काही वर्षांपूर्वी मी एका पायवाटेवरून जायचो. तो बीच वृक्षांचा एक रानवा होता.तिथे मला मॉस म्हणजे मडगजने भरलेले दगड दिसायचे. त्यांच्याकडे मी फारसं लक्ष देत नसे,पण एके दिवशी मात्र खाली वाकून मी त्या दगडांकडे निरखून पाहिलं.थोडी पोकळी असलेले विचित्र आकाराचे हे दगड मला चमत्कारिक वाटले. हलक्या हाताने एका दगडावरचं मडगजाचे आवरण मी उचलून बघतो तर काय!तो दगड नसून बीच वृक्षाचं साल होतं!मला वाटलेला 'दगड' हा चांगलाच टणक होता आणि जमिनीला चिकटून बसला होता.मडगजने लगडलेलं हे साल जमिनीला जखडलं गेलं होतं.खरंतर बीचच्या लाकडाचं किंवा सालाचं काही वर्षांतच विघटन सुरू होतं.पण हे मात्र अनेक वर्षं टिकून राहिल्यासारखं दिसत होतं.
खिशातल्या चाकूचा वापर करून मी सालाचा वरचा थर काढून टाकला आणि आत मला हिरवा रंग दिसला.हिरवा रंग ? मी आश्चर्यचकित झालो.हिरवा रंग क्लोरोफिल नावाच्या एका रसायनामुळे मिळतो.हे रसायन पानांमध्ये असतं, ज्यामुळे पानांना हिरवा रंग मिळतो.क्लोरोफिल झाडाच्या खोडातही साठवलेल असतं,पण केवळ जिवंत झाडात!म्हणजे माझ्या हातात असलेलं साल जिवंत होतं की काय!
मी आजूबाजूला जरा नीट पाहिलं तेव्हा जाणवलं की ही दगडासारखी वाटणारी सालं एका वर्तुळात मांडून ठेवली होती.सुमारे पाच फुटाच्या व्यासाचं हे वर्तुळ म्हणजे एका पुरातन झाडाचं खोड असल्याचं माझ्या लक्षात आलं.
त्याचा मधला भाग पूर्णपणे कुजून गेला होता आणि फक्त कड टिकून होती.त्या मोठाल्या घेराकडे पाहून हे झाड सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वी पाडलं गेलं असेल,असा अंदाज मी लावला.पण मग इतकी वर्ष या सालामध्ये जीव राहिला कसा ?
कोणत्याही पेशीला जिवंत राहण्यासाठी अन्न, हवा आणि पाणी हे तर लागतंच आणि ते थोड्याफार प्रमाणात मिळालं तरी त्यांची वाढ होत राहते.पण एकही पान नसताना या खोडाला प्रकाश संश्लेषण (फोटोसिंथेसिस) प्रक्रिया कशी करता आली,जी झाडांना जिंवत ठेवण्यासाठी आवश्यक असते आणि ती पानांमध्येच होते. कसं करता आलं? पृथ्वीवरील कोणताही सजीव शेकडो वर्ष भुकेला राहू शकत नाही.निसर्गाचा हा नियम त्या खोडालाही लागू होता.म्हणजे या खोडात नक्की काहीतरी प्रक्रिया सुरू आहे याची मला जाणीव झाली.या पुरातन खोडाला त्याच्या शेजाऱ्यांकडून काहीतरी मदत मिळत असणार. मुळाच्या मार्गाने ही मदत पुरविली जात असावी, असा अनुमान मी लावला.काही शास्त्रज्ञांनी या विषयात संशोधन केलं आहे.त्यात त्यांना असं दिसून आलं की,झाडांच्या मुळांशी फंगल नेटवर्क,म्हणजे कवकाची जाळी असतात ज्यातून झाडं पोषणद्रव्यांची देवाणघेवाण करतात.' काही वेळा झाडांची मुळंच एकमेकांना जोडलेली असतात आणि त्यातून देवाणघेवाण चालते.जंगलात सापडलेल्या या झाडाच्या खुंट्यात नक्की काय चाललं आहे याचा शोध मला घेता आला नाही,कारण त्या खोडाला उकरून मला त्याला कोणत्याही प्रकारची इजा करायची नव्हती.पण एक गोष्ट नक्की होती की, भोवतालच्या बीच झाडांकडून या खुंट्याला साखरेचा पुरवठा होत होता.झाडं एकमेकांना कशी जोडून घेतात याची प्रचीती कदाचित तुम्हाला रस्त्याच्या कडेच्या बंधाऱ्याकडे बघून येईल.
रस्त्याकडेच्या तिरकस भागावरून पाऊस झपाट्याने वाहतो आणि त्याबरोबर माती वाहून जाते.अशा वेळेस झाडांच्या मुळांची जाळी दिसू लागते.
जर्मनीमधील हार्झ डोंगररांगेत शास्त्रज्ञांना असे आढळून आले की हे परस्परावलंबनातून सहजीवनाचं उत्तम उदाहरण आहे.यात एकाच प्रजातीची झाडे एकमेकांना मुळातून जोडलेली असतात.आणि गरजेच्या वेळी त्यातून पोषणद्रव्यांची देवाणघेवाण होऊन आपल्या शेजाऱ्याला मदत पुरवली जाते.या अभ्यासातून असं दिसतं की जंगलात वनस्पती एकमेकांना जोडून राहतात,
ज्यामुळे त्यांचे आचरण एका भव्य विशाल - जीवासारखं असतं जसं ते आपल्याला मुंग्यांच्या वसाहतीतही पाहायला मिळतं.
इथे एक प्रश्न मनात येतो,की झाडांची मुळे मातीत अहेतुक,मुक्तपणे वाट काढत असतील का ? आणि वाटेत अपघातात एखादा स्वकीय भेटला तरच त्याच्या मुळांना जोडून घेत असतील का?आणि एकदा जोडलं गेल्यावर त्यांना पोषणद्रव्यांची देवाणघेवाण करावीच लागत असेल ? म्हणजे त्यांच्याकडून एक समूहाची उभारणी होत असल्यासारखं आपल्याला वाटतं, पण त्यांच्यासाठी ही अपघातानेच सुरू झालेली देवाणघेवाण तर नसेल? जरी हे झाडाकडून नियोजनबद्धरीत्या,हेतुपुरस्सर केले जात नसून निव्वळ योगायोगाने साधले जात असेल तरीसुद्धा जंगलाच्या परिसंस्थेसाठी ही गोष्ट जमेचीच आहे.पण निसर्ग इतका साधा सरळ नक्कीच नाही.इटलीच्या ट्यूरिन विद्यापीठाचे मासिमो माफेई यांच्या मते झाडांकडे आपल्या प्रजातीची मुळं अचूक ओळखण्याची क्षमता असते.आपल्या आणि इतर प्रजातींच्या मुळांमधला फरकही ओळखता येतो.'
पण वनस्पती अशा प्रकारचं सामाजिक जीवन का बरं जगत असतील? आपले खाद्य आपल्या स्वजातीयाशी आणि काही वेळा स्पर्धकांशीही वाटून खाण्याचं औदार्य का बरं दाखवत असतील? मानव जातीकडे या प्रश्नाला जे उत्तर आहे तेच वनस्पतींनाही लागू होतं - अशा प्रकारच्या सहजीवनाचे फायदे आहेत.एक झाड म्हणजे वन परिसंस्था नव्हे.स्थानिक हवामान नियंत्रणाची क्षमता एका झाडात नसते.वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानाला एकट्याने तोंड देणं सोपं नसतं.पण अनेक झाडं असलेल्या परिसराची परिसंस्था बनते.अशा प्रकारच्या समूहात थंडी आणि उष्णता नियंत्रणाची थोडी क्षमता असते.एकमेकांच्या साहाय्याने पाण्याचा अधिक साठा होऊ शकतो आणि हवेतील आर्द्रता वाढवता येते.अशा अनुकूल परिस्थितीत झाडं अनेक वर्ष जगू शकतात.पण यासाठी तिथल्या सर्व झाडांना सहकार्यानेच जगावं लागतं.प्रत्येक झाड जर स्वत:चा फायदा बघू लागलं तर सर्वांना दीर्घायु लाभणं शक्य होणार नाही.आणि झाडं वठण्याचे प्रमाण वाढलं की तिथं जंगलातील आच्छादन कमी होतं.अशा परिस्थितीत वादळी वारे आत शिरतात आणि उन्हाची झळ जमिनीला लागून मातीची आर्द्रता घटते.मग प्रत्येक झाडालाच संकटाला तोंड द्यावं लागतं.
त्यामुळे वनसमूहात प्रत्येक झाडाचं महत्त्व असतं आणि ते दुसऱ्याला उपयुक्त असतं.म्हणून वनपरिसंस्थेत आजारी आणि क्षीण वृक्षांनाही इतर झाडांकडून मदत केली जाते.
कोण जाणे, उद्या मदत पुरवणाऱ्याला त्या आजारी झाडाची मदत लागेल.
मोठाल्या चंदेरी -करड्या रंगाच्या खोडाचे बीच वृक्ष जेव्हा असे वागतात तेव्हा मला हत्तींच्या कळपाची आठवण होते. हत्तींच्या कळपाप्रमाणेच झाडेसुद्धा आपल्या समूहातील आजारी आणि दुर्बल झाडांची
ते बरे होईपर्यंत काळजी घेतात.इतकंच काय तर मेलेल्या झाडालाही एकटं सोडायची त्यांची तयारी नसते.मृताला सोडून जाणं हत्तींनाही जड जातं.
या समूहात जरी प्रत्येक झाड एक सदस्य असलं तरी वनामध्ये सदस्यत्वाचे विविध स्तर असतात. उदाहरणार्थ,बहुतांश वठलेले वृक्ष शे-दोनशे वर्षांत कुजून नाहीसे होतात.मला सापडलेल्या या 'हिरव्या दगडांसारखे' काही थोडेच वृक्ष इतकी वर्षं जिवंत ठेवले जातात.पण वनपरिसंस्थेत असा भेदभाव का होत नसून असेल? मानव जातीप्रमाणे त्यांच्यातही कनिष्ठ दर्जाचे नागरिक असतात की काय? मला वाटतं वनपरिसंस्थेतही असं असतं,पण त्यात 'दर्जा' हा निकष एखादा वृक्ष इतरांना किती जोडला गेला आहे,इतरांशी त्याचा स्नेहभाव किती आहे, यावर त्याला दुसऱ्यांकडून होणारी मदत ठरत असावी.एखाद्या वनाच्या आच्छादनाकडे पाहून तुम्हालाही हे जाणवेल.प्रत्येक झाड आपला विस्तार शेजारच्या झाडाच्या पालवीच्या विस्तारापर्यंतच पसरवते,कारण तिथे पोचणारा सूर्यप्रकाश वापरला जात असतो.पण तिथपर्यंत पोहोचलेल्या पालवीला भक्कम फांद्यांनी आधार दिला जातो.दोन झाडांमध्ये धक्काबुक्की चालू आहे की काय असं वाटेल बघणाऱ्याला! खऱ्या मित्रांसारखी ही दोन्ही झाडं आपला विस्तार आणि फांद्या दुसऱ्याला त्रास होईल इतक्या वाढवतच नाहीत.त्यांना आपल्या शेजारच्या मित्राकडून प्रकाश ओरबाडून घ्यायचा नसतो. त्यामुळे मित्र नसलेल्या दिशेला ते आपल्या फांद्यांचा विस्तार वाढवतात.मित्र वृक्ष जमिनीखालूनही भक्कमरीत्या जोडलेले असतात.त्यांची मैत्री इतकी घट्ट असते की काही वेळेला एक वठला की दुसराही फार काळ टिकत नाही.वठलेल्या मित्राच्या खोडाला जिवंत ठेवण्याचे कार्य फक्त अविचल जंगलात दिसून येतं.ही मैत्री बीच वृक्षांव्यतिरिक्त इतर प्रजातींमध्येही दिसून येत असणार.ओक,फर,स्प्रूस आणि डगलस स्प्रूस वृक्षाच्या जंगलातून मी स्वतः अशी मैत्री पाहिली आहे.त्यांच्यातही कापून टाकलेल्या झाडांच्या खोडांना अशाच प्रकारे जिवंत ठेवलं गेलं होतं.युरोपमध्ये बहुतांश सूचीपर्णी जंगलं लावली गेली आहेत.यामधले वृक्ष रस्त्यावर खेळणाऱ्या उनाड मुलांसारखे वागतात.लागवड करताना त्यांच्या मुळांना कधीही भरून न येण्यासारखी प्रचंड इजा झालेली असल्यामुळे मुळाच्या जाळ्यातून ते मैत्री करू शकत नाहीत.
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज
पी ट र वो ह्ल ले बे न
अनुवाद - गुरुदास नूलकर
अरविंद घनश्याम पाटकर
मनोविकास प्रकाशन