प्रत्येक जीव आपलं अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात संघर्ष करत असतो.कधी अन्नासाठी,कधी पुनरुत्पादनासाठी,कधी शत्रूविरुद्ध प्रत्येक जीव लढा देत असतो.यात अजून एक बाब त्याच्या लक्षात आली,ती म्हणजे शत्रूही या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावत असतात. मांसाहारी प्राण्यांसाठी इतर प्राणी हे अन्नच असतात.त्यामुळे इतर प्राणी आणि पक्षी या हिंस्र आक्रमक प्राण्यांच्या हाती न लागण्याचा प्रयत्न करतात.नाही तर त्यांच्या जातीचं अस्तित्व कायमचं संपण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो.हे सगळं निसर्गानं निर्माण केलेलं चक्र आहे.निसर्गातल्या अडचणींचा सामना करत जे जगतात त्यांचंच अस्तित्व टिकू शकतं. पुनरुत्पादन होत असताना बऱ्याचदा पुढची पिढी आधीच्या पिढीसारखीच जन्माला येते. एखादे वेळी पुढच्या पिढीत काही जीव आधीच्या पिढीपेक्षा वेगळे गुण घेऊन जन्माला येतात.हे नवीन जीव जर नैसर्गिक वातावरणात आपलं अस्तित्व टिकवू शकले तर सजीवांची एक नवीन जात निर्माण होते.जर याउलट ते नवीन जीव नैसर्गिक संकटांचा सामना करण्यास सक्षम नसतील तर मात्र हे नवे जीव संपुष्टात येतात.हेच मुद्दे वनस्पतींच्या बाबतीतही खरे आहेत. एखाद्या झाडाची बी पक्ष्यांमार्फत अनेक मैल दूर प्रवास करते.जिथं ती पडते तिथं.रुजते आणि त्याचं झाड तयार होतं;पण जर तिथलं वातावरण त्या वनस्पतीला पोषक नसेल तर ते झाड तिथंच मरतं.त्या वनस्पतीच्या जातीचं अस्तित्वही यामुळं अनेकदा धोक्यात येत असतं.कधी कधी त्या वातावरणानुसार वनस्पतीमध्येही अनेकदा बदल होताना दिसतात.
म्हणूनच आपल्याला एकाच प्राण्याची,पक्ष्याची किंवा वनस्पतीची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात.
निसर्गानं प्रत्येकाला तर आपली पुनरुत्पादनाची सीमाही आखून दिलेली असते.फुलातला पराग किंवा बी यांसारखे कुठलेही पुनरुत्पादन करणारे भाग जास्त काळ टिकून राहत नाही.त्यांची शक्ती हळूहळू कमी होत जाते.हे जर असं नसतं तर प्रत्येकानं आपलं पुनरुत्पादन इतकं केलं असतं की,संपूर्ण पृथ्वीच व्यापून टाकली असती. हा निसर्गानं आपला समतोल राखण्यासाठीच केलेला एक उपाय आहे.या प्रक्रियेला डार्विननं 'नॅचरल सिलेक्शन'असं नाव दिलं,तर माणसाने स्वतः प्रयत्नपूर्वक 'सिलेक्टिव्ह ब्रीडिंग' करून निर्माण जाती निर्माण करण्याच्या प्रक्रियेला त्यानं "आर्टिफिशियल सिलेक्शन' असं नाव दिलं.
जलमोहिमेवरच्या प्रवासात डार्विननं अनेक कीटक,पक्षी,
प्राणी सगळं काही खाल्लं होतं. घुबडाचं मांस मात्र त्याला अजिबात आवडलं नव्हतं.कुठल्या मांसाची चव कशी होती याविषयीदेखील तो नोंद करून ठेवत असे.दरम्यान डार्विनला जहाजावर आलेले चित्रविचित्र अनुभव आणि जमवलेली माहिती १८३९ साली त्यानं 'जर्नल ऑफ रिसर्चेस इंटु जिऑलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री ऑफ व्हेरियस कंट्रीज व्हिजिटेड बाय एच.एम.एस.बीगल' या नावानं प्रकाशित केली.डार्विनला आपल्याला आतापर्यंतच्या निरीक्षणांतून आणि अभ्यासांतून जे लक्षात आलं होतं.त्यातूनच सजीवांच्या विविध जातींचा कसा जन्म झाला याविषयीचे त्याचे विचार पक्के होत गेले.त्यानं २० वर्षांपासून गोळा केलेली विविध प्रकारची माहिती एकत्र केली.बीगल मोहिमेत आलेले सगळे अनुभवही त्याच्या पाठीशी होतेच.बागकाम,प्राणी,नॅचरल हिस्ट्री यांच्याविषयीची अनेक पुस्तकं,याशिवाय परत प्रवासवर्णनं अशा अनेक पुस्तकांचा अभ्यास करून त्यानं माहिती गोळा केली.तो वनस्पती,प्राणी,पक्षी, 'भूरचनाशास्त्रज्ञ यातल्या अनेक तज्ज्ञांनाही भेटला,त्यांना प्रश्नावली देऊन त्यांच्याकडून उत्तरं घेतली आणि अनेक विषय समजून घेतले. डार्विननं पाळीव पक्ष्यांचं वय आणि त्यांची हाडे यांची जंगलातल्या पक्ष्यांचं वय आणि त्यांची हाडे यांच्याबरोबर तुलनाही करून बघितली.ज्यातून पुरावा मिळण्याची शक्यता होती असा कोणताच भाग त्यानं सोडला नाही.त्यानं तर समुद्रात फळं टाकून,बियांची नैसर्गिकरीत्या देवाणघेवाण कशी होते हेही बघितलं.
जितका तो या विषयाच्या खोलात शिरत होता तितकाच तो नॅचरल सिलेक्शन या एका मोठ्या निष्कर्षाकडे पोचत होता.नॅचरल सिलेक्शनची आपली थिअरी योग्यच आहे हेच दर वेळी सिद्ध होत होतं. आपल्याकडच्या सगळ्या माहितीचं संकलन करून त्यानं शेवटी एक थिअरी तयार केली. हीच 'थिअरी 'डार्विनिझम' या नावानं प्रसिद्ध झाली.डार्विननं ती आपल्या काही जवळच्या वनस्पती शास्त्रज्ञांना दाखवली;पण अजूनही ही थिअरी प्रकाशित करून लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्याची मनापासून तयारी होत नव्हती.याचं कारण म्हणजे त्याची थिअरी धर्मालाच आव्हान देणारी होती.पुरेसे पुरावे गोळा करून मगच ही थिअरी जगासमोर आणावी, असा विचार डार्विननं केला आणि मग तो पुराव्याच्या मागे लागला.
१८४२ साली त्यानं आतापर्यंत जमवलेली माहिती पुस्तकरूपात लिहायला सुरुवात केली.हे सगळं 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' या पुस्तकात सामील होणार होतं;पण हे काम सोपं नव्हतं.सजीवांच्या प्रजातींच्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं लोकांना समजतील आणि पटतील अशा पद्धतीनं डार्विनला लिहायचं होतं.डार्विननं आपली ही कल्पना १८४२ च्या जानेवारी महिन्यात प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ ल्येल याला कळवली आणि १८४४ साली डार्विनच्या या पुस्तकाची २३० पानं लिहून पूर्ण झाली! एके दिवशी डार्विनला आल्फ्रेड रसेल वॉलेस या सृष्टिवैज्ञानिक / नॅचरलिस्टकडून 'एसे ऑन टेंडन्सी ऑफ व्हरायटीज टु डिपार्ट इनडेफिनेटली फ्रॉम द ओरिजिनल टाइप' या नावानं लिखाणाचा एक ड्राफ्ट आला.त्या ड्राफ्टमध्ये डार्विनच्याच थिअरीचं संक्षिप्त रूप होतं.याचा अर्थ वॉलेसनंही डार्विनसारखीच उत्क्रांतीवादाची थिअरी मांडली होती.
वॉलेसनंही अँमेझॉन आणि काही जंगलांतून बरेच नमुने गोळा केले होते.डार्विनला पुराव्यासकटचं आपली थिअरी पुस्तकात मांडायची होती आणि त्यामुळेच त्यानं आतापर्यंत आपलं पुस्तक छापलं नव्हतं.हा ड्राफ्ट जर वॉलेसनं आधीच छापला असता तर तो आपण लिहीत असलेल्या पुस्तकाचंच संक्षिप्त रूप असलं असतं,असं डार्विनच्या लक्षात आलं.आपल्या आधी वॉलेसनं त्याच पुस्तक छापलं तर आपली मेहनत पाण्यात जाणार,
या विचारानं डार्विन अस्वस्थ झाला. डार्विननं आपली अनेक वर्ष केवळ या विषयाच्या खोलवर अभ्यासातच घालवली होती.आता नेमक काय करावं हे त्याला सुचतच नव्हतं.शेवटी ल्येल आणि जोसेफ कर यांच्याकडे डार्विननं सल्ला मागितला.या दोघांनी डार्विनला 'ही थिअरी डार्विन आणि वॉलेस या दोघांची आहे' असं जाहीर करण्याचा सल्ला दिला.हा सल्ला डार्विननं मान्य केला.विशेष म्हणजे वॉलेसनंही कुठलीही कटकट न करता हा सल्ला मान्य केला.या दोघांची थिअरी १ जुलै १८५८ या दिवशी 'डार्विन वॉलेस' थिअरी या नावानं लिनियन सोसायटीत वाचली गेली!पण उत्क्रांतीचा हा पेपर वाचण्यासाठी काही कारणांमुळे त्या वेळी डार्विन आणि वॉलेस या दोघांपैकी कोणीच उपस्थित राहू शकलं नव्हतं. तसंच तिथे फक्त ३० जणच हजर होते.ही थिअरी ऐकल्यावर जग हादरवून टाकणारा हा शोध आहे,असं म्हणत लोकांचा जो अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिसाद हवा होता,तसं काहीच घडलं नाही.उलट 'मागच्या वर्षी एकही नवीन शोध लागलेला नाही.'असं लिनियन सोसायटीच्या प्रेसिडेंटनं १८५९ च्या मे महिन्यात चक्क जाहीरही करून टाकलं! वॉलेसन कधीही ती थिअरी फक्त आपल्या नावावर प्रसिद्ध केली नाही.एवढंच नाही,तर त्यानं ही थिअरी 'डार्विनिझम' या नावानंच ओळखली जावी असंच मुळी जाहीर करून टाकलं.! मग मात्र डार्विननं जास्त वेळ घालवला नाही.त्यानं लगेच एका वर्षानेच ही थिअरी 'क्वार्टरली रिव्ह्यू' या नियतकालिकात प्रकाशित केली.या पुस्तकाचं नाव त्यानं सुरुवातीला 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन और द प्रिझर्व्हेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाइफ' असं भलंमोठं दिलं होतं. आपल्या पुस्तकाची प्रत जेव्हा डार्विननं प्रकाशकाकडे दिली तेव्हा या नियतकालिकेचा प्रकाशक जॉन मरे चक्क घाबरला होता.
हे पुस्तक अजिबात खपणार नाही असंच वाटलं होतं.
त्यानं डार्विनला 'यापेक्षा तू कबुतरांवर लिही,मी छापतो,'
असं म्हटलं होतं.तरीही अखेर मरेन हिंमत करून पुस्तकाचं नाव जरा कमी करून 'द अँब्स्ट्रॅक्ट ऑफ व्हरायटीज थ्रू नॅचरल सिलेक्शन' या पुस्तकाच्या १२०० प्रती छापल्या.पुस्तक खपावं म्हणून पुस्तकाची किंमत केवळ १५ शिलांग ठेवली.मात्र या पुस्तकाच्या १२०० प्रती पहिल्याच दिवशी खपल्या! त्यानंतर या पुस्तकाची अनेक भाषांतरही झाली.डार्विनचं हे पुस्तक अनेक देशांत घरोघरी वाचलं गेलं. काळानुसार त्याचं नावही बदलत गेलं. सुरुवातीला असलेलं 'द अँब्स्ट्रक्ट ऑफ व्हरायटीज थू नॅचरल सिलेक्शन' हे नाव बदलून 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन और द प्रिझव्र्हेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाइफ' झालं होतंच,त्यानंतर या पुस्तकाचं नाव 'ओरिजिन ऑफ स्पीशीज' एवढं लहान झालं. १८८२ सालापर्यंत फक्त इंग्लंडमध्ये या पुस्तकाच्या जवळजवळ २४००० प्रती विकल्या गेल्या होत्या.!
या पुस्तकात सुरुवातीच्या पहिल्या चार प्रकरणांत डार्विननं आपल्या थिअरीची मूलतत्त्वं उलगडून सांगितली,
तर पुढच्या चार प्रकरणांत या थिअरीवरच्या शक्य आरोपांविषयी चर्चा केलेली आहे.त्यानंतरच्या प्रकरणांत भूरचनाशास्त्र,वनस्पती आणि प्राण्यांची भौगोलिक विभागणी तसंच त्यांचं वर्गीकरण, त्यांची रचना आणि त्यांची ऍम्ब्रिओलॉजी यांच्याविषयी चर्चा केलेली होती.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच डार्विननं सजीवांमध्ये बदल घडत असतात आणि ते तसेच्या तसे राहात नाहीत हा मुद्दा सामान्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता.'सिलेक्टिव्ह ब्रीडिंग'मुळे जन्म झालेला अनोळखी जीव हा नवीन प्रजाती म्हणून म्हणून ओळखला जावा,असं मत त्यानं मांडलं.
वातावरण,अन्न,मांसाहारी प्राणी,उपलब्ध जागा अशा अनेक गोष्टींमुळे सजीवांचं अस्तित्व आणि प्रमाण कसं नियंत्रित होतं हेही त्यानं समजावून सांगितलं, त्यानंतर डार्विननं 'नॅचरल सिलेक्शन'विषयी भाष्य केलं.
या पुस्तकातले उत्क्रांतीवादामधले काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे,
सजीवांच्या जातींना कायमचं अस्तित्व नसतं,तर त्या कायम बदलत असतात.सर्व जातींना अस्तित्वासाठी आणि पुनरुत्पादनासाठी झगड़ा करत राहावा लागतो.याअस्तित्वाच्या लढाईमध्ये ज्याज्या टिकून राहातात,त्यांच्या पुनरुत्पादनातून अशा जातींची वाढ होते.यालाच 'नॅचलर सिलेक्शन' असं म्हणतात.
डार्विननं अतिशय सोप्या भाषेत या गोष्टी समजावून सांगितल्या मुळे सामान्य माणसालाही ही थिअरी समजून घ्यायला फारशी अवघड गेली नाही.
हे पुस्तक लोकांच्या हातात पहिल्यांदा पडल्यावर इंग्लंडमध्ये एकच खळबळ उडाली.नंतर मात्र हळूहळू ते पुस्तक जगभर वाचलं गेलं.काहींना डार्विनचे विचार पटले,तर काहींनी त्याच्यावर टीका केली.डार्विनचे विचार चर्चला आणि धर्मनिष्ठ लोकांना मान्य नव्हतेच.तसंच काही शास्त्रज्ञांनाही त्याविषयी शंका होत्या.डार्विनची थिअरी 'फॉसिल्स'- वरून सिद्ध होत नाही,असं काहीचं म्हणणं होतं.जर प्राणी उत्क्रांतीन हळूहळू बदलत असतील,तर मग दोन प्राण्यांमधले ही वेगवेगळ्या अवस्थेतले अनेक प्राणी सापडायला हवे होते,असं त्यांचं म्हणण होते;पण या उत्क्रांतीसाठी प्रचंड मोठा काळ लागतो,'असं डार्विननं म्हटलं होतं.डार्विनची खिल्ली उडवणारी व्यंगचित्रंही त्या काळी प्रकाशित होत.नाकतोडा,कुठलासा बग,फुलपाखरू यांचे वेगवेगळे अवयव कापून ते एकमेकांना जोडून 'नवीनच' एक प्राणी बनवून डार्विनची चेष्टा करायला लोक घेऊन येत.डार्विन जिवंत असेपर्यंत 'ओरिजिन ऑफ स्पीशीज'च्या प्रत्येक आवृत्तीत अनेक बदल होत गेले आणि दर वेळी त्यात नवीन माहिती लिहिली गेली;
त्यातल्या चुका दुरुस्त केल्या गेल्या;नवीन पुरावेही जोडले गेले आणि काही रेखाटनंही काढली गेली.दर वेळी हे पुस्तक अधिकाधिक चांगलं आणि वाचनीय होत गेलं. या पुस्तकात डार्विननं अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत उत्क्रांतीची थिअरी अतिशय सोपी उदाहरणं देऊन स्पष्ट केली होती.
पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर 'ही थिअरी माझी आहे आणि ती डार्विननं चोरली आहे' असा दावा करणारे अनेक होते तरी त्यात पेंट्रिक मॅथ्यू नावाच्या शास्त्रज्ञाचा दावा बरोबर होता.डार्विननं ही नॅचरल सिलेक्शनची थिअरी मांडायच्या २० वर्ष आधीच ही थिअरी 'नेव्हल टिंबर अँड अर्बोरीकल्चर' या पुस्तकाच्या 'अँपेंडिक्स' मध्ये छापली होती.हे पुस्तक कुणाला फारसं माहीतच नसल्यामुळे मॅथ्यूनं लिहिलेली थिअरी कुणी वाचणं शक्यच नव्हत.
डार्विनही या पुस्तकाबद्दल अनभिज्ञ होता. त्यामुळं त्यानं मॅथ्यूची थिअरी चोरल्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, पण तरीही डार्विननं मॅथ्यूची माफी मागितली!
डार्विनच्या 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन' या पुस्तकानं जगभरातल्या शास्त्रज्ञांना जाग केल्यावर डार्विननं 'द डिसेंट ऑफ मॅन' नावाचं अजून एक पुस्तक लिहिलं.या पुस्तकात डार्विननं 'एप' पासून माणूस झाला आणि तो कसा झाला हे सांगितलं.
डार्विनला अनेकांकडून विरोध होत असतानाही डार्विनचे अनेक कट्टर समर्थकही त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहिले.टी.एच. हक्सलेन तर डार्विनला जोरदार पाठिंबा दिला.यानंतर डार्विननं 'नॅचरल सिलेक्शन' प्रमाणेच 'सेक्श्युअल सिलेक्शन' हेही उत्क्रांतीसाठी जबाबदार कसं ठरतं हे शोधून काढलं आणि ही चिअरी त्यानं द डिसेंट ऑफ मॅन अँड सिलेक्शन इन रिलेशन टू सेक्स'या त्याच्या पुस्तकात मांडली.यावरही बरेच वाद आणि चर्चा झाल्या.डार्विननं 'द एक्स्प्रेशन ऑफ द इमोशन्स इन मॅन अँड अँनिमल्स' या नावानं अजून एक पुस्तक लिहिलं.या पुस्तकात त्यानं माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये असलेल्या भावनांविषयी लिहिल १८८१ साली त्याचं 'द फॉर्मेशन ऑफ व्हेजिटेबल मोल्ड थ्रू द अँक्शन ऑफ वर्क्स' हे पुस्तक आलं.वनस्पती,गांडूळ आणि माती या विषयांवरही त्यानं अनेक पुस्तकं लिहिली.पण 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' इतकी प्रसिद्धी त्याच्या इतर कुठल्याच पुस्तकाला मिळाली नाही.डार्विन प्रत्येक गोष्ट विज्ञान आणि तर्क यांच्या कसोटीवर तपासून बघत असे.इतकंच काय,पण त्यानं लग्न या विषयावरदेखील त्यातल्या फायद्यातोट्यांविषयी अभ्यास करून लिखाण केलं होतं.एम्मा वेजवूड या त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठ्या असलेल्या स्त्रीशी डार्विनचं लग्न झालं.या दांपत्याला एकूण १० मुलं झाली.एम्मानं डार्विनला शेवटपर्यंत साथ दिली. फावल्या वेळात तो तिच्याबरोबर सारिपाटही खेळायचा.इतकंच नाही तर या खेळात कोण जिंकलं आणि कसं जिंकलं हेही तो टिपून ठेवायचा.आपली तब्येत खालावलेली असतानाही डार्विन शेवटपर्यंत काम करतच राहिला.मृत्यूला कवटाळण्यापूर्वी डार्विन एम्माजवळ अखेरचं बोलला.तो म्हणाला,'मला मृत्यूची जराही भीती वाटत नाही.लक्षात ठेव, पत्नी म्हणून तू मला शेवटपर्यंत झकास साथ दिलीस. मुलांनाही हेच आठवायला सांग, की माझ्यासाठी माझी मुलं नेहमीच चांगली होती.'हेन्रिटा आणि फ्रान्सिस या आपल्या शुश्रूषा करणाऱ्यांनाही त्यांनी आपली खूप चांगली सेवा केली,ही गोष्ट आवर्जून सांगितली. १८ एप्रिल १८८२ या दिवशी चार्ल्स डार्विननं या जगाचा कायमचा निरोप घेतला.! खरं तर आपल्याला सेंट चर्च यार्डमध्ये दफन केलं जावं,अशी त्याची इच्छा होती;पण सगळ्यांना मात्र त्याला सन्मानानं इंग्लंडच्या वेस्टमिनिस्टर अँबेच्या दफनभूमीत दफन करायचं होतं,त्यामुळे २६ एप्रिल १८८२ या दिवशी त्याचे हजारो चाहते,कुटुंबीय,
स्नेही,तत्त्वज्ञ,शास्त्रज्ञ अशा अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत विख्यात शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनच्या शेजारी डार्विनला दफन करण्यात आलं.
आज चार्ल्स डार्विन जरी या जगात नसला तरी त्याचं 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' हे पुस्तक आजही प्रचंड लोकप्रिय आहे,जितकं तो जिवंत असताना होतं.या पुस्तकामुळं अनेक शास्त्रज्ञांना सजीवांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी तर दिलीच,पण धर्मात सांगितलेल्या चुकीच्या संकल्पना खोडून काढण्यासाठी हिंमतही दिली.हे पुस्तक उत्क्रांतीची प्रक्रिया हळूहळू घडते,असं सांगणारं असलं तरी त्यानं विज्ञानात वेगानं मोठी क्रांती केली यात मात्र शंका नाही.
२६ मार्च २०२३ या लेखातील शेवटचा भाग.