* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

5/7/26

तरुण मुलीची सत्यकथा / True story of a young girl

त्या रात्री ज्युलियनला गाढ झोप लागते. रात्रीतून किती किडे अंगावर वळवळले असतील, कोणते प्राणी आसपास फिरून गेले असतील याचा विचार करण्याचंही ती टाळते. बहुतेक अजूनही तिच्यावरच्या धक्क्याचा परिणाम पुरता ओसरलेला नसतो. सकाळी उठून ती पुन्हा चालू लागते. चालताना अनेकदा तिला धोकादायक किडे दिसत असतात. एके ठिकाणी पक्ष्याला गिळंकृत करू शकणारा एक मोठा विषारी कोळी तिला दिसतो. धोका वाटला तर माणसावरही हल्ला करणारा तो कोळी असतो. पण नशिबाने तो झऱ्याच्या दुसऱ्या बाजूला असतो. ज्युलियन आणि तो दोघंही एकमेकांकडे बघतात आणि आपापल्या दिशेने चालू लागतात.खूपदा ज्युलियनला आकाशातून विमानांचे आवाजही ऐकू येत असतात.

बचावकार्यासाठी घिरट्या घालणारं विमान असावं असं ती ताडते; पण झाडांच्या दाटीतून तिला विमान दिसणं शक्य नसतं, मग विमानातून ती दिसणं तर लांबच राहिलं. पण तरीही विमानाचा आवाज ऐकू आल्यावर ती खच्चून ओरडून घेते.

आपला आवाज या झाडांच्या टोकांपर्यंत पोहोचणंही शक्य नाही हे माहिती असूनही. कदाचित जसजसा हा झरा मोठा होत जाईल आणि त्याचं रूपांतर नदीत होईल तिथे कदाचित जंगलही कमी झालेलं असेल आणि विमानातून खालचा भाग दिसू शकेल. तोपर्यंत आपल्याला चालत राहण्याशिवाय पर्याय नाही, अशी खूणगाठ बांधून ज्युलियन चालत राहते.

पायपिटीचे पहिले दोन-तीन दिवस ज्युलियन जास्त विचार न करता यांत्रिकपणे चालत असते. अजूनही तिची बधिरावस्था पूर्ण संपलेली नसते. अधूनमधून तिच्या मनात आईचा विचार डोकावत असतो; पण आतापर्यंत नक्कीच आईची सुटका झाली असेल असं मानून ती सारे विचार मनातून बाजूला काढून टाकते. झऱ्याकाठाने चालत राहणं एवढंच आपलं सध्याचं काम आहे असं जणू या परिस्थितीने तिला सांगितलेलं असतं.

चौथा दिवस थोडा वेगळा उजाडतो. दुपारच्या वेळेस तिला एक कर्कश आवाज ऐकू येतो. तो ऐकून पहिल्यांदाच ज्युलियन भीतीने गोठून जाते. आवाजावरूनच ती ओळखते की हा भल्या मोठ्या गिधाडांचा आवाज आहे. एवढ्या जवळ गिधाडं आहेत याचा अर्थ कुठे तरी मोठ्या प्रमाणावर मांस आहे हे उघड असतं. तिच्या मनात येतं, या गिधाडांचं इथे येण्याचं कारण माझी आईच असेल तर ? थोड्याच वेळात तिला गिधाडांचं अन्न दिसू लागतं. विमानातल्या तीन आसनी खुर्चीवर तीन मृतदेह वेड्यावाकड्या अवस्थेत पडलेले असतात. जमिनीत घुसलेली तोंडं आणि आकाशाच्या दिशेने उंचावलेले पाय. त्या तिघांमधली एक बाई असते. ती आपली

आई तर नसेल ना, या विचाराने ज्युलियन सुन्न होऊन जाते. त्या ठिकाणाहून पळून जावं अशी इच्छा तिचा ताबा घेते, पण शहानिशा करण्याशिवाय पर्याय नसतो. जवळ जाऊन बघते तर तिला त्या बाईच्या पायाची रंगवलेली नखं दिसतात. ती सुटकेचा निःश्वास टाकते. आई कधीच नखं रंगवत नाही, हे तिला माहीत असतं. पण त्या दृश्यामुळे तिची बधिरावस्था थोडीशी कमी होते. आपल्या आईचं काय झालं असेल, हा विचार तिच्या मनाचा ताबा घेतो. आई सुखरूप असणार, असं स्वतःला बजावत ती चालत राहते.आता ज्युलियनकडच्या कँडीही संपलेल्या असतात. पावसाळा असल्यामुळे कुठल्याच झाडाला फळं नसतात.पामचा गर वगैरे खावा म्हटलं तर तो काढण्यासाठी तिच्याकडे सुरी नसते. जंगलातल्या बहुतेक गोष्टी विषारी असल्यामुळे कुठलाही धोका पत्करायला ती तयार नसते. त्यामुळे झऱ्यातलं माती मिसळलेलं गढूळ पाणी पिऊन पोट भरण्याशिवाय आता दुसरा पर्याय नसतो,पण जिथे मानवी वस्ती नाही तिथलं पाणी पिण्यात फारसा धोका नाही एवढं ज्युलियनला माहिती असते. बहुधा ते पाणी प्यायल्यामुळेच तिला भुकेचीही फारशी जाणीव होत नाही ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट.पण तिच्या शरीरातली ताकद मात्र झपाट्याने कमी व्हायला लागलेली असते.

पाचव्या किंवा सहाव्या दिवशी तिला एका ओळखीच्या पक्ष्याचा आवाज येतो.पाण्याच्या मोठ्या साठ्याजवळ आढळणाऱ्या या पक्ष्याचा तिच्या आईने सखोल अभ्यास केलेला असतो.

पाण्याजवळ आढळत असल्याने त्याच्या आसपास मानवी वस्तीही असू शकते,असं वाटून आपला एरवीचा बेफिकीर मूड बाजूला ठेवून ज्युलियन काहीशी आनंदित होते. अतिशय अवघड वाट चालत चालत अखेर ती अशा ठिकाणी येऊन पोहोचते की तिच्या झऱ्याने आता छोट्या नदीचं रूप घेतलेलं असतं.साधारण तीसेक फूट रुंद पात्र तिच्या समोर असतं.वर पाहते तर जंगलही काहीसं विरळ झालेलं असतं आणि आकाशाचा एक तुकडा तिला स्वच्छ दिसू लागतो.आता इथून वस्ती फार दूर नसणार असं तिला वाटून जातं.थोड्याच वेळाने तिला विमानांची घरघरही ऐकू येऊ लागते.

ती पुन्हा एकदा जोरजोरात ओरडून विमानांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते.आता आपण विमानातून नक्की दिसू असं तिला वाटत असतं.विमानांचे आवाज कमी कमी होत लांब निघून जातात तेव्हाही ती स्वतःची समजूत काढते, की आता थोड्याच वेळात विमान पुन्हा परतेल आणि आपली सुटका होईल.पण बराच काळ जाऊनही काहीच घडत नाही.अंधार पडू लागतो तसं तिचं मन निराशेने भरून येतं.आपण सोडून विमानातल्या इतर सगळ्या प्रवाशांची सुटका झाली असणार आणि आपण सापडत नसल्यामुळे आता शोधमोहीम थांबवण्यात आली असणार असं वाटून तिचा संताप संताप होतो.रागाचा भर ओसरल्यावर ज्युलियन थोडी शांत होते.

आपल्याकडे एवढ्या भावनिक आंदोलनांसाठी अजूनही इतकी शक्ती शिल्लक आहे याचं तिला आश्चर्य वाटत राहतं.याचा अर्थ अजूनही आपण आशा सोडता कामा नये. चालत राहिलो तर लवकरच एखाद्या वस्तीपाशी पोहोचू, हा विचार पुन्हा एकदा तिचा ताबा घेतो आणि पुन्हा एकदा पुढे मार्गक्रमण कसं करायचं याचा विचार करण्यात ती स्वतःचं मन गुंतवते.एकच सँडल घातलेल्या पायांनी काठावरून चालवणं अवघड जात असल्यामुळे ती नदीच्या पात्रातूनच चालायचं ठरवते.शिवाय जंगलामध्ये नदीच्या काठावर स्टिंग रे विश्रांती घेत बसलेले असतात याचीही तिला माहिती असते.अशा एखाद्या स्टिंग रेवर चुकून जरी पाय पडला तरी मृत्यू ओढवणार हे नक्की.त्यापेक्षा नदीतून चाललेलं बरं, असा विचार ती करते.अर्थात नदीच्या पाण्यातही धोके कमी नसतात.मगरींची भीती असते.शिवाय पिरान्हा नावाचे शिकारी मासेही या पाण्यात आढळण्याची शक्यता असतेच.पण हे प्राणी कारणाशिवाय माणसावर हल्ला करणार नाहीत हे ज्युलियनला माहिती असतं. शिवाय,

काहीही असलं तरी हे धोके पत्करून चालत राहण्याशिवाय तिच्यापुढे पर्याय काय असतो?एखादी चांगली जागा सापडली तर तिथेच थांबून राहावं आणि सुटकेसाठी कोणी येईल याची वाट पाहावी का,असंही तिच्या मनात एक-दोनदा येऊन जातं.पण आता थांबलो आणि आणखी चार दिवसांनी पुन्हा चालण्याची वेळ आली तर तेवढी शक्ती आपल्याकडे उरणार नाही आणि आपण या जंगलातच संपून जाऊ याची जाणीव तिला पुढे रेटत असते.चालत राहिलो तर आपण एक ना एक दिवस मानवी वस्तीपर्यंत किंवा सुटकेसाठी शोधमोहीम राबवणाऱ्यांपर्यंत पोहोचू,असा विश्वास तिला मनातून वाटत असतो.एक चांगलं असतं,की मनातून तशी शंका असली तरी आता लवकरच शोधमोहीम थांबवली जाणार असल्याचं ज्युलियनला कळण्याची काही शक्यता नसते.तिला हेदेखील कळण्याची शक्यता नसते की विमानातील एकाही व्यक्तीची सुटका झालेली नसते.किंवा,तेव्हा तिला याचीही कल्पना आलेली नसते की विमान पडल्यानंतर सर्वच प्रवाशांना लगेच मृत्यू आलेला नसतो.काही प्रवासी काही काळ जिवंत असतात;पण तिथून बाहेर पडून स्वतःची सुटका करून घेण्याचं ज्युलियनसारखं भाग्य त्यांना लाभत नाही.त्या प्रवाशांमध्ये तिच्या आईचाही समावेश असतो.पुढे तिला जेव्हा हे समजतं तेव्हा आईचं त्या काळात काय झालं

असेल या विचाराने ती किती तरी रात्री तळमळत काढते.जंगलात असताना झाला नसेल एवढा त्रास तिला पुन्हा बाहेरच्या जगात येऊन या सत्याशी सामना करताना होतो.एका अर्थाने तिचा जगण्याचा झगडा सुरू होतो तो तिथून बाहेर पडल्यावरच.

पण सध्या आत जंगलात मात्र सर्व बातम्यांपासून दूर ती स्वतःच्या विचारांमध्ये चालत असते;पण पहिल्या तीन-चार दिवसांनंतर मात्र चालणं आणि रात्रीची झोप या दोन्ही गोष्टी अधिकाधिक त्रासदायक बनत जातात. रात्र तर अतिशय वेदनादायी असते.डास किंवा कोणते ना कोणते किडे रात्री तिच्या जवळपास उघड्या अंगावर चाल करून येत असतात.थोडी डुलकी लागते ना लागते तोच नवा दंश तिला जागं करत असतो.

चिलटं,माश्या, पिसवा आणि अशा हजारो प्रकारच्या किड्यांची संख्या इतकी असते की बास.ते किडे तिच्या तोंडात,नाकात, डोळ्यांत,कानांत सगळीकडे शिरून चावे घेत असतात. हे कमी की काय,म्हणून कधी तरी रात्रीतूनच पाऊस सुरू होतो.दिवसाच्या वेळी जंगलातली हवा दमट आणि उष्ण असली तरी रात्री पाऊस सुरू झाल्यावर मात्र कडाक्याची थंडी वाजते.पावसाचे थेंब सुया टोचल्यासारखे ज्युलियनच्या अंगात घुसत असतात. छोट्याशा ड्रेसमध्ये चिंब भिजून आता आणखी थंडी सहन होणं शक्य नाही अशा परिस्थितीत ज्युलियन रात्रच्या रात्र कुडकुडत काढते.

अशा वेळी बहुतेकदा ज्युलियन आपल्या आईचा विचार करत प्रार्थना करत राहते.हा अपघात कसा काय झाला, आपण उठलो तेव्हा एकट्याच कशा काय होतो,बाकीचे प्रवासी कुठे गेले,आई कुठे असेल,विमानाचे अवशेष कुठे पडले असतील,असे कोड्यात टाकणारे प्रश्न तिच्या मनाला व्यापून असतात.एवढ्या उंचीवरून पडल्यावरही आपण कसे काय वाचलो,हा प्रश्न तर अनेकदा तिच्या मनात उचंबळून येत असतो.

ज्याअर्थी आपण १० हजार फुटांवरून कोसळूनही वाचलो त्याअर्थी आता आपण या जंगलात मरून जाणं शक्य नाही. आपण जिवंत राहिलो त्यामागे काही तरी कारण असणार,

असं तिला सतत वाटू लागतं.चालता चालता,रात्र मुक्कामाच्या ठिकाणी थांबल्यावर ती खूप वेळ हा विचार करत राहते.आपण का जिवंत राहिलो?आपल्या आयुष्याचा हेतू काय? त्यातून आजवर कधीच न पडलेले प्रश्न तिला पडू लागतात.आपल्या आई-वडिलांप्रमाणे आपणही जीवशास्त्राचा अभ्यास करायचा हे आधीपासूनच ठरलेलं असतं,पण त्यामागच्या कारणांचा फारसा विचार मात्र तिने केलेला नसतो.पण आता स्वतःचा संवाद करायला वेळच वेळ असण्याच्या काळात हा विचार तिचं मन व्यापून टाकतो.ज्या जंगलातून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते त्याच जंगलाच्या अभ्यासासाठी,तिथल्या पक्ष्या-प्राण्यांच्या अभ्यासासाठी आपण आयुष्यभर काम करायला हवं…!

अपूर्ण शेवटचा तिसरा भाग पुढील लेखामध्ये…!!



5/5/26

तरुण मुलीची सत्यकथा / True story of a young girl

जिवावरच्या संकटातून स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडण्याचा अनुभव माणसांना कायमचा बदलवून टाकतो.विमान कोसळल्यानंतर अ‍ॅमेझॉनच्या जंगलात दहा दिवस एकटीने पायपीट करणाऱ्या ज्युलियन कोपेक या तरुण मुलीची सत्यकथा अशा प्रसंगी मनात घडणाऱ्या उलथापालथर्थीची कहाणी सांगते.

२४ डिसेंबर १९७१.पेरूची राजधानी लिमाचा विमानतळ भरून वाहतो आहे.ख्रिसमसच्या आधीचा दिवस असल्यामुळे प्रत्येकालाच आपापल्या कुटुंबीयांजवळ पोहोचण्याची घाई आहे.सतरा वर्षांची ज्युलियन कोपेक आणि तिची आई मारिया या दोघी त्यात आहेत.ज्युलियनच्या आई-वडिलांचं पेरूच्या अमेझॉन जंगलात पुकाल्पा गावाजवळ संशोधन केंद्र आहे.तिचे वडील सध्या तिथेच आहेत.आदल्या दिवशी ज्युलियनच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्यामुळे त्यांना अगदी ऐन वेळचं फ्लाइट पकडायला लागतं आणि

 तेही अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या लान्सा एअरलाइन्सचं.'दरवेळी अशा दुर्घटना घडत नसतात आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात तर कधीच असं घडत नसतं', असं म्हणत या दोधी विमानात बसतात, लिमा ते पुकाल्पा हा अवध्या तासाभराचा प्रवास.हवा अगदी उत्तम असते,प्रवास सुरळीत सुरू असतो;पण दुपारी साडेबाराच्या सुमारास कोणतीही पूर्वकल्पना न देता एक वादळ अचानक विमानावर थडकतं.मोठा हादरा बसतो आणि काही कळायच्या आत ज्युलियनच्या लक्षात येतं की आपण विमानातून खाली कोसळतो आहोत..

… जाग येते तेव्हा ज्युलियन अ‍ॅमेझॉनच्या जंगलात चिखलमाती आणि पालापाचोळ्याने आच्छादलेल्या जमिनीवर पडलेली असते.एका क्षणात तिच्या लक्षात येतं की आपलं विमान क्रैश झालं आहे आणि आपण जंगलात कोसळलो आहोत आणि आपली आई आपल्याजवळ दिसत नाही.पण आई-वडिलांचं संशोधन केंद्र अ‍ॅमेझॉनमध्येच असल्याने या जंगलाचा स्वभाव तिच्या ओळखीचं असतो,हाच काय तो दिलासा.ती उठून उभी राहण्याचा प्रयत्न करते;पण त्यासरशी तिच्या डोळ्यांसमोर अंधारी येते. थोडा वेळ तशीच पडून राहिल्यावर ती हातावरचं घड्याळ चाचपून पाहते,तर बरेच तडे गेले असले तरी घड्याळ अजून सुरू असतं.नऊ वाजलेले असतात. प्रकाशावरून ज्युलियन ताडते की सकाळची वेळ असावी.म्हणजे आदल्या दिवशी दुपारी विमान कोसळल्यापासून सकाळपर्यंत ती बेशुद्धावस्थेत जंगलामध्ये पडून असते.बऱ्याच प्रयत्नांनंतर तिला उठून उभं राहायला जमतं. आपल्याला नेमकं कुठे आणि किती लागलंय हे ती चाचपून बघते.मानेजवळचं एक हाड वेडवाकडं लागत असल्याचं आणि पिंढरीला एक खोल जखम झाल्याचं तिला तपासणी केल्यावर जाणवतं;पण आश्चर्य म्हणजे दोन्ही ठिकाणी तिला दुखत नसतं.किमान १० हजार फुटांवरून कोसळूनही एवढ्या मामुली जखमांवर आपलं कसं काय निभावलं हे तिला कळत नाही.

ज्युलियन कोपेक,जंगलात येऊन पडलेल्या मुलीची गोष्ट,मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन,

आपण खरंच विमानातून खाली कोसळलो की हे केवळ स्वप्न आहे,असा प्रश्न तिला पडतो.या जखमांपेक्षा दोन-तीन गंभीर समस्या असतात.एक तर तिचा चष्मा हरवलेला असतो,एक सँडल गायब असते आणि तिचा उन्हाळ्यासाठी घातलेला आखूड ड्रेस जंगलातल्या मुक्कामासाठी अगदीच चुकीचा असतो.चांगले बूट आणि योग्य कपडे नसताना अमेझॉनच्या जंगलात राहणं म्हणजे खरं तर मृत्यूला आमंत्रण.कारण साप आणि नाना प्रकारच्या विषारी कीटकांचं ते साम्राज्यच. त्यामुळे कटकट वाटत असूनही ज्युलियन एक सँडल घालूनच चालत असते.किमान एका पायाचं तरी थोडं संरक्षण !

उठून चालता येऊ लागल्यावर ज्युलियनची पहिली प्रतिक्रिया असते ती आजूबाजूला विमानातलं अन्य कोणी दिसतं का ते पाहण्याची.अ‍ॅमेझॉनचं रेन फॉरेस्ट म्हणजे प्रचंड आकारांच्या झाडांची गर्दी असलेलं जंगल.दहा पावलंही सरळ चालता येऊ शकणार नाही इतकं दाट.त्यातून वाट काढत काढत ज्युलियन आसपासचा परिसर हिंडते,पण तिथे विमान कोसळल्याची कुठलीच चिन्हं नसतात.ना विमानाचे अवशेष,ना जखमी माणसं,ना विमानात तिच्या शेजारी बसलेली तिची आई.विमानातून फक्त आपणच खाली कोसळलो की काय असं ज्युलियनला वाटतं.अर्थात ही शोधाशोध करताना एखादी खूण लक्षात ठेवणं गरजेचं आहे याचं भानही तिला असतं.कारण अमेझॉनमध्ये व्यवस्थित आखलेल्या खुणा नसतील तर माणसाला चकवा लागायला वेळ लागत नाही हे ज्युलियनला चांगलं ठाऊक असतं थोड्याच वेळात तिला कळून चुकतं की आपल्या आसपास मदतीला इतर कोणीही नाही. 

विमान नेमकं कुठे पडलंय ते आपल्याला माहिती नाही. थोडक्यात,या किर्र जंगलात आपण आता एकटेच असून कोणीही तातडीने आपल्या मदतीला येण्याची शक्यता नाही.पण तरीही ज्युलियन घाबरून जात नाही की आपण कुठे जंगलात येऊन पडलो अशी भावना तिच्या मनात तयार होत नाही.याचं एक कारण बहुधा विमानातून खाली कोसळल्याच्या धक्क्यामुळे ती काहीशी बधिर झालेली असते.कोणतीच भावना पटकन तिचा ताबा घेत नाही.ना तिला भीती वाटत असते,ना जखमांमुळे वेदना होत असतात ना आता आपलं कसं होणार याची चिंता वाटत असते.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेझॉनचं हे जंगल तिच्या ओळखीचं असतं.लहानपणापासून ती आई-वडिलांच्या संशोधन केंद्रात येत-जात असते आणि दोन-तीन वर्षं तर ती या जंगलात राहिलेली असते,आई-वडिलांबरोबर जंगलात भरपूर भटकलेली असते.जंगलाचे कायदेकानून तिला माहिती असतात. झाडा-वनस्पतींशी,प्राण्यांशी,असंख्य विषारी किड्यांशी,सापांशी आणि एकूणच प्रत्येक वेळेला रूप बदलणाऱ्या जंगलाशी तिची ओळखच नव्हे तर मैत्री असते.

आता आपल्यालाच जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधावा लागणार हे लक्षात आल्यावर तिला वडिलांनी सांगितलेला जंगलातला पहिला नियम आठवतो कधीही जंगलात हरवलीस तर वाहतं पाणी शोधून काढ.पाणी ज्या दिशेला वाहतंय त्या दिशेने पाण्यासोबत चालत राहिलीस तर माणसांच्या वस्तीपर्यंत पोहोचशील.त्यामुळे तिच्याही नकळत ती पाण्याचा शोध घेऊ लागते.थोडा वेळ आसपास फिरल्यावर ज्यूलियनला एक ओळखीचा आवाज ऐकू येऊ लागतो.अगदी छोटा ओहोळ वाहत असल्याचा आवाज.त्या दिशेने गेल्यावर थोड्याच वेळात ती पाण्यापाशी जाऊन पोहोचते.वाटेत तिला कँडीचं एक पाकीट सापडत,पण ते सोडता इतर प्रवाशांच्या काहीच खाणाखुणा तिला दिसत नाहीत.तिच्या स्वतःच्या तुलनेने छोट्या जखमा पाहता विमानातले प्रवासी बचावले नसतील अशी शंकाही तिला येत नाही.आपल्यापासून लांब कुठे तरी तेही जिवंत असतील आणि त्यात आपली आईही असेल असंच तिला वाटत असतं. त्यामुळे त्यांची वाट पाहत थांबून न राहता या छोट्या ओहोळाचा माग पकडून चालत राहायचं असं ती ठरवते.पण या ओहोळाच्या सोबतीने चालणं सोपं नसतं.झाडांच्या गर्दीमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. शिवाय सगळा परिसर चढ-उताराचा असतो.कधी कधी ज्युलियनला झाडांमधून वाट काढत बरंच चढून जावं लागतं;पण हे चढ टाळण्यासाठी शॉर्टकट घेऊन जंगलाच्या आत शिरणं किती जोखमीचं आहे याची तिला कल्पना असते.

त्यामुळे कितीही दमणूक होत असली तरी ती पाण्याच्या काठाने चालत राहते.थोड्या वेळाने हा ओहोळ मोठा होत जातो आणि त्याचं छोट्या झऱ्यात रूपांतर होतं.आता त्याच्या कडेने चालणंही थोडं कमी त्रासदायक बनतं.अपघातानंतरच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास अंधार पडायला लागतो आणि ज्युलियन रात्री मुक्कामासाठी थोडी बरी जागा शोधून झोपण्याची तयारी करते.

फुट कँडीचं एक पाकीट वगळता ज्युलियनकडे खायला काहीच नसतं.मासे पकडून भाजून खावेत,असा विचार केलाच तरी आग पेटवायलाही तिच्याकडे काही साधनं नसतात.अगदी दोन वाळक्या काटक्यांनी किंवा दगडांनी ठिणगी कशी पेटवायची हेही तिला माहिती असतं;पण या पावसाळ्यात सगळं जंगल भिजलेलं असताना तेही शक्य नसतं.एक कँडी खाऊन झऱ्यातलं पाणी भरपूर पिणं एवढंच तिच्या हातात असतं.

★★★ अपुर्ण उर्वरित भाग पुढील लेखामध्ये…

5/3/26

एका दिवसाची देणगी / A day's donation

जीवनाचा मथित अर्थ काढायचा तर एका वेळी एकच दिवस हाती येतो.तो दिवस म्हणजे आजचा दिवस.

जेसन स्टीव्हन्सच्या सर्वोत्तम देणगीच्या शोधप्रवासाच्या या अकराव्या महिन्यात आम्ही प्रवेश करत होतो,आणि मला भान आलं की,या महिन्यात रेड स्टीव्हन्सची प्रथम पुण्यतिथी येणार आहे.माझा आयुष्यभराचा मित्र आणि सखा,त्याचा विचार मी वारंवार करीत असे. रेड स्टीव्हन्स आणि मी अगदी पूर्णतःभिन्न पार्श्वभूमितून आलेलो होतो,आणि वरवर पाहिलं तर,आमच्यात तसं काही साम्य नव्हतं.पण कुठेतरी आम्हा दोघांत आलेला समान धागा आम्हाला सापडला,आणि यामुळे पाच दशकांहून जास्त टिकलेली आमची मैत्री विकसित झाली अन जोपासली गेली.

सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,

डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर

EMBASSY BOOK DISTRIBUTORS

रेड स्टीव्हन्स याची,अचाट असलेला माणूस म्हणून मला नेहमी आठवण राहील.बॅकबे बोस्टनमधल्या माझ्या कार्यालयात निवांत असलेला मी,तर रेड स्टीव्हन्स टेक्ससमध्ये मजेत असलेला.कसं कोण जाणे हे सगळं त्याला अगदी मान्य असायचं.रेड सारखी माणंस घडायची तर टेक्सससारखंच ठिकाण हवं.

पूर्वी कोणीतरी म्हणून गेल्याचं माझ्या ऐकण्यात होतं की कुणाला एकच जरी मित्र असला,तरी तो माणूस एकटा पडत नाही.रेड स्टीव्हन्ससारखा मित्र कोणाला लाभला तर तो कधीच एकटा पडणार नाही,एवढं मात्र मी खात्रीने म्हणतो.तो कायम माझ्यासोबत असणार हे मला ठाऊक होतं.सर्वोत्तम देणगी मिळण्याकडे एकेक पायरी ओलांडायची,याकरिता जेसनला साथ करायची जबाबदारी त्यानं माझ्यावर टाकली होती,याचा मला अभिमान वाटला.

जेसन स्टीव्हन्स आला तेव्हा माझ्या मनात असे विचार होते.

आमच्या कायदेविषयक फर्मच्या कॉन्फरन्स रूममध्ये आमच्या सवयीच्या जागी आम्ही जाऊन बसलो,बरोबर ठरल्यासारखा पुन्हा एकदा रेड स्टीव्हन्स व्हिडिओ टेप आणि तो खोलीच्या टोकाला असलेला मोठा पडदा यांच्यामार्फत आमच्यासामोर आला.तो हसला आणि मोठ्यानं म्हणाला,

"अभिनंदन,जेसन. मी आज तुझ्याशी बोलतोय याचा अर्थ मिस्टर हॅमिल्टनने मागच्या महिन्यात तू सर्वोत्तम देणगी ज्या प्रकारे हाताळलीस,तिला संमती दिली आहे.

'जेसन,तुला हे माहीत हवं की मी आपल्या मृत्यूपत्राद्वारे तुला सर्वोत्तम देणगी देण्याच्या विचारात असतांना मी तुझ्याबद्दल विचार करण्यात खूप काळ खर्च केला.रोज सकाळी करण्याच्या माझ्या सोनेरी यादीत तुला कायम स्थान मिळाले आहे.तू अणि मी यांच्यात रक्ताच्या नात्यापलीकडे जाणारा,एकच कौटुंबिक वारसा आहे. याची मला धन्यता वाटते."

रेड असं बोलत होता,तेव्हा जेसन मान डोलवत असलेला मी डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं.

रेड पुढं बोलत होता,"माझं मृत्युपत्र करण्याच्या कामातून मी जात होतो,आणि माझं जगणं आणि माझा मृत्यु यांचा विचार करीत होतो तेव्हा,मी माझ्या जगण्यातल्या सर्व मूलतत्त्वांना विचारात घेतलं,त्यांनी ते एक खास रसायन बनवलं होतं.मी खूप आठवणींना उजाळा दिलाय आणि त्या सर्व आठवणी मी एखाद्या खजिन्याप्रमाणे संभाळतो.

"जेव्हा आपल्याला मृत्युच्या छायेचं भान येतं,तेव्हा आपण आयुष्याचा हिशोब मांडतो,किती जगून झालं, आणि किती जगायचं राहिलं,वाळूच्या घड्याळात वाळू सरकत असते,तसं असंत ते.आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला वाटत रहातं,हा आयुष्याचा एकच दिवस राहिलाय.तेव्हा,किंवा मरायच्या दिवशी आपण कसे जगायचे याचा मी विचार करत असे.मला असं लक्षात आलं की,तो दिवस पुढे पुढे ढकलण्याचं चित्र मनात नीट ठसलं तर जीवनाचा गाभा माझ्या हाती लागला आहे,कारण आयुष्य म्हणजे दिवसांमागून जाणारे दिवस याहून दुसरं काय असतं ? एक दिवस,त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यायला आपण शिकलो तर आपलं जीवन खूप अर्थपूर्ण होईल आणि समृद्ध होईल.

"जेसन,पुढच्या तीस दिवसांत,तू तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस कसा घालवशील याची योजना तू करायची आहेस.महिन्याच्या शेवटी,माझी मागणी अशी आहे की तू त्याचा सविस्तर अहवाल मिस्टर हॅमिल्टनला सांगायचा.एका दिवसाच्या वेळात जीवनाचा केवढा भाग सामावता येतो,याचा तुला शोध लागेल आणि मग ज्याचा शोध मला लागला,त्याचाच शोध तुलाही लागेल. जास्तीत जास्त जगणे भोगण्यासाठी आपण शेवटच्या दिवसाची का बरं वाट बघायची ? या शेवटच्या दिवसाचा कार्यक्रम आखण्यासाठी लागेल अशी सगळी साधनसामग्री तुझ्याजवळ आहे,मी तुला आजच्या आणि उरलेल्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसासाठी शुभेच्छा देतो."

पडद्यावरून रेड स्टीव्हन्स दिसेनासा झाला.

जेसननं दीर्घ श्वास सोडला,आणि म्हणाला, "माहिती आहे,आयुष्याचा शेवटचा दिवस किंवा मृत्यू याबद्दल मी खरंच अजिबात विचार केला नाहीये."

मी हसून उत्तर दिलं,"मी तुझ्या वयाचा असताना मी ही याचा फार विचार केला नव्हता.

पण मला वाटतं,तुझे आजोबा तुला जे शिकवण्याचा प्रयत्न करताहेत ते असं की,पद्धतशीर विचार केला तर खूप काही मिळण्यासारखं आहे,आणि मला तर खरंच वाटतं की याचा विचार आपण तरूण वयात केला तर तुमच्या आयुष्याची गुणवत्ता वाढेल." जेसन आणि मी उठून हस्तांदोलन केलं,आणि महिनाभरात दिवस ही एक देणगी कशी असते याचा शोध घ्यायला,त्या विचारसृष्टीत जायला,जेसन निघून गेला.जेसनहून माझं निराळं होतं.मी आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस कसा घालवणार याचा काही विचार मी केला होता.त्या शेवटच्या चोवीस तासांत मला काय उरकायला आवडेल असं मनांत येत होतं. महिनाभर माझ्या मनांत हेच विचार येत राहिले.

महिन्याच्या अखेरीस,जेसन स्टीव्हन्स माझ्या कार्यालयात आला.एका मोहिमेवर निघालेल्या माणसाची त्याची चालचलणूक होती.तो माझ्या अशिलांसाठी असलेल्यापैकी एका खुर्चीत बसला, आणि मिस् हेस्टिंग्ज दुसरीत बसली.

मी म्हटलं,"तुला पुन्हा भेटायला छानच वाटतंय,जेसन हा महिना तुझ्यासाठी सफल झाला असावा."

जेसन उत्साहानं उद्‌गारला,"अगदी मौज वाटली.मी मरण्यापूर्वी जे जे करावसं वाटणार,ते ते सर्व काही एका दिवसात मावण्याइतका दिवस पुरेल,याची मला खात्री नाहीये.अगदी विस्मयकारक गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी कराव्याशा वाटतात अशा गोष्टी अगदी सामान्य आणि साध्यासुध्या आहेत.

"सुरुवातीला मी या गोष्टीचा विचार करायला लागलो, तेव्हा वाटलं,एका उंच पर्वतावर जाऊन यावं किंवा एखादी भव्य कलाकृती निर्माण करावी,किंवा असंच काहीतरी.पण नीट विचार केल्यावर,असं लक्षात आलं की सुंदर,छोट्याछोट्या गोष्टींनी माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस खरोखर मला भरून पावेल."

जेसन थांबला,आणि मिस् हेस्टिंग्ज आणि मी दोघांकडे त्यानं पाहिलं.त्यानं कोटाच्या खिशात हात घातला आणि एक लहानसा कागद बाहेर काढला.त्या टिप्पणाकडे एक नजर टाकून पुन्हा तो बोलायला लागला.

"माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी मी सकाळी लवकर उठणं पसंत करीन.वाया घालवायला वेळ नसेल.अंथरूण सोडण्याच्याही आधी मला ज्या ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञता वाटते,त्या गोष्टींची उजळणी करीन, आणि माझ्या मनाची सोनेरी यादी तयार करीन.पण मागच्या महिन्यात जशी तयार केली तशी ती दहा गोष्टींपर्यंत मर्यादित नसेल,मला वाटतं आयुष्याच्या त्या शेवटच्या दिवशी मी ज्यासाठी धन्य असावं अशा बऱ्याच गोष्टींची भर घालावी लागेल.

"घराच्या मागच्या उघड्या ओट्यावर कांही खास मित्रांच्या समवेत जरा लवकरच नाश्ता करायला आवडेल,मला माझ्या आयुष्यात त्यास किती मोठ स्थान आहे हे मी त्यांना सांगेन त्यांच्यातल्या प्रत्येकाला मी अशी भेट देईन की ती मिळाल्यामुळे त्यांचे सर्व आयुष्य सार्थकी लागेल.'नाश्ता झाल्यावर मी काही खास लोकांशी फोनवर बोलणार.

टेक्सासमधला गस कोल्डवेल,दक्षिण अमेरिकेतली रेड स्टीव्हन्स वाचनालयात येणारी माणस, मेनमध्ये राहणारी ती वसतीगृहातली मुलं आणि अशी बरीचजण आहेत.असे कांही नातेवाईक आहेत की मी ज्यांच्याशी फारसे चांगले संबंध ठेवले नाते आणि इतर असेच लोक आहेत,त्यांना मी फोनवर भेटणार. त्यातल्या प्रत्येकाला मी सांगेन की आपल्यामध्ये जे चुकलंमाकलं त्याबद्दल मी दिल्लगीर आहे.मी जे करतोय ते त्यांनीही करावं अम मी त्यांना सागेन ते असे की चांगल्या आठवणी तेवढ्या ठेवून वाईट आठवणींची छुट्टी करायची.

"दुपारच्या जेवणासाठी मी ब्रायनला कुठेतरी बाहेर घेऊन जाईन,आणि त्याला हवं ते खायला घालीन, त्याची त्याच्या जीवनाबद्दल जी स्वप्न असतील त्यात मी वाटेकरी होईन.

"सरत्या दुपारी मी साध्या साध्या गोष्टींचा आनंद लुटणार.त्यात बागेत फिरायला जाणं असेल.या वर्षाच्या सुरुवातीला रूग्णालयातून आलेली ती एमिली,ती असावी माझ्यासोबत.नंतर बोस्टनच्या धक्क्यावर जाऊन एखादी बोटीतनं छोटीशी चक्कर मारीन,आणि कलादालनाला भेट देऊन येईन.

"मग संध्याकाळी मी एक खास पार्टी देणार.त्यात माझे सगळे मित्र,त्यांचे मित्र आणि खास म्हणजे तुम्ही दोघे असाल,पार्टीच्या शेवटी मी तिथल्या स्टेजवर सर्वांसमोर उभा राहून माझे आजोबा रेड स्टीव्हन्स यांनी मला जी सर्वोत्तम देणगी दिली.त्याबद्दल सांगेन,मी त्याचं व्हिडिओ टेप रेकॉर्डिंग करून घेणार म्हणजे मला जे हवंय,की मी मेल्यानंतरही अशा मस्त देणगीचा लाभ माझ्यासारख्या इतरही सर्व तरुणांना होईल."

जेसननं मिस् हेस्टिंग्जकडं आणि माझ्याकडं ओझरतं पाहीलं आणि परत त्याच्या कागदाकडे पाहिलं.काही क्षणांनी त्यानं कागदाची घडी घातली आणि तो परत खिशात ठेवून दिला.तो म्हणाला,"खरं तर खूप गोष्टी आणखी करायच्या होत्या,आणि त्या सगळ्या चांगल्याही होत्या.पण मी ज्या लिहिल्यायत त्या मला वाटलं,माझ्या शेवटच्या दिवसात बरोबर बसवता येतील."

मी हसून म्हटलं,"जेसन,शेवटचा दिवस घालवण्याचा याहून दुसरा चांगला मार्ग मला तरी ठाऊक नाही.मला वाटतं,तुझ्या रेड आजोबांच्या मनांतलं दिवस म्हणजे एक देणगी कशी असते हे तुला नीट समजलंय,यावर आपलं सर्वांचं एकमत असणार."

जेसन उठला,आणि माझ्याशी मनापासून हस्तांदोलन करून मिस् हेस्टिंग्जला उराउरी भेटला.मिस् हेस्टिंग्ज त्याला पोचवायला लिफ्टपर्यंत गेली,तेव्हा एका वर्षापूर्वी माझ्या कार्यालयात आलेला तो रागीट दुर्मुखलेल्या चेहऱ्याचा तरूण मला आठवला.मला माहीत आहे,रेड स्टीव्हन्स हसतोय आमच्या कडे बघून.

अपूर्ण शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….

5/1/26

दैवी प्रकोप / Divine wrath !

ऑगस्टच्या शेवटी एका निरभ्र दुपारी महासमाज एका महत्त्वाच्या वार्षिक समारंभाची तयारी करत होता.सगळं वर्ष संभोग उड्डाणाकडे जात असतं. वारुळानं नवे जन्म देण्याची घटना असते ती. वारुळाचं सातत्य संभोग-उड्डाणानं राखलं जातं. मुंगी-प्रजातीचं अमरत्व त्या उड्डाणानं टिकवलं जातं. वेळकाळ योग्य होता.दोन दिवस आधी एका ढगांच्या समूहानं नोकोबी परिसरावर पाच सेंटिमीटर पाऊस ओतून जमिनीला ओलावा दिला होता. उन्हाळ्यानं कोमेजलेली झाडं नव्यानं तरारून उठत होती.सूर्य आणि नुकताच झालेला पाऊस यामुळे हवा शांत,दमट झाली होती.

मुंग्यांच्या मेंदूंमधल्या पंचांगानं संभोग उड्डाणाचा मुहूर्त जवळ आल्याची सूचना दिली.हजारो कामकरी मुंग्या जमिनीखालून पृष्ठभागावर येऊन धावाधाव करत होत्या.लवकरच शेकडो राजकुमारी आणि नरही जमिनीखालून वर आले.कोणीच उड्डाण करत नव्हतं.कोणीच वर भरारी मारत नव्हतं. महासमाजात उड्डाणाचा भाग बाद होऊन संभोगाचाच भाग उरला होता.अनेक नर एकमेकांना ढकलत,दूर सारत राजकुमारींशी जुगायला झटत होते.एखाद्या नरानं राजकुमारीशी संभोग करून शुक्राणू तिच्यात ओतले,तरी आसपासची धक्काबुक्की कमी होत नव्हती. संभोग न जमलेले नर धावपळ करून न फळलेल्या राजकुमारींच्या शोधात होते.त्यांचं आयुष्य लहानखुरं होतं.आणि राजकुमारीला गाठता न आलेल्या नरांचा निर्वंश होणार होता. कडोनिकडीची लढाई होती ही.


संभोग-स्पर्धेत जिंकलेले आणि हरलेले,सगळेच नर जरासे उडून मेले.नोकोबी परिसरातल्या सर्व दिव्यांखाली रात्री मेलेल्या मुंग्यांचा खच पडला.किडे,सरडे,विंचू,कोळी,

बेडूक,सगळे या मेजवानीवर ताव मारत होते. माणसांना मात्र जिवंत आणि मेलेल्या मुंग्यांचा त्रासच होता.सगळी अंगणं,बागा, रस्ते झाडावे लागले !

नरांच्या धडपडीच्या विरुद्ध स्थिती राजकुमारींची होती.एक संभोग,कधी एकापेक्षा जास्त संभोग, की पुन्हा जमिनीत जायची तयारी.पंख मोडायचे आणि आत एखादं दालन शोधून महासमाजासाठी अंडी द्यायला लागायचं.आज मात्र हे झालं नाही.हलत्या झाडांनीही आज मुंग्यांवर 'दैवी प्रकोप' पाठवायचं ठरवलं होतं. अनेक हलणारे झाड-देव घुबड तलावाकाठी आले. त्यांच्या सावल्यांनी,त्यांच्या वासांनी सगळा महासमाज परिसर व्यापला.त्यांच्या फांद्यामध्ये मोठाल्या वस्तू होत्या.त्या वजनांमुळे झाडं चालताना जमीन हादरत होती.आणि वातावरण एक विचित्र आवाजानं भारलं, तो आवाज ढगांच्या गडगडाटासारखा नव्हता,उंच झाडांमधून वाहणाऱ्या वाऱ्यासारखा आवाज होता तो.

तासाभरानं जमिनीवरच्या मुंग्यांना जाणवलं की झाड-देव परत येताहेत.पण या वेळी काहीच दिसत नव्हतं.फक्त एक विचित्र दुर्गंध हवेत होता.मुंग्या एकमेकींना धोक्यापासून सावध राहायला जसे फेरोमोन संदेश देतात,तसला हा वास. जमिनीवरच्या मुंग्या बावरून सैरावैरा पळायला लागल्या.शत्रू शोधत होत्या त्या. पण शत्रूचा पत्ता नव्हता.आणि मग मिनीटभरात सगळ्या क्षेत्रांवर एक रासायनिक ढग पसरला.

काही मुंग्यांनी हा तपासायला शिंगं उभारली,आणि त्या तत्काळ कोलमडल्या.त्या वात झाल्यासारख्या लोळागोळा होऊन पडल्या आणि मरण पावल्या.

रासायनिक ढग खाली जमिनीवर येऊन स्थिरावला,आणि जमिनीवर एकही मुंगी जिवंत उरली नाही.ढगामागून झाड-देव आले,आणि त्यांच्या फांद्यांमधल्या वस्तूंमधून काहीतरी द्रव पदार्थ जमिनीवर फवारला गेला.वारूळ-जंजाळाच्या प्रत्येक दारातून झाड-देवांनी ते द्रव्य सोडलं.

दुसऱ्या सकाळी महासमाज,महानगर,साम्राज्य सगळं संपलं होतं.ते झालं होतं मुंग्यांचं मृत्यु-क्षेत्र. सगळा परिसर निर्जीव झाला होता.मुंग्याच नव्हेत, तर सर्वच लहान जीव झाड-देवांनी मारून टाकले होते.पक्षी,

सरडे,खारी,काहीही जिवंत नव्हतं. महासमाज क्षेत्राबाहेर हे सगळे जीव शाबूत होते, आणि मुंग्याही.पण ते कोणीही या जहरी क्षेत्राजवळही येत नव्हते.झाड-देवांनी न तुडवलेली झुडपं आणि झाडोरा शिल्लक होता.कीटकसृष्टीचा मात्र आता मागमूसही उरला नव्हता.वाऱ्यानं होणारी झाडांची सळसळ,तलावाकाठचा लाटांचा नाद,हे सोडून नीरव शांतता पसरली होती.

नवा गडी...

दोन लहानशा झाडांच्या मुळांमध्ये जमिनीत एक खड्डा होता.त्यात एक लहानसं,झुडपांमध्ये घडवलेलं वारूळ होतं;झुडूप-वारूळ म्हणू या त्याला महासमाजाच्या मृत्युक्षेत्राच्या जरा कडेला हे वारूळ होतं.

आधी जेव्हा पायवाट वारूळ आणि नंतर ओढा वारूळ या भागावर सत्ता गाजवत असत, तेव्हा त्यांच्या गस्ती मुंग्या कधीकधी झुडूप-वारुळाच्या दाराजवळूनही जात असत.पण त्यांना हे लहानखुरं वारूळ जाणवत नसे.झुडूप वारुळातल्या मुंग्या आपल्या वारुळाजवळच वावरत.अन्न कमी असल्यानं वारुळाची वाढ मंद होती.थोडेसे मेलेले कीटक,इतरांना न सापडलेले, यांच्यावरच जेमतेम गुजराण होत असे.महासमाज घडल्यावर तर स्थिती आणिकच बिघडली.त्यांच्या मुंग्यांची गस्त जास्त आक्रमक असायची.त्या मुंग्या झुडूप-क्षेत्रात जास्त घुसखोरीही करायच्या,आणि सहजच मारामारीला तयार व्हायच्या.. झुडूप- वारुळाचं क्षेत्र यामुळे आणिकच आक्रसलं.महासमाज माणसांच्या विषप्रयोगानं मेला,त्याच वेळी झुडूप-वारूळही खचत आलं होतं.पायवाट वारुळाच्या काळात झुडूप-वारुळात शंभरेक मुंग्याच होत्या.महासमाज काळात तर जेमतेम वीस मुंग्या उरल्या,आणि त्याही बाहेर पडायला घाबरणाऱ्या. या वीस मुंग्यांमध्ये एकही सैनिक नव्हती.राणीची अंडाशयं सुकून चालली होती.अन्न कमी मिळाल्यानं अंडी देणं थांबलं होतं.कामकरी मुंग्या मरण्याचा वेग मात्र वाढला होता.उन्हाळा संपेपर्यंत झुडूप-वारूळ मरणार,आणि महासमाजाच्या जंजाळाचा भाग बनणार,असं चित्र दिसत होतं.पण हलते झाड-देव आले,आणि त्यांनी महासमाजाला ठार मारलं.त्या चमत्कारानं झुडूप वारुळावरचा जीवघेणा दबाव एकाएकी संपून गेला.

काही महासमाजी गस्ती मुंग्या जवळपास होत्या, पण घराकडे परतायचा प्रयत्न करताच त्याही विषारी जमिनीवर मरून पडल्या.आठवड्याभरात त्यांच्या वास्तव्याच्या फेरोमोन-खुणाही संपून गेल्या.आता घाबरत,बिचकत झुडूप-मुंग्या बाहेर पडू लागल्या.पूर्वी प्रबळ शेजारी असल्यानं अन्न मिळवणं अवघड जायचं.आता मात्र स्पर्धा संपल्यानं अन्न वाढलं.मेलेले कीटक,सहज पकडता येणारे कीटक,मावा किड्यांची विष्ठा,सगळंच आता जास्त प्रमाणात मिळू लागलं.पंधरा-तीन वारांमध्ये राणीची अंडाशयं पुन्हा जोमदार झाली.अंडी,निरोगी अळ्या वगैरेंनी संगोपन दालनं गजबजली.स्थिरावलेली लोकसंख्या नव्यानं वाढायला लागली.हिवाळा संपून वसंत ऋतू आला,तोपर्यंत झुडूप-वारूळ जोमदार झालं.कामकरी मुंग्या दूरवर फिरून नवनवे अन्नाचे स्रोत शोधून काढू लागल्या. आता महासमाजाच्या मृत्युक्षेत्रातलं विषही उडून, धुऊन गेलं होतं,आणि त्या भल्याथोरल्या क्षेत्रात कीटक आणि अळ्या सुरवंट पुन्हा वावरायला लागले होते.त्यांच्यावर जगणं झुडूप-मुंग्यांना सोपं जात होतं.नुकतंच वैराण असलेलं क्षेत्र आता नव्यानं पेरलेल्या,वाढलेल्या बागेसारखं झालं होतं. महासमाजाच्या वारूळ-जंजाळानं जमीन भुसभुशीत झाली होती.

महासमाजी मुंग्यांची प्रेतं कुजून जमिनीला खत मिळालं होतं.हे खत आणि आतवर खेळणाऱ्या हवेनं वनस्पतींची वाढ जोमदार झाली होती.गवत,झुडपं यांच्या बिया शेजारच्या जंगलातून येऊन पडल्या,की झपाट्यानं मुळं धरून त्यांची वाढ होत होती.जुन्या मृत्युक्षेत्रावर आता वनस्पतींचा हिरवाकंच गालिचा पसरला होता.

वसंत ऋतूत या वनस्पतींची फुलं फुलली,आणि त्या सुगंधानं परागीकरण करणारे जीव मृत्युक्षेत्रात परतले.भुंगे,पाकोळ्या,फुलपाखरं यांनी सगळं क्षेत्र जिवंत झालं.आणि मुंग्यांचं अन्नही भरपूर आणि विविध प्रकारचं झालं.नुकतीच या भागावर महामारी येऊन गेली,याच्या खुणाही पूर्णपणे पुसल्या गेल्या.

वारुळ पुराण,सातेरीचा वाडा झाला चिरेबंदी,माधव गाडगीळ,उदंड वारुळे जाहली ! ई.ओ.विल्सन संक्षिप्त अनुवाद - नंदा खरे, मनोविकास प्रकाशन…

नव्यानं बहरणाऱ्या जीवसृष्टीत एक भाग होता कोळी-प्रकाराचा.खरं तर मृत्युक्षेत्रात पहिल्यांदा आले,ते कोळी.काही शेजारच्या जंगलांमधून चालतफिरत आले.पण एक मोठा गट हवाई मार्गानं आला ! कोळ्यांना पंख नसतात.पण लहान कोळ्यांना दूर जायचं असेल,तर त्यांच्याकडे एक युक्ती असते.एखादं गवताचं पातं किंवा झुडपाची काडी पाहून उंचावर जायचं.मग बूड उचलून आपल्या रेशीम देणाऱ्या ग्रंथींमधून रेशमाचा एक तंतू हवेत उडवायचा.हा नाजुकसा तंतू एखाद्या पतंगासारखा वाऱ्यानं ओढला जातो,आणि सोबत आपला कोळीही उडी मारून हवाई-प्रवासाला लागतो.वारा योग्य दिशेचा आणि वेगाचा असला, तर कोळी तीनेकशे मीटर उंच आणि कैक किलोमीटर दूर पोचू शकतो.

उतरायची इच्छा झाली, की आपला तंतू आत ओढून खाऊन टाकायचा. कणाकणानं तंतू खात संथपणे जमिनीवर लैंडिंग करता येतं.नव्या जागी फारसे कोळी नसले,तर छान अन्न कमावत जगता येतं.

फास टाकून भक्ष्य पकडणारे कोळी असतात.मोठी चक्राकार जाळी,गुंतागुंतीची जाळी.चाडीसारखी जाळी,अशा अनेक प्रकारच्या जाळ्यांनी भक्ष्य पकडता येतं.काही कोळी तर जाळंही न विणता अचल स्वस्थ बसून राहतात,आणि भक्ष्य जवळ आलं,की झडप घालून पकडतात.

तर नव्यानं वनस्पती-श्रीमंत झालेल्या महासमाज क्षेत्रात अशी विविध प्रकारची कीटकसृष्टी बहरली आणि सोबत झुडूप-वारूळही बहरलं.

अजूनही हा वाचन प्रवास सुरु राहिल.शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…¶¶¶

4/29/26

चिंचा आल्यात पाडाला !The chickpeas are ripe!

दीर्घायुष्य असलेलं,चिवट सदा हिरवंगार असलेलं, डेरेदार आकाराचं,गर्द छाया देणारं,गावाचं वाऱ्या-वादळापासून संरक्षण करणारं विपुल पानं,फुलं, फळं देणारं,इतकेच नव्हे तर,बगळे,ढोकरी,पाणकावळे, कांबऱ्या ढोक-व्हाईट नेक्ड स्टॉर्क,कंकर व्हाईट आयबिस,अडई,वंडकी इत्यादीपक्ष्यांच्या गूढ घरट्यांना आश्रय देणारं कुठलं झाड असेल तर ते चिंचेचं होय.भारतात नारळाला कल्पवृक्ष तर चिंचेला खजुराचे झाड म्हणतात.

अरबी भाषेत चिंचेला तमार-उल-हिंद म्हणजे 'हिंदुस्तानचे खजुरीचे झाड' म्हणून संबोधले जाते. चिंचेच्या फळांचा रंग देखील खजुराच्या वर्णासारखाच. इंग्रजीत टॅमरिंड ह्या शब्दाचे मूळ जरी अरबी भाषेत असले तरी चिंचेचा उल्लेख अमरकोशासारख्या अतिप्राचीन संस्कृत ग्रंथात आला आहे।तिन्तिडी,चिञ्चाऽम्लिका म्हणजे चिंचेची तीन नावे आहेत.तिन्तिडी,चिंचा व अम्लिका.

भंडारा जिल्ह्यात पस्तीत हजारांवर तळी आहेत.ह्या तलावांच्या प्रदेशात नऊ लाखांवर चिंचेची झाडं आहेत, हे क्वचित कुणाला ठाऊक असेल.जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणतात.कुठंही एखाद्या उंच डोंगरावर जाऊन उभे रहा.तुम्हाला दूरवर दिसतील ती चिंचेच्या राईत वसलेली लहान-मोठी गावं.त्यातून डोकावत असलेली मंदिरांची शिखरं.काही ठिकाणी विशाल चिंचेच्या मोठ्या राया आहेत.अगोदर राई वाढली की गाव वसलं,हे सांगणंही कठीण जातं.वाटतं,विविध हिरव्या वर्णांची झाक असलेले जणू ढगच गावाला व्यापून राहिले आहेत.

वृक्षाला कोवळी पालवी फुटू लागली की वाटतं,वैडूर्य मण्यांचे घुमट गावात उभे आहेत.नंतर त्यांचा वर्ण हिरव्या रत्नासारखा दिसू लागतो.चिंचेला एप्रिल-जून महिन्यात फुलं धरू लागतात.त्या फुलांबरोबर दिसू लागतातबगळे-ढोकरी-पाणकावळे यांचे गोदे.ग्रहनक्षत्रांनी निळं आकाश जसं शोभावं तसं पांढऱ्या-बदामी-काळ्या पक्ष्यांनी हे वैडूर्य मण्यांचे घुमट शोभू लागतात ज्ञानेश्वरांनी अशा अद्भुत सारंगागाराचे-हेरॉन्री मोठे मार्मिक वर्णन केले आहे;

अहो आकाशाचिये खोळे। दिसती ग्रहगणाची कुळे।

का महावृक्षी अविसाळे। पक्षिजातीची ।।

बगळे-ढोकरी हे प्रामुख्याने चिंचेच्या झाडावरच का घरटी करतात,हे पक्षिशास्त्रातील कोडं आहे.शेपन्नास झाडांपैकी काही मोजक्या झाडांवरच त्यांची विपुल घरटी का असतात हेही पुन्हा एक गूढ आहे.अशी सारंगागारे नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील जांभडी व पवनी या नवेगाव तलावाकाठच्या गावात आढळून आली.तसेच इटियाडोहाच्या परिसरातील बोंड गाव व इतर गावांतही दिसून आली.जांभडी येथील सारंगागार नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचे भूषण आहे,तर त्या गावच्या समृद्धीचे प्रतीक आहे.त्या गूढविस्तीर्ण जलाशयाकडे पाहात राहावं ! सूर्य अस्ताला गेला असला तरी तो स्वयंभू जलाशय कुठल्यातरी अनामिक तेजाने उजाळलेला वाटतो.पाण्यात पडलेल्या हिरव्यानिळ्या पर्वतमालांच्या छाया संधिप्रकाशात मनाला मोह पाडतात.

गूढ रम्य वाटणाऱ्या झीलानी व बोडीतून ढोकरी सारंगागाराकडे थव्याथव्यांनी उडताना,त्यांच्या वाक्-वाक् या स्वराने सायंतन शांततेत नाद-माधुरी ओतीत असतात.पवनी-जांभडी भागातील तलावाकाठचे सौंदर्य अवर्णनीय आहे.हिरव्यागार देवधानांनी रेखांकित असा हा तलावाचा किनारा पुढे जाऊन एका विस्तीर्ण झीलानीत विस्तारला आहे.त्याचा परिसर गूढ बोडींनी व्यापला आहे.ह्या हिरव्यागार पसाऱ्यावर दृष्टी ठरत नाही, इतके ते विशाल आहे.पूर्वेकडील हिरवेगार देवधान व पश्चिमेकडील पर्वतमालांच्या चिमटीत असल्यागत वाटणारा तो जलाशय अशा वेळी सागरातील खाडीसारखा दिसू लागतो.अशा या शांत,अद्भुतसमयी ढोकरी जांभडी गावाकडे रांगेने उंच आकाशातून उडू लागतात.त्यांच्या रांगाचे आकार कधी अर्धत्रिकोणासारखे तर कधी उभी रांग तर कधी आडवी रांग असे दिसतात.ढोकरी हा हा म्हणता नजरेआड होतात.


जांभडी गावच्या त्या चिंचांवर लक्षावधी ढोकरी व बगळे जमतात.ती झाडे या पांढऱ्या व बदामी पाखरांमुळे शोभू लागतात.प्रत्येक घरट्यागणिक असलेली तीन-चार पिले आईबापांच्या आगमनाची चाहूल लागताच विलक्षण कच्-कच् कच्-कच् आवाज करू लागतात. सूर्यास्तानंतर काही काळ ऐकू येणारा त्यांचा कोलाहल हळूहळू दिवेलागणीबरोबर शांत होऊ लागतो.

सकाळी मात्र हे सारंगागार शांत असते.जवळच्या झीलानी व बोडीतून बगळे-ढोकरी पिलांसाठी चारा घेऊन येतात.चारा घेण्यासाठी पिलांची कोण धडपड चालते.नुकतीच आपल्या पायावर उभी राहू शकणारी ती पिले विलक्षण धडपडीने तोल जाऊन खाली तर पडणार नाहीत ना असे वाटते !

सारंगागारे बहुधा गावातील चिंचेच्या झाडावरच असतात.गावात असलेल्या चिंचेच्या झाडांपैकी निवडक वृक्षांवरच ते आपले निवासस्थान बनवून घरटी बांधतात. तेथेच शेकडो वर्षे पिढ्यान्पिढ्या फुलतात,फळतात.पूर्वी गावातून दाट सावली व फळांसाठी चिंचेच्या झाडांची निवड केली जाई.चिंचेच्या फांद्या दाट व लवचिक असतात व पिसाप्रमाणे दिसणारी हिरवी पाने विपुल असतात.त्या घनदाट पालवीतून त्यांची नवजात पिले खाली जमिनीवर पडण्याची शक्यता कमीच. गावाबाहेर रस्त्याच्या कडेने असलेल्या चिंचेवर ते घरटी बांधत नाहीत.कारण तिथे दिवसा कावळे,मोरघारी त्यांची अंडी खातात तर रात्री घुबडे व वटवाघुळांचा त्यांना मोठा उपद्रव होतो. हा त्रास टाळायचा तर गावचा आश्रय घेणेच त्यांना योग्य वाटत असावे.

परंतु तेराव्या शतकात झालेला हंसदेव हा जैनमुनी 'मृगपक्षिशास्त्र' या संस्कृत ग्रंथात याविषयी लिहितो की,'वाघाची डरकाळी नव्हे,तर नुसता हुंकार ऐकूनही बगळे ढोकरी भितात.' त्यामुळे ढोकरी बगळ्यांची घरटी जंगलातील वृक्षावर न आढळता ती गावात किंवा गावानजीकच्या सुरक्षित राईत का दिसून येतात याचे रहस्य समजून येईल.

सकाळी उठून पाहावे तो घराच्या अंगणात-परसात पक्ष्यांची शीट पडलेली दिसते.परसात असलेला भाजीपाला व अंगणातील फुलझाडे ह्या खताने जोमाने वाढतात.तिथल्या जमिनीचा कस कधीच कमी होत नाही.पक्ष्यांची शीट गोळा करून धीवर माशांना घालतात.पक्ष्यांची शीट हे माशांचे आवडते खाद्य आहे. त्यांना तळ्यात खूप मासे मिळतात.ह्या चिंचेवर हे पक्षी राहिले नसते तर रात्री त्यांना हिरवा-निळा-काळा अंधार खायला उठला असता.परंतु ह्या आनंददायी पक्ष्यांनी त्या वृक्षांची तशीच गावची समृद्धी द्विगुणित केली आहे, जंगलातील एकट्यादुकट्या चिंचेवर किंवा रस्त्याच्या दुतर्फा मैल न् मैल असलेल्या चिंचेवरही हे पक्षी घरटी करीत नाहीत याचे आश्चर्य वाटते.ज्या चिंचेच्या राईत गावे वसली आहेत त्यावरच हे पक्षी घरटी बांधतात. चिंचेबद्दल चांगल्या-वाईट लोककथा ऐकण्यात येतात. चैतन्य महाप्रभूना या वृक्षाखालीच बोध प्राप्त झाला व हा चिंचेचा वृक्ष आज वृंदावनात आहे असे सांगतात.तमिळ भाषेत एक म्हण आहे 'भुताशी लग्न झाले तर चिंचेच्या झाडावर चढावे लागते.' चिंचेच्या झाडावर चढणे मोठे कठीण असते.त्याच्या फांद्या काड्या इतक्या विपुल,

घनदाट व चिवट असतात की,त्यातून पक्ष्यांचे शत्रू असलेल्या सापाचादेखील शिरकाव होत नाही. यामुळे त्यांच्या घरट्यांना नैसर्गिक तक्तपोसच मिळतो. अशा सुरक्षित चिंचेच्या कडेकोट किल्ल्यात आश्रयाला राहावयास पक्ष्यांना आवडेलच.(जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली, साहित्य प्रसार केंद्र, सीताबाई,नागपूर)

परंतु आपल्या पूर्वजांनी ज्या व्यावहारिक कल्पकतेनं गावची रचना करून चिंचेची झाडे वाढविली ते वैभव आता प्रत्येक गावातून हळूहळू नष्ट होत आहे.पक्ष्यांची शीट घरादारावर पडते,त्याचा घाण वास येतो म्हणून त्या झाडाच्या मोठमोठ्या फांद्या तोडण्यात येत आहेत.परंतु त्यापासून जे फायदे होतात त्या मानानं त्रास काहीच नाही.वाऱ्या-वादळापासून गावाचं रक्षण करणाऱ्या ह्या वृक्षांची तोड अविचारानं चालू आहेच.

निमगावात मी एक भयानक दृश्य पाहिलं.एका धीवरानं तर बगळ्याढोकरीची अंडी टोपलीभर गोळा केली होती.

मी विचारलं,'ह्याचं काय करणार?'

तो म्हणाला,बाजारात ती विकणार.'

हॉटेल-खाणावळीतून ही अंडी कोंबड्यांच्या अंड्यांबरोबर भेसळ करून लबाड व्यापारी ती अन्नात वापरतात.ह्या पक्ष्यांची अंडी आरोग्याला,अतिशय उष्ण व अपायकारक असतात.त्यापासून पोटाच्या अनेक व्याधी होतात.तो धीवर स्वतः पोटदुखीने जर्जर झालेला मी पाहिला.

चिंचेची झाडं भंडारा जिल्ह्यातील कल्पवृक्ष आहेत.चिंचा माघ व फाल्गुन या महिन्यात पिकून तयार होतात.

चिंचा बहुउपयोगी आहेत.चिंचेमध्ये ज्या बिया असतात त्यास चिंचोके म्हणतात.चिंच भाज्या वगैरे बहुतेक पदार्थात घालावी लागते.भातावर घेण्याकरता चिंचेच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात,फुलांची चटणी करतात.रेशीम रंगविण्यासाठी चिंचेच्या पानांचा उपयोग होतो.चिंचोके गरीब लोकांचे अन्न आहे.सूत, ताग व लोकरीच्या धाग्यासाठी चिंचोक्यापासून खळ करतात.

त्यांचे उत्तम तेल निघते.तेलाचा उपयोग बाहुल्या व मूर्ती रंगविण्यासाठी करतात.चिंचेचे लाकूड चिवट व टिकावू असते.त्यापासून बैलगाड्यांची चाके व कुऱ्हाडीचे दांडे करतात.तेलाच्या घाणी व उसाचे चरक यांचे बरेच भाग ह्या लाकडाचे बनविलेले असतात. चिंचेच्या रूपानं गावात जणू आरोग्य नांदते.तो नित्य औषधे देणारा वैद्यच वाटतो.मूळव्याध,परमा,पांडूरोग, खोकला,विंचवाचा दंश,क्षतक,शूळ देवीचा आजार, उंदराचे विष,अतिसार,

डोळे येणे,अपचन,भूक कमीहोणे,हिंगुलाचेविष,निवडुंगाचे विष,बैलाचा पाय सुजणे, कानदुखी,अरुची व पित्त,बद्धकोष्ठ,रूईचे विष,भांगेवर उतारा व मोडशी इत्यादी अनेक विकारावर पाने,फुले, चिंचा,

चिंचोके व झाडाची साल वनौषधी म्हणून वापरतात.ही त्यांची बहुमोल उपयुक्तता पाहून राज्य सरकारनं आता चिंचेची झाडं तोडण्यावर बंदी घातली आहे.ती झाडे तोडणं गुन्हा आहे.ज्या चिंचेवर बगळे ढोकरी इत्यादी पक्षी वर्षानुवर्षे घरटी करतात अशी सारंगागारे असलेली झाडं तोडणं तर फारच गंभीर गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना दोन हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

♀♀♀ समाप्त ♀♀♀

4/27/26

ग्रंथसंग / book company


ग्रंथांचिया द्वारी,जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा अतुल देऊळगावकर,प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन पुणे एकूण २८ ग्रंथसंग आपण क्रमशः सुरु करीत आहोत.

शाळेची सुटी संपल्यावर काही शिक्षक 'काय वाचलं?' असे विचारत.तेव्हा वर्गात शोभा होऊ नये यासाठी काळजी घेणे भाग होते.घरातील वातावरणामुळे विविध प्रसंगी येणारे नरहर कुरुंदकर,अनंतराव भालेराव, वसंतराव पळशीकर,पन्नालाल सुराणा,पुष्पाबाई भावे यांच्याकडून हमखास येणाऱ्या ह्याच कठीण प्रश्नाला उत्तर देणे अनिवार्य होते.ही महनीय मंडळी वयाने व ज्ञानाने अतिशय लहान असणाऱ्या बालकांशीही मनापासून बोलत असत.यातूनच 'काय वाचावं?' हे आवर्जून सांगत.शिक्षणाच्या व नोकरीच्या निमित्ताने पुण्यात असताना समर नखाते,माधुरी पुरंदरे यांच्या 'माध्यम' पथनाट्य चळवळीत सामील झाल्यावर 'तोच' प्रश्न धाकदायक होत गेला.नंतर 'ग्रंथाली' वाचक चळवळीमुळे दिनकर गांगल,कुमार केतकर,अरुण साधू यांच्या गाठीभेटी वाढत गेल्या.तेव्हाही भेटीतील आरंभीची विचारपूस 'याच' दडपण आणणाऱ्या प्रश्नाने होत असे.तर अशा ह्या 'अटळ' प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी करणे भागच होते.ह्या सर्वार्थाने ज्येष्ठ मंडळींच्या बोलण्यातून येणारे संदर्भ समजले नाही,तर तो भयंकर अपमान वाटत असे.त्यामुळे संदर्भ आलेल्या पुस्तकांचा शोध घेणे अगत्याचे होते.ह्या बुजुर्गांच्या घरी जाण्याची संधी मिळाली,तर त्यांच्या ग्रंथसंग्रहाकडे मनःपूर्वक पाहत,नोंदी करून घेणे आवश्यक वाटायचे.वाचायचे तर अफाट आहे.वाचनाचा क्रम कसा असावा? ही समस्या कधी सुटलीच नाही.'वाचनशिस्त आली नाही.

खूप काही राहून गेलं आहे',ही जाणीव सातत्याने टोचत राहते.अशा ह्या सदोष,अ-रेषीय व अ-परिपूर्ण वाचनप्रवासात अनेक लेखक-कवी माझ्यासोबत येत बरेच काही देऊन गेले.'आपण फारच छोटे आहोत. आपला शब्दसंग्रह थिटा आहे.आपल्याला भाषावैभव कधी येणार? आपली दृष्टी ही भंगलेली, विखंडित आहे.' ही टोचणी कायमची आहे व तशीच राहणार.त्यामुळे 'दृष्टी समग्र व विशाल करण्याच्या आटोकाट प्रयत्नात' काही लेखक-कवी-कलावंतांना कायम सोबत ठेवावे लागते.जे. कृष्णमूर्ती,विनोबा भावे,तुकाराम,पं. कुमार गंधर्व,मर्वेकर,विंदा,एलकुंचवार,एरिक फ्रॉम ह्यांच्या सतत सहवासात राहून शिकत राहणे सुरूच आहे.

वर्गमित्र दीपक देवधरमुळे भगतसिंगांचे 'मी नास्तिक का आहे?" हातात आले.वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी फासावर जातानाही न डगमगता परमेश्वराला नाकारण्याचे आंतरिक धैर्य असणाऱ्या विवेकी भगतसिंगाने पछाडून टाकले.विख्यात इतिहासकार बिपिन चंद्र यांनी १९७० मध्ये मूळ गुरुमुखीतील ह्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आणि लोकवाङ्गय गृहामुळे ते लवकरच मराठीत आले.ह्या पुस्तकामुळे भगतसिंगांच्या वाचन व्यासंगाची माहिती देशाला झाली. मृत्यू समोर दिसत असताना विलक्षण शांत व संयमी राहणारा हा तरुण वाचनात गढून गेला होता. शोषणरहित आदर्श समाजाचे स्वप्न उराशी बाळगून होता.फाशीचा क्षण आला,तेव्हाही हा धीरोदात्त महावीर पुस्तकात रममाण झाला होता. 'मी नास्तिक का आहे?' मुळे वाचनाची आवश्यकता मनात ठसली गेली आणि विवेकी विचारही बळकट झाला.

महाराष्ट्रातील पथनाट्य चळवळीचे जनक समर नखाते यांच्या अभ्यासवर्गात अक्षरशःविश्वरूपदर्शन होत असे. 'व्यक्तीचं व समाजाचं वर्तन कसं व का? हे समजलंच पाहिजे.राजकारणाचे व व्यवस्थेचे स्वरूप समजून घेण्यासाठी अर्थकारण समजून घेतलं पाहिजे.तसंच कोणीही कोणताही प्रश्न विचारला तर आपल्याकडे उत्तर असलं पाहिजे,'असे बजावत ते आपल्याला न पडणारे प्रश्न टाकून अस्वस्थ करत.त्यांच्या बोलण्यात मढेकर, विंदा,तुकाराम,नामदेव ढसाळ,इरावती कर्वे,नारायण सुर्वे,किरण नगरकर,भाऊ पाध्ये,कुमार केतकर यांच्यापासून फ्रॉइड,मार्क्स,अ‍ॅडम स्मिथ,जॉन केनेथ गालब्रेथ,रसेल,एरिक फ्रॉम,नोम चोम्स्की,एडवर्ड सैद, असे अनेक संदर्भ येत.माधुरी पुरंदरे यांच्याकडून दि.बा मोकाशी, म. वा. धोंड,त्र्यं. ना. अत्रे,ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक,गोडसे भटजी ते व्हानगोंग,पिकासो, रेम्ब्रा,सार्ज, सिमोन द बोव्हा,कुरोसावा,बर्गमन इत्यादींचे उल्लेख होत असत.मग त्या संदर्भाचा जमेल तसा पाठलाग सुरू केला.सोबतचे अनिल झणकर,दीपक देवधर,अश्विनीकुमार धर्माधिकारी,कामोद देशपांडे या मित्रांशी गप्पा मारताना 'वाचलं पाहिजे' हे ध्रुपद कायम असे. 'ते काय वाचतात? आपलं काय राहिलंय? आपण किती मागे?' ही भावना दाटून येत असे.त्या काळात (१९७८ ते १९८४) सर्वांच्या भेटीगाठींचे ठिकाण होते - 'कॅफे डिलाइट'! (गुडलक चौकातील 'हॉटेल वाडेश्वर'च्या जागी).तिथे तास न् तास बसल्यावर कला,राजकारण, समाजकारण यांवरील अनेक संदर्भ ऐकू येत.एकंदरीत सर्वत्र श्रवणभक्ती करताना आपल्या अत्यल्पज्ञानाचा साक्षात्कार पदोपदी होत असे.अशा वातावरणात वाचले तरच मी वाचणार होतो.त्या टप्प्यात मानवतावादी तत्त्वज्ञ,सामाजिक मानसशाखज्ञ एरिक फ्रॉम (१९००-१९८०) यांनी बराच काळ धरून ठेवले.फ्रॉम यांनी हिटलरच्या आगमनानंतर मायदेश जर्मनीला रामराम ठोकला.आधी स्वित्झर्लंड व पुढे ते अमेरिकेत वास्तव्यास गेले.औद्योगिक क्रांतीनंतर जगाची होत असलेली वाटचाल ते पाहत होते.त्यांच्या 'द सेन सोसायटी' (१९५५) मध्ये त्यांनी भांडवलशाही अमेरिका व साम्यवादी सोव्हिएत युनियन ह्या दोन्ही व्यवस्थांचे धारदार विच्छेदन केले होते.१९८२ मध्ये हे पुस्तक घेणे भाग पडले होते.पाठोपाठ वसंतराव पळशीकर यांनी सुचविल्यामुळे रॅचेल कार्सन यांचे 'सायलेंट स्प्रिंग' (१९६२) घेतले.ह्या दोन्ही पुस्तकांनी त्या काळातील प्रचलित विचारसरणींपेक्षा निराळ्या रीतीने पाहण्याची दृष्टी (लॅटरल थिंकिंग) दिली.सोव्हिएत युनियनच्या स्थापनेपासूनच त्यांच्यात आणि अमेरिका यांच्यात संघर्ष जाणवत होता.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर ह्या दोन्ही देशांनी त्यांच्या आधिपत्याखालील देश वाढवून आपापला साम्राज्यविस्तार सुरू केला.यातूनच शीतयुद्धाचा आरंभ झाला. (जॉर्ज ऑर्वेल यांनी 'तुम्ही आणि अणुबाँब' ह्या निबंधात 'कोल्ड वॉर' ही संज्ञा मांडली होती.) साम्यवादी व भांडवलशाही ह्या दोन्ही विचारांनी 'निसर्गाला अंकित करून विकास' घडवला. युद्धसज्जतेसाठीच अवकाश संशोधन,

अणुऊर्जा, संगणक ह्या तंत्रज्ञानातील शोधमोहिमा सुरू होत्या.या काळातच जगभर निसर्गाच्या मनमुराद विध्वंसाचा पाया घातला गेला आणि त्यामध्ये भांडवलशाही व साम्यवादी या दोन्ही विचारसरणी एकाच दिशेने प्रवास करू लागल्या.वसाहतीतून मुक्त झालेल्या अनेक नव्या देशांनी हाच कित्ता गिरवला.ह्या पार्श्वभूमीवर,फ्रॉम यांनी 'द सेन सोसायटी'त वास्तव दाखवले होते,आपल्या लोकशाहीमुळे समाज हा सभ्य व सुसंस्कृत होत नाहीए.व्यक्तींची व समाजाची आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा सर्व बाजूंनी प्रगती झाली,तरच समाज प्रगत होईल.त्याची कारणमीमांसा करताना ते म्हणतात,माणसाने स्वतःला निसर्गापासून अलग करीत निसर्गविनाश चालू केला.पुढे समाजापासून वेगळे होत व्यक्तिवाद जोपासला. व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तिवाद यात गल्लत करीत अतिरेकी व्यक्तिवादी होऊ लागला.ह्या प्रक्रियेत चढत्या भाजणीने वस्तुसंचय करू लागला.दरम्यानच्या काळात, बाजारपेठ अतिशय शक्तिमान होत व्यक्तींवर ताबा मिळवू लागली.बाजारानेच नीती व मूल्ये ठरविण्याचा मक्ता घेतला.बाजाराची भाषा सर्रास घराघरांत ऐकू येऊ लागली.पैशाला अतिरेकी महत्त्व येत गेले. पैसा हेच मोजमाप सर्वत्र लागू होताच कमीतकमी काळात व कमीतकमी कष्टांत अधिकाधिक पैसा हे आयुष्याचे ध्येय झाले.'बाजार' हे मूल्य व्यक्ती व समाज, नाती व नीती सारं काही घडवत जाते.यातून माणसांना असुरक्षितता,अनिश्चितता,एकाकीपणा ह्या भावनांनी ग्रासून टाकलं आहे.पूर्वी माणसाला गुलाम होण्याची भीती होती.बाजारपेठ हीच सार्वभौम होत चालल्याने भविष्यात माणूस यंत्रमानव होण्याची शक्यता आहे. असा भविष्यवेध करून फ्रॉम यांनी 'वो सुबह हमीसे आएगी' अशी आशा दाखवत 'मानवतावादी समुदायवादा'ची (ह्यमुनिस्टिक कम्युनिटिरॅनिझम) मांडणी केली.त्यांना उदार व उन्नत समाज अपेक्षित होता.'कोणीही कोणावर सत्ता न गाजवता एकमेकांशी साहचर्याने जुळवून घेणारा,इतरांविषयी बंधुभाव व वात्सल्याची भावना असणारा,व्यक्तीचा सातत्याने गुणात्मक विकास होण्यास पोषक वातावरण असणारा समाज घडवावा लागेल.' हे फ्रॉम यांचे स्वप्नरंजन असे संबोधून हिणवण्यापेक्षा,अशी स्वप्ने पाहणे आवश्यक असल्याची जाणीव तेव्हा झाली होती.आजही ती तशीच टिकून आहे.फ्रॉम यांनी मूलभूत समस्यांचा अन्वय लावणारी,'बियाँड द चेन्स ऑफ इल्युजन - माय एनकाउंटर्स विथ मार्क्स अँड फ्रॉइड','झेन बुद्धिझम अँड सायकोॲनॅलिसिस', 'द आर्ट ऑफ लिसनिंग','ऑन बिईंग ह्युमन' अशी अनेक मौलिक पुस्तकं लिहिली आहेत.व्यक्ती व समाज यांच्या वर्तनाची अनेकांगी चिकित्सा करणाऱ्या फ्रॉम यांचा पाठपुरावा करणे,मला गरजेचे होते.त्यांनी 'फिअर ऑफ फ्रिडम'मधून सांगितले,'स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन निर्णय घेताना माणसाला ताण येतो. त्यामुळे स्वातंत्र्याचं भय वाटून पलायनवादी माणसं आपला ताबा ईश्वर, बुवा, नेता यांच्याकडे द्यायला सहज तयार होतात.'

प्रेम ही एक कला आहे, हे स्पष्ट करताना 'द आर्ट ऑफ लव्हिंग' (१९५६) मध्ये फ्रॉम लिहितात, 'दुसऱ्या व्यक्तींची मालकी मिळवणे,तिच्याकडून अपेक्षापूर्ती करून घेणे म्हणजे प्रेम नव्हे.प्रेम ही नैसर्गिक बाब वा भावना नसून,ती एक साधना आहे.त्यासाठी आत्मप्रेमातून बाहेर पडून स्वतःमध्ये शिस्त व संयम,तसेच दुसऱ्या व्यक्तीविषयी विश्वास व आदर असावा लागतो.एका विशिष्ट व्यक्तीशी नातं प्रस्थापित करण्यापुरतं मर्यादित असतं ते 'प्रेम' नाही.तो विस्तारलेला अहं असतो.सर्व माणसांविषयी,प्राणिमात्रांविषयी प्रीती वाटणं ही विशाल व व्यापक प्रेमभावनेची खूण आहे.'

फ्रॉम यांनी 'द अ‍ॅनाटॉमी ऑफ ह्युमन डिस्ट्रक्टिव्हनेस' (१९७३) या पुस्तकात आक्रमकपणाचे सखोल व बहुआयामी विश्लेषण केलं आहे.टिकून राहण्यासाठी, स्व-रक्षणार्थ,उपजत येतो तो 'सौम्य आक्रमकपणा' असतो.इतरांचा ताबा मिळवणे,त्यांचा छळ करण्यात आनंद घेणे,ह्या प्रवृत्तींमधून 'विध्वंसक आक्रमकपणा' निर्माण होतो.अशी मांडणी करीत फ्रॉम यांनी हिटलर, मुसोलिनी,हिमलर यांच्या वर्तनाचे सखोल व सूक्ष्म पातळीवर मनोविश्लेषण केले आहे. (ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मानवी चेहऱ्यावरचे ओरखडे दाखवले होते. ते पाहताना शाळेतील पत्र्याच्या पाटीवर ब्लेडने ओरखडल्यावर येणाऱ्या कर्कश आवाजाचा अथवा फुलपाखराला हातात पकडून त्याचे एकेक पंख छाटतानाच्या क्रौर्याचा भास होतो.) 'आत्मकेंद्रितता वा आत्मप्रेमामुळे आक्रमकता वाढीस लागते.कधीकधी एखादा समूहच आत्ममग्न होऊन इतरांना तुच्छ लेखत, त्यांच्याशी क्रूरपणे वागू लागतो.अशा समूहात सामील व्यक्तींना त्या सर्वश्रेष्ठ असल्याचे भास होऊ लागतात. त्यामुळे त्यांना हिंसक होताना वावगं न वाटता ते कर्तव्यच वाटू लागते.आक्रमक वृत्ती ही जैविक (बायॉलॉजिकल) नव्हे.(तसा सिद्धांत डेसमंड मॉरिस व आपल्याकडे विजय तेंडुलकर यांसारखे अनेक जण मांडत होते.) एकमेकांविषयी प्रेम व आदर,सहकार्य व साहचर्य हे नैसर्गिक आहे.त्यासाठी माणूस व निसर्ग यांना केंद्र मानून विकास करणारा समाज घडवला पाहिजे,'असं ते म्हणतात.

फ्रॉम यांच्या अखेरच्या काळातील लिखाणातून बौद्ध विचार अधिकाधिक येत गेले.कित्येक वेळा त्यांच्या मांडणीत जे.कृष्णमूर्तीचा भास होत असे.

'सर्व बंधनं व चौकटींच्या पलीकडे जाताना तूच तुझा दीप हो' हे त्याचे तात्पर्य होते. (शांती, करुणा, सहकार्य, एकवटलेपणाची भावना यांमुळे मेंदूत सकारात्मक व सुखावह बदल होतात, असे अलीकडील मेंदुशास्त्रातील अनेक संशोधनांत दिसून येत आहे.) 

'सायलेंट स्प्रिंगमुळे विश्वाचा समग्र विचार करण्यातून पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण झाली.'ही पृथ्वी केवळ माणसांचीच नाही,तर ती सर्व वनस्पती व प्राण्यांचीही आहे.आर्थिक विकासाच्या नादात हे भान ठेवलं पाहिजे.या जीवसृष्टीच्या साखळीमधील प्रत्येक कडी तेवढीच महत्त्वाची आहे.कुठलीही कड़ी तुटली, तर विश्वाची जैविक लय बिघडून जाईल.माणसाने निसर्गाला बाधा आणणारा विकास सुरू ठेवल्यास तो विनाशाकडे नेईल.' या विचारांना हळूहळू जग गंभीरपणे घेऊ लागले.'सायलेंट स्प्रिंग'मुळे जगाची विचार करण्याची रीत बदलून गेली.

विख्यात निसर्गवादी वृत्तपटकार सर डेव्हिड अ‍ॅटनबरो म्हणतात,'चार्ल्स डार्विन यांच्या 'ओरिजिन ऑफ स्पिसिज'नंतर वैज्ञानिक विश्वाला बदलून टाकणारं पुस्तक म्हणजे 'सायलेंट स्प्रिंग!'

१९८५ साली सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी शस्त्रस्पर्धा थांबवून अण्वस्त्र निकामी करण्यास सुरुवात केली आणि शीतयुद्धाच्या अंताचा आरंभ झाला.१९९१ला सोव्हिएत युनियनच कोसळल्यावर शीतयुद्ध समाप्त झाले,त्यानंतर मागील ३० वर्षांत निसर्गविनाशाचा वेग गेला.त्यासोबतच हवामानबदलाच्या समस्या वाढत गेल्या.अजूनही विविध कारणांनी फ्रॉम यांचे संदर्भ येतच राहतात.फ्रॉम यांनी माणसाला जीवसृष्टीविषयी असणाऱ्या उपजत प्रेमाला 'जीवाकर्षण (बायोफिलिया)' म्हटले होते.२०१९ मध्ये पर्यावरणाचे तत्त्वज्ञ प्रो.ग्लेन अलब्रेख्त यांनी जीवाकर्षण या संकल्पनेचा विस्तार केला.

अल्ब्रेख्त यांच्या मते,'माणसाला केवळ स्वतःच्या परिसराविषयीच नव्हे, तर सजीव-निर्जीवांसकट असलेल्या व्यापक विश्वाविषयीचा जिव्हाळा व आकर्षण असतं व ते वाढलं पाहिजे.' या समग्र विचाराला ते 'विश्वाकर्षण' (सोलीफिलिया) म्हणतात. तर अमेरिकी विचारवंत प्रो.मायकेल सँडल यांनी समुदायवादाची निकड सांगताना म्हटले आहे,"व्यक्तिवादामध्ये सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या व्यक्ती हीच केंद्रस्थानी असते. समुदायाची सांस्कृतिक व आर्थिक प्रगती झाल्यास व्यक्तींची आपसूकच होते व व्यक्तींचे आपापसांतील संबंधही सुधारतात.'पुढे कुमार केतकरांमुळे जे.कृष्णमूर्ती वाचत गेलो.'जीवनदृष्टी' ह्या पुस्तकातून ते अस्तित्व,प्रेम, आनंद,भय, दुःख यांविषयी मूलभूत प्रश्न विचारत हादरवून सोडतात.ते म्हणतात,

'आपल्याला निसर्गाकडे वा माणसांकडे निखळ पाहताच येत नाही.अनुभव वा ज्ञान यांमुळे आपण पूर्वग्रह तयार करतो आणि ते घेऊनच व्यक्ती वा प्रसंगांना सामोरे जातो. निसर्गात सर्व काही नित्य नव्याने व सहज होत असते.

तसे आपण प्रत्येक घटनेकडे कुठलाही आग्रह,पूर्वग्रह न ठेवता मोकळेपणाने पाहावे.प्रेमाने व कुतूहलाने पाहिल्यास आपल्याला साधेपणातील सौंदर्य दिसेल. आकाश,झाडं,पानं,फुलं,पक्षी यांतील रंग गंध,आकार, ध्वनी व स्पर्श यांतील सौंदर्य उमजून येईल.' सद्यः परिस्थितीविषयी ते सांगतात,'निसर्गाशी असलेलं नातं तुटताच मानवताही संपुष्टात येते.मग तुम्ही स्वतःच्या नफ्यासाठी वनस्पती असो वा प्राणी,सरोवर असो वा नदी,सर्वांची सर्रास हत्या करीत सुटता.तुमच्यामुळे भयग्रस्त झालेला निसर्ग स्वतःचे सौंदर्य आकसून घ्यायला लागतो.' बदलांसंबंधी त्यांना अनेक प्रश्न विचारले जात.ते म्हणत, विज्ञान ज्या वेगानं प्रगती करत आहे,त्या वेगानं माणसाचं मन प्रगत होत नाही.आता प्रत्येक व्यक्तीला स्वतः सोडून इतर कोणालातरी बदलावयाचं आहे; परंतु त्याने आधी स्वतःला बदललं पाहिजे,स्वतःची सफाई केली पाहिजे.'

याच काळात पं.कुमार गंधर्व यांचे गायन,मुलाखती, तसेच त्यांच्यावरील लेख यांतून एक विशाल दालन खुले होत गेले.कुमारजी म्हणत,'मी कधीही शाळेत न गेलेला एक जीव आहे;परंतु मी असं मानत आलोय,'की, येणारा प्रत्येक क्षण,प्रत्येक अनुभव हा मला काही शिकवण्यासाठीच आला आहे.'त्यांची श्रोत्यांबद्दल 'आपण कधीच समाधानी होता कामा नये.

तुम्ही लवकर तृप्त होता.'ही तक्रार असे.ते स्वतः कधीही तृप्त झाले नाहीत.ते सातत्याने जगाकडे नव्यानं पाहत गेले आणि नवनिर्मिती करीत गेले.म्हणूनच ते म्हणू शकले, 'आताचा राग आणि कुमार इथेच संपला.उद्याचा राग व कुमार वेगळा असेल.'

एकंदरीत व्यक्ती व समाज हे सुसंस्कृत व प्रगल्भ होत जावेत,याचसाठी फ्रॉम,कृष्णमूर्ती,विनोबा,कुमारजी यांचा अट्टाहास होता.ते त्यांच्या मंथनातील नवनीत, आपल्या हातात आयतेच ठेवत गेले.त्यांचे मार्ग वेगवेगळे असले,तरी त्यांच्या विचारांतील सूत्र मात्र सारखेच होते. त्याची अधूनमधून उजळणी करताना 'माझे मज कळो येती अवगुण' ही तुकोबांनी सांगितलेली अवस्था येत राहते.स्वतःतील अपूर्णता नेहमी अस्वस्थ करीत राहते. तरीही ह्या ज्ञानियांच्या सान्निध्यात राहून स्व-क्षमतेनुसार काही शिकण्याचा प्रयत्न सुरू ठेवायचा.

■■■ क्रमशः ■■■


4/25/26

कोल्हा : एक धूर्त प्राणिविशेष / Fox: A cunning animal

कोल्ह्यासारखा लबाड आणि चतुर प्राणी नाही म्हणतात ते खरं असल्याची प्रचीती निदान त्याचं निरीक्षण करणाऱ्याला येते.त्याला शोधून कसं काढावं हाच मुळी प्रश्न पडतो.वर्षाच्या ठरावीक काळातच कोल्हा निश्चितपणे अमुक ठिकाणी सापडेल असं सांगता येत असलं,तरी तो मुक्त व स्वच्छंद प्राणी आहे.

कोल्ह्याची पिलं कप्पी व जमिनीतील पोखरीत बराच काळ राहतात.कित्येकदा ही लबाड बछडी कप्पीच्या समोर मे-जून महिन्यात खेळता-बागडतानाही दिसतात. वीण होताच कोल्ही त्यांना पाजवीत राखीत असते.जरा मोठी झाली की त्यांची मातापितरं त्यांना भक्ष्य आणून देतात.त्यांचं निरीक्षण करायचं तर विणीच्या काळात.

जुलै ते मार्च या प्रदीर्घ काळात कोल्ही कधी व कुठे दिसतील हे मात्र निश्चित सांगता येणार नाही. कोल्ह्यांच्या कप्पी व पोखरी शोधून काढणं ही देखील सोपी गोष्ट नाही.पोखरीच्या रचनेमुळे कोल्ह्याच्या वास्तव्याची खात्री झाली नाही,तर वासानं त्याच्या ठावठिकाणाची निश्चिती करता येते.कोल्ह्याच्या अंगाला कस्तुरीसारखा उग्र वास येतो.त्याच्या पोखरीत डोकावलं की तो तीक्ष्ण वास येताच कोल्होबा तिथे राहतात असं समजायचं.त्याचा वास इतका उग्र असतो की,कित्येक वेळा हा वास जमिनीवरूनही येतो.आपल्याकडे कोल्ह्याची पारध करण्याकरिता शिकवलेली जातिवंत कुत्री उपयोगात आणीत नाहीत. परंतु कुठल्याही पारध्याला विचारा,

त्यांची शिकारी कुत्री कोल्ह्याच्या वासाचा मागोवा घेत कशी पाठलाग करतात ते!

विचलित व भयभीत झालेल्या कोल्ह्याचा वास अधिक उग्र असतो असं म्हणतात.ज्या कोल्ह्याचा ससेमिरा करण्यात येतो तो चतुर कोल्हा जसजसा थकतो, तसतसा कमीकमी वास अंगातून सोडतो.भीती,राग, सजग व विचलितपणापासून मुक्त असलेल्या कोल्ह्याचाच परिचित वास येतो.

कोल्ह्याचं एकंदर वागणं पाहून मला नेहमी वाटत आलं आहे की,तो मनात म्हणत असेल :"भल्या गृहस्था,तुला माझा उग्र दर्प जवळून येत असेल,परंतु तुझा वास मात्र मला अर्ध्या मैलावरून येतो.आता यात घाणेरडा कोण हे तूच ठरव!"

कोल्ह्यानं आपला वास लपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या पाऊलखुणा एखाद्या स्पष्ट सहीसारख्या सराणीतील पवाट्यात,पोखरीजवळच्या मातीत उमटलेल्या दिसतात.पण इथे थोडं सावध राहायला हवं.कोल्ह्याच्या अन् कुत्र्याच्या पाऊलखुणांतील फरक ओळखणं कठीण असतं,

धनगराची अन् गुराख्याची कुत्री त्यांच्या बिळात उगीचच नाकं खुपशीत असतात आणि ह्याच कुत्र्यांच्या पाऊलखुणांमुळे कोल्ह्यांची पाऊलचिन्हं ओळखणं अवघड होतं.

स्वतःचा मागमूस लागू न देणाऱ्या ह्या कोल्ह्याचा ठावठिकाणा मात्र विणीच्या काळात त्यांच्या कप्पी पोखरींच्या तोंडाशी पडलेल्या खाद्याच्या अवशेषांवरून लागतो.कोल्ह्याची मादी जरा वेंधळीच असते.अन्नाचा सुकाळ असला की कप्पीच्या तोंडाजवळ पक्ष्यांचे पंख, पिसं,चोच,पंजे,हाडं,सशाची एखादी तंगडी इत्यादींचे अवशेष आढळून येतात.पाखरं,ससे, तसंच जंगलात हिंस्र पशुंनी मारून फस्त करून टाकलेल्या प्राण्यांच्या उरल्यासुरल्यातनं आणलेली मोठी हाडं इत्यादीमुळेही त्यांची कप्पी शोधून काढणं शक्य होतं.

एकदा तर मी एका कोल्ह्याच्या कप्पीजवळ ढाकाची (नर सांबर) मांसविरहित तंगडी,सशाचे पाय, रानकोंबड्यांच्या दोन चोची व तणमोराची पिसं पाहिली. पोखरीच्या तोंडात अडकलेल्या तणमोर व तित्तिराच्या पंखांचे अवशेष दिसले.प्राणिजगात धूर्त म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या कोल्ह्यानं आपल्या अस्तित्वाच्या अशा खुणा ठेवाव्यात याबद्दल आश्चर्य वाटत असलं तरी निसर्गात असं सहज घडतं मात्र.जलाशयाकाठी कासवाची अंडी पिलं खाण्यासाठी कोल्ह्यांनी केलेल्या उगद्यांवरूनही (उकरलेले खड्डे) त्यांचं अस्तित्व कळून येतं.मांजराप्रमाणे तो आपली विष्ठा खळगा करून पुरत नसल्यामुळे विष्ठेचा मागोवा घेऊनही त्याचं एखाद्या ठिकाणातील अस्तित्व शोधून काढता येतं.

विणीच्या काळात कोल्ही दगडमातीच्या खाणीत, शेताच्या बांधाच्या पोखरीत (मोंगाड) आश्रयाला राहत असली तरी जंगलातून परंपरेनं चालत आलेली त्यांची कप्पी-पोखरींची स्थळं आढळून येतात.अशा ठिकाणी कोल्ही वर्षाकाठी वा काही वर्षांआड हमखास दिसतात. पारधी,शिकारी,धनगर,गुराखी व गायकी यांना कोल्ह्यांची निवासस्थानं असलेली अशी स्थळं ठाऊक असतात.परंतु कोल्हाही मोठा वस्ताद असतो.नित्य नवनवे निवारे,आश्रयस्थाने यांच्या शोधात तो असतो. एकदा मी जंगलातील उजाड पुलाखाली डोकावलो असता कोल्ही आपल्या लहानग्या बछड्याला पाजताना दिसली.

विणीच्या काळात पिलांसह त्यांचा ठाव घेणं मोठं कठीण असतं.कोल्हीला कुत्र्या-माणसाचा थोडा जरी वास आला तरी ती आपला निवारा सोडून पिलांसह निघून जाते.बिळासमोर नाचत-बागडत असलेली कोल्ह्याची गोजिरवाणी निष्पाप पिलावळ पाहणं मोठं मनोरंजक व आनंददायी असतं.'माणूस' नावाच्या शत्रूची अजून पुरती ओळख देखील झालेली नसते.रोज सकाळ-सायंकाळ पोखरीच्या तोंडालगत ती खेळताना दिसतात.मात्र मांजराच्या पावलानं त्यांना पाहावं लागतं. ती कितीही निष्पाप असली,तरी आपली चाहूल मात्र त्यांना लागू देऊ नये.निर्धास्त असलेली ही पिलं तांबडं फुटताच न्याहरीच्या वेळेपर्यंत बिळाच्या तोंडाजवळ खेळताना दिसत असली तरी त्यांना पाहणं तितकं सोपं नाही.पिलं जरी मूर्ख असली,तरी कोल्ही चतुरच असते.तिला काही सहज फसविता येणार नाही.पहाटेपूर्वीच्या काळोखात भक्ष्याच्या शोधात गेलेली कोल्ही दिवस उगवेपर्यंत पिलासाठी घास घेऊन परत येणार नाही,असं नव्हे.

कप्पीकडे येणारी कोल्ही तुम्ही कधी पाहिली आहे काय? गनिमी काव्याचे सारे पवित्रे घेत,नाकात सारा जीव आणून,शत्रूचा पावलागणिक वास घेत,पोखरीला वळसा घालीत मोठ्या सावधानतेनं ती घराकडे येते. तिच्या अद्‌भुत सहाव्या इंद्रियापासून काहीही लपून राहत नाही आणि म्हणूनच जमिनीवरून येणाऱ्या तुमच्या वासामुळे तिला तुमचा सुगावा लागू नये ह्यासाठी तुम्ही जमिनीपासून जरा उंचावरच जायला हवं.

कोल्ही तुम्हाला हेरील,तुम्ही जमिनीवर असताना हेरीलच.लगेच भुंकून ती आपल्या बछड्यांना सावध करील.पिलं इकडेतिकडे पाहण्यात क्षणाचाही वेळ न दवडता किंवा कसलंही कुतूहल न दाखविता लगेच बिळात धूम ठोकतील.त्या क्षणी त्यांना आलेला वास, पाहिलेलं दृश्य व आईचं विशिष्ट भुंकणं यांची सांगड घालून भविष्यात ती त्या वासाशी,दृश्याशी असलेलं धोक्याचं साहचर्य भुंकण्याशिवाय ओळखू शकतात,ती कायमचीच.

माणसाच्या आकाराशी,वासाशी परिचित झालेल्या मोठ्या पिलांचं आचरण प्रौढ कोल्ह्याप्रमाणेच असतं. पावसाळ्याच्या सुरवातीला ती खूप जाणती झालेली असतात.या काळात त्यांचं जमिनीवरून निरीक्षण करावयाचं तर दुर्बिणीतून दूर अंतरावरून किंवा जमिनीपासून उंचावरून.

तीन महिन्यांची मोठी पिलं मी रोज पहाटे चारच्या सुमारास अर्ध्या एक फर्लांगावरून पाहत असे.एकदा मात्र पाठमोऱ्या येणाऱ्या कोल्हीनं मला हेरलं.तशी तिनं पिलांना धोक्याची साद घातली.

व्यालेली कोल्ही सकाळ-सायंकाळ तिच्या पिलांबरोबर असताना थोडीफार दक्षता घेऊन तिचं निरीक्षण करता येणं सहज शक्य आहे.तुम्ही जरी जमिनीपासून पन्नाससाठ फूट उंचीवर असलात तरी अल्पशा हालचालीनं ती सावध होते.यापुढे तिथे राहणं तिला धोक्याचं वाटलं,तर लगेच ती आपलं बिन्हाड हलविते.

उंचावर बसलेल्या तुम्हास ती पाहू शकणार नाही.परंतु कुठल्याही प्रकारचा आवाज,हालचाल करण्याचं टाळणं अत्यंत आवश्यक असतं.लांबच्या अंतरावरून येणाऱ्या आवाजांची,हालचालींची ती कदाचित दखल देखील घेणार नाही.

तिच्या कप्पीपासून बारा फूट अंतरावर बसून,निश्चिंत मनानं बाहेर येणाऱ्या कोल्हीला मी काही वेळा पाहिलं आहे.परंतु अशा प्रकारची लगट वा जवळीक करण्यास मी तरी सांगणार नाही.

पोखरीसमोरच्या झाडाच्या किंवा शिलाखंडाच्या आश्रयाने,पाठमोरा वारा नसताना तुम्ही कदाचित तिला पाहू शकालही,पण ती चतुर कोल्ही कर्मधर्मसंयोगानं तुमच्या पाठीमागूनच आली तर !...तर पुन्हा त्या ठिकाणी ती कधीच दिसणार नाही; सहपरिवार ती तिथून लगेच निघून जाईल.

कोल्ह्याचं निरीक्षण करावयाचं तर पुढील नियम पाळायलाच हवेत.त्यांना दुरून पाहावं.दिवसाउजेडी उघड्या डोळ्यांनीच त्यांना पाहायचं झालं तर थोर्ड दूरवर गेल्यानं,जरा लांब अंतरावर राहिल्यानं काही बिघडणार नाही.उलट फायदाच होईल.त्यांच्यापासून वीसएक फुटांवर असण्यात खूप तोटे आहेत,तर पन्नास यार्डावर आपण मोठे सुरक्षित असतो.

कोल्ह्यीचं छायाचित्र मिळणं म्हणजे कपिलाषष्ठीचा योगच म्हणायला हवा!आपल्या आवाक्यातलं कप्पीजवळचं एखादं झाड,जवळपासची झाडंझुडपं यांच्या आश्रयानं तिचं एखादं छायाचित्र घेणं अशक्य नाही.कप्पीच्या तोंडाजवळ दिसणाऱ्या रिफ्लेक्टरमुळे ती कोल्ही अशी काही बुजून जाते की नंतर तिचं छायाचित्र मिळणं दुष्करच.कोल्ह्याचं छायाचित्र टिपता येणं हे आजही एक आव्हान आहे.

कोल्हा-कोल्ही आपल्या अजाण बछड्याची मोठ्या दक्षतेनं काळजी घेतात.खरोखरीच ती आदर्श मातापितरं असतात.वेळ पडली तर कोल्ही आपली पिलं वाचविण्यासाठी जिवाचा धोका पत्करेल.स्तनपान सोडलेली,आईविना असलेल्या पिलांची कोल्हा जोपासना करतो.त्यांना आईच्या मायेनं वाढवितो.

भक्ष्याविषयीच्या कोल्ह्याच्या काय सवयी आहेत त्याचं निरीक्षण सामान्यतःत्याच्या विष्ठेच्या पृथक्करणानं करता येतं.परंतु त्यांच्या कप्पीजवळ पडलेल्या पशुपक्ष्यांच्या अवशेषांवरूनही खूप माहिती मिळू शकते.दिवसाउजेडी तोंडात भक्ष्य धरून गुहेकडे येताना ते काय आणतात, यांच्याही नोंदी ठेवाव्यात.हेच निरीक्षण तांबडी काच असलेल्या विजेरीच्या साह्यानं रात्रीच्या वेळी गुहेच्या तोंडाजवळ करता येतं.कारण तांबड्या प्रकाशानं ते बुजत नाहीत.

निळावंती मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र सिताबर्डी,नागपूर

त्यांच्या पोटातील अवशेषांवरून व विष्ठेच्या पृथक्करणानं मिळालेल्या माहितीवरून असं आढळून आलं आहे की,कोल्हे नाना प्रकारचं खाद्य खातात. गावकोंबड्या,तित्तिर,लावा व ससे यांवरच कोल्ही जगतात असं समजणं चुकीचं आहे,पण संधी मिळाली तर ते हे प्राणी सोडणार नाहीत,हेही तितकंच खरं आहे. घुशी,उंदीर,बेडकी,घुई,कोश-अळी,किडे,मृत प्राण्यांचं मांस हे त्यांचं मुख्य अन्न आहे.विविध फळंही त्यांना आवडतात.बहाव्याच्या गुळमट शेंगा त्यांना फार आवडतात.शेतातील ऊस,खरबूज,

कलिंगड,गाजर व रताळी ज्या ज्या वेळी सहज प्राप्त होतात,त्या त्या वेळी ते खातात.बोरं खाण्यासाठी ते बोराच्या झाडाखाली गोळा होतात.दूरदुरून अभयारण्यं पाहायला येणाऱ्या प्रवाशांना कोल्ही हमखास दाखविण्यासाठी वाघाप्रमाणे गारा (बेट : आमिषादाखल मुद्दाम मारून टाकलेलं जनावर) बांधावा लागतो.

सशाइतका उत्तम गारा नाही. परंतु सुकविलेलं मांस व अंडीही त्यांना आवडतात. एकदा का अशा गाऱ्याची सवय जडली की कोल्ही पुनःपुन्हा तिथे येताना दिसतात.

कधीकधी,कोल्ह्याला सहज चढता येईल अशा झाडावर 'गारा' बांधावा.कोल्ही अशा झाडांवर चढतात. कित्येकदा त्यात लपून बसलेलीही आढळतात.अशी संधी प्राप्त करून दिल्यामुळे त्यांना चढताना,उतरताना पाहता येणं सहज शक्य होतं.

जानेवारी-फेब्रुवारी हा त्यांचा विणीचा काळ.ज्या माळरानात कोल्हेकुई नेहमी ऐकू येते अशा जागेपासून काही अंतरावरच्या टेकडीवर चांदण्या रात्री बसलात तर कदाचित कोल्ह्याची एखादी जोडी दिसेलही.वाघानं टाकून दिलेल्या सांबराच्या अवशेषांवर कोल्ही मोठ्या संख्येनं जमा होतात.तुम्हाला शिकार आवडो न आवडो; पारधी,वैदू,शिलाजितवाले व आदिवासींची शिकारी कुत्री कोल्ह्यांचा माग काढताना जरूर पाहा;म्हणजे कोल्हा कुत्र्यांना कसा गुंगारा देतो कसा चकवतो ते दिसेल.असं एखादं शिकवलेलं कुत्रं जवळ बाळगलं तर कोल्ह्याचा माग काढायला त्याचा खूप उपयोग होतो.

एखाद्याला अचानक खूप लाभ झाला वा घबाड हाती लागलं तर अजूनही ग्रामीण भागात म्हटलं जातं की, "कोल्ह्याचं तोंड पाहिलंस की काय?" याचं कारण कोल्हा दृष्टीस पडण्याची संधी क्वचितच मिळते.एकदा मी वनमार्गानं जाताना दव पडलेल्या गवतावर उगवत्या सूर्याच्या प्रकाशात एक कोल्हा लोळताना दिसला. तळ्याच्या काठानं पक्षिनिरीक्षण करताना सराणीतल्या (नदीचं मागे सरलेलं खाडीसारखं पाणी) खोलगट भागातूनही त्याला बिचकून धूम ठोकताना अनेक वेळा पाहिलं.भावतरल मनाची माझी पहिली आठवण कशाची असेल,तर ती आहे समुद्रावरच्या मावळत्या सूर्याची दोन्ही बाजूला निळाईनं झाकलेल्या पर्वतमाला. मध्ये अथांग पसरलेल्या गूढ जलाशयावरच्या निळ्याहिख्या लाटा.सागर- सीमेवरील ते छोटंसं गाव. नारळ-पोफळी-केळी यांच्या सुंदर बागा.

किनाऱ्यावरचं ते केतकीचं बन आणि आपल्या पिलांबरोबर लपतछपत केवड्याच्या बनांतून डोकावणारी चतुर कोल्ही.


¶¶¶ समाप्त ¶¶¶

4/23/26

मीराबाई - आगळंवेगळं धाडस / Meerabai - extraordinary courage

कदाचित मेवाडच्या मीराबाईने आगीत उडी घेतली असती,तर पद्मावतसारखा तिच्यावरचा सिनेमा आला असता आणि मग एकविसाव्या शतकातील पुरुषांचा फौजफाटा तिच्या मानसन्मानाच्या रक्षणाच्या नावाखाली काचा फोडायला आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करायला रस्त्यावर उतरला असता.काल्पनिक सौंदर्यवतींनी आपल्या अंगावरील जडजड आभूषणे आणि वस्त्रप्रावरणे सावरत धाडस आणि अविचल धैर्याच्या गोष्टी बोलायच्या,त्या बोलताबोलता हसतमुखाने चितेत उडी घेऊन प्राणत्याग करायचा अशा भ्रममूलक गोष्टींमुळे पितृसत्ताक मर्दानी अभिमान जेवढा जागृत होतो तेवढा अन्य कशामुळेही होत नाही. त्यामुळे (बहुधा काल्पनिकच) पद्मावती 'योग्य तऱ्हेच्या दुःखी नायिकेने मरावं' त्या प्रकारे मरते पण खरीखुरी मीराबाई मात्र 'योग्य प्रकारे झुकण्यास नकार देऊन' पुरुषसत्तेसमोर एक समस्याच उभी करते.पती रणांगणावर मृत्यू पावल्यावर चितेवर चढण्याऐवजी मीराबाईनं ठामपणे जाहीर केलं की, मी सती जाणार नाही.त्याऐवजी लाडकं दैवत श्रीकृष्ण याच्या स्तुतीपर कवनं गात गात जगण्याचा पर्याय तिनं निवडला.

राजपूत समाजाच्या उग्र धर्मरक्षकांच्या दबावाला ती जराही बळी पडली नाही.नंतरच्या काळात पितृसत्तेने तिला स्त्रीरूपातली 'देवभक्तीची साक्षात मूर्ती' म्हणून स्वीकारलं असलं,तरी तिच्या स्वतःच्या काव्यात मात्र आपल्याला स्वेच्छेने वागणारी एक स्त्री दिसते.

जिनं मानसन्मानाच्या सगळ्या प्रस्थापित संकल्पना झुगारून दिल्या आणि भोवतीच्या प्रत्येकच मर्त्य मानवाचा अधिकारही झुगारून दिला.

सोळाव्या शतकाचं तांबडं फुटत असताना मीराबाईचा जन्म राजस्थानमधील मेरठ येथे झाला. प्रशंसकांनी लिहिलेल्या तिच्या संतचरित्रानुसार,ही मातृहीन कन्या आजोळच्या घरी लहानाची मोठी झाली.अगदी कोवळ्या वयापासूनच तिला कृष्णाबद्दल खूप प्रेम वाटत होतं.सन १५१६च्या सुमारास किशोरवय संपत असतानाच तिचा विवाह मेवाडचा विख्यात राणा संग याचा पुत्र भोजराज याच्याशी लावून देण्यात आला.तथापि,त्यांचे गुंतागुंतीचे वैवाहिक जीवन जास्त काळ टिकलं नाही.लग्नाला दहा वर्षं होण्यापूर्वीच मीराबाईचा नवरा वारला आणि राजघराण्यातील तिचं स्थानही डळमळलं.सती जाण्यास नकार दिल्यामुळे विधवापणामुळे आपोआपच मिळणारा दर्जाही नाहीसा झाला,परंतु त्रास देणारी स्त्री म्हणून आपली प्रतिमा निर्माण होत आहे,याची तिला तमा नव्हती.तिच्या एका अभंगात तिनं नवऱ्याच्या वारसाला उद्देशून म्हटलंय,"मला ही निंदा,हा कलंक मधुर वाटत आहे.मीरेचा प्रभु तर तो गिरिधर नागर आहे आणि दुष्टदुर्जनच भट्टीत जळणार आहेत." 

मीराबाईचं कृष्णावर उत्कट प्रेम होतं याबद्दल काहीच संशय नाही.तिच्या दैवी प्रियकराच्या विरहदुःखाविषयी तिनं रचलेली गीतं ही तिची महान गीतं समजली जातात.परंतु तिचा आवाज जगाला आव्हान देणारा आवाजही होता यातही काही संशय नाही.सासरचे लोक स्वतःची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि ती राजघराण्याची मर्यादा ओलांडते आहे म्हणून तिच्यावर बरीच बंधनं घालू इच्छित होते.परंतु मीराबाईने त्यांच्यापुढे मान तुकवायला नकार दिला.

मीराबाईच्या निधनानंतर लगेचच लिहिल्या गेलेल्या 'नभदास' यांच्या 'भक्तमल' ग्रंथात यातला काही प्रतिकार दिसून येतो.

त्यात हे संत लिहितात,"त्या गिरिधर कृष्णासाठी लोकलाज आणि कुलमर्यादा या दोन्ही गोष्टी मीराबाईने सोडून दिल्या होत्या. तिला कसलीही लाज आणि भीती उरलेली नव्हती. कुणाही समोर ती झुकत नव्हती.फक्त प्रेमाचा मृदंग वाजवत होती." वेगळ्या शब्दांत सांगायचं तर विधवेच्या पोशाखातलं कुणाच्याही समोर न येणारं जीवन जगण्यापासून मीरा दूर होती,तसंच ती पतिव्रतेच्या (म्हणजे पद्मावतीच्या) भूमिकेतही बसत नव्हती.

त्याऐवजी मीराबाई मोकळेपणानं अन्य भक्तांत वावरत होती आणि सहसा जिथं स्त्रियांना जायची परवानगी नव्हती,अशा ठिकाणी जात होती.एवढंच नव्हे;तर तिच्याशी संवाद साधणारे लोक वेगळ्याच प्रकारचे,वेगळ्याच पार्श्वभूमीतून आलेले होते.राजपूत विधवेचे आदर्श सोबती असं नक्कीच त्यांना म्हणता आलं नसतं.

समाजात तिनं तोंडही दाखवायचं नाही असं रूढी सांगत असताना मीराबाईने त्याच्या बरोब्बर विरुद्ध मार्ग निवडला त्यामुळे तिच्या कुटुंबाला अधिकच राग आला.तरीही तिला त्याची पर्वा नव्हती.ती त्याबद्दल म्हणते,"हे राणा,मला तुझी ही विचित्र दुनिया आवडतच नाही.या दुनियेत साधू कुणीच नाहीत,आहेत ते सगळे पाखंडी."


तिच्या या निर्धारामुळे तिच्यावर विषप्रयोग करण्याचाही प्रयत्न झाला,परंतु तरीही ती डगमगली नाही.तिनं आपल्या काव्यात म्हटलं,"राणा, साधुसंतांकडे जाण्यापासून मला कुणी रोखू शकत नाही.लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही." सरतेशेवटी,मीराबाईला सर्वांनी वाळीत टाकलं आणि त्यामुळे तिचा निर्धार अधिकच वाढला.


ती गाऊ लागली,"मूरख को तुम राज दियत हो, पंडित फिरत भिखारी." तर अन्य ठिकाणी ती म्हणते, "राणा रागावत असेल रागावू दे,त्याचं राज्य त्याला लखलाभ असो;पण देव रागावला तर मात्र मी कोमेजून जाईन."असं बोलून तिनं आपली निष्ठा कुठे आहे हे दर्शवलं.


ध्रुवदास लिहितात,"पायांत पैंजण आणि हातात चिपळ्या घेऊन ती नाचत होती.हृदयात विशुद्ध भक्ती घेऊन ती अन्य देवभक्तांना भेटत होती,तेव्हा तिला दुनियेचा क्षुद्रपणा कळत होता."तिला खूप काही गोष्टी सोडून द्याव्या लागणार होत्या.

परंतु हृदयाच्या हाकेला ओ देत तिनं ते सगळं तत्परतेने सोडून दिलं.मीराबाई लिहिते,"मी माझं सामाजिक शरीर त्यागलं,

शहरी शरीर त्यागलं,माझं कौटुंबिक शरीर त्यागलं,मला वारसाहक्काने मिळालेली सगळी आभूषणं त्यागली." केवळ कृष्णावरच सगळं चित्त लागल्याने प्रत्येक हानी तिनं घट्ट मनाने सोसली आणि ती लोकांच्यात मिसळून गेली.ती 'त्याची' गाणी गात होती आणि गाता गाता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वही राखत होती.


गणिका महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण, भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्या,मनू.एस.पिल्लई,अनुवाद सविता दामले,मधुश्री पब्लिकेशन


हळूहळू मीराबाई 'प्रवासी संत' बनली.एके काळी जी राजाची राणी होती तिथंच आज ती बहिष्कृता बनली.तिच्या सत्संगाला हजेरी लावणारे लोक बरेच होते;परंतु तिचा मार्ग हलाखी आणि सत्त्वपरीक्षांनी भरलेला होता.भक्तिपरंपरेतील काही लोक तिला आव्हान देत होते किंवा या स्वच्छंद स्त्रीचा फायदा घेण्याचाही प्रयत्न करत होते.पण ती त्यांनाही पुरून उरली.द्वारका येथे त्या शतकाच्या मध्यावर मरतानाही ती स्वतःच्या अटीवर मेली.(दुसऱ्यांच्या इच्छेने पती-चितेवर जळून नव्हे) तिच्या कहाणीने नंतर बऱ्याच लोकांना भारावून टाकलं. महात्मा गांधींना तिच्यात अहिंसक प्रतिकाराचं उदाहरण दिसलं,तर कर्नाटक संगीत गायिका एम. एस.

सुब्बलक्ष्मींनी मीराबाईची धार्मिकता चित्रपटीय पडद्यावर आणली.परंतु त्याचसोबत कुटुंब,विवाह, जात,घराणे,राजपद आणि अगदी भक्तिमार्ग यांच्यासारख्या सामर्थ्यशाली आणि खोलवर रुजलेल्या संस्थांशी संबंधित मूल्यंही मीराबाईने स्वीकारली नाहीत,मानली नाहीत आणि धुडकावून लावली,

हेही तितकंच महत्त्वाचं आहे.तिनं प्रत्येक ठिकाणाहून लादण्यात आलेलं अपेक्षांचं ओझं झुगारून दिलं आणि तिला देवाजवळ घेऊन जाणारं जे जे काही होतं तेच कष्टपूर्वक कवटाळलं. उत्कटता,दोष,नाकारलेपणाची भावना आणि महानता या सगळ्या सगळ्या गोष्टी याही मर्त्य जीवात गुंफलेल्या होत्या तरीही 'मेवाडची मीराबाई' या मनमोहक,

अमर नावाने ती आजमितीलाही स्मरली जाते आहे.


अशा प्रकारे,खरोखरच ती जशी होती,तशीच ती जगली आणि तशीच ती मेली.तिनं त्या एकरंगी पावित्र्याची खाण म्हणून गणल्या गेलेल्या काल्पनिक पद्मावतीच्या पावलांवर पाऊल टाकून दुसरी पद्मावती बनायला नकार दिला.


■■■ समाप्त ■■■



4/21/26

रंगीची गोष्ट / A colorful thing

रंगी ह्या खोलीत पहिल्यांदाच आली होती.तिने आजूबाजूला पाहिलं.एका बाजूला कालीमातेची भव्य मूर्ती,दुसऱ्या बाजूला त्रिशूल,कवटी आणि काही हाडं मांडून ठेवलेली होती.रंगीचं अंग थरथरलं.तिने परत बाबांकडे पाहिलं.बाबा आता हवेत कुणाशी बोलत असल्यासारखे हातवारे करत होते.मध्येच नमस्कार करत होते.सुरुवातीला एकदा तर त्यांनी लोटांगणही घातलं होतं.सुमारे वीसेक मिनिटांनी बाबा शांत झाले. पुढची पाच मिनिटं तसेच डोळे मिटून बसले.मग सावकाश डोळे उघडून खोल आणि धीरगंभीर आवाजात बाबा म्हणाले,

"कालीला रक्त हवंय.ताजं रक्त.मानवी रक्त.लहान मुलाचं रक्त !"

बाबांचा एक एक शब्द खोल गुहेतून आल्यासारखा वाटत होता.रंगीच्या अंगावर सरसरून काटा आला.ती घाबऱ्या आवाजात म्हणाली,"बाबा,पण लहान मुलाचं रक्त मी कुठून आणायचं ?"

बाबांचं रूप पालटलं,ते कडाडले."धन तुला हवंय.मला नाही! नरबली कालीला हवा आहे.ही तिची मागणी आहे.तुला ती मी फक्त सांगितली.काय करायचं ते तुझं तू ठरवायचं आहे.आता तू जा.तुझा विचार झाला तरच उद्या ये.नाही तर धन विसर.मठीत पुन्हा येऊ नकोस."

रंगी चावी दिलेल्या बाहुलीसारखी मठीच्या बाहेर पडली. घरापर्यंत कशी आली ते तिचं तिलाही कळलं नाही. तिच्या मनाला एकप्रकारची बधिरता आली होती.आज कामावर जायचं नाही असं ठरवून ती तरटावर आडवी झाली.थोड्याच वेळात तिचं स्थळकाळाचं भान गेलं. तिला सणसणून ताप भरला.ती कण्डू लागली.रंगीला जाग आली तेव्हा करकरीत संध्याकाळ झाली होती.जराशाने तिने उठून पाहिलं तर खोलीत आणि अंगणातही काळाकुट्ट अंधार होता.आता तिचा ताप उतरलेला होता.सगळं अंग घामाने डबडबलेलं होतं. खूप अशक्तपणा तिला जाणवत होता.तिच्या कानात भैरवनाथबाबांचे शब्द घुमत होते.

"कालीला रक्त हवंय.ताजं रक्त.मानवी रक्त.लहान मुलाचं रक्त !"

तिने त्याच तंद्रीत दिवा लावला.आईने खोलीत दिवा लावलेला पाहिल्यावर बाहेर खेळत असलेला छोट्या घरात आला.आईला बिलगला.त्याला जवळ घेताना रंगीच्या मनात एक विचार चमकून गेला,त्यासरशी तिची तीच दचकली ! 'नाही! नाही!' असं काहीसं पुटपुटत ती मान हलवत राहिली.पण थोड्या वेळाने तिचे डोळे चमकले.तिच्या मनातला गोंधळ संपला होता.तिने पर्याय निवडला.तिला श्रीमंत व्हायचं होतं. तिचा निर्धार झाला. तिने छोट्याला आपल्यापासून दूर केलं.

भैरवनाथबाबांना होकार देताना रंगीच्या मनात शंका होती.ती तिने बोलून दाखवली."महाराज,माझ्या छोट्याला मी कालीमातेला देते आहे पण त्याला त्रास व्हायला नको."

भैरवनाथबाबा गंभीरपणे म्हणाले,"नागेश तुझ्याकडे येऊन मुलगा कालीला विधिवत् अर्पण करील.त्यानंतर पुढचं काली सगळं बघून घेईल.तिला चढवलेला भोगदेखील तुझ्या घरातून तीच नेईल आणि तुझ्या घरात धनदेखील तीच आणील."

रंगीच्या मनातल्या सगळ्या शंका बाबांच्या बोलण्याने फिटल्या.

बाबा पुढे म्हणाले,"योगायोगाने उद्याच अमावस्या आहे.नागेश संध्याकाळीच तुझ्याकडे येईल. मध्यरात्रीपर्यंत पूजाविधी पूर्ण करील.कालीला तिचं भक्ष्य अर्पण करील.'

मठीतून निघताना नागेशने पूजेसाठी काय काय सामान आणून ठेवायचं त्याची यादी रंगीकडे दिली.बाकीचं लागणारं सामान तो स्वतः येताना घेऊन येणार होता.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच नागेश रंगीच्या घरात शिरला,त्याबरोबर रंगीने घाईघाईने खोलीचं दार आतून लावून घेतलं.नागेशने गोड बोलून छोट्याला अफूमिश्रित पेढे खायला दिले.

पहिल्यांदाच असा खाऊ त्याला कुणी देत होतं.आग्रहाने खाऊ घालत होतं.छोट्याही आनंदाने ते पेढे खाऊ लागला.थोड्याच वेळात त्याला गुंगी येऊ लागली आणि तो अर्धबेशुद्धावस्थेत गेला.आता नागेश भराभर कामाला लागला.छोट्याच्या डोक्यावरचे सगळे केस त्याने तासून टाकले.त्याला स्वच्छ आंघोळ घालून नंतर काळ्या रंगाची लंगोटी बांधली.त्याच्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरला.टाळूवर अगम्य अशा आकृत्या शेंदराने काढल्या.हे करत असताना एकीकडे काही तरी मंत्र तो जोरजोरात म्हणत होता.गळ्यात कवड्यांची माळ घालून,केस मोकळे सोडून,कपाळावर मळवट भरून बसलेली रंगी नागेश सांगेल ती मदत त्याला करत होती.नागेशने खोलीच्या चारी कोपऱ्यांत धूप लावला होता.त्यामुळे खोलीचं वातावरण पार बदलून गेलं होतं. छोट्या मात्र अर्धवट डोळे मिटलेल्या अवस्थेत सगळे सोपस्कार करून घेत होता.त्याला जास्तच झापड आली की,नागेश त्याच्या चेहऱ्यावर हळुवार हाताने थोपटत त्याला जागं ठेवत होता.

नागेशने रंगीने केलेल्या भाताच्या मुदी केल्या.त्यांच्यावर कुंकू,काळे तीळ वगैरे गोष्टी टाकल्या.आता मंत्र म्हणण्याचा त्याचा वेग खूपच वाढला होता आणि हालचालींनाही प्रचंड वेग आला होता.शेवटी त्याने त्याच्या छाटीतून एक छोटं पण अत्यंत तीक्ष्ण असं त्रिशूल काढलं आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच छोट्याच्या गळ्यावरून फिरवलं.एक पुसटशी रक्ताची रेघ छोट्याच्या गळ्यावर दिसायला लागली,त्याच लालसर झालेल्या त्रिशूळाने नागेशने भाताच्या मुदींवर त्वेषाने प्रहार केले आणि त्या विस्कटून टाकल्या.आता विधी संपला होता.नागेश घामाने चिंब भिजला होता. छोट्याही श्रमाने आणि गुंगीने आडवा झाला.नागेशने सगळी पूजा एका केळीच्या पानात गोळा केली.रंगीला ते बोचकं गावाबाहेर चौफुल्यावर ठेवायला सांगून तो नेहमीसारखा अंधारात अदृश्य झाला.

आता खोलीत धुपाचा वास,कालीमातेचा फोटो आणि त्यासमोर आडवी ठेवलेली दोन मानवी हाडं एवढंच शिल्लक होतं.रंगीने सुटकेचा निःश्वास सोडला. छोट्याला तसाच झोपलेला ठेवून ते बोचकं घेऊन ती चौफुल्याच्या दिशेने निघाली.बाबूला तिने आज होटेलातच झोप म्हणून सांगितलं होतं.पुढचे पंधरा दिवस गळ्यावरची जखम मिटेस्तोवर आणि डोक्यावर केस येईपर्यंत छोट्याला शाळेतच काय पण घराबाहेरही ती जाऊ देणार नव्हती.जाताना नागेशने एक अफूची पुडी छोट्याला रोज देण्यासाठी म्हणून देऊन ठेवली होती.त्याच्या अमलाखाली पंधरा दिवस तो घरातच गुंगून पडणार होता.आता नागेशचं काम संपलं होतं.आता कालीमाता स्वतःचं काम स्वतःच करील असं त्याने सांगितलं होतं. रंगीला फक्त काही विधी करायचे होते नि मंत्र म्हणायचे होते.त्याने सांगितल्याप्रमाणे दररोज रात्री रंगीच्या खोलीतून हळू आवाजात मंत्राचे आवाज येऊ लागले. त्याची दबक्या आवाजात चर्चा व्हायला लागली.छोट्या पंधरा दिवसांनी घराबाहेर खेळायला म्हणून आला तेव्हा त्याचं एकंदर रूप आणि गळ्यावरची अस्पष्ट अशी खूण बघून लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली.त्यातच दर शनिवारी मध्यरात्रीची केस मोकळे सोडलेली एक बाई गल्लीतल्या पिंपळाला फेऱ्या मारते अशी अफवा पसरली.गल्लीतले लोक बाहेर ओट्यावर झोपायला घाबरू लागले.अशाच अवस्थेत दोन महिने गेले.छोट्या हळूहळू खंगू लागला.अशक्त दिसू लागला. गल्लीतल्या भीतीने 'जयजवान मंडळा'च्या स्वयंसेवकांनी गल्लीत गस्त बसवली.

एका शनिवारी दिलीप आणि इतर स्वयंसेवकांना दुरून एक आकृती पिंपळाजवळ दिसली.पण ते धावत तिथे पोहचेपर्यंत ती आकृती नाहीशी झाली होती.तिथे उमटलेल्या ओल्या पावलांच्या ठशांचा वेध घेत ते गेले तर ते ठसे रंगीच्या खोलीपर्यंत जाऊन घांबले होते. दिलीपने दार ठोठावलं.पाचदहा मिनिटं ठोठावूनही दार उघडलं गेलं नाही.नंतर डोळे चोळत चोळत रंगीने दार उघडलं.दिलीप जबरदस्तीने आत घुसला.मोरीत पडलेलं ओलं लुगडं,कोपऱ्यात कालीचा फोटो,त्यासमोरची मानवी हार्ड आणि धुपाचा दरवळ ... दिलीपने रंगीकडे संशयाने रोखून पाहिलं.

"रंगूबाई,हे सगळं थांबवा.परत आम्हाला काही संशयास्पद प्रकार दिसला तर आम्ही सरळ बापूसाहेबांच्याकडे तक्रार करू!"

रात्रभर रंगीला झोप आली नाही.धन मिळेल तेव्हा मिळेल.पण राहतं घर जाण्याची वेळ आता आली होती. नागेशने या व्रता-विधीच्या गोष्टी किती दिवस करायच्या हे सांगितलं नव्हतं आणि आता हे बापूसाहेबांना कळलं तर डोक्यावरचं छप्पर जाईल.

रस्त्यावर यावं लागेल.तसं झालं तर मग काय करायचं? कोण आसरा देईल आपल्याला ? कामंसुद्धा सुटतील. खाणार काय ? छोट्याला शिकवणार कुठल्या जोरावर ? ते काही नाही. हे आता थांबवलंच पाहिजे.दुसऱ्या दिवशी तिने माईंना भेटायचं ठरवलं.रंगीच्या मनातली खळबळ शांत झाली.

सकाळची सगळी कामं आटोपून माई दहाच्या सुमारास गोठ्यात असतात तेव्हाची वेळ त्यांच्याशी बोलायला बरी असं तिला वाटलं.

माई नेहमीप्रमाणे पार्वती-लक्ष्मी आणि नंद्याचं चारापाणी बघत असताना मागचा दरवाजा उघडून कुणीतरी आत आल्याचा आवाज त्यांना आला.माई मागे मान वळवून बघणार तोच तिन्ही जनावरं हंबरू लागली.दावं तोडायला लागली.एवढंच काय,

घाबरून जवळ येणाऱ्या नंद्याला लक्ष्मी शिंगांनी दूर ढकलायला लागली.माईंनी वळून पाहिलं तर दरवाजात रंगी उभी होती!

माईंना रंगीविषयी काही कुणकुण लागली होती.त्यामुळे त्या तिला म्हणाल्या,"रंगे,बरं झालं तूच स्वतःहून आलीस.मी तुला बोलावणारच होते."

माईंचं बोलणं ऐकताच रंगीने हंबरडा फोडला.स्वतःचं पायतण काढून तोंड झोडून घेऊ लागली.माई म्हणाल्या,"हे बघ,तू पुढच्या दरवाजाने येऊन चौकात थांब.मी गुरांना शांत करून येते.तू येताच ही निष्पाप जनावरंपण इतकी अस्वस्थ झाली आहेत की,लक्ष्मी तिच्या गोऱ्हालाही जवळ येऊ न देता शिंगांनी ढकलतेय.जा बरं तू."

गुरांना थोपटून शांत केल्यावर माई चौकात आल्या.रंगी कोपऱ्यात मान खाली घालून उभी होती.तिने रडत रडत सगळी हकिकत सांगितली. ती ऐकून माई थक्कच झाल्या.त्यांच्या कल्पनेपलीकडचं त्यांच्याच मालकीच्या खोलीत घडत होतं अन् त्याचा त्यांना पत्तादेखील नव्हता!माईंना रंगीच्या लोभी स्वभावाचा राग आला आणि कणवही आली.

रंगीला समजावत त्या म्हणाल्या,"रंगे,तुझ्या बाबाने धन मिळेल म्हणून सांगितलं पण किती ते नाही सांगितलं.उद्या एखादा रुपया मिळाला तर ते धनच म्हणायचं.आणि बळदात तेवढंच असणार.आमच्याकडे वाडा आला तेव्हा तो सावकाराकडे गहाण पडला होता.मी घरातलं सोनं विकून तो सोडवला.

तेव्हा बळदात ठेवायला पैसे कुणाकडे असणार होते ? आणि त्या नसलेल्या धनाच्या लोभापायी तू आपला सोन्यासारखा मुलगा बळी देणार होतीस? अगं,आई आहेस की कसाई?"

रंगी माईंच्या पायावर गडबडा लोळायला लागली. माई म्हणाल्या,

"आता फार नाटक करू नकोस.उद्यापासून छोट्यासाठी वाड्यावरून रोज अर्धा शेर दूध पुढचे तीन महिने घेऊन जा आणि आधी तो फोटो अन् ती हाडंबिडं आजच्या आज घराबाहेर काढून गावाबाहेर त्याचा निकाल लावून टाक !"

तीन महिन्यांनतर छोट्या आता छान गुटगुटीत आणि तजेलदार दिसत होता.एके दिवशी माई सकाळी नेहमीप्रमाणे गोठ्यात होत्या तेव्हा रंगी छोट्याला घेऊन आली.तिला पाहून आज लक्ष्मी बिथरली नाही.नंद्यानेही गोंधळ घातला नाही.

छोट्या माईंना नमस्कार करून म्हणाला,"आजी,शाळेत माझा पहिला नंबर आलाय!"

माईंनी त्याच्याकडे कौतुकाने पाहिलं.कनवटीचा एक रुपया काढून त्याच्या हातावर बक्षीस म्हणून ठेवला. छोट्याला खूपच आनंद झाला. रंगीच्याही चेहऱ्यावर समाधान होतं. ती दोघं गेल्यावर माईंनी वळून पाहिलं तर लक्ष्मी नंद्याला वात्सल्याने चाटत होती.

●●● समाप्त ●●●

4/19/26

रंगीची गोष्ट / A colorful thing

बाबूची आई धाकट्या छोट्याला शाळेत नाव घालायला आलेली पाहून चष्म्याच्या वरच्या भागातून रोखून बघत अनुनासिक स्वरात त्यांनी विचारलं, "जन्माचा दाखला कुठाय?"

मागील लेखातून पुढे…

रंगीने पिशवीत जपून ठेवलेला दाखला बाहेर काढला.दाखल्याकडे निरखून बघत गुरुजींनी ड्रॉवरमधून रजिस्टर काढलं.त्यातलं बाबूचं नाव मनातच वाचलं. नंतर रंगीकडे रोखून बघत तीक्ष्ण स्वरात म्हणाले, "दोघांच्या आडनावांत फरक कसा?"

रंगीला उत्तर न सापडल्याने तिने न बोलता मान खाली घातली.जोशीमास्तरांनी किरट्या आवाजात म्हटलं, "अशा परिस्थितीत ह्या मुलाला शाळेत भरती करता येणार नाही!"

रंगी गोरीमोरी झाली.छोट्याचा हात धरून घरी परत आली.जाताना छोट्याने सगळ्या गल्लीत 'साळेमंदी नाव घालाया चाललो'असा गाजावाजा केला होता.त्यामुळे हिरमुसला झालेल्या छोट्याला बघून गल्लीत सगळ्यांना शाळेत घडलेली घटना समजली.दोनतीन दिवस गल्लीत सगळ्या घरात नि मारुतीच्या पारावर छोट्याची शाळेतली अ‍ॅडमिशन आणि जोशी गुरुजींचा आगाऊपणा ह्यावर चर्चा चालू होती.तिसऱ्या दिवशी सकाळीच 'जयजवान मंडळा' ची मुलं वाड्यावर बापूंना भेटायला आली.बापूंच्या कानावरदेखील छोट्याच्या शाळेतील अ‍ॅडमिशनचा प्रकार आला होता.जयजयवानचा आक्रमक अध्यक्ष दिलीप ह्याने बापूंना यासंबंधी काही नियम,काही कायदा आहे का,जोशीमास्तर अशा कारणांनी छोट्याची अ‍ॅडमिशन नाकारू शकतात का,हे विचारून घेतलं.

बापू त्याला म्हणाले,"दिलीप,तिथे जाऊन भांडूबिंडू नकोस ! जोशींना म्हणावं,तुम्ही छोट्याला भरती का करत नाही,त्याची कारणं लेखी द्या.त्यांनी काही लिहून नाही दिलं तर त्यांना सांग,मी भेटायला येणार आहे."

दिलीप आणि जयजवानचे इतर सभासद छोट्याला घेऊन शाळेत गेले."छोट्याला भरती करा नाही तर तसं लेखी द्या आणि अ‍ॅडमिशन नाही दिली तर बापूसाहेब तुम्हाला भेटायला येणार आहेत !"

दररोज संध्याकाळी तालमीत दोन दोन तास कसरत करणाऱ्या त्या मंडळींकडे चष्याच्या वरच्या भागातून बघत गुरुजी नरमाईने म्हणाले,"एवढ्या लहानशा गोष्टीसाठी बापूसाहेबांना कशाला तसदी दिलीत ? उद्यापासून छोट्याला शाळेत पाठवून द्या."

"उद्यापासून कशाला ? छोट्याला बरोबरच आणलं आहे.कुठल्या वर्गात बसवू ते सांगा."

गुरुजींनी दाखवलेल्या दिशेने छोट्याला घेऊन दिलीप आणि बाकी सभासद निघाले.छोट्या तर उड्याच मारत निघाला.जोशी गुरुजींनी रजिस्टर काढून छोट्याच्या नावाची रीतसर नोंद करायला सुरुवात केली.

छोट्याची शाळा सुरू झाली.तो अभ्यासात रमलादेखील पण एक अनपेक्षित अडचण समोर आली.छोट्याला शाळेत घालेपर्यंत गल्लीत गावात कुणालाच त्याच्या आणि बाबूच्या वडिलांच्या नावात-आडनावात फरक आहे हे माहीत असण्याचं कारण नव्हतं.पण छोट्याच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी मुख्यत्वे जोशीगुरुजींनी हरकत घेतल्यामुळे ते सगळ्यांनाच कळलं होतं.शाळेतली सगळी मुलं येता-जाता दोघांना त्यातल्या त्यात बाबू मोठा असल्याने त्याला चिडवायला लागली.छोट्या लहान होता.त्यामुळे त्याला मुलं कमी चिडवत.शिवाय त्याचा अर्थही त्याला फारसा कळत नव्हता पण बाबूच्या आणि त्याला चिडवणाऱ्या त्या मुलांच्या मारामाऱ्या होऊ लागल्या.त्यापैकी काही कागाळ्या मास्तरांपर्यंत जायच्या.छोट्याच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी जबरदस्ती केल्याने जोशी मास्तर दुखावले गेले होते.त्याचा राग ते बाबूवर काढायचे आणि त्याला कडक शिक्षा करायचे. आधीच बाबूला अभ्यासात फारसा रस नव्हता.त्यात मुलांचं चिडवणं अन् वरून मास्तरांचा मार.ह्या सगळ्यामुळे बाबूने शाळेत जाणंच बंद केलं.

शाळेत न जाण्याचं कारण रंगीला समजल्यावर ती बाबूला काहीच बोलू शकली नाही.तिने श्रीकृष्ण टॉकीजच्या जवळच्या 'दी नागपुरे टी अँड स्नॅक्स'मध्ये बाब्याला नोकरीला लावून दिलं.बाब्यालादेखील हे काम आवडलं.तो ढोरमेहनत करायला मागेपुढे बघायचा नाही.त्यामुळे होटेलचा मालक जगदीशभाई नागपुरे पण त्याच्यावर खूश असायचा.बाबू पगाराचे सगळेच्या सगळे पैसे आईच्या हातात आणून द्यायचा.त्यामुळे रंगीसुद्धा त्याच्यावर खूश होती.पैसे कमवून संसाराला हातभार लावणारा म्हणून रंगी आता बाबूला जीव लावू लागली.थोड्या दिवसांतच बाबू आणि छोट्याच्या वेगवेगळ्या नावा-आडनावांच्या प्रकरणाचा लोकांना विसर पडला.चिडवणं बंद झालं.छोट्याची शाळा सुरळीत चालू झाली होती आणि बाबूचा पगार नियमित येत होता.त्यामुळे रंगीच्या संसाराच्या गाड्याला वंगण मिळून तो आवाज न करता चालू लागला.गल्लीतल्या शंकराच्या देवळात एक दिवस अचानक एक साधू आला.त्याच्याबरोबर त्याचे दोन शिष्यदेखील होते.

सुरुवातीचे आठ दिवस बाबांचं मौनव्रत होतं.पण देवळात येणाऱ्या लोकांना शिष्यांकडून बाबांची माहिती मिळत होती.बाबांचं नाव भोलेनाथबाबा होतं. हिमालयात पंचवीस वर्षं एका पायावर उभं राहून त्यांनी तप केलं होतं...! सध्या जरी ते जेमतेम चाळिशीचे दिसत असले तरी त्यांचं वय शंभरीच्या जवळपास आहे...! लहानशा गावाला चघळायला नवा विषय मिळाला.बाबांचं मौन संपेपर्यंत त्यांच्याभोवती भक्तांचा घोळका जमला.त्यात स्त्रिया प्रामुख्याने होत्या,सगळ्या जणी रात्री भजनाला जमायच्या.

'चांग फिटला,पांग फिटला,भोलेनाथबाबा मला गुरू भेटला'

अशासारख्या भजनांचे आवाज गल्लीत घुमू लागले. रंगीसुद्धा नियमित जाणाऱ्या भक्तांपैकी एक झाली. शिष्यांनी भक्तांना भोलेनाथबाबांचे फोटो वाटले.इतर भक्तांप्रमाणे रंगीच्याही घरात फ्रेम लावलेला भोलेनाथबाबांचा फोटो लागला.त्याला उदबत्ती लावणंही सुरू झालं.गल्लीतल्या प्रतिष्ठित घरातल्या बायका कुजबुजायच्या - 'करून करून भागली नि देवपूजेला लागली...'

माईंकडे कुणी तरी हा विषय काढला तर त्या म्हणाल्या, “भोलेनाथबाबांबद्दल मला माहीत नाही पण त्यांच्या निमित्ताने रंगी भक्तिमार्गाला लागलीय,हे चांगलंय. भजन,कीर्तनाच्या नावाने चार चांगले शब्द कानांवर पडताहेत,मुखातून बाहेर पडताहेत,हेदेखील चांगलंच आहे!" चारेक महिन्यात भोलेनाथबाबांचा मुक्काम हलला पण तोपर्यंत रंगीच्या मनात त्या तथाकथित बाबाच्या भक्तिमार्गाची वाट चांगलीच रुळली होती. तिच्या त्या भक्तीला प्रत्यक्ष स्वरूप देणारं कोणी नसल्याने ती सैरभैर झाली आणि ह्या अस्वस्थतेच्या काळातच तिला अनकाईच्या डोंगराजवळ राहणाऱ्या अघोरी पंथाच्या भैरवनाथांचं नाव समजलं.रंगी एकदोनदा तिथे जाऊनही आली आणि मग त्यांच्या नादीच लागली.बाबांना भूत-भविष्य चांगलं समजतं... ते थेट कालीमातेशी बोलू शकतात... वगैरे गोष्टी ती भांडी घासायला ज्या ज्या घरी जायची त्या त्या घरांत सांगायची.तिच्या घरातला भोलेनाथबाबांचा फोटो जाऊन आता भैरवनाथबाबांचा फोटो आला. संध्याकाळी त्यांच्या फोटोसमोर धूप लागू लागला. संध्याकाळी महाराजांनी प्रसाद म्हणून दिलेली कवड्यांची माळ रात्रीच्या पूजेच्या वेळी रंगीच्या गळ्यात दिसू लागली.एकदा मठीतून येताना रंगीने भैरवनाथांच्या भजनाची पुस्तकं आणली आणि रात्री ती एकटीच त्यांची भजनं म्हणायला लागली.कधी कधी ती छोट्यालाही आपल्याबरोबर भजनं म्हणायला लावायची.बाबू रात्रीचा सिनेमा सुटल्यावर घरी यायचा म्हणून तो कधी भजनाला नसायचा.हळूहळू रंगीवर भैरवनाथांचा पगडा वाढत गेला.तशा तिच्या मठीच्या फेऱ्याही वाढत गेल्या.

एकदा रंगी मठीत गेली असताना बाबांनी एरवी नेहमी बंद असलेले

डोळे उघडले आणि आपली तीक्ष्ण नजर रंगीवर रोखून ते म्हणाले,

"बेटा,तुझ्या नशिबात भरपूर धनलाभ आहे!"

इतक्या दिवसांत बाबा प्रथमच तिच्याशी बोलले होते.बाबांचं भविष्य रंगीला अशक्य वाटलं.लोकांच्या घरची भांडी घासून आणि पोराने होटेलात काम करून घरी येणारा पैसा म्हणजे धनलाभ असू शकत नाही,एवढं कळण्याइतकी रंगी हुशार होती.रंगीच्या चेहऱ्यावरून आपण सांगितलेल्या भविष्यावर तिचा विश्वास बसला नाही हे चाणाक्ष बाबांनी ओळखलं.

त्यांनी आपल्या पट्टशिष्याकडे निर्देश करत म्हटलं,

"धन कुठून येणार अन् कसं येणार हे हा तुला समजावून सांगेल.त्यासाठी मधूनमधून हा तुझ्या घरी येईल."

बाबांच्या बोलण्यातल्या ठामपणाने भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे असा विश्वास रंगीला वाटला आणि तिचे डोळे चमकले !

बाबांच्या सांगण्याप्रमाणे नागोजी रंगीच्या खोलीवर आला आणि नंतर यायलाच लागला.पहिल्या फेरीतच त्याची घारीसारखी नजर सगळ्या गल्लीवर,वाड्यावर अन् रंगीच्या खोलीत भिरभिरली.दीर्घ श्वास घेत नागोजी म्हणाला,

"येतोय... येतोय... येतोय... पैशांचा आवाज येतोय आणि वासपण येतोय.रंगूबाई,सोन्याची नाणी,चांदी, हिरे-माणकं मोडूंच घबाड दिसतंय.आता फक्त ते कुठे आहे,कसं मिळवायचं,एवढंच बघणं आपलं काम आहे."

नागोजी दिवेलागणीच्या सुमारास यायचा.रंगीच्या खोलीत डोळे मिटून ध्यानधारणा करायचा.भजनाचा कार्यक्रम झाला की,रात्रीच्या अंधारात नाहीसा व्हायचा. काळाकुळकुळीत,कपाळावर शेंदूर फासलेला, कवड्यांच्या आणि वेगवेगळ्या रंगांच्या मण्यांच्या माळा घातलेला,कुरळ्या केसांचं जंगल असलेला फेफट्या नाकाचा नागोजी अतिशय भयानक दिसायचा. बोलताना आपली लांबलचक अन् टोकदार जीभ बाहेर काढून ओठांवर फिरवायची त्याला सवय होती.नागोजी रंगीकडे आला की,त्याला पाहायला गल्लीतली पोरंटोरं आणि कधी कधी मोठी माणसंसुद्धा मुद्दाम खोलीवरून सहज आल्यासारखी आत डोकवायची.पाचसहा भेटींनंतर नागोजी येऊन जेव्हा डोळे मिटून ध्यान करत बसला होता आणि रंगी त्याच्यासमोर हात जोडून भैरवनाथबाबांचा जप करत होती तेव्हा अचानक नागोजीने डोळे उघडले.विस्फारलेल्या डोळ्यांनी तो रंगीला म्हणाला,"सापडलं ! मला सापडलं ! मी प्रत्यक्ष पाहिलं ! दोन हंडे भरून ठेवले आहेत !! जमिनीखालच्या जागेत आहेत. ्इथून फक्त पाचशे फुटांवर आहेत!"

रंगीचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं.सर्वांगाला घाम फुटला.तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा भाग्याचा क्षण आला होता.नागोजीने वर्णन केलेलं ते ठिकाण म्हणजे वाड्यातल्या स्वैपाकघरातलं बळद असं रंगीच्या मनाने ठाम घेतलं.तरीच आपल्याला भाई सारं घर सारवायला सांगतात पण स्वैपाकघर मात्र कधीच सारवायला सांगत नाहीत.ते त्या स्वतः सारवतात.तिथे नक्कीच धन असणार.नागोजी म्हणतो.ते खरंच असणार.आता फक्त ते धन कसं मिळवायचं ते ह्या नागोजीबाबाकडून समजून घ्यावं लागेल.कितीही कठीण आणि कडक व्रत असलं तरी ते करावं लागेल.धन मिळवण्यासाठी एवढी साधना तर करायलाच पाहिजे.करू आपण एकदा का धन मिळालं की,मग मोठ्ठा वाडा बांधू.आपण कुणाच्या घरी काम करायला जायचं नाही.आपणच एक नाही दोन दोन बाया कामाला ठेवू.रंगीचे विचार डोक्यात मावेनासे झाले.कानशिलं तापली.कपाळाच्या शिरा इतक्या फुगल्या की,त्या आत्ता फुटतील की काय असं तिला वाटलं. त्तेजित स्वरात तिने नागोजीला विचारलं,

"नागोजी,काय उपासना केली पाहिजे ते लगेच सांग. कसंही करून मला ते धन पाहिजे.गावातल्या बऱ्याच जणांना संशय आहे की,वाड्यातल्या बळदात धन आहे. म्हणूनच तिथून साप अन् नाग निघतात !"

नागोजीने परत डोळे मिटले.काही क्षण स्तब्धतेत गेले. आता त्याला डोळ्यांसमोर काय दिसतंय,तो काय सांगतो हे ऐकायला रंगी अधीर झाली होती.

"रंगूबाई,हे काही माझ्या आटोक्यातलं काम नाही. आता मी निघतो.तुम्ही उद्या मठीवर या.बाबांना शरण जा. बाबाच काय ते तुम्हाला सांगतील."

कपड्यांचा सळसळ आवाज करत नागोजी दार उघडून रंगीच्या खोलीबाहेर पडला.रात्रीच्या काळोखात दिसेनासासुद्धा झाला.रात्रभर रंगीला झोप लागली नाही. सकाळी लवकरच ती मठीवर पोहचली.दोन तास ताटकळत वाट पाहिल्यावर नागोजीने तिला बाबांच्या ध्यानाच्या खोलीत नेलं.बाबांनी मिटल्या डोळ्यांनीच विचारलं,

"आलीस ? म्हटल्याप्रमाणे शोध तर लागलाय. नागोजीने तिथे पाहिलंय हे आम्ही इथे स्थानावर बसून पाहिलंय.आता ते मिळवणं फक्त तुझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे."

"बाबा,लौकर सांगा.वाटेल ते करायची तयारी आहे माझी !" रंगीच्या आवाजात अधीरता ओतप्रोत भरली होती. बाबांनी व्याघ्रजिनावर पद्मासन घातलं.नागोजीने रंगीला एकदम शांत बसायची खूण केली.

राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…..★★★




4/17/26

रंगी / colored

नारायणमामा दिवाळीत भाऊबिजेसाठी पुण्याहून आले होते.

बापूंच्या बरोबर ओसरीवर बसून गप्पा मारताना गावाचा आणि वाड्याचा विषय निघाला.नारायणमामांना एखाद्या गोष्टीची उत्सुकता वाटली तर त्याची सविस्तर माहिती ऐकायला आवडत असे,हे माहीत असल्याने बापू त्यांना सविस्तर माहिती सांगत होते -

पेशव्यांच्या काळात ही एक छोटीशी वाडी होती.सगळा भूभाग दुष्काळी होता.शेतकरी कोरडवाहू शेती करून गुजराण करत होते.व्यापारउदीम काहीच नव्हता.

कुठल्याशा लढाईत सरदार विंचुरकरांनी खूप मोठा पराक्रम केला म्हणून पेशव्यांनी त्यांना पाच गावं इनाम दिली.त्यात हा गावसुद्धा दिला.सरदार विंचुरकरांनी आपला प्रतिनिधी म्हणून रघोजी ह्या कर्तबगार माणसाला गावचा पाटील म्हणून नियुक्त केला आणि गाव वसवायला सांगितलं.रघोजीने स्वतःसाठी एक मोठी गढी बांधली आणि तिथून तो गावचा कारभार करू लागला.आजही गावात रघोजी बाबाची गढी आहे.

तिच्यात त्यांचे वंशज राहतात.दसऱ्याच्या दिवशी गावाबाहेरच्या मैदानात शमीच्या वृक्षाची पूजा करायला गाव जमतं तेव्हा अग्रपूजेचा मान आजही गढीवरच्या मंडळींचा असतो.शिवाय दरवर्षी गावात रघोजीबाबांची यात्रासुद्धा मोठ्या दणक्यात साजरी होते.तर,हे रघोजीबाबा मोठे कर्तबगार असावेत.त्यांनी पैठण आणि इतर ठिकाणांहून विणकर आणून इथे वसवले.त्यांना माग काढून दिले.आज हे गाव पैठणीसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.रघोजीबाबांनी गुजरात आणि राजस्थानातून व्यापाऱ्यांना निमंत्रण दिलं.ह्या व्यापाऱ्यांच्या पुढच्या पिढ्याही आज गावात समाधानाने राहत आहेत.गावात पाण्याची सोय व्हावी म्हणून गावच्या नगरशेटने गावाबाहेर एक मोठा तलाव बांधला.त्यामुळे गावातल्या जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढली.आडा-विहिरींना उन्हाळ्यातले काही महिने सोडले तर भरपूर पाणी राहू लागलं.गावाचा व्यापार-उदीम वाढला.इथली रेशमी वस्त्रं शनिवारवाड्यातदेखील जाऊ लागली.गावात पैका आला.साहजिकच इथल्या व्यापाऱ्यांनी,

अंमलदारांनी मोठमोठे वाडे आणि गढ्या बांधल्या.नंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी गेल्यामुळे त्यातले बरेच वाडे डागडुजीशिवाय ओसाड पडले.त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे बऱ्याचशा वाड्यांत बळदं-भुयारं आहेत आणि त्यामुळे त्या संबंधीच्या आख्यायिकाही आहेत.

बापू सांगत होते - "आता आपला वाडा म्हणाल तर तो यशाच्या पहिल्या आईच्या वडिलांकडून माझ्याकडे आला आहे.तो त्यांच्या दोन पिढ्याआधी म्हणजे १८५० सालाच्या सुमारास बांधला गेला असावा." बापूंकडून वाड्याची सविस्तर माहिती ऐकून नारायणमामांच्या शेजारीच कान पाडून ऐकत बसलेल्या यशाच्या मनात वाड्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानात भरच पडली.यशाला हा बलदंड वाडा मनापासून आवडायचा.बाहेरून दगडी भिंत सगळ्या वाड्याच्या रुंदीला ऐसपैस व्यापणाऱ्या ओट्यानंतर सुरू व्हायची. ओट्याच्या दोन्ही बाजूंना बसण्यासाठी सिमेंटचे कट्टे होते.घराचा मुख्य दरवाजा मजबूत लाकडाचा असून त्यावर उभ्या-आडव्या पट्ट्या मारलेल्या होत्या.त्यांच्या प्रत्येक जोडावर लोखंडी फुलं लावलेली होती. आतमधून दोन्ही बाजूंच्या कोनाड्यात अडसर बसवलेला तर दहा जणांनाही दरवाजा उघडता आला नसता.आत गेल्यावर फरशी टाकलेला चौक होता. त्याच्यावर उजेडासाठी मोठे धारे होते.चौकाच्या वरती थोड्याशा उंचीवर ओसरी होती.तिथे बापूंची बैठक होती.तक्क्याला टेकून चंचीतलं पान खाणाऱ्या बापूंशी सहसा कुळवाडी लोक चौकातच बसून बोलत.शेत कसणारे राधू,विश्वनाथ वरती आले तरी चौकाजवळच्या खांबांना टेकून बसत.बापूंच्या बैठकीवर कुणीच बसत नसत.ओसरीमधून स्वैपाकघरात जाण्यासाठी एक रस्ता देवघरातून जाई तर दुसरा मधल्या बोळीतून स्वैपाकघरात जाई.वाड्याच्या मध्यभागातल्या कोठीच्या आणि बाळंतिणीच्या खोलीनंतरचा भाग मारवाडी कुटुंबाला भाड्याने दिला होता.त्याच्यामागे अंगण.त्यात एका बाजूला आड आणि आंघोळीची प्रशस्त जागा तर दुसऱ्या बाजूला जनावरांचा गोठा आणि कोपऱ्यात संडास.वाड्याच्या बाहेरच्या बाजूला ओट्याला लागूनच एक खोली होती.ती वापरात नव्हती.

नुस्तीच बंद करून ठेवली होती.वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वैपाकघरात असलेलं बळद.स्वैपाकघराच्या मध्यभागी ओट्याच्या समोरच बळदात उतरण्यासाठी एक दरवाजा होता.तो उघडला की,जमिनीला एक चौरस खड्डा असून वरती चौकट होती.आत उडी मारून गेलं की,डाव्या बाजूला सुमारे पंधरा फूट लांब,पाच फूट रुंद आणि चार फूट उंचीचं बळद होतं.ते दगडी भिंतींनी बांधलेलं होतं.मात्र बळदाच्या टोकाला एक मातीचा ओटा होता. 

कधीकाळी तो शेणाने सारवला जात होता.ओट्यावर तीन रांजण ठेवलेले लांबूनही दिसत.बळदात खूप सटरफटर सामान वर्षानुवर्षं वेगवगळ्या पूर्वजांनी टाकलेलं होतं.यशाची मोठी बहीण मुंबईत राहत होती. तिचे यजमान श्रीकांत ह्यांना यशा का कोण जाणे 'डॅनी' म्हणे.तर हे डॅनी आणि उषाताई एकदा सुट्टीत गावी आले होते तेव्हा बळदात उतरण्याची टूम निघाली होती.

बळदात धन आहे असा कुटुंबातच नाही तर गल्लीतही सगळ्यांचा समज होता.धन मिळालं की,ते कुणाचा तरी बळी घेतं असाही समज होता.त्यामुळे लेकीचा आणि जावयाचा जीव माई धोक्यात घालू इच्छित नव्हत्या.मरो तो पैसा,माझ्या सोन्यासारख्या जावयाचा न् लेकीचा जीव मला धोक्यात घालायचा नाही असा हेका माईंनी चालवला होता.माईंनी अगदी काकुळतीला येऊन विरोध केला होता पण डॅनींनी हट्टच धरला.ते आणि यशा उडी मारून बळदात उतरले. चारपाच वेळा तर सोबत घेतलेला कंदिल विझला तेव्हा उडी मारून ते जिथे उभे होते,तिथेच उभे राहिले.खाली गेल्या पन्नास वर्षांतली हस्तलिखित स्वरूपातली पंचांगं होती,ती त्या दोघांनी वर काढली.पुढे मात्र खूप अडगळ होती.त्या अडगळीखाली साप-विंचू असण्याची शक्यता होती.म्हणून ते पुढे गेले नाहीत.धूळमाखल्या अवस्थेत परत वरती चढून बाहेर आले.

ह्या बळदाच्या दरवाजाच्या फटीतून कितीदा तरी मोठे मोठे साप बाहेर येत असत.माई ह्या बळदाच्या दाराला मोठे,जड लाकडी पाट टेकवून ठेवत.एक पाट बसायला घेत.एका पाटावर पुढे पोथी ठेवून त्या वाचायला बसत.एकदा अशाच माई पोथी वाचत असताना अशोकभाऊचा मित्र शंकर आला.त्याने पाहिलं तर माईंनी पाठ टेकवलेल्या पाटाच्या वरतीच बळदाच्या फटीतून एका काळ्याभोर सापाचं तोंड बाहेर आलं होतं. त्याची जीभ मधूनमधून बाहेर लवलवत होती.शंकरने प्रसंगावधान राखून माईंना झटकन् पाटासकट बळदाच्या दरवाजापासून लांब ओढलं अन् वाडा एका मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडला.नंतर दोनतीन प्रसंगी बळदातून साप आल्यावर तो दरवाजाच माईंनी मातीने लिंपून टाकला.वाड्याच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या बंद खोलीवर बऱ्याच जणांचं लक्ष होतं.काही दुकानदारांना त्यांच्या दुकानाचा माल ठेवण्यासाठी गोदाम म्हणून वापरायला ती हवी होती.'

जयजवान मित्रमंडळा'ला कॅरम-पत्ते खेळायला पाहिजे होती.पण बापूंनी अशा कुठल्याही कामासाठी ती जागा देण्याचं नाकारलं.

त्यामुळे बरेच दिवस ती खोली कुलूप लावून बंद होती.वाड्याच्या बाहेरच्या बाजूला स्वतंत्र अशी ती जागा असल्याने तशी ती खोली दुर्लक्षितच होती.एक दिवस सकाळी मागच्या अंगणातल्या गोठ्यात पार्वती-लक्ष्मीला चारा घालण्याचं काम माई करत होत्या.सवयीप्रमाणे माईंच्या त्या दोघींशी गप्पा चालू होत्या.

तेवढ्यात रंगूबाई बाबू आणि छोट्या या तिच्या लहान मुलांना घेऊन वाड्याच्या मागच्या बाजूच्या दरवाजाने आत आली.रंगूबाई दोन घरी भांडी घासण्याचं काम करी.तिचा उल्लेख सगळे जण रंगी असाच करीत. रंगी पस्तिशीची,काळीसावळी पण नाकीडोळी नीटस अशी होती.तिच्या नाकात चमकी होती.रंगी म्हणजे आपल्या ऐन तारुण्यात बिनधास्त वागणारी तरुणी असावी.कारण तिच्या दोन्ही मुलांच्या वडिलांची नावं आणि आडनावं वेगवेगळी होती.रंगी आली त्यावेळी माई लक्ष्मीला थोपटत तिच्याशी बोलत होत्या.ती तिच्या गोऱ्ह्याला-नंद्याला चाटत होती नंद्या तिला लाडाने दुशा देत होता."बायो,तुझं पोरावर भारीच प्रेम.पण त्या नादात चारा खाण्याकडे दुर्लक्ष कशाला करतेस?" माई लक्ष्मीकडे कौतुकाने पाहत म्हणत होत्या.रंगीने हे वाक्य ऐकलं.माईंचं आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी ती थोडीशी खाकरली."काय गं रंगे,काय काम काढलंस? आणि अगदी पोरांसकट आलीसशी ?"

माईंच्या प्रश्नावर रंगीने तिचं काम सांगितलं.रंगीला गावाबाहेर राहत असलेल्या खोलीच्या मालकाने जागा रिकामी करायला सांगितलं होतं.त्याला वापरायला जागा कमी पडत होती म्हणे.त्यामुळे तिला वाड्याबाहेरची रिकामी आणि बंद असलेली खोली मिळाली तर हवी होती."माई,ह्या दोन पोरांना घरी सोडून दिवसभर कामाला यावं लागतं.माझी सगळी कामं इथली गल्लीतलीच हायत.त्यामुळे माझी चांगली सोय होईल." रंगीला मध्येच थांबवत माईंनी म्हटलं,"बापूंना विचारून सांगते. पण हे बघ रंगे,हा पोरीबाळींनी भरलेला वाडा आहे. थोडं जरी वावगं वागणं लक्षात आलं तर सोन्याला सांगून त्याच दिवशी तुझं सामान खोलीच्या बाहेर फेकून दिलं जाईल." रंगी खाली मान घालून म्हणाली,

"माईसाहेब,गेले ते दिवस.अन् देवळात,देवाच्यासमोर वंगाळ वागनं काय, पन वंगाळ इचार पन कुनी करतं काय ? तुमी बापूंकडं माझ्या पोरांकडं बघून सबुद टाका." "बरं." नंद्याला थोपटत माई म्हणाल्या.

यथावकाश रंगी तिच्या पोरांसकटत्या खोलीत राहायला आली आणि खोलीचं रंगरूपच पालटलं.खोलीची बाहेरची भिंत तिने लिपून काढली.त्याला चुना मारला. छोटंसं अंगण सारवल्याने स्वच्छ दिसू लागलं.बाबू आणि छोट्या गल्लीतल्या पोरांबरोबर भवरा,गोट्या वगैरे खेळायला लागले.ठकूबाई कामावर काही कारणांनी आल्या नाहीत तर रंगी वाड्यावर भांडी घासायला येऊ लागली.महिनापंधरा दिवसांतून एकदा स्वैपाकघर सोडून इतर खोल्या आणि ओसऱ्या शेणाने सारवायचं काम रंगीच नियमित करू लागली.स्वैपाकघर मात्र माई स्वतःच सारवायच्या.रंगी तरतरीत होती.बोलण्यात चतुर होती आणि महत्त्वाकांक्षीदेखील होती.वाड्यातल्या मुली ओट्याच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसल्या की, आपल्या मोरीत भांडी घासता घासता त्या गप्पांमध्ये रंगीही सामील व्हायची.एक मात्र खरं की,तिच्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल जे ऐकलं होतं त्याचा मागमूसही आता कुणालाच दिसला नव्हता.

पहाटेच्या अंधारात ती बाहेरच्या मोरीत आंघोळ करून घेई.उजाडताच पोरांना उठवी.मोठा बाबू आता गल्लीतल्याच मराठी मुलांची शाळा नं.२ मध्ये पाचवीच्या वर्गात जाऊ लागला होता. बाबू अभ्यासात यथातथाच होता.त्याचं अभ्यासात लक्ष नव्हतं.

काळ्या रंगाचा आणि पसरट नाकाचा बाबू त्याच्या निस्तेज डोळ्यांनी मख्खपणे तासन्तास कुठे तरी शून्यात बघत राही.छोट्या मात्र तरतरीत होता. गल्लीतली मुलं मारुतीच्या पारावर अभ्यास करत बसली की हा तिथे टक लावून बघत उभा राही. पुढच्याच वर्षी तो पहिलीत जाणार होता पण ऐकून ऐकून त्याचे दहा एके दहापर्यंतचे पाढे पाठ झाले होते. रंगी त्याला जवळ घेऊन म्हणे,"छोट्याला मी लई शिकिवनार ! शिकशील का न्हाई रे छोट्या ?" आईला खूश करण्यासाठी आणि तिच्यावर जास्त प्रभाव टाकण्यासाठी मग छोट्या बे एके बे मोठ्या आवाजात सुरू करायचा.

आईला म्हणायचा,"व्हय आये.म्या लय शिक्नार.यशादादासारकं साळामंदी जानार,विंग्रजी शिक्नार.यस फेस ठेस करनार!"

गावगोत,अष्टगंध प्रकाशन,माधव सावरगांकर

रंगी त्याला आणखीच जवळ ओढून घेत कुरवाळत राही.नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायची वेळ झाली.रंगी छोट्याचा जन्मदाखला घेऊन जोशी गुरुजींकडे गेली. जोशी गुरुजींना शाळेतल्या सगळ्या मुलांची नावं पाठ होती.बाबूची आई धाकट्या छोट्याला शाळेत नाव घालायला आलेली पाहून चष्म्याच्या वरच्या भागातून रोखून बघत अनुनासिक स्वरात त्यांनी विचारलं, "जन्माचा दाखला कुठाय?"

■■■ अपूर्ण शिल्लक भाग पुढील दोन भागात प्रकाशित होईल.■■■