जोस सॅल्वडोर अल्वरेंगा
एक होडी,खाली समुद्र आणि वर आकाश एवढ्यावर खोल समुद्रात फेकला गेलेला माणूस एकट्याने किती काळ तग धरू शकतो? माणसाची सहनशक्ती किती कमालीची असते याचं आश्चर्यकारक दर्शन घडवणारी मध्य अमेरिकेतल्या जोस सॅल्वडोर अल्वरेंगा या मच्छीमाराची ही कहाणी.
▶ ही गोष्ट आहे २०१२ सालची.मेक्सिकोतल्या कोस्टा अझूल नावाच्या छोट्या गावातल्या मच्छीमार वस्तीतली.जोस सॅल्वडोर अल्वरेंगा हा मूळचा मेक्सिकोच्या शेजारी असलेल्या मध्य अमेरिकेतल्याच एल सॅल्वडोर देशातला मच्छीमार. त्याच्या गावातल्या रोजच्या भांडणांना आणि मारामारीला वैतागून तो मेक्सिकोतल्या कोस्टा अझूलमध्ये स्थिरावलेला असतो.आई-वडील, प्रेयसी आणि तिच्यापासून झालेली मुलगी या सगळ्यांना मागे ठेवून.खरं तर एल सॅल्वडोरसारख्या देशातून बाहेर पडणारी माणसं सहसा अशा गरीबड्या गावांमध्ये थांबत नाहीत.ती मेक्सिको पार करून अमेरिकेत जाण्याच्या मागे असतात.पण अल्वरेंगाचं प्रकरण वेगळं असतं.त्याला मुख्य गावापेक्षा मच्छीमार वस्तीशी जास्त देणं-घेणं असतं आणिजमिनीवरच्या व्यवहारांपेक्षा प्रशांत महासागराची ओढ अधिक असते.
वयाच्या दहाव्या वर्षीपासून अल्वरेंगा मासेमारीचंच काम करत आलेला असतो.त्याच्याइतका तरबेज मच्छीमार त्या वस्तीत दुसरा नसतो.मनमोकळा स्वभाव,सर्वांना मदत करण्याची तयारी आणि मच्छीमारीतलं कसब यामुळे तो लवकरच कोस्टा अझूलच्या मच्छीमार वस्तीत लोकप्रिय होतो.त्याला आपल्या बोटीवर ओढण्यासाठी मालकांची चढाओढ सुरू असते;पण अल्वरेंगाला ना पैशांचा मोह असतो ना कसली महत्त्वाकांक्षा. मासेमारीसाठी समुद्रात झोकून देणं आणि परतल्यावर मित्रांसोबत खाणं-पिणं,मौज करणं एवढंच त्याचं आयुष्य असतं.साऱ्या वस्तीप्रमाणेच आपल्या बोटमालकांचाही तो मित्र होऊन जातो.
१७ नोव्हेंबर २०१२.वस्तीत कुठल्याशा पार्टीची तयारी सुरू असते.वादळवाऱ्याचे दिवस असतात,त्यामुळे बहुतेक मच्छीमार समुद्र शांत व्हायची वाट पाहत किनाऱ्यावर पार्टीच्या प्लॅनिंगमध्ये मश्गुल असतात. अल्वरेंगा मात्र अशा छोट्या-मोठ्या वादळांना घाबरून जमिनीवर थांबणारा नसतो.बोटीवरचा त्याचा नेहमीचा पार्टनर या वेळी काही कामामुळे त्याच्यासोबत येणार नसतो;पण त्यामुळे जाणं रद्द न करता तो नवा पार्टनर शोधतो,बोटीचं हवं-नको बघतो आणि पंचवीस फुटी मोटारबोट पाण्यात घालतो.त्याचा हा नवा पार्टनर कोडोंबा नावाचा नवखा तरुण मुलगा असतो.त्याला ना मच्छीमारीचा फारसा अनुभव असतो ना समुद्रात झोकून देण्याचा पिंड.पण एक दिवसाचा तर प्रश्न,असं म्हणून अल्वरेंगा त्याला सोबत नेतो.वादळ सुरूच असतं; पण अल्वरेंगाला त्याची सवय असते.त्यांची बोट आत नेहमीच्या ठिकाणी पोहोचल्यावर दोघंही प्रचंड जाळं समुद्रात टाकायला सुरुवात करतात.
रात्री आठच्या सुमारास जाळं टाकून होतं.आता निवांतपणे बिडी ओढत मासे जाळ्यात अडकण्याची वाट बघत थांबून राहायचं एवढंच काम.रात्रभर मासळी पकडायची आणि सकाळी पुन्हा किनाऱ्याच्या दिशेने मोहरा वळवायचा,हा त्याचा नेहमीचा दिनक्रम.छोट्या-मोठ्या वादळांनी आजवर हा नेम कधीही चुकलेला नसतो.पण जसजशी रात्र वाढत जाते तसा वादळाचा जोर वाढतो.हे वादळ नेहमीपेक्षा ताकदीचं आहे हे अल्वरेंगाच्या लक्षात येतं.थोडा वेळ वाट पाहिल्यावर तो जाळं काढून परतण्याचा निर्णय घेतो.तो आणि कोर्डोबा जाळं ओढू लागतात.निम्मं जाळं हातात येतं तेव्हाच त्यांच्या लक्षात येतं,की या वेळी आपल्याला जबरदस्त मासळी हाती गावली आहे.तोवर अर्धा टन मासे त्यांनी बोटीच्या आइसबॉक्समध्ये रिकामे केलेले असतात.आता वादळाचा तडाखा आणखी वाढतो.मुसळधार पाऊस कोसळू लागतो.बोटीत पाणी साठू लागतं. बोट प्रचंड हेलकावे खाऊ लागते.ती उलटू नये यासाठी अल्वरेंगाला आपलं सगळं कसब अन् ताकद पणाला लावावी लागते.नवखा कोर्डोबा तर कमालीचा घाबरून जातो.अल्वरेंगा त्याला पाणी बाहेर काढण्याच्या कामाला लावतो;पण कितीही पाणी उपसलं तरी बोट पाण्याने भरतच चाललेली असते.बोट स्थिर ठेवणं,जाळं आत ओढणं आणि पाणी बाहेर टाकणं,सगळं एकाच वेळी करणं अशक्य असतं.त्यामुळे अल्वरेंगा तातडीने एक टोकाचा निर्णय घेतो- जाळं कापून टाकायचं आणि बोट माघारी वळवायची.कुठल्याही मच्छीमारासाठी जाळं कापण्याचा निर्णय अगदी शेवटचा असतो. तशीच वेळ आल्याशिवाय हजारो डॉलर्स किमतीचं आणि ज्यावर आपलं पोट अवलंबून आहे ते जाळं कापण्याचा निर्णय कुणी घेत नाही.अल्वरेंगा तर नाहीच नाही.पण त्याच्या मते आता ती वेळ आलेली असते.तो फार विचार न करता जाळं कापून टाकतो आणि कंपासच्या साह्याने पूर्वेकडची किनाऱ्याची दिशा पकडतो.हे थोडं अघटित घडलं खरं,पण आता लवकरच या वादळातून सहीसलामत बाहेर पडून मित्रांसोबत चिकन तंगडी हाणत असू,असा विचार करून अल्वरेंगा बोट हाकण्यावर लक्ष केंद्रित करतो.
नोव्हेंबरमध्ये तसाही समुद्र रासवट असतो;पण आजचं प्रकरण साधंसुधं नाही हे तोवर त्यांच्या लक्षात आलेलं असतं.तब्बल दहा-दहा फुटी लाटा एखाद्या सर्किंग बोर्डप्रमाणे त्यांची बोट वर उचलून पुन्हा खाली टाकत असतात.
अल्वरेंगाच्या जागी आणखी कोणी असतं तर बोट दहा मिनिटांत उलटली असती हे नक्की.बोटीच्या हेलकाव्यांमुळे कोर्डोबाला एका जागी स्थिर राहता येत नसतं. त्यामुळे पोटात ढवळून तो सतत ओकत असतो, रडत असतो आणि जमेल तसं बोटीतलं पाणी बाहेर काढत असतो.मात्र,अल्वरेंगा म्हणजे समुद्रावरच वाढलेला जीव असल्यामुळे तो त्या वादळाचा स्वभाव समजून घेत त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. 'प्रत्येक वादळाचा एक पॅटर्न असतो. जणू मोर्स कोडच. तो समजून घेतला की वादळातून तरून जाता येतं', अशी अल्वरेंगाची अनुभवातून आलेली थिअरी असते. ती त्याला इथेही उपयोगी पडते.
पहाट होते.अल्वरेंगाचा कंपास सांगत असतो की ते योग्य दिशेने चालले आहेत.सगळं काही सुरळीत झालं तर पाच-सहा तासांत किनाऱ्याला पोहोचू असा त्याचा अंदाज असतो... आणि नेमकी तेव्हाच बोटीची मोटार आचके द्यायला सुरुवात करते. सुरुवातीला विचित्र घरघर ऐकू येते आणि थोड्याच वेळात मोटार बंदच पडते.आता मात्र अल्वरेंगालाही धोक्याची जाणीव होते.किनारा जवळ असला तरी एवढ्या वादळात,मोटार बंद पडलेल्या अवस्थेत आणि हातात कोणतंही वल्हं नसताना किनाऱ्यापर्यंत पोहोचणार कसं?बोट वारं नेईल त्या दिशेने भरकटत जाण्याला पर्यायच नाही.अल्वरेंगा तातडीने रेडिओ उचलतो आणि किनाऱ्यावर बोटीच्या मालकाला संदेश पाठवतो:"विली,आमची मोटार बंद पडली आहे.आम्ही किनाऱ्यापासून फार लांब नाही,पण वादळ खूप जोरात आहे."नशिबाने बोटीचा मालक विली रेडिओजवळच बसलेला असतो.तो लगेचच उत्तर देतो,"तुझं नक्की ठिकाण सांग,लगेच मदत घेऊन येतो." पण अल्वरेंगाचा जीपीएस बंद पडलेला असतो.तो विलीला ते सांगतो,"आमची पुरती वाट लागली आहे.लवकर या,नाही तर.." किनाऱ्यावरच्या लोकांनी ऐकलेले अल्वरेंगाचे हे शेवटचे शब्द ठरतात.
अल्वरेंगाला भीती असते त्यानुसारच वादळी वाऱ्यांमुळे बोट किनाऱ्यापासून दूर भिरकावली जात असते.मोटार बंद असताना बोटीचा तोल सावरण्यासाठीही त्याला जिवाचं रान करावं लागत असतं.पण आता आपले साथीदार थोड्याच वेळात आपली सुटका करणार याची खात्री दोघांनाही असते,पण तोवर तरी बोट तग धरेल का याची अल्वरेंगाला भीती वाटू लागते.शेवटी तो आणखी एक कठोर निर्णय घेतो - बोटीतली सगळी मासळी समुद्रात फेकून देण्याचा.ते केल्यावर तरी बोट थोडी स्थिर आणि पाण्याच्या वर राहील असा त्याचा अंदाज असतो.जास्त विचार न करता दोघं मिळून मासळी बाहेर फेकायला सुरुवात करतात.एवढे प्रचंड मासे फेकून द्यायलाही त्यांना तास लागतो. त्याच्या अंदाजानुसार बोटीचे हेलकावे काहीसे कमी होतात;पण तेवढ्यात त्यांना दुसरा धक्का बसतो. बोटीतला रेडिओही बंद पडतो.बचाव दलाशी संपर्क साधण्याचा मार्ग पूर्ण बंद होतो आणि वादळ तर बोटीला झपाट्याने आत समुद्रात ओढत असतं. इतका वेळ कोर्डोबाला समजावणाऱ्या अल्वरेंगालाही रडू फुटावं अशी परिस्थिती आता आलेली असते.
इकडे अल्वरेंगाच्या बोटीचा मालक विली आणि इतर काही मित्रमंडळी तातडीने बोटी समुद्रात घालतात;पण बराच वेळ शोध घेऊनही त्यांना अल्वरेंगाचा पत्ता लागत नाही.वादळाचं अक्राळविक्राळ रूप पाहता जास्त आत बोटी घालणंही शक्य नसतं.सलग दोन दिवस शक्य तितका सगळा परिसर हे लोक धुंडाळतात,सरकारी मदतीने विमानाने पाहणी केली जाते;पण अल्वरेंगाची बोट गायब असते.एरवी कोणत्याही मच्छीमार बोटीसाठी दोन दिवस शोधाशोध करण्याची पद्धत असते,तरीही माणूस सापडला नाही तर तो मेला असं गृहीत धरलं जात असतं; पण अल्वरेंगाच्या बाबतीत मात्र अपवाद घडतो. त्याच्यासारख्या कसबी नाविकाची बोट उलटेल यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. साऱ्यांचं अल्वरेंगावरचं प्रेमही कदाचित त्याला कारणीभूत असतं. त्यामुळे वादळ थंडावल्यावर थोड्या दिवसांनी पुन्हा शोधमोहिमा काढल्या जातात; पण व्यर्थ ! समुद्राने जणू अल्वरेंगा आणि कोर्डोबाला गिळून टाकलेलं असतं. अखेर नाइलाजाने शोध थांबवला जातो.अल्वरेंगाच्या मित्रांच्या मनात मात्र कुठे तरी आशा असते,की तो इतक्या सहजासहजी हार मानणं शक्य नाही.तो नक्कीच जिवंत असणार.
.. त्यांचा विश्वास अनाठायी नसतो.सहा दिवस उलटून गेलेले असतात,पण अल्वरेंगा आणि कोर्डोबा दोघंही जिवंत असतात.एवढ्या वादळात, मुसळधार पावसात आणि कडाक्याच्या थंडीत हे दोघं कसा टिकाव धरू शकतात हे एक आश्चर्यच. मासळी बाहेर फेकल्यावर रिकाम्या झालेल्या आइसबॉक्समध्ये शरीराची मुटकुळी करून एकमेकांना चिकटून ते दोघं पडून राहिलेले असतात.बोटीतलं पाणी उपसून उपसून कोर्डोबा अर्धमेला झालेला असतो.त्याचं मनोधैर्य तर पार रसातळाला गेलेलं असतं.'आता आपण नक्कीच मरणार.आपल्या नशिबात अतिशय वेदनादायी मृत्यू लिहिलेला आहे',असा जप कोडोंबा सतत करत असतो. ल्वरेंगा मात्र अजून हिंमत हरलेला नसतो. लवकरच एखादं बचाव दल आपली सुटका करेल किंवा एखादं मोठं जहाज आपल्याला पाहील.
(मृत्यू पाहिलेली माणसं,मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन)
नोंद - सदरचा हा लेख सलग तीन भागात प्रकाशित केला जाईल,त्यातील हा पहिला भाग.