* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: डार्विन : उत्क्रांतिवादापर्यंतची वाटचाल / Darwin: The Journey Towards the Theory of Evolution

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

9/3/26

डार्विन : उत्क्रांतिवादापर्यंतची वाटचाल / Darwin: The Journey Towards the Theory of Evolution

भाग ६ — उत्क्रांती

मूळ लेखक : अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे

मूळ पुस्तक : सजीव
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन


भाग १ : बीगलच्या सफरीपासून उत्क्रांतीच्या विचारापर्यंत

३८५ कोटी वर्षांपूर्वी कशाबशा तयार झालेल्या एका जिवापासून इतके कोट्यवधी जीवप्रकार आणि प्रत्यक्षात अब्जावधी सजीव प्राणी हे या पृथ्वीवर कसे निर्माण झाले याचं पूर्ण शास्त्रशुद्ध उत्तर दिलं ते डार्विननं.

डार्विनची चित्तरकथा सुरू होते ती त्याच्या आजोबांपासून. त्यांचं नाव होतं इरॅस्मस. ते स्वतः व्यवसायानं डॉक्टर असले तरीही ते शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, कवी हे सगळं असल्यानं त्यांना समाजात खूप मान होता. बलदंड देहयष्टी, भरपूर खाणं, ‘पिणं’ आणि बायका यांचे खास रसिक असल्यानं मग तर काय विचारता?

गंमत म्हणजे उत्क्रांतिवादाची तत्त्वं इरॅस्मसनं ‘द बोटॅनिकल गार्डन’ आणि ‘द टेंपल ऑफ नेचर’ या खंडकाव्यांतून यापूर्वीच सांगून ठेवली होती!

त्यांची पहिली बायको मेरी वयाच्या ३० व्या वर्षी अतिमद्यपानामुळे पाच मुलं मागे सोडून वारली. यातला तिसरा मुलगा रॉबर्ट याचा चार्ल्स हा मुलगा. मेरी वारल्यानंतर तर इरॅस्मसनं पुढची दहा वर्षं खूपच स्वैरपणानं काढली. मुलांना सांभाळायला ठेवलेल्या गव्हर्नेसपासून त्यांना दोन मुलं झाली. पन्नाशीला आल्यावर एलिझाबेथ नावाच्या एका तरुण श्रीमंत विधवेशी त्यांनी लग्न केलं. तिच्यापासूनही त्यांना एक मूल झालं. याशिवाय इतर ७ अनौरस मुलं झाली हा भाग वेगळाच! शेवटी हा ‘कारखाना’ बंद पडल्यावर त्यांनी रॉबर्टला आपली मेडिकल प्रॅक्टिस देऊन टाकली.

अशा या इरॅस्मसचा नातू चार्ल्स शाळेत असताना खूपच उडाणटप्पू होता. जुगार खेळणं, कुत्र्यांच्या मागे धावणं, उंदीर पकडून त्यांच्याशीच खेळत बसणं, घोड्यावरून जंगलात जाऊन शिकार करणं, असा टारगटपणा तो कायम शाळेला दांड्या मारून करे.

‘असंच करत राहिलास तर तू पूर्ण घराण्याला काळिमा फासणार आहेस,’ असंही रॉबर्टनं चार्ल्सला बजावलं होतं.

१८२२ साली चार्ल्सनं एडिंबरोला वैद्यकीय शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पण तिथं रक्त, हाडं, फाडलेली प्रेतं वगैरे बघून त्याला वैद्यकीय शिक्षणाची शिसारी आली. मग तो सगळाच वेळ उनाडपणा आणि उधळपट्टी करण्यात घालवतोय हे बघून वडिलांनी कपाळाला हात मारला आणि त्याला धर्मशास्त्राचा अभ्यास करायला केंब्रिज विद्यापीठात पाठवलं.

यावेळी त्याला अभ्यासात वनस्पतिशास्त्र, जीवशास्त्र, भूशास्त्र वगैरेही विषय होते आणि त्यात मात्र त्याला रुची निर्माण झाली. तिथं तो भुंगे पकडून त्यांचंच निरीक्षण करत बसे. जॉन स्टीव्हन हेन्सलो या वनस्पतिशास्त्रज्ञाच्या हाताखाली तो शिकला आणि १८३१ साली पदवीधरही झाला.

त्यानं अलेक्झांडर फॉन हंबोल्टची ब्राझीलच्या जंगलातली प्रवासवर्णनं वाचली होती. मग त्यालाही असाच प्रवास करायची खूप इच्छा झाली. केंब्रिजमधला ‘रामसे’ नावाचा शिक्षक त्याच्याबरोबर यायलाही तयार झाला. डार्विननं मग लगेच अॅडॅम सेजविक या भूशास्त्रज्ञाच्या मदतीनं भूशास्त्रातल्या मध्यवर्ती कल्पना वेल्समध्ये जाऊन समजून घेतल्या.

आता मोहिमेवर जाण्याच्या इराद्यानं डार्विन परतला, पण तेवढ्यात रामसे मरण पावला होता. डार्विनचा सगळा प्लॅनच उधळला गेला. मग आता करायचं काय?

याच वेळी ‘एच.एम.एस. बीगल’ नावाची बोट ही चिली, पेरू यांच्या किनारपट्टी, ‘इंडियन द्वीपसमूह’ वगैरेंचा अभ्यास करण्यासाठी आणि घड्याळं तपासण्यासाठी निघाली होती. या बोटीचा कॅप्टन होता रॉबर्ट फिटझॉय.

हा प्रवास खूपच लांबचा असल्यानं फिटझॉयला कुणीतरी एक जीवशास्त्रज्ञ आणि त्याहीपेक्षा रात्री जेवताना जरा चांगली कंपनी हवीच होती. त्यानं खरं तर पहिल्यांदा डार्विनचा गुरू हेन्सलो यालाच विचारलं, पण बायकापोरांना सोडून इतके दिवस जायला हेन्सलो काही तयार होईना. मग हेन्सलोनंच लिओनार्ड जेनिन्स या विद्यार्थ्याचं नाव सुचवलं. पण आयत्या वेळी त्यानं नकार दिल्यामुळे मग हेन्सलोनं सरतेशेवटी नाईलाज म्हणून डार्विनचं नाव सुचवलं.

डार्विन हे ऐकून खुश झाला. पण यात एक अडथळा होताच. डार्विनच्या वडिलांचा याला विरोध होता. ‘अशा सफरी खूपच धोकादायक असतात आणि शिवाय त्या धर्मगुरूंना शोभा देत नाहीत,’ असं त्यांना वाटे. डार्विननं या सफरीवर का जाऊ नये या कारणांची त्यांनी एक लांबलचक यादीही बनवली होती.

मग डार्विननं त्याच्या वडिलांचा मेहुणा वेजवूड याला गाठलं. आणि त्या दोघांनी वडिलांना पटवण्याचा प्रयत्न केला. शेवटी मनाविरुद्ध वडील तयार झाले. आणि मग त्यांनी त्याला त्या सफरीकरता थोडे पैसेही दिले. बहिणीनं मग डार्विनला काही शर्टस् घेऊन दिले.

आता फिटलॉयला भेटायला डार्विन लंडनच्या कोचमध्ये बसला. पण तेवढ्यात फिटझॉयनं दुसऱ्यालाच बरोबर नेण्याचा निर्णय घेतल्याचं डार्विनला समजलं आणि त्यामुळे डार्विनचा फारच भ्रमनिरास झाला.

पण तरीही फिटलॉय डार्विनला भेटला. या भेटीत हा प्रवास कसा भयानक, खडतर, एकाकी आणि भीषण असतो याचं वर्णन फिटझॉयनं डार्विनकडे केलं, पण डार्विन त्याच्याशी इतका अदबीनं वागला की शेवटी फिटझॉय त्याच्यावर फिदा झाला.

फिटझॉयनं डार्विनचं नाक बघून त्याला प्रथम बादच केलं होतं. फिटझॉय हा कमालीचा विक्षिप्त माणूस होता. ‘नाकावरून माणसाचा स्वभाव कळतो,’ असं त्याला वाटे. पण शेवटी डार्विननं कसंतरी करून फिटझॉयला गटवलं.

आणि हो, नाही करता करता २७ डिसेंबर १८३१ रोजी डार्विन त्या ‘बीगल’ बोटीवर चढला. विज्ञानाच्या इतिहासातला हा एक प्रचंड महत्त्वाचा क्षण ठरणार होता! पुढची पाच वर्षं डार्विन इंग्लंडचा किनारा बघणार नव्हता!

फिटलॉय आणि डार्विन एकाच केबिनमध्ये राहायचे. त्यांच्यात सतत भांडणं व्हायची. फिटझॉय हा पूर्णपणे धार्मिक होता आणि त्याचा बायबलवर विश्वास होता, तर डार्विनचा उत्क्रांतिवादावर विश्वास दृढ होत चालला होता. डार्विनचे विचार अर्थातच बायबलशी न जुळणारे होते. आणि पुढे तर डार्विननं आपले विचार ठामपणे मांडायला सुरुवात केली आणि फिटझॉय यांच्यात कायमचं वितुष्ट आलं.

या प्रवासादरम्यान फिटझॉयची तब्येत काही फारशी बरी नसायची, त्याला फिट्सचा त्रास होता. फिट आली की तो आक्रमक व्हायचा आणि मग तर कोणाचाही गळा दाबण्याचा प्रयत्न करेपर्यंत परिस्थिती व्हायची. त्यामुळे डार्विन आणि फिटझॉय यांच्या खोलीतून अनेकदा मारामाऱ्या, आरडाओरडा आणि किंकाळ्या असे आवाज यायचे.

इतक्या लांब पल्ल्याच्या कंटाळवाण्या समुद्रीप्रवासामध्ये मानसिक संतुलन बिघडणं हे साहजिकच होतं. पण निदान या सफरीत तरी फिटलॉयची मानसिकता आत्मघात करायची नव्हती!

पण १८६५ साली फिटझॉयनं दुसऱ्या एका सफरीदरम्यान स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली! फिटझॉयची ही दुसरी सफर होती.

पहिल्या सफरीत त्याची बोटच टिएरा डेल फ्युगो इथं स्थानिक आदिवासींनी पळवली होती. मग फिटझॉयनं त्यावेळी त्यांच्याबरोबर दोन हात करून त्यांच्यापैकीच तिघांना पळवून चक्क बोटीनं इंग्लंडला नेलं होतं आणि त्यांना सुधारवून, माणसाळवून परत आणून सोडण्याचा त्यावेळी त्यानं घाट घातला होता. ही ‘सुधारलेली’ मंडळीही फिटझॉय या सफरीत परत करण्यासाठी घेऊन निघाला होता. एकूण सगळं विचित्रच!

पण हे सोडलं तर मात्र डार्विनला या सफरीत खूपच अनुभवायला मिळालं. बीगलनं किनारा सोडल्यावर अनेक आठवडे कुठे जमीनच दिसेना. बोट मॅडेरा इथं आली, पण तिथल्या लाटा इतक्या अक्राळविक्राळ होत्या की फिटझॉयनं तिथं बोट थांबवलीच नाही.

मग पुन्हा बऱ्याच काळानंतर कॅनेरी बेटांपाशी बोट आली तेव्हा सगळ्यांना अनेक दिवसांनी जमीन पाहून बरं वाटलं. पण तिथं कॉलऱ्याची जोरदार साथ चालू असल्यामुळे फिटलॉयनं तिथूनही बोट पुढे नेली.

अशा अनेक बऱ्यावाईट अनुभवांतून डार्विनला जावं लागलं. चिलीतल्या भूकंपातून तो कसाबसा वाचला. ‘मोंटेव्हिडिओ’ इथे बोटीनं नांगर टाकला तेव्हा तिथं धुमश्चक्री चालली होती!

कित्येकदा किनाऱ्यावरच्या विचित्र लोकांचे वेगवेगळे अनुभव, मधूनच कित्येक मैल जंगल, नदी यातून घोड्यावरून प्रवास आणि असं बरंच काही.

‘मी झकासपैकी माझी ‘मॅटी’ पिऊन, सिगार ओढून, पानं आणि पिसं यांचा बिछाना करून आकाशाकडे बघत बघत झोपतो,’ असं त्यानं त्याच्या बहिणीला लिहिलेल्या पत्रातही म्हटलं होतं.

त्यानं त्याच वेळी डॉल्फिनची एक नवीन जातही शोधली आणि त्याला फिटझॉयवरून ‘डेल्फिनस फिट्झरॉय’ असं नावही ठेवलं. अँडेसमध्ये त्यानं जिऑलॉजीचा खूप अभ्यास केला. त्यानं चार्ल्स ल्येलचं ‘प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजी’ हे बरोबर घेतलंच होतं. तेही त्यानं प्रवासात वाचून काढलं.

पण दक्षिण अमेरिकेतून जाताना त्याला कुठलेसे कीटक चावल्यामुळे ‘छागाज डिसीज’ नावाचा रोग झाला होता! डिसेंबर १८३२ मध्ये फिटझॉयनं पूर्वी पकडलेले स्थानिक लोक टिएरा डेल फ्युगो इथं परत केले, पण तिथंही पुन्हा मारामाऱ्या झाल्याच!

या प्रवासात डार्विननं अनेक प्राणी, पक्षी यांची सॅम्पल्स, अनेक जीवाश्म (फॉसिल्स) वगैरे गोष्टी गोळा केल्या. त्यांच्याविषयी त्यानं बरीच खोलवर निरीक्षणं केली आणि ती लिहून ठेवली. त्याच्या पाच वह्या बनल्या.

डार्विननं गॅलापॅगॉस या बेटांच्या समूहावर जी निरीक्षणं केली त्यातूनच त्याची उत्क्रांतिवादाची थिअरी जन्माला आली. त्या बेटांवर फिंच नावाचे गाणारे पक्षी सापडतात. त्या पक्ष्यांचीही त्यानं बरीच सॅम्पल्स गोळा केली. हा सगळा पसारा अनेक क्रेट्स भरून झाला होता. तोही त्यानं इंग्लंडला परतताना आणला होता.

२ ऑक्टोबर १८३६ रोजी पाच वर्षांच्या भयानक, रोमांचकारी पण ‘इव्हेंटफुल’ सफरीनंतर बीगलनं इंग्लंडचा किनारा गाठला. त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. पण रात्री खूपच उशीर झाला होता. मग घरच्यांना मध्यरात्री कशाला उठवा, म्हणून तो एका खानावळीत राहिला आणि ४ ऑक्टोबरला घरी परतला.

आता आपले वडील आपल्यावर खूपच भडकतील असं डार्विनला वाटलं. पण वडिलांना जेव्हा डार्विननं काय काम केलंय हे समजलं तेव्हा ते खूश झाले आणि त्यांनी डार्विनला दरवर्षी ४०० पौंड देऊन संशोधन पुढे चालू ठेवायला सांगितलं!

भाग १ समाप्त —