* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: दारा शुकोह - योद्धयांमधील कवी/Dara Shukoh - A poet among warriors

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२४/२/२४

दारा शुकोह - योद्धयांमधील कवी/Dara Shukoh - A poet among warriors

ऑगस्ट,१६५९ महिना संपायला आला आणि आग्र्याच्या शाही दरबारातील सर्वांना माहीत झालं,की दारा शुकोहचा लवकरच शिरच्छेद करण्यात येणार आहे.दारा शुकोह हा सूफी संतांचा,कवींचा लाडका असा बादशाह शाहजहानचा सर्वांत ज्येष्ठ,लाडका पुत्र वारसाहक्काची लढाई हरला होता.अत्यंत कपटी औरंगजेबाने त्याला मात दिली होती.त्याच्या स्वतःच्याच सैनिकांनी त्याचा विश्वासघात केला,जुन्या सरदारांनी त्याला आयत्या वेळेस सोडून दिलं,त्याची पत्नीही मरण पावली (बहुधा तिनं आत्महत्या केली, असा कयास आहे.) आणि ज्याला तो स्वामिभक्त समजत होता,अशा माणसाने त्याला आयत्या वेळेस दगा दिला अशा त्या दारा शुकोहला आपल्यावर काय भोग ओढवलेले आहेत,याची जाणीव होती.आपल्या

बंदिवासातून त्यानं भावाला पत्रही लिहिलं होतं की,मी उर्वरित जीवन नव्या बादशाहच्या भल्यासाठी प्रार्थना करण्यात व्यतीत करीन. परंतु त्याच्या विनवणीला नकार मिळाला. नाहीतरी विजयी औरंगजेबच्या मनात कित्येक दशकांपासून दाराबद्दल तिरस्कार साठून राहिला होता.

त्यामुळे नंतर खोटाच खटला दाखल करण्याचं नाटक रचून त्यानं आपल्या ज्येष्ठ बंधूवर हर त-हेचे आरोप लावले.त्यात राजाच्या निकालात चुकीची ढवळाढवळ करण्यापासून ते मुस्लीम धर्माशिवाय अन्य धर्मावर विश्वास ठेवण्याचा प्रवाद असे सर्व त-हेचे आरोप होते.हे सर्व आरोप खरे आहेत असे सिद्ध करून धाकटा बंधू औरंगजेब याने आपण स्वतः फारच मोठे नैतिक आहोत असा आव आणून दाराला मृत्युदंड फर्मावला.तोपर्यंतचं दाराचं जीवन वैभवात आणि सुखसुविधांमध्ये गेलं होतं. 


वडिलांच्या दरबारात तो सुवर्णासनावर बसत होता.त्या सुखी दिवसांत त्याला 'नशीबवान शाहजादा' असंच म्हटलं जात होतं.ते आसन आणि ते नशीब- दोन्ही त्याच्याकडून अचानक हिसकावलं जाण्यापूर्वी त्याला दरवर्षी चांदीचे दोन कोटी रुपये उत्पन्न दिलं जात होतं.तो पित्याचा सर्वांत जवळचा सल्लागार होता त्यामुळेच अन्य भावांच्या मनात त्याच्याबद्दल खूप मत्सर निर्माण झाला होता. दाराचं व्यक्तिमत्त्व लोभस होतं.त्यानं सर्वसंग परित्यागाविषयी भावुक काव्य लिहिलेलं असलं, तरी प्रत्यक्षात तोही थोडाबहुत स्वार्थी होताच.


औरंगजेबाने दख्खनच्या शिया सल्तनतींना खिंडीत गाठलं की तिथले सुलतान दारालाच आपली निवेदनं पाठवायचे.

कारण त्यांना माहीत होतं की,हा ज्येष्ठ शाहजादाच बादशाहच्या विश्वासातला आहे.महत्त्वाकांक्षी औरंगजेबाची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे हे दाराला बघवत नव्हतंच.त्यामुळे तो आपल्या वडिलांचं मन वळवायचा आणि भावाच्या योजनांना सुरुंग लावायचा.

त्यामुळे खरोखरच,दारा त्या वारसाहक्काच्या लढाईत जिंकला असता,तर त्यानंही आपल्या स्पर्धकांवर औरंगजेबाहून जास्त दया दाखवली असती अशी अपेक्षा करण्याचं काही कारण नाही.त्याच्या स्वभावात काही अंगभूत वैगुण्यं होती. फ्रैंकॉईस बर्नियर हा दाराचा खाजगी डॉक्टर होता.त्यानं लिहिलंय की,आपण खूपच श्रेष्ठ आहोत असं त्याला वाटायचं.आपण आपल्या मनशक्तीने काहीही साध्य करू शकतो असा त्याचा समज होता.त्याला सल्ला द्यायचं धाडस करणाऱ्यांकडे तो तुच्छतेने बघायचा त्यामुळे 'त्याचे बंधू त्याच्या विरुद्ध गुप्त कारस्थानं रचत आहेत' हे त्याच्या कानी घालायला खरे मित्रही कचरत होते.स्वतःच्याच पायांवर कुऱ्हाड मारणाऱ्या या फाजील आत्मविश्वासाच्या जोडीला त्याच्याकडे उच्च बुद्धिमत्ता होती.पण त्यामुळे संकुचित मनोवृत्तीच्या गर्विष्ठ लोकांना तो अजिबात आवडत नसे. "जिथं एकही मुल्ला नसतो तिथं स्वर्ग असतो," असं तो म्हणायचा. साहजिकच दाराबद्दल सहानुभूती असणारे मुल्लाही त्याच्यापासून दूर जायचे.त्यातच भर म्हणून त्याचे वडील त्याच्यावर आपलं सगळं प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव करायचे.त्यामुळेही दाराने बरेच शत्रू गोळा केले. औरंगजेबासारख्याच्या मनात तर त्याच्याबद्दल तीव्र तिरस्कारच निर्माण झाला.दारानं काढलेली एक मोठी लष्करी मोहीम अपयशी ठरली.

कारण सैन्यातील सर्वसामान्य सैनिकांशी त्याचे भावबंधच जुळलेले नव्हते.त्याउलट औरंगजेबाचे आणि अन्य भावांचे तसे बंध त्यांच्या सैन्याशी असल्यानेच त्यांना लढायांत यश मिळत होतं. त्याचे भाऊ तलवार गाजवत असताना इकडे दारा मात्र सूफी संत गोळा करत बसला होता. परंतु तसं पाहता या मोगल शाहजाद्याचे दोष कुठल्याही मानवात असू शकत होते.त्याचं मन त्याच्या समकालीनांच्या मनापेक्षाही अधिक वेगाने धावत होतं.

वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यानं पहिलं पुस्तक लिहिलं आणि शिरच्छेद होण्याच्या दोन वर्षं अगोदर तो काव्याच्या अत्यंत नितांतसुंदर ओळी लिहीत होता.औरंगजेबाने नेमलेल्या एका कवीने तक्रार केली आहे की,दारा सदैव ब्राह्मण,योगी आणि संन्यांशांच्या संगतीत असतो.हे सगळे भ्रामक गोष्टी शिकवणारे बिनकामाचे गुरू फारच विद्वान आणि शाहणपणाचे खरे धारक आहेत असं त्याला वाटतं.त्यानं 'माजमा अल बहरेन' (दोन महासागरांचा संगम) हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्याला पणजोबा अकबराप्रमाणेच दोन धर्मांचं मीलन घडवून आणून समाजासाठी नवीन दृष्टी निर्माण करण्याची इच्छा होती.दारानेच उपनिषदांचा अनुवाद संस्कृतातून फारसीत केला.या अनुवादामुळेच तर आणखी एका शतकानंतर फ्रान्समध्ये व्होल्टेअरला भारतीय ज्ञानानंदात डुंबता आलं.शाहजहानच्या या कमनशिबी मुलाने उपनिषदांबद्दल लिहिलं,"हे जगातले सर्वांत पहिले स्वर्गीय पुस्तक होते यात काहीच संशय नाही." परंतु हेच वाक्य नंतर त्याचा घात करण्यासाठी वापरण्यात आलं. म्हणजे त्याने तसे बोलून कुराणाला थेट आव्हानच दिलं आहे असा आरोप करण्यात आला.तो एकूण काळच हिंसेचा होता.अशा त्या हिंसक काळात एकीकडे बौद्धिक यशप्राप्तीच्या शिखराकडे जात असताना तो शस्त्रसामर्थ्यावर दावा सांगण्यात मात्र अपयशी ठरला.

खरंतर त्या गुंतागुंतीच्या जगात राजेपद टिकवण्यासाठी तेच खरं गरजेचं होतं.शाहजहान आजारी पडला, तेव्हा त्याच्या या मुलाने डावपेचाच्या गंभीर चुका केल्या.

बादशाही सैन्य आणि खजिन्याच्या चाव्या ताब्यात असल्यामुळे अजूनही त्याला जिंकण्याची शक्यता होती.

परंतु युद्धभूमीवर तर औरंगजेबच खरा 'लढवय्या' होता आणि दारा मारून मुटकून चिलखत घालायला लावलेला 'कवी' होता. युद्धात पराभव झाल्यावर तो आग्र्याहून पळून गेला.मग या प्रांतातून त्या प्रांतात भटकत राहिला.

बाप अश्रू गाळत असताना औरंगजेबाच्या माणसांनी पुन्हा एकदा त्याचा पराभव केला.खरंतर तेव्हा संधी होती तर त्यानं पर्शियाला पळून जायला हवं होतं.तसं केलं असतं तर अकबराच्या पित्यासारखा (बाबरासारखा) तो लढण्यासाठी नंतरच्या कुठल्यातरी दिवशी परतू शकला असता.परंतु त्याचा अंदाज चुकला.त्यानं एका माणसाला पूर्वी मदत केली होती.त्यानंच त्याला दगा दिला आणि 'दारा'वर त्याच्या मरणाचं वॉरंट बजावलं.उदाहरणार्थ,

त्याची पत्नी वारंवार सांगत होती की आपण अजून पुढे जाऊ या.परंतु याला खूपच लवकर वाटू लागलं की आता आपण संकटातून बाहेर पडलो आहोत.तसंच एका प्रादेशिक सरदाराने त्याचं स्वागत केलं तेही दाराने चटकन स्वीकारलं.खरंतर त्याचे सोबती त्या माणसाकडे संशयाने पाहत होते.शेवटी तो खोटा ठरला आणि सोबत्यांचे संशयच खरे ठरले.बेड्यांनी जखडलेल्या अवस्थेत दाराला दिल्लीला आणलं,तेव्हा खरोखरीची खंत वाटून लोकांनी आसवं गाळली.बर्नियर लिहितो, "समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यातून दुःखाच्या कर्कश किंकाळ्या ऐकू येत होत्या.स्त्री-पुरुष-लहान मुलं अशा प्रकारे आक्रोशत होती की,जणू त्यांच्यावरच कसलंतरी भयंकर संकट कोसळलं आहे. त्यानंतर या स्पर्धकाला नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने ऑगस्ट महिन्याच्या शेवटल्या दिवशी माणसं पाठवली.दाराचा सर्वांत धाकटा मुलगा त्याच्या सोबत मारला गेला आणि मोठा मुलगा पकडला गेला.पुढे त्याच्यावर हळूहळू विषप्रयोग करून त्यालाही ठार मारण्यात आलं. या सर्व क्रूर राजकीय घटनांतून सुटण्याचा धार्मिक मार्ग मोठ्या कौशल्याने तयार करण्यात आला.औरंगजेबाच्या बखरकाराने लिहून ठेवलं आहे की दाराला वेदांचं फार आकर्षण होतं.या 'पाखंडी' ग्रंथांतील लेखनावरच त्याचं लक्ष केंद्रित झालेलं होतं.त्याशिवाय तो धर्मभ्रष्टही होता त्यामुळे त्याने सत्ता ग्रहण केली असती तर मुस्लीम धर्माचा पायाच धोक्यात आला असता आणि इस्लामी उपदेशांच्या जागी काफर आणि ज्यू धर्माची बडबड ऐकावी लागली असती.अशा प्रकारे भावाची भावाने केलेली हत्या हा एकाच वेळेस राजाचा न्याय होता आणि देवाचा क्रोधही होता,असं त्या बखरीत लिहिलं आहे.(गणिका,महात्मा,आणि एक इटालियन ब्राह्मण मनछ एस.पिल्लई,अनुवाद-सविता दामले) 


आता असला काही विचार करणं व्यर्थ असलं तरी समजा,आपण असा विचार केला की,दारा जिंकला असता आणि औरंगजेब जिंकला नसता तर मोगल इतिहासाने कसं वळण घेतलं असतं? त्याच्या काळचा 'अकबर' बनून तो त्यांच्या साम्राज्याचं रक्षण करू शकला असता का? म्हणजे जिथं आवश्यक तिथे तलवार वापरून पण त्याच वेळेस राजनैतिक मुत्सद्देगिरीही न घाबरता त्यानं अवलंबिली असती का? अकबराने राजपूतांना आपल्या बाजूने वळवलं तसं त्याला मराठ्यांना वळवता आलं असतं का? की तो दीर्घ काळ कवी आणि संतांच्या संगतीतच राहिला असता आणि त्यामुळे राजकारणपटुत्व आणि सत्ता बाजूलाच राहिली असती? नक्की काय झालं असतं हे सांगणं तसं अवघडच आहे. पण एका इतिहासकाराने लिहून ठेवलं आहे,

की काहीही झालं असतं,तरी दारा शुकोहच्या नशिबी अपयशच लिहून ठेवलं होतं.त्याच्यात बरेच दोष होते पण काही चांगले गुणही होते;परंतु शोकांतिकेचा आणि निराशेचा नायक म्हणून त्याला स्थान देण्यात एक गोष्ट कारणीभूत ठरली.ती म्हणजे,तो त्याच्या काळाच्या मानाने खूपच सौम्य आणि सभ्य होता.