मूळ लेखक : डॉ. रवींद्र श्रावस्ती
मूळ पुस्तक : आदिम दुःखाचे मुक्तिस्थानक हॉस्पिटल
प्रकाशक : नाग-नालंदा प्रकाशन
भारतीय स्त्री ही तशी एक भगभगती, चिघळती जखमच. वेदना भरपूर आणि जखमेवर फुंकर मारल्यावर जरासं खुशी-खुशी तसे सुख त्यांच्या वाटेला.
त्यांच्या सौंदर्यालाही टोचलेले असते भरपूर. कधी कानात, कधी नाकात सोन्याने, चांदीने नाही तर लोखंडाने टोचलेले असतेच. त्यानंतर त्यांचे सौंदर्य खुलून दिसते म्हणे. पुरुषी मीडियाने स्त्रियांच्या मनावर ते इतके बिंबवलेय की स्त्रिया स्वतःच स्वखुशीने तयार होतात, स्वतःच्या शरीराला छिद्र पाडायला. दोन्ही नाकपुड्या, मधला नाकाचा पडदा, कानाच्या दोन्ही पाळ्या, दोन्ही कानांच्या बाहेरच्या विविध भागांत विविध धातूंनी छिद्रे पाडून या भागांची 'शोभा' केलेली असते. एवढे टोचणे कमी की काय म्हणून गोंदून उर्फ टोचून टोचून नक्षीकाम हे केले जाते. कपाळावर, हनुवटीवर, छाती, पाठीवर, दंडावर, हातावर कुठे कुठे वेदनेला सुख, सौंदर्य या गोंडस नावांनी स्त्रियांना लहानपणापासूनच वर्णिले जाते, सांगितले जाते.
शरीराला बांधणारी आभूषणे वेगळीच. गळ्याभोवती हार, साखळी, बोरमाळ, माळ, हातात बांगड्या, बिल्वर, बोटात अंगठ्या, पायात तोडे, पैंजण, घागर, कमरेला कमरपट्टा, छल्ला. कधी कधी ही आभूषणे रुतून बसतात, निघत नाहीत. जणू ती शरीरालाच बांधून आहेत, जखडून आहेत. मोठ्या मुश्किलीने कापून काढावे लागते. त्यामुळे काप पडतात, क्वचित रक्त सांडते.
कमरेपर्यंत रुळणारे डोक्यावरचे केस. त्यालाही बुचडा, आंबाडा, वेणी, फुलांच्या माळा यांनी बांधले जातेच. पाठीवर मोकळे सोडलेले लांबलचक, काळेभोर केस स्त्रीसौंदर्याचे एक मानक, एक मानबिंदू. कवी थकत नाहीत त्या केसांवर लिहायला. कथा, कादंबरी यांची पानेच पाने भरली जातात केसांच्या वर्णनांनी. स्त्रियांनाही खुणावते त्यातले सौंदर्य. आयुष्याचा बराच काळ त्या घालवतात केसांची निगराणी करायला. अंघोळ करताना आधी केस धुवायचे, ते वाळवत बसायचे, वाटी वाटी तेल चोपडायचे, तासन्तास त्यावर कंगवा फिरवायचा, वेणी बांधायची, पुन्हा सोडायची. पुन्हा बांधायची, सोडायची. मनासारखी वेणी बांधेपर्यंत हेच करत राहायचे. उवा, लिखा काढायचा एक स्वतंत्र प्रोग्राम असतो. जेवढे दाट जंगल तेवढे प्राणी जास्त! याच उवा, लिखा क्वचित आजाराचे कारण ठरतात (खाजवायचे निमित्त ठरतात).
याच केसांत बुरशी वाढते आणि केस एकमेकांना चिकटून त्यांचा लगदा बनतो. या मुलीला किंवा स्त्रीला मग यल्लमाच्या देवीला सोडले जाते. जोगतिण म्हणून जग तिचा उपभोग घेते.
एकमेकांच्या झिंज्या (केस) पकडून भांडणाचा फड रंगविणाऱ्या स्त्रिया आपण बघतोच. तोंडाला बोचकारे ओढून प्रतिस्पर्धी बाईचे केस तोडून भांडण मिटते!
साडी व केस स्त्रियांचा जीव की प्राण!
माहेरची साडी! सासरची साडी! पहिली साडी! दुसरी साडी! भावानं, मित्रानं, प्रियकरानं किंवा नवऱ्यानं घेतलेली साडी! साडी! साडी साडी साडी साडी अन् साडी! चालता बोलता नेसता फेडता साडी साडी! साडी अन् साडी! बस्स, बस्स, साडी पुराण! स्त्रीचा जीव ज्या अनेक प्रिय गोष्टींत गुंततो त्यापैकी सर्वांत प्रिय म्हणजे साडीच. स्त्रीसौंदर्य खुलवणारे एक साधन म्हणजे साडी. साडी आवडणार नाही अशी भारतीय स्त्री विरळाच! साडीने भारतीय स्त्रीचे स्त्रीपण खुलते, सौंदर्य वाढते, हे खरंच. शतपटीनं खरंय. ही साडी व लांबसडक केस यामुळे भारतीय स्त्री जगाच्या पाठीवर वेगळीच उठून दिसते; हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की या दोन गोष्टींमुळे ती जास्त असुरक्षित झाली आहे.
एखाद्या ठग्याने, दुष्ट माणसाने स्त्रीच्या केसांना पकडले वा साडीला हात घातला तर तिचे सारे अवसानच गळून जाते, तिचा प्रतिकार दुबळा बनतो. साडीमुळे स्त्रीची चपळता संपते आणि दुष्ट माणसाच्या तावडीत ती अलगद सापडते. तिच्यावर त्यामुळे शारीरिक व लैंगिक अत्याचार सहजपणे केला जातो. भारतीय स्त्रीला शारीरिक, मानसिक वेदना देणाऱ्या गोष्टी साडी व लांब केस ह्याच आहेत. त्यासाठीच हे नमनालाच घडाभर तेल घातले।
जगातली कोणतीही स्त्री असू दे, रजोनिवृत्ती (Menopause) पूर्वी सर्वच स्त्रियांना प्रत्येक महिन्याला साधारण पाच ते सात दिवस मासिक पाळी या नैसर्गिक अडचणीला तोंड द्यावेच लागते. ती काही काळवेळ, सवड बघून येत नाही. तिच्या नैसर्गिक चक्रानेच येते. काही स्त्रियांना मासिक पाळीपूर्वी २-३ दिवस अगोदर डोकेदुखी, पोटदुखी, मानसिक अस्वस्थता, नैराश्य, मळमळ, उलटी आदी गोष्टींना तोंड द्यावे लागते. त्याला प्रिमेन्स्ट्रुअल टेन्शन म्हणतात. काही स्त्रियांना मासिक पाळीच्या दिवसांत ओटीपोटात प्रचंड दुखते, पाठीत दुखते. सारे शरीरच पिळवटून निघते. प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होतो, रक्ताच्या गाठी पडतात. अशक्तपणा, प्रचंड थकवा येतो, डिहायड्रेशन (निर्जलीकरण) होते. चिडचिडपणा, अस्वस्थता, नैराश्य वाढते. अन्नावरून वासना उडते. स्त्रिया अंथरुणाला खिळून राहतात (फुरसत मिळाली तर). या मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रियांना घरगुती कामे करावीच लागतात. त्यांना विश्रांती कोणी देत नाही. सदर स्त्री नोकरी करणारी असेल तर घरगुती कामाबरोबर नोकरीचीही कामे करावीच लागतात.
कल्पना करा, मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रीला हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेला ठेवले आहे. पुरुष वॉर्डात तिचा नातलग अॅडमिट आहे. पुरुष वॉर्डात (जनरल) स्त्रियांना स्वतंत्र सॅनिटरी ब्लॉक असतो? काय होत असेल अशा स्त्रीचे! शहारे येतात ना! तिचे 'हायजिन'चे काय होत असेल? तिथे तिला पाहिजे तेव्हा विश्रांती मिळत असेल? या शारीरिक अवघडलेपणात, अडचणीत, मानसिक ताणतणावात या स्त्रियांचे काय होत असेल?
एक वचन प्रसिद्ध आहे, स्त्रियांचे सौंदर्य बघावे आणि पुरुषांची मर्दानगी. स्त्रियांचा नाजूकपणा आणि पुरुषांचा आडदांडपणा बघावा असे म्हटले जाते. या सौंदर्यासंबंधीच्या अतिरेकी, एकांगी तत्त्वज्ञानामुळे स्त्रिया प्रायः नाजूक साजूकपणाच्या सोवळ्यात अडकतात. 'फिगर मेंटेन' करायला, झिरो फिगर मेंटेन करायला पाहिजेच्या नादात सकस आहार व व्यायामाकडे दुर्लक्ष केले जाते. भाऊ व नवरा रक्षण करतात (भाऊ रक्षण करतो म्हणून भाऊबीज व रक्षाबंधन साजरे करतात; नवऱ्याने रक्षण करावे म्हणून लग्न करतात) असा प्रचार असल्यामुळे स्वतःला त्या दुर्बलच (अबला) समजतात. कोणीतरी रक्षण-संरक्षण करतीलच्या नादात स्वतःचे स्वतःच संरक्षण करायचे असते हे त्या विसरून जातात आणि म्हणूनच त्या शारीरिक व लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. समाजात, घराच्या बाहेर त्या असुरक्षित आहेतच. पण स्वतःच्या घरातही त्या सुरक्षित नाहीत. लहान मुली, तरुण मुली एवढेच काय म्हाताऱ्या बायकांच्यावरही लैंगिक बलात्कार घडतात. हिंसा तर पाचवीलाच पुजलेली असते. त्यामुळे साध्या जखमेपासून फ्रॅक्चर होईपर्यंतच्या हिंसा त्यांच्याबाबतीत होताना दिसतात.
या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून Anxiety, Depression, Mood Disorders आदी मानसिक आजार स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.
भाग समाप्त