* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: निरोप घेता / Saying goodbye.. २

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२२/२/२४

निरोप घेता / Saying goodbye.. २



'मी एकेका झाडलेल्या बाराबरोबर त्यांचा जणू जमिनीवर सडाच पडला;पण तरीही वाचालेल्यांचं त्या ठिकाणाबद्दलचं प्रेम वाढून ते पुन्हा आले फिरून तिथेच आणि आपल्या मृत भाईबंदांकडे पाहत बसले आणि अशा एका वेगळ्या अनुकंपेने आणि जिव्हाळ्याने की, माझ्या हातातली गन गळून पडली...'


२० व्या शतकाच्या दुसऱ्या दशकापर्यंत,ते पक्षी इतक्या सातत्याने टिपले गेले की,अगदीच थोडे पिंजऱ्यात ठेवलेले तेवढे वाचले.१९१८ साली त्यांच्यातला सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयात असणारा 'इंका' नावाचा शेवटचा पॅराकीट मेला. (तिथेच त्याआधी चार वर्षं शेवटचं 'पॅसेंजर-कबुतर' मेलं होतं!) आणि मग त्याला पेंढा भरून काळजीपूर्वक अगत्यानं जपून ठेवण्यात आलं,

आता तुम्हाला तो 'इंका' बघायचा असेल, तर कुठे जावं लागेल माहितीये? कुणालाच ठाऊक नाही,कारण त्या प्राणिसंग्रहालयातून तो एकमेव नमुनाही गहाळ झालाय ! आणि वर लिहिलेल्या गोष्टीत काहीसं गूढ आणि चक्रावणार काय असेल तर हे की पीअल अतिशय मोठा पक्षिप्रेमी होता आणि तरीही त्याला शॉटगनने त्यांना मारताना काही वाटू नये? त्याने का ठार करावं इतक्या संख्येत त्या पक्ष्यांना काय कारणं सांगता येईल? केवळ त्याला ते तसं करणं आवडलं म्हणून? हे मात्र खरंच आश्चर्यच म्हणाव लागेल की,


या जगात प्राण्यांमध्ये,पक्ष्यांमध्ये ज्यांना खरोखरच इंटरेस्ट होता, अभ्यास करावासा वाटत होता अशीच माणसं त्या त्या पक्ष्यांचा, प्राण्यांचा नामशेष व्हायला कारणीभूत ठरली आहेत.. 


आणि या वर्णनात दुसऱ्या कोणाहीपेक्षा अचूक तंतोतंत फिट्ट बसतो तो लायनेल वॉल्टर रॉथचाईल्ड ! एका प्रतिष्ठित बँकिंग कुटुंबातला दुसरा बॅरन.त्या कुटुंबाचं शेंडेफळ !रॉथचाईल्ड काहीसं विक्षिप्त आणि एकांतप्रिय माणूस होता. बकिंगमशरमधल्या ट्रिंग इथल्या आपल्या घराच्या नर्सरी विंगमध्ये त्याने १८६८ ते १९३७ मधलं आपलं संपूर्ण आयुष्य काढलं त्या खोलीतलं फर्निचरसुद्धा त्याच्या बालपणी होतं, तेच कायम होत आणि तो झोपायचा तो बिछानासुद्धा लहानपणापासूनचाच होता (जरी पुढे त्याचं वजन १३५ किलो झालं होतं!) त्याला 'नॅचरल हिस्टरी' विषयात कमालीची रुची होती आणि वेगवेगळ्या वस्तू जमवायचा त्याला छंद जडला होता,तो एकाच वेळी माणसांच्या गटांना (चारशे माणसं एकावेळी) दुनियेच्या वेगवेगळ्या भागांत पाठवायचा कुणी डोंगरमाथ्यांवर,कुणी दाट जंगलात... कायम नवनवीन नमुने शोधण्यासाठी आणि विशेषतः असे नमुने जे उडू शकत असतील (अर्थात पक्षी) मग ती मंडळी पक्ष्यांना पकडून क्रेटमध्ये किंवा बॉक्समध्ये भरून ट्रिंग इथल्या रॉथचाईल्ड इस्टेटवर पाठवायची आणि मग ते तिथे पोहोचल्यावर रॉथचाईल्ड आणि त्याचे मदतनीस त्या सगळ्यांची नोंद करून ठेवायचे आणि विश्लेषण करायचे मग त्यावर त्यांनी पुस्तकं काढली, शोधनिबंध लिहिले जवळपास १२०० ! एकूण बघता,रॉथचाईल्डच्या त्या निसर्ग - इतिहासाच्या कारखान्यात २० लाखांहून अधिक नमुने तयार झाले होते आणि त्याने वैज्ञानिक भांडारामध्ये ५००० प्राण्यांच्या नमुन्यांची भर घातली होती; पण तरीही हे उल्लेखनीयच म्हणावं लागेल की, १९ व्या शतकातले रॉथचाईल्डचे ते सगळे परिश्रम हे इतिहासात सर्वोच्च असे किंवा खूप सढळपणे पैसे खर्च करून केलेले नव्हते,तो मान त्या वेळेच्या आधीच्या एका श्रीमंत ब्रिटिश संग्राहकाचा! ह्यू कमिंगचा! त्याला तर असे पक्ष्याप्राण्यांचे नमुने जमवण्याच्या वेडानं इतकं पछाडलं की,त्याने एक भलं मोठं जहाजच बांधलं आणि मग त्यासाठी काही खलाशी, कॅप्टन वगैरे माणसांची भरती केली.त्यांचं काम एकच जगभर जहाजातून फिरत राहायचं आणि जमेल तिथून,जमेल तेवढ्या प्राण्यांचे नमुने गोळा करून आणायचे! प्राणी,पक्षी,वनस्पती सगळ्यांच्या मिळतील,

तेवढ्या जाती-जमाती आणि हो शंख-शिंपलेसुद्धा.त्यानेच मग त्याच्या संग्रहातल्या बार्नेकलचे नमुने डार्विनला दिले होते आणि मग त्याचा फायदा पुढे डार्विनला त्याच्या अंतिम अभ्यासासाठीसुद्धा झाला होता.


पण तरीही रॉथचाईल्ड हा त्याच्या वयाचा विचार करता अतिशय शास्त्रशुद्ध अभ्यास करणारा म्हणून ओळखला जातो,पण दुर्दैवाने तो निर्दयीसुद्धा होता! १८९० साली त्याला हवाई बेटाचे वेध लागले होते एक अशी जागा जी पृथ्वीवरची टोकाची आकर्षक जागा असली तरी तितकीच असुरक्षितही मानली जाते.लक्षावधी वर्षं पृथ्वीच्या इतर भू-भागापासून दूर असल्यानं तिथे जवळपास ८८०० प्रकारच्या अत्यंत दुर्मीळ अनोख्या प्राण्यांची आणि वनस्पतींची वसाहत होती.अर्थात रॉथचाईल्डच्या दृष्टीनं त्याला लुभावणारी विशिष्ट गोष्ट म्हणजे तिथे असणारे अत्यंत चित्ताकर्षक पक्षी! काही जातीचे पक्षी संख्येनं कमी असले तरी ठरावीकच विशिष्ट जागांमध्येच आढळणारे होते.हवाईवरच्या पक्ष्यांच्या बाबतीत दुर्दैवाची गोष्ट ही होती की, ते वैविध्यपूर्ण,आकर्षक वगैरे अद्भुत संयोग असलेले जरी असले तरी अगदीच,अत्यंत सहज पकडता येतील असेच होते.उदाहरणार्थ - हनीकीपर जातीमधला 'द ग्रेटर कोआ फिंच' हा एक निरुपद्रवी पक्षी - हा कोआ झाडांवर विहरत असतो काहीसा लाजतबुजत;पण कुणी जर त्याच्या गाण्याची नक्कल केली तर तो झाडाच्या पानांचा सुरक्षित आसरा सोडून तुमच्यासमोर जणू स्वागताला आल्यासारखा येऊन बसतो, १८९६ साली त्या पक्ष्यांपैकी शेवटचा पक्षी मारला गेला तो रॉथचाईल्डच्या तरबेज हॅरी पामर या संग्राहकाकडून! (त्याच्या पाच वर्षंआधी त्याच पक्ष्याच्या दुसऱ्या जातीतला लेसर कोआ फिंच हा नामशेष झाला होता.तो इतका प्रचंड दुर्मीळ होता की,आज केवळ एक पक्षी पाहायला मिळतो,तोही रॉथचाईल्डच्या संग्रहासाठी ठार मारला गेलेला! गोळाबेरीज काय,तर रॉथचाईल्डच्या संग्रहाचा पसारा वाढवण्याच्या त्या दशकभराच्या काळात हवाईअन बेटांवरच्या किमान नऊ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष झाल्या.कदाचित,जास्तही असू शकतात.

कुठल्याही थराला जाऊन,कितीही पैसे मोजून पक्षी मिळवण्याच्या वेडाच्या बाबतीत रॉथचाईल्ड काही एकटाच नव्हता. 


किंबहुना,दुसरे काही जण त्याच्यापेक्षाही निर्दयी होते. १९०७ साली,ॲलनसन ब्रायन नावाच्या एका प्रसिद्ध संग्राहकाला जेव्हा समजलं की, त्याने 'ब्लॅक मॅमोज' पक्ष्याचे जगातले शेवटचे 'उरलेले तीनच्या तीन' जंगली पक्षी मारलेत (की जे त्याआधीच्याच दशकात पहिल्यांदा सापडले होते),तेव्हा त्याला ती 'बातमी' ऐकून चक्क 'आनंद झाला होता!' खरं तर,तो काळच थांग लागायला कठीण असा होता.त्याकाळात कुठलाही प्राणी जर व्यत्यय आणणारा वाटला, तर त्याचा खुशाल छळ होत असे! १८९० साली, न्यू यॉर्क राज्यानं पूर्वेकडच्या डोंगरी सिंहांना ठार करण्यासाठी शंभरावर इनाम जाहीर केलं होतं, जरी हे माहीत होतं की,ते आधीच त्रस्त झालेले प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून! जवळपास १९४० सालापर्यंत अमेरिकेतलं कुठलंही राज्य आपल्या राज्यातल्या प्राण्यांना ठार करण्यासाठी इनाम जाहीर करत असत! पश्चिम व्हर्जिनिया राज्याने एक वार्षिक कॉलेज शिष्यवृत्तीच जाहीर केली होती,जो कोणी जास्तीत जास्त पेस्ट्स (कीटक) मारून आणेल त्यांच्यासाठी! आणि त्या पेस्ट शब्दाचा अर्थ हा शेतावर ज्याची पैदास केली जात नाही किंवा घरी पाळले जात नाहीत असे कोणतेही प्राणी ! आणि त्या विचित्र काळाविषयी बोलताना छोट्या बाकमन्स वार्लरपेक्षा आणखी बोलकं आणि स्पष्ट उदाहरण दुसरं कुठलं असू शकेल? अमेरिकेच्या दक्षिणेकडे आढळणारा हा देखणा छोटा पक्षी! त्याची लकेर खूप छान असायची; पण त्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली होती आणि १९३० पर्यंत ते दिसेनासेच झाले आणि पुढची अनेक वर्षं त्यांचं कुणालाच दर्शनही झालं नाही. त्यानंतर १९३९ साली एका छान योगायोगानं दोन पक्षी निरीक्षकांना वेगवेगळ्या ठिकाणी केवळ दोन दिवसांच्या अंतरानं ते एकाकी पक्षी दिसले आणि त्या दोघांनी त्या दोन्ही पक्ष्यांना गोळ्या झाडून टिपलं! पण असं गोळी घालून संपवणं ही लहर किंवा हुक्की काही फक्त अमेरिकन लोकांमध्येच नव्हती येत ! ऑस्ट्रेलियात 'टास्मेनियन टायगर' (थायलेसिन) या कुत्र्यासदृश पण वाघासारखे पट्टे असणाऱ्या प्राण्याला मारण्यासाठी इनाम जाहीर करण्यात आलं होतं.त्यांच्यातला शेवटचा टास्मेनियन टायगरला,त्या उपेक्षित,एकाकी जीवाला मृत्यू आला तो १९३६ साली होबार्टच्या प्राणिसंग्रहालयात तुम्ही कधी तिथे गेलात,तर 'टास्मेनियन म्युझियम अँड आर्ट गॅलरी'ला विचारा आम्हाला तो 'टास्मेनियन टायगर' पाहायचाच आहे म्हणून जो आजच्या आधुनिक जगात प्रवेश केलेला शेवटचा मांसभक्षक मारुस्पियल (पोटात पिशवी असणारा) होता,तर तुम्हाला बघायला मिळेल ते जेमतेम मिनिटभराचं एक फिल्मचं फूटेज आणि काही फोटोज ! जेव्हा त्या प्राणिसंग्रहालयातला तो शेवटचा थायलेसिन (टास्मेनियन टायगर) मेला,तेव्हा त्याचा मृतदेह इतर कचऱ्याबरोबर बाहेर कचरापेटीत फेकण्यात आलं होतं - मी हे सगळं सांगतोय याचं कारण तुमच्यापर्यंत एक मुद्दा ठामपणे पोहोचवण्यासाठी की,यदाकदाचित 


तुम्ही एखादा सूक्ष्मजीव आपल्या या एकाकी विश्वात जगण्यासाठीआयुष्यघालवण्यासाठी डिझाईन करत असाल किंवा तो कुठे कुठे होता वगैरे याचं रेकॉर्ड ठेवणार असाल तर त्या कामासाठी कृपया 'माणसाला' नेमू नका! हा अत्यंत महत्त्वाचा ठळक मुद्दा आहे! आपल्याला निवडण्यात आलंय.आपली निवड झालीये ती दैववशात किंवा भविष्याची काही गणितं डोक्यात असल्याने किंवा जे काही म्हणता येईल त्यासाठी! त्या प्रकाराने आपण सध्यातरी सर्वोत्तम आहोत! पण आपणच तेवढे असू कदाचित.हे कदाचित भीतिदायक सत्य असेल की,

त्या सर्वशक्तिमान निसर्गाची आपण सर्वांत शक्तिमान आणि उच्च निर्मिती असू आणि एकाच वेळी त्यानं पाहिलेलं महाभयंकर स्वप्नही असू!


कारण,आपण आजूबाजूच्या अनमोल गोष्टींकडे अत्यंत निष्काळजीपणे बघणारे आहोत.गोष्टी अस्तित्वात असताना आणि नसतानाही आपण अत्यंत निष्काळजी,

बेदरकार असणारे आहोत आपल्याला त्याची जाणीवही नाहीये - अजिबातच ! किती किती प्रकारच्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्यात किंवा नाहीशा होऊ घातल्याहेत किंवा कधी नाहीशा नाहीही होणार आणि आपली त्या सर्वांमध्ये काय भूमिका राहील? १९७९ साली प्रसिद्ध झालेल्या 'द सिंकिंग आर्क' या आपल्या पुस्तकात नॉर्मन मेयर्सने असं सूचित केलंय की, पृथ्वीवर माणसाच्या कारनाम्यांमुळे दर आठवड्याला दोन प्रजाती नामशेष होत जाताहेत ! पुढे १९९० सालापर्यंत त्याने तोच आकडा वाढवून आठवड्याला ६०० इतका नेला ! (यामध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी, जलचर सगळ्या प्रकारचं नामशेष होणं अंतर्भूत!) पण इतर काही जणांनी तर ती संख्या त्याहीपेक्षा जास्त मानलीये; आठवड्याला हजार इतकी ! १९९५ सालच्या युनोच्या एका अहवालाद्वारे असं सांगितलं गेलं की,गेल्या चारशे वर्षांत नामशेष झालेल्या ज्ञात प्रजातींची संख्या ५०० प्राणी आणि ६५० वनस्पती इतकी भरतीये;पण ते कदाचित कमी धरलेली संख्या असू शकते असंही म्हटलं गेलं. विशेषतः समशीतोष्ण कटिबंधातल्या प्रजातींविषयी! तर काहींच्या मते नामशेष झालेल्या प्राणी, वनस्पतींची संख्या ही फुगवलेली आकडेवारी आहे म्हणून! सत्य कदाचित आपल्याला ठाऊकच नाही! आपल्याला कसलीच कल्पना नाही! आपल्याला आपण करत असलेल्या कित्येक गोष्टी कधीपासून सुरू केल्या हेही सांगता येत नाही. आपण या क्षणी काय करतोय तेही आपल्याला सांगता येणार नाही किंवा आपण आत्ता जे करतोय त्याचा परिणाम भविष्यावर कसा होणार आहे,ते आपल्याला आज सांगता येत नाही; पण आपल्याला एक गोष्ट नक्कीच माहितीये की, आपण जे काही करू शकतोय ते फक्त या एकाच ग्रहावर ! आणि आपण (मानव) हा एकच प्राणी असा आहे की, जो काही बदल घडवू शकेल, या ग्रहावर! डायव्हर्सिटी ऑफ लाइफमधून एडवर्ड ओ.विल्सनने अगदी कमीत कमी शब्दांत हे छान सांगितलंय - 'एक ग्रह, एक प्रयोग'.


जर या पुस्तकात काही धडा असेल घेण्यासारखा,तर तो हाच की आपण प्रचंड सुदैवी आहोत की आज आपण इथे आहोत! आणि 'आपण' म्हणजे प्रत्येकच सजीव! या विश्वात कुठल्याही प्रकारचं जीवन 'जगायला मिळणं' म्हणजेच खूप 'मोठी कामगिरी' म्हणता येईल! आणि मानव या नात्याने तर आपण डब्बल सुदैवी आहोत,

नक्कीच !आपण 'आहोत',आपलं अस्तित्व आहे,याचा आनंद तर आपण उपभोगू शकतोच; पण त्याचबरोबर त्याबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करू शकतो आणि अनेक प्रकारे आहे ते मिळालेलं जीवन आणखी सुखी,आणखी समाधानी जगण्याचं कामही करू शकतोय! आणि ते करू शकणारी क्लृप्ती अलीकडेच तर कळलीये आपल्याला !


आपण या अतिशय समृद्धतेच्या आणि लौकिकाच्या टप्प्यावर फार झपाट्याने पोहोचलोय.पृथ्वीच्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर,आधुनिक मानव म्हणून वावर सुरू झालाय.आपण त्या इतिहासाचा केवळ ०.०१ टक्के भाग व्यापलाय म्हणजे खरं तर काहीच नाही - पण त्या अत्यंत छोट्या,कणांएवढ्या काळाच्या भागात अस्तित्व असण्यासाठीसुद्धा आपल्याला अनेक योगांची,अनेक दुर्लभ भाग्याची अथक, अखंड साथ मिळालेली आहे.


आपण खरं तर या सर्वांच्या आरंभाच्या ठिकाणीच आहोत जणू! आणि त्यात योजना हीच आहे की,

आता आपल्याला त्याचा शेवट सापडूच नये! आणि त्यासाठी मात्र आपल्याला केवळ सुदैवी क्षणांपेक्षा खूपच जास्त गोष्टींची आवश्यकता असणार आहे!!


२०.०२.२४ या लेखातील शेवटचा भाग..