* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: देवरायणदुर्गची विक्षिप्त वाघीण नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२३/३/२३

देवरायणदुर्गची विक्षिप्त वाघीण नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन

ह्या वाघिणीला विक्षिप्त म्हणायच कारण म्हणजे हिनं वास्तव्यासाठी निवडलेलं ठिकाण,हिचं तऱ्हेवाईक वागणं आणि विक्षिप्त सवयी,ही वाघीण जरा वेगळीच होती.ती नरभक्षक नव्हती. किंबहुना हिनं कधीच नरमांस खाल्लं नाही.मात्र ती जरा हिंस्त्र प्रवृत्तीची होती आणि तिचं मनुष्यजातीशी विशेष शत्रुत्व होतं. 


तिनं तीन जणांना मारलं.एक महिला व दोन माणसं.हा हल्ला तिनं केवळ त्याक्षणी आलेला आवेग आक्रमकतेतून केला होता.हिच्या सवयीही वाघांसारख्या नव्हत्या.ही वाघीण शेळ्या व गावातली कुत्री मारून खायची,वाघ जसं कधीच करत नाहीत.क्वचित ते एखादी शेळी मारतील,पण कुत्री कधीच नाही.


बंगलोरपासून पन्नास मैलांच्या आत आणि तुमकूरपासून सहा मैलांवरच्या देवरायणदुर्गच्या डोंगरामध्ये ही वाघीण एक दिवस अचानक अवतीर्ण झाली.देवरायणदुर्गमध्ये कितीतरी दशकांत वाघानं वास्तव्य केलेलं नव्हतं.इथे म्हणण्यासारखं जंगलही नव्हतं,फक्त खुरट्या झुडुपांनी आच्छादलेला एक बेटासारखा भाग होता,जिथे काही रानडुकरं व मोर सोडले,तर इतर प्राणीही नव्हते.बाकी सर्वदूर शेतं पसरलेली होती.इथला डोंगर अत्यंत खडकाळ होता व त्यात काही गुहाही होत्या,पण वाघासारखा एखादा मोठा प्राणी राहू शकेल एवढ्या त्या मोठ्या नव्हत्या.कधीतरी तिथे राहणाऱ्या साळिंदरासारख्या प्राण्याला हाकलून देऊन एखादा बिबळ्या तिथे मुक्काम करायचा.अशा ठिकाणी राहाण्याचा धोका कुठल्याही सर्वसाधारण वाघानं पत्करला नसता.ह्या वाघिणीनं मात्र हीच जागा निवडली होती.शेतं ओलांडल्याशिवाय तिथल्या डोंगरावरच्या झुडुपांच्या तुटपुंज्या आडोशाला जाता येणंही शक्य नव्हतं.


ह्या परिसरातील बकऱ्या आणि कुत्री लक्षात येण्याएवढी गायब होऊ लागली.सुरुवातीला हे काम बिबळ्याचं असावं असंच सर्वांना वाटलं, परंतु जेव्हा नांगरलेल्या शेतात हिच्या पंज्यांचे ठसे दिसले,तेव्हा हे वाघिणीचं काम आहे हे लक्षात आलं.त्यानंतर दोनच दिवसांनी रात्री चरायला सोडलेली एक मोठी गाय गावाच्या वेशीवर मारली गेली.त्या गाईची मालकीण एक म्हातारी बाई होती.तिची ही गाय अत्यंत लाडकी होती.गाय मारली गेल्याचं कळताच तिनं गाईकडे धाव घेतली,व तिच्या शेजारी बसून तिनं मोठ्यानं गळा काढला.तिचे कुटुंबीय पण तिथे येऊन तिचं सांत्वन करू लागले.थोडा वेळ थांबून एकेकानं काढता पाय घेतला.


ती बाई तिथे एकटीच उरली,पण तिचं भोकाड पसरून रडणं काही थांबेना.सकाळचे अकरा वाजले,सूर्य माथ्यावर यायच्या बेतात होता अशा तळपत्या उन्हात कुठलाही सामान्य वाघ भक्ष्याच्या जवळ जाणं तर सोडाच,बाहेरही पडला नसता.पण ही वाघीण सामान्य नव्हतीच.ती त्या मेलेल्या गाईपाशी आली.तिनं गाईजवळ बसून मोठ्यानं रडणारी बाई पाहिली.ते मोठ्याने रडणं न आवडून,हे आता थांबवलंच पाहिजे,असं बहुतेक ठरवून तिनं त्या बाईवर उडी घेतली आणि पंजाच्या एका फटक्यात तिचा प्राण घेतला.त्यानंतर तिनं गाईला ओढून थोडं लांब नेलं आणि त्या मेलेल्या बाईकडे संपूर्ण दुर्लक्ष करत भरपेट जेवण केलं.


दुपारी चार वाजले,तरी म्हातारी घरी आली नाही.एवढा वेळ रडून दमल्यानं तिला झोप लागली असावी,म्हणून तिला घरी आणायला तिच्या घरचे त्या जागेवर गेले.तेथील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला.म्हातारी मरून पडली होती.आणि थोड्याच अंतरावरच्या गाईला खाऊन वाघीण निघून गेली होती.ते पाहून धावत पळत ते गावात गेले आणि ती दुःखद बातमी सगळ्यांना सांगितली.थोड्याच वेळात गावचा सरपंच त्याच्याकडची ठासणीची बंदूक घेऊन निघाला.त्याच्याबरोबर अजून दोन डझन लोक हातात निरनिराळी शस्त्रं घेऊन त्या ठिकाणी पोहोचले.

त्यांनी वाघिणीचा माग काढायचा प्रयत्न केला,पण वाघीण जवळच असलेल्या झुडुपांच्या दाटीत शिरली होती.त्यात शिरायची भीती वाटल्यानं त्यांनी दुरूनच आरडाओरडा केला,दगड मारले.सरपंचानं हवेत दोन बार काढले.काहीच घडलं नाही,म्हणून म्हातारीचा मृतदेह घेऊन जायला सगळे वळले आणि वाघीण झाडीतून धावत बाहेर आली.तिनं सर्वात मागच्या माणसावर हल्ला चढवला.तो माणूस नेमका सरपंच होता.काही कळायच्या आत तो जागेवरच ठार झाला.त्याच्या एकट्याकडेच बंदूक असल्यानं सगळे लोक पळत सुटले,ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेतं आणण्यासाठी परत तिथे गेले, तेही जास्त संख्येने.दोन्ही प्रेतं जशीच्या तशी पडलेली होती.वाघानं गाईवर मात्र ताव मारला होता.


पुढचे दोन दिवस संपूर्ण गावावर भीतीचं सावट होतं.

तिसऱ्या दिवशी एक वाटसरू आपल्या दोन गाढवांवर सामान लादून तुमकूरकडून येत होता. तो गावापासून मैलभर अंतरावर असताना वाघिणीनं पुढच्या गाढवावर झडप घातली. ते गाढव खाली कोसळलं.दुसरं गाढव तसंच उभं राहिलं,पण तो वाटसरू भीतीनं किंकाळी फोडत आल्या दिशेनं पळत सुटला.त्याला पळताना बघून वाघीण बिथरली असावी,कारण त्या माणसाचा पाठलाग करत वाघिणीनं त्याला मारलं आणि ती मारलेल्या गाढवाकडे परत आली.गाढवाला उचलून नेऊन तिने त्याला खाल्लं.हे सर्व करताना तिनं त्या दुसऱ्या गाढवाला किंवा त्या मरून पडलेल्या वाटसरूला स्पर्शही केला नव्हता.


या सर्व घटना बंगलोरच्या इतक्या जवळ घडल्यानं सर्व स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये त्याच्या बातम्या मोठ्या मथळ्यांमध्ये छापून आल्या होत्या.त्या वाचून दुसऱ्याच दिवशी मी कारनं निघून दोन तासांत देवरायणदुर्गमध्ये दाखल झालो.भेदरलेल्या गावकऱ्यांनी वर घडलेल्या घटना मला सांगितल्या.धुळीनं भरलेले रस्ते आणि कोरडी हवा असल्यामुळे वाघिणीच्या पंजाचे सर्व ठसे पुसले गेले होते.काही काळ हे काम वाघिणीचंच आहे की एखाद्या मोठ्या आणि आक्रमक बिबळ्याचं आहे,असा संभ्रम माझ्या मनात होता;पण सरपंचासोबत असणाऱ्या लोकांनी घडलेली घटना प्रत्यक्ष पाहिल्यानं,ती वाघीणच असल्याचं ते छातीठोकपणे सांगत होते.गावकऱ्यांना अतिशयोक्ती करण्याची सवय असल्यानं त्यांनी एवढं सांगूनही माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होतीच.

दुपारचं जेवण पटकन आटोपून,माझ्याबरोबर यायला अत्यंत अनुत्सुक असलेल्या एका वाटाड्याला घेऊन मी तो सर्व परिसर धुंडाळला.त्या गुहांमध्येही डोकावलो, पण आम्हाला कुठेही एखादी खूणही दिसली नाही.आम्ही दमून भागून चार वाजता गावात परत आलो.तिथे म्हैस न मिळाल्यानं मी एक अर्धवट वयाचा बैल मिळवला.

गावापासून पाऊण मैलावर रस्ता जिथे एका खडकाळ, काट्याकुट्यांनी भरलेल्या नाल्याला छेदून जातो, तिथे मी तो बैल बांधला.जवळजवळ सहा वाजत आले होते.

मचाण बांधायला वेळ नव्हता.त्यामुळे सहा मैलांवर असलेल्या तुमकूरच्या प्रवासी बंगल्यात रात्र काढून मी सकाळी इथे यायचं ठरवलं.तोपर्यंत वाघिणीनं बैल मारलेला असेल, अशी मला आशा होती.मी पहाटे पाच वाजताच उठलो.साडेपाच वाजेपर्यंत बैल जिथे बांधला होता,तिथून अर्ध्या मैलावर गाडी उभी केली आणि अत्यंत सावधपणे चालत पुढे गेलो.बैल गायब होता.नीट पाहाणी केल्यावर लक्षात आले की,बैल मारला गेला आहे.त्याला बांधलेला दोर जोरदार ओढाओढी करून अगदी प्रयत्नपूर्वक तोडला गेला होता. तिथं ठसेही स्पष्टपणे दिसत होते,ज्यावरून हे काम वाघाचं नसून एका प्रौढ व आकारानं मोठ्या वाघिणीचं आहे,हे कळत होतं. या जनावराचा विक्षिप्त स्वभाव आणि अचानक हल्ला करण्याची सवय लक्षात घेऊन मी अतिशय सावधपणे बैलाला ओढत नेल्याच्या खुणांवरून पुढे जाऊ लागलो.

मागे पुढे आणि दोन्ही बाजूंना लक्ष ठेवत मी जात असल्यानं माझा वेग मंद होता.साधारण दीडशे यार्ड गेल्यावर मी त्या मेलेल्या बैलापाशी आलो. वाघीण मात्र तिथे नव्हती,ती निघून गेली असावी.


वाघ ज्या पद्धतीनं जनावराला मारतात अगदी तशाच पद्धतीनं तो तरुण बैल मारला गेला होता. त्याची मान मोडली होती,त्यानंतर तिनं त्याला ओढत आणलं होतं.बैलाच्या गळ्यावरच्या सुळ्यांच्या खोलवर घुसलेल्या जखमांवरून तिनं त्याच्या नरडीचा चावा घेऊन त्याचं रक्तप्राशन केलं होतं.त्या बैलाची शेपटी चावून धडापासून अलग करून सुमारे दहा फूट अंतरावर टाकली गेली होती,तर पोट फाडून आतली आतडी व घाणही बाहेर काढून लांब नेऊन टाकली होती. त्यानंतरच तिनं भोजन सुरू केलं होतं.वाघ खातात त्या पद्धतीनं,म्हणजे मागून सुरुवात करून तिनं बैलाचा अर्धाअधिक फडशा पाडला होता.या सर्व गोष्टींवरून मला जे सांगण्यात आलं होतं,तशी मला तरी ती विक्षिप्त वाटली नाही.असली तर भडक डोक्याची असावी.वाघीण परत येईल,या आशेनं मी वीस यार्डावर असलेल्या एका हडकुळ्या झाडावर चढून बसलो.बसण्याजोगी तेवढी एकच जागा जवळपास उपलब्ध होती.तिथे मी साडेनऊपर्यंत थांबलो,वाघीण काही आली नाही;परंतु तीक्ष्ण नजरेच्या गिधाडांना मृतदेहाची खबर लागली आणि ती घिरट्या घालत मेजवानीवर ताव मारायला खाली खाली येऊ लागली. गिधाडांपासून त्या मृतदेहाचं संरक्षण करण्यासाठी मला झाडावरून खाली उतरावं लागलं.आजूबाजूच्या झुडुपांच्या फांद्या तोडून मी त्या बैलाचा मृतदेह झाकला.

माझी गाडी घेऊन मी नंतर गावात आलो आणि चार जणांना घेऊन परत त्या जागेवर गेलो.माझ्याबरोबर नेहमी गाडीत असणारं मचाण मी त्यांना झाडावर चढवायला सांगितलं.त्यातल्या एका माणसानं मला,मी तिथे एक बकरीपण बांधावी,असं सुचवलं.त्याच्या म्हणण्याप्रमाणे या वाघिणीला एकतर बकऱ्या खायला आवडायचं,दुसरं म्हणजे तिचं ओरडणं ऐकून वाघीण तिथे यायची शक्यताही वाढेल.मला त्याचं हे म्हणणं पटलं.मी परत गावात जाऊन एक बकरी मिळवली.


थोडी बिस्किटं व चहा पिऊन मी मचाणावर चढलो की,मगच त्या बकरीला बांधून तिथून निघून जाण्याच्या सूचना मी माझ्या माणसांना दिल्या,म्हणजे ते तिथून निघून गेले,की तिला एकटं वाटून ती ओरडू लागेल.ती माणसं तिथून निघेपर्यंत दोन वाजले.ते गेल्यावर ती बकरी खरंच जोरात बें बें करत ओरडू लागली.साधारण पावणेसहापर्यंत ती बकरी ओरडत होती.त्याच सुमारास मला ती वाघीण येत असल्याची चाहूल लागली.ती हळू आवाजात अधेमधे कण्हल्यासारखे आवाज काढत येत होती. बकरीनंही ते ऐकलं आणि ती बिचारी भीतीनं नखशिखांत थरथरू लागली.दुर्दैवानं ती वाघीण माझ्या मागच्या बाजूनं येत होती.माझ्या खाटेच्या मचाणावरून मला मागे पाहाता येत होतं,पण मागच्या बाजूला दाट झुडुपं होती आणि माझ्या मागे झाडाचं खोड होतं,त्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं.शिवाय मागच्या बाजूची जमीन वरून खाली उतरत आली होती.वाघीण वरून खाली उतरताना तिला माझं मचाण थेट समोर दिसलं म्हणा किंवा वाघासारख्या प्राण्यांना असणाऱ्या तीव्र अशा सहाव्या इंद्रियामुळे तिला पुढे धोका असल्याची जाणीव झाली म्हणा, तिला शंका आली हे खरं,कारण तिनं एक जोरदार डरकाळी फोडली आणि पुढे न येता ती त्या परिसराभोवती घिरट्या घालू लागली.बिचारी बकरी भीतीनं अर्धमेली झाली होती. अंधार पडू लागला,तशी ती थरथरत अंगाची जुडी करून खाली बसली.ती वाघीण रात्री नऊ वाजेपर्यंत डरकाळ्या फोडत फिरत होती.शेवटी

निषेध नोंदवणारी एक डरकाळी फोडून ती निघून गेली.त्यानंतर काहीच घडलं नाही.पहाटे पारा खाली उतरून एवढी थंडी पडली की,मी पार गारठून गेलो.


कथा अजून शिल्लक आहे.ती लेखातील दुसऱ्या भागात..


अनुवाद - संजय बापट 

राजहंस प्रकाशन