* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: नरसंहाराची साक्षीदार / Witness to the genocide

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१०/२/२६

नरसंहाराची साक्षीदार / Witness to the genocide

इमॅक्युली इलिबागिझा…!!


▶ रवांडा.मध्य आफ्रिकेतला एक छोटासा देश. १९८० च्या दरम्यानचा काळ.या देशातल्या एका छोट्या खेड्यात शाळा भरली आहे.पाचवीतली मुलं आज पहिल्यांदाच या मोठ्या,माध्यमिक शाळेत आली आहेत. त्यातच एक आहे इमॅक्युली इलिबागिझा.

शिक्षक वर्गात येतात आणि शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी हजेरी घेऊ लागतात.


"वर्गात कोण कोण 'हुतू' आहेत ?"


काही मुलं-मुली हात वर करतात.


मग पुढचा प्रश्न येतो, "कोण कोण 'तुत्सी' आहेत?"


इतर काही मुलं-मुली हात वर करतात.


"कोणी 'त्वा' मंडळी आहेत का वर्गात ?"


एखाद-दुसरा हात वर येतो.


रवांडामध्ये १९९४मध्ये झालेल्या वांशिक विच्छेदामध्ये १०० दिवसांत तुत्सी जमातीतले आठ लाखांहून अधिक लोक मारले गेले. या नरसंहारातून बचावलेल्या एका तरुणीची कहाणी.


शिक्षक आपली कुत्सित नजर इमॅक्युलीवर रोखतात आणि म्हणतात,"मी हुतूंचं नाव घेतलं तेव्हा तू हात वर केला नाहीस.

तुत्सींचं नाव घेतलं तेव्हाही हात वर केला नाहीस.तू त्वा तर नक्कीच नाहीस. मग कुठल्या जमातीची आहेस तू?"


हे काय चाललंय हे न कळल्यामुळे दहा वर्षांची इमॅक्युली आधीच गोंधळलेली असते.आपण कोणत्या जमातीच्या आहोत हे तिला माहितीच नसतं.ती घाबरून म्हणते,"मला माहिती नाही सर." 'कुठल्या जमातीची आहेस हे कळल्याशिवाय परत वर्गात येऊ नकोस',असं सांगून शिक्षक तिला वर्गाबाहेर काढतात.


आपण कोणत्या जमातीचे आहोत,या प्रश्नाचं उत्तर माहिती असणं इतकं महत्त्वाचं का आहे हे इमॅक्युलीच्या समजेपलीकडचं असतं.पण पुढे हा प्रश्न तिचंच नव्हे,तर तिच्या देशाचं भविष्य उलटंपालट करणार असतो. १९९४ मध्ये सगळ्या जगाला हादरवून टाकणाऱ्या भीषण वंशविच्छेदाची ती नांदी असते. 


त्या वंशविच्छेदात होरपळून निघालेल्या इमॅक्युलीने लिहिलेलं 'लेफ्ट टु टेल : डिस्कव्हरिंग गॉड अमिस्ट द रवांडन होलोकास्ट' हे पुस्तक आपल्याला रवांडातल्या नागरिकांनी भोगलेल्या नरकयातनांची झलक दाखवतं.नाझींनी केलेला ज्यूंचा नरसंहार ही इतिहासातली गोष्ट झाली,आणि आता नव्या न्याय्य युगात अशा अमानुष घटना घडणं शक्य नाही, अशा भ्रमात जगणाऱ्या आपल्याला हे पुस्तक हादरवून सोडतं.आपल्या माणसांपासून तुटून मृत्यूच्या छायेत जगण्याची वेळ येते तेव्हा माणसांचं काय होतं याचाही अनुभव ते आपल्याला देतं.अनेक कारणांमुळे इमॅक्युली आणि तिचं रवांडा आपल्याला आपलं वाटू लागतं.


इमॅक्युली इलिबागिझा ही खाऊन-पिऊन सुखी आणि सुशिक्षित घरात जन्मलेली मुलगी.तीन भाऊ आणि आई-वडील असं प्रेमळ सुखी कुटुंब.आई-वडील दोघंही कष्टांतून शिकत वर आलेले.

शिक्षणाशिवाय गरिबी हटणं शक्य नाही याची जाण असणारे,

त्यामुळे आपल्या मुलांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे असं मानणारे. त्यांना आपल्या वागणुकीतून समानतेचं,प्रेमाचं तत्त्व शिकवणारे.सर्व माणसं समान आहेत आणि मुलांना लहानपणापासून भेदभावांबद्दल सांगून त्यांचं बालपण कलुषित करणं योग्य नाही असं मानणारे तुत्सी जमातीतले उदारमतवादी.

त्यामुळे वर्गात वांशिक हजेरी सुरू होईपर्यंत इमॅक्युली आणि तिच्या भावंडांना आपल्या देशात काय खदखदतं आहे याची कल्पनाही नसते.


इमॅक्युलीच्या आई-वडिलांनी खरं तर त्याआधीही वांशिक विद्वेषाशी सामना केलेला असतो.त्यांच्या डोळ्यांसमोरच रवांडात अनेक उलथापालथी सुरू असतात.जर्मन अधिपत्याखाली येण्याआधी रवांडामध्ये अल्पसंख्य तुत्सींची राजवट असते.त्यामुळे अर्थातच बहुसंख्य हुतूंना दुय्यम नागरिकत्व स्वीकारावं लागलेलं असतं.जर्मन आणि नंतर बेल्जियन या दोन्ही परकीय सत्ता तुत्सी आणि हुतूंमधील संघर्ष धुमसत ठेवतात. १९५९ मध्ये बेल्जियन स्वदेशी परततात तेव्हा तुत्सींची राजवट उलथवून हुतू स्वतःचं सरकार स्थापन करतात. तुर्सीविरोधी हिंसाचाराची लाट उसळते.

त्याचा फटका इमॅक्युलीच्या आई-वडिलांनाही बसतो.पुढे १९७३ मध्ये रवांडाच्या लष्करप्रमुखांनी सत्ता हस्तगत केल्यावर देशभर हिंसाचार उफाळून येतो.त्यात तर इमॅक्युलीचं घर जाळलं जातं.

सुदैवाने हे कुटुंब एका हुतू मित्राच्या घरी लपून राहतं आणि वातावरण निवळल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी घर बांधून राहू लागतं.या घटनेवेळी 


इमॅक्युली तीन वर्षांची असते.ती लिहिते,'त्या प्रसंगानंतर कधीही आई-वडिलांनी आमच्यासमोर त्या घटनेचा विषय काढला नाही की हुतूंविरोधात ते काही बोलले नाहीत.जणू ती आग म्हणजे चुकून झालेला अपघातच होता.त्यांच्या मते हुतू आणि तुत्सींमध्ये भेदभाव आणि द्वेष असण्याचं काहीही कारण नव्हतं.त्यामुळे माझे अनेक मित्र-मैत्रिणी,शेजारी हुतू होते आणि त्यांच्यासोबतच मी मोठी होत होते.'


पण इमॅक्युलीच्या आई-वडिलांनी कितीही रोखून धरलं तरी हे विद्वेषाचं लोण त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही.तो द्वेष दैनंदिन आयुष्यात दिसत नसतो.वरवर सगळं शांत असतं.हुतू आणि तुत्सी एकत्र वावरत असतात,पण..इमॅक्युलीला त्याचा पहिला फटका बसतो तो तिचं शालेय शिक्षण पूर्ण होताना.


इमॅक्युली अतिशय हुशार असते आणि अभ्यासूही. त्यामुळे शालान्त परीक्षेत उत्तम गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आपण सरकारी स्कॉलरशिप पटकावणार याची तिला खात्री असते.त्या काळी रवांडामध्ये खासगी शाळा भयकंर महाग असतात आणि त्यांचा दर्जाही वाईट असतो.दुसरीकडे, सरकारी कॉलेजमध्ये निवासी प्रवेशासाठी निवड होणं गरजेचं असतं;पण केवळ तुत्सी असल्यामुळे वर्गात दुसरा क्रमांक येऊनही इमॅक्युलीला सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही.तिच्या वडिलांना घरच्या गाई विकून तिच्यासाठी खासगी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो.ती दोन वर्ष इमॅक्युली कशीबशी त्या कॉलेजमध्ये काढते;पण नशिबाने पुन्हा एकदा सरकारी परीक्षेला बसण्याची संधी तिला मिळते आणि त्यात उत्तीर्ण होऊन तिला हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेशही मिळतो.आई-वडिलांच्या समजुतीवर शिक्कामोर्तब होतं. तुत्सी आणि हुतू हे भेदाभेद खरे नाहीत.दिवस पालटताहेत.आता वांशिक हिंसाचार मागे पडणार आहे..पण लवकरच वातावरण पुन्हा पालटतं. 


१९५९ च्या सत्तापालटावेळी युगांडामध्ये आश्रय घेतलेल्या तुत्सी नागरिकांनी रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंट (आरपीएफ) नावाचं दल स्थापन केलेलं असतं.हे दल सैन्याची जुळवाजुळव करून सीमेपाशी हल्ल्याची तयारी सुरू करतं तशी देशात अशांतता पसरते.हुतू पुन्हा एकदा तुत्सींकडे संशयाने बघू लागतात. पॅट्रिऑटिक फ्रंटने हल्ला केल्यावर तुत्सी सैनिक आणि नागरिक हुतूंना मारून टाकणार अशी भीती पसरू लागते-मुद्दाम पसरवलीही जाऊ लागते.रवांडातल्या हुतू सरकारचा अशा अफवांना पाठिंबाच असतो.एवढंच नव्हे,तर सरकारच्या आशीर्वादाने 'इंटरहामवे' हे समांतर सैन्यदल स्थापन होतं आणि तुत्सींविरोधी कारवायांना सुरुवात होते.विशेषतः देशाच्या उत्तर भागात,जिथे हुतूंचं बहुमत असतं,तिथे हा गट विशेष कार्यरत असतो.किरकोळ कारणांवरून तुत्सींवर हल्ले आणि तुत्सी मुली-बायकांवर बलात्काराचं सत्र सुरू होतं.१९९० मध्ये युद्धाला तोंड फुटतं. 


रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंट युगांडाच्या बाजूने देशावर हल्ला चढवतं.

देशातलं सरकार उलथवून टाकण्यासाठी आणि हुतूंचा नायनाट करण्यासाठीच तुत्सी बंडखोर येत असल्याचं हुतूंचं म्हणणं असतं,

तर सरकार उलथवणं हा हेतू नसून या निर्वासितांना पुन्हा मायदेशी परतायचं आहे,असा तुत्सींचा युक्तिवाद असतो.


दोन्ही गोष्टी आपापल्या जागी खऱ्याच असतात;आणि त्याहूनही खरं असतं ते देशभर पसरलेल्या हिंसाचाराचं आणि एकमेकांबद्दलच्या अविश्वासाचं वास्तव.या काळात इमॅक्युलीच्या वडिलांना तुत्सी बंडखोरांना छुपी मदत करत असल्याचा आरोप ठेवून अटक होते.त्यांचा हुतू मित्रच ही अटक घडवून आणतो. पुढे थोड्याच दिवसांत ते सुटतात; पण त्यानंतरही त्यांचा 'हुतू-तुत्सी भाई-भाई'चा नारा संपत नाही.पण अशा घडामोडींमुळे देशातली शांतता ढळते ती ढळतेच.


तिचा कडेलोट होतो १९९४ च्या एप्रिल महिन्यात. चोवीस वर्षांची इमॅक्युली त्या वेळी सुटीसाठी घरी आलेली असते.तिचा सर्वांत थोरला भाऊ उच्च शिक्षणासाठी परदेशी असतो पण बाकी सगळं कुटुंब मात्र घरीच असतं.इमॅक्युलीचे दोन्ही भाऊही सुटीसाठी घरी आलेले असतात.देशात अराजक माजलं असलं तरी इमॅक्युलीचे वडील मात्र आश्वस्त असतात.


एके दिवशी इमॅक्युलीचा भाऊ डॅमसीन घाबराघुबरा होऊन घरी येतो आणि वडिलांना सांगतो, की 'आपल्या गावातले हुतू हल्ल्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याकडे तातडीने खात्मा करण्यासाठीची यादी आहे आणि त्यात आपली नावं आहेत.

त्यामुळे आज रात्रीच आपल्याला इथून पळ काढायला पाहिजे.' इमॅक्युलीचं घर देशाच्या पश्चिम टोकाला किवू सरोवराच्या काठाशी असतं. बोटीतून हे सरोवर पार केलं की पल्याडच्या काठावर असतो झैरे (सध्याचा डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो) हा देश.रात्रीतून आपण बोटीने झैरेला जाऊ, अन्यथा आपण मारले जाऊ,असं डॅमसीनचं म्हणणं असतं.पण इतक्या अटीतटीच्या क्षणीही त्यांच्या वडिलांना वंशविद्वेषाची चाहूल लागत नाही,किंवा लागूनही त्यांचं उदारमतवादी मन ते मान्य करत नाही.'असल्या अफवांवर विश्वास ठेवून मी माझं घर,माझं गाव सोडून पळपुट्यासारखा पळणार नाही',असं ते जाहीर करतात आणि सुटकेचा शेवटचा मार्गही खुंटतो.


डॅमसीनने आणलेली बातमी ही अफवा नसल्याचं दुसऱ्याच दिवशी सिद्ध होतं.रात्री रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंटच्या हल्ल्यात रवांडाचे अध्यक्ष मारले जातात आणि हिंसाचाराला तोंड फुटतं.भल्या पहाटेच गावातली तुत्सी मंडळी घोळक्याने इमॅक्युलीच्या घराकडे चालत येऊ लागलेली त्यांना दिसतात.इमॅक्युलीचे वडील हे त्या भागातले प्रतिष्ठित आणि चळवळे असल्यामुळे त्यांनीच आता आपलं रक्षण करावं,असं त्यांचं म्हणणं असतं. तुत्सींच्या लोंढ्याबरोबच आणखीही काही आवाज इमॅक्युलीच्या कुटुंबाला ऐकू येऊ लागतात.त्या असतात डोळ्यांत रक्त उतरलेल्या 'इंटरहामवे' गटातील हुतूंच्या गर्जना.'हुतू पॉवर' अशा आरोळ्या ठोकत हे गट तुत्सींवर चालून येत असतात.दिवसभरात इमॅक्युलीच्या घराभोवती हजोरी तुत्सींचा जमाव जमा होतो.काही न खाता-पिता मुलाबाळांसकट ते त्या ठिकाणी ठाण मांडून बसतात.मरणासन्न प्राण्याभोवती गिधाडं जमावीत तसे हुतू त्यांना मारण्यासाठी चहुबाजूंनी फिरत असतात;पण तुत्सींची संख्या बरीच असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्याचा त्यांना धीर होत नाही.ते दृश्य पाहून इमॅक्युलीच्या वडिलांना पहिल्यांदाच वस्तुस्थितीची जाणीव होते;पण तोवर उशीर झालेला असतो एक दिवस आणि एक रात्र पार पडते. तुर्सीमधली तरुण मंडळी हुतूंना रोखण्याचं काम करत असतात;पण हे फार काळ शक्य नाही याची साऱ्यांनाच कल्पना येते.दुसऱ्या दिवशी इमॅक्युलीचा भाऊ आणि आई-वडील तिला जवळ बोलावतात आणि त्यांच्या गावातले पाद्री मुरिन्झी यांच्या घरी जाऊन लपायला सांगतात.त्यांना भीती असते ती तरुण इमॅक्युलीवर बलात्कार होण्याची.इमॅक्युली अर्थातच त्याला तयार होत नाही.जायचं तर आपण सगळ्यांनी,असं तिचं म्हणणं असतं;पण तिचे वडील तिला जवळपास हुकूमच सोडतात,की तिने तातडीने पाद्री मुरिन्झींच्या घरी जावं. हे पाद्री हुतू असले तरी ते उदारमतवादी असतात आणि इमॅक्युलीच्या वडिलांचे मित्रही.वडिलांच्या विरोधात बोलण्याची सवय नसल्याने इमॅक्युली सापडतील ते कपडे एका छोट्या सॅकमध्ये भरून मुरिन्झींच्या घरी जायला निघते.तिच्या सोबत असतो त्यांच्याकडे सुटीसाठी आलेला तिच्या धाकट्या भावाचा हुतू मित्र.(मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानिटकर,समकालीन प्रकाशन,पुणे) हे सगळं इतक्या झपाट्याने घडतं की आपण एखादं दुःस्वप्न तर पाहत नाही ना,असं इमॅक्युलीला वाटत असतं;पण चहुबाजूंनी ऐकू येणारा 'हुतू पॉवर'चा उन्माद तिला घडतंय ते सत्य असल्याची जाणीव करून देत असतो.आपण पाद्रींच्या घरी तरी सुखरूप पोहोचू की नाही अशी शंका तिला येऊ लागते.तसा धोका येतोच. अचानक हुतूंची एक टोळी हातांत कोयते घेऊन समोर येते.ती सारी पोरं इमॅक्युलीच्या गावात राहणारी,तिची तिच्या भावांची मित्रमंडळी असतात;पण आता त्यांच्या डोळ्यांतली ओळख पार पुसली जाऊन तिथे फक्त खून चढलेला तिला दिसतो.

आता आपण संपलो,असं वाटत असतानाच त्यांच्यातलाच एक मित्र समोर येतो आणि म्हणतो, "इमॅक्युली,तू इथे काय करते आहेस ? तुला दिसत नाही का इथे सगळ्यांची डोकी फिरली आहेत?" तो मित्र इतरांना तिला मारण्यापासून परावृत्त करतो आणि टोळीला पुढे पिटाळून घेऊन जातो.


राहिलेला शिल्लक भाग…पुढील लेखामध्ये…!!