* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: देवत्व पावलेला नास्तिक बुद्ध उर्वरीत भाग..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/३/२३

देवत्व पावलेला नास्तिक बुद्ध उर्वरीत भाग..

बुध्द काशी क्षेत्री आले तेथील उपवनात ते राहिले.त्यांना पाच शिष्य मिळाले.त्या शिष्यांना त्यांनी ते नवीन ज्ञान दिले.नंतर ते त्यांना म्हणाले, आता हिंदुस्थानभर जा.सर्वत्र हा धर्म द्या.त्या पाचांचे पुढे साठ झाले.त्यांची कीर्ती हिंदुस्थानभर पसरली.लोक त्यांची पूजा करू लागले.

त्यांनी नवीन ज्ञान दिल.म्हणून नव्ह; तर ते काही चमत्कार करतात असे ऐकून.ख्रिस्ताची अशीच पूजा होई.

ख्रिस्ताप्रमाणे बुद्धही पाण्यावरून चालत जातात,अशी कथा पसरली.ते हवेत उंच जातात,ते वाटेल तेव्हा अदृश्य होतात,इत्यादी चमत्कारकथा वाऱ्यावर सर्वत्र गेल्या.एके दिवशी बुद्ध आपल्या शिष्यांसह एका नदीजवळ आले. ती नदी दुथडी भरून वाहात होती.प्रचंड पूर! परंतु बुद्धांनी मनात आणले आणि काय आश्चर्य? सशिष्य ते एकदम पैलातीरास गेले,अशा गोष्टी सर्वत्र पसरत होत्या.बुद्धांची पूजा होऊ लागली. त्यांनी नवीन दृष्टी दिली.म्हणून नव्हे,तर ते एक थोर जादूगार आहेत.अदभूत चमत्कार करणारे आहेत म्हणून.


काही थोड्यांनी बुद्धांचे तत्त्वज्ञान समजून घेण्याची धडपड केली.आणि फारच थोड्यांनी त्यांचे जीवन आपल्या कृतीत आणण्याची खटपट केली.बुद्ध हे चांगले जीवन कसे जगावे, ते शिकवणारे महान् आचार्य होते.


बुद्धांचे तत्त्वज्ञान व चांगल्या जीवनाविषयींचे त्यांचे विचार आपण थोडक्यात पाहू या.


प्रथम भटांभिक्षुकांचे बंड त्यांनी मोडले.ते विधी, ते यज्ञ,त्या नाना भ्रामक रूढी,सर्वांच्या मुळावर बुद्धांनी घाव घातला.मोक्षासाठी स्वत:चा उद्धार व्हावा यासाठी या गोष्टींची काही एक जरुरी नाही,असे ते स्वच्छ सांगत. देवांचे हे सेवक आधी दूर करून नंतर त्यांनी देवांनाही दूर केले.देव नकोत व हे भटजीही नकोत.देव आहेत की नाहीत याविषयी बुद्ध काहीच बोलत नसत, होय वा नाही,

काहीच ते सांगत नसत.त्यांनी त्या गोष्टीची जणू उपेक्षा केली.जर कोणी देवदेवतांविषयी त्यांना प्रश्न कला,तर ते खांदा जरा उडवीत व म्हणत,


"या देवांचा प्रश्न मला महत्त्वाचा वाटत नाही मला जिवंत माणसांचा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटतो. "


बुद्ध जसजसे परिणतवयस्क होऊ लागले, तसतसे हे जन्म मरणाच्या फेऱ्यांचे त्यांचे तत्त्वज्ञान अधिकच काव्यमय होऊ लागले. पुढेपुढे बुद्ध निराळ्याच रीतीने बोलू लागले. प्रत्येक जीव स्वतः अनेक जन्मांतून जातो,असे ते आता सांगत नसत.ते आता म्हणत; प्रत्येक जीव म्हणजे एक पेटती मशाल आहे. दुसऱ्या मशालीस ती जाऊन मिळते.आणि याप्रमाणे प्रत्येक जीवाची ज्योत अमृतत्वाच्या विश्वव्यापक ज्योतीत विलीन होते.किंवा घंटांची उपमा वापरली तर असे म्हणता येईल,की प्रत्येक जीवाचे जीवन म्हणजे उघड्या खोलीतील घंटेचे नाव आहे.

कालसोपानावरील सर्व जीवांच्या जीवन-घंटांतून नाद निघण्यास हा व्यक्तिगत नादही कारणीभूत होत असतो आणि शेवटी हा नाद स्वर्गाच्या विश्वव्यापक संगीतात विलीन होतो.


या मताभोवतालचे काव्य दूर केले,म्हणजे शेवटी मथितार्थ इतकाच उरतो,की प्रत्येक जीवनाचे फार दूरवर पोहोचणारे परिणाम होत असतात आणि प्रत्येक मानवप्राणी हा मानवजातीचा एक महत्त्वाचा घटक आहे.


वैयक्तिक अमृतत्वावर बुद्धांचा विश्वास नव्हता.त्यांना त्याची पर्वाही नव्हती.प्रत्येक मानवी जीव, प्रत्येक मानवात्मा विश्वात्मा भाग आहे,जगदात्म्याचा अंश आहे.वैयत्तिक अमृतत्वाची इच्छा करणे म्हणजे सर्वांचा प्रश्न दूर सोडून केवळ स्वतःपुरते पाहणे होय,अंशीला दूर झुगारून अंशाने आपल्यापुरते पाहणे होय.बुद्ध शिष्यांना सांगत,


"जगातील सारे दुःख आपल्या स्वार्थी महत्त्वाकांक्षेमुळे आहे.मग या स्वार्थी महत्त्वाकांक्षा ऐहिक असोत वा पारलौकिक असोत. "


परंतु जो मानवजातीच्या विशाल व महान आत्म्यासाठी स्वतःचा क्षुद्र आत्मा दूर करतो; स्वतःचा आत्मा मानवजातीच्या सेवेत जो रमवतो,तो जन्म मरणाच्या फेऱ्यांतून मुक्त व्हायला पात्र असतो.चिरशांतीच्या निर्वाणाप्रत तो जातो.


बुद्ध 'निर्वाण' या शब्दाला काय समजत असत, ते त्यांनी कधी स्पष्ट केले नाही.शिष्यांनी निर्वाणाविषयी पुष्कळदा विचारले,परंतु बुद्ध उत्तर देण्याचे टाळीत.अशा वेळेस ते नेहमी गंभीर असे मौन पाळीत.या मौनाची शिष्य क्षमा करीत ते मौन त्यानां जणू पूजाही वाटे,पवित्र वाटे, स्वर्गाची,त्या निर्वाणाच्या अंतिम दशेची कल्पना बुद्ध शब्दांत कशी आणून देणार,असा त्या मौनाचा अर्थ शिष्य करीत.जेव्हा जीव निर्वाणाप्रत जातो,तेव्हा त्याला स्वतःची जाणीव कोठून उरणार? त्या वेळेस त्याला सतही म्हणता येत नाही.असतही म्हणता येत नाही; जणू तो मृतही नाही,सजीवही नाही.ती अत्यंत परंमकोटीच्या आनंदाची स्थिती असते. जीवनाहून वा मरणाहून परम दोहोंहूनही श्रेयस्कर अशी ती स्थिती असते.बुद्धांचे शिष्य निर्वाणाचा अशा प्रकाराचा काहीतरी अर्थ लावीत,जेव्हा बुद्ध मरण पावले,तेव्हा शिष्य म्हणाले, "बुद्ध आता अपरंपार अनंत सागराप्रमाणे गंभीर झाले आहेत;सद्सतांच्या पलीकडे ते गेले आहेत.सद्सतांच्या संज्ञा,ही परिभाषा त्यांना आता लावता येणार नाही.


म्हणजे बुद्धांचा जीवात्मा जणू अवर्णनीय अशा अनंताचे स्वरूप धारण करता झाला. अनाकलनीय अशा शाश्वततेचे चिंतन करणारे ते जणू अनंत परब्रह्मच झाले.शाश्वत निःस्तब्धतेच्या,अखंड शांतीच्या संगीतात शून्यत्वाचा डंका ते वाजवीत राहिले.


माझ्या समजुतीप्रमाणे निर्वाणाचा खरा अर्थ हा असा आहे.


बुद्धांची चांगल्या जीवनाविषयींची त्यांची शिकवण अती उदात्त आहे. ते म्हणतात,"या दुःखमय संसारात आपण सारे भाऊभाऊ आहोत.जणू आपण एका कुटुंबातील आहोत." या आपल्या विशाल कुटुंबात बुद्ध केवळ मानवप्राण्यांचाच अंतर्भाव करीत,असे नव्हे; तर सर्व सजीव सृष्टीचा ते अंतर्भाव करीत.जे जे जीव जन्मतात,दुःखे भोगतात,मरतात,ते ते सारे एकाच कुटुंबातले.बुद्धांना प्रत्येक प्राणमय वस्तू, प्रत्येक जीव म्हणजे करुणेचे काव्य वाटे.मानवी वेदनांची भाषा जितक्या कोमलतेने ते जाणत तितक्याच कोमलतेने पशुपक्ष्यांचीही अस्पष्ट वेदना त्यांना कळे.मूसाप्रमाणे बुद्धांनीही वागण्याचे दहा नियम दिले आहेत.त्या दहा आज्ञांतील पहिली व सर्वांत महत्त्वाची आज्ञा 


"कोणत्याही स्वरूपात जीवाची हिंसा करू नका." ही आहे.ज्या अर्थी आपणास जीव निर्माण करता येत नाही,त्या अर्थी त्याची हिंसा करण्याचाही हक्क आपणास नाही.त्यांच्या सर्व शिकवणीचा हा मुख्य आधार आहे.


बुद्धांच्या नीतिशास्त्रातील दुसरी महत्त्वाची तत्त्वे म्हणजे नेमस्तपणा,सहनशीलता,प्रेम,इत्यादी होत.स्वतःच्या कृतीने नेमस्तपणाचे,संयमाचे महत्त्व त्यांनी पदोपदी दाखवून दिले आहे.अत्यंत सुखसंपन्न अशा घराण्यात ते जन्मले होते.परंतु त्या सुखांना ते - लवकरच विटले.नंतर ते स्वतःच्या देहाला अत्यंत क्लेश देऊ लागले.परंतु या आत्यंतिक देहदंडनेचाही त्यांना वीट आला. शेवटी मध्यम मार्ग त्यांनी पसंत केला.मध्यम मार्गात सुख आहे असे त्यांनी सांगितले.अतिरेक कशाचाही नको,अति तिथे माती,मनाचे लाड पुरविण्यापेक्षा मनावर अंकुश ठेवणे हेच हिताचे, असे त्यांनी शिकवले.भोगांध होणे,सत्तांध होणे, विजयांध होणे इत्यादींचा त्यांनी धिक्कार केला. या तिन्ही गोष्टींनी मनुष्य शेवटी बुद्धिष्ट होतो, असे ते म्हणत.अतीमहत्त्वाकांक्षा आत्म्याच्या रोगटपणाची खूण होय,दुर्बलांवर सत्ता चालवू पाहणे युद्धात विजय मिळण्याची इच्छा करणे, या साऱ्या आत्म्याच्या विकृती होत.विजय म्हणजे मृत्यूची जननी विजयी होण्याची इच्छा करणे आपल्याच बंधूंचा हेवादावा करणे; आणि आपल्या भावांचा द्वेष करणे ही गोष्ट मृत्यूहूनही वाईट होय.


परंतु मानवी मनात विजयतृष्णा आहे.ही विजयतृष्णा कशी जिंकायची? बुद्ध म्हणाले, "सहनशीलतेने"जो जिंकायला येईल त्याला क्षमा करा.त्या विजिगीषू माणसाची कीव करा.ते एक रोगी बालक आहे असे समजा.द्वेषाची परतफेड मैत्रीने व स्नेहाने करा.याच मार्गाने जगातील ही भांडखोर व रानटी मुले एके दिवशी सुसंस्कृत व शांतिप्रिय अशी माणसे होतील.दुसऱ्याला दुःख न देता स्वतः सारे सहन करण्याचे शौर्य त्यांनी शिकविले.दुसऱ्याची हिंसा न करता स्वतः मरण्याचे धैर्य त्यांनी शिकविले.एक गोष्ट खरोखर त्यांनीच शिकविली.ती म्हणजे सहनशीलपणा,सारे मुकाट्याने सहन करा. पौर्वात्यांची ही सोशीकता निस्सीम आहे.तसेच सहिष्णूताही त्यांनी शिकविली.बुद्धधर्मी मनुष्य म्हणजे पृथ्वीवरचा अत्यंत सहिष्णु प्राणी होय. मुसलमानाप्रमाणे किंवा ख्रिस्ती लोकांप्रमाणे धर्मयुद्ध करीत बुद्धधर्मीयांनी रक्त सांडले नाही. बुद्धांच्या नावाने कोणाही परमधर्मीयाचा त्यांनी कधीही छळ केला नाही.


बुद्धांनी परमेश्वराचे वैभव शिकविले नाही,तर प्रेमाचे सामर्थ्य शिकविले."सारा संसार प्रेमाने आनंदमय करणे" हे त्यांचे ध्येय होते.दुःखी, दरिद्री लोकांत राहण्यासाठी त्यांनी राज्यत्याग केला.बुद्धांची शांती देणारी परममंगल वाणी कानी पडावी म्हणून एक भिकारी त्यांच्याकडे आला.या भिकाऱ्याला मंगल आशीर्वाद देणे हे जीवनातील त्यांचे शेवटचे कर्म होते.ते आता ८० वर्षांचे होते.लोहार जातीचा त्यांचा एक शिष्य होता.त्या गरीब शिष्याकडे ते जेवले आणि त्यांना आजार जडला.ते कसेतरी मोकळ्या शेतात गेले. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, "पर्णमय शय्येवर मला ठेवा." पुन्हा ते म्हणाले, "मी आजारी पडलो म्हणून त्या लोहाराला नकाहो नावे ठेवू."


बुद्धांचे प्राण निघून जाण्याची वेळ आली. बुद्धांजवळ काही उपदेशपर शब्दांची भिक्षा मागण्यासाठी एक अस्पृश्य आला होता.त्या अती शूद्राला त्यांनी आपल्याजवळ बोलावले.त्या मरणोन्मुख महात्म्याने,त्या आसन्नमरण राजर्षीने त्या भिकाऱ्याचा हात आपल्या हातात घेतला. त्या दुःखी बंधूजवळ प्रेमाचे व करुणेचे दोन शब्द तो बोलला आणि त्याचा प्राण गेला.


जवळजवळ दोन हजार वर्षे बुद्धांच्या शिकवणीचा निम्म्या मानवजातीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होत आहे.भूतदया, सहनशीलता,सहिष्णुता,प्रेम यांची त्यांनी दिलेली थोर शिकवण परिणाम करीत आहे.आता उरलेली निम्मी मानवजातही बुद्धांची ती वाणी ऐकायला उभी राहात आहे.तो संदेश ऐकायला आरंभ करीत आहे.


समाप्त .. 

९ मार्च २०२३ या लेखातील शेवटचा भाग.