* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: कामशास्त्राचा अवलिया रिचर्ड बर्टन / Richard Burton, the master of sex

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२७/११/२५

कामशास्त्राचा अवलिया रिचर्ड बर्टन / Richard Burton, the master of sex

नैतिक-अनैतिकतेच्या गुंत्यात अडकून न पडता आपल्या मर्जीनुसार जीवन जगणारे सर रिचर्ड बर्टन हे आयुष्याच्या अखेरपर्यंत जगभर भटकत राहिले. निरनिराळ्या देशांतील शारीरिक संबंधांबाबतच्या असंख्य अनिष्ट प्रथा त्यांनी पहिल्यांदा जगासमोर आणल्या.अशा या जगावेगळ्या 'इरॉटिक ट्रॅव्हलर' बद्दल…(कामशास्त्राचा अवलिया अभ्यासक रिचर्ड बर्टन,हटके - भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन)


एकोणिसाव्या शतकात इंग्लडच्या समाजमनावर व्हिक्टोरियन चालीरीतींचा जबरदस्त पगडा होता. संस्कृतीच्या नावाखाली लोकांच्या वागण्याबोलण्यावर अनेक निर्बंध टाकले गेले होते.

शारीरिक संबंधांबाबत जाहीरपणे बोलणंदेखील असभ्य मानलं जात होतं, त्याविषयीची माहिती गोळा करणं तर दूरच राहिलं. अशा वातावरणात सर रिचर्ड बर्टन नावाचा एक इंग्रज अवलिया मात्र जगभर भटकंती करत याच विषयाची आश्चर्यकारक माहिती गोळा करून जगापुढे मांडत होता.त्यांनी सेक्सबाबतच्या जगभरातल्या अनेक प्रथा, चालीरीती,धारणा यांची बारकाव्यां -

सहित निरीक्षणं नोंदवली.समलिंगी संबंध,तसंच मुस्लिम समाजात असलेल्या स्त्रियांची सुंता करण्याच्या अघोरी पद्धतीसारख्या अनेक प्रथा अस्तित्वात आहेत हे जगाला प्रथमच कळलं ते सर बर्टन यांच्या निरीक्षणांवरूनच. आज या घटनेला सुमारे दीडशेहून अधिक वर्ष लोटली आहेत आणि आता कुठे जागतिक पातळीवर त्या अघोरी प्रथेविरुद्ध आवाज उठवला जात आहे.


सर रिचर्ड बर्टन यांनी निरनिराळ्या देशांतील दुर्गम भागात भटकंती केली.त्यांना या देशांमधल्या अनेक भाषा त्यातल्या बारकाव्यांसह अस्खलितपणे येत होत्याच,पण त्या भाषांतील साहित्याशीही त्यांचा परिचय होता.ते ज्या भागात जात तिथली स्थानिक भाषाही झटकन आत्मसात करत आणि स्थानिकांतलेच एक बनून राहत.

स्थानिक लोक त्यांना आपल्यातला एक मानून त्यांच्याशी निःसंकोच गप्पा मारत असत.त्यामुळे त्या भूभागातील स्त्री-पुरुष संबंधांतले बारकावे त्यांना अवगत होत.बर्टन त्या सर्व चालीरीती नोंदवून त्या जपून ठेवत असत.अफाट स्मरणशक्ती,तटस्थ दृष्टीने केलेलं निरीक्षण,बारकावे टिपण्याची वृत्ती आणि भावनात्मक वृत्तीचा अभाव यामुळे त्यांच्या नोंदी अतिशय अचूक असत.त्यांच्या अशा अनेक नोंदींचं संपादित संकलन म्हणजे एडवर्ड ली यांनी संपादित केलेलं 'द इरॉटिक ट्रॅव्हलर' हे पुस्तक. (त्यांनी जगभरातल्या कामशास्त्रावरचं साहित्य जमवून त्याचा अनुवादही पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे.हे प्रचंड गाजलेलं पुस्तक म्हणजे 'द अरेबियन नाइट्स' हा महाखंड.

त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना पाश्चात्त्य जगात 'कामशास्त्राचा पहिला अनुवादक' तसंच 'सेक्युअल अँथ्रॉपॉलॉजिस्ट' अशीही प्रसिद्धी मिळाली आहे.)


'द इरॉटिक ट्रॅव्हलर' या पुस्तकातून सर रिचर्ड बर्टन यांचं आयुष्य उलगडत जातं तेव्हा 'सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असतं' याचीच प्रचिती येते.रिचर्ड फ्रान्सिस बर्टनचा जन्म १९ मार्च १८२१ या दिवशी लंडन इथे झाला.त्याचे वडील लेफ्टनंट कर्नल जोसेफ नेटरव्हिल बर्टन यांना तीन मुलं.रिचर्ड सर्वांत मोठा.कर्नल बर्टन अत्यंत निर्भीड,स्पष्टवक्ते, तत्त्वनिष्ठ आणि वृत्तीने भटके होते.एका ठिकाणी फार काळ राहणं त्यांना आवडत नसे.या सर्व गुणांची देणगी त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला वारसा म्हणून दिली होती.याच गुणांमुळे कर्नलसाहेबांना त्यांची सैन्यातली नोकरी गमवावी लागली होती.त्यांनी अपुऱ्या माहितीवर केवळ वरिष्ठ सांगतात म्हणून राणीविरुद्धच्या व्यभिचाराच्या खटल्यात साक्ष द्यायला नकार दिला होता.कर्नल बर्टननी वरिष्ठांची आज्ञा पाळली नाही म्हणून ड्यूक ऑफ वेलिंग्टननी त्यांना निम्म्या पगारावर सक्तीने निवृत्त करण्याची आज्ञा दिली.सुदैवाने कर्नल बर्टनच्या पत्नीला,मार्था बेकरला,माहेरहून खूप संपत्ती वारसाहक्काने मिळाली होती,त्यामुळे कर्नलसाहेब आरामात जगू शकले.


रिचर्डच्या भटकंतीला बालवयातच सुरुवात झाली. त्याचे आई-वडील फ्रान्समध्ये स्थायिक झाले.रिचर्ड आणि त्याच्या भावंडांचं औपचारिक शिक्षण झालंच नाही.तसंच त्यांच्या जगण्याला शिस्तही नव्हती. जसजसं वय वाढू लागलं तसतसे रिचर्ड आणि त्याचे भाऊ अधिकाधिक बेदरकार जीवन जगू लागले. समाजाला सत्याची कदर नसते,त्यांना देखावा महत्त्वाचा वाटतो,या निष्कर्षाप्रत रिचर्ड फार लहान वयातच पोहोचला होता.फ्रान्समध्ये काही वर्षं राहिल्यानंतर तिथे सुरू असलेल्या राजकीय उलाढालींमुळे बर्टन कुटुंब पुन्हा इंग्लंडमध्ये परतलं. तोपर्यंत रिचर्डने फ्रेंच भाषा आत्मसात केलेली होती.


बर्टन कुटुंब इंग्लंडमध्ये असताना रिचर्डला कांजिण्या झाल्या आणि कर्नलसाहेबांनी त्यांचा मुकाम परत फ्रान्समध्ये हलवला.तिथून एका वर्षातच ते इटलीस राहायला गेले.तिथेही ते स्थिरावले नव्हतेच.पण इटलीतल्या या मुक्कामात रिचर्ड आणि एडवर्ड या दोन्ही भावांनी इटालियन भाषेवरही प्रभुत्व मिळवलं.


इटलीतल्या वास्तव्याने रिचर्डला इतके विविध अनुभव दिले,की इतर सामान्य माणसाला त्याच्या संपूर्ण आयुष्यभरातदेखील एवढा अनुभव मिळणं कठीणच. त्या वेळी रिचर्ड फक्त सोळा वर्षांचा होता,इटलीतल्या नेपल्समध्ये कॉलऱ्याची साथ होती,त्या वेळी या दोन भावांनी साथीत मेलेल्यांची प्रेतं हातगाड्यांवर रचून त्या गाड्या स्मशानात नेण्याचं काम केलं होतं. नेपल्समध्येच असताना दोघांनी घराजवळच असलेल्या वेश्यागृहाची माहिती काढली आणि ते तिथे नियमित भेटी देऊ लागले.भावांच्या या बेदरकारपणामुळे त्यांचा वेश्यांबरोबरचा पत्रव्यवहार कर्नल

साहेबांच्या हातात सापडला.ते खवळले आणि त्यांनी नेपल्स सोडायचा निर्णय घेतला.ते आधी प्रॉव्हेन्स इथे,नंतर पिरनीज पर्वतराजीतील पाऊ या खेड्यात राहायला गेले. पाऊ हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलं तरी तो स्मगलरांचा अड्डा होता.त्या स्मगलरांच्या संपर्कात यायला या बंधूंना वेळ लागला नाही.तिथे येणाऱ्या पर्यटक मुलींना पटवणं हाही उद्योग या बंधूंनी आवडीने केला.आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन चर्चच्या सेवेत दाखल करावं,असा एक अजब निर्णय या वेळी कर्नलसाहेबांनी घेतला.वडिलांच्या या निर्णयामुळे रिचर्ड ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात दाखल झाला.ग्रीक आणि लॅटिन शिकवणाऱ्या त्या महाविद्यालयात रिचर्डच्या पूर्वानुभवाचा उपयोग नव्हता.व्यावहारिक जगाचं ज्ञान,इंग्रजी-फ्रेंच आणि इटालियन बोलीभाषा अस्खलितपणे बोलता येणं,बुद्धिबळ आणि तलवारबाजीत प्रावीण्य यांचा नि ऑक्सफर्ड विद्यापीठाचा मेळ बसणं तसं अवघडच होतं. तोपर्यंतच्या आयुष्यात त्याचा आणि शिस्तीचाही कधी संबंध आलेला नव्हता,त्यामुळे लवकरच त्याची ऑक्सफर्ड विद्यापीठातून हकालपट्टी झाली.


विद्यापीठातून बाहेर पडल्यावर काय करायचं हा प्रश्न रिचर्डने स्वतःच सोडवला.त्या काळात रिचर्ड अरेबिक भाषेचा अभ्यासही करत होता.याच दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये झालेल्या पराभवात बरेच अधिकारी गमावले असल्याने कंपनीने सैन्यभरती सुरू केली होती.हे रिचर्डला कळलं तेव्हा त्याने पाचशे पौंड एवढी रक्कम भरून बाँबे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये कमिशन्ड अधिकारी म्हणून नोकरी मिळवली.

लगेचच त्याने हिंदुस्तानी भाषा शिकण्यास सुरुवातही केली.चार महिन्यांच्या सागरी प्रवासानंतर, जून १८४२ मध्ये झुपकेदार मिश्यांचा हा रुबाबदार आणि देखणा अधिकारी मुंबई बंदरात उतरला.इथे आल्या आल्या काही दिवसांतच इथल्या इंग्रज अधिकाऱ्यांशी त्याचे खटके उडू लागले,याचं कारण रिचर्ड भारतीय वेश्यांच्या वस्तीत उघडपणे वावरायचा.

त्याने कुणाच्या लक्षात येणार नाही अशा त-हेने हे उद्योग करायला ब्रिटिश समाजाची हरकत नव्हती;पण कुठलीही गोष्ट चोरून करायची हे रिचर्डला मान्य नव्हतं.


भारतात आलेल्या सैन्याधिकाऱ्याला इथे आल्यावर सहा महिन्यांच्या आत हिंदुस्थानी भाषेची परीक्षा पास होणं आवश्यक असे.रिचर्ड त्या परीक्षेत पहिला आला.नंतर त्याने गुजराती आणि मराठी भाषेतही प्रावीण्य मिळवलं.


याच सुमारास सर चार्ल्स नेपियरनी सिंध प्रांत जिंकून घेतला होता.१८४४ च्या सुरुवातीस रिचर्डची रेजिमेंट सिंधला रवाना झाली.त्याला कराचीत मुख्य कचेरीत असलेल्या सिंधच्या सर्वेक्षण विभागात नियुक्ती मिळाली.इथे त्याने भारतीय चालीरीतींची नोंद ठेवायला सुरुवात केली.सामान्य भारतीयांचं जीवन हा त्याचा आवडीचा विषय बनला.


त्याचा रंग युरोपियन गोरा नव्हता.त्यातच त्याच्या भटकंतीमुळे तो रापला होता.त्यामुळे आणि भाषाप्रभुत्वामुळे स्थानिक बनून वावरणं त्याला सहज जमून जात होतं.त्याने कराचीमध्ये तीन विविध वस्तू भांडारं उघडली.या दुकानांमध्ये काम करत असताना तो गिऱ्हाइकांशी संवाद साधायचा.त्यामुळे त्याच्याजवळ माहितीचा खजिनाच जमा झाला.स्थानिक चालीरीती, सण-उत्सव,रस्त्यावरचे जादूगार आणि भटके यांच्याकडून धार्मिक माहितीबरोबरच लैंगिक समजुती, कामोत्तेजकं,युनानी औषधं,वैदूंची झाडपाल्याची औषधं यांची माहिती त्याने मिळवली.या नोंदींवर आधारित 


त्याचं पहिलं पुस्तक इ. स. १८५१ मध्ये प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकाचं शीर्षक होतं,'सिंध अँड द रेसेस देंट इनहॅबिट द व्हॅली ऑफ इंडस, वुईथ द नोटिसेस अँड द टोपोग्राफी अँड हिस्टरी ऑफ द प्रॉव्हिन्स'. या पुस्तकात आणि नंतरही इतर पुस्तकांमध्ये बर्टनने एक नोंद वारंवार केल्याचं दिसून येतं. 


सिंध प्रांतातल्या स्त्रियांच्या निरीक्षणावरून बर्टनने म्हटलं आहे,की उष्ण आणि आर्द्र हवामानाच्या भूप्रदेशातील पर्वतराजीजवळ राहणाऱ्या स्त्रिया या त्या भागातील पुरुषांपेक्षा जास्त कामातुर आणि भावनिक असतात,तर थंड भूप्रदेशात नेमकी याउलट परिस्थिती दिसून येते.(त्यासाठी त्याने कुठलाही पुरावा दिलेला नसला तरी त्याच्या या निरीक्षणावर तो शेवटपर्यंत ठाम होता.) सिंध प्रांतातल्या समजुती, विशेषतःवशीकरणासाठी करण्यात येणाऱ्या जा‌देटोण्यावर बर्टनने या पुस्तकातील बरीच पानं खर्च केली असून त्यासाठीचे तांत्रिक विधी आणि मंत्रही दिले आहेत.

'सिंधी स्त्रिया दिसायला सुंदर असल्या तरी हिंदुस्तानात त्यांच्या चालचलणुकीबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही,' असं सांगून त्या कारणाने होणाऱ्या खूनखराब्याची काही उदाहरणंही तो देतो.सिंधसह वायव्य हिंदुस्तानातल्या पुरुषांकडून वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कामोत्तेजकांचं बारकाव्यांसह वर्णनही त्याने केलं आहे.. स. १८४५ मध्ये सर चार्ल्स नेपियरना कराचीत पुरुष वेश्यागृहं आहेत असं कळलं.सर चार्ल्सनी 'याची सत्यता तपासून पाहावी'असं मध्यस्थामार्फत बर्टनला सुचवलं. तशी लेखी सूचना मात्र बर्टनला मिळाली नव्हती.त्याने त्याच्या नेहमीच्या पद्धतशीरपणे त्या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली.तो 'मिर्झा अब्दुल्ला बशिरी' नावाचा एक व्यापारी बनून कराचीला पोहोचला. मिळालेल्या माहितीवर आधारित एक तपास अहवाल त्याने मुंबईस १८४७ मध्ये पाठवला.दुर्दैवाने त्या वेळी सर चार्ल्स राजीनामा देऊन मायदेशी परतले होते. त्यांची जागा घेतलेले गृहस्थ फारच सोवळे आणि सनातनी वृत्तीचे होते.हा अहवाल वाचून ते संतापले. त्यांनी रिचर्ड बर्टनच्या बडतर्फीचा हुकुमनामा जारी केला.बर्टन सैन्यात अधिकारी होता.त्यामुळे सैन्यातली त्याची हकालपट्टी जरी लगेच झाली नसली तरी त्याच्या एकूण सैनिकी कारकिर्दीवर मात्र याचा वाईट परिणाम झालाच.मात्र,बर्टनचा अहवाल म्हणजे समलिंगी संबंध आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक वापराचा पहिला शास्त्रशुद्ध अभ्यास मानला जातो. बर्टन जगात जिथे जिथे गेला तिथे तिथे सर्व जमातींत त्याला या प्रकारचे लैंगिक संबंध आढळून आले.या निरीक्षणांवर त्याने 'टर्मिनल एसे' नावाचा एक प्रबंध लिहिला, जो पुढे त्यानेच लिहिलेल्या 'द अरेबियन नाइट्स' या प्रसिद्ध महाखंडातल्या दहाव्या भागात समाविष्ट केला गेला.सिंधमध्ये असताना वयाच्या पंचविसाव्या वर्षी बर्टनला कॉलरा झाला.त्या वेळी तो मरता मरता वाचला.


यातून सुधारण्यासाठी त्याला बराच काळ विश्रांती घेणं भाग होतं.त्यामुळे त्याला दोन वर्षांची रजा मंजूर करण्यात आली.या आजारपणाच्या रजेत विश्रांतीसाठी त्याला उटकमंड इथे सरकारी खर्चाने पाठवण्यात आलं. तेव्हा उटकमंड मद्रास इलाख्यात होतं.तिकडे त्रिवेंद्रममार्गे जायचं त्याने ठरवलं.त्याला वाटेत गोवा लागलं.गोव्याच्या सौंदर्याची भुरळ त्याला पडलीच.तो तिथे काही काळासाठी थांबला.इथे त्याला एक पोर्तुगीज मुलगी भेटली.ती 'काझा द मिसेरीकॉर्डिया' या कॉन्व्हेंटमध्ये नन होती.तिला उत्तम लॅटिन येत होतं. मुख्य म्हणजे तिला मठात जोगीण बनून राहायचा कंटाळा आला होता.लॅटिन शिकता शिकवता या दोघांनी गोव्यातून पळून जाण्याचं ठरवलं.बर्टनने स्वतः ही योजना आखून यशस्वीही केली.यानंतर चार वर्षांनी त्याने त्याच्या गोव्यातील वास्तव्यावर एक पुस्तक लिहिलं.'गोवा अँड द ब्लू माउंटन्स ऑर सिक्स मंथ्स ऑफ सिक लीव्ह' हे १८५१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्या पुस्तकाचं नाव. या पुस्तकात बर्टनने त्या पलायनाची घटना जशीच्या तशी न लिहिता ती एका अज्ञात ब्रिटिश तरुणाचं साहस म्हणून समाविष्ट केली. 


गोव्यातून कालिकतला पोहोचल्यानंतर बर्टन उटकमंडला गेला.इथे त्याला पर्शियनचा जाणकार असलेला एक मौलवी भेटला.त्याच्याकडून तो पर्शियन शिकला.सप्टेंबर १८४७ मध्ये तो मुंबईला परतला. मुंबईत त्याने पर्शियन भाषेची सरकारी परीक्षा दिली. नेहमीप्रमाणे याही भाषेच्या परीक्षेत तो पहिला आला. वैद्यकीय अधिकाऱ्याशी थोडीशी हुज्जत घालून त्याने शारीरिक सक्षमतेचं प्रमाणपत्र मिळवलं आणि तोपर्यंत अशक्तच असलेला बर्टन वैद्यकीय रजा संपवून त्याच्या सैनिकी सेवेत रुजू झाला.


सेवेत रुजू झाल्यानंतर त्याची रवानगी परत कराचीला करण्यात आली.इथे त्याने त्याच्या सिंधविषयक पुस्तकात भर घालण्यासाठी माहिती गोळा करणं सुरू केलं. इ.स. १८४८च्या उन्हाळ्याच्या थोडं आधीच दुसरं इंग्रज-शीख युद्ध सुरू झालं.बर्टनजवळ सहा भाषांमधील प्रावीण्याची प्रशस्तिपत्रकं आणि आधीच्या अधिकाऱ्यांची 'स्थानिकांमध्ये सहजपणे मिसळतो' अशी भलावण होती.त्या जोरावर त्याने पंजाबमध्ये घुसणाऱ्या सैन्याबरोबर दुभाष्या म्हणून जाण्याची परवानगी मागितली.

मात्र,त्याच्या नेहमीच्या वाह्यातपणाने त्याला पुन्हा एकदा दगा दिला. त्याला संधी नाकारण्यात आली.


त्यामुळे निराश झालेल्या बर्टनने नंतरची चार वर्षं इंग्लंड आणि फ्रान्समध्येच व्यतीत केली.या काळात त्याने वेगवेगळ्या विषयांवर पाच पुस्तकं लिहिली.याच काळात त्याला एक कल्पना सुचली.

त्याला जागतिक प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या प्रवासाची ही योजना होती. इ.स. १८५२ मध्ये या योजनेला संमती मिळावी म्हणून त्याने ती वरिष्ठांपुढे मांडली.'मध्य आणि पूर्व अरबस्तानाचं भूसंशोधन' असं त्या योजनेचं स्वरूप होतं.या मोहिमेत रुब-अल्‌खाली या 'एंप्टी कार्टर' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रचंड वाळवंटी भूभागाचाही समावेश होता.बर्टनच्या नियोजित साहसाला रॉयल जिओग्राफिक सोसायटीने मदत द्यायचं मान्य केल.

..अपुरे राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..!