* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१/३/२४

बिश्नोईंची शांतिगाथा..Bishnoinchi Shantigatha..|

आधुनिक भारतात असेच ओकचे लोकांना हवेहवेसे जंगल,वनविभाग आणि व्यापारी कंपन्यांपासून वाचवायला गढवालात चिपको सत्याग्रह केला गेला.

त्यात कोणी मृत्युमुखी पडले नाही,पण त्याच्या आधी अडीचशे वर्षे दुसऱ्या एका चिपकोत ३६८ निसर्ग

भक्तांनी प्राणार्पण केले होते.ही घटना घडली होती वैराण मारवाडात.ह्या रेती - कंकराच्या मुलूखात आज पाहायला मिळते खुरटे गवत,काटेरी झुडपे आणि तुरळक कोठे बाभळी-बोरींची झाडे असलेली माळरानेच्या माळराने.दिवसाच्या रणरणीत उन्हात एक सबंध माणूस मावेल एवढीही सावली सापडणे मुश्कील,तर सबंध उंट आरामात पाय पसरू शकेल अशा सावलीची कल्पनाही करता येत नाही.पण या मारवाडात अशीही काही गांवे आहेत की ज्यांच्या आसपास खेजडीचे अनेक वृक्ष फोफावलेले आहेत.

ही बाभळीसारखी खेजडी म्हणजे वाळवंटातला कल्पवृक्ष आहे.याच्या सावलीत एकेक सबंध उंट झोप काढू शकतो.यांच्या पाल्यावर गायी,शेळ्या -

मेंढ्या,उंट पोसले जातात,आणि याच्या शेंगांची भाजी मोठी रुचकर असते.शिवाय खेजडीच्या काट्यांनी शेतांची कुंपणेच्या कुंपणे बनवली जातात.


कोणे एके काळी मारवाडच्या वाळवंटाने आजच्यासारखे पाय पसरले नव्हते.जरी पाऊस अगदी कमी होता तरी इथल्या माळरानांवर खेजडीची झाडे अमाप होती.आणि शिवाय होत्या चिक्कार बोरी,केर,सांगरी,या रानांत काळवीट,चिंकारे,नीलगायी विपुल होत्या आणि त्यांची शिकार करून राहायचे भिल्ल लोक, हजारो वर्षे त्यांचा हा जीवनक्रम चालला होता. बोरी-केरांना रुचकर फळे यायची,खेजडीला भरपूर शेंगा लगडायच्या,शिकार रगड होती. खावे-प्यावे आडदांडपणे राहावे असा सिलसिला हजारो वर्षे चालला होता.पण मग सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी मध्य आशियातून माणसांचे लोंढेच्या लोंढे यायला लागले. हे होते मुख्यतः गुराखी,यांतील अनेक जाट आणि राजपूत हळूहळू मारवाडात पसरले.भिल्लांशी भांडत-तंडत हातपाय पसरू लागले.तसा मुलूखही भरपूर होता.

फारसा काळजीचा प्रश्न नव्हता.मारवाडची आबादी वाढत चालली.पण शतकामागून शतके जशी गेली तसा या प्रचंड गुरांच्या कळपांचा प्रभाव मारवाडातल्या झाडा-झुडपांवर जाणवू लागला. हळूहळू त्यांची पैदास कमी झाली.

त्याबरोबरच जाट-राजपुतांच्या कुन्हाडींनी जुनी झाडे तुटत राहिली.दिवसेंदिवस मारवाडचे जंगल ओसाड होऊ लागले आणि आदिवासी-भिल्लांची सद्दी संपुष्टात येऊ लागली.शेवटी तेराव्या शतकात कनोजच्या राठोडांनी भिल्लांचा पराभव करून मारवाडात आपले राज्य स्थापन केले. त्यांच्याबरोबर आलेले राजपूत सर्वत्र पसरले.


इसवीच्या पंधराव्या शतकापर्यंत राठोडांचे राज्य मारवाडात पक्के पाय रोवून होते.त्यांच्यातल्या एका पराक्रमी राजाच्या राव जोधाजीच्या कारकिर्दीत एक असाधारण पुरुषाचा जन्म झाला.त्याचे नाव होते जम्बाजी.पिपासर गावात क्षत्रिय परमार कुलात ठाकूर लोहटाच्या घरी, हंसादेवीच्या पोटी इसवी सन १४५१ मध्ये जंबाजींचा जन्म झाला. ठाकूरजी होते ग्रामपती, व्यवसायाने शेतकरी आणि पशुपालक,शेतीवर भर

कमीच,कारण घरात ४०-५० गायी होत्या. वयाच्या सातव्या वर्षापासून जम्बाजी गुरांमागे होता.रानात जावे,

गुरे वळावी,आरामात झोपावे, आणि आजूबाजूला फिरणाऱ्या काळविटांच्या झुंडीच्या झुंडींची मौज पहावी- मस्तीला आलेले काळे नर कसे झुंजतात हे पाहण्याची तर फारच मजा! वर्षांमागून वर्षे गेली.जम्बाजी पंचवीस वर्षांचा झाला आणि सबंध मुलखावर संकट आले.थोडा का होईना,पण नियमित पडणारा पाऊस येईनासा झाला.

पहिल्या वर्षी घरात साठलेला थोडा कडबा होता,गुरे निभावून गेली. दुसऱ्या वर्षी तसेच अवर्षण,गुरांना चरायचे भयंकर हाल.गवताचे पान नाही.जी काय थोडी झाडे होती,ती ओरबाडून - ओरबाडून पाला खायला घातला.

पण उपाशीपोटी गुरांची दशा बघवेना,असा दुष्काळ एक नाही दोन नाही, तब्बल आठ वर्षे चालला.सर्वत्र हाहाकार झाला. ओरबाडून-ओरबाडून उरलेली सुरलेली झाडे सतत निष्पर्ण राहिली गेली.एकामागून एक ती सुकून गेली.

साठवलेला दाणा संपला.लोकांनी खेजडीच्या शेंगांवर,

बोरांच्या बियांच्या पिठावर गुजारा चालवला.पण तेही मिळेनासे झाले तशी सांगरीच्या झाडांची साल सोलून कुटून खायला लागले.मग उरलीसुरली सांगरीची झाडेही मेली.भुकेल्या लोकांनी भुकेल्या काळविटांचा फडशा पाडला आणि मग शेवटी काही निभेना तशी ते मुलूख सोडून निघून गेले.


नऊ वर्षांत सत्यानाश झाला.एक झाड - एक गुरू-एकही काळवीट दिसेनासे झाले.केवळ ठाकुरांसारखे तोलदार लोक,घरात बाजरीच्या कणगीच्या कणगी भरलेल्या होत्या म्हणून कसेबसे टिकून राहिले.जंबाजीच्या आजोबांच्या लहानपणीही असाच दुष्काळ पडला होता.पण ते म्हणायचे की,असे हाल झाले नाहीत.तेव्हा गवत सुकून गेले तरी खेजडी अमाप होती.तिच्या पाल्यावर तब्बल सहा वर्षे गुरे जगून राहिली.तिच्या शेंगांवर माणसांनी जीव धरला. पण असा कल्पवृक्ष दोन पिढ्यांत नाहीसा होत गेला होता आणि जंबाजीच्या डोळ्यांदेखत तर त्याचे बेणेच संपुष्टात आले होते.


जंबाजीच्या संवेदनशील मनावर या दुष्काळाचा अतोनात परिणाम झाला.रात्र-न् रात्र तो आजूबाजूच्या लोकांचे - गुरांचे हाल बघत तळमळत राहिला आणि शेवटी वयाच्या चौतिसाव्या वर्षी त्याला दृष्टांत झाला.निसर्गाशी भांडून,त्याच्यावर अत्याचार करून माणूस मस्तीत राहात होता.निष्पाप काळविटांची हत्या करून, दारू पिऊन,अफूच्या धुंदीत सारे जग बरबाद करीत होता.


 जंबाजीने हे सगळे बदलायचे ठरवले.हे अवर्षण हटल्यावर जर मारवाडात पुन्हा आयुष्य उभे करायचे असेल,तर माणसाला बदलायला हवे होते.या पृथ्वीवर पुन्हा खेजडी-बोर-केर-सांगरीचे आच्छादन करायला हवे होते. पुन्हा काळवीट वाचवायला हवे होते.इसवी सन १४८५ मध्ये जंबाजीने आपला संदेश जगाला दिला.


त्याच्या संदेशात २९ मूलभूत नियम होते.आणि त्यातले दोन मुख्य होते : हिरवे झाड केव्हाही तोडू नये आणि प्राणिहत्या केव्हाही करू नये.जंबाजीचा भूतदयेचा आणि मानवतेचा संदेश कोणावर काहीही जबरदस्ती न करता फैलावत चालला. 


जाट, राजपूत, ब्राह्मण त्यांच्या पंथात मोठ्या प्रमाणात सामील झाले.आयुष्याची पुढची ५१ वर्षे जम्भेश्वरांनी मननात,चिंतनात आणि आपल्या संदेशाचा प्रसार करण्यात घालवली. दिल्लीच्या सिकंदर लोदीला भेटून गोहत्या बंद करवली.आणि शेकडो खेड्यांत आपल्या अनुयायांमार्फत पृथ्वीला पुन्हा हरित वस्त्रांनी पांघरण्याचे काम चालू ठेवले.जम्भेश्वरांनी २९ नियम घालून दिले म्हणून त्यांच्या अनुयायांनी नाव पत्करले - बिश्नोई - बीस और नौई.त्यांनी आपल्या खेड्यांभोवती वृक्षवल्ली जपल्या, काळवीट, चिंकारा, नीलगायी,मोर आणि सर्व पशुपक्ष्यांना आसरा दिला. हळूहळू त्यांची खेडी,त्यांच्या जमिनी वृक्षाच्छादित होत राहिल्या. त्यांच्या गुरांना पुन्हा भरपूर चारा मिळू लागला.जमिनीचा कस वाढू लागला.

बिश्नोई सुस्थितीत आले.मारवाडातून त्यांचा पंथ राजस्थानाच्या इतर प्रदेशात,मध्य प्रदेश हरयाणांत पसरला.इतरत्र मात्र पूर्वीचीच गती चालू होती.वाळवंट पसरत होते,माळरान आणखीच रखरखीत होत होते.

लोकांना कळत नव्हते असे नाही,पण वळत मात्र नव्हते.

राठोड राजांच्या अनेक पिढ्या गेल्या.त्यांचे स्वातंत्र्य जाऊन ते मोगलांचे मांडलिक झाले.जोधपूर स्थापणाऱ्या जम्भेश्वरांच्या समकालीन,राव जोधाजीच्या वंशातल्या आठ पिढ्या गेल्या आणि महाराज अजितसिंग गादीवर आले.अजितसिंग औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्यांच्या महापराक्रमी बापाच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी जन्मले होते.औरंगजेबाने त्यांना पकडायला जंग जंग पछाडले;परंतु त्यांच्या निष्ठावंत सेवकांनी त्यांना वाचवून वाढविले.शेवटी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी जोधपूरची गादी पुन्हा मिळवली. 


पण त्या धामधुमीच्या काळात एका क्षणाचीही उसंत मिळाली नाही.सतत लढायांना तोंड देत देत त्यांनी गादी राखली.आयुष्याच्या शेवटी इसवी सन १७३० मध्ये त्यांनी जोधपूरला एक मोठा राजवाडा बांधायचा ठरवला.

जोधपूरच्या सुंदर लाल दगडांचा राजवाडा.तो बांधायला चुना हवा.तसा चुना या प्रदेशात भरपूर आहे.पण एवढ्या चुन्याची कळी करायला भरपूर जळण हवे.आता या वाळवंटात एवढ्या प्रचंड भट्टीसाठी जळण पैदा करणे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती.पण अजितसिंग महाराजांच्या सुदैवाने जोधपूरपासून सोळाच मैलांवर बिश्नोई लोकांची मोठी वस्ती होती.जवळजवळ अडीचशे वर्षांपूर्वी या लोकांनी जम्भेश्वरांचा मार्ग पत्करला होता आणि त्याच्या गावापाशी शेकडो खेजडीची झाडे वाढविली होती.त्यातल्या खेजडली गावाजवळ चुन्याच्या खाणीही होत्या. झाले! दिवाणांचा हुकूम निघाला,

'खेजडली गावी चुन्याच्या भट्ट्या सुरू करा आणि महाराजांच्या राजवाड्याचे बांधकाम चालू करा.' कामगार हजर झाले. कुऱ्हाडी घेऊन निघाले. पण काय ! बिश्नोई त्यांना आडवे आले.आम्ही जतन केलेली खेजडीची झाडे तोडायची नाहीत.ते आमच्या धर्माविरुद्ध आहे.कामगार परतले.राजवाड्यात निरोप गेला,दिवाणसाहेब गरम झाले.

काय ही मग्रुरी ! ते स्वतः जातीने घोडेस्वार घेऊन आले. कामगारांना हुकूम केला, बिश्नोईंचे काही ऐकू नका.झाडे तोडा.' कामगार सरसावले.सारा गाव गोळा झाला.

विनवण्या करू लागला.आमचा धर्म तुडवू नका.आमच्या पिढ्यान् पिढ्यांनी जतन करून ठेवलेली वृक्षसंपदा नासू नका.दिवाण म्हणाला,काही चालणार नाही,घाव पडणारच. पण गावात होती एक रणचंडी.बिश्नोई रामखोडची बायको अमृतादेवी.ती म्हणाली, झाड तुटेल आम्ही तुटल्यावरच,आधी नाही.तिने आणि तिच्या तीन मुलींनी झाडांना मिठ्या घातल्या.म्हणाल्या, तोडा हवे तर.दिवाण गरजला,बघता काय? घाव घाला. कुऱ्हाडीचे

घाव पडले.चौघींचे झाडासकट तुकडे उडाले. साऱ्या गावकऱ्यांना उचंबळून आले.त्यांनी झाडा-झाडाला मिठ्या घातल्या.बायका- मुले-पुरुष सारे सारखेच.दिवाणाचे तर माथेच फिरले.महाराजांच्या मर्जीआड कोण येतो? तोडा त्या सगळ्यांना.बघता बघता थोडेथोडके नाही,३६३ बिश्नोई जीव त्यांच्या खेजडीच्या झाडांसकट तोडले गेले!


या अघटित घटनेची बातमी म्हणता म्हणता फैलावली.गावा-गावाचे बिश्नोई खेजडलीला धावत आले.दरबारात महाराजांनाही वर्दी मिळाली.मग मात्र दिवाणाची मग्रुरी उतरली. राजा मऊ झाला.महाराज जातीने घोडेस्वार होऊन खेजडलीला आले.तो काय,

हजारो बिश्नोईंचा जमाव आक्रोश करीत असलेला बघायला मिळाला.महाराजांना पश्चात्ताप झाला. तिथल्या तिथे लोकांची माफी मागून महाराज म्हणाले : यापुढे बिश्नोईच्या गावापासचे एकही हिरवे झाड तुटणार नाही याची हमी आम्ही घेतो.त्यांनी बिश्नोईना ताम्रपट दिला : तुमच्या गावांपाशी वृक्षतोड होणार नाही,पशुहत्या होणार नाही.एवढेच नाही तर कोणी बिश्नोई दुसऱ्या गावी गेला आणि त्याला कोणी झाड तोडताना किंवा शिकार करताना दिसला तर त्याला मना करायचा अधिकार आहे.आणि तो सर्वांनी मानलाच पाहिजे.शिवाय बिश्नोईना अनेक कर माफ केले गेले.(वारुळ पुराण,माधव गाडगीळ,ई.ओ.विल्सन,

संक्षिप्त अनुवाद नंदा खरे,मनोविकास प्रकाशन,)


या गोष्टीला आज पावणेतीनशे वर्षे झाली. तब्बल पाच शतके बिश्नोई पंथ राजस्थानात, मध्य प्रदेशात,हरयाणात झाडांना सांभाळतो आहे,वन्य पशुपक्ष्यांना सांभाळतो आहे.या काळात आपल्या भारतमातेचे हरितवस्त्र अधिकाधिक फाटून त्याची पार लक्तरे झाली आहेत.भारत भूमीवर एके काळी हजारोंनी नव्हे लक्षावधींनी बागडणारे काळविटांचे - चिंकारांचे कळप केव्हाच संपून गेले आहेत.

पण बिश्नोई खेड्यांच्या आसपास मात्र अजूनही झाडी नुसती टिकूनच नाही,तर वाढत आहे.पूर्वीच्या कण्व ऋषींच्या आश्रमाच्या वर्णनाप्रमाणे त्यांच्या वस्तीजवळ निर्भय कृष्णमृगांचे कळपच्या कळप फिरत आहेत.

दिल्लीच्या अकबर बादशहाने सव्वाचारशे वर्षांपूर्वी बिश्नोई लोकांच्या देवळाजवळ काळविटांचे असे निर्भय कळप पाहिले तेव्हा लिहून ठेवले की,कलियुगात हा सत्ययुगातला देखावा पाहून मला फार आश्चर्य वाटले!आज तर हे दृश्य अधिकच विस्मयजनक आहे.पण 


आजही बिश्नोई आपल्या या अप्रूप परंपरेला जपून आहेत आणि त्याचा अभिमान बाळगून आहेत.जेथे बिश्नोईची अग्निपरीक्षा झाली,त्या खेजडली गावी अजूनही दोनशे ऐंशी वर्षांपूर्वी न तुटलेले एक झाड आहे.साठ वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या ३६३ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ३६३ झाडे लावलेली आहेत.आणि त्यांच्या प्रेमाने ती भराभर फोफावत आहेत.दर वर्षी भाद्रपद शुद्ध दशमीला तेथे एक मोठी यात्रा भरते.

२८/२/२४

मानवी शरीराचे विच्छेदन..२ Dissection of the human body


यानंतर त्यानं 'हिस्टोरिए ॲनिमेलियम' (Historiae Animalium) या आपल्या पुस्तक तसेच माहितीसंग्रहात त्या वेळी परिचित असलेल्या सगळ्याच प्राण्यांची आणि जेस्नरनं स्वतः शोधलेल्या प्राण्यांची माहिती आणि अतिशय सुबक वूड कट डिझाइन्स त्यानं मांडल्या होत्या.

गंमत म्हणजे त्यात त्यानं चक्क ड्रॅगन आणि मरमेड अशा फक्त माणसाच्या कल्पनेतल्या प्राण्यांनासुद्धा घेतलं होतं!


'हिस्टोरिया प्लँटारम' (Historia Plantarum) हे जेस्नरनं वनस्पतींच्या माहितीचं आणि चित्रांचं पुस्तक लिहिण्याचा घाट घातला होता.हेही काम अवाढव्यच होतं.दुर्दैवानं त्याच्या मृत्यूपर्यंत हे पूर्ण होऊ शकलं नाही.त्यानं 'मित्रिडेट'(Mithridates) नावाचा १३० भाषांमधलं साम्य आणि फरक सांगणारा कोशही लिहिला.त्यात एकाच अर्थाची एक प्रार्थना त्यानं चक्क २२ भाषांमध्ये लिहिली होती! त्याचं हेही काम अचाटच म्हणावं लागेल. शिवाय,त्यानं कीटकांच्या माहितीचाही असाच कोश तयार करायचा घाट घातला होता. तोही त्याच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. नंतर तो पेनी नावाच्या त्याच्या विद्यार्थ्यानं पूर्ण केला. जेस्नरनं इतरांनी केलेलं लिखाणही संपादन करून प्रसिद्ध केलं.

त्यानं केलेल्या लिखाणाची फक्त यादी करायची म्हटली तरी पुस्तकाची दोन-चार पानं सहज लागतील! इतकं करून तो थांबला नाही.त्यानं जगात अस्तित्वात असलेल्या सगळ्याच पुस्तकांची माहिती देणारी युनिव्हर्सल लायब्ररी तयार करायची योजना आखली होती.त्यासाठी त्यानं अतोनात कष्ट घेतले होते.त्यानं त्याच्या संपर्कात असलेल्या सगळ्या देशांतल्या आणि सगळ्या भाषांमधल्या आपल्या मित्रांना त्यांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या आणि प्रकाशित झालेल्या सगळ्या पुस्तकांची माहिती पाठवून द्यायला सांगितली होती.त्यानं अनेक प्रकाशकांना आणि लेखकांना हाताशी धरून त्यांच्या पुस्तकांचे आणि त्या पुस्तकांची माहिती असलेल्या मासिकांचे कॅटलॉग्ज जमा केले होते.

जगातल्या अनेक देशांतल्या लायब्ररीजमध्ये तो स्वतः जाऊन आला होता.त्यात उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी करून घेऊन आला होता.या सगळ्यांमधला नेमका आणि महत्त्वाचा मजकूर कापून व्यवस्थित संगतवार लावण्यात तो दिवसेंदिवस बुडून जायचा.हा त्यानं तयार केलेला त्या वेळचा अजस्र डेटाबेसच म्हणावा लागेल.

आणि आश्चर्य म्हणजे हे त्यानं स्वतः कोणत्याही यंत्राची मदत न घेता केलं होतं. तो खरंचच सोळाव्या शतकातला 'वन मॅन सर्च इंजिन' होता आणि तेही मानवी सारासार बुद्धीसहित!आतापर्यंत त्याची तब्बल ७२ पुस्तकं प्रकाशित झाली होती आणि तो पुढच्या १८ पुस्तकांवर काम करत होता! पण दुर्दैवानं मध्येच त्याला प्लेग झाला.आता आपण अजून जगत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यानं आपल्याला आपल्या प्रिय पुस्तकांच्या लायब्ररीत घेऊन जायची विनंती केली.आणि आपल्या प्राणप्रिय पुस्तकांच्या सान्निध्यात त्यानं शेवटचा श्वास घेतला! त्याची अनेक प्रॉजेक्ट्स चालू असताना अशा प्रकारे वयाच्या फक्त ४९ वर्षांपर्यंत त्यानं इतकं अचाट काम केलं होतं,की आज माहितीचा महापूर असूनही कोणी हे करायला धजावेल की नाही शंकाच आहे! त्या काळातलं त्याचं हे काम आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे.


जेस्नरनं केलेलं अचाट काम पाहून त्याला मानवंदना म्हणून अठराव्या शतकाला वनस्पतिशास्त्रज्ञ कार्ल लिनियस यानं ट्यूलिपच्या एका जातीला 'ट्यूलिपा जेस्नेरियाना' असं नाव दिलं.शिवाय, एका जिनसलाही त्यानं 'जेस्नेरिया' आणि वनस्पतींच्या एका फॅमिलीला 'जेस्नेरियासी' असं नाव दिलं.आज जेस्नरला आपण आधुनिक वैज्ञानिक प्राणिशास्त्र,

वनस्पतिशास्त्र आणि बिब्लिओग्राफीचा जनक मानतो.आधीची ग्रीक पुस्तकं ही तर विज्ञानाची सुरुवात आहे. शआता आपण यापुढे जायला हवं असं युरोपियनांना प्रकर्षानं लक्षात यायला लागलं. पण अजूनही प्लेटो,ॲरिस्टॉटल,थिओफ्रॉस्ट्स, गेलन,या वैज्ञानिकांचा समाजावर इतका जबरदस्त पगडा होता,की तो भेदन नवं काही करणं हे काम प्रचंड अवघड होतं.हे फक्त बायॉलॉजीतच होतं असं नाही तर जवळपास सगळ्याच विज्ञानशाखांना यातून जावं लागलं आहे.हा पडदा भेदायला आता दुसऱ्या थिओफ्रॉस्ट्सची गरज होती! पण हा थिओफ्रॉस्ट्स स्विस डॉक्टर होता. याचं मूळ नाव थिओफ्रॉस्ट्स बॉम्बास्ट्स फॉन होहेनहाइम (Theophrastus Bombastus von Hohenhiem) (१४९३-१५४१) असं होतं! 


हा मुलगा म्हणजे मुळातच पायाला भिंगरी लावून आलेला होता.त्यामुळे हुशार असूनही त्याला घरी बसून जुनी पुस्तकं वाचून त्यात काय लिहिलंय याची पारायणं करण्यात काही फारसा रस नव्हताच! तो सतत कोणत्या तरी भटकंतीच्या दौऱ्यावर जायच्या तयारीत असे किंवा भटकायला तरी गेलेला असे. वडिलांनी लहानपणीच त्याला औषधांचं ज्ञान दिलं होतंच. तो आता त्याही पलीकडे नव्या गोष्टींच्या शोधात निघाला होता.आपल्या प्रवासात त्याला अनेक नवनव्या औषधी वनस्पतींचा शोध लागला.हा थिओफ्रॉस्ट्स मुळातच विक्षिप्त,गूढवादी आणि चक्रम होता.गंमत म्हणजे त्यालाही त्याच्या आधीच्या अल्केमींप्रमाणे वेगवेगळी रसायनं तयार करण्यात भारी रस होता.पण पूर्वीच्या अल्केमींनी परीस आणि अमृत शोधण्यात आपलं आयुष्य घालवलं होतं. होहेनहाइमला हे सगळं अनावश्यक आणि त्यामुळेच अतार्किक वाटायचं.


सोनं किंवा अमृत अशा कधीही न सापडणाऱ्या गोष्टी शोधण्यापेक्षा माणसाला गरजेच्या असलेल्या औषधी वनस्पती आणि औषधी रसायनं शोधणं आणि त्याद्वारे माणसांना होणारे वेगवेगळे रोग बरे करणं हे डॉक्टरचं कर्तव्य आहे असं त्याला वाटत होतं. यातून त्यानं औषधांमध्ये खनिजांचा उपयोग करायला सुरुवात केली. 


पण गंमत म्हणजे यातूनच त्याला आपणही कधीही आजारी न पडू देणारा खडा/दगड शोधलाय असा दावा तो करत असे.नंतर तर तो चक्क आपल्याला अमृत सापडलंय आणि अनेक राक्षस आपल्या आज्ञेत आहेत असंच सगळयांना सांगत सुटायचा.अर्थात,त्यात काही तथ्य नव्हतं. पण त्यानं शोधून काढलेली इतर औषधं मात्र खरोखर गुणकारी असावीत.होहेनहाइम ब्रसेल्समध्ये डॉक्टरकी करायचा.तो फुफ्फुसांच्या रोगांवर उपचार करायचा.त्याचा ज्योतिषावरही विश्वास होता.शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवर वेगवेगळ्या ग्रहांचं नियंत्रण असतं असं त्याला वाटायचं.उदाहरणार्थ,सूर्य हृदयावर नियंत्रण ठेवतो,चंद्र मेंदूवर आणि गुरू यकृतावर नियंत्रण ठेवतो.

अशा प्रकारे तर आपल्या सूर्यमालेतले ग्रह कमी पडले असते आणि आपल्याला राहिलेल्या अवयवांसाठी इतर ग्रहांना पाचारण करावं लागलं असतं! एखाद्या हत्यारानं आपल्याला जखम झाली तर ते हत्यारच मोडून टाकलं तर ती जखम आपोआप बरी होईल असं त्याला वाटे.!होहेनहाइम त्याच्या पेशापेक्षा इतर उद्योग करण्यासाठीच प्रसिद्ध होता.तो प्रचंड दारू प्यायचा.तो पैसाही वेडावाकडा उधळायचा.


 तो खूप गर्विष्ठही होता. त्यात त्यानं प्रसिद्ध 'हिप्पोक्रॅट्स ओथ' ही शपथ घ्यायला नकार दिला होता! अपण कसे पुढारलेल्या मतांचे आणि विज्ञानाला जुन्या बुरसटलेल्या विचारांतून बाहेर काढणारे आहोत हे दाखवण्यासाठी त्यानं गावातल्या भर चौकात चक्क गेलन आणि अविसेना यांच्या पुस्तकांची होळी केली होती. आणि त्यावेळी लोक सेल्ससला सगळ्यात हुशार मानत होते. तर हा स्वत:ला त्याच्याही पुढचा म्हणजे चक्क पॅरासेल्सस म्हणवून घेत होता! आणि आपणही आज त्याला याच पॅरासेल्सस या नावानं ओळखतो.त्याच्या अशा प्रक्षोभक कृत्यांमुळे मात्र त्याला गावाच्या बाहेर काढलं गेलं.पॅरासेल्ससच्या स्वतःच्या थिअरीज काही फार उच्च कोटीच्या होत्या असं नव्हतं.पण युरोपियनांनी अजूनही जुन्या ग्रीक पुस्तकांना प्रमाण मानून आपण नवं काहीही न करणं यावर त्याचा आक्षेप होता. आणि त्याचा परिणामही जुन्या विचारांचा पगडा डळमळीत होण्यात झाला.यातूनच पुराण

काळातल्या गोष्टींवरची झापडं दूर होऊन माणूस नव्या स्वच्छ नजरेनं विज्ञानाकडे पाहायला लागणार होता.आता विज्ञानाला धातूतल्या सोन्याची नाही तर ज्ञानाच्या सोन्याची झळाळी प्राप्त होणार होती.!


२७.०१.२४ या लेखातील शेवटचा भाग..





२६/२/२४

भगतसिंगांचे वडिलांना पत्र /Bhagat Singh's letter to his father

दि. ३० सप्टेंबर १९३० रोजी भगतसिंगांचे वडील किशनसिंह यांनी विशेष न्यायालयाला (ट्रिब्युनलला) अर्ज करून बचाव करण्याची संधी देण्याची मागणी केली होती.सरदार किशनसिंह स्वतः एक देशभक्त होते आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी तुरुंगवास भोगला होता,बचाव करण्यासाठी आपली बाजू मांडून भगतसिंगला फाशीपासून वाचविणे शक्य आहे,असे वाटल्यामुळे त्यांनी अर्ज केला होता.भगतसिंग यामुळे प्रचंड नाराज झाले,

कारण भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचे विचार याबाबत वेगळे होते.ब्रिटीश सरकारने सूड उगविण्याचे धोरण ठेवले आहे आणि न्याय हे निव्वळ थोतांड आहे.शिक्षा देण्यापासून ब्रिटीश सरकारला कोणत्याही प्रकारे थांबवले जाऊ शकत नाही.

याबाबत जर दुबळेपणा दाखवला,तर जनतेत अंकुरणारे क्रांतीचे बीज रुजू शकणार नाही असे भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना वाटत होते. इतर तुरुंगात असलेल्या साथीदारांना मी त्यांच्यासोबत विश्वासघात करतोय असे वाटू नये,म्हणून वडिलांनी केलेल्या अर्जामुळे भगतसिंग दुखावले गेले होते;पण आपल्या भावनांना यावर घालत आपली तत्त्वे त्यांच्या

पर्यंत पोहोचावीत याकरिता त्यांनी दि.४ ऑक्टोबर १९३० रोजी पुढील पत्र लिहिले.ते पत्र त्यांच्या वडिलांना उशिरा मिळाले. दि.७ ऑक्टोबर १९३० ला खटल्याचा निकाल जाहीर झाला.ते पत्र सोबत देत आहे.या पत्रावरून भगतसिंगांची आपल्याला झालेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल काय भूमिका होती हे अधिक स्पष्टपणे आपल्याला कळू शकेल. मजबुती का नाम महात्मा गांधी-चंद्रकांत झटाले,न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे


दि. ४ ऑक्टोबर १९३०


पूज्य पिताजी,


माझा बचाव करण्यासाठी विशेष न्यायालयाच्या (स्पेशल ट्रिब्युनल) सदस्यांकडे आपण अर्ज पाठवला आहे,हे ऐकून मी उद्विग्न झालो आहे.ही बातमी इतकी यातनादायी होती की,मी ते शांतपणे सहन करू शकलो नाही.या बातमीने माझ्या मनाची शांतता भंग करून मनात खळबळ निर्माण केली आहे.आजच्या अवस्थेत आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा अर्ज करणे हे तुम्हाला कसे काय योग्य वाटते,हे काही मला समजू शकत नाही.एक पिता म्हणून आपली भावना आणि आपली कळकळ लक्षात घेतली,तरी माझ्याशी सल्लामसलत न करता माझ्यावतीने असे पाऊल टाकायचा आपल्याला कोणताही हक्क नाही असे मला वाटते.राजकीय क्षेत्राबाबत हे आपल्यापेक्षा नेहमीच वेगळे राहिले आहेत हे आपणास ठाऊक आहे.मी आपल्या मान्यतेचा किंवा अमान्यतेचा विचार न करता नेहमीच स्वतंत्रपणे कार्य करत आलो आहे.


मी आपला खटला गांभीर्याने लढवावा आणि आपला बचाव योग्य प्रकारे करावा ही गोष्ट माझ्या मनावर बिंबवण्याचा आपण सुरुवातीपासून प्रयत्न करत आला आहात,हे तुम्हाला आठवत असेल असे मला वाटते;पण मी नेहमीच या गोष्टीला विरोध करत आलो आहे,हेदेखील आपल्याला ठाऊक आहे.


माझा बचाव करण्याची मला कधीही इच्छा नव्हती आणि त्याकडे गंभीरतेने मी कधीच लक्षही दिलेले नाही.हे केवळ मी कोणत्या धूसर विचारसरणीपोटी केले की,त्यासंदर्भात माझ्या भूमिकेचे समर्थन करणारे नेमके असे माझे काही म्हणणे होते,हा प्रश्न वेगळा आहे आणि त्याची या ठिकाणी चर्चा करता येणार नाही.आम्ही हा खटला लढवताना एका निश्चित धोरणाचा पाठपुरावा करत आहोत हे आपल्याला ठाऊक आहे.हे धोरण,माझी तात्त्विक विचारसरणी आणि आमचा कार्यक्रम यानुसारच माझे प्रत्येक पाऊल पडले पाहिजे.

आज परिस्थिती फारच वेगळी आहे;पण ती याहीपेक्षा वेगळी असती तरीही बचाव करू पाहणारा मी शेवटचा ठरलो असतो.आमच्याविरुद्ध मोठे गंभीर आरोप केलेले असले तरीही त्या खटल्याबाबत पूर्ण अनास्था दाखविणे हीच माझी भूमिका संपूर्ण खटल्यामध्ये राहिली आहे.अशा परिस्थितीत सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी अनास्था दाखविली पाहिजे.त्यांनी न्यायालयातील कायदेशीर लढायांची पर्वा करता कामा नये. त्यांना ठोठावलेल्या कठोरात कठोर शिक्षा त्यांनी धैर्याने भोगल्या पाहिजेत असे माझे मत नेहमीच राहिले आहे.त्यांनी स्वतःचा बचाव करायलाही हरकत नाही;पण तो निखळ राजकीय विचाराने केला पाहिजे,कधीही वैयक्तिक विचारापोटी नव्हे. खटल्याच्या संपूर्ण काळात आमची योजना या तात्विक विचारसरणीला अनुरूप अशीच होती. असे करण्यात आम्ही यशस्वी झालो की नाही याचा निर्णय करणे हे माझे काम नाही.आम्ही आमचे कार्य नेहमीच निरपेक्षपणे करत आलो आहोणे. 'लाहोर कटा' च्या खटल्याचा वटहुकूम जारी करताना व्हॉइसरॉयने त्यासोबत जे वक्तव्य केले होते त्यात त्यांनी म्हटले होते की,'कटातील आरोपी कायदा आणि मानखंडणा करण्याचा प्रयत्न करत आहेत.' या परिस्थितीने जनतेसमोर ही वस्तुस्थिती ठेवण्याची संधी आम्हाला दिली की,कायदा उधळून लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत की,तो दुसऱ्या बाजूने केला जात आहे हे जनतेने ठरवावे.बाबाबतीत लोकांचे मत वेगळे असू शकते.मतभेद असणाऱ्यांपैकी कदाचित आपणही एक असाल;पण त्याचा अर्थ असा नव्हे की माझ्याशी विचारविनिमय न करता,मला कल्पनाही न देता माझ्यावतीने आपण पावले टाकावीत.


आपल्याला वाटते तसे माझे आयुष्य काही इतके मौल्यवान नाही. निदान मला तरी तसे वाटत नाही.

माझ्या तात्त्विक विचारसरणीची आहुती देऊन बचाव करावा इतके माझे आयुष्य मौल्यवान नाही. माझ्या

शिवाय माझे जे इतर साथीदार आहेत, त्यांचेही खटले माझ्या खटल्याप्रमाणेच गंभीर स्वरूपाचे आहेत.

आम्ही सर्वांनी मिळून एक सामाजिक धोरण ठरवले आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्याला चिकटून राहू.त्यासाठी आम्हाला व्यक्तिशःकितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी त्याची आम्हाला मुळीच पर्वा नाही.


पिताजी,मी फार गोंधळलोय.आपण उचललेल्या या पावलाबद्दल आपल्यावर दोषारोप करताना किंवा टीका करताना मी सभ्यतेच्या सीमा तर ओलांडत नाही ना,

आणि माझी भाषा अधिक बोचरी तर होणार नाही ना अशी धास्ती मला वाटते;पण माझे म्हणणे मी स्पष्टपणे अवश्य सांगेन.जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने माझ्याशी असा व्यवहार केला असता,तर त्याला मी विश्वासघातापेक्षा कमी लेखले नसते;पण याबाबत मी एवढेच म्हणेन की,हा एक दुबळेपणा आहे.अतिशय शोचनीय असा दुबळेपणा.


ही वेळ आपल्या सर्वांच्या परीक्षेची होती. पिताजी,आपण त्यात अयशस्वी झालात,एवढेच मला सांगायचे आहे.मला जाणीव आहे की, दुसऱ्या कोणत्याही अव्वल देशभक्ताएवढेच आपणही देशभक्त आहात.आपण आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केलेले आहे हे मला माहीत आहे;पण या कसोटीच्या वळणावर आपण असा दुबळेपणा कसा काय दाखवलात,हे मात्र मला समजूच शकत नाही.शेवटी आपण टाकलेले हे पाऊल मला मान्य नाही;हे मला आपल्याला,माझ्या इतर मित्रांना, तसेच माझ्या खटल्यात स्वारस्य असणाऱ्या सर्वांना सांगायचे आहे.न्यायालयात कोणत्याही प्रकारे बचाव करावा अशी माझी आजही भूमिका नाही.माझ्या काही साथीदारांकडून बचावासंदर्भात केला गेलेला विनंती अर्ज न्यायालयाने जरी मंजूर केला असता,तरीही मी माझा बचाव केला नसता.


उपोषणाच्या काळात विशेष न्यायालयाला (ट्रिब्युनलला) माझ्या मुलाखतीसंदर्भात मी जो अर्ज दिला होता,त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि मी माझा बचाव देऊ इच्छितो, असेही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.प्रत्यक्षात खरेतर कसलाही बचाव देण्याची माझी इच्छा नव्हती.

आजही माझे तेच मत आहे.


'बॉर्स्टल' तुरुंगात कैदी असलेल्या माझ्या साथीदारांना मी दगा दिला आणि विश्वासघात केला असेच वाटत असेल.

माझी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर स्पष्ट करायला मला संधीदेखील मिळणार नाही.या विषयासंबंधीच्या गुंतागुंतीचे सर्व सत्य जनतेला समजले पाहिजे अशी माझी इच्छा आहे म्हणून हे पत्र प्रसिद्ध करावे अशी मी आपणास विनंती करतो.


आपलाच प्रिय पुत्र,

भगतसिंग


भगतसिंगांची फाशी माफ व्हावी म्हणून गांधींनी व्हॉइसरॉय आयर्विनला लिहिलेलं एक पत्र


Letter to Viceroy


1,Daryaganj Delhi 

March 23,1931


Dear Friend,

It seems cruel to inflict this letter on you; but the interest of peace demands a final appeal.Though you were frank enough to tell me that there was little hope of your commuting the sentence of death on Bhagat Singh and two others,you said you would consider my submission of Saturday.

Dr.Sapru met me yesterday and said that you were troubled over the matter and taxing your brain as to the proper course to adopt.If there is any room left for reconsideration,I invite you attention to the following.


Popular opinion rightly or wrongly demands commutation.When there is no principle at stake,it is often a duty to respect it.


In the present case the chances are that,if commutation is granted, internal peace is most likely to be promoted.In the event of execution, peace is undoubtedly in danger.


Seeing that I am able to inform you that the revolutionary party has assured me that,in the event of these lives being spared,that party will stay its hands suspension of sentence pending cessation of revolutionary murders becomes in my opinion a peremptory duty.Political murders have been condoned before now.It is worth while saving these lives,if thereby many other innocent lives are likely to be saved and maybe even revolutionary crime almost stamped out.


Since you seem to value my influence such as it is in favour of peace,do not please unnecessarily make my position,difficult as it is, almost too difficult for future work.


Execution is an irretrievable act.If you think there is the slightest chance of error of judgment,I would urge you to suspend for VOL.51


: 6 JANUARY,1931 - 28 APRIL,1931 291 further review an act that is beyond recall.If my presence is necessary,I can come.Though I may not speak.I may hear and write what I want to say.Charity never faileth.


I am,

Your sincere friend,


From a Photostat: C.W. 9343.

Courtesy: India Office Library

२४/२/२४

दारा शुकोह - योद्धयांमधील कवी/Dara Shukoh - A poet among warriors

ऑगस्ट,१६५९ महिना संपायला आला आणि आग्र्याच्या शाही दरबारातील सर्वांना माहीत झालं,की दारा शुकोहचा लवकरच शिरच्छेद करण्यात येणार आहे.दारा शुकोह हा सूफी संतांचा,कवींचा लाडका असा बादशाह शाहजहानचा सर्वांत ज्येष्ठ,लाडका पुत्र वारसाहक्काची लढाई हरला होता.अत्यंत कपटी औरंगजेबाने त्याला मात दिली होती.त्याच्या स्वतःच्याच सैनिकांनी त्याचा विश्वासघात केला,जुन्या सरदारांनी त्याला आयत्या वेळेस सोडून दिलं,त्याची पत्नीही मरण पावली (बहुधा तिनं आत्महत्या केली, असा कयास आहे.) आणि ज्याला तो स्वामिभक्त समजत होता,अशा माणसाने त्याला आयत्या वेळेस दगा दिला अशा त्या दारा शुकोहला आपल्यावर काय भोग ओढवलेले आहेत,याची जाणीव होती.आपल्या

बंदिवासातून त्यानं भावाला पत्रही लिहिलं होतं की,मी उर्वरित जीवन नव्या बादशाहच्या भल्यासाठी प्रार्थना करण्यात व्यतीत करीन. परंतु त्याच्या विनवणीला नकार मिळाला. नाहीतरी विजयी औरंगजेबच्या मनात कित्येक दशकांपासून दाराबद्दल तिरस्कार साठून राहिला होता.

त्यामुळे नंतर खोटाच खटला दाखल करण्याचं नाटक रचून त्यानं आपल्या ज्येष्ठ बंधूवर हर त-हेचे आरोप लावले.त्यात राजाच्या निकालात चुकीची ढवळाढवळ करण्यापासून ते मुस्लीम धर्माशिवाय अन्य धर्मावर विश्वास ठेवण्याचा प्रवाद असे सर्व त-हेचे आरोप होते.हे सर्व आरोप खरे आहेत असे सिद्ध करून धाकटा बंधू औरंगजेब याने आपण स्वतः फारच मोठे नैतिक आहोत असा आव आणून दाराला मृत्युदंड फर्मावला.तोपर्यंतचं दाराचं जीवन वैभवात आणि सुखसुविधांमध्ये गेलं होतं. 


वडिलांच्या दरबारात तो सुवर्णासनावर बसत होता.त्या सुखी दिवसांत त्याला 'नशीबवान शाहजादा' असंच म्हटलं जात होतं.ते आसन आणि ते नशीब- दोन्ही त्याच्याकडून अचानक हिसकावलं जाण्यापूर्वी त्याला दरवर्षी चांदीचे दोन कोटी रुपये उत्पन्न दिलं जात होतं.तो पित्याचा सर्वांत जवळचा सल्लागार होता त्यामुळेच अन्य भावांच्या मनात त्याच्याबद्दल खूप मत्सर निर्माण झाला होता. दाराचं व्यक्तिमत्त्व लोभस होतं.त्यानं सर्वसंग परित्यागाविषयी भावुक काव्य लिहिलेलं असलं, तरी प्रत्यक्षात तोही थोडाबहुत स्वार्थी होताच.


औरंगजेबाने दख्खनच्या शिया सल्तनतींना खिंडीत गाठलं की तिथले सुलतान दारालाच आपली निवेदनं पाठवायचे.

कारण त्यांना माहीत होतं की,हा ज्येष्ठ शाहजादाच बादशाहच्या विश्वासातला आहे.महत्त्वाकांक्षी औरंगजेबाची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे हे दाराला बघवत नव्हतंच.त्यामुळे तो आपल्या वडिलांचं मन वळवायचा आणि भावाच्या योजनांना सुरुंग लावायचा.

त्यामुळे खरोखरच,दारा त्या वारसाहक्काच्या लढाईत जिंकला असता,तर त्यानंही आपल्या स्पर्धकांवर औरंगजेबाहून जास्त दया दाखवली असती अशी अपेक्षा करण्याचं काही कारण नाही.त्याच्या स्वभावात काही अंगभूत वैगुण्यं होती. फ्रैंकॉईस बर्नियर हा दाराचा खाजगी डॉक्टर होता.त्यानं लिहिलंय की,आपण खूपच श्रेष्ठ आहोत असं त्याला वाटायचं.आपण आपल्या मनशक्तीने काहीही साध्य करू शकतो असा त्याचा समज होता.त्याला सल्ला द्यायचं धाडस करणाऱ्यांकडे तो तुच्छतेने बघायचा त्यामुळे 'त्याचे बंधू त्याच्या विरुद्ध गुप्त कारस्थानं रचत आहेत' हे त्याच्या कानी घालायला खरे मित्रही कचरत होते.स्वतःच्याच पायांवर कुऱ्हाड मारणाऱ्या या फाजील आत्मविश्वासाच्या जोडीला त्याच्याकडे उच्च बुद्धिमत्ता होती.पण त्यामुळे संकुचित मनोवृत्तीच्या गर्विष्ठ लोकांना तो अजिबात आवडत नसे. "जिथं एकही मुल्ला नसतो तिथं स्वर्ग असतो," असं तो म्हणायचा. साहजिकच दाराबद्दल सहानुभूती असणारे मुल्लाही त्याच्यापासून दूर जायचे.त्यातच भर म्हणून त्याचे वडील त्याच्यावर आपलं सगळं प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव करायचे.त्यामुळेही दाराने बरेच शत्रू गोळा केले. औरंगजेबासारख्याच्या मनात तर त्याच्याबद्दल तीव्र तिरस्कारच निर्माण झाला.दारानं काढलेली एक मोठी लष्करी मोहीम अपयशी ठरली.

कारण सैन्यातील सर्वसामान्य सैनिकांशी त्याचे भावबंधच जुळलेले नव्हते.त्याउलट औरंगजेबाचे आणि अन्य भावांचे तसे बंध त्यांच्या सैन्याशी असल्यानेच त्यांना लढायांत यश मिळत होतं. त्याचे भाऊ तलवार गाजवत असताना इकडे दारा मात्र सूफी संत गोळा करत बसला होता. परंतु तसं पाहता या मोगल शाहजाद्याचे दोष कुठल्याही मानवात असू शकत होते.त्याचं मन त्याच्या समकालीनांच्या मनापेक्षाही अधिक वेगाने धावत होतं.

वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यानं पहिलं पुस्तक लिहिलं आणि शिरच्छेद होण्याच्या दोन वर्षं अगोदर तो काव्याच्या अत्यंत नितांतसुंदर ओळी लिहीत होता.औरंगजेबाने नेमलेल्या एका कवीने तक्रार केली आहे की,दारा सदैव ब्राह्मण,योगी आणि संन्यांशांच्या संगतीत असतो.हे सगळे भ्रामक गोष्टी शिकवणारे बिनकामाचे गुरू फारच विद्वान आणि शाहणपणाचे खरे धारक आहेत असं त्याला वाटतं.त्यानं 'माजमा अल बहरेन' (दोन महासागरांचा संगम) हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्याला पणजोबा अकबराप्रमाणेच दोन धर्मांचं मीलन घडवून आणून समाजासाठी नवीन दृष्टी निर्माण करण्याची इच्छा होती.दारानेच उपनिषदांचा अनुवाद संस्कृतातून फारसीत केला.या अनुवादामुळेच तर आणखी एका शतकानंतर फ्रान्समध्ये व्होल्टेअरला भारतीय ज्ञानानंदात डुंबता आलं.शाहजहानच्या या कमनशिबी मुलाने उपनिषदांबद्दल लिहिलं,"हे जगातले सर्वांत पहिले स्वर्गीय पुस्तक होते यात काहीच संशय नाही." परंतु हेच वाक्य नंतर त्याचा घात करण्यासाठी वापरण्यात आलं. म्हणजे त्याने तसे बोलून कुराणाला थेट आव्हानच दिलं आहे असा आरोप करण्यात आला.तो एकूण काळच हिंसेचा होता.अशा त्या हिंसक काळात एकीकडे बौद्धिक यशप्राप्तीच्या शिखराकडे जात असताना तो शस्त्रसामर्थ्यावर दावा सांगण्यात मात्र अपयशी ठरला.

खरंतर त्या गुंतागुंतीच्या जगात राजेपद टिकवण्यासाठी तेच खरं गरजेचं होतं.शाहजहान आजारी पडला, तेव्हा त्याच्या या मुलाने डावपेचाच्या गंभीर चुका केल्या.

बादशाही सैन्य आणि खजिन्याच्या चाव्या ताब्यात असल्यामुळे अजूनही त्याला जिंकण्याची शक्यता होती.

परंतु युद्धभूमीवर तर औरंगजेबच खरा 'लढवय्या' होता आणि दारा मारून मुटकून चिलखत घालायला लावलेला 'कवी' होता. युद्धात पराभव झाल्यावर तो आग्र्याहून पळून गेला.मग या प्रांतातून त्या प्रांतात भटकत राहिला.

बाप अश्रू गाळत असताना औरंगजेबाच्या माणसांनी पुन्हा एकदा त्याचा पराभव केला.खरंतर तेव्हा संधी होती तर त्यानं पर्शियाला पळून जायला हवं होतं.तसं केलं असतं तर अकबराच्या पित्यासारखा (बाबरासारखा) तो लढण्यासाठी नंतरच्या कुठल्यातरी दिवशी परतू शकला असता.परंतु त्याचा अंदाज चुकला.त्यानं एका माणसाला पूर्वी मदत केली होती.त्यानंच त्याला दगा दिला आणि 'दारा'वर त्याच्या मरणाचं वॉरंट बजावलं.उदाहरणार्थ,

त्याची पत्नी वारंवार सांगत होती की आपण अजून पुढे जाऊ या.परंतु याला खूपच लवकर वाटू लागलं की आता आपण संकटातून बाहेर पडलो आहोत.तसंच एका प्रादेशिक सरदाराने त्याचं स्वागत केलं तेही दाराने चटकन स्वीकारलं.खरंतर त्याचे सोबती त्या माणसाकडे संशयाने पाहत होते.शेवटी तो खोटा ठरला आणि सोबत्यांचे संशयच खरे ठरले.बेड्यांनी जखडलेल्या अवस्थेत दाराला दिल्लीला आणलं,तेव्हा खरोखरीची खंत वाटून लोकांनी आसवं गाळली.बर्नियर लिहितो, "समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यातून दुःखाच्या कर्कश किंकाळ्या ऐकू येत होत्या.स्त्री-पुरुष-लहान मुलं अशा प्रकारे आक्रोशत होती की,जणू त्यांच्यावरच कसलंतरी भयंकर संकट कोसळलं आहे. त्यानंतर या स्पर्धकाला नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने ऑगस्ट महिन्याच्या शेवटल्या दिवशी माणसं पाठवली.दाराचा सर्वांत धाकटा मुलगा त्याच्या सोबत मारला गेला आणि मोठा मुलगा पकडला गेला.पुढे त्याच्यावर हळूहळू विषप्रयोग करून त्यालाही ठार मारण्यात आलं. या सर्व क्रूर राजकीय घटनांतून सुटण्याचा धार्मिक मार्ग मोठ्या कौशल्याने तयार करण्यात आला.औरंगजेबाच्या बखरकाराने लिहून ठेवलं आहे की दाराला वेदांचं फार आकर्षण होतं.या 'पाखंडी' ग्रंथांतील लेखनावरच त्याचं लक्ष केंद्रित झालेलं होतं.त्याशिवाय तो धर्मभ्रष्टही होता त्यामुळे त्याने सत्ता ग्रहण केली असती तर मुस्लीम धर्माचा पायाच धोक्यात आला असता आणि इस्लामी उपदेशांच्या जागी काफर आणि ज्यू धर्माची बडबड ऐकावी लागली असती.अशा प्रकारे भावाची भावाने केलेली हत्या हा एकाच वेळेस राजाचा न्याय होता आणि देवाचा क्रोधही होता,असं त्या बखरीत लिहिलं आहे.(गणिका,महात्मा,आणि एक इटालियन ब्राह्मण मनछ एस.पिल्लई,अनुवाद-सविता दामले) 


आता असला काही विचार करणं व्यर्थ असलं तरी समजा,आपण असा विचार केला की,दारा जिंकला असता आणि औरंगजेब जिंकला नसता तर मोगल इतिहासाने कसं वळण घेतलं असतं? त्याच्या काळचा 'अकबर' बनून तो त्यांच्या साम्राज्याचं रक्षण करू शकला असता का? म्हणजे जिथं आवश्यक तिथे तलवार वापरून पण त्याच वेळेस राजनैतिक मुत्सद्देगिरीही न घाबरता त्यानं अवलंबिली असती का? अकबराने राजपूतांना आपल्या बाजूने वळवलं तसं त्याला मराठ्यांना वळवता आलं असतं का? की तो दीर्घ काळ कवी आणि संतांच्या संगतीतच राहिला असता आणि त्यामुळे राजकारणपटुत्व आणि सत्ता बाजूलाच राहिली असती? नक्की काय झालं असतं हे सांगणं तसं अवघडच आहे. पण एका इतिहासकाराने लिहून ठेवलं आहे,

की काहीही झालं असतं,तरी दारा शुकोहच्या नशिबी अपयशच लिहून ठेवलं होतं.त्याच्यात बरेच दोष होते पण काही चांगले गुणही होते;परंतु शोकांतिकेचा आणि निराशेचा नायक म्हणून त्याला स्थान देण्यात एक गोष्ट कारणीभूत ठरली.ती म्हणजे,तो त्याच्या काळाच्या मानाने खूपच सौम्य आणि सभ्य होता. 

२२/२/२४

निरोप घेता / Saying goodbye.. २



'मी एकेका झाडलेल्या बाराबरोबर त्यांचा जणू जमिनीवर सडाच पडला;पण तरीही वाचालेल्यांचं त्या ठिकाणाबद्दलचं प्रेम वाढून ते पुन्हा आले फिरून तिथेच आणि आपल्या मृत भाईबंदांकडे पाहत बसले आणि अशा एका वेगळ्या अनुकंपेने आणि जिव्हाळ्याने की, माझ्या हातातली गन गळून पडली...'


२० व्या शतकाच्या दुसऱ्या दशकापर्यंत,ते पक्षी इतक्या सातत्याने टिपले गेले की,अगदीच थोडे पिंजऱ्यात ठेवलेले तेवढे वाचले.१९१८ साली त्यांच्यातला सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयात असणारा 'इंका' नावाचा शेवटचा पॅराकीट मेला. (तिथेच त्याआधी चार वर्षं शेवटचं 'पॅसेंजर-कबुतर' मेलं होतं!) आणि मग त्याला पेंढा भरून काळजीपूर्वक अगत्यानं जपून ठेवण्यात आलं,

आता तुम्हाला तो 'इंका' बघायचा असेल, तर कुठे जावं लागेल माहितीये? कुणालाच ठाऊक नाही,कारण त्या प्राणिसंग्रहालयातून तो एकमेव नमुनाही गहाळ झालाय ! आणि वर लिहिलेल्या गोष्टीत काहीसं गूढ आणि चक्रावणार काय असेल तर हे की पीअल अतिशय मोठा पक्षिप्रेमी होता आणि तरीही त्याला शॉटगनने त्यांना मारताना काही वाटू नये? त्याने का ठार करावं इतक्या संख्येत त्या पक्ष्यांना काय कारणं सांगता येईल? केवळ त्याला ते तसं करणं आवडलं म्हणून? हे मात्र खरंच आश्चर्यच म्हणाव लागेल की,


या जगात प्राण्यांमध्ये,पक्ष्यांमध्ये ज्यांना खरोखरच इंटरेस्ट होता, अभ्यास करावासा वाटत होता अशीच माणसं त्या त्या पक्ष्यांचा, प्राण्यांचा नामशेष व्हायला कारणीभूत ठरली आहेत.. 


आणि या वर्णनात दुसऱ्या कोणाहीपेक्षा अचूक तंतोतंत फिट्ट बसतो तो लायनेल वॉल्टर रॉथचाईल्ड ! एका प्रतिष्ठित बँकिंग कुटुंबातला दुसरा बॅरन.त्या कुटुंबाचं शेंडेफळ !रॉथचाईल्ड काहीसं विक्षिप्त आणि एकांतप्रिय माणूस होता. बकिंगमशरमधल्या ट्रिंग इथल्या आपल्या घराच्या नर्सरी विंगमध्ये त्याने १८६८ ते १९३७ मधलं आपलं संपूर्ण आयुष्य काढलं त्या खोलीतलं फर्निचरसुद्धा त्याच्या बालपणी होतं, तेच कायम होत आणि तो झोपायचा तो बिछानासुद्धा लहानपणापासूनचाच होता (जरी पुढे त्याचं वजन १३५ किलो झालं होतं!) त्याला 'नॅचरल हिस्टरी' विषयात कमालीची रुची होती आणि वेगवेगळ्या वस्तू जमवायचा त्याला छंद जडला होता,तो एकाच वेळी माणसांच्या गटांना (चारशे माणसं एकावेळी) दुनियेच्या वेगवेगळ्या भागांत पाठवायचा कुणी डोंगरमाथ्यांवर,कुणी दाट जंगलात... कायम नवनवीन नमुने शोधण्यासाठी आणि विशेषतः असे नमुने जे उडू शकत असतील (अर्थात पक्षी) मग ती मंडळी पक्ष्यांना पकडून क्रेटमध्ये किंवा बॉक्समध्ये भरून ट्रिंग इथल्या रॉथचाईल्ड इस्टेटवर पाठवायची आणि मग ते तिथे पोहोचल्यावर रॉथचाईल्ड आणि त्याचे मदतनीस त्या सगळ्यांची नोंद करून ठेवायचे आणि विश्लेषण करायचे मग त्यावर त्यांनी पुस्तकं काढली, शोधनिबंध लिहिले जवळपास १२०० ! एकूण बघता,रॉथचाईल्डच्या त्या निसर्ग - इतिहासाच्या कारखान्यात २० लाखांहून अधिक नमुने तयार झाले होते आणि त्याने वैज्ञानिक भांडारामध्ये ५००० प्राण्यांच्या नमुन्यांची भर घातली होती; पण तरीही हे उल्लेखनीयच म्हणावं लागेल की, १९ व्या शतकातले रॉथचाईल्डचे ते सगळे परिश्रम हे इतिहासात सर्वोच्च असे किंवा खूप सढळपणे पैसे खर्च करून केलेले नव्हते,तो मान त्या वेळेच्या आधीच्या एका श्रीमंत ब्रिटिश संग्राहकाचा! ह्यू कमिंगचा! त्याला तर असे पक्ष्याप्राण्यांचे नमुने जमवण्याच्या वेडानं इतकं पछाडलं की,त्याने एक भलं मोठं जहाजच बांधलं आणि मग त्यासाठी काही खलाशी, कॅप्टन वगैरे माणसांची भरती केली.त्यांचं काम एकच जगभर जहाजातून फिरत राहायचं आणि जमेल तिथून,जमेल तेवढ्या प्राण्यांचे नमुने गोळा करून आणायचे! प्राणी,पक्षी,वनस्पती सगळ्यांच्या मिळतील,

तेवढ्या जाती-जमाती आणि हो शंख-शिंपलेसुद्धा.त्यानेच मग त्याच्या संग्रहातल्या बार्नेकलचे नमुने डार्विनला दिले होते आणि मग त्याचा फायदा पुढे डार्विनला त्याच्या अंतिम अभ्यासासाठीसुद्धा झाला होता.


पण तरीही रॉथचाईल्ड हा त्याच्या वयाचा विचार करता अतिशय शास्त्रशुद्ध अभ्यास करणारा म्हणून ओळखला जातो,पण दुर्दैवाने तो निर्दयीसुद्धा होता! १८९० साली त्याला हवाई बेटाचे वेध लागले होते एक अशी जागा जी पृथ्वीवरची टोकाची आकर्षक जागा असली तरी तितकीच असुरक्षितही मानली जाते.लक्षावधी वर्षं पृथ्वीच्या इतर भू-भागापासून दूर असल्यानं तिथे जवळपास ८८०० प्रकारच्या अत्यंत दुर्मीळ अनोख्या प्राण्यांची आणि वनस्पतींची वसाहत होती.अर्थात रॉथचाईल्डच्या दृष्टीनं त्याला लुभावणारी विशिष्ट गोष्ट म्हणजे तिथे असणारे अत्यंत चित्ताकर्षक पक्षी! काही जातीचे पक्षी संख्येनं कमी असले तरी ठरावीकच विशिष्ट जागांमध्येच आढळणारे होते.हवाईवरच्या पक्ष्यांच्या बाबतीत दुर्दैवाची गोष्ट ही होती की, ते वैविध्यपूर्ण,आकर्षक वगैरे अद्भुत संयोग असलेले जरी असले तरी अगदीच,अत्यंत सहज पकडता येतील असेच होते.उदाहरणार्थ - हनीकीपर जातीमधला 'द ग्रेटर कोआ फिंच' हा एक निरुपद्रवी पक्षी - हा कोआ झाडांवर विहरत असतो काहीसा लाजतबुजत;पण कुणी जर त्याच्या गाण्याची नक्कल केली तर तो झाडाच्या पानांचा सुरक्षित आसरा सोडून तुमच्यासमोर जणू स्वागताला आल्यासारखा येऊन बसतो, १८९६ साली त्या पक्ष्यांपैकी शेवटचा पक्षी मारला गेला तो रॉथचाईल्डच्या तरबेज हॅरी पामर या संग्राहकाकडून! (त्याच्या पाच वर्षंआधी त्याच पक्ष्याच्या दुसऱ्या जातीतला लेसर कोआ फिंच हा नामशेष झाला होता.तो इतका प्रचंड दुर्मीळ होता की,आज केवळ एक पक्षी पाहायला मिळतो,तोही रॉथचाईल्डच्या संग्रहासाठी ठार मारला गेलेला! गोळाबेरीज काय,तर रॉथचाईल्डच्या संग्रहाचा पसारा वाढवण्याच्या त्या दशकभराच्या काळात हवाईअन बेटांवरच्या किमान नऊ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष झाल्या.कदाचित,जास्तही असू शकतात.

कुठल्याही थराला जाऊन,कितीही पैसे मोजून पक्षी मिळवण्याच्या वेडाच्या बाबतीत रॉथचाईल्ड काही एकटाच नव्हता. 


किंबहुना,दुसरे काही जण त्याच्यापेक्षाही निर्दयी होते. १९०७ साली,ॲलनसन ब्रायन नावाच्या एका प्रसिद्ध संग्राहकाला जेव्हा समजलं की, त्याने 'ब्लॅक मॅमोज' पक्ष्याचे जगातले शेवटचे 'उरलेले तीनच्या तीन' जंगली पक्षी मारलेत (की जे त्याआधीच्याच दशकात पहिल्यांदा सापडले होते),तेव्हा त्याला ती 'बातमी' ऐकून चक्क 'आनंद झाला होता!' खरं तर,तो काळच थांग लागायला कठीण असा होता.त्याकाळात कुठलाही प्राणी जर व्यत्यय आणणारा वाटला, तर त्याचा खुशाल छळ होत असे! १८९० साली, न्यू यॉर्क राज्यानं पूर्वेकडच्या डोंगरी सिंहांना ठार करण्यासाठी शंभरावर इनाम जाहीर केलं होतं, जरी हे माहीत होतं की,ते आधीच त्रस्त झालेले प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून! जवळपास १९४० सालापर्यंत अमेरिकेतलं कुठलंही राज्य आपल्या राज्यातल्या प्राण्यांना ठार करण्यासाठी इनाम जाहीर करत असत! पश्चिम व्हर्जिनिया राज्याने एक वार्षिक कॉलेज शिष्यवृत्तीच जाहीर केली होती,जो कोणी जास्तीत जास्त पेस्ट्स (कीटक) मारून आणेल त्यांच्यासाठी! आणि त्या पेस्ट शब्दाचा अर्थ हा शेतावर ज्याची पैदास केली जात नाही किंवा घरी पाळले जात नाहीत असे कोणतेही प्राणी ! आणि त्या विचित्र काळाविषयी बोलताना छोट्या बाकमन्स वार्लरपेक्षा आणखी बोलकं आणि स्पष्ट उदाहरण दुसरं कुठलं असू शकेल? अमेरिकेच्या दक्षिणेकडे आढळणारा हा देखणा छोटा पक्षी! त्याची लकेर खूप छान असायची; पण त्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली होती आणि १९३० पर्यंत ते दिसेनासेच झाले आणि पुढची अनेक वर्षं त्यांचं कुणालाच दर्शनही झालं नाही. त्यानंतर १९३९ साली एका छान योगायोगानं दोन पक्षी निरीक्षकांना वेगवेगळ्या ठिकाणी केवळ दोन दिवसांच्या अंतरानं ते एकाकी पक्षी दिसले आणि त्या दोघांनी त्या दोन्ही पक्ष्यांना गोळ्या झाडून टिपलं! पण असं गोळी घालून संपवणं ही लहर किंवा हुक्की काही फक्त अमेरिकन लोकांमध्येच नव्हती येत ! ऑस्ट्रेलियात 'टास्मेनियन टायगर' (थायलेसिन) या कुत्र्यासदृश पण वाघासारखे पट्टे असणाऱ्या प्राण्याला मारण्यासाठी इनाम जाहीर करण्यात आलं होतं.त्यांच्यातला शेवटचा टास्मेनियन टायगरला,त्या उपेक्षित,एकाकी जीवाला मृत्यू आला तो १९३६ साली होबार्टच्या प्राणिसंग्रहालयात तुम्ही कधी तिथे गेलात,तर 'टास्मेनियन म्युझियम अँड आर्ट गॅलरी'ला विचारा आम्हाला तो 'टास्मेनियन टायगर' पाहायचाच आहे म्हणून जो आजच्या आधुनिक जगात प्रवेश केलेला शेवटचा मांसभक्षक मारुस्पियल (पोटात पिशवी असणारा) होता,तर तुम्हाला बघायला मिळेल ते जेमतेम मिनिटभराचं एक फिल्मचं फूटेज आणि काही फोटोज ! जेव्हा त्या प्राणिसंग्रहालयातला तो शेवटचा थायलेसिन (टास्मेनियन टायगर) मेला,तेव्हा त्याचा मृतदेह इतर कचऱ्याबरोबर बाहेर कचरापेटीत फेकण्यात आलं होतं - मी हे सगळं सांगतोय याचं कारण तुमच्यापर्यंत एक मुद्दा ठामपणे पोहोचवण्यासाठी की,यदाकदाचित 


तुम्ही एखादा सूक्ष्मजीव आपल्या या एकाकी विश्वात जगण्यासाठीआयुष्यघालवण्यासाठी डिझाईन करत असाल किंवा तो कुठे कुठे होता वगैरे याचं रेकॉर्ड ठेवणार असाल तर त्या कामासाठी कृपया 'माणसाला' नेमू नका! हा अत्यंत महत्त्वाचा ठळक मुद्दा आहे! आपल्याला निवडण्यात आलंय.आपली निवड झालीये ती दैववशात किंवा भविष्याची काही गणितं डोक्यात असल्याने किंवा जे काही म्हणता येईल त्यासाठी! त्या प्रकाराने आपण सध्यातरी सर्वोत्तम आहोत! पण आपणच तेवढे असू कदाचित.हे कदाचित भीतिदायक सत्य असेल की,

त्या सर्वशक्तिमान निसर्गाची आपण सर्वांत शक्तिमान आणि उच्च निर्मिती असू आणि एकाच वेळी त्यानं पाहिलेलं महाभयंकर स्वप्नही असू!


कारण,आपण आजूबाजूच्या अनमोल गोष्टींकडे अत्यंत निष्काळजीपणे बघणारे आहोत.गोष्टी अस्तित्वात असताना आणि नसतानाही आपण अत्यंत निष्काळजी,

बेदरकार असणारे आहोत आपल्याला त्याची जाणीवही नाहीये - अजिबातच ! किती किती प्रकारच्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्यात किंवा नाहीशा होऊ घातल्याहेत किंवा कधी नाहीशा नाहीही होणार आणि आपली त्या सर्वांमध्ये काय भूमिका राहील? १९७९ साली प्रसिद्ध झालेल्या 'द सिंकिंग आर्क' या आपल्या पुस्तकात नॉर्मन मेयर्सने असं सूचित केलंय की, पृथ्वीवर माणसाच्या कारनाम्यांमुळे दर आठवड्याला दोन प्रजाती नामशेष होत जाताहेत ! पुढे १९९० सालापर्यंत त्याने तोच आकडा वाढवून आठवड्याला ६०० इतका नेला ! (यामध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी, जलचर सगळ्या प्रकारचं नामशेष होणं अंतर्भूत!) पण इतर काही जणांनी तर ती संख्या त्याहीपेक्षा जास्त मानलीये; आठवड्याला हजार इतकी ! १९९५ सालच्या युनोच्या एका अहवालाद्वारे असं सांगितलं गेलं की,गेल्या चारशे वर्षांत नामशेष झालेल्या ज्ञात प्रजातींची संख्या ५०० प्राणी आणि ६५० वनस्पती इतकी भरतीये;पण ते कदाचित कमी धरलेली संख्या असू शकते असंही म्हटलं गेलं. विशेषतः समशीतोष्ण कटिबंधातल्या प्रजातींविषयी! तर काहींच्या मते नामशेष झालेल्या प्राणी, वनस्पतींची संख्या ही फुगवलेली आकडेवारी आहे म्हणून! सत्य कदाचित आपल्याला ठाऊकच नाही! आपल्याला कसलीच कल्पना नाही! आपल्याला आपण करत असलेल्या कित्येक गोष्टी कधीपासून सुरू केल्या हेही सांगता येत नाही. आपण या क्षणी काय करतोय तेही आपल्याला सांगता येणार नाही किंवा आपण आत्ता जे करतोय त्याचा परिणाम भविष्यावर कसा होणार आहे,ते आपल्याला आज सांगता येत नाही; पण आपल्याला एक गोष्ट नक्कीच माहितीये की, आपण जे काही करू शकतोय ते फक्त या एकाच ग्रहावर ! आणि आपण (मानव) हा एकच प्राणी असा आहे की, जो काही बदल घडवू शकेल, या ग्रहावर! डायव्हर्सिटी ऑफ लाइफमधून एडवर्ड ओ.विल्सनने अगदी कमीत कमी शब्दांत हे छान सांगितलंय - 'एक ग्रह, एक प्रयोग'.


जर या पुस्तकात काही धडा असेल घेण्यासारखा,तर तो हाच की आपण प्रचंड सुदैवी आहोत की आज आपण इथे आहोत! आणि 'आपण' म्हणजे प्रत्येकच सजीव! या विश्वात कुठल्याही प्रकारचं जीवन 'जगायला मिळणं' म्हणजेच खूप 'मोठी कामगिरी' म्हणता येईल! आणि मानव या नात्याने तर आपण डब्बल सुदैवी आहोत,

नक्कीच !आपण 'आहोत',आपलं अस्तित्व आहे,याचा आनंद तर आपण उपभोगू शकतोच; पण त्याचबरोबर त्याबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करू शकतो आणि अनेक प्रकारे आहे ते मिळालेलं जीवन आणखी सुखी,आणखी समाधानी जगण्याचं कामही करू शकतोय! आणि ते करू शकणारी क्लृप्ती अलीकडेच तर कळलीये आपल्याला !


आपण या अतिशय समृद्धतेच्या आणि लौकिकाच्या टप्प्यावर फार झपाट्याने पोहोचलोय.पृथ्वीच्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर,आधुनिक मानव म्हणून वावर सुरू झालाय.आपण त्या इतिहासाचा केवळ ०.०१ टक्के भाग व्यापलाय म्हणजे खरं तर काहीच नाही - पण त्या अत्यंत छोट्या,कणांएवढ्या काळाच्या भागात अस्तित्व असण्यासाठीसुद्धा आपल्याला अनेक योगांची,अनेक दुर्लभ भाग्याची अथक, अखंड साथ मिळालेली आहे.


आपण खरं तर या सर्वांच्या आरंभाच्या ठिकाणीच आहोत जणू! आणि त्यात योजना हीच आहे की,

आता आपल्याला त्याचा शेवट सापडूच नये! आणि त्यासाठी मात्र आपल्याला केवळ सुदैवी क्षणांपेक्षा खूपच जास्त गोष्टींची आवश्यकता असणार आहे!!


२०.०२.२४ या लेखातील शेवटचा भाग..