* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: बिश्नोईंची शांतिगाथा..Bishnoinchi Shantigatha..|

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१/३/२४

बिश्नोईंची शांतिगाथा..Bishnoinchi Shantigatha..|

आधुनिक भारतात असेच ओकचे लोकांना हवेहवेसे जंगल,वनविभाग आणि व्यापारी कंपन्यांपासून वाचवायला गढवालात चिपको सत्याग्रह केला गेला.

त्यात कोणी मृत्युमुखी पडले नाही,पण त्याच्या आधी अडीचशे वर्षे दुसऱ्या एका चिपकोत ३६८ निसर्ग

भक्तांनी प्राणार्पण केले होते.ही घटना घडली होती वैराण मारवाडात.ह्या रेती - कंकराच्या मुलूखात आज पाहायला मिळते खुरटे गवत,काटेरी झुडपे आणि तुरळक कोठे बाभळी-बोरींची झाडे असलेली माळरानेच्या माळराने.दिवसाच्या रणरणीत उन्हात एक सबंध माणूस मावेल एवढीही सावली सापडणे मुश्कील,तर सबंध उंट आरामात पाय पसरू शकेल अशा सावलीची कल्पनाही करता येत नाही.पण या मारवाडात अशीही काही गांवे आहेत की ज्यांच्या आसपास खेजडीचे अनेक वृक्ष फोफावलेले आहेत.

ही बाभळीसारखी खेजडी म्हणजे वाळवंटातला कल्पवृक्ष आहे.याच्या सावलीत एकेक सबंध उंट झोप काढू शकतो.यांच्या पाल्यावर गायी,शेळ्या -

मेंढ्या,उंट पोसले जातात,आणि याच्या शेंगांची भाजी मोठी रुचकर असते.शिवाय खेजडीच्या काट्यांनी शेतांची कुंपणेच्या कुंपणे बनवली जातात.


कोणे एके काळी मारवाडच्या वाळवंटाने आजच्यासारखे पाय पसरले नव्हते.जरी पाऊस अगदी कमी होता तरी इथल्या माळरानांवर खेजडीची झाडे अमाप होती.आणि शिवाय होत्या चिक्कार बोरी,केर,सांगरी,या रानांत काळवीट,चिंकारे,नीलगायी विपुल होत्या आणि त्यांची शिकार करून राहायचे भिल्ल लोक, हजारो वर्षे त्यांचा हा जीवनक्रम चालला होता. बोरी-केरांना रुचकर फळे यायची,खेजडीला भरपूर शेंगा लगडायच्या,शिकार रगड होती. खावे-प्यावे आडदांडपणे राहावे असा सिलसिला हजारो वर्षे चालला होता.पण मग सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी मध्य आशियातून माणसांचे लोंढेच्या लोंढे यायला लागले. हे होते मुख्यतः गुराखी,यांतील अनेक जाट आणि राजपूत हळूहळू मारवाडात पसरले.भिल्लांशी भांडत-तंडत हातपाय पसरू लागले.तसा मुलूखही भरपूर होता.

फारसा काळजीचा प्रश्न नव्हता.मारवाडची आबादी वाढत चालली.पण शतकामागून शतके जशी गेली तसा या प्रचंड गुरांच्या कळपांचा प्रभाव मारवाडातल्या झाडा-झुडपांवर जाणवू लागला. हळूहळू त्यांची पैदास कमी झाली.

त्याबरोबरच जाट-राजपुतांच्या कुन्हाडींनी जुनी झाडे तुटत राहिली.दिवसेंदिवस मारवाडचे जंगल ओसाड होऊ लागले आणि आदिवासी-भिल्लांची सद्दी संपुष्टात येऊ लागली.शेवटी तेराव्या शतकात कनोजच्या राठोडांनी भिल्लांचा पराभव करून मारवाडात आपले राज्य स्थापन केले. त्यांच्याबरोबर आलेले राजपूत सर्वत्र पसरले.


इसवीच्या पंधराव्या शतकापर्यंत राठोडांचे राज्य मारवाडात पक्के पाय रोवून होते.त्यांच्यातल्या एका पराक्रमी राजाच्या राव जोधाजीच्या कारकिर्दीत एक असाधारण पुरुषाचा जन्म झाला.त्याचे नाव होते जम्बाजी.पिपासर गावात क्षत्रिय परमार कुलात ठाकूर लोहटाच्या घरी, हंसादेवीच्या पोटी इसवी सन १४५१ मध्ये जंबाजींचा जन्म झाला. ठाकूरजी होते ग्रामपती, व्यवसायाने शेतकरी आणि पशुपालक,शेतीवर भर

कमीच,कारण घरात ४०-५० गायी होत्या. वयाच्या सातव्या वर्षापासून जम्बाजी गुरांमागे होता.रानात जावे,

गुरे वळावी,आरामात झोपावे, आणि आजूबाजूला फिरणाऱ्या काळविटांच्या झुंडीच्या झुंडींची मौज पहावी- मस्तीला आलेले काळे नर कसे झुंजतात हे पाहण्याची तर फारच मजा! वर्षांमागून वर्षे गेली.जम्बाजी पंचवीस वर्षांचा झाला आणि सबंध मुलखावर संकट आले.थोडा का होईना,पण नियमित पडणारा पाऊस येईनासा झाला.

पहिल्या वर्षी घरात साठलेला थोडा कडबा होता,गुरे निभावून गेली. दुसऱ्या वर्षी तसेच अवर्षण,गुरांना चरायचे भयंकर हाल.गवताचे पान नाही.जी काय थोडी झाडे होती,ती ओरबाडून - ओरबाडून पाला खायला घातला.

पण उपाशीपोटी गुरांची दशा बघवेना,असा दुष्काळ एक नाही दोन नाही, तब्बल आठ वर्षे चालला.सर्वत्र हाहाकार झाला. ओरबाडून-ओरबाडून उरलेली सुरलेली झाडे सतत निष्पर्ण राहिली गेली.एकामागून एक ती सुकून गेली.

साठवलेला दाणा संपला.लोकांनी खेजडीच्या शेंगांवर,

बोरांच्या बियांच्या पिठावर गुजारा चालवला.पण तेही मिळेनासे झाले तशी सांगरीच्या झाडांची साल सोलून कुटून खायला लागले.मग उरलीसुरली सांगरीची झाडेही मेली.भुकेल्या लोकांनी भुकेल्या काळविटांचा फडशा पाडला आणि मग शेवटी काही निभेना तशी ते मुलूख सोडून निघून गेले.


नऊ वर्षांत सत्यानाश झाला.एक झाड - एक गुरू-एकही काळवीट दिसेनासे झाले.केवळ ठाकुरांसारखे तोलदार लोक,घरात बाजरीच्या कणगीच्या कणगी भरलेल्या होत्या म्हणून कसेबसे टिकून राहिले.जंबाजीच्या आजोबांच्या लहानपणीही असाच दुष्काळ पडला होता.पण ते म्हणायचे की,असे हाल झाले नाहीत.तेव्हा गवत सुकून गेले तरी खेजडी अमाप होती.तिच्या पाल्यावर तब्बल सहा वर्षे गुरे जगून राहिली.तिच्या शेंगांवर माणसांनी जीव धरला. पण असा कल्पवृक्ष दोन पिढ्यांत नाहीसा होत गेला होता आणि जंबाजीच्या डोळ्यांदेखत तर त्याचे बेणेच संपुष्टात आले होते.


जंबाजीच्या संवेदनशील मनावर या दुष्काळाचा अतोनात परिणाम झाला.रात्र-न् रात्र तो आजूबाजूच्या लोकांचे - गुरांचे हाल बघत तळमळत राहिला आणि शेवटी वयाच्या चौतिसाव्या वर्षी त्याला दृष्टांत झाला.निसर्गाशी भांडून,त्याच्यावर अत्याचार करून माणूस मस्तीत राहात होता.निष्पाप काळविटांची हत्या करून, दारू पिऊन,अफूच्या धुंदीत सारे जग बरबाद करीत होता.


 जंबाजीने हे सगळे बदलायचे ठरवले.हे अवर्षण हटल्यावर जर मारवाडात पुन्हा आयुष्य उभे करायचे असेल,तर माणसाला बदलायला हवे होते.या पृथ्वीवर पुन्हा खेजडी-बोर-केर-सांगरीचे आच्छादन करायला हवे होते. पुन्हा काळवीट वाचवायला हवे होते.इसवी सन १४८५ मध्ये जंबाजीने आपला संदेश जगाला दिला.


त्याच्या संदेशात २९ मूलभूत नियम होते.आणि त्यातले दोन मुख्य होते : हिरवे झाड केव्हाही तोडू नये आणि प्राणिहत्या केव्हाही करू नये.जंबाजीचा भूतदयेचा आणि मानवतेचा संदेश कोणावर काहीही जबरदस्ती न करता फैलावत चालला. 


जाट, राजपूत, ब्राह्मण त्यांच्या पंथात मोठ्या प्रमाणात सामील झाले.आयुष्याची पुढची ५१ वर्षे जम्भेश्वरांनी मननात,चिंतनात आणि आपल्या संदेशाचा प्रसार करण्यात घालवली. दिल्लीच्या सिकंदर लोदीला भेटून गोहत्या बंद करवली.आणि शेकडो खेड्यांत आपल्या अनुयायांमार्फत पृथ्वीला पुन्हा हरित वस्त्रांनी पांघरण्याचे काम चालू ठेवले.जम्भेश्वरांनी २९ नियम घालून दिले म्हणून त्यांच्या अनुयायांनी नाव पत्करले - बिश्नोई - बीस और नौई.त्यांनी आपल्या खेड्यांभोवती वृक्षवल्ली जपल्या, काळवीट, चिंकारा, नीलगायी,मोर आणि सर्व पशुपक्ष्यांना आसरा दिला. हळूहळू त्यांची खेडी,त्यांच्या जमिनी वृक्षाच्छादित होत राहिल्या. त्यांच्या गुरांना पुन्हा भरपूर चारा मिळू लागला.जमिनीचा कस वाढू लागला.

बिश्नोई सुस्थितीत आले.मारवाडातून त्यांचा पंथ राजस्थानाच्या इतर प्रदेशात,मध्य प्रदेश हरयाणांत पसरला.इतरत्र मात्र पूर्वीचीच गती चालू होती.वाळवंट पसरत होते,माळरान आणखीच रखरखीत होत होते.

लोकांना कळत नव्हते असे नाही,पण वळत मात्र नव्हते.

राठोड राजांच्या अनेक पिढ्या गेल्या.त्यांचे स्वातंत्र्य जाऊन ते मोगलांचे मांडलिक झाले.जोधपूर स्थापणाऱ्या जम्भेश्वरांच्या समकालीन,राव जोधाजीच्या वंशातल्या आठ पिढ्या गेल्या आणि महाराज अजितसिंग गादीवर आले.अजितसिंग औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्यांच्या महापराक्रमी बापाच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी जन्मले होते.औरंगजेबाने त्यांना पकडायला जंग जंग पछाडले;परंतु त्यांच्या निष्ठावंत सेवकांनी त्यांना वाचवून वाढविले.शेवटी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी जोधपूरची गादी पुन्हा मिळवली. 


पण त्या धामधुमीच्या काळात एका क्षणाचीही उसंत मिळाली नाही.सतत लढायांना तोंड देत देत त्यांनी गादी राखली.आयुष्याच्या शेवटी इसवी सन १७३० मध्ये त्यांनी जोधपूरला एक मोठा राजवाडा बांधायचा ठरवला.

जोधपूरच्या सुंदर लाल दगडांचा राजवाडा.तो बांधायला चुना हवा.तसा चुना या प्रदेशात भरपूर आहे.पण एवढ्या चुन्याची कळी करायला भरपूर जळण हवे.आता या वाळवंटात एवढ्या प्रचंड भट्टीसाठी जळण पैदा करणे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती.पण अजितसिंग महाराजांच्या सुदैवाने जोधपूरपासून सोळाच मैलांवर बिश्नोई लोकांची मोठी वस्ती होती.जवळजवळ अडीचशे वर्षांपूर्वी या लोकांनी जम्भेश्वरांचा मार्ग पत्करला होता आणि त्याच्या गावापाशी शेकडो खेजडीची झाडे वाढविली होती.त्यातल्या खेजडली गावाजवळ चुन्याच्या खाणीही होत्या. झाले! दिवाणांचा हुकूम निघाला,

'खेजडली गावी चुन्याच्या भट्ट्या सुरू करा आणि महाराजांच्या राजवाड्याचे बांधकाम चालू करा.' कामगार हजर झाले. कुऱ्हाडी घेऊन निघाले. पण काय ! बिश्नोई त्यांना आडवे आले.आम्ही जतन केलेली खेजडीची झाडे तोडायची नाहीत.ते आमच्या धर्माविरुद्ध आहे.कामगार परतले.राजवाड्यात निरोप गेला,दिवाणसाहेब गरम झाले.

काय ही मग्रुरी ! ते स्वतः जातीने घोडेस्वार घेऊन आले. कामगारांना हुकूम केला, बिश्नोईंचे काही ऐकू नका.झाडे तोडा.' कामगार सरसावले.सारा गाव गोळा झाला.

विनवण्या करू लागला.आमचा धर्म तुडवू नका.आमच्या पिढ्यान् पिढ्यांनी जतन करून ठेवलेली वृक्षसंपदा नासू नका.दिवाण म्हणाला,काही चालणार नाही,घाव पडणारच. पण गावात होती एक रणचंडी.बिश्नोई रामखोडची बायको अमृतादेवी.ती म्हणाली, झाड तुटेल आम्ही तुटल्यावरच,आधी नाही.तिने आणि तिच्या तीन मुलींनी झाडांना मिठ्या घातल्या.म्हणाल्या, तोडा हवे तर.दिवाण गरजला,बघता काय? घाव घाला. कुऱ्हाडीचे

घाव पडले.चौघींचे झाडासकट तुकडे उडाले. साऱ्या गावकऱ्यांना उचंबळून आले.त्यांनी झाडा-झाडाला मिठ्या घातल्या.बायका- मुले-पुरुष सारे सारखेच.दिवाणाचे तर माथेच फिरले.महाराजांच्या मर्जीआड कोण येतो? तोडा त्या सगळ्यांना.बघता बघता थोडेथोडके नाही,३६३ बिश्नोई जीव त्यांच्या खेजडीच्या झाडांसकट तोडले गेले!


या अघटित घटनेची बातमी म्हणता म्हणता फैलावली.गावा-गावाचे बिश्नोई खेजडलीला धावत आले.दरबारात महाराजांनाही वर्दी मिळाली.मग मात्र दिवाणाची मग्रुरी उतरली. राजा मऊ झाला.महाराज जातीने घोडेस्वार होऊन खेजडलीला आले.तो काय,

हजारो बिश्नोईंचा जमाव आक्रोश करीत असलेला बघायला मिळाला.महाराजांना पश्चात्ताप झाला. तिथल्या तिथे लोकांची माफी मागून महाराज म्हणाले : यापुढे बिश्नोईच्या गावापासचे एकही हिरवे झाड तुटणार नाही याची हमी आम्ही घेतो.त्यांनी बिश्नोईना ताम्रपट दिला : तुमच्या गावांपाशी वृक्षतोड होणार नाही,पशुहत्या होणार नाही.एवढेच नाही तर कोणी बिश्नोई दुसऱ्या गावी गेला आणि त्याला कोणी झाड तोडताना किंवा शिकार करताना दिसला तर त्याला मना करायचा अधिकार आहे.आणि तो सर्वांनी मानलाच पाहिजे.शिवाय बिश्नोईना अनेक कर माफ केले गेले.(वारुळ पुराण,माधव गाडगीळ,ई.ओ.विल्सन,

संक्षिप्त अनुवाद नंदा खरे,मनोविकास प्रकाशन,)


या गोष्टीला आज पावणेतीनशे वर्षे झाली. तब्बल पाच शतके बिश्नोई पंथ राजस्थानात, मध्य प्रदेशात,हरयाणात झाडांना सांभाळतो आहे,वन्य पशुपक्ष्यांना सांभाळतो आहे.या काळात आपल्या भारतमातेचे हरितवस्त्र अधिकाधिक फाटून त्याची पार लक्तरे झाली आहेत.भारत भूमीवर एके काळी हजारोंनी नव्हे लक्षावधींनी बागडणारे काळविटांचे - चिंकारांचे कळप केव्हाच संपून गेले आहेत.

पण बिश्नोई खेड्यांच्या आसपास मात्र अजूनही झाडी नुसती टिकूनच नाही,तर वाढत आहे.पूर्वीच्या कण्व ऋषींच्या आश्रमाच्या वर्णनाप्रमाणे त्यांच्या वस्तीजवळ निर्भय कृष्णमृगांचे कळपच्या कळप फिरत आहेत.

दिल्लीच्या अकबर बादशहाने सव्वाचारशे वर्षांपूर्वी बिश्नोई लोकांच्या देवळाजवळ काळविटांचे असे निर्भय कळप पाहिले तेव्हा लिहून ठेवले की,कलियुगात हा सत्ययुगातला देखावा पाहून मला फार आश्चर्य वाटले!आज तर हे दृश्य अधिकच विस्मयजनक आहे.पण 


आजही बिश्नोई आपल्या या अप्रूप परंपरेला जपून आहेत आणि त्याचा अभिमान बाळगून आहेत.जेथे बिश्नोईची अग्निपरीक्षा झाली,त्या खेजडली गावी अजूनही दोनशे ऐंशी वर्षांपूर्वी न तुटलेले एक झाड आहे.साठ वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या ३६३ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ३६३ झाडे लावलेली आहेत.आणि त्यांच्या प्रेमाने ती भराभर फोफावत आहेत.दर वर्षी भाद्रपद शुद्ध दशमीला तेथे एक मोठी यात्रा भरते.