज्ञात ब्रिटिश तरुणाचं साहस म्हणून समाविष्ट केली. 


गोव्यातून कालिकतला पोहोचल्यानंतर बर्टन उटकमंडला गेला.इथे त्याला पर्शियनचा जाणकार असलेला एक मौलवी भेटला.त्याच्याकडून तो पर्शियन शिकला.सप्टेंबर १८४७ मध्ये तो मुंबईला परतला. मुंबईत त्याने पर्शियन भाषेची सरकारी परीक्षा दिली. नेहमीप्रमाणे याही भाषेच्या परीक्षेत तो पहिला आला. वैद्यकीय अधिकाऱ्याशी थोडीशी हुज्जत घालून त्याने शारीरिक सक्षमतेचं प्रमाणपत्र मिळवलं आणि तोपर्यंत अशक्तच असलेला बर्टन वैद्यकीय रजा संपवून त्याच्या सैनिकी सेवेत रुजू झाला.


सेवेत रुजू झाल्यानंतर त्याची रवानगी परत कराचीला करण्यात आली.इथे त्याने त्याच्या सिंधविषयक पुस्तकात भर घालण्यासाठी माहिती गोळा करणं सुरू केलं. इ.स. १८४८च्या उन्हाळ्याच्या थोडं आधीच दुसरं इंग्रज-शीख युद्ध सुरू झालं.बर्टनजवळ सहा भाषांमधील प्रावीण्याची प्रशस्तिपत्रकं आणि आधीच्या अधिकाऱ्यांची 'स्थानिकांमध्ये सहजपणे मिसळतो' अशी भलावण होती.त्या जोरावर त्याने पंजाबमध्ये घुसणाऱ्या सैन्याबरोबर दुभाष्या म्हणून जाण्याची परवानगी मागितली.

मात्र,त्याच्या नेहमीच्या वाह्यातपणाने त्याला पुन्हा एकदा दगा दिला. त्याला संधी नाकारण्यात आली.


त्यामुळे निराश झालेल्या बर्टनने नंतरची चार वर्षं इंग्लंड आणि फ्रान्समध्येच व्यतीत केली.या काळात त्याने वेगवेगळ्या विषयांवर पाच पुस्तकं लिहिली.याच काळात त्याला एक कल्पना सुचली.

त्याला जागतिक प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या प्रवासाची ही योजना होती. इ.स. १८५२ मध्ये या योजनेला संमती मिळावी म्हणून त्याने ती वरिष्ठांपुढे मांडली.'मध्य आणि पूर्व अरबस्तानाचं भूसंशोधन' असं त्या योजनेचं स्वरूप होतं.या मोहिमेत रुब-अल्‌खाली या 'एंप्टी कार्टर' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रचंड वाळवंटी भूभागाचाही समावेश होता.बर्टनच्या नियोजित साहसाला रॉयल जिओग्राफिक सोसायटीने मदत द्यायचं मान्य केल.

..अपुरे राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..!