* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: नरसंहाराची साक्षीदार / Witness to the genocide

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१६/२/२६

नरसंहाराची साक्षीदार / Witness to the genocide

१२.०२.२६ या लेखातील पुढील शेवटचा भाग…


त्या टॉयलेटला जातात.त्यांच्यापैकी मोठ्या मुली-बायकांची मासिक पाळी येते.इमॅक्युली लिहिते,'पार्दींनी बजावल्याप्रमाणे शेजारच्या संडासातून फ्लशचा आवाज आल्यावरच इकडेही फ्लश करायचं,हा नियम आम्ही कसोशीने पाळला,पण त्या काळात दुसरं कोणी टॉयलेटला बसलेलं पाहिल्याचं किंवा घाण वास आल्याचं मला आठवत नाही.एवढंच काय,आमच्या मासिक पाळ्याही येऊन गेल्या,पण पाद्रींकडे टिश्यू पेपरची मागणी करण्यापलीकडे त्याकडे आमचं लक्षही गेलं नाही.जिवंत राहण्याच्या आव्हानापुढे त्या सगळ्या गोष्टी क्षुल्लक होत्या.'


इमॅक्युलीच्या दृष्टीने सगळ्यात मोठं आव्हान असतं ते स्वतःच्या मनात घोंघावणारं वादळ शांत करण्याचं.अनेकदा पाद्री त्यांना बाहेर काय चालू आहे याची खबर देत असतात.त्या सगळ्या बातम्या एकीकडे सुन्न करणाऱ्या तर दुसरीकडे मन विखाराने भारून टाकणाऱ्या असतात.ती लिहिते, 'ज्यूंच्या वंशविच्छेदानंतर आता पुन्हा असं घडू द्यायचं नाही अशी प्रतिज्ञा साऱ्या जगाने केली आहे असं मला वाटत होतं; पण आता आम्ही सहाजणी काहीही कारण नसताना या बाथरूममध्ये मरणाची वाट पाहत थांबलो होतो.देव आम्हाला कशाची शिक्षा देत होता?'

अनेकदा तिचं मन हुतू-तुत्सींमधील या संघर्षांचा विचार करण्यात गुंतून जातं.आम्ही वर्षानुवर्षं एकत्र नांदत आलोय.एकमेकांशी लग्न केल्यामुळे आमचे जीन्सही आता एकमेकांत मिसळून गेले आहेत.

आमचे धर्म एक आहेत,आमची संस्कृती एक आहे;मग विद्वेषाचं नेमकं कारण तरी काय, हा सवाल राहून राहून तिच्या मनात येतो.


तर त्याउलट,तुत्सींना 'झुरळ, साप' अशा नावाने संबोधणाऱ्या आरोळ्यांमुळे कधी कधी इमॅक्युलीच्या मनातही संताप उफाळून येत असतो.कधी कधी तर तिला वाटतं,'माझ्याकडे एखादी मोठी मशिनगन आली तर मी सगळ्या हुतूंना संपवून टाकेन.' पण मन हुतूंचं असं बरं-वाईट चिंतू लागलं की पापभीरू आणि देवभक्त इमॅक्युलीला स्वतःची लाज वाटू लागते.'आपल्या मनात असे विचार येत असतील तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक तो काय राहिला? आणि मग आपण कोणत्या तोंडाने देवाकडे आपल्याला वाचवण्यासाठी प्रार्थना करायची ?' हे द्वंद्व तिच्या मनात सतत चालू असतं. हुतू जे करताहेत ते पाहता त्यांचा तिरस्कार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.आणि तसं करायचं तर आपल्याला देवाच्या दारी स्थान नाही.हा कलह सोडवण्यात तिची रोजची बरीच शक्ती खर्च होत असते


आपण करतोय ती प्रार्थना पोकळ आहे असं तिला वाटू लागतं.

असे अनेक दिवस जातात.अखेर एके दिवशी तासन् तासांच्या विचारानंतर तिला मार्ग सापडतो. तिला वाटतं,देवच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर देतोय. तो म्हणतोय, 'तुत्सी आणि हुतू दोघंही माझीच मुलं आहेत.मुलं चुका करतात.त्यांना त्यांची चूक कळेल.'येशू ख्रिस्ताचं ते प्रसिद्ध वाक्य आपल्या सर्वांनाच माहिती असतं : 'देवा, त्यांना माफ कर.ते काय करताहेत त्यांना कळत नाहीये.' पण ते स्वतःच्या अंतर्मनातून येण्यासाठी इमॅक्युलीसारखंच अग्निपरीक्षेतून जावं लागत असावं. हे वाक्य तिच्या मनात येतं आणि संघर्ष संपतो


त्यानंतरचा काळ कमी कठीण नसतो;पण किमान देवावरचा विश्वास,सातत्याने ओठावर असणारी प्रार्थना आणि जपाची माळ यांची सोबत इमॅक्युलीला असते.


मधल्या काळात मारेकरी पुन्हा एकदा पार्दींंच्या घरात पोहोचतात.

या वेळी ते थेट पाद्रींच्या बेडरूममध्ये,या सहाजणी असलेल्या बाथरूमजवळच येतात. त्यांच्याकडे अजूनही खात्मा न झालेल्या तुत्सींची यादी असते आणि त्यात इमॅक्युलीचं नाव असतं.ते घरात शिरतात तेच तिच्या नावाचा पुकारा करत. त्यातला एकजण ओरडत असतो, "इमॅक्युली... कुठे आहे ते झुरळ ? तिला मारलं की माझ्या नावावरचा आकडा ४०० होईल.कसा भारदस्त वाटतोय की नाही हा आकडा!" पुन्हा एकदा इमॅक्युलीच्या मनात येतं, 'आता आपण नक्कीच संपलो.' त्या क्षणी ती प्रार्थनेत इतकी व्यग्र असते, की आपण देवाच्या अतिशय जवळ आहोत असं तिला वाटत असतं.आता काही झालं तरी हरकत नाही, असा विचार करून ती मृत्यूला सामोरं जाण्याचं ठरवते; पण त्या मारेकऱ्यांना बाथरूम सापडत नाही. इमॅक्युली पुन्हा एकदा बचावते.


पण त्या दिवशी रात्री पाद्री त्यांना आणखी एक धक्कादायक बातमी देतात.त्यांचं म्हणणं असतं, "तुत्सींचं हत्याकांड इतक्या जोरकसपणे राबवलं जातंय की रवांडामध्ये बहुतेक तुम्हीच सहा तुत्सी जिवंत असाल." हा धक्का पचवण्यापलीकडचा असतो. 'याचा अर्थ आणखी कितीही दिवस लपून राहिलं तरी बाहेर आल्यावर आपण मरणारच.मग कशाला लपून रहा?' असा सवाल त्यांच्या मनात उठतो.दुसरा विचार असतो तो घरच्यांचा. 'म्हणजे आपले आई-वडील-भाऊ सगळे मारले गेले?' इतके दिवस इमॅक्युली या आशेवर जगत असते, की जशी मी लपून राहिले तसेच तेही कुठे तरी सुरक्षित असणार.आणखी काही दिवसांनी का होईना, आपली भेट होईल.पण या बातमीने त्या सगळ्या आशा चक्काचूर होतात.आता पुढे काय,हा प्रश्न तिला व्यापून राहतो.त्या दिवशी त्या साऱ्याजणी पार्दींना रेडिओ लावण्याची विनंती करतात.तिथे काही तरी बरी बातमी ऐकायला मिळेल असं त्यांना वाटत असतं; पण त्यांना ऐकू येतो तो एका मंत्र्याचा उन्मादी आवाज.तो रेडिओवरून हुतूंना आवाहन करत असतो,की 'जेवढे म्हणून तुत्सी आहेत त्या सगळ्यांना मारून टाका. वृद्ध-लहान मुलं-तान्ही बाळं,कुणालाही जिवंत ठेवू नका.कारण ते अस्तनीतले साप आहेत.बाळांना तुम्ही सोडून दिलंत तर उद्या मोठे होऊन ते तुमचा जीव घेतीलच.तुत्सींना मारणं हे तुमचं कर्तव्य आहे.' पाद्री सांगत असतात ते खरं असल्याचा पुरावाच त्यांना मिळतो.पण थोड्याच वेळात पाद्री बीबीसीच्या बातम्या लावतात. तिथे त्यांना रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंटम्हणजे तुत्सींच्या सैन्याची खबर ऐकायला मिळते.ते सैन्य आता रवांडाच्या राजधानीजवळ आलेलं असतं.

इमॅक्युली प्रार्थना करते,की लवकरात लवकर हे सैन्य सरकारचा ताबा घेऊ दे;अन्यथा,आपण वाचणं अशक्य आहे याची तिला खात्री वाटू लागलेली असते.


या सहाजणींना बाथरूममध्ये लपून महिना होऊन गेलेला असतो.अजूनही बाहेरचा हिंसाचार थांबायचं नाव घेत नसतो.

पाद्रींनी त्यांना लपवलेलं असलं तरी बाहेरच्या वातावरणाचा त्यांच्यावरही परिणाम होत असतोच.एके दिवशी ते येतात आणि इमॅक्युलीला म्हणतात, "तुझे वडील फार वाईट होते.ते आरपीएफला छुपी मदत करत होते.तुमच्या घरी ६०० बंदुका सापडल्या आहेत.हुतूंनी हात-पाय हलवले नसते तर तुम्ही आम्हाला मारूनच टाकलं असतंत." इमॅक्युली यावर विश्वास ठेवणं शक्यच नसतं.पण अशा अफवा पसरताहेत त्याअर्थी आपले वडील जिवंत नसणार हे तिला पुन्हा एकदा कळून चुकतं. शिवाय,

ज्याअर्थी पाद्री आपल्याशी या भाषेत बोलण्याचं धाडस करताहेत त्याअर्थी आपलेही फारसे दिवस राहिलेले नसणार याचीही जाणीव होते.कदाचित पाद्रींचा विचार आता बदलला असेल आणि तेच आपल्याला हुतूंच्या हवाली करणार असतील.एकदा ते म्हणतात,

"आता आणखी काही दिवस असंच सुरू राहिलं तर माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी अन्नही नसेल.मग मी काय करेन कुणाला माहिती!" पाद्रींकडे बंदुक असल्याचं इमॅक्युलीने पाहिलेलं असतं.

तेच आपल्याला मारून टाकणार नाहीत ना,असाही विचार तिच्या मनात येतो.एकदा ते त्यांच्याबरोबर प्रार्थना करतात आणि त्यांना सांगतात, "मी तुम्हाला किवू सरोवरातल्या बेटावर पाठवण्याचा विचार करतोय.तिथे तुम्हाला हबर्शीच्या बायका म्हणून राहावं लागेल.पण तिथे किमान तुम्ही जिवंत तरी राहाल." इमॅक्युलीला जाणवतं,की आपल्यासारखीच पाद्रींच्याही मनात विचारांची खळबळ माजलेली असणार.त्यामुळेच ते भलभलते विचार करताहेत. त्यामुळे ते प्रत्यक्ष तसं करणार नाहीत,या आशेवर इमॅक्युली प्रार्थना करत राहते.घडतंही तसंच.उलट, थोड्याच दिवसांत एक आनंदाची गोष्ट घडते.पाद्रींच्या दहा मुलांपैकी काही इमॅक्युलीचे मित्र असतात युद्धाला तोंड फुटल्यामुळे ते घरी परतलेले असतात. पाद्री त्यांना त्यांचं गुपित सांगायचं ठरवतात आणि एके रात्री त्यांची भेटही घडवून देतात.त्या दोघांनाही इमॅक्युलीला पाहून अतिशय आनंद होतो.तो आनंद पाहणंही इमॅक्युलीसाठी प्रचंड धीर देणारं असतं. सगळेच हुतू आपल्याला मारायला टपलेले नाहीत याची जाणीव सुखद असते.


मध्ये एकदा इमॅक्युलीला आणखी एक चांगली बातमी कळते.

शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशन्स आता रवांडामध्ये दाखल होणार आहे.तिला काय वाटतं कुणास ठाऊक,पण ती मनाने घेते,की हा नरसंहार थांबल्यावर पुन्हा नवं आयुष्य सुरू करायचं असेल तर त्यासाठी इंग्रजी शिकावं लागेल.

किन्यारवांडा या तिच्या मातृभाषेबरोबर तिला फक्त फ्रेंच येत असतं.पण ती पाद्रींच्या विनवण्या करून फ्रेंच इंग्रजी डिक्शनरी आणि काही इंग्रजी पुस्तकं बाथरूममध्ये मागवून घेते.तसंही जागेपणीचा प्रत्येक क्षण प्रार्थनेत घालवणाऱ्या इमॅक्युलीचं आजूबाजूला लक्ष नसतंच.आता प्रार्थनेतला थोडा वेळ कमी करून ती झपाटल्यासारखी डिक्शनरीवरून इंग्रजी शिकायला सुरुवात करते.महिन्याभरात तिला तोडकं-मोडकं का होईना,इंग्रजी वाचता-बोलता येऊ लागतं.


बाथरूममधल्या बंदिवासाला दोन महिने उलटल्यानंतर पाद्री आणखी दोन तुत्सी मुलींना त्या बाथरूममध्ये सोडतात.आधी सहाजणी मावणं अशक्य वाटत असतं, पण आता आणखी दोघीदेखील त्यात सामावून जातात. त्या दोघींकडून इमॅक्युलीला बाहेरची हालहवाल कळते. त्या कहाण्या न ऐकवणाऱ्या असतात.


त्या सांगतात, "हुतू लोक हातांत नंग्या तलवारी घेऊन फिरताहेत.ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही अशा हुतूंनाही प्राण गमवावे लागताहेत.कचऱ्याचे ढीग असावेत तसे रस्त्यांवर प्रेतांचे ढिगारे पडलेले आहेत.त्यांचं दफन करायलाही माणसं उरलेली नाहीत.'आपण आता कशासाठी जगायचं,हा विचार सगळ्यांनाच व्यापून टाकतो.इमॅक्युली लिहिते,'आपलं कुणीही उरलेलं नाही,

आता आपल्याला जगण्याची गरज नाही,हा विचार तुम्हाला खोल गर्तेत घेऊन जाणारा असतो.एकदा का जगण्याची इच्छा संपली की तुम्हाला कुणी वाचवू शकत नाही.


आम्हीही त्याच टोकावर होतो;पण कशी कोण जाणे माझ्या मनात मात्र जगण्याची इच्छा टिकून होती.ज्याअर्थी इतक्या हालअपेष्टा सहन करून मी वाचले आहे,त्याअर्थी मला जगवण्यामागे देवाचं काही तरी प्रयोजन असणार.मी जगायला हवं.' हा विचारच इमॅक्युलीला जगवतो.


पुढे तुत्सी बंडखोर युद्ध जिंकतात.बचावलेल्या तुत्सींची सुटका करण्यासाठी युनायटेड नेशन्स फ्रान्सचं सैन्य रवांडात पाठवतं.

हत्याकांडही काहीसं थंडावतं. ठिकठिकाणी फ्रेंच सैन्याचे कॅम्प लागतात.बचावलेल्या तुत्सींनी या कॅम्पमध्ये दाखल व्हावं असं आवाहन केलं जाऊ लागतं.अखेर तीन महिन्यांनंतर पाद्री मुरिन्झी इमॅक्युली आणि इतर बायका-पोरींना बाहेर काढतात. तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच त्यांना मोकळी हवा मिळते.मध्यरात्री लपून-छपून या आठजणी फ्रेंच कॅम्पमध्ये पोहोचतात.या कॅम्पमध्ये काही काळ काढल्यावर इमॅक्युली देशाच्या राजधानीत येऊन पोहोचते.या प्रवासात तिला दिसतात त्या फक्त विनाशाच्या खुणा...उद्ध्वस्त शहरं,

मेलेल्या माणसांचे खच,ती प्रेतं


लेफ्ट टु टेल: डिस्कव्हरिंग गॉड अमिस्ट द खांडन होलोकास्ट' हे इमॅक्युली इलिबागिझा हिने स्टीव्ह एर्विनसोबत लिहिलेलं पुस्तक अ‍ॅमेझॉन,इतर वेबसाइट्स तसंच अ‍ॅमेझॉन किंडलवर उपलब्ध आहे.इमॅक्युलीचं वास्तव्य सध्या अमेरिकेत आहे.


खाण्यासाठी उडालेली कुत्र्या-गिधाडांची झुंबड,त्यातून निर्माण झालेली रोगराई,कॅम्पमध्ये दाखल होणारी अनाथ मुलं-बायका आणि त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगांच्या अमानुष कहाण्या.त्यातल्या काही कहाण्या तिच्या घरच्यांच्याही असतात.आई-वडील आणि तिचे दोघं भाऊ असेच अमानुष पद्धतीने मारले गेलेले असतात.ओळखी पाळखीच्या लोकांकडून त्या तिच्यापर्यंत येऊन पोहोचतात.त्या तिला ऐकाव्याही लागतात.पण हे सगळं सहन करूनही इमॅक्युली उभी राहते.स्वतःच्या जगण्याचं प्रयोजन शोधण्याचा ती प्रयत्न करत राहते.


अखेर ते प्रयोजन तिला सापडतं आपण जगलोय ते आपली कहाणी, रवांडाची कहाणी जगाला सांगण्यासाठी. 'लेफ्ट टु टेल' हे पुस्तक लिहून तिने ते प्रयोजन पूर्ण केलंय.पुस्तकाच्या उपशीर्षकात म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट तिच्या दृष्टीने देवाचा साक्षात्कार होण्याची असली,तरी ती प्रत्येक वाचकाला वेगळा साक्षात्कार देऊ करते. नरसंहार थांबल्यावर इमॅक्युलीच्या आयुष्यात आणि रवांडामध्ये पुढे काय काय घडतं याची गोष्टही पुस्तकातून उलगडते.पण पुस्तक वाचून झाल्यावर मनात एक वाक्य रेंगाळत राहतं : ही कहाणी वाचल्यावर एखाद्या तरी व्यक्तीला वांशिक जातीय धार्मिक अस्मितेतला फोलपणा कळून येईल का?....समाप्त…!!