* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: चॅन्सेलर विस्मार्क Chancellor Wismarck

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

८/२/२६

चॅन्सेलर विस्मार्क Chancellor Wismarck

मॅझिनी व मार्क्स जगाची पुनर्रचना न्यायाच्या पायावर करण्यासाठी खटपट करीत असता जुन्या संप्रदायाचे राजकारणी व मुत्सद्दी आपापले राज्यकारभार स्वार्थाच्याच पायावर चालवत होते.ते मॅकिऑव्हिलियन तत्त्वावर निष्ठा ठेवून वागत होते.एकमेकांचे प्रदेश लुबाडू इच्छित होते.मुत्सद्देगिरीच्या फसवाफसवीने ते हळूच मुलूख चोरीत व मुत्सद्देगिरीने जमले नाही व फौजा तयार ठेवीत. ( प्रशियाचा प्रतिगामी चॅन्सेलर विस्मार्क,मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - सानेगुरुजी,मधुश्री पब्लिकेशन )


प्रिन्स ऑटो व्हॉन विस्मार्क हा एकोणिसाव्या शतकातील अत्यंत प्रतिगामी,फसवा व दुष्ट मुत्सद्दी होता.त्याची मूठ लोखंडाची होती.तो बळाचा उपासक होता.स्वतःच्या महत्त्वाकांक्षेच्या क्षितीजापलीकडे तो पाहत असे.तो म्हणे, "राजकारणात आपला फायदा असल्याशिवाय केवळ शेजाऱ्यासाठी आपण काही करीत नसतो." त्याने जर्मनीचे एकीकरण करून प्रशियन सम्राटाच्या सत्तेखाली जर्मनी देश दिला. विस्मार्कने लष्करी शक्ती उभारून कित्येक पिढ्यांची संस्कृती रक्ताच्या वादळात नष्ट केली.

वस्तुतः तो सतराव्या शतकात शोभणारा मुत्सही होता, पण तो चुकून एकोणिसाव्या शतकात जन्माला आला.


त्याचा बाप प्रशियन सैन्यातील रिटायर्ड कॅप्टन होता. शोनॉसेन येथे त्याची इस्टेट होती.तिची व्यवस्था बापाच्या मरणानंतर विस्मार्क स्वतः पाहू लागला. वयाच्या बत्तीसाव्या वर्षी म्हणजे १८४७ साली प्रशियातील पहिल्या असेंब्लीच्या निवडणुकीत तो स्वतःच्या जिल्ह्यातर्फे निवडून गेला.या काळात प्रगतीपर वारे सुटले होतेपण बिस्मार्कने असेंब्लीकडे केलेली सारी भाषणे प्रतिगामी होती.तो अनियंत्रित राजसत्तेच्या दैवी हक्कांचे समर्थन करीत होता.ख्रिश्चन स्टेटचे समर्थन करीत होता.त्या वेळी फ्रेडरिक वुइल्यम हा राजा होता. त्याचे लक्ष विस्मार्ककडे गेले व त्याने त्याला आपल्या नोकरीत घेतले.


१८४८मधले क्रांतिकारक बंड मोडणे हे त्याचे पहिले अधिकृत काम होय.पण या क्रांतीमुळे एक गोष्ट मात्र झाली व तिच्यासाठी तरी विस्मार्कने या क्रांतीस कृतज्ञ राहणे जरूर होते.ती म्हणजे ही की,या वेळेस जर्मनीचे राजकीय नसले तरी निदान आर्थिक एकीकरण झाले. वेल्स म्हणतो,जर्मनीचे भाग विस्कळीत होते.

हाताच्या पंजाची बोटे असतात,तशी जर्मन स्टेट्स होती. 


विस्मार्कने त्यांची एकजूट करून एकमूठ केली व ती मूठ वळून इतर देशांच्या तोंडावर ठोसे देण्यास विस्मार्क उभा राहिला.जर्मनीचे साम्राज्य निर्मावयासाठी त्याने जाणूनबुजून पद्धतशीर कारवाया सुरू केल्या.त्याला जर्मन साम्राज्यासाठी वाव पाहिजे होता.अगर त्याच्याच शब्दांत सांगायचे तर सूर्यप्रकाशातील महत्त्वाची जागा त्याला हवी होती.अर्थात,उष्ण कटिबंधातील वसाहती वगैरे पाहिजे होत्या.प्रशियाचा राजा जगातील सर्वश्रेष्ठ, सर्वसामर्थ्यसंपन्न व केवळ अनियंत्रित सर्वसत्ताधीश व्हावा,अशी त्याची मनीषा होती.


प्रथम आसपासचे लहान-लहान विस्कळीत प्रदेश घेऊन ते तो खुशाल आपल्या राज्यास जोडीत चालला. जर्मनीच्या उत्तरेस श्लेज्विग व होल्स्टेन हे प्रांत होते. या दोन प्रदेशांतील लोकवस्ती अंशतः डॅनिश व अंशतः जर्मन होती.या दोन्ही प्रदेशांवर डेन्मार्कच्या राजाची सत्ता होती.पण प्रशियाच्याच राजाची हुकमत या भागावर असली पाहिजे,असे विस्मार्कने ठरवले व तो डेन्मार्कशी युद्ध करावयास उभा राहिला.ऑस्ट्रियाचा सम्राटच अद्यापि संयुक्त जर्मनीचा अधिराजा मानला जात असे.श्लेज्विग व होल्स्टेन हे आपले गेलेले प्रांत परत मिळवण्यासाठी ऑस्ट्रियाची मदत घेऊन त्याने युद्ध पुकारले.ऑस्ट्रिया व प्रशिया यांच्या संयुक्त सेना डॅनिश हद्दीत शिरल्या.डॅनिश लोकांनी फ्रान्सचा राजा तिसरा नेपोलियन याच्याशी करार करण्याचा प्रयत्न केला.पण नेपोलियन निराळ्याच उद्योगात होता. 


अमेरिकेत या वेळी चाललेल्या यादवी युद्धात तो आपली बोटे घुसवू पाहत होता.अमेरिकेतील रिपब्लिकच्या जागी तो पुन्हा पूर्वीचे जुने फ्रेंच साम्राज्य स्थापू पाहत होता.त्याने आपले सैन्य व्हेरा क्रूझ येथे पाठवले.मेक्सिकन लोकांना तो ऑस्ट्रियन राजा नकोच होता.त्याला गोळी घालून ठार मारण्यात आले.तिसरा नेपोलियन युरोपियन शेजाऱ्यांच्या घाणेरड्या भांडणात हात घालण्याला पुन्हा मोकळा झाला.


पण या वेळेपावेतो,जर्मन व ऑस्ट्रियन फौजांनी डेन्मार्कच्या राजाजवळून श्लेज्विंग व होल्स्टेन प्रांत घेतले होते.ते दोन्ही प्रदेश जर्मनी व ऑस्ट्रिया यांच्या संयुक्त मालकीचे होते.पण ही मिळालेली सारी लूट केवळ जर्मनीसाठी राहावी अशी विस्मार्कची इच्छा होती.तसेच त्याला ऑस्ट्रियाचे अधिराज्यत्व नष्ट करून स्वतंत्र जर्मन साम्राज्य स्थापावयाचे होते म्हणून त्याने ऑस्ट्रियाशी काहीतरी भांडण उकरून काढले व संरक्षक युद्ध पुकारले.

वास्तविक प्रत्येक युद्ध दोन्ही बाजूंच्या भाडोत्री प्रचारकांकडून संरक्षकच दाखवण्यात येत असते.ऑस्ट्रियाचे सैन्य दोन शत्रू देशात कोंडण्यासाठी विस्मार्कने इटलीशी करार केला व मुत्सद्देगिरीने युरोपातील इतर राष्ट्रांस त्याने तटस्थ ठेवले. त्यासाठी त्याने कोणाला खोटी वचने दिली.कोणाला खोटे सांगितले,

कोणाची खुशामत केली,कोणाला दमदाटी केली,कोणाला धाक घातला आणि आपले व आपल्या राजाचे हित साधण्यासाठी मॅकिऑव्हिलियन कोडातील प्रत्येक मार्गाचा अवलंब केला.


ऑस्ट्रियाविरुद्ध पुकारलेले हे युद्ध पटकन संपले.दोनच महिन्यात प्रशियन फौजांनी ऑस्ट्रियन सैन्यास खडे चारले.ऑस्ट्रियाचा पूर्ण मोड झाला व युरोपच्या घोड्यावर विस्मार्क आरूढ झाला.त्याने उत्तर जर्मनीतील संस्थानांचे फेडरेशन करून ते प्रशियाच्या अधिराज्यत्वाखाली आणले.एवढे केल्यानंतर तो आपल्या चढाऊ धोरणाचे पुढचे पाऊल टाकावयास निघाला.प्रशियातील लष्करी अधिकारी  धर्माधिकाऱ्यांप्रमाणे सन्मानिले जाऊ लागले. विस्मार्कच्या संतत शस्त्रघाताने व त्याच्या अहर्निश चळवळीने जर्मनीभर लष्करामध्ये नोकरी करणे हे केवळ देशभक्तीचे नव्हे;तर पवित्र व धार्मिक कर्तव्य मानले जाऊ लागले. 


प्रशियन सेनापती व्हाँ मोल्टके हा विस्मार्कच्या हाताखाली होता.त्याने स्वतःच्या देशबांधवांना व इतर राष्ट्रांनाही शिकवले,की 'युद्ध ही जगाच्या रचेनेत ईश्वरनिर्दिष्ट अशी एक आवश्यक बाब आहे.' या वेळचे विस्मार्कचे चित्र पाहा.डोक्यावर मध्ययुगीन शिरस्त्राण, निष्ठुर दिसणारे डोळे,जाड पापण्या,जबड्याची मोठी हाडे,मोठ्या लष्करी मिशा यांमुळे तो जनू प्राचीन काळातला युद्धदेवच दिसतो! तो सर्वत्र लाल रक्ताळ मुठीचा कारभार सूरू करू पाहत होता.नवे जर्मन साम्राज्य नीट सुसंघटित व बलिष्ठ करण्यसाठी व वाढविण्यासाठी विस्मार्कने फ्रान्सची कुरापत काढली.पण एकटा विस्मार्कच युद्धप्रिय होता असे नव्हे, तर तिसऱ्या नेपोलियनलाही युद्धाची खुमखुमी होतीच,भांडणाला नेहमी दोघांची जरूरी असते.जर्मनीच्या वाढत्या शक्तीचा नेपोलियनला मत्सर वाटत होता.जर्मनीला चिरडून टाकणारा घाव घालावा अशी संधी नेपोलियन पाहत होता.त्याला विस्मार्कने संधी दिली व नेपोलियनने खरोखरच चिरडणारा घाव घातला.पण तो जर्मनीवर न पडता फ्रान्सवरच पडला व फ्रान्स कोलमडला.जर्मनी व फ्रान्स यांच्यात आर्थिक तशीच राजकीय स्पर्धा सुरू होती व युद्धाचे हेच मुख्य कारण होते.एक क्षुद्र असे तात्कालिक कारणही होते;पण तात्कालिक कारणे ही नेहमीच निमित्ते असतात.चढाऊ राष्ट्र पूर्ण तयारी करून युद्धास सज्ज झाले की ते युद्धासाठी काहीतरी निमित्त शोधीतच असते.


१८७० साली स्पॅनिश लोकांनी आपल्या व्यभिचारी राणीला हद्दपार करून लिओपोल्डला गादी दिली.लिओपोल्ड हा जर्मन राजाचा चुलतभाऊ होता.नेपोलियनला काही तरी कलहकारण हवेच होते.लिओपोल्ड स्पेनच्या गादीचा वारस व्हावा ही गोष्ट नेपोलियनला मान्य नव्हती. विस्मार्क युद्धोत्सुक होताच,तो म्हणाला, "लिओपोल्ड हाच योग्य वारस आहे." नेपोलियनने जर्मनीचा राजा वुईल्यम याला लिओपोल्डची वारसदारी रद्द करण्यास सांगितले तर विस्मार्कने "शक्य ते सर्व करून लिओपोल्ड राजा निवडला जाईल असे करा." असे आपल्या राजाला सांगितले.


जर्मनीचा राजा फारसा युद्धोत्सुक नव्हता.तो नेपोलियन व विस्मार्क या दोघांनाही संतुष्ट ठेवू पाहत होता. खाजगी रीतीने त्याने लिओपोल्डला स्पॅनिश गादीसाठी उमेदवार म्हणून उभे न राहण्यास सांगितले.पण त्याने जाहीररीत्या मात्र त्याच्यावर कोणत्याही रीतीने वजन आणले नाही.येथवर जर्मन राजा व फ्रेंच सम्राट दोघेही अत्यंत सभ्यतेने वागले.पण आता वीस्मार्कने सूत्रे हाती घेऊन युद्ध भडकेल असे केले.नेपोलियनच्या एका सभ्य पुत्राला वुइल्यम राजाने एक सभ्य भाषेतील उत्तर तयार करून ते त्याला देण्यासाठी विस्मार्ककडे धाडले. या वेळी विस्मार्क एम्स येथे औषधोपचार घेत होता.म्हणून ते उत्तर त्याने विस्मार्ककडे तारेने पाठवले होते.


पण विस्मार्कने त्यातील काही शब्द गाळून ते उत्तर अशा स्वरूपात प्रसिद्ध केले की,फ्रेंचांना जर्मन व जर्मनांना फ्रेंच डाकू वाटावेत.विस्मार्कचा हेतू सफल झाला व फ्रेंचांचे आणि जर्मनीचे युद्ध जुंपले.ते वस्तुतः अनावश्यक व संपूर्ण मूर्खपणाचे युद्ध होते. त्यात फ्रेंचांचा मोड झाला व नेपोलियन पदच्युत झाला.दोहो बाजूंचे हजारो लोक ठार झाले.फ्रेंचांनी रिपब्लिक जाहीर केले.विस्मार्कचा जय झाला.


उत्तरेकडची व दक्षिणेकडची संस्थाने एक करून जर्मन साम्राज्य स्थापण्यात आले.इल्यम राजा पहिला केसर (सीझर) वइल्यम झाला.विस्मार्कचे घोडे गंगेत न्हाले. त्याची कीर्ती शिगेला पोहोचली.त्याचे मनोरथ पूर्ण झाले. त्याच्या वैभवावर कळस चढला.फ्रान्सचे अल्सेस व लॉरेन हे प्रांत बळकावण्यात आले व १९१४च्या महायुद्धाचे बीजारोपण करण्यात आले. १८७०च्या द्वेषात व १८७१च्या तहात १९१४च्या महायुद्धाची बीजे होती.युरोपचे प्रभुत्व लाभल्यावर विस्मार्क वसाहतींकडे वळला.'वसाहतींचा विस्तार' या नवीन रूढ झालेल्या शब्दांचा अर्थ असा की, 'आशिया व आफ्रिका या खंडांतील दुबळ्या देशांना प्रबळ युरोपियन राष्ट्रांनी गुलाम करणे.पौर्वात्यांच्या या लुटमारीची विस्मार्कला - त्या लुटीच्या पुरस्कर्त्याला बिलकुल दिक्कत वाटत नसे. साऱ्या हयातीत त्याने आपले कुटुंब व आपला राजा यांपलीकडे कोणालाही व कधीही सहानुभूती दाखवली नाही.इंग्लिश ज्ञानकोशात प्रो.एरिक बँडेनवर्ग लिहितो,'मानवजातीसाठी विस्मार्कला काहीही वाटत नसे.' त्याला नैतिकदृष्ट मुळी नव्हतीच.स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी मानवांना तो प्यादी समजत असे. स्वतःचे हेतू पूर्ण करून घेण्यासाठी तो मानवांच्या आशांची राखरांगोळी करी.त्यांच्या प्राणांचे हत्याकांड मांडी. पण विस्मार्कने आपली कीर्ती पाहिली, तशीच ती नष्ट झालेलीही पाहण्याचे त्याच्या कपाळी आले! कैंसर दुसरा वुइल्यम याने राजा होताच विस्मार्कला रजा दिली.आपण त्या लोखंडी,पोलादी मदतीशिवायही मानवजातीची नीट लूटमार करण्यात समर्थ आहोत,असा आत्मविश्वास या नवीन तरुण राजाला वाटत असे.


एखाद्या जुनाट हत्याराप्रमाणे विस्मार्कला फेकून देण्यात आल्यामुळे तो सम्राटाविरुद्ध जाफळत होता व आपल्या दुर्दैवाला दोष देत होता.पण त्याचा क्रोध कर्मशून्य व विफल होता. २८ जुलै १८९८ रोजी मृत्यू येईतो तो गंजलेल्या हत्याराप्रमाणे पडून राहिला.

त्याला ब्याऐंशी वर्षे आयुष्य लाभले. रक्ताच्या पायावर त्याने जर्मन साम्राज्याची उभारणी केली.पण हे सामर्थ्यसंपन्न साम्राज्य पन्नासच वर्षांत पुन्हा रक्तसागरात बुडून गेले. तो अद्वितीय मुत्सद्दी होता;पण मुत्सद्देगिरीतील अगदी प्राथमिक धडाही तो शिकला नव्हता.

हा.धडा कोणता? युद्धप्रिय बनून जग जिंकण्यास निघणे,म्हणजे साम्राज्याच्या विनाशाचा खात्रीचा मार्ग.


हा लेख समाप्त…!!