१०.०२.२०२६ या लेखातील दुसरा भाग पुढे सुरू..!!
त्यानंतर जवळपास धावतच हे दोघं पाद्रींच्या घरी जाऊन पोहोचतात.गावातले अनेक हुतू नागरिक तिथे जमा झालेले असतात.पण त्या ओळखीच्या लोकांमध्ये आल्यावर सुरक्षित वाटण्याऐवजी त्यांच्या तिरस्काराने भरलेल्या नजरा पाहून इमॅक्युली समजून चुकते की आपण वाचणं अवघड आहे.ती पाद्रींना वडिलांचा निरोप सांगते आणि आपल्याला लपवण्याची विनंती करते. पाद्री तिला आतल्या खोलीत घेऊन जातात.तिथे आणखी काही तुत्सी बायका बसलेल्या असतात. त्यांच्यासोबत इमॅक्युली बसून राहते.अधांतरी.पुढे काय होणार याची वाट बघत.
घरी काय झालं असेल याचा अंदाज बांधत.थोड्या वेळाने तिचे दोन्ही भाऊ डॅमसीन आणि व्हिएन्ने पाद्रीच्या घरी दाखल होतात.
त्यांना पाहिल्यावर इमॅक्युलीच्या पोटात गोळा उभा राहतो. "आई-वडील कुठेयत?" डॅमसीन सांगतो,"आमची ताटातूट झाली.त्यांना पळून जावं लागलं. मोटरसायकलवर बसून ते गेले.निघताना त्यांनी आम्हाला तुझी चौकशी करायला सांगितलं.आता व्हिएन्ने तुझ्यापाशी थांबेल,पण मला जायला हवं." मग धाकट्या व्हिएन्नेकडे वळून तो त्याला बजावतो, "काहीही झालं तरी या घरातून बाहेर पडू नकोस आणि इमॅक्युलीलाही पडू देऊ नकोस.मी तुम्हाला घ्यायला परत येईन." एवढं बोलून डॅमसीन बाहेर पडतो.
आपण आपल्या लाडक्या भावाला शेवटचं पाहतो आहोत याची त्या वेळी इमॅक्युलीला कल्पनाही नसते.
संध्याकाळ होते,तसे पाद्रींच्या घरी जमलेले बाकीचे लोक पांगतात. थोड्या वेळाने पाद्री आत येतात आणि इमॅक्युलीला बाजूला बोलावून सांगतात,"तुम्हाला इथे लपवणं किती धोक्याचं आहे तुला कल्पना नाही.बाहेर इंटरहामवेच्या टोळ्या हातांत कोयते घेऊन खुले आम फिरताहेत.तुम्ही इथे आहात हे कळलं तर ते तुमच्याबरोबर मलाही खलास करायला मागेपुढे पाहणार नाहीत.
पण माझी सदसद्विवेकबुद्धी तुम्हाला बाहेर काढण्याचीही परवानगी देणार नाही.त्यामुळे तुम्हा बायका-पोरींना मी कसा तरी लपवेन;पण तुझ्या भावाला आणि त्याच्या हुतू मित्राला मात्र मी ठेवून घेणार नाही.त्यांना आत्ताच्या आत्ता इथून निघून जायला सांग." पाद्रींचे शब्द ऐकून इमॅक्युलीवर आभाळच कोसळतं. व्हिएन्ने तिचा धाकटा भाऊ असतो.त्याला बाहेर जायला सांगणं म्हणजे स्वतःच्या हाताने त्याला मृत्यूच्या दरीत ढकलणं. ते कसं शक्य आहे? ती पाद्रींच्या विनवण्या करते; पण त्याचा काहीही उपयोग होत नाही.
इमॅक्युली सुन्न बसून राहते. एक मन म्हणत असतं, 'आपणही भावाबरोबर बाहेर जावं.जे काही होईल ते होईल.स्वतःचा जीव वाचवून व्हिएत्रेला मरणाच्या दारात लोटण्याचा स्वार्थीपणा तरी करावा लागणार नाही.' दुसरं मन म्हणतं,"त्यांच्याबरोबर जाऊन आपण त्यांचा जीव वाचवू शकणार आहोत का? शिवाय,वडिलांनी आणि डॅमसीनने आपल्याला काही झालं तरी पार्दीच्या घराबाहेर न पडण्याची शपथ घातलीय,त्याचं काय?' तिचं मन एकदा एक ठरवतं,एकदा दुसरं.समोर सतत दृश्यं दिसत राहतात,'आपण व्हिएन्ने आणि त्याच्या मित्राला घराबाहेर काढलंय आणि बाहेर पडताक्षणी त्यांच्या शरीराच्या खांडोळ्या झाल्यायत.' तिची घालमेल खोलीतल्या इतर बायका बघत असतात.त्यात एक पन्नास वर्षांची बाई असते.इमॅक्युलीच्या आईच्याच वयाची.ती इमॅक्युलीला म्हणते, "ती पोरं आता लहान नाहीत.ती स्वतःची काळजी घेऊ शकतात.तू त्यांच्याबरोबर गेलीस तर उलट ती अडचणीत सापडतील.माझं ऐक.माझ्या मुलीलाही मी हाच सल्ला दिला असता."इमॅक्युलीला जाणवतं,की तिचं म्हणणं खरं आहे.
दुसरा पर्याय नाहीये.थोड्या वेळात पाद्री तिला मुलांच्या खोलीकडे घेऊन जातात. तिथे ही दोन तरुण पोरं शांत झोपलेली असतात. इमॅक्युलीचं मन पुन्हा एकदा हाय खातं.ती मनातल्या मनात आक्रंदन करते,पण पाद्री तिला पुढे ढकलतात. अखेर बधिर झालेल्या अवस्थेतच ती व्हिएन्नेला उठवते आणि त्याला म्हणते, "उठा.तुम्हाला दोघांना जायला हवं." व्हिएन्ने डोळे चोळत उठतो आणि तिला म्हणतो, "कुठे? मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही. आणि डॅमसीनचं काय? तो इथे परत येणारेय.त्याला सोडून मी कसा जाऊ?"
इमॅक्युली लिहिते,'व्हिएन्ने त्या वेळी माझी आणि भावाची काळजी करत होता आणि मी मात्र त्याला धोक्याकडे ढकलत होते.एखाद्या आईला आपलं तान्हं बाळ कोल्ह्यांच्या तोंडी देताना काय वाटेल तशाच वेदना मला होत होत्या;पण नाइलाजाने मी त्या दोघांना समजावून घराबाहेर काढलं.त्याची पाठमोरी आकृती बघताना माझ्या मनात आलं,आता मला माझं कुटुंब बहुतेक परत.कधीच भेटणार नाही..'इमॅक्युली आपल्या खोलीत परतते.सगळं घर शांत असतं.फक्त दुरून तुत्सींच्या किंकाळ्या आणि हुतूंच्या डरकाळ्या ऐकू येत असतात.थोड्याच वेळात पाद्री हातात छोटा टॉर्च घेऊन परततात आणि इमॅक्युलीसह त्या खोलीतल्या तुत्सी बायकांना आपल्या मागून येण्याची खूण करतात.
त्यांच्या बेडरूममध्ये मागच्या बाजूला एक चार फूट बाय तीन फुटांची छोटी,वापरात नसलेली बाथरूम असते. तिचं दार उघडून ते म्हणतात,"इथे तुम्हाला लपून राहायचं आहे."एवढ्या छोट्या जागेत सहाजणी कशा मावणार हे त्यांना कळत नाही.त्या साऱ्याजणी निःशब्द होऊन त्यांच्याकडे बघत राहतात.त्यांच्या चेहऱ्यांवरचे भाव ओळखून पाद्री म्हणतात,"ही जागा लहान आहे याची मला कल्पना आहे;पण आता इलाज नाही.बाकी सगळ्या जागा आमच्या घरातल्यांच्या वापरात आहेत. वेळ अशी आली आहे की मला माझ्या मुलांचाही भरवसा देता येत नाही.त्यामुळे लवकरात लवकर वातावरण निवळेल आणि तुम्हाला इथून बाहेर पडता येईल अशी प्रार्थना करा."
अर्थात या जागेत राहणंही कमी धोक्याचं नसतं.पाद्री त्यांना बऱ्याच सूचना करतात :"थोडाही आवाज करू नका.इंटरहामवेचे लोक आता घराबाहेर पाळत ठेवतील असं दिसतंय.टॉयलेटला जाऊ नका.अगदीच जावं लागलं तर शेजारच्या टॉयलेट फ्लशचा आवाज झाला की तेव्हाच तुम्हीही फ्लश करा.जराही आवाज बाहेर आला तर तुम्ही मेलात म्हणून समजा.तरीही तुम्ही कशा वाचणार हा प्रश्नच आहे.." शेवटचं वाक्य स्वतःशीच पुटपुटत पाद्री निघून जातात.खोलीत पूर्ण अंधार होतो. एकमेकांना खेटून त्या सहाजणी कशाबशा उभं राहण्याचा प्रयत्न करतात;पण आपल्या श्वासांची उष्णता आणि घामामुळे लवकरच आपल्याला चक्कर येणार असं त्यांना वाटू लागतं.काहीजणी बसण्याचा प्रयत्न करतात,पण सगळ्यांनी एकत्र हालचाल करण्याएवढी तिथे जागाच नसते.इमॅक्युली आणि इतर उंच बायका भिंतीला टेकून कशाबशा खाली बसतात आणि दोन छोट्या मुलींना स्वतःच्या मांडीवर बसवतात.पहाटेचे तीन वाजलेले असतात.आवाज केलात तर मारले जाल,ही पाद्रींनी घातलेली भीती त्यांना इतकी व्यापून असते,की त्या साऱ्याजणी निर्जीव वस्तूंचा ढिगारा असल्यासारख्या जराही हालचाल न करता बसून राहतात.इमॅक्युली डोळे घट्ट मिटून घेते आणि शांत होण्याचा प्रयत्न करत मनातल्या मनात प्रार्थना म्हणू लागते.तिथून पुढे देव हाच तिचा मित्र बनतो आणि प्रार्थना ही श्वासाइतकीच गरजेची क्रिया.
सकाळ होते,दिवस येतो आणि जातो,तरीही त्या तशाच बसलेल्या असतात.त्या अवस्थेत झोप लागणंही अशक्य असतं.एखादीला डुलकी लागलीच,तरी पायात आलेल्या क्रॅम्पमुळे किंवा शेजारचीचं ढोपर छातीत घुसल्यामुळे लगेच जाग येत राहते.दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी त्यांना पाद्री मुरिन्झींचा चढा आवाज ऐकू येतो : "मी कोणत्याही तुत्सींना घरात थारा दिलेला नाही.मी एक भला हुतू आहे.मी असलं काम कधीही करणार नाही. जे होते त्या सगळ्यांना मी परवा रात्रीच घराबाहेर हाकललं आहे." ते ऐकून इमॅक्युली आणि तिच्या सोबतिणींची शरीरं भीतीने गोठून जातात.आता कोणत्याही क्षणी बाथरूमचा दरवाजा उघडेल आणि आपण मारले जाऊ असं प्रत्येकीला वाटत असतं.ते सहन करण्याची शक्ती एकवटत त्या बसून राहतात.पण थोड्याच वेळात पाद्रींशी बोलणारा माणूस निघून गेल्याचं त्यांच्या लक्षात येतं.त्या सुटकेचा निःश्वास टाकतात - अर्थातच जराही आवाज न करता.
या वेळी तरी आपण बचावलो;पण आपल्या आई-वडिलांचं काय,आपल्या भावांचं काय ? त्यांचं काय झालं असेल? त्यांच्यातलं कोणी तरी वाचलं असेल का? बाहेर मोकाट मारेकरी फिरत असताना आपण आपल्या भावाला घराबाहेर काढलं.देव आपल्याला कधी तरी माफ करेल का? घरच्यांचा विचार मनात आल्यावर इमॅक्युलीच्या मनात पुन्हा भीतीची लाट पसरते.थोड्या वेळाने दार उघडतं.पाद्री काहीही न बोलता एका ताटलीतून उकडलेले थंड बटाटे आत सरकवतात.सगळ्या बायका-पोरी त्या थंडगार अन्नावर तुटून पडतात.गेले दोन दिवस त्यांना अन्न-पाण्याचा कणही मिळालेला नसतो.पाद्री त्यांना चमचे देण्यासाठी परत येतात,तोपर्यंत त्या अन्नाचा चट्टामट्टा झालेला असतो.पुढेही रोजच्या रोज जेवण ही त्यांच्यासाठी चैनच ठरते.घरी तुत्सींना लपवल्याचं पाद्रींनी आपल्या मुलांनाही सांगितलेलं नसल्यामुळे सगळ्यांच्या नजरा चुकवून उरलंसुरलं अन्न आणून देणं त्यांना रोज जमणं शक्यच नसतं.त्यामुळे कधी तरी दोन दिवसांतून एकदा, कधी कधी तर चार-चार दिवस त्यांना खायला-प्यायला मिळत नाही;पण जीव वाचतोय हेच नशीब,अशी स्थिती असल्यामुळे त्याबद्दल त्यांच्या मनात काही विचारही येत नाहीत.चार दिवस उलटल्यावर इमॅक्युलीच्या मनात विचार येतो,'बाहेर आल्यावर
मी माझ्या मैत्रिणींना आणि लोकांना मोठ्या अभिमानाने सांगेन मी काय काय सहन केलं तुम्हाला माहिती नाही. पाच अनोळखी बायका-मुलींसोबत मी चार दिवस एका छोट्याशा बाथरूममध्ये अडकून पडले होते.' स्वतःला हीरो मानून दिवास्वप्न पाहत असतानाच इमॅक्युलीचं मन तिला फटकारतं, 'तुझे आई-वडील-भाऊ बाहेर जिवाच्या आकांताने पळताहेत आणि तू स्वतःची पाठ थोपटून घेतेयस?'आपण सध्या तरी बचावलो आहोत याचा आनंद मानावा,आई-वडील-भावांपासून ताटातूट झाल्याचं दुःख करावं,ते सारे जिवंत आहेत की नाही याची भीती वाटून घ्यावी,आपण कोणत्या परिस्थितीत जगतो आहोत याची कीव करावी,की बाहेर इतके तुत्सी मारले जात असताना फक्त आपणच कसे काय वाचलो याचं आश्चर्य वाटून घ्यावं?... विचारांचे सगळेच फटकारे इमॅक्युलीला जखमी करणारे असतात.दिलासा एवढाच,की तिचा सर्वांत थोरला भाऊ परदेशी असल्यामुळे नक्कीच सुरक्षित असतो.आपल्यापैकी जो कोणी जगेल-वाचेल त्याला त्याची सोबत असेल,हेच काय ते समाधान.
या विचारात असतानाच बाहेरून प्रचंड गोंधळ ऐकू येतो.
इंटरहामर्वेच्या टोळीने पाद्रींच्या घराला घेरलेलं असतं.स्वतःचं भान हरपून ते तरुण आरडाओरडा करत असतात "तुत्सींना असतील तिथून शोधून काढा. जंगलात लपले असतील तर जंगलातून.
चर्चमध्ये लपले असतील तर तिथून.पृथ्वीवर एकही तुत्सी जिवंत राहता कामा नये.." बाथरूममधल्या खिडकीला लावलेल्या पडद्याला छोटं भोक असतं.त्यातून इमॅक्युलीला जे दृश्य दिसतं ते भयावह असतं.हुतू माणसं हातांत कोयते घेऊन नंगानाच करत असतात. 'मारून टाका,मारून टाका'च्या घोषणा सुरू असतात.
त्यातली किती तरी माणसं तिच्या ओळखीची असतात.किती तरी जणांसोबत ती लहानपणी एकत्र खेळलेली असते. किती तरी माणसं गावातले प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखली जात असतात;पण ते सगळे स्वतःची ओळख विसरून आता फक्त मारेकऱ्यांच्या भूमिकेत गेलेले असतात.जणू ही माणसं कुणी वेगळीच आहेत. त्यांच्यावर जणू हैवानाने कब्जा केलाय.
इमॅक्युली खाली बसते आणि प्रार्थना म्हणण्याचा प्रयत्न करते;पण प्रार्थनेतला एकही शब्द तिला आठवत नाही. भीतीचा आणि नैराश्याचा शरीरावर थेट परिणाम होऊ शकतो हे तिला पहिल्यांदा जाणवतं.शरीरात सळ्या खुपसल्यासारख्या वेदना होत असतात.
सैतान तिच्या मनाचा ताबा घेऊ लागतो.ती विचार करू लागते, 'देवाला हाक मारून काय उपयोग आहे? बाहेर कित्येक तुत्सी कुत्र्याच्या मौतीने मरताहेत.छोट्या बाळांना मारलं जातंय.
बायकांच्या पोटातल्या गर्भाना मारलं जातंय. त्यांना देव वाचवत नाहीये,मग तुलाच एकटीला कशाला वाचवेल तो ? आता तू वाचणं अशक्य आहे.ते जवळ आलेत.घराबाहेर येऊन पोहोचलेत.आता घरात येतील.. आता बाथरूमचं दार उघडेल.तुझ्यावर बलात्कार होईल. तुझे तुकडे तुकडे केले जातील..'
या विचारांचा लोंढा परतवण्याचा आटोकाट प्रयत्न करत इमॅक्युली डोळे झाकून बसून राहते.बाकी सगळं विसरून फक्त प्रार्थनेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते.स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करते,की आपण क्षुल्लक माणूस असलो तरी वाचणार आहोत.देव आपल्याला मदत करणार आहे.वडिलांनी निघण्याच्या क्षणी तिच्या हातात ठेवलेली जपाची माळ तिने घट्ट धरून ठेवलेली असते.जणू ती हातातून सुटली तर तिचा मृत्यू अटळ आहे.असा किती तरी वेळ निघून जातो. रात्री पाद्री दरवाजा उघडतात तेव्हा त्या साऱ्याजणी पूर्ण बधिरावस्थेत असलेल्या त्यांना दिसतात.त्यांच्या हाकाही त्यांना ऐकू येत नाहीत.शेवटी हलवून जागं केल्यावर त्यांची तंद्री भंगते.इमॅक्युली लिहिते, 'ते सात-आठ तास म्हणजे मला सात-आठ मिनिटं वाटली,इतकी मी प्रार्थना म्हणताना एकाग्र झाले होते.आणि तरीही त्या सात-आठ तासांत माझ्यातली शक्ती पूर्ण आटून गेली होती.माझ्या डोक्यातले सगळे वाईट विचार त्या काळात दबा धरून होते,पण त्यांना मी आत प्रवेश करू दिला नव्हता. माझ्या लक्षात आलं,की जगायचं असेल तर ती लढाई माझ्या मनातच लढली पाहिजे.भीती,नैराश्य,दुःख, असहायता या साऱ्या भावना मला खाऊन टाकण्यासाठी उत्सुक होत्या.त्यांचा विजय झाला असता तर मला कोणीच वाचवू शकलं नसतं.या लढाईत मला फक्त देव मदत करू शकत होता.'
आज मारेकरी गेले म्हणजे ते पुन्हा येणार नाहीत याची शाश्वती नसते.उलट,ते पाद्रींना बजावून गेलेले असतात, की 'आज आम्हाला तुम्ही लपवलेले तुत्सी सापडलेले नाहीत;पण आम्हाला खात्री आहे,तुम्ही त्यांना लपवलं आहे.आम्ही त्यांना शोधून काढल्याशिवाय राहणार नाही.' मारेकरी पुन्हा येतील,या कल्पनेनेही इमॅक्युलीचे हात-पाय गार पडतात;पण तिला अचानक एक कल्पना सुचते.ती पाद्रींना म्हणते, "तुमच्या खोलीतलं मोठं लाकडी कपाट तुम्ही या बाथरूमच्या समोर सरकवून घ्या.त्यांना दार दिसलंच नाही तर आम्ही सापडणंही शक्य नाही." सुरुवातीला त्यांना ते पटत नाही,पण इमॅक्युली आणि तिच्या सोबतिणींनी आर्जवं केल्यावर ते अखेरीस तयार होतात.
इमॅक्युली आणि इतर पाचजणी बाथरूममध्ये जातात तेव्हा त्यांना वाटत असतं,की एक-दोन दिवस आपल्याला इथे थांबावं लागेल.
फार फार तर दोन-चार दिवस.त्यापेक्षा जास्त काळ अशा ठिकाणी काढणं केवळ अशक्य आहे असंच त्यांना वाटत असतं.पण जसजसे दिवस जातात तसतसं इथून कधी बाहेर पडता येणार याबाबतची अनिश्चितता गडद होत जाते. कदाचित आपण कधीच बाहेर पडणार नाही,अशीही शंका त्यांच्या मनात येऊ लागते. इतके दिवस आत काढायचे म्हणजे निसर्गाच्या हाकेला ओ देणं भाग असतं… अपुरे शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!