* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ग्रंथसंग / book company

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

4/27/26

ग्रंथसंग / book company


ग्रंथांचिया द्वारी,जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा अतुल देऊळगावकर,प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन पुणे एकूण २८ ग्रंथसंग आपण क्रमशः सुरु करीत आहोत.

शाळेची सुटी संपल्यावर काही शिक्षक 'काय वाचलं?' असे विचारत.तेव्हा वर्गात शोभा होऊ नये यासाठी काळजी घेणे भाग होते.घरातील वातावरणामुळे विविध प्रसंगी येणारे नरहर कुरुंदकर,अनंतराव भालेराव, वसंतराव पळशीकर,पन्नालाल सुराणा,पुष्पाबाई भावे यांच्याकडून हमखास येणाऱ्या ह्याच कठीण प्रश्नाला उत्तर देणे अनिवार्य होते.ही महनीय मंडळी वयाने व ज्ञानाने अतिशय लहान असणाऱ्या बालकांशीही मनापासून बोलत असत.यातूनच 'काय वाचावं?' हे आवर्जून सांगत.शिक्षणाच्या व नोकरीच्या निमित्ताने पुण्यात असताना समर नखाते,माधुरी पुरंदरे यांच्या 'माध्यम' पथनाट्य चळवळीत सामील झाल्यावर 'तोच' प्रश्न धाकदायक होत गेला.नंतर 'ग्रंथाली' वाचक चळवळीमुळे दिनकर गांगल,कुमार केतकर,अरुण साधू यांच्या गाठीभेटी वाढत गेल्या.तेव्हाही भेटीतील आरंभीची विचारपूस 'याच' दडपण आणणाऱ्या प्रश्नाने होत असे.तर अशा ह्या 'अटळ' प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी करणे भागच होते.ह्या सर्वार्थाने ज्येष्ठ मंडळींच्या बोलण्यातून येणारे संदर्भ समजले नाही,तर तो भयंकर अपमान वाटत असे.त्यामुळे संदर्भ आलेल्या पुस्तकांचा शोध घेणे अगत्याचे होते.ह्या बुजुर्गांच्या घरी जाण्याची संधी मिळाली,तर त्यांच्या ग्रंथसंग्रहाकडे मनःपूर्वक पाहत,नोंदी करून घेणे आवश्यक वाटायचे.वाचायचे तर अफाट आहे.वाचनाचा क्रम कसा असावा? ही समस्या कधी सुटलीच नाही.'वाचनशिस्त आली नाही.

खूप काही राहून गेलं आहे',ही जाणीव सातत्याने टोचत राहते.अशा ह्या सदोष,अ-रेषीय व अ-परिपूर्ण वाचनप्रवासात अनेक लेखक-कवी माझ्यासोबत येत बरेच काही देऊन गेले.'आपण फारच छोटे आहोत. आपला शब्दसंग्रह थिटा आहे.आपल्याला भाषावैभव कधी येणार? आपली दृष्टी ही भंगलेली, विखंडित आहे.' ही टोचणी कायमची आहे व तशीच राहणार.त्यामुळे 'दृष्टी समग्र व विशाल करण्याच्या आटोकाट प्रयत्नात' काही लेखक-कवी-कलावंतांना कायम सोबत ठेवावे लागते.जे. कृष्णमूर्ती,विनोबा भावे,तुकाराम,पं. कुमार गंधर्व,मर्वेकर,विंदा,एलकुंचवार,एरिक फ्रॉम ह्यांच्या सतत सहवासात राहून शिकत राहणे सुरूच आहे.

वर्गमित्र दीपक देवधरमुळे भगतसिंगांचे 'मी नास्तिक का आहे?" हातात आले.वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी फासावर जातानाही न डगमगता परमेश्वराला नाकारण्याचे आंतरिक धैर्य असणाऱ्या विवेकी भगतसिंगाने पछाडून टाकले.विख्यात इतिहासकार बिपिन चंद्र यांनी १९७० मध्ये मूळ गुरुमुखीतील ह्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आणि लोकवाङ्गय गृहामुळे ते लवकरच मराठीत आले.ह्या पुस्तकामुळे भगतसिंगांच्या वाचन व्यासंगाची माहिती देशाला झाली. मृत्यू समोर दिसत असताना विलक्षण शांत व संयमी राहणारा हा तरुण वाचनात गढून गेला होता. शोषणरहित आदर्श समाजाचे स्वप्न उराशी बाळगून होता.फाशीचा क्षण आला,तेव्हाही हा धीरोदात्त महावीर पुस्तकात रममाण झाला होता. 'मी नास्तिक का आहे?' मुळे वाचनाची आवश्यकता मनात ठसली गेली आणि विवेकी विचारही बळकट झाला.

महाराष्ट्रातील पथनाट्य चळवळीचे जनक समर नखाते यांच्या अभ्यासवर्गात अक्षरशःविश्वरूपदर्शन होत असे. 'व्यक्तीचं व समाजाचं वर्तन कसं व का? हे समजलंच पाहिजे.राजकारणाचे व व्यवस्थेचे स्वरूप समजून घेण्यासाठी अर्थकारण समजून घेतलं पाहिजे.तसंच कोणीही कोणताही प्रश्न विचारला तर आपल्याकडे उत्तर असलं पाहिजे,'असे बजावत ते आपल्याला न पडणारे प्रश्न टाकून अस्वस्थ करत.त्यांच्या बोलण्यात मढेकर, विंदा,तुकाराम,नामदेव ढसाळ,इरावती कर्वे,नारायण सुर्वे,किरण नगरकर,भाऊ पाध्ये,कुमार केतकर यांच्यापासून फ्रॉइड,मार्क्स,अ‍ॅडम स्मिथ,जॉन केनेथ गालब्रेथ,रसेल,एरिक फ्रॉम,नोम चोम्स्की,एडवर्ड सैद, असे अनेक संदर्भ येत.माधुरी पुरंदरे यांच्याकडून दि.बा मोकाशी, म. वा. धोंड,त्र्यं. ना. अत्रे,ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक,गोडसे भटजी ते व्हानगोंग,पिकासो, रेम्ब्रा,सार्ज, सिमोन द बोव्हा,कुरोसावा,बर्गमन इत्यादींचे उल्लेख होत असत.मग त्या संदर्भाचा जमेल तसा पाठलाग सुरू केला.सोबतचे अनिल झणकर,दीपक देवधर,अश्विनीकुमार धर्माधिकारी,कामोद देशपांडे या मित्रांशी गप्पा मारताना 'वाचलं पाहिजे' हे ध्रुपद कायम असे. 'ते काय वाचतात? आपलं काय राहिलंय? आपण किती मागे?' ही भावना दाटून येत असे.त्या काळात (१९७८ ते १९८४) सर्वांच्या भेटीगाठींचे ठिकाण होते - 'कॅफे डिलाइट'! (गुडलक चौकातील 'हॉटेल वाडेश्वर'च्या जागी).तिथे तास न् तास बसल्यावर कला,राजकारण, समाजकारण यांवरील अनेक संदर्भ ऐकू येत.एकंदरीत सर्वत्र श्रवणभक्ती करताना आपल्या अत्यल्पज्ञानाचा साक्षात्कार पदोपदी होत असे.अशा वातावरणात वाचले तरच मी वाचणार होतो.त्या टप्प्यात मानवतावादी तत्त्वज्ञ,सामाजिक मानसशाखज्ञ एरिक फ्रॉम (१९००-१९८०) यांनी बराच काळ धरून ठेवले.फ्रॉम यांनी हिटलरच्या आगमनानंतर मायदेश जर्मनीला रामराम ठोकला.आधी स्वित्झर्लंड व पुढे ते अमेरिकेत वास्तव्यास गेले.औद्योगिक क्रांतीनंतर जगाची होत असलेली वाटचाल ते पाहत होते.त्यांच्या 'द सेन सोसायटी' (१९५५) मध्ये त्यांनी भांडवलशाही अमेरिका व साम्यवादी सोव्हिएत युनियन ह्या दोन्ही व्यवस्थांचे धारदार विच्छेदन केले होते.१९८२ मध्ये हे पुस्तक घेणे भाग पडले होते.पाठोपाठ वसंतराव पळशीकर यांनी सुचविल्यामुळे रॅचेल कार्सन यांचे 'सायलेंट स्प्रिंग' (१९६२) घेतले.ह्या दोन्ही पुस्तकांनी त्या काळातील प्रचलित विचारसरणींपेक्षा निराळ्या रीतीने पाहण्याची दृष्टी (लॅटरल थिंकिंग) दिली.सोव्हिएत युनियनच्या स्थापनेपासूनच त्यांच्यात आणि अमेरिका यांच्यात संघर्ष जाणवत होता.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर ह्या दोन्ही देशांनी त्यांच्या आधिपत्याखालील देश वाढवून आपापला साम्राज्यविस्तार सुरू केला.यातूनच शीतयुद्धाचा आरंभ झाला. (जॉर्ज ऑर्वेल यांनी 'तुम्ही आणि अणुबाँब' ह्या निबंधात 'कोल्ड वॉर' ही संज्ञा मांडली होती.) साम्यवादी व भांडवलशाही ह्या दोन्ही विचारांनी 'निसर्गाला अंकित करून विकास' घडवला. युद्धसज्जतेसाठीच अवकाश संशोधन,

अणुऊर्जा, संगणक ह्या तंत्रज्ञानातील शोधमोहिमा सुरू होत्या.या काळातच जगभर निसर्गाच्या मनमुराद विध्वंसाचा पाया घातला गेला आणि त्यामध्ये भांडवलशाही व साम्यवादी या दोन्ही विचारसरणी एकाच दिशेने प्रवास करू लागल्या.वसाहतीतून मुक्त झालेल्या अनेक नव्या देशांनी हाच कित्ता गिरवला.ह्या पार्श्वभूमीवर,फ्रॉम यांनी 'द सेन सोसायटी'त वास्तव दाखवले होते,आपल्या लोकशाहीमुळे समाज हा सभ्य व सुसंस्कृत होत नाहीए.व्यक्तींची व समाजाची आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा सर्व बाजूंनी प्रगती झाली,तरच समाज प्रगत होईल.त्याची कारणमीमांसा करताना ते म्हणतात,माणसाने स्वतःला निसर्गापासून अलग करीत निसर्गविनाश चालू केला.पुढे समाजापासून वेगळे होत व्यक्तिवाद जोपासला. व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तिवाद यात गल्लत करीत अतिरेकी व्यक्तिवादी होऊ लागला.ह्या प्रक्रियेत चढत्या भाजणीने वस्तुसंचय करू लागला.दरम्यानच्या काळात, बाजारपेठ अतिशय शक्तिमान होत व्यक्तींवर ताबा मिळवू लागली.बाजारानेच नीती व मूल्ये ठरविण्याचा मक्ता घेतला.बाजाराची भाषा सर्रास घराघरांत ऐकू येऊ लागली.पैशाला अतिरेकी महत्त्व येत गेले. पैसा हेच मोजमाप सर्वत्र लागू होताच कमीतकमी काळात व कमीतकमी कष्टांत अधिकाधिक पैसा हे आयुष्याचे ध्येय झाले.'बाजार' हे मूल्य व्यक्ती व समाज, नाती व नीती सारं काही घडवत जाते.यातून माणसांना असुरक्षितता,अनिश्चितता,एकाकीपणा ह्या भावनांनी ग्रासून टाकलं आहे.पूर्वी माणसाला गुलाम होण्याची भीती होती.बाजारपेठ हीच सार्वभौम होत चालल्याने भविष्यात माणूस यंत्रमानव होण्याची शक्यता आहे. असा भविष्यवेध करून फ्रॉम यांनी 'वो सुबह हमीसे आएगी' अशी आशा दाखवत 'मानवतावादी समुदायवादा'ची (ह्यमुनिस्टिक कम्युनिटिरॅनिझम) मांडणी केली.त्यांना उदार व उन्नत समाज अपेक्षित होता.'कोणीही कोणावर सत्ता न गाजवता एकमेकांशी साहचर्याने जुळवून घेणारा,इतरांविषयी बंधुभाव व वात्सल्याची भावना असणारा,व्यक्तीचा सातत्याने गुणात्मक विकास होण्यास पोषक वातावरण असणारा समाज घडवावा लागेल.' हे फ्रॉम यांचे स्वप्नरंजन असे संबोधून हिणवण्यापेक्षा,अशी स्वप्ने पाहणे आवश्यक असल्याची जाणीव तेव्हा झाली होती.आजही ती तशीच टिकून आहे.फ्रॉम यांनी मूलभूत समस्यांचा अन्वय लावणारी,'बियाँड द चेन्स ऑफ इल्युजन - माय एनकाउंटर्स विथ मार्क्स अँड फ्रॉइड','झेन बुद्धिझम अँड सायकोॲनॅलिसिस', 'द आर्ट ऑफ लिसनिंग','ऑन बिईंग ह्युमन' अशी अनेक मौलिक पुस्तकं लिहिली आहेत.व्यक्ती व समाज यांच्या वर्तनाची अनेकांगी चिकित्सा करणाऱ्या फ्रॉम यांचा पाठपुरावा करणे,मला गरजेचे होते.त्यांनी 'फिअर ऑफ फ्रिडम'मधून सांगितले,'स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन निर्णय घेताना माणसाला ताण येतो. त्यामुळे स्वातंत्र्याचं भय वाटून पलायनवादी माणसं आपला ताबा ईश्वर, बुवा, नेता यांच्याकडे द्यायला सहज तयार होतात.'

प्रेम ही एक कला आहे, हे स्पष्ट करताना 'द आर्ट ऑफ लव्हिंग' (१९५६) मध्ये फ्रॉम लिहितात, 'दुसऱ्या व्यक्तींची मालकी मिळवणे,तिच्याकडून अपेक्षापूर्ती करून घेणे म्हणजे प्रेम नव्हे.प्रेम ही नैसर्गिक बाब वा भावना नसून,ती एक साधना आहे.त्यासाठी आत्मप्रेमातून बाहेर पडून स्वतःमध्ये शिस्त व संयम,तसेच दुसऱ्या व्यक्तीविषयी विश्वास व आदर असावा लागतो.एका विशिष्ट व्यक्तीशी नातं प्रस्थापित करण्यापुरतं मर्यादित असतं ते 'प्रेम' नाही.तो विस्तारलेला अहं असतो.सर्व माणसांविषयी,प्राणिमात्रांविषयी प्रीती वाटणं ही विशाल व व्यापक प्रेमभावनेची खूण आहे.'

फ्रॉम यांनी 'द अ‍ॅनाटॉमी ऑफ ह्युमन डिस्ट्रक्टिव्हनेस' (१९७३) या पुस्तकात आक्रमकपणाचे सखोल व बहुआयामी विश्लेषण केलं आहे.टिकून राहण्यासाठी, स्व-रक्षणार्थ,उपजत येतो तो 'सौम्य आक्रमकपणा' असतो.इतरांचा ताबा मिळवणे,त्यांचा छळ करण्यात आनंद घेणे,ह्या प्रवृत्तींमधून 'विध्वंसक आक्रमकपणा' निर्माण होतो.अशी मांडणी करीत फ्रॉम यांनी हिटलर, मुसोलिनी,हिमलर यांच्या वर्तनाचे सखोल व सूक्ष्म पातळीवर मनोविश्लेषण केले आहे. (ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मानवी चेहऱ्यावरचे ओरखडे दाखवले होते. ते पाहताना शाळेतील पत्र्याच्या पाटीवर ब्लेडने ओरखडल्यावर येणाऱ्या कर्कश आवाजाचा अथवा फुलपाखराला हातात पकडून त्याचे एकेक पंख छाटतानाच्या क्रौर्याचा भास होतो.) 'आत्मकेंद्रितता वा आत्मप्रेमामुळे आक्रमकता वाढीस लागते.कधीकधी एखादा समूहच आत्ममग्न होऊन इतरांना तुच्छ लेखत, त्यांच्याशी क्रूरपणे वागू लागतो.अशा समूहात सामील व्यक्तींना त्या सर्वश्रेष्ठ असल्याचे भास होऊ लागतात. त्यामुळे त्यांना हिंसक होताना वावगं न वाटता ते कर्तव्यच वाटू लागते.आक्रमक वृत्ती ही जैविक (बायॉलॉजिकल) नव्हे.(तसा सिद्धांत डेसमंड मॉरिस व आपल्याकडे विजय तेंडुलकर यांसारखे अनेक जण मांडत होते.) एकमेकांविषयी प्रेम व आदर,सहकार्य व साहचर्य हे नैसर्गिक आहे.त्यासाठी माणूस व निसर्ग यांना केंद्र मानून विकास करणारा समाज घडवला पाहिजे,'असं ते म्हणतात.

फ्रॉम यांच्या अखेरच्या काळातील लिखाणातून बौद्ध विचार अधिकाधिक येत गेले.कित्येक वेळा त्यांच्या मांडणीत जे.कृष्णमूर्तीचा भास होत असे.

'सर्व बंधनं व चौकटींच्या पलीकडे जाताना तूच तुझा दीप हो' हे त्याचे तात्पर्य होते. (शांती, करुणा, सहकार्य, एकवटलेपणाची भावना यांमुळे मेंदूत सकारात्मक व सुखावह बदल होतात, असे अलीकडील मेंदुशास्त्रातील अनेक संशोधनांत दिसून येत आहे.) 

'सायलेंट स्प्रिंगमुळे विश्वाचा समग्र विचार करण्यातून पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण झाली.'ही पृथ्वी केवळ माणसांचीच नाही,तर ती सर्व वनस्पती व प्राण्यांचीही आहे.आर्थिक विकासाच्या नादात हे भान ठेवलं पाहिजे.या जीवसृष्टीच्या साखळीमधील प्रत्येक कडी तेवढीच महत्त्वाची आहे.कुठलीही कड़ी तुटली, तर विश्वाची जैविक लय बिघडून जाईल.माणसाने निसर्गाला बाधा आणणारा विकास सुरू ठेवल्यास तो विनाशाकडे नेईल.' या विचारांना हळूहळू जग गंभीरपणे घेऊ लागले.'सायलेंट स्प्रिंग'मुळे जगाची विचार करण्याची रीत बदलून गेली.

विख्यात निसर्गवादी वृत्तपटकार सर डेव्हिड अ‍ॅटनबरो म्हणतात,'चार्ल्स डार्विन यांच्या 'ओरिजिन ऑफ स्पिसिज'नंतर वैज्ञानिक विश्वाला बदलून टाकणारं पुस्तक म्हणजे 'सायलेंट स्प्रिंग!'

१९८५ साली सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी शस्त्रस्पर्धा थांबवून अण्वस्त्र निकामी करण्यास सुरुवात केली आणि शीतयुद्धाच्या अंताचा आरंभ झाला.१९९१ला सोव्हिएत युनियनच कोसळल्यावर शीतयुद्ध समाप्त झाले,त्यानंतर मागील ३० वर्षांत निसर्गविनाशाचा वेग गेला.त्यासोबतच हवामानबदलाच्या समस्या वाढत गेल्या.अजूनही विविध कारणांनी फ्रॉम यांचे संदर्भ येतच राहतात.फ्रॉम यांनी माणसाला जीवसृष्टीविषयी असणाऱ्या उपजत प्रेमाला 'जीवाकर्षण (बायोफिलिया)' म्हटले होते.२०१९ मध्ये पर्यावरणाचे तत्त्वज्ञ प्रो.ग्लेन अलब्रेख्त यांनी जीवाकर्षण या संकल्पनेचा विस्तार केला.

अल्ब्रेख्त यांच्या मते,'माणसाला केवळ स्वतःच्या परिसराविषयीच नव्हे, तर सजीव-निर्जीवांसकट असलेल्या व्यापक विश्वाविषयीचा जिव्हाळा व आकर्षण असतं व ते वाढलं पाहिजे.' या समग्र विचाराला ते 'विश्वाकर्षण' (सोलीफिलिया) म्हणतात. तर अमेरिकी विचारवंत प्रो.मायकेल सँडल यांनी समुदायवादाची निकड सांगताना म्हटले आहे,"व्यक्तिवादामध्ये सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या व्यक्ती हीच केंद्रस्थानी असते. समुदायाची सांस्कृतिक व आर्थिक प्रगती झाल्यास व्यक्तींची आपसूकच होते व व्यक्तींचे आपापसांतील संबंधही सुधारतात.'पुढे कुमार केतकरांमुळे जे.कृष्णमूर्ती वाचत गेलो.'जीवनदृष्टी' ह्या पुस्तकातून ते अस्तित्व,प्रेम, आनंद,भय, दुःख यांविषयी मूलभूत प्रश्न विचारत हादरवून सोडतात.ते म्हणतात,

'आपल्याला निसर्गाकडे वा माणसांकडे निखळ पाहताच येत नाही.अनुभव वा ज्ञान यांमुळे आपण पूर्वग्रह तयार करतो आणि ते घेऊनच व्यक्ती वा प्रसंगांना सामोरे जातो. निसर्गात सर्व काही नित्य नव्याने व सहज होत असते.

तसे आपण प्रत्येक घटनेकडे कुठलाही आग्रह,पूर्वग्रह न ठेवता मोकळेपणाने पाहावे.प्रेमाने व कुतूहलाने पाहिल्यास आपल्याला साधेपणातील सौंदर्य दिसेल. आकाश,झाडं,पानं,फुलं,पक्षी यांतील रंग गंध,आकार, ध्वनी व स्पर्श यांतील सौंदर्य उमजून येईल.' सद्यः परिस्थितीविषयी ते सांगतात,'निसर्गाशी असलेलं नातं तुटताच मानवताही संपुष्टात येते.मग तुम्ही स्वतःच्या नफ्यासाठी वनस्पती असो वा प्राणी,सरोवर असो वा नदी,सर्वांची सर्रास हत्या करीत सुटता.तुमच्यामुळे भयग्रस्त झालेला निसर्ग स्वतःचे सौंदर्य आकसून घ्यायला लागतो.' बदलांसंबंधी त्यांना अनेक प्रश्न विचारले जात.ते म्हणत, विज्ञान ज्या वेगानं प्रगती करत आहे,त्या वेगानं माणसाचं मन प्रगत होत नाही.आता प्रत्येक व्यक्तीला स्वतः सोडून इतर कोणालातरी बदलावयाचं आहे; परंतु त्याने आधी स्वतःला बदललं पाहिजे,स्वतःची सफाई केली पाहिजे.'

याच काळात पं.कुमार गंधर्व यांचे गायन,मुलाखती, तसेच त्यांच्यावरील लेख यांतून एक विशाल दालन खुले होत गेले.कुमारजी म्हणत,'मी कधीही शाळेत न गेलेला एक जीव आहे;परंतु मी असं मानत आलोय,'की, येणारा प्रत्येक क्षण,प्रत्येक अनुभव हा मला काही शिकवण्यासाठीच आला आहे.'त्यांची श्रोत्यांबद्दल 'आपण कधीच समाधानी होता कामा नये.

तुम्ही लवकर तृप्त होता.'ही तक्रार असे.ते स्वतः कधीही तृप्त झाले नाहीत.ते सातत्याने जगाकडे नव्यानं पाहत गेले आणि नवनिर्मिती करीत गेले.म्हणूनच ते म्हणू शकले, 'आताचा राग आणि कुमार इथेच संपला.उद्याचा राग व कुमार वेगळा असेल.'

एकंदरीत व्यक्ती व समाज हे सुसंस्कृत व प्रगल्भ होत जावेत,याचसाठी फ्रॉम,कृष्णमूर्ती,विनोबा,कुमारजी यांचा अट्टाहास होता.ते त्यांच्या मंथनातील नवनीत, आपल्या हातात आयतेच ठेवत गेले.त्यांचे मार्ग वेगवेगळे असले,तरी त्यांच्या विचारांतील सूत्र मात्र सारखेच होते. त्याची अधूनमधून उजळणी करताना 'माझे मज कळो येती अवगुण' ही तुकोबांनी सांगितलेली अवस्था येत राहते.स्वतःतील अपूर्णता नेहमी अस्वस्थ करीत राहते. तरीही ह्या ज्ञानियांच्या सान्निध्यात राहून स्व-क्षमतेनुसार काही शिकण्याचा प्रयत्न सुरू ठेवायचा.

■■■ क्रमशः ■■■