* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: पक्षिगान / birdsong

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

७/१२/२५

पक्षिगान / birdsong

पक्ष्यांच्या सौंदर्याचं रहस्य मानवाला ऋग्वेदकालापासून वाटत आलं आहे.'परमेश्वररूपी सुंदर पक्ष्याचे गूढरम्य रूप ज्या कोणास ठाऊक असेल त्याने ते मला सांगावे.' अशा अर्थाची एक सुंदर ऋचा ऋग्वेदात आहे. परंतु हे गूढरम्य रूप महाकवी कालिदासाला अंशतःउलगडले असावे.शकुंतलेच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना तो म्हणतो,"मनुष्यकुळात अशा रूपाचा संभव होणे कसे शक्य आहे ? अशी तेजस्वी ज्योती जमिनीतून कशी उगवेल ? सौंदर्यातूनच सौंदर्य जन्माला येते." शकुंत पक्ष्याने जिचा लहानपणी सांभाळ केला अशा त्या स्वर्गकन्येला पक्ष्याचे सुंदर रूप लाभले होते.


पशूना रंग लाभले असले तरी ते फक्त त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी असतात.परंतु पक्ष्याचे रंग-रूप पाहिले की त्या अपार्थिव सौंदर्याचा हेवा वाटतो.त्यांच्यात दिसून येणारी रंगारूपाची विविधता इतरत्र दुर्मीळ आहे. 


ऋतुमानाप्रमाणे बदलणारे त्यांचे रंग किती अद्भुत सुंदर असतात ! वसंत व हेमंतातील त्यांचा पेहराव,प्रणय कालातील त्यांचे मुलायम रेशमी अवगुंठन,दूरच्या प्रवासासाठी लागणारे कोट व घागरा आणि इतर वेळचा साधा-सोज्वळ पोशाख.सुंदर पाखरांना कोणती गोष्ट शोभत नाही ?


आकाश जसे इंद्रधनुष्याच्या रंगाने शोभते,तसेच वनश्री पक्षिरूपी इंद्रजालाने गूढ वाटते.त्यांच्या रंगाची किमया अद्भुतरम्य आहे.पक्षी हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे.सृष्टीतील अलौकिक वर्ण त्याने पक्ष्यांना मुक्त हस्ताने बहाल केले आहेत.हिरव्या वनश्रीतून विद्युत् गतीने निळ्या रेषा ओढणारा खंड्या,निळ्या आकाशाचा भार पेलवत उडणारे निळे चास,फुललेल्या पिवळ्या जर्द बहावा वृक्षाशी स्पर्धा करणारे हरिद्र,शिरीष पुष्पासारखे कोमल हारित,पाचूच्या पूजापात्रातील मोत्याच्या शिंपल्याप्रमाणे शोभणारी कमळाच्या पानावरील बगळी,रंगीबेरंगी पोशाख केलेल्या सुंदर मुलींच्या घोळक्याप्रमाणे वाटणाऱ्या देखण्या तेजस्वी सैरा-गोल्ड फिच-पक्ष्यांचा थवा,नभश्रीच्या कंठातील पाचूचा व माणकांचा कंठाच ओघळत आहे अशी वाटणारी पोपटांची आकाशातून उतरणारी रांग, एखाद्या गौरांगीप्रमाणे दिसणारे चक्रवाक,मत्त चांदणे पिऊन अरण्याकडे पाहात पाहात जाणाऱ्या गुलाबी-बदामी चकोर पक्ष्यांचा समूह,हिमाच्छादित शिखराची आठवण करून देणाऱ्या तुषार तित्तिरांचा थवा,

कर्पूरगौर वर्णाचे शाही बुलबुल,रत्नाचे सौंदर्य लाभलेला पाचू कवडा,मुहे खोऱ्याचे वैभव असलेले पारवे,एखाद्या रूपवती नागकन्येप्रमाणे फूत्कार टाकणारे सुंदर पंखांचे हुदहुद,उंच पर्वतातील पठारावरील गवताच्या निळ्या फुलांच्या मखमली गालिचांवरून हारीने चालणाऱ्या रूपवती शामल कोकणी लावा,काळ्या पांढऱ्या जुन्या पद्धतीच्या पोशाखातील करकोचे,

उन्हाळ्यातील मावळत्या दिशेप्रमाणे दिसणारे धूसर वर्णांचे कपोत,वर्षाऋतूतील सूर्यास्ताप्रमाणे दिसणारे सुंदर पंखांचे तित्तिर,पहाटेच्या ताऱ्यांचा वर्ण असलेले कलविंक पक्षी,

जलाशयावर विहार करणाऱ्या रोहित पक्ष्यांचा क्षणोक्षणी बदलत असणारा व गुलाबी दुपट्याप्रमाणे दिसणारा दाट थवा पाहून निसर्गाच्या अत्यद्भुत किमयेची प्रचीती येते.


एखाद्या शापभ्रष्ट परीप्रमाणे हिमालयात राहणाऱ्या जीवजीवक पक्ष्यांच्या पिसाऱ्याला इंद्रधनुष्याच्या रंगाची उपमा द्यावी इतके ते सुंदर व मनोहर असतात.


फुले पाहिली की मला पाखरांची आठवण होते;आणि पक्षी दिसले की रानफुलांचे स्मरण होते. कुर्गच्या घनदाट किर्र जंगलातून जाताना सूर्याचे किरणही दृष्टीला पडत नसत.रंगीबेरंगी पक्षी मोठ्या चपळतेने उडताना दिसत.त्या अंधुक प्रकाशात ह्या थरथरणाऱ्या ज्योती आहेत असे वाटे.कोठून तरी येणाऱ्या देदीप्यमान, तेजःपुंज दिव्याच्या ज्योतीसारखे क्षणार्धात दिवा मालवल्याप्रमाणे नाहीसे होत,आणि तिथला अंधार मात्र वाढलेला असे.गंधर्व स्त्रियांचे रूप मुळातच अलौकिक ! त्यांना देखील पक्ष्यांचे रूप घेण्याचा मोह आवरत नसे.पक्षी हे अलौकिक सौंदर्य लाभलेल्या स्त्रियांचेप्रतीक आहे. 


अगस्ति ऋषींची पत्नी लोपामुद्रा हिला लोपा-सी गल-पक्ष्याचे रूप लाभले होते.मिस तू ही प्राचीन चिनी साहित्यातील लावण्यमयी स्त्री.तिच्या सुदर मानेला उबदार मुलायम अशा अलबॅस्टर पक्ष्यांची उपमा दिली ती यथोचित वाटते.निळावंती त्यांच्या भाषेलाही रंगाचीच उपमा दिली आहे.


सामगान अतींद्रिय ज्ञान व त्यांचा मनोहर पिसारा यांनी जरी पक्ष्यांच्या सौंदर्याला रहस्याचा आविष्कार होत असला तरी त्यांची व्यक्त होत असलेली गूढतम चारुता इथच थांबत नाही.ती त्यांच्या प्रसवकाळात गूढ आचरणाच्या पडद्या

आडून घरट्याच्या रूपाने डोकावत असते.विणीच्या काळाइतका समृद्धीचा-सौंदर्याचा काळ निसर्गात नाही! हे समृद्धीचे सौंदर्य चैत्राच्या नव्या पालवी बरोबर येते.ते पाना-फुला-फळाप्रमाणे बहरत जाते.


कुठल्याही प्राण्याला पक्ष्यांच्या घरटी बांधण्याच्या कुशलतेशी बरोबरी करता आली नाही,इतकी ती देखणी असतात.याला अपवाद आहेत घारी-गिधाडांच्या कुलातील हिंस्र पक्ष्यांची घरटी.एखाद्या सुंदर वनश्रीत बेढब लष्करी तळ उभारावा ना तसं ह्या शिकारी,युद्धपिपासू पक्ष्यांची खोपी पाहून वाटते. तुषाराच्छादित पर्वतातील सहा-सात पांढुरकी घरकुलं शिलाखंडावरील एखाद्या पक्ष्याच्या घरट्यासारखी रमणीय दिसतात,तर कच्छच्या रणातील रोहितपक्ष्यांच्या खोपी आकाशातील कुणा एका गंधर्वनगरीची आठवण करून देतात.

काबूल-कंदाहारच्या विस्तीर्ण जलाशयाकाठी पाहिलेली पक्ष्यांची शेकडो लक्षावधी घरटी बाबरसारख्या शूर वीराच्या स्मृतीतील फुले बनून राहिली.तिबेटात घराच्या छपरावर,मठा-मंदिरावर चक्रवाक पक्ष्यांची युगुले घरटी बांधून तिथल्या लोकांच्या अहिंसा व धर्मपरायणतेची आठवण करून देतात.एरवी कावळ्याचा आवाज किती कर्कश ! पण ज्यांनी घरट्यात बसलेल्या कावळीचा आवाज ऐकला असेल तो त्या आवाजाने विचलित झाल्याशिवाय राहणार नाही. केवढा अद्भुत स्वर तिच्या कंठातून स्रवतो ? एखाद्या हरिद्र पक्ष्याच्या आर्द्र स्वरासारखा.हिमालयात पॉपलर,विलो व चिनारच्या पुरातन वृक्षांवर तसेच पर्वताच्या शिखरावर अनेक चास पक्षी घरटी करतात.देदीप्यमान निळ्या पंखांचे हे पक्षी घरट्याकडे गूढ स्थळी ठेवलेल्या आपल्या पिलांकडे झेप घेत उडत असता वाटते की ही निळी पाखरे जणू निळ्या गगनाचा भारच घेऊन उडत आहेत.आपल्या छातीच्या पिसात पिलासाठी पाणी साठवून वैराण वालुकामय प्रदेशातून शेकडो मैल उडत घरट्याकडे जाणारा भट तित्तिराचा थवा सांजसकाळ कुणी पाहिला आहे काय ? मोठे विस्मयजनक दृश्य असते ते !


पक्ष्यांची घरटी अद्भुत व आनंददायी सौंदर्याचा जणू निधीच आहे.जी आपल्या प्राचीन ऋषिमुनींच्या,संत,कवी व तत्त्वज्ञान्यांच्या चिंतनाचा विषय न होतील तरच नवल!


ऋग्वेदात या निधीचे मोठे मार्मिक वर्णन केले आहे.हे वरुणा,घरट्याकडे झेप घेणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे माझ्या साऱ्या कामना धनप्राप्तीस्तव तुझ्याकडे धाव घेत आहेत.या समृद्धीबरोबर गूढताही नांदते.घरट्यामधील अंड्यातून नुकत्याच उबविलेल्या पिलांची व सोमाची तुलना केली आहे,ते मोठे लक्षणीय आहे.'पक्ष्यांच्या पिलाप्रमाणे गूढ स्थळी ठेवलेला,निधीप्रमाणे मौल्यवान, स्वर्गाहून आणलेला आणि दगडात झाकलेला सोम इंद्राने प्राप्त केला.'


'प्राणिमात्राच्या संगोपनाचा आदर्श पक्ष्यांची घरटीच आहेत.इतकेच काय यज्ञासनासारखे पवित्र आसन देखील पक्ष्यांच्या घरट्याप्रमाणेच मृदू आहे.'घरट्यातील पक्ष्यांची पिले चारा घेऊन येणाऱ्या आपल्या मातापित्यांची किती आतुरतेने वाट पाहतात याची तुलना सोम प्राशन करण्यापूर्वी स्तवन करणाऱ्या भक्तजनांच्या प्रतीक्षेशी केली आहे.'हे इंद्रा,उबदार घरट्यातील पक्ष्यांप्रमाणे दधी व दुग्धमिश्रित सोमयुक्त निवासस्थानातील भक्तजन तुझे स्तवन करीत आहेत.'


शत्रू दूर जातात ते पुन्हा परत येण्याकरिता हे अनादी सत्य सांगताना म्हटले आहे,'हे वज्रहस्त इंद्रा,पक्ष्यांना घराबाहेर काढणाऱ्या सूर्याप्रमाणे त्रासदायक शत्रूना तू दूर हाकलतोस.'


सुगरण पक्ष्याचे घरटे सर्वांना परिचित आहे.परंतु यजुर्वेदात त्याचे सुंदर वर्णन केले आहे.'नम्रतेसाठी लव्हाळ्याकडे पहा व कारागिरीसाठी सुगरण पक्ष्यांकडे पहा.'


जीवनातील जे जे गूढ,मृदू,ऋजू,मौल्यवान,सुंदर व सर्जनशील होते ते सारे पक्ष्यांच्या घरट्याभोवती गुंफण्याइतकी सौंदर्य व समृद्धीची दृष्टी प्राचीनांकडे होती हे केवढे आश्चर्य ! जीवनावरील आत्यंतिक प्रेमाचे प्रतीक घरटे आहे.


उषा पक्ष्यांचे दिव्य संगीत घेऊन येते.सारे आकाश वनोपवने पक्ष्यांच्या नित्य नवीन,आगळ्या सुस्वर गीतांनी भरून जातात.

हेमंतात पहाटेपूर्वीच्या काळोखात आकाशमार्गाने वेगात जाणाऱ्या वन्य बदकांच्या अकस्मात येणाऱ्या स्वरांची विलक्षण मोहिनी पडते.पावसाळ्यात लावा पक्ष्यांमुळे खूप बहार येते.त्यांचे प्रणयगीत साऱ्या दऱ्याखोऱ्यांत सप्त सुरांसारखे भरून जाते.

माझ्यापासून अगदी जवळ वृक्षाच्या बुध्यावर उभी राहून लाविया गात होती.अर्ध्याअधिक फर्लांगावरून अनेक नर तिला साद देत होते.त्यांचे ते प्रीतीचे अवर्णनीय सामगान उच्च स्वराला पोहोचले तेव्हा ते कानाला मोठे गोड वाटले.


जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,प्रकाशक-साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर


सुतार पक्ष्याच्या चंद्रमौळी कोटरातून मावळतीकडील मृग-व्याधाचा तारकापुंज मंद प्रकाशताना दिसत होता.तो पक्षी अरण्यभर डम् डम् डमरू वाजवत एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर संचार करीत होता.


सुंदर व आरस्पानी जलाशयाचा काठ 'विलो' वृक्षांनी रेखिला आहे.जणू गंधर्व नगरीतल्या नाजूक कटीच्या अप्सराच त्या.मंद वायुलहरीबरोबर त्यावर हिरव्या पाचूचे नाजूक तरंग उठत आहेत.पिवळेजर्द हरिद्राव पक्षी लवचिक फांद्यांतून सुस्वर गात आहेत, पाठशिवणीचा खेळ खेळत आहेत.त्यांचे लोभस व देखणे प्रतिबिंब पाण्यात पडले आहे.हरित लाटेवर विरलेले त्यांचे स्वर अंतःकरणाच्या सीमा अमर्याद करून टाकतात.प्रभातसमयी न्हाऊन नटलेल्या सुंदर युवतीचे दर्शन व्हावे तसे हारिताकडे पाहून वाटते. गोजिरवाणी, सुंदर व शिरीष पुष्पासारखी कोमल अशी ही पाखरे गुंजन करू लागली की अस्फुट ओठ उघडलेल्या सुतनूची आठवण होते.आता ती कुठले गीत गाणार ? गत स्मृतीतील कुठली विराणी छेडणार ?


या त्यांच्या अनुनय गीतांत गिरिगव्हरातून येणाऱ्या श्यामा व पल्लवपुच्छाचेही स्वर मिळालेले असतात.


धिटुकल्या रानचिमण्या,वनातील भाट पक्षी,बुलबुल, दयाळ जरा उशिराने जागे होतात.त्यांना माणसाच्या बंदुकीची व उनाड पोरांच्या गलोलीची भीती वाटत नाही.स्वभावतःभीरू असलेली ती पाखरे एखाद्या घरंदाज गायकाप्रमाणे अरुणोदयापूर्वीच आपली हजेरी लावून वनोपवनात अदृश्य होतात.


आता शाही बुलबुल इथं नाही.ह्या कर्पूरगौर स्वर्गीय पक्ष्याने हिमालयातील अद्भुत स्वर स्वतःबरोबर आणले होते.ते आगळे सूर विसरलेल्या कवितेतील अर्ध्यामुर्ध्या आठवणाऱ्या चरणाप्रमाणे माझ्या मनात येरझारा घालू लागतात.त्यांनी माझ्या जीवनातील दिवस आणि रात्री चिरसंपन्न केल्या आहेत.


संध्या तित्तिर पक्ष्याच्या सुंदर पंखांचे लेणे लेवून येते.दूर पर्वतावरील पारदर्शक धुक्यात दऱ्याखोरी,वनश्री,नदी, ओहोळ आणि गाव लपेटला आहे.किलिकिल्किलीच्या उच्च स्वराने तित्तिर जणू थोड्याच वेळात काळोखात परिणत होणाऱ्या ह्या मनोहर दृश्याला निरोप देत आहे.


"ईश्वरा,तू चराचरी व्यापून राहिला आहेस!"