* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: हास्य एक देणगी / Hasya Ek Dengi 

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

५/१२/२५

हास्य एक देणगी / Hasya Ek Dengi 

अंत:करणाला हास्य एक चांगलं औषध आहे.आपल्या

जगाला तर या औषधाची निकडीची गरज  फार मोठ्या प्रमाणात आहे.


ऐशीच्या घरात वय झालं असतांना तुम्ही स्मृती आणि माणसाची मरणाधीनता यांत गुंतता.मी माझ्या कार्यालयात बसलो होतो.खूप चांगल्या आठवणी येत होत्या.मनात विचार चालला होता, आणि माझं मन मागेमागे जातं रेड स्टीव्हन्सशी थबकलं.विधीमहाविद्यालयातून मी बाहेर पडलो होतो आणि माझं कार्यालय थाटलं होतं.पाटीवर नाव झळकत होतं,हॅमिल्टन अ‍ॅण्ड असोसिएटस्. पैकी असोसिएटस् हा वस्तुस्थितीपेक्षा इच्छेचा भाग होता.मी प्रत्येक दिवसाचा बराच भाग एकट्यानेच घालवत होतो. ( सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल, बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर EMBASSY BOOK DISTRIBUTORS )


एक दिवस बाहेरच्या दाराची घंटा वाजली.अर्धवेळ काम करणारी माझी सेक्रेटरी काम करून गेली होती,म्हणून उठलो आणि घाईने जाऊन कोण आलंय ते बघायला दार उघडलं.

दारात एक जोरकस व्यक्तिमत्त्वाचा माणूस उभा होता.त्याचं नाव रेड स्टीव्हन्स होतं हे मला नंतर कळलं.त्यानं मला सांगितलं की तो टेक्ससमधला तेल आणि गुरंढोरं ह्या क्षेत्रांमधला मोठ्ठा माणूस होणार होता आणि तो एका चांगल्या कायदेतज्ज्ञाच्या शोधात होता. अमेरिकेतल्या उत्तम विधीमहाविद्यालयाकडे त्याने चौकशी केली होती आणि आदल्या वासंतिक सत्रात मी पहिल्या क्रमांकाने पदवी परीक्षा पास झालो होतो.पुढे माझ्या ओळखीचं आणि आवडीचं झालं तसलं मोठं हसू हसत तो गरजला,"म्हणून मला वाटलं जगायला उत्तम कायदेतज्ज्ञ आणि जगातला उत्तम तेल आणि गुरंढोरं तज्ज्ञ एकत्र आलेच पाहिजेत."


त्या घटकेला मी केवळ विधिमहाविद्यालयातून नुकताच बाहेर पडलेला आणि कोणी अशील नसलेला असा कायदेतज्ज्ञ होतो,तर त्या तेल आणि गुरंढोरं यातल्या उत्तम माणसाकडे या दोन्हींमधलं काही नव्हतं,पण आम्हाला त्याची फिकीर वाटली नाही.ते असं सहजपणे सुरू झालं आणि त्याला कायमच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत मैत्रीचं स्वरूप आलं.मिस हेस्टिंग्जनं माझ्या कार्यालयात डोकावून सांगितलं की जेसन आम्हा दोघांची कॉन्फरन्स रूममध्ये वाट पहातो आहे.आणि त्यामुळे माझ्या रेड स्टीव्हन्सबद्दलच्या विचारांमध्ये व्यत्यय आला.


नंतर व्हिडिओच्या पडद्यावर रेड आला आणि म्हणाला,"बारा महिन्यांच्या या उपक्रमांपैकी सहा महिने तू नीट पाडलेस,बरं का जेसन.परंतु तरी मी तुला आठवण करून देतो की एक मोठा टप्पा तू जरी ओलांडला असलास तरी तुला एक मोठा टप्पा अजून पार पाडायचा आहे.आणि अजूनही जर का तुझी वृत्ती किंवा वर्तणूक मिस्टर हॅमिल्टनच्या अपेक्षेनुसार नसली तर लगेच हा प्रवास थांबवला जाईल.मृत्यूपत्रात लिहीलेली सर्वोत्तम देणगीही तुला मिळणार नाही.


"या महिन्यात हास्य ही एक देणगी कशी असते हा एक धडा तुला शिकायचा आहे.या देणगीचा धडा शिकवतांना माझ्यापुढे नाईट क्लबमधला किंवा विनोदी सिनेमातला विदूषक नाही.तुमच्या स्वतःकडे,तुमच्या समस्यांकडे आणि एकंदरच सर्व गोष्टींकडे बघून त्यातून करमणूक करून घेण्याचं तुमच्या अंगी सामर्थ्य हवं.खूप लोक दुःखी जीवन जगत असतात,कारण त्यांच्या समस्या ते लोक मनाला फारच लावून घेत असतात.मागच्या सहा महिन्यात मला वाटतं तू शिकलास की जीवनात अशा काही गोष्टी असतात की त्या गांभिर्यानं घेत, मोलाच्या मानायच्या असतात.


"या महिन्यात तू अशी व्यक्ती शोधून काढायची आहे,की ती व्यक्ती खूप अडचणींनी वेढली असूनही,खूप आव्हांनांना सामोरं जात असूनही, हास्यवृत्ती हरवून बसलेली नाही.

संकटग्रस्त असूनही ज्यानं हास्यवृत्ती राखून ठेवली आहे,तो जीवनात सुखी होणारच."


"महिन्याच्या शेवटी मिस्टर हॅमिल्टन आणि मिस हेस्टिंग्ज यांना तू अहवाल द्यायचा.तुला सापडलेली अशी व्यक्ती,आणि त्यापासून तू हास्य ही एक देणगी असते याबद्दल काय शिकलास ते सांगायचं." 


रेड स्टीव्हन्स हसायला लागला,म्हणाला, "जेसन पूर्वीच्या काळात आम्ही ज्या विनोदी परिस्थितीत कधी कधी सापडायचो त्याबद्दल टेडला विचार एकदा." रेड स्वतःशीच हसत असतांना त्याची छबी पडद्यावरून दिसेनाशी झाली आणि पडदा रिता झाला.


जेसननं विचारलं, "कशाबद्दल बोलत होते ते, मिस्टर हॅमिल्टन ?"


मी हसलो आणि म्हणालो,"केव्हांतरी आणि कुठेतरी बोलू याविषयी आपण.पण सध्या तू गांभीर्यानं, हास्य ही देणगी कशी असते,याचा विचार कर."


मिस् हेस्टिंग्ज जेसनला घेऊन कार्यालयाबाहेर पडली.


आमच्या फर्मचा खाजगी जासूस रेगी टर्नर पुढचा महिनाभर गुप्तपणे जेसनच्या मागावर राहिला. रेगीनं सांगितलं की जेसनचा रोजचा सर्वसाधारण कार्यक्रम चालू होता आणि हास्य ही देणगी कशी असू शकते याचा शोध घेत असल्याची त्याच्यात काही बाह्य लक्षणं दिसत नव्हती.


महिन्याच्या अखेरचा दिवस आला,मिस् हेस्टिंग्जनं मला येऊन सांगितलं की दुपारी येऊ का असं जेसन विचारत होता.ठीक असल्याचं मी म्हटल्यावर ती म्हणाली की आज जेसन येतांना कोणाला तरी बरोबर घेऊन येणार आहे,असं तो म्हणत होता.


ठरलेल्या वेळी जेसनला घेऊन मिस् हेस्टिंग्ज माझ्या कार्यालयात आली.बरोबर एक तरूण मनुष्य होता आणि तो अंध असल्याचं स्पष्ट दिसत होतं. डोळ्यावर काळा चष्मा आणि हातात पांढरी काठी होती.तो अंध माणूस कार्यालयात इकडेतिकडे चालू लागल्याचं पाहून मिस् हेस्टिंग्ज अस्वस्थ झाली. आणि मलाही थोडीशी धास्ती वाटली,हे मी मान्य करतो.


जेसन म्हणाला, "मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्ज मी डेव्हिड रीजची ओळख करून देतो."


मिस्टर रीजने हात पुढे केला आणि म्हणाला, "खूपच दिवसात आपली दृष्टिभेट नाही."


माझी चिंता पार करून त्याच्या विनोदाचा आस्वाद घ्यायला मला थोडा वेळ लागला,मी मिस्टर रीजशी हस्तांदोलन केले आणि आम्ही सगळे खाली बसलो.


जेसननं खुलासा केला, "गेल्या आठवड्यात मी लोकलमधून जात असतांना मला डेव्हिड भेटला. आम्ही गाडीत खूप गप्पा केल्या आणि नंतर फोनवर खूपदा बोललो.मला वाटतं हास्याची देणगी असलेल्या माणसाचं हा उत्तम उदाहरण आहे.


डेव्हिड रीज एकदम बोलून गेला, "तरीच हा म्हणत होता की तुम्हा मंडळींकडे जरा हास्याचा तुटवडाच होता आणि म्हणून त्यानं इथ मला ओढतच आणलं."


डेव्हिडनं उजीवीकडे मान फिरवली आणि म्हणाला, "वा ! हे खरोखर सुंदर कार्यालय आहे."


मी म्हटलं, "आभारी आहे," मी त्याला माझ्या फर्निचरबद्दल सांगणार एवढ्यात माझ्या लक्षात आलं की स्वारी माझी फिरकी घेत होती आणि आम्ही सगळे हसलो.


मी जेसनला विचारलं, "या तरूणाला तू पहिल्यांदा भेटलास तेव्हा असं त्याच्यात तुला काय दिसलं, की तुला वाटावं,या माणसात हास्याची देणगी आहे?"


मधेच बोलणं तोडत डेव्हिड रीज म्हणाला, "सर, माझ्या मासिकाच्या युक्तीमुळे."


मी हसून म्हटलं, "अच्छा, ही मासिकाची युक्ती काय आहे बुवा ?"


डेव्हिड रीजन उलगडून सांगितल, "काही लोकलगाड्या जशा हव्या तशा स्वच्छ नसतात.मग जेव्हा बाकांवर धूळ असते,तेव्हा लोक मासिकांवर बसतात.बाक स्वच्छ आहे किंवा नाही हे मी जाणू शकत नसल्यामुळे मी नेहमीच मासिकावर बसतो. मी आणि जेसन जेव्हा ओळख करून घेत होतो, तेव्हा मागच्या सीटवरच्या माणसानं मला विचारलं की मी मासिक वाचतो आहे का ? त्याला बहुधा काहीतरी वाचयला हवं होतं."


या वेळेस जेसन खो खो हसायला लागला आणि बोलणं तोडीत म्हणाला, "त्या माणसानं डेव्हिडला 'तू ते मासिक वाचणार आहेस का ?' असं विचारल्याबरोबर डेव्हिड उभा राहिला आणि त्यानं पान उलटवलं आणि परत खाली बसत म्हणाला, "होय साहेब, पण लवकरच माझं ते संपेल."


आमचं हसणं ओसरल्यावर मी डेव्हिडला विचारलं, ही हास्यदेणगी त्यानं केव्हा आणि कशी कमावली. त्यानं सांगितलं की लहानपणीच त्यानं दृष्टी गमावली होती आणि त्यामुळे बऱ्याच आव्हानांना आणि संघर्षांना तोंड द्यावं लागलं होतं. त्यात लोकांकडून मिळणाऱ्या वाईट वागणुकीचाही वाटा होता.


तो म्हणाला, "मिस्टर हॅमिल्टन,जीवनात काही वेळा अशा येतात की तुम्ही एकतर हसता किंवा रडता. मी हसणं निवडलं."


मी डेव्हिड रीजचा विचार करायला लागलो.त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन काय सही होता ! त्याच्या ह्या हास्यदेणगीचा फायदा त्याला एकट्याला नाही तर माझ्यासकट त्याच्या संबंधात आलेल्या सगळ्यांना वाटला जात होता.मी जेसनला म्हटलं की त्यानं त्या महिन्याला सोपवलेलं काम नक्कीच पूर्ण केलंय.


डेव्हिड रीजबरोबर जेसन कार्यालयातून बाहेर पडत होता.तो थांबला,मागे वळला आणि म्हणाला, "मिस्टर हॅमिल्टन, तुम्हांला सांगायचं राह्यलंच की तुम्ही घातलेला टाय फार सुंदर आहे.


मी त्याचे आभार मानायच्या बेतात होतो तेव्हाच लक्षात आलं की त्यानं माझी पुन्हा एकदा फिरकी घेतलीय. तो आणि जेसन हॉलमधून बाहेर पडून लिफ्टपर्यंत पोचले तोवर त्यांच हसणं ऐकू येत होतं. मिस् हेस्टिंग्ज पण हसत होती.


शेवटी मी तिला विचारलं, "तू कशासाठी हसते आहेस?"


तिनं उत्तर दिलं, "अं, टाय सुंदर आहे खरा !"