* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: संयुक्त युरोपचे स्वप्न खेळवणारा इटालियन नेता मॅझिनी — Mazzini — The Italian Leader Who Dreamed of a United Europe.

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

9/19/26

संयुक्त युरोपचे स्वप्न खेळवणारा इटालियन नेता मॅझिनी — Mazzini — The Italian Leader Who Dreamed of a United Europe.

मूळ लेखक / पुस्तक / अनुवादक

मूळ लेखक: हेन्री थॉमस
पुस्तक: मानवजातीला कथा
अनुवादक: साने गुरुजी
प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन


भाग १ — मॅझिनीच्या स्वप्नाचा जन्म आणि विकास

आपणास या प्रकरणात एका उदात्त ध्येयाचा जन्म, त्याचा विकास व त्याचा नाश दिसणार आहे. कोणते हे ध्येय? कोणता हा महाविचार? युरोपातील राष्ट्रांनी एका कुटुंबातील भावांप्रमाणे गुण्यागोविंदाने राहावे, युरोपचे एक संयुक्त राष्ट्र बनवावे, हा तो विचार. ज्याच्या मोठ्या मनात हे महोच्च ध्येय जन्मले, त्या पुरुषाचे नाव गायसेघे मॅझिनी.

मॅझिनीची कारकीर्द समजण्यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील युरोपियन राजकारणाची सर्कस आपण थोडक्यात पाहू या. तिच्याकडे जरा डोकावू या.

१८१५ साली नेपोलियनचा पाडाव झाल्यावर व्हिएन्ना येथे युरोपातील राष्ट्रांचे शांतिप्रतिनिधी जमले होते. १९१४ सालच्या महायुद्धाच्या वेळी ज्याप्रमाणे शांतता-स्थापक मुत्सद्दी जमले व जखमी जगाला पुन्हा आपल्या पायांवर उभे करण्यास अटले, पण अयशस्वी झाले, तसेच व्हिएन्ना येथे शंभर वर्षांपूर्वी घडले.

व्हिएन्नाच्या काँग्रेसमध्ये प्रामाणिक पण प्रतिगामी मुत्सद्दी मेटरनिक होता, हुशार पण दुष्ट टॅलिरँड होता आणि मानवांवर मनातून प्रेम करणारा; पण प्रत्यक्ष व्यवहारात अनियंत्रित सत्ता गाजविण्याची चटक लागलेला, अर्धवट भला व अर्धवट बुरा, गूढवादी झार अलेक्झांडरही होता.

अलेक्झांडरची धार्मिक प्रेरणा तिथे प्रभावी होती. मेटरनिक व टॅलिरंड यांना व्यवहारबुद्धी अधिक होती. या तिघांच्या संमिश्र सूचनांनुसार तिथे जमलेल्या प्रतिनिधींनी एक शांततेचा करार केला. त्याला 'पवित्र करार' म्हणतात.

या पवित्र करारानुसार युरोपातील राष्ट्रांनी बायबलच्या पायावर मानवांचे बंधुत्व उभारण्याचे ठरवले. त्याचबरोबर, प्रबळ राष्ट्रांनी दुबळ्या राष्ट्रांचे स्वातंत्र्य दडपून टाकण्याचाही निश्चय केला.

युरोपातील सत्ताधाऱ्यांना जुलमाची सनदच मिळाली. ही सनद उद्घोषिताना काही हेतू उदात्त होते. पण पुष्कळसे मुत्सद्देगिरीचे, स्वार्थाचे व मूर्खपणाचे होते.

मेटरनिक, टॅलिरँड व अलेक्झांडर जगाला गुलाम करायला निघाले व त्या कामी त्यांनी पवित्र धर्मग्रंथांचा आधार घेतला. युरोपची विभागणी केली गेली. हावऱ्या साम्राज्यशाही लांडग्यांना युरोपचे तुकडे चारण्यात आले.

डच रिपब्लिक रूपांतर पुन्हा राजेशाहीत करण्यात आले. पोलंड रशियाला देण्यात आला. क्रांतिकारक वृत्तीचा सर्वत्र बीमोड करण्यात आला. स्पेनमध्ये पुन्हा इन्क्विझिशन व छळमंदिरे स्थापिली गेली.

गुप्त पोलिसांना लोकांच्या घरात जाऊन त्यांची भाषणे ऐकण्याची परवानगी देण्यात आली. लोकांची मोहोरबंद पत्रेही ते पाहत. उदार मताचा पुरस्कार करणारे विद्यार्थी वा प्राध्यापक यांना हद्दपार करण्यात येई किंवा कारागृहात कोंबण्यात येई.

आता राष्ट्राराष्ट्रांचे युद्ध नव्हते हे खरे; पण 'मानवजातीचा इतिहास' या पुस्तकाचा कर्ता हेंडिग व्हॅन लून लिहितो, 'युरोपातील ही शांतता केवळ स्मशानशांतता होती.'

पवित्र करार आपले अपवित्र वर्चस्व युरोपवरच नव्हे, तर अमेरिकेवरही गाजवू लागला. ज्या वेळी सायमन बोलिव्हरने वेनेइवालाचे स्वातंत्र्य जाहीर केले त्या वेळी दक्षिण अमेरिकेतील हे रिपब्लिक चिरडून टाकण्यासाठी पवित्र करारवाले उभे राहिले.

पण अमेरिकेचे अध्यक्ष मन्रो यांनी जाहीर केले की, "युरोपातील दोस्त आपली साम्राज्यशाही वृत्ती जर या बाजूला आणू पाहतील, तर अमेरिकेच्या शांततेस व सुरक्षिततेस ही गोष्ट धोक्याची आहे, असे आमचे मत आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या बाबतीत हे धोरण मैत्रीचे द्योतक नाही, असे वाटते."

पवित्र कराराच्या दोस्तांनी मन्रोच्या घोषणेचा नीट विचार केला व आपली दडपशाही युरोपातील अंसरक्षित राष्ट्रांपुरती ठेवली. पवित्र करारवाल्यांचा मुख्य हेतू अनियंत्रित सत्तेला जगात धोका असू नये हा होता.

'फोडा व झोडा' हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. 'युरोपचे उद्धारकर्ते', 'यूरोपला वाचवणारे' असे स्वतःलाच संबोधणारी युरोपची डाकू राष्ट्र सर्व युरोपला त्राही भगवान! करीत होती.

पण सर्वांहून अधिक त्रास कोणाला झाला असेल तर तो इटलीला. इटलीचे शतखंड करण्यात आले होते. ऑस्ट्रियन राजघराण्यातील अनेकांना हे तुकडे वाटून देण्यात आले होते.

पण पांगलेले पाणी ज्याप्रमाणे एका प्रवाहात येऊ पाहते, त्याप्रमाणे एकाच रक्ताचे इटालियन लोक जरी विखुरलेले होते, तरी ते अधिकच उत्साहाने व उत्कंठतेने एकत्र येऊ पाहत होते.

त्यांच्यावर जितका जितका अधिक जुलूम होई; जितकी-जितकी त्यांची पांगापांग करण्यात येई, तितकी तितकी त्यांच्या ऐक्यभावनेची तीव्रता अधिकाधिक प्रखर होई.

युरोपच्या व्यवहारी मुत्सद्द्यांना इटलीचे एकीकरण हे एक अशक्य स्वप्न वाटत होते, पण मॅझिनीला मात्र तसे वाटत नव्हते. त्याचे रक्त जणू प्रेषितांचे होते!

इटलीचे एकीकरण ही अतःपर एक कल्पना न राहता ती मॅझिनीचा धर्म झाली. त्यांच्या मनःचक्षूंसमोर केवळ इटलीचेच एकीकरण नव्हते, तर सारे जगच एका कुटुंबाप्रमाणे वागत असावे, असे ध्येय खेळत होते.

एकाच ईश्वराची पूजा करणारे, मोकळेपणाने एकत्र राहणारे व प्रेमस्वरूप परमेश्वराची उपासना करणारे एकत्र नांदत आहेत, असे तो आपल्या मनःसृष्टीत पाहत होता.

तो १८०५ साली जन्मला. वयाच्या बाराव्या वर्षीच तो राजकारणात रस घेऊ लागला. आईबरोबर जिनेव्हाच्या नव्या राजमार्गाने तो जात होता. एका क्रांतिकारक उठावात पराभूत झालेल्यांचा एक निराधार जथा त्याला भेटला.

ते निराधार क्रांतिकारक स्पेनमध्ये जाऊ इच्छित होते. त्यांना मदत हवी होती. मॅझिनी लिहितो, 'त्या दिवशी एक अस्पष्ट व संमिश्र विचार माझ्या मनात आला. तो माझ्या देशाबाबत होता की स्वातंत्र्याबाबत होता, हे मला सांगता येत नाही. पण त्या विचारात एवढा भाग होता की, इटालियनांनी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे व ते लढूही शकतील.

माझे आई-बाप लोकशाही तत्त्वांचे पुजारी होते. त्यांच्या शिकवणीत मी वाढलेला. नकळतच मी समानतेच्या भक्तगणांत सामील झालो होतो. मी समतेचा उपासक झालो होतो. माझे आईबाप उच्चनीच भेद मानीत नसत. ते रावांस व रंकास समान लेखीत. व्यक्ती कोणत्या वर्गाची हे ते पाहत नसत. ते व्यक्तीतील मानव्य व प्रामाणिकपणा पाहत.'

विद्यापीठात असताना तो विद्यार्थ्यांच्या खेळात फारसा सामील होत नसे. तो सदैव तन्मय व गंभीर असे व एकदम पोक्त झाल्याप्रमाणे दिसे. या वेळेस तो सदैव काळा पोशाख करी. आपल्या दुःखी देशासाठी तो जणू सुतकी होता!

त्याने आपल्याभोवती समविचाराचे स्नेही जमवले. जप्त झालेली पुस्तके तो चोरून आणी. ज्या गोष्टींची चर्चा करण्यासही परवानगी नसे, त्या गोष्टींची तो चर्चा करी.

परंतु अजून स्वातंत्र्याच्या बाबतीतील त्याची भक्ती तशीच त्याची उत्कटता शाब्दिक होती, चर्चात्मक होती, अॅकॅडमिक होती. अजून तो गटेसारखा वाङ्‌मयीन बंडखोरच होता, राजकीय बंडखोर झाला नव्हता.

त्याने एक जहाल व क्रांतिकारक पत्र सुरू केले. डान्टेवर त्याने एक नवविचारप्रवर्तक निबंध लिहिला. त्याने इटलीत वैचारिक क्रांती सुरू केली व बौद्धिक खळबळ माजवली.

पण तो आपल्या मायभूमीची दैना पाहून केवळ मनात हळहळणारा नव्हता. अन्याय व दुःख यांनी त्याच्या हृदयात खोल घर केले होते. अन्यायाविरुद्ध केवळ शब्दांची तलवार परजीतच राहणे त्याला शक्य नव्हते.

कोळसे जाळणारांची 'कार्बोनरी' नामक एक गुप्त संघटना होती. पदवीधर झाल्यावर तो तिचा सभासद झाला. त्या संस्थेचे सभासद ऑस्ट्रियाच्या जुलुमाविरुद्ध इटलीत क्रांती करण्याची खटपट करीत होते.

मॅझिनी फार दिवस या संस्थेचा सभासद राहिला नाही. संस्थेचे सभासद मूर्खपणाच्या गोष्टी बोलत. ते खऱ्या कामाविषयी फारसा विचार करीत नसत. देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मुख्य, पण तो जणू मागे पडला होता.

त्या संस्थेच्या नाना विधींत व समारंभांत त्याला गोडी वाटत नसे. त्यांनी आपल्या निरनिराळ्या चळवळीत सामील होण्यास मॅझिनीला बोलावले नाही.

१८३० साली त्याला संशयावरून पकडण्यात आले. जिनेव्हाचा गव्हर्नर लिहितो, 'तो बुद्धिमान तरुण होता. रात्री एकटेच फिरण्याची त्याला फार आवड होती. तो कशाचे चिंतन करी? तो आपल्या विचारांची दुसऱ्या कोणाला फारशी कल्पना देत नसे. सरकारला असे बुद्धिमान लोक फारसे आवडत नाहीत. ज्या बुद्धिमंतांचे विचार सरकारला समजत नाहीत, ते सरकारला नको असतात.'

मॅझिनी मानव जातीवर प्रेम करणारा होता. त्या प्रेमासाठी त्याला भोगाव्या लागलेल्या हालांचा हा आरंभ होता. या वेळेपासून पन्नास वर्षांपर्यंत मॅझिनीला कैद, हद्दपारी व इतर कष्ट सतत भोगावे लागले.

त्याला एका किल्ल्यात ठेवण्यात आले. तेथून समोर महासागर दिसे. महासागराचे भव्य दर्शन हा त्याला मोठा आधार होता.

तो लिहितो, 'मी जेव्हा जेव्हा गजांच्या खिडकीपाशी जाई, तेव्हा तेव्हा अनंत अंबर व अगाध सिंधू ही अनंततेची दोन प्रतीके सदैव माझ्या डोळ्यांसमोर असत. सृष्टीतील तिसरी भव्य व उदात्त वस्तू म्हणजे आल्प्स पर्वत. त्याचे दर्शन मात्र मला येथून होत नसे.'

त्याच्या शांत व निःस्तब्ध एकांतवासातील चिंतनाला येथे त्याला भरपूर वेळ होता. मुक्त अशा संयुक्त युरोपच्या योजनेचा त्याने येथे खूप विचार केला.

त्याच्या लक्षात आले की, या ध्येयासाठी 'कार्बोनरी' संस्था निरुपयोगी होती. त्याला या संस्थेतील गुप्तता व विधिसमारंभ मुळीच आवडत नसत. मुक्त होताच एक नवीन संस्था काढण्याचे त्याने ठरवले.

पोकळ बाह्य विधींपेक्षा प्रत्यक्ष क्रियात्मक चळवळींवर जोर देणाऱ्यांची ती संस्था व्हायची होती. 'तरुण इटली' असे तिचे नाव ठेवण्यात यावयाचे होते.

या संस्थेचे त्रिविध उद्देश होते — 'इटलीचे एकीकरण, इटलीत रिपब्लिकची स्थापना व सर्व युरोपचे युरोपातील सर्व स्वतंत्र व समान राष्ट्रांचे फेडरेशन करणे.'

१८३१ सालच्या फेब्रुवारीत तो मुक्त झाला. पण मुक्त होताच 'देश सोडून जा' असे त्याला बजावण्यात आले. तो फ्रान्समध्ये गेला.

पण तिथेही स्वातंत्र्यवीरांना थारा नव्हता, त्यांची जरुरी नव्हती, असे त्याला आढळून आले. त्याला फ्रान्समधून हाकलून देण्यात आले. तेथून तो स्वित्झर्लंडमध्ये गेला. त्याची आमरण क्लेशयात्रा सुरू झाली.

स्वित्झर्लंडमधून तो कॉर्सिकाला गेला. तिथे त्याने पवित्र कराराच्या संघाविरुद्ध बंड करण्याची खटपट केली.

तो स्वभावाने सौम्य होता. रक्तपाताने त्याच्या अंगावर काटा उभा राही. हिंसा त्याला तिरस्कारणीय वाटे.

'यंग इटली' या संस्थेच्या जाहीरनाम्यात तो लिहितो, 'मोठमोठ्या क्रांत्या बागनेटांपेक्षा तत्त्वांनीच अधिक यशस्वी होत असतात. अंध पाशवी बळाने विजयी वीर, हुतात्मे व ठार मरणारे मिळतील. पण अशा विजयातून पुढे जुलूमशाहीच उत्पन्न होते.'

पण गांधी ज्याप्रमाणे केवळ सत्याच्या व अहिंसेच्या शस्त्रांवर विसंबून होते, त्याप्रमाणे मॅझिनी नव्हता. अजिंक्य अशा ध्येयरूपी तलवारीवर सर्वस्वी विसंबून राहण्याइतका आत्मविश्वास अगर धीर मॅझिनीच्या ठायी नव्हता.

त्याने भौतिक शास्त्रांचा आधार घेतला व मग अधिक प्रभावी भौतिक शस्त्रांनी त्याचा पराजय केला. इटलीचे एकीकरण करण्यात त्याला यश आले. पण इटलीत रिपब्लिक येण्याऐवजी इटलीत संयुक्त इटलीत राजेशाही आली.

— भाग समाप्त — मॅझिनीच्या स्वप्नाचा जन्म आणि क्रांतिकारी प्रवास