डान्टेचा मृत्यू आपणास चौदाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात आणून सोडतो.तेराशे वर्षे चाललेले युरोपातील राष्ट्रांचे सुसंस्कृत होण्याचे दुबळे प्रयत्न आपण पाहत आलो.ते प्रयत्न पाहून कीव येते.शहरे उभारीत आहेत व धुळीस मिळवीत आहेत;चित्रे रंगवीत आहेत,तलवारी परजीत आहेत,संगमरवरी पुतळे खोदीत -आहेत; माणसांच्या कत्तली करीत आहेत;मंदिरे बांधीत आहेत, काव्ये व गीते रचीत आहेत;आपल्या बांधवांना ठार मारीत आहेत,असे प्रकार आपणास या शतकात दिसतात.गॅलिलीच्या ज्यू ख्रिस्ताचा तो शांत व सुंदर धर्म त्यांनीपण मानवांचा छळ करण्याचे साधन म्हणून तो वापरला.मानवप्राणी पशुकोटीतून मानवकोटीत यायला एक कोटी वर्षे लागली.पण चौदाव्या शतकाच्या आरंभास हा मानव कसा दिसतो ? अद्यापि त्याच्यामध्ये नव्वद टक्के पशुता,तर केवळ दहाच टक्के मानवता दिसून येते.आपण थोडा वेळ ग्रोपातील श्वेतवर्णीयांना सोडून जरा दूर आशियातील पीतवर्णीयांकडे जाऊ या व खिस्ताच्या आगमनापासून तो डान्टेच्या निधनापर्यंतच्या चौदा शतकांचा या पीतवर्णीयांनी कसा उपयोग केला ते पाहू.!
तिकडे युरोप सरंजामशाहीच्या रानटीपणात बुडत असता,
अधःपतित होत असता,इकडे चीन सुधारणेच्या व संस्कृतीच्या शिखरावर चढत होते.युरोपला रानटी टोळ्यांच्या स्वाऱ्यांपासून त्रास झाला,तसा चीनलाही झाला. पण युरोपप्रमाणे चीन कोलमडले नाही. चीनमध्ये सरंजामशाही जवळजवळ नव्हतीच. युरोपातील श्वेतवर्णीय लोकांत जसे परस्पर लढणारे शेकडो पंथ व भेद निर्माण झाले,तसे चीनमध्ये झाले नाही.युरोपातील संपत्ती,संस्कृती ज्ञान व सौंदर्य मध्ययुगातील युद्धांनी धुळीत जात असता इकडे चीनमधील संपत्ती,संस्कृती व सौंदर्य ही अविरत झगड्यांमुळे नष्ट झाली नाहीत;जिवंत राहिली.
ग्रीक संस्कृती व रोमन संस्कृती जवळजवळ हजार वर्षांत जणू नष्ट होऊन गेल्या;पण चिनी संस्कृती मात्र कधीच मेली नाही,एक दिवसही दृष्टिआड झाली नाही. दुसऱ्या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत चिनी चित्रकारांनी जगातील अत्यंत रमणीय अशी निसर्गाची चित्रे रंगविली आहेत.त्या तीन शतकांतील अपूर्व व अप्रतिम अशी चिनी चित्रे,सुंदर काव्ये व भव्य शिल्पे यांना जगात तुलना नाही.आजही अमर सौंदर्याचे नमुने म्हणून त्यांच्याकडे बोट दाखविता येईल.सहाव्या शतकात चिनी लोकांनी लाकडी ठसे निर्मून छापण्याची कला शोधून काढली.त्या काळात चिनी लोक गॅस व दगडी कोळसे वापरीत असे आढळते;पण युरोपातील लोक मात्र या गोष्टी वापरण्यास कित्येक शतकांनंतर शिकले.सहाव्या शतकातच चिनी लोकांस बंदुकीची दारू माहीत होती.पण शांतताप्रिय चिनी लोकांनी या शोधाचा उपयोग स्वार्थासाठी मात्र कधीही करून घेतला नाही.सातवे शतक म्हणजे चिनी संस्कृतीचे सुवर्णयुग, कला,बुद्धी,नीती,सर्वच बाबतीत कन्फ्यूशियसचे वारसदार साऱ्या जगाच्या कितीतरी पुढे होते.
इ.स.६२८ मध्ये मुसलमानी धर्मप्रचारक चीनमध्ये आले.त्यानंतर सातच वर्षांनी ख्रिश्चन मिशनरीही आले. त्या वेळेस टाई-त्संग हा चीनचा सम्राट होता.या सम्राटाने आपला कन्फ्यूशियसचा धर्म त्यांच्यापुढे मांडून तीन धर्माचा तिरंगी झगडा माजविण्याऐवजी परधर्मीयांना मोठ्या सन्मानाने दरबारात आणवून न्यू टेस्टामेंट व कुराण यांची चिनी भाषेत भाषांतरे करवून घेतली आणि नंतर त्या धर्मग्रंथात काय आहे,ते स्वतः पाहिले व परीक्षिले,कन्फ्यूशियसने कित्येक शतकांपूर्वी सांगितले होते तेच त्याही धर्मात आहे,असे त्याला आढळले.कन्फ्यूशियसचा धर्म सोडून ख्रिस्त किंवा महंमद यांचा धर्म स्वीकारावा असेही त्याला वाटले नाही,किंवा स्वतःचा धर्म या दोन्ही धर्मांहून श्रेष्ठ आहे हे दाखविण्यासाठी तिकडे ख्रिश्चन व मुसलमान यांना वाटत होती,तशी युद्धे करण्याचीही जरुरी त्याला वाटली नाही.ईश्वराकडे जाण्याचे नाना मार्ग असू शकतील आणि कोणताही मार्ग पत्करला तरी तो देवाकडे नेणारा असेल,तर ठीकच आहे असे टाई-त्सुंग याला वाटले. म्हणून त्याने मुसलमानांना मशिदी बांधण्यास, ख्रिश्चनांना चर्चेस बांधण्यास व दोघांनाही चिनी लोकांत धर्मप्रचार करण्यासही खुशाल परवानगी दिली ! केवळ धर्मवेडेपणाने त्यांनी रक्तपात मात्र करू नये,एवढाच त्याचा कटाक्ष होता.
चिनी संस्कृतीचे विहंगमावलोकन करताना टाईत्संगची सहिष्णुता ख्रिश्चन सम्राट शार्लमन याच्या असहिष्णुतेशी तोलून पाहावी,असे मनात येते.शार्लमन एका दिवसात साडेचार हजार सॅक्सनांना ते ख्रिस्ती होईनात,म्हणून ठार करतो! क्षणभर थांबून या दोन गोष्टींची तुलना करावी असे वाटते,नाही ?
मध्ययुगात चीन संस्कृतीच्या शिखरावर होते.तेराव्या शतकात त्यांची थोडा वेळ जराशी पिछेहाट झाली खरी; पण तीही क्षणभरच.या सुमारास मध्य आशियातील डोंगरपठारावर राहणारे भटके मोंगोलियन चीनवर स्वाऱ्या करू लागले.त्यांचे हूण व तुर्क यांच्याशी थोडेफार संबंध होते.या मेंगोलियनांनी अल्पावधीत पॅसिफिक महासागरातून रशियातील नीपर नदीपर्यंतचा प्रदेश व्यापून टाकला ! चेंगीझखान हा त्यांचा अत्यंत प्रबळ असा पुढारी होता.त्याच्या विद्युन्मय नेतृत्वाखाली थोड्याच अवधीत मेंगोलियनांनी एवढे मोठे साम्राज्य मिळविले की,त्याच्यासमोर अलेक्झांडरचे साम्राज्यही मुलाचे खेळणे वाटावे,पोरखेळ वाटावा.अलेक्झांडरची बेडर निर्भयता,हॅनिबॉलची सहनशीलता,
आशियातील प्राचीन विजेत्यांची अल्लड वृत्ती,तसाच त्यांचा साधेपणा हे सारे गुण चेंगीझच्या ठायी होते.त्याचा आहार म्हणजे घोडीचे मांस असे,त्याचा प्रासाद म्हणजे तंबू असे,त्याचे सिंहासन म्हणजे घोड्याचे जीन असे.राज्य चालविण्यापेक्षा जिंकून घेणे त्याला आवडे;पण इतर जगज्जेत्यांप्रमाणे त्याच्या ठायी सूडबुद्धी नव्हती, रानवटपणा नव्हता.
वेल्स लिहितो, "चेंगीझखानाच्या कारकिर्दीत,त्याच्या साम्राज्यात सर्व आशियाभर संपूर्ण धार्मिक सहिष्णुता होती." पराभूत राष्ट्रांवर आपला रानटीपणा लादण्याऐवजी पराभूतांच्या श्रेष्ठ संस्कृतीतच तो स्वतः रंगला;त्या संस्कृतीनेच त्याला जिंकले,स्वतःमध्ये मिळवून घेतले.त्याने चीन देश भौगोलिकदृष्ट्या जिंकला; पण चीनने त्याला सांस्कृतिकदृष्ट्या जिंकले.एखाद्या महासागरावर मेघांनी वर्षाव करावा तद्वत् मोंगोलियन आले;पण ते चिनी जनतेच्या महासागरात विलीन झाले व त्या सर्वांचे एक सुसंवादी राष्ट्र बनले.
ग्रीसची व रोमची संस्कृती व्हेंडॉल व गाँध यांनी नष्ट केली,पण मोंगोलियनांनी तसे केले नाही.त्यांनी चिनी संस्कृती तर नष्ट नाहीच केली;पण उलट स्वतःच ती स्वीकारली.कुब्लाईखान हा चेंगीझचा नातू.कुब्लाई हा चीनच्या सांस्कृतिक,ज्ञानोपासक व कलोपासक परंपरेचा ऋणी आहे.स्वतःच्या रानटी पूर्वजांच्या चालीरीतींपासून त्याला काहीही मिळाले नाही.त्याचे मन व त्याची ही चिनी संकृतीवरच पोसली गेली.
या कुब्लाईखानच्या दरबारात राहिलेल्या मार्को पोलो च्याद्वारा आशियातील आश्चर्यकारक संस्कृतीशी युरोप परिचित झाले.मार्को पोलो कुब्लाईकडे का आला व राहिला? त्याचे कार्य आर्थिक व धार्मिक असे द्विविध होते.युरोप चीनशी व्यापार सुरू करू इच्छित होते; आणि पोप चीनला ख्रिश्चनधर्मी करू इच्छित होता. मार्को पोलो हा व्हेनिसचा रहिवासी,त्याचे वडील व चुलते चीनशी व्यापार करीत.वडिलांचे नाव निकोलो पोलो व चुलत्याचे मॅथ्यू किंवा मफ्फेओ पोलो.चिनी सम्राट कुब्लाईखान याने या दोघा युरोपियन व्यापाऱ्यांस आपल्या दरबारी बोलावले.त्याने त्या वेळेपर्यंत युरोपियन ख्रिश्चन व्यापारी पाहिला नव्हता.ख्रिश्चन व्यापारी हा कसा काय प्राणी असतो,हे त्याला पाहायचे होते.हे दोन्ही व्हेनिशियन व्यापारी त्याच्या दरबारी आले. कुब्लाईला ते आवडले.निकोलो मोठा हुशार;पण जरा काळसर रंगाचा होता.तो हिऱ्यांचा तद्वतच तलवारीचा पारखी होता.त्याचा भाऊ मफ्फेओ उंच व धिप्पाड होता.त्याची दाढी लाल रंगाची होती.तो घोड्यांचा तद्वतच स्त्रियांचाही पारखी होता.त्या दोघांचाही असंस्कृत व रंगेल स्वभाव,वाटेल तेव्हा देवाशपथ म्हणण्याची त्यांची सवय व मोकळी वृत्ती पाहून सम्राटाला गंमत वाटली.त्याने त्यांच्याशी व्यापारी चर्चा केली,तीवरून ते चांगलेच हुशार आहेत असे त्याला आढळून आले.त्याने त्यांच्याशी धर्म व राजकारण यांचीही चर्चा केली,तेव्हा त्या बाबतीत मात्र ते मूर्ख व अडाणी असल्याचे दिसून आले.
दोघांनीही सम्राटाला ख्रिश्चन करण्याची पराकाष्ठा केली.साऱ्याच मोंगोलियनांना ख्रिश्चन करावे अशी पोपची इच्छा होती.
कुब्लाईखान त्या दोघांना म्हणाला,"आपण काय बोलतो हे ज्याला नीट समजते असा कोणी ख्रिश्चन धर्मी आला, तर त्याच्याशी मी चर्चा करीन व ख्रिश्चन धर्म काय आहे ते पाहीन.म्हणून तुम्ही पोपकडे परत जा;व ख्रिश्चन धर्माचे शंभर उपदेशक इकडे पाठवायला त्याला सांगा. ते सुसंस्कृत,सर्व ललितकलांशी परिचित व नीट वादविवाद्कुशल असावेत.सर्व मूर्तिपूजकांस तद्वतच इतरांसही ख्रिस्ताचा कायदाच सर्वोत्कृष्ट आहे,हे त्यांना पटवून देता आले पाहिजे." निकोलो व मॅफ्फेओ पोपकडे जाण्यास निघाले.पण ते युरोपला पोहोचण्यापूर्वीच पोप मेला होता व कॅथॉलिक चर्चमध्ये मतभेद माजले होते,त्यामुळे दोन वर्षांपर्यंत नवीन पोपचीही निवड झालीच नव्हती.चिनी सम्राटाची इच्छा ऐकताच नव्या पोपने शंभर सुसंस्कृत धर्मतज्ज्ञ पाठविण्याऐवजी साधू डॉमिनिक याने स्थापलेल्या संप्रदायांतील दोन मूर्ख डोमिनिकना पाठविले.साधू डॉमिनिक हा स्पेनमधला सेंट फ्रेंन्सिसचा समकालीन संत होता.सेंट डॉमनिक याचा खाक्या सेंट फ्रेंन्सिसपेक्षा अगदी निराळा होता.तो लढाऊ वृत्तीचा होता,संकुचित ख्रिश्चन धर्माचा पुत्र होता.जिभेने लोकांना एखादी गोष्ट पटवून देता येत नसे,तेव्हा तो तलवार हाती घेई.तो एकदा नास्तिकांना म्हणाला, "तुम्ही ख्रिश्चन धर्मात आपण होऊन न याल,तर तुम्हाला त्यात हाकून नेण्यात येईल.कितीतरी वर्षे मी तुम्हाला उपदेश करीत आहे,गोड शब्दांनी सांगत आहे,तुमची मनधरणी करीत आहे,डोळ्यांत पाणी आणून तुमचे मन वळवू पाहत आहे.आमच्या स्पॅनिश भाषेत म्हण आहे,की जिथे गोड शब्दांनी काम होत नाही, तिथे ठोसे यशस्वी होतात; आशीर्वाद विफल झाले तरी आघात मात्र सफल होतात. अर्थात,आम्ही राजे,महाराजे,पोप,धर्मगुरू,सारे तुमच्याविरुद्ध उठवू.ते फौजा घेऊन तुमच्या देशावर चालून येतील व प्रार्थना निरुपयोगी ठरल्या,तिथे प्रहार विजयी होतील."
'मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद-सानेगुरुजी, मधुश्री पब्लिकेशन'
अशा वृत्तीचे ते दोन डेमिनिकन ख्रिश्चन वीर निकोलो व मफ्फेओ यांच्याबरोबर कुब्लाईला 'ख्रिस्ताचा धर्म कन्फ्यूशियसच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे.' हे पटवून देण्यासाठी आले.त्या दोघांप्रमाणेच आपला मुलगा मार्को यालाही निकोलोने आपल्याबरोबर आणले होते. मार्को ऐन उमेदीत होता.त्याला धर्माची आवड होती, तशीच व्यापाराचीही हौस होती.त्याला बरोबर नेले,तर कुब्लाई चांगला ख्रिश्चन होईल,मार्कोही चांगला व्यापारी होईल व चर्चच्या फायद्याप्रमाणेच स्वतःचा स्वार्थही साधेल,असे निकोलो व मफ्फेओ या दोघांनाही वाटले.या वेळेस ते व्हेनिसपासून चीनपर्यंत खुष्कीने गेले.हा प्रवास दीर्घ,कठीण आणि धोक्याचा होता.पर्वत ओलांडायचे,वाळवंटे उल्लंघायची,याला कंटाळून ते दोघे मिशनरी परत गेले;पण मार्को,त्याचे वडील व त्याचे चुलते हे तिघे मात्र संकटास न जुमानता पुढेपुढे चालले, ते जेरुसलेम येथे थांबले; व तेथील ख्रिस्ताच्या समाधीपुढील नंदादीपातील तेल त्यांनी बरोबर घेतले. कारण त्या तेलाने सारे रोग बरे होतात,अशी समजूत होती.त्या मोंगोलियन सम्राटाचा हृदयपालट करायला
आपल्यापाशी धर्मोपदेशक नसले,तरी निदान हे तेल तरी आहे अशी आशा तर त्यांना होतीच;पण शिवाय मार्का तरुण,देखणा व गोड वाणीचा असल्यामुळे तो शंभर शहाण्यांची उणीव भरून काढील असे त्यांना वाटत होते.मार्को कब्लाईला चुकीच्या धर्मापासून परावृत्त करील अशी श्रद्धा,असा विश्वास त्यांना होता.पण त्या पोलोची ही समजूत म्हणजे हास्यास्पद अहंकारावाचून दुसरे काय होते? व्यापारात यशस्वी होत असल्यामुळे आपण जे जे हाती घेऊ, त्यात यशच मिळेल असे त्यांना वाटे.माकोंच्या मदतीने आपण केवळ आपल्या पेट्याच सोन्याच्या नाण्यांनी भरू असे नव्हे,तर स्वर्गही कोट्यवधी चिनी-ख्रिश्चनांनी भरून टाकू अशी अहंकारी आशा करीत ते येत होते.
साडेतीन वर्षे प्रवास करून ते चीनला पोहोचले. कुब्लाईखानाच्या दरबारी ते सोळा वर्षे राहिले. त्यांनी लाखो रुपये मिळविले; पण एकाही माणसास ख्रिश्चन करून स्वर्गात पाठविण्याचे काम त्यास करता आले नाही.
पाश्चात्त्य संस्कृतीचा परिणाम तर कुब्लाईखानावर झालाच नाही;पण उलट कुब्लाईनेच पौर्वात्य संस्कृतीचा खोल ठसा माकोंवर उठविला.मार्को युरोपियन व ख्रिश्चन होता तरी,कुब्लाईने त्याला एक बडा अधिकारी म्हणून नेमले. तेराव्या शतकातील चिनी आजच्या युरोपियनांपेक्षाही उदार व विशाल दृष्टीचे होते.१९३५ साली एखाद्या कन्फ्यूशियस किंवा बौद्ध धर्माच्या चिनी माणसाला इंग्लंडमध्ये महत्त्वाची सनदी नोकरी मिळणे कितपत संभवनीय वाटते ? कल्पना करा.
मार्को पोलो व्हेनिसला परतला,तेव्हा व्हेनिस व जिनोआ यांच्या दरम्यान चाललेल्या आरमारी लढाईत त्याने भाग घेतला.ही लढाई १२९८ साली झाली.जिनोईजनी मार्कोला कैद केले.तुरुंगात वेळ घालविण्यासाठी व बरोबरच्या कैद्यांची करमणूक व्हावी म्हणून तो आपला पूर्वेकडील वृत्तांत रस्टिसिआनो नामक एका लेखकाला सांगून लिहवून घेऊ लागला.'मार्को पोलोचे प्रवासवृत्त' या नावाने रस्टिसिआनोने तो वृत्तांत पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला.हे पुस्तक चौदाव्या शतकातील फार खपणाऱ्या पुस्तकांपैकी एक होते.मार्को जरा अतिशयोक्ती करणारा होता.तो प्रवासी व्यापारी व हिंडताफिरता विक्रेता होता व असे लोक कसे बोलतात, कायकाय गप्पा मारतात हे सर्वांस माहीतच आहे.लाखो हिरेमाणके,लाखो मैल सुपीक जमीन,लाखो सोन्याची नाणी,आश्चर्यकारक स्त्री-पुरुष,इत्यादी नानाविध गोष्टींविषयी तो अतिशयोक्तीने बोलतो व लिहितो. त्याच्या या अतिशयोक्तीपूर्ण लेखनपद्धतीमुळे लोक त्याला 'लाखोंनी लिहिणारा मार्को,लक्षावधी मार्को' असे थट्टेने म्हणत.आधीच मार्कोची अतिशयोक्ति व तीत आणखी रस्टिसिआनोच्या अलंकाराची भर पडताच अशी एक नवलपूर्ण कथा जन्मास आली की, ती वाचताना आपण एखाद्या जादूगाराच्या सृष्टीत किंवा पऱ्यांच्या अथवा गंधर्वांच्या नगरीतच आहोत असे वाटते;पण ही अतिशयोक्ती व हे अलंकार वगळताही मार्को पोलोचे हे पुस्तक उत्कृष्ट आहे यात शंकाच नाही. ते इतिहासयुगात नवयुग निर्माण करणारे आहे. स्वतःच्या संस्कृतीहून वेगळ्या दुसऱ्याही संस्कृती आहेत, आपल्या देशाशिवाय दुसरे देशही आहेत,असे या ग्रंथाने युरोपियनांस शिकविले व त्यांची दृष्टी या अन्य संस्कृतींकडे व देशांकडे वळविली.या पुस्तकाने मध्ययुगातील झापड पडलेल्या मनाला जागृत केले.जागृत करणाऱ्या अनेक कारणांपैकी मार्को पोलोचे प्रवासवृत्त हे एक महत्त्वाचे कारण आहे.या ग्रंथामुळे मध्ययुगातील युरोपीय मनासमोरचे क्षितिज विस्तृत झाले व त्याला पूर्व व पश्चिम यांमध्ये विचारांची व वस्तूंची अधिक उत्साहाने देवघेव व्हावी;व व्यापारी आणि संस्कृती संबंध वाढावेत असे आतून वाटू लागले.जग अधिक मोठे झाले,जगाचा अधिक परिचय झाला, मानवजात अधिक जवळ आली, पूर्वे कडे जाण्यासअधिक सोपे व जवळचे रस्ते शोधून काढावेत असे युरोपियनांस वाटू लागले व या प्रयत्नांतूनच अमेरिका त्यांना एकदम अचानक सापडली
.युरोपियनांनी चिनी लोकांची बंदुकीची दारू घेतली.चिनी लोकांनी ती शोधून काढली,पण ती केवळ शोभेसाठी व मुलांच्या खेळासाठी वापरली. युरोपियनांनी ती युरोपात नेली व तिच्यापासून मरणाचे प्रभावी साधन तयार करून तिचा युरोपीय युद्धांत प्रचार केला.
एक महत्वाची नोंद...
आमचे मार्गदर्शक मल्हार लोखंडे सर यांच्याकडून आलेली
विचारच तयार होत असताना मनंच तिथे अज्ञान पूर्व असते. तेव्हा हे घडतं . ई. पॉल टॉरेंसच्या मते...वेगवेगळ्या चिंतन स्थितीतून विचारांची निर्मिती होते तेव्हा ते विचार -नवीन व मौलिक, विचारांचा प्रवाह, विचारा- विचारांच मदत कार्य-लवचिकता, विचारांचे वास्तव आणि विचारांचा विस्तार,
*********************
ग्राहम वालेस
समस्या एकटीकरण,
अव चेतन मन, परीक्षणपूर्वक स्थितीत जन्मजात वातावरण चिंतन व विचार स्थिती प्राप्त होते तेव्हा...
जन्मजात वातावरण,
मानवाच्या उजव्या बुद्धीतील कलात्मक कल्पना जागृत होतात,तेव्हा जाणीवपूर्वक क्षमता विचारांची जबाबदारी घेतात व त्या आत्मविश्वासपूर्वक स्वतंत्र विचारांना जन्म देतात तेव्हा ते विचार अज्ञानाचे ज्ञानात रूपांतर करते. तेथेच सृजनता घडते....जे.पी गिल्फोर्ड
असे त्यांचेही मत टाॅरेंस सोबत जुळते....