* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३/९/२४

हसा फक्त हसा..! Smile just smile..!

एका मोठ्या पार्टीत एक गर्भश्रीमंत स्त्री प्रत्येकावर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत होती.न्यू यॉर्क शहरातील त्या पार्टीत उंची वस्त्रे, हिरे आणि मोती यांनी झगमगणारी तिची श्रीमंती,तिच्या चेहऱ्याच्या बाबतीत मात्र अगदीच कुचकामी ठरत होती.ती किती सुंदर आहे किंवा नाही यापेक्षाही तिच्या चेहऱ्याबाबत लक्षात राहणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावरून ओसंडून वाहणारा रुक्षपणा आणि स्वार्थीपणा. तुमचे कपडे आणि तुमच्या दागदागिन्यांपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील मृदू,

मैत्रीपूर्ण भावच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देतात,ही सामान्यतः प्रत्येकालाच माहिती असलेली गोष्ट बहुधा तिला जाणवलीच नव्हती.


चार्लस स्कॅब हा पूर्वी अजिबात हसत नसे,पण हसण्यात केवढी जादू दडली आहे,हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा तो आमूलाग्र बदलला..! स्कॅबचे आनंदी व्यक्तिमत्त्व,

लोकांनी प्रेम करावे ही त्याची क्षमता,त्याचे मंत्रमुग्ध करणारे हसू यातच त्याच्या असामान्य यशाचे गुपित दडले आहे.शब्दांपेक्षा कृती ही खूप काही बोलून जाते. जेव्हा तुम्ही हसून एखाद्याला भेटता तेव्हा जणू तुम्ही असेच म्हणत असता की,मला तू आवडतोस,तुला भेटून मला आनंद झाला,तू मला सुखी केलेस. 


कुत्र्यांच्या लोकप्रियतेमागे हेच कारण असावे,की कुत्र्यांना आपल्याला पाहून इतका आनंद होतो की,ती आपल्या अंगावर उड्या मारतात.साहजिकच आपल्यालाही त्यांना पाहून आनंद होतो.लहान बाळाचे हसूही अत्यंत लोभसवाणे असते.


डॉक्टरांच्या वेटिंगरूममध्ये बसून कंटाळलेल्या इतर पेशंट्सना तुम्ही कधी निरखून पाहिलंय? सगळेजण अत्यंत गंभीर चेहऱ्याने डॉक्टरांना भेटण्यासाठी तिथे ताटकळत बसलेले असतात. प्राण्यांचे डॉक्टर डॉ.स्टिफन मिसुरीतील रेटाउन येथे दवाखाना चालवत असत.त्यांनी वसंत ऋतूतील एका खास दिवसाची आठवण सांगितली.

त्या दिवशी त्यांची वेटिंगरूम प्राण्यांना रोगप्रतिबंधक लस देण्यासाठी जमलेल्या लोकांनी व त्यांच्या प्राण्यांनी खच्चून भरलेली होती.सगळे काही न बोलता शांत बसून होते. साधारण सहा किंवा सात पेशंट्स उरलेले असताना एक तरुण स्त्री आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला आणि एका छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन आली.खूप वेळ बसावे लागल्यामुळे वैतागलेल्या एका सभ्य प्रौढ गृहस्थां शेजारी ती बसली.तेवढ्यात ते छोटे बाळ त्या आजोबांकडे पाहून बोळकं पसरून असं काही हसलं की,त्यानंतर गंभीरपणे किंवा लांब चेहरा करून बसून राहणे कुणालाच शक्य झाले नाही.मग लगेच ते आजोबा त्या बाळाविषयी, त्यांच्या नातवंडांविषयी बोलू लागले आणि त्या हॉलमधील सगळी माणसेच त्यामध्ये सहभागी झाली आणि मग सगळे ताणतणाव,कंटाळा विरून त्या हॉलमध्ये आनंद व उत्साह भरून गेला.खोट्या,यांत्रिक हसण्यामुळे मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच शक्यता जास्त असते.असे हसणाऱ्या माणसांविषयी मनात एक चीड उत्पन्न होते.समोरच्याच्या मनात आनंद लहरी उमटतील असे खरेखुरे,अगदी हृदयातून उमटणारे हसू आयुष्य बदलून टाकू शकते.


मिशिगन विद्यापीठातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ प्रोफेसर जेम्स मॅकोनेल हे हास्य या संकल्पनेबद्दल असे म्हणतात की,हसू शकणारे लोक चांगले व्यवस्थापक असतात, उत्तम शिक्षक असतात आणि त्यांचे विक्रीकौशल्य विशेष उल्लेखनीय असते. ते मुलांनासुद्धा चांगल्या पद्धतीने वाढवतात. नुसतीच नाके मुरडण्याऐवजी एकदा मोकळे हसून पाहा,अनेक चांगल्या भावनांचा उगम त्यातून होतो. शिक्षा करण्यापेक्षा प्रोत्साहन देणे हीच उत्तम शिकवण आहे.एक एम्प्लॉयमेंट मॅनेजर जी न्यूयॉर्कमधील एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करते; तिचे असे म्हणणे आहे की,मला शक्य झाले तर, चेहऱ्यावर उत्साहवर्धक हसू असणारी व्यक्ती जरी अर्धवट शिकलेली असेल तरी गंभीर चेहऱ्याच्या पी.एच.डी. झालेल्या व्यक्तीपेक्षा, अशा व्यक्तीलाच मी पसंत करेन.


जरी काही वेळा आपल्या चेहऱ्यावरचे हसू दिसले नाही,

तरी त्याचा होणारा परिणाम हा अतिशय प्रभावशाली असतो.आपली उत्पादने व सेवा विकण्यासाठी फोन कॉल्स करणाऱ्या लोकांसाठी अमेरिकेत फोनपॉवर नावाचा एक अभिनव उपक्रम केला गेला.त्यात त्यांना असे सांगण्यात आले की,तुमच्या बोलण्यातून तुमचे हास्य समोरच्या व्यक्तीला समजायला हवे आणि याचा त्यांच्या विक्रीवर चांगला परिणाम झाल्याचे लक्षात आले.


ओहियोसिनसिनाटी येथील कंपनीमध्ये संगणक विभागाचा व्यवस्थापक असणाऱ्या रॉबर्ट क्रायरने अभिमानाने सांगितले की,त्यांच्या कंपनीसाठी लायक कॉम्प्युटर इंजिनिअरची नेमणूक त्याने अचूकपणे कशी केली :त्याच्या कंपनीसाठी कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएच.डी.केलेला एक चांगला हुशार उमेदवार ताबडतोब हवा होता.परड्यु युनिव्हर्सिटीतून पदवी घेतलेला,उत्तम क्वालिफिकेशन असलेला उमेदवार शेवटी निवडला गेला.त्याच्याशी बरेचवेळा फोनवर बोलल्यानंतर असे लक्षात आले की,त्याला अनेक कंपन्यांकडून बोलावले गेले होते.त्यांपैकी काही कंपन्या तर आमच्यापेक्षा मोठ्या आणि नावाजलेल्या होत्या.तरीही त्याने मात्र आमच्या कंपनीची निवड केली. मी त्याला विचारले,त्याने इतरांना डावलून आम्हाला का निवडले?तो एक क्षणभर थांबून विचारपूर्वक म्हणाला,मला असे वाटते की,माझ्याशी बोलणाऱ्या इतर मॅनेजर्सचे बोलणे अत्यंत थंड व व्यावहारिक होते;एखादा सौदा केल्यासारखे ते बोलणे होते.पण तुमचा आवाज मला फार आश्वासक वाटला व तुम्ही मला आमंत्रित करत आहात,तुम्हाला माझे बोलणे ऐकायचे आहे आणि तुमच्या संस्थेचा एक भाग म्हणून तुम्हाला मी हवा आहे असे मला जाणवले.


अमेरिकेतील एका खूप मोठ्या रबर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या अध्यक्षाचे निरीक्षण असे आहे,

की कोणतेही काम लोक जेव्हा हसून-खेळून करतात तेव्हाच ते त्यामध्ये यशस्वी होतात.हा मोठा उद्योजक जुन्या काळातील असला,तरी फक्त काबाडकष्ट हीच यशाचे दार उघडण्याची जादूची किल्ली नव्हे,यावर त्याचा विश्वास होता.त्याचे म्हणणे असे होते,मला अशी यशस्वी माणसे माहिती आहेत की,ज्यांनी त्यांचा व्यवसाय अत्यंत आनंदाने केला आहे आणि मी अशीही माणसे पाहिली आहेत की,ज्यांनी मौजमजा विसरून फक्त काम केले आहे;पण मग त्यांच्या व्यवसायात त्यांना मंदी आली, त्यांचा आनंद नाहीसा झाला आणि ते अपयशी ठरले.तुम्ही लोकांना आनंद दिलात, तर निश्चितच ते तुमच्याबरोबर आनंदात वेळ घालवतील.


माझ्या क्लासमधल्या हजारो व्यावसायिकांना मी नेहमी सांगतो एक आठवडाभर तुम्ही सातत्याने प्रत्येक तासाला कोणालातरी स्माईल द्या आणि मग इथे येऊन त्याचे काय परिणाम झाले ते सांगा. हे खरंच शक्य आहे का? न्यूयॉर्कमधील एका स्टॉकब्रोकरचे पत्र आता पाहा :


मि.स्टेनहार्ड लिहितात - अठरा वर्षांपूर्वी माझे लग्न झाले आणि अठरा वर्षांच्या काळात मी माझ्या पत्नीकडे पाहून क्वचितच हसलो असेन किंवा सकाळी उठल्यापासून ते ऑफिसला जाईपर्यंत दोन डझन शब्दसुद्धा मी रोज तिच्याबरोबर बोलत नाही.सतत फक्त कुरकुर करत असे.मी कधी तिच्याबरोबर सिनेमालासुद्धा गेलो नाही.पण जेव्हा तुम्ही मला हसून बोलण्याचा सल्ला दिलात व तो अनुभव कथन करण्यास सांगितलात,तेव्हा मी मनाशी विचार केला की,मी आठवडाभर प्रयत्न करून पाहीन. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच आरशातल्या माझ्या खिन्न,आंबट चेहऱ्याकडे पाहून मी स्वतःला बजावले,बिल तू आता हसणार आहेस आणि या क्षणापासून हसतच राहणार आहेस. मी नाश्ता करताना बायकोला हसून गुड मॉर्निंग म्हणालो.तुम्ही म्हणाला होतात की,ती आश्चर्यचकित होईल;पण कार्नेगी साहेब,तुम्ही चुकलात.

तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे घडले.ती चक्क घाबरली.तिला धक्काच बसला,पण जेव्हा मी तिला विश्वास दिला की यात काहीही अनपेक्षित नाही आणि आता असे नेहमीच घडत राहणार आहे तेव्हा तिला खूप आनंद झाला.आणि खरोखरच त्या दिवसापासून अवघ्या दोनच महिन्यांनी आमचे घर सुखासमाधानाने न्हाऊन निघाले.ऑफिसला जाताना आमच्या लिफ्ट ऑपरेटरलासुद्धा मी गुड मॉर्निंग असे हसून म्हणू लागलो.ऑफिस मधील दरवानालासुद्धा हसून अभिवादन करू लागलो.माझ्या कॅशिअरने माझ्याकडे सुट्टे पैसे मागितले तेव्हाही मी त्याच्याकडे पाहून हसलो.स्टॉक एक्स्चेंजच्या दरबारात उभे राहून तेथे जमलेल्या लोकांकडे पाहून हसताना तर मला कुणीच पाहिले नव्हते.काही दिवसांतच माझ्या लक्षात आले की,प्रत्येकजण माझ्या सुहास्याला हसून प्रतिसाद देत होता.माझ्याकडे काही तक्रारी घेऊन येणाऱ्या किंवा टीका करणाऱ्याचे म्हणणेसुद्धा मी काळजीपूर्वक ऐकू लागलो.त्यावर आनंदाने उपाय सुचवू लागलो आणि माझ्या लक्षात आले की,तडजोडीने अनेक समस्या सुटतात.निदान सोप्या वाटतात.मला असेही जाणवले की,हास्य माझ्याकडे संपत्ती खेचून आणते आहे.


माझा एक मित्र माझा भागीदार होता.त्याच्या स्टाफपैकी त्याचा एक क्लार्क फार उमद्या स्वभावाचा होता.जगाकडे बघण्याच्या माझ्या दृष्टिकोनात बदल केल्यामुळे मला होणारे फायदे त्याला सांगावे म्हणून मी जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा त्याने मला प्रांजळ कबुली दिली की,पूर्वीचे माझ्याबद्दल त्याचे मत,महानालायक,खडूसप्राणी असे होते.पण आता ते बदलले होते.


कामाच्या पद्धतींमधून पूर्णपणे हद्दपार केलेली टीका,

रागाऐवजी कौतुक आणि स्तुती या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात क्रांती घडली.मला काय पाहिजे आहे यावर भर देण्यापेक्षाही मी आता समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून त्या घटनेकडे पाहू लागलो आणि खरे सांगायचे,तर मी आता पहिल्यापेक्षा खूप वेगळा,

अधिक आनंदी,अधिक श्रीमंत आहे.खरेतर मित्रांच्या बाबतीतली ही श्रीमंती,संपत्तीच अधिक टिकाऊ असते.

हसावेसे वाटत नाही तेव्हा दोन गोष्टी कराव्यात.पहिली म्हणजे बळजबरीने स्वतःला हसवा.एकटे असताना मुद्दाम शिट्टी वाजवा किंवा गाणे म्हणा.मग आपोआपच तुम्हाला आनंद होईल.तुम्ही स्वतःला आनंदी मानू लागलात तर नेमकी हीच गोष्ट तुम्हाला अधिक आनंदी करेल.प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व तत्त्ववेत्ता विल्यम जेम्स म्हणतो…। 


तो काय म्हणतो ते वाचू पुढील भागात,याच ठिकाणी अगदी न चुकता… तोपर्यंत हसून धन्यवाद व आभार… विजय गायकवाड..!

१/९/२४

संस्कृती विध्वंसक सायरस / Culture Destroyer Cyrus

ज्या राष्ट्रांनी ज्ञानदेवांची,धर्म-प्रेषितांची थोर विभूती म्हणून,हेच खरे महावीर म्हणून पूजा केली अशा राष्ट्रांचे आपण धावते दर्शन घेतले.आता आपण अशा एका देशाकडे वळू या,की जेथे योद्धा म्हणजेच परमश्रेष्ठ मनुष्य मानला जाई,जेथे विषयलंपटता,पशुता व स्वार्थ हेच परमोच्च सद्गुण मानवी सद्‌गुण मानले जात. हिंदुस्थान व चीन यांना इतर आशियापासून अलग करणाऱ्या पर्वतांना ओलांडून आपण पलीकडे जाऊ या.आपण पश्चिमेकडे जाऊ या. ते पहा इराणचे मैदान.आपण मागे पाहिले आहे, की काही आर्यशाखा येथे वसाहती करून राहिल्या होत्या.या सर्व शाखांना 'मेडीज' किंवा 'पर्शियन' असे संबोधण्यात येते.हे अर्धवट जंगली,साहसी,रक्ततृषार्त असे लोक होते. 


पायांपासून डोक्यापर्यंत ते कातड्यांचा पोशाख करीत,

अती ओबडधोबड असे अन्न खात.दोनच गोष्टी ते शिकत.घोड्यांवर बसणे व लढणे, शांततेने शेती किंवा व्यापार करणे ही गोष्ट त्यांना कमीपणाची वाटे.त्यांना ज्या गोष्टीची जरूर वाटे, ती ते खुशाल लुटीत.

स्वतःला लागणाऱ्या वस्तू जे विकत घेत,त्यांना ते दुबळे म्हणून संबोधित;बावळट म्हणून ते त्यांचा उपहास करीत.सर्वत्र लूटमार करीत ते दौडू लागले.

ठायीठायी त्यांनी पुरे-पट्टणे धुळीस मिळविली.सारे आशिया खंड उध्वस्त व दग्ध नगरांच्या धुळीने व राखेने भरून गेले.आतापर्यंत एवढे मोठे साम्राज्य कोणी मिळविले नव्हते,अशी शेखी ते मारू लागले.

प्रचंड साम्राज्य बांधणारे मेडीज हे पहिले होत.त्याचे अनुकरण पर्शियाने केले.खि.पू.६०६ मध्ये मेडीज लोकांनी निनवी शहर घेतले. असीरियन लोकांची सत्ता त्यांनी कायमची नष्ट केली.भूतलावरून त्यांनी त्यांचे उच्चाटन केले. त्यानंतर छप्पन वर्षांनी सम्राट सायरस पुढे आला.सायरसने मेडिजी लोकांच्या वैभवाचा बुडबुडा फोडला.पर्शियाच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षाच्या मोठ्या बुडबुड्याचा धक्का लागून मीडियन सत्तेचा बुडबुडा नष्ट झाला.ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकाच्या मध्याला ही गोष्ट झाली. यात शतकात चीनमध्ये आणि हिंदुस्थानात लाओत्से,कन्फ्युसियस व बुद्ध झाले.इतिहासाच्या ग्रंथातून या तीन शांती प्रधान महात्म्यांविषयी फारसे लिहिलेले नसते.कारण ते रणधुमाळी वाजवणारे नव्हते.ते स्वप्नसृष्टित रमणारे अवलिय होते प्रचंड सैन्य घेऊन त्यांनी कधी राष्ट्रावर स्वाऱ्या केल्या नाहीत.परंतु सायरस आदळआपट करणारा वीर होता.तो जागतिक साम्राज्याचा निर्माता होता.तो आपल्या पायांखाली सारे आशिया खंड तुडविणारा सेनानी होता.यासाठी मूर्ख इतिहासकारांनी त्याला 'मोठा' ही पदवी दिली आहे.थोर सम्राट,असे त्याला संबोधण्यात येते.सायरस मोठा होता.

परंतु कशात? तो अहंकाराने मोठा होता; कारस्थाने गाजविण्यात मोठा होता;भोगलालसेत मोठा होता.इतर कशातही तो मोठा नव्हता.सायरसच्या जन्माविषयी, त्याच्या आरंभीच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पर्शियन दंतकथा सांगतात,की त्याच्या आईबापांस एक स्वप्न पडले.ते एक दुष्ट स्वप्न होते.ते स्वप्न सायरसविषयीचे होतेआईबापांनी भीतीने सायरसचा त्याग केला.त्याला त्यांनी रानावनात नेऊन सोडले.तिथे तो वास्तविक मरावयाचाच.परंतु एका कुत्रीने त्याला पाळले आणि अत्यंत आश्चर्यकारक रीतीने तो जगला, वाचला.

नंतर एका धनगराला तो आढळला.त्याने त्याला मुलगा म्हणून पाळले.तो मोठा झाला.पुढारीपणाचे गुण जन्मजातच त्याच्याजवळ होते.ते दिसून येऊ लागले.

पुढारी अर्थातच लोक समजतात,त्या अर्थान पुढारीपणाचे गुण म्हणजे पहिल्या नंबरचे दुष्ट असणे,गुंड असणे.

सायरसने स्वयंसेवकाचा संघ गोळा केला.आजोबा अस्त्यगस यांना त्याने पदच्युत केले,आणि मेडीज व पर्शिया यांचा तो राजा झाला.परंतु एवढ्याने त्याचे समाधान झाले नाही.सुखी व समाधानी अशा लहानशा राज्याचा राजा होऊन राहणे हे त्याला पुरेसे वाटेना.त्याची महत्त्वाकांक्षा अमर्याद होती.कॅन्सरच्या रोगाप्रमाणे,

काळपुळीप्रमाणे आपले साम्राज्य सर्व खंडभर पसरावे असे त्याला वाटत होते. अत्युष्ण कटिबंधापासून ते अती शीत कटिबंधापर्यंत आपले सम्राज्य पसरले पाहिजे असे त्याला वाटत होते,ते त्याला पर्शियाविषयी खूप प्रेम वाटत होते म्हणून नव्हे;पर्शियाचे नाव सर्वत्र व्हावे म्हणून नव्हे;

त्याला फक्त स्वतःविषयी प्रेम हाते.तो स्वतःचा पुजारी होता. त तृष्णांध होता,लालसोन्मत्त होता.सायरसने पर्शियाचे राज्य बळाकावले,त्याच्या आधी दहाच वर्षे क्रोशियस हा लीडियाचा राजा झाला होता. आशिया मायनरमधील ग्रीक वसाहतींच्या समुदायाला 'लीडिया' म्हणत.एजियन समुद्राच्या पूर्व बाजूस ह्या वसाहती पसरल्या होत्या.राजा क्रोशियस हा प्राचीन काळातील जणू कुबेर होता!प्राचीन काळातील जे.पी.मॉर्गन होता.स्वतःजवळच्या संपत्तीचा त्याला अत्यंत अभिमान होता.तो प्रत्येक देशातील यात्रेकरूंस बोलावी.हेतू हा,की त्यांनी आपल्या या संपत्तीची कीर्ती सर्वत्र न्यावी.तो त्या परदेशीय पाहुण्या समोर आपली सारी माणिकमोती,सारे जडजवाहीर मांडी आणि नंतर त्यांना विचारी, 


पृथ्वीवरील सर्वांहून सुखी प्राणी मी नाही का?" त्याच्या या अहंकारी प्रश्नाला ग्रीक तत्त्वज्ञानी सोलोन याने स्पष्ट उत्तर दिले होते,मनुष्य मेल्याशिवाय त्याला सुखी म्हणता येणार नाही. मनुष्य जन्मभर सुखी होता की दुःखी हे त्याच्या मरणकाळच्या स्थितीवरून कळते.जेव्हा सायरसने आपले दिग्विजय सुरू केले, तेव्हा क्रोशियसला मनात वाटले,की त्याच्याआधी आपणच दिग्विजयाची दौड मारावी म्हणून त्याने देवाला कौल लावून विचारले,इराणच्या सम्राटाबरोबर लढाई पुकारली तर ते शहाणपणाचे होईल की मूर्खपणाचे?परंतु देवाने नेहमीप्रमाणे दूयर्थी उत्तर दिले.देवाने सांगितले, जर तू सायरसच्याविरुद्ध जाशील तर मोठे साम्राज्य नष्ट करशील.'याचा अर्थ सायरसचे साम्राज्य नष्ट होईल किंवा स्वतः क्रोशियसच आपले साम्राज्य गमावील असा होतो.देवाने दिलेला निर्णय निर्दोष होता.या ना त्या बाजूने देवाचे म्हणणे खरेच होणार होते.देवाने दिलेला कौल नेहमीच खरा होत असतो.परंतु देवाने दिलेल्या उत्तराचा क्रोशियसने स्वतःला अनुकूल असा अर्थ लावला, क्रोशियसने असा अर्थ लावला,की,जर आपण सायरसशी लढाई केली,तर आपण विजयी होऊ व सायरसचे साम्राज्य रसातळास जाईल. 


समतोल विचारसरणीच्या व डोके शाबूत असलेल्या त्याच्या एका प्रधानाने युद्ध करू नका,असे सांगितले,

तो म्हणाला,युद्ध करून काहीही मिळणार नाही.उलट सारे गमावून बसाल.युद्ध ही भयंकर गोष्ट आहे,तशीच ती मूर्खपणाचीही आहे.युद्ध ही गोष्ट निसर्गाच्या

व्यवस्थेच्या विरुद्ध आहे.कारण युद्धामुळे बापांना मुलांची प्रेतक्रिया करावी लागते.वास्तविक मुलांनी वडिलांना मूठमाती द्यायची असते, परंतु युद्धामुळे हे असे विपरित प्रकार होतात.युद्ध ही अनैसर्गिक वस्तू आहे." परंतु क्रोशियसने तो उपदेश झिडकारला.त्याने सायरसवर स्वारी केली.त्याचा पराजय झाला. घाईघाईने तो आपल्या सार्डिस राजधानीस परत आला.परंतु सायरस पाठीवर होताच.त्याने सार्डिस शहराला वेढा घातला व फार त्रास न पडता ती राजधानी जिंकली.( मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन)


सायरसने क्रोशियसला कैद केले. आशियामायनरमधील ग्रीकांना शरण आणण्यासाठी हार्पागॉस (या नावाचा अर्थ 'लुटणारा' असा आहे.) नावाच्या आपल्या अधिकाऱ्यास मागे ठेवून सायरस पूर्वेस खाल्डिआकडे दिग्विजयार्थ निघाला.बांबिलोन ही खाल्डियाची राजधानी बाबिलोन अती सुंदर शहर होते.किती भव्य प्रासाद,किती उद्याने उपवने ! तेथील स्त्री-पुरुष अत्यंत सुसंस्कृत होते.लंडनच्या आकाराची पाच शहरे मावतील एवढा बाबिलोनचा विस्तार होता.आजच्या न्यूयॉर्कमधील सुधारणा व संस्कृती यांच्याशी शोभतील अशा तेथील सुधारणा व संस्कृती होत्या.बाबिलोनमध्ये न्यूयॉर्कपेक्षा धावपळ कमी असेल, गती, वेग जरा कमी असेल, परंतु सदभिरूची व सुसंस्कृतपणा यांत ते कमी नव्हते. ते शहर एका विस्तृत मैदानाच्या मध्यभागी वसलेले होते.शहराभोवती साठ मैल घेराच्या प्रचंड भिंती होत्या.त्या भिंतींना धातूंचे भक्कम दरवाजे होते.ते शहर चुना व पितळ यांच्या एखाद्या प्रचंड मनोऱ्याप्रमाणे आकाशात उंच गेले होते.शहरातील अत्यंत उंच अशा इमारतीहूनही उंच जागी शहरातील झुलत्या बागा होत्या. कृत्रिम बागांचे मजल्यावर मजले उभारण्यात आले होते.आधीचा राजा नेबुचद्रेझ्झर याने आकाशाला मिठी मारायला जाणारी अशी ती उद्यानांची इमारत उभारली होती.बागांचा फुलता-झुलता असा हा मनोरा मोठा अपूर्व होता.जणू फुललेल्या वृक्षवेलींचा घवघवीत असा प्रचंड पुष्पगुच्छ बाबिलोन शहर आकाशातील प्रभूच्या चरणी अर्पित होते.शहराच्या मध्य भागातून युफ्रेटिस नदी वाहात होती.तिच्यावर प्रचंड दगडी पूल होता.अफाट दळणवळणात व्यवस्था असावी म्हणून नदीखालूनही एक बोगदा होता.नदीच्या खालून व नदीच्या वरून असे हे रस्ते होते.नदीतीरावरच्या राजवाड्यात सुंदर ग्रंथालय होते.तिथे खाल्डियाचा ज्ञानोपासक राजा नबोनिडस आपल्या राष्ट्राच्या इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास करीत बसे;आणि मातीच्या विटांवर तो लिहून ठेवीत असे.युद्धाच्या गोष्टींपासून त्याचे विचार दूर होते.सभोवतालचे राजे युद्ध व कारस्थाने करीत असताना राजा नबोनिडस ज्ञानोपासनेत रमला होता.आणि अकस्मात सायरस आला! प्रचंड वादळाप्रमाणे तो आला. त्याने शहरातील सैनिकांना व भटाभिक्षुकांना लाचलुचपती दिल्या.ते धर्माधिकारी लाचलुचपतीला बळी पडले.फितुरीस यश आले. लढाई शिवायच सायरस राजधानीच्या दरवाज्यातून आत आला.बाबिलोनिया जिंकून सायरसने इजिप्तकडे दृष्टी वळविली.पहिले पाऊल म्हणून त्याने बाबिलोनमधील ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये परत पाठविले.बाबिलोनमध्ये

जवळजवळ सत्तर वर्षे हे ज्यू कैदी म्हणून राहात होते.त्यांना सायरस जणू उद्धारकर्ता वाटला ! परंतु सायरसने ज्यूंना त्यांची मातृभूमी परत दिली,ती उदारपणाने व निरपेक्षपणाने दिली नव्हती.पर्शियाच्या साम्राज्यशाही धोरणातील तो एक भाग होता.

पॅलेस्टाईनमध्ये मित्रराष्ट्र असण्याची सायरसाला फार जरूर होती. 


कारण घुसण्याचा मागचा दरवाजा म्हणजे पॅलेस्टाईन.

सायरसच्या डोळ्यांसमोर आयुष्यभर एकच ध्येय होते.ते म्हणजे साम्राज्यनिर्मितीचे.ही एकच महत्त्वाकांक्षा त्याला होती.पर्शियन साम्राज्याच्या बाहेर सूर्य कोठे प्रकाशणार नाही.एवढे मोठे साम्राज्य त्याला स्थापावयाचे होते.


परंतु इजिप्त जिंकून घेण्यापूर्वीच सायरस मारला गेला.

एका युद्धात तो स्वतः जातीने लढत होता. आपला भव्य देह त्याने शत्रूच्या शस्त्रास्त्रांसमोर उभा केला आणि तो ठार झाला.प्रदेश,आणखी प्रदेश,असे करणाऱ्या सायरसला शेवटी योग्य ते उत्तर मिळाले.त्याच्या तृप्त न होणाऱ्या तृष्णेला अंतिम जवाब मिळाला.सहा फूट लांबीच्या त्याच्या देहाला भरपूर पुरेल असा जमिनीचा तुकडा मिळाला.मर्त्यलोकींचा पुरेपूर वाटा त्याला लाभला.


सायरसने आरंभलेले दिग्विजयाचे कार्य त्याच्या मुलाने कंबायसिसने पुढे चालविले आणि कंबायसिसचे काम पुढे डरायसने हाती घेतले. कंबायसिसने इजिप्त उद्ध्वस्त केला,डरायसने बाबिलोनचा पुरा विध्वंस केला.एक हजार वर्षांची पुंजीभूत होत आलेली संस्कृती त्यांनी धुळीस मिळविली.त्या संस्कृतीला मागे खेचून पुन्हा आपल्या रानटीपणाशी त्यांनी ती आणून ठेवली.त्यांना यापेक्षा अधिक चांगले काही माहीत नव्हते.कारण ते वेडेपीर होते.सारे लष्करी आक्रमक-सायरस,अलेक्झांडर,हॅनिबॉल, सीझर, नेपोलियन सारे एकजात वेडेपीर होते, मूर्खशिरोमणी होते,ज्याचे म्हणून डोके ठिकाणावर असेल,तो कधीही आपल्याच मानवबंधूच्या कत्तली करून आपली कीर्ती वाढवावी अशी इच्छा करणारा नाही;रक्ताचे पाट वाहवून तो स्वतःचा गौरव वाढवू इच्छिणार नाही. आपले हे जग अद्याप अर्धवट रानटी स्थितीतच आहे.

अजूनही,दिग्विजय करू पाहणाऱ्या या भूतकाळातील खाटकांची आपण पूजा करीत असतो.मागील जेत्यांना आपण भजतो व आजचे जे जेते आहेत त्यांना तरुणांच्या डोळ्यांसमोर अनुकरणीय आदर्श म्हणून आपण ठेवतो. 


आपण जेव्हा खरोखर सुधारू,सुसंस्कृत होऊ,तेव्हा जग जिंकू पाहणाऱ्या या साऱ्या तलवारबहाद्दरांना आपण वेड्यांच्या दवाखान्यात ठेवू अत्याचारी अशा माथेफिरू वेड्यांच्यामध्ये त्यांना ठेवू,कारण या संहारकारी सैतानांचे खरे स्थान तेच होय.


ज्याने साम्राज्य मिळवले पण संस्कृती विध्वंसली असा सायरस…


३०/८/२४

नव्या भूमितीचे प्रणेते/Pioneers of New Geometry…

२८.०८.२४ या लेखातील शेवटचा दुसरा भाग..


त्यातच त्याचा मोठा मुलगा अचानक वारला. हा धक्का लोबॅचेव्हस्की पचवू शकला नाही. त्याचे केस अकाली पांढरे झाले.शरीरही खंगलं.कझानमध्ये त्याचं मन रमेना.यानंतर त्यानं कझान सोडलं आणि दूर एका शेतात घर घेऊन तो राहायला लागला.तिथे त्यानं (गणिताशी काहीही संबंध नसलेले) लोकरीच्या जातींवर बरेच प्रयोग केले आणि ते यशस्वीही झाले,एका नव्या युगाची सुरुवात करणारा हा 'भूमितीतला कोपर्निकस' २४ फेब्रुवारी १८५६ रोजी वयाच्या एकसष्टाव्या वर्षी मरण पावला तो एका नव्या क्रांतीची बीजं पेरूनच !


लोबॅचेव्हस्कीप्रमाणेच जानोस बोल्याई (१८०२-१८६९) यानंही गाऊसला अशाच प्रकारच्या नॉन-युक्लिडियन जॉमेट्रीबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला.पण गाऊसनं त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं.कोण होता हा जानोस बोल्याई ? गणितज्ञ गाऊस गॉर्टिजेनला असताना त्याची भेट हंगेरीहून आलेल्या फार्कस बोल्याई नावाच्या एका गणितज्ञाशी झाली.पुढे गाऊसची आणि फार्कस बोल्याईची घनिष्ठ मैत्रीही झाली. फार्कस बोल्याई खरं तर हा एक कवी, नाटककार आणि संगीतकार होता.पण तो एक चांगला गणितज्ञही होता.त्याला युक्लिडच्या भूमितीतलं पाचवं पॉस्च्युलेट सिद्ध करायचं होतं.

त्यानं त्याप्रमाणे एक सिद्धता सुद्धा लिहिली.पण गाऊसनं लगेचच त्यात चूक काढली.त्यामुळे निराश न होता फार्कस बोल्याईनं त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एक सिद्धता लिहिली.गाऊसनं तीही चुकीची ठरवली.कालांतरानं गाऊसनं पाचव्या पॉस्च्युलेट

ऐवजी वेगळाच दुसरा काहीतरी विचार सुरू केला आणि त्यामुळे त्याची आणि फार्कस बोल्याईची पाचव्या पॉस्च्युलेटवरची चर्चा थांबली.


फार्कस बोल्याई अतिशय नम्र असा माणूस होता. आपल्या मृत्यूनंतर आपल्या थडग्याजवळ एक सफरचंदाचं झाड लावावं अशी इच्छा त्यानं व्यक्त केली होती.या सफरचंदाच्या तीन फळांपैकी ॲडम आणि इव्ह या दोघांसाठी प्रत्येकी एक अशी दोन त्यांनी पृथ्वीचा नरक केल्याबद्दल असावीत आणि उरलेलं एक न्यूटनसाठी पृथ्वीचा परत स्वर्ग केल्याबद्दल असावं,अशी त्याची भन्नाट इच्छा आणि त्याहूनही भन्नाट त्यामागची कारणं होती !


१५ डिसेंबर १८०२ साली फार्कस बोल्याईला एक देखणा,निळ्या डोळ्यांचा आणि कुरळ्या केसांचा मुलगा झाला. त्याचं नाव बोल्याईनं जानोस ठेवलं.या मुलाला त्यानं स्वतःच अगदी लहानपणापासून गणित शिकवलं.१८१७ साली जानोसनं व्हिएन्ना इथल्या रॉयल कॉलेज ऑफ इंजिनिअर्स इथे प्रवेश घेतला.

बोल्याईनं जानोसला सेनेत जाता यावं म्हणून प्रशिक्षणही दिलं होतं. त्याप्रमाणे जानोस लष्करामध्ये अधिकारी झाला.जानोस अतिशय सुंदर व्हायोलिन वाजवे.एकदा तर त्यानं लष्करामधल्या १३ अधिकाऱ्यांबरोबर एक स्पर्धा लावली होती. १३ अधिकाऱ्यांनी गाणं म्हणायचं आणि जानोसनं व्हायोलिन वाजवायचं.या जुगलबंदीत जानोसनं या तेराही अधिकाऱ्यांना गारद केलं.


जानोसला आपल्या वडिलांची युक्लिडच्या  पाचव्या पॉस्च्युलेटबद्दलची महत्त्वाकांक्षा सुरुवातीपासूनच माहीत होती.बराच काळ तोही या युक्लिडच्या पाचव्या पॉस्च्युलेटवर विचार करण्यात घालवे.या अशक्यप्राय अशा युक्लिडच्या पॉस्च्युलेटच्या सिद्धतेवर जानोसनं वेळ घालवू नये अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. ते त्याप्रमाणे त्याला पत्रंही लिहीत.पण जानोसनं ऐकलं नाही. त्याला ते युक्लिडचं पाचवं पॉस्च्युलेट वेड लावत होतं.आपल्या मुलाचा हा ध्यास बघून फार्कस बोल्याई मात्र अस्वस्थ झाला.कारण त्याची स्वतःची उमेदीची वर्ष या पाचव्या पॉस्च्युलेटमुळे फुकट गेली होती.'कृपा करून हा नाद सोड. यानं तुझा वेळ जाईल, तुझी तब्येत खराब होईल, तुझी मनःशांती भंग होईल'असं तो आपल्या मुलाला सांगत असे.


शेवटी १८२० साली जानोस बोल्याईला युक्लिडच्या पाचव्या पॉस्च्युलेटपेक्षा वेगळं पॉस्च्युलेट धरूनही वेगळ्याच नॉन-युक्लिडियन जॉमेट्रीचा डोलारा उभा करता येतो हे लक्षात आलं आणि भूमितीत एक नवं दालन उघडलं गेलं आणि दोन हजार वर्षांच्या युक्लिडच्या थिअरीला तडे गेले.युक्लिडची भूमिती या नव्या भूमितीतली एक फक्त स्पेशल केस होती.१८३२-३३साली फार्कस बोल्याईनं गणितावरचे दोन खंडं प्रकाशित केले.यातल्या पहिल्या खंडात शेवटी परिशिष्टामध्ये जानोसनं 'सायन्स ऑफ ॲब्सोल्यूट स्पेस' नावाचा एक २६पानी निबंध लिहिला.या २६ पानांनी जानोस बोल्याईचं नाव गणितात अजरामर केलं !


बोल्याईनं युक्लिडच्या पाचव्या पॉस्च्युलेटवर प्लेफेअरच्या विचारांपासून सुरुवात केली. युक्लिडचं पाचवं पॉस्च्युलेट बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारांनी लिहिता येतं.त्यापैकी प्लेफेअरचं व्हर्शन असं की एखाद्या सरळ रेषेच्या बाहेरच्या कुठल्याही बिंदूपासून त्या रेषेला एक आणि एकच समांतर रेषा काढता येते.बोल्याईनं असं म्हटलं की समजा हे पॉस्च्युलेट खोटं आहे असं मानलं तर रेषेबाहेरच्या बिंदूतून दोन किंवा जास्त समांतर रेषा काढता आल्या पाहिजेत.

पण त्यासाठी आपल्याला सपाट पृष्ठभागाऐवजी वक्र पृष्ठभागाचा विचार करावा लागेल असा लोबेंचेव्हस्की

प्रमाणे त्यानंही विचार करायला सुरुवात केली.त्यानं मग युक्लिडच्या या पाचव्या पॉस्च्युलेटपेक्षा वेगळंच पॉस्च्युलेट मांडलं.त्याच्या पॉस्च्युलेटप्रमाणे कुठल्याही रेषेला त्या रेषेबाहेरच्या बिंदूतून एकापेक्षा जास्त समांतर रेषा काढता येत होत्या.त्यानं त्याच्या नव्या भूमितीचा डोलारा रचायला सुरुवात केली.

जानोसच्या या नव्या भूमितीत कुठलेच अडथळे किंवा परस्परविरोध येत नव्हते.जानोसनं ज्या वेळी आपली भूमिती शोधली त्या वेळी तो स्वतःच इतका भारावला की,'मी कसलाही आधार न घेता एक विलक्षण विश्व निर्माण केलं आहे' असं म्हणायला लागला.


जानोसचं संशोधन फार्कस बोल्याईनं गाऊसकडे पाठवलं. त्यावर गाऊसनं 'हे सगळं संशोधन अप्रतिम आहे,युगप्रवर्तक आहे याची मला कल्पना आहे.या संशोधनाची स्तुती करणं म्हणजे माझी स्वतःचीच स्तुती करण्यासारखं आहे.कारण बऱ्याच वर्षांपूर्वी मीही अशाच काही कल्पना लिहिल्या होत्या.

त्याच्याशी तुमच्या मुलाच्या कल्पना तंतोतंत जुळतात' असं उत्तर लिहिलं.गाऊसनं फार्कसच्या या समांतर रेषांसंबंधीच्या संशोधनातल्या दोन वेळा चुका काढलेल्या असल्यामुळे फार्कसला या वेळी आपल्या मुलाचं संशोधन गाऊसला पटलं याचा अफाट आनंद झाला.पण त्याच्या मुलाचा मात्र हिरमोड झाला.

कारण आपण काहीतरी नवीन शोधलंय असं त्याला वाटत होतं.पण गाऊसनं हे आधीच शोधलंय म्हटल्यावर तो हिरमुसला. 


बोल्याईची भूमिती बरीचशी लोबॅचेव्हस्कीप्रमाणेच असली तरी बोल्याईला मात्र याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यानं आपली भूमिती स्वतंत्रपणेच शोधली होती.बोल्याई,लोबॅचेव्हस्की आणि गाऊस या तिघांनी वेगवेगळ्या प्रकारे सपाट पृष्ठभाग आणि गोलाकार वक्र पृष्ठभाग यांच्यातल्या भूमितीतला फरक दाखवला आणि नव्या भूमितीचा पाया घातला.

गाऊस,बोल्याई आणि लोबॅचेव्हस्की यांनी जणू काही युक्लिडच्या भूमितीकडे बघण्याची काच काढून तिथे भिंग बसवलं.त्यामुळे सुरुवातीला साधी सरळ वाटणारी युक्लिडची भूमिती भिंगातून बघितल्या

प्रमाणे वेडीवाकडी दिसायला लागली.गाऊस, बोल्याई आणि लोबॅचेव्हस्की यांनी सपाट स्पेसची कल्पना झुगारून लावली आणि वक्र स्पेसची कल्पना आणली.लोबॅचेव्हस्कीच्या भूमितीप्रमाणेच जानोस बोल्याईची भूमितीही बराच काळ अज्ञातच राहिली.

१८६७ साली रिचर्ड बाल्टझर या गणितज्ञानं ती जगासमोर आणली आणि जगाला लोबॅचेव्हस्की बोल्याई यांच्याबद्दल कळलं.त्यामुळे १८९४ साली जानोस बोल्याईच्या उपेक्षित थडग्यापुढे त्याचा पुतळा उभारण्यात आला.लोबॅचेव्हस्कीच्या नावानंही १८९३-९४ साली एक फंड उभारला गेला.यातला काही भाग नवीन गणितज्ञांना बक्षीस देण्यासाठी वापरला गेला,तर काही भागातून कझान विद्यापीठासमोर लॅबोचेव्हस्कीचा पुतळा उभारला गेला.कित्येक वर्षांनी का होईना पण शेवटी निकोलस लोबॅचेव्हस्की आणि जानोस बोल्याई यांना अखेर न्याय मिळाला.


वाचणीय नोंद:-पॅगोडा : देवळाचे चित्र असलेले सोन्याचे नाणे. हिंदूंच्या देवळांना युरोपियन पॅगोडा म्हणत. म्हणून या होनाचे नाव पॅगोडा.सन १८१८ मध्ये एका पॅगोडाची किंमत ८ कास किंवा ४२ फलम होती.तो साडेतीन रुपयांबरोबर होता.फलम म्हणजे पुतळीपेक्षा कमी किमतीचे नाणे.याची किंमत तीन रुपये.१० फलम म्हणजे एक होन. एका पुतळीची किंमत चार रुपये.भारतातील सोन्याचे आणि चांदीचे असलेले हे नाणे मद्रासमध्ये १८१८ च्या सुमारास चलनात होते.८ कास म्हणजे १ फनम तर ८२ फनम म्हणजे एक पॅगोडा.त्यावर्षी रुपया हे प्रमाणभूत नाणे केले होते.म्हणून पॅगोडाची किंमत साडेतीन रुपये होती.२० कास म्हणजे १ फलूस तर ४ फलूस म्हणजे १ फनम.असे ४२ फनम म्हणजे १ पॅगोडा.विजयनगर,

अर्काट,मद्रास,डच,फ्रेंच आणि डॅनिश वसाहती यांची नाणी पॅगोडा म्हणून प्रचलित होती.विजयनगरच्या पॅगोडाचे वजन ३.३० ग्रॅम होतं.दक्षिण भारतात प्रचलित असलेले फनम हे लहान नाणे मल्याळममध्ये ते 'फनम' तर तमिळमध्ये 'पनम' म्हणून ओळखले जाई.संस्कृतमध्ये त्याला म्हणत 'पण'.दखनी भाषेत ते झाले फनम.प्राचीन काळापासून चलनात असलेले सोन्याचे हे नाणे नंतर चांदीचे झाले.( वाचता .. वाचता.. वेचलेले.)



२८/८/२४

लोबॅचेव्हस्की / बोल्याई Lobachevsky / Bolyai.

नव्या भूमितीचे प्रणेते…


नॉन-युक्लिडियन जॉमेट्रीचा पाया घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निकोलस लोबॅचेव्हस्कीचा जन्म रशियात १७९३ साली झाला.

त्याच्या आई-वडिलांनी पोलंडहून रशियात स्थलांतर केलं होतं. 


लोबॅचेव्हस्कीच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्याचे वडील वारले.तीन लहान मुलं पदरात असूनही लोबॅचेव्हस्कीची आई डगमगली नाही.गरिबीमुळे आपली मुलं अशिक्षित राहिली तर ते योग्य होणार नाही याची तिला कल्पना होती.तिन्ही मुलांना सुरुवातीला ती घरीच शिकवत असे.नंतर तिनं मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून प्रयत्न केले. शिष्यवृत्ती मिळाल्यावर तिनं त्यांना शाळेत दाखल केलं.या सगळ्यामुळे लोबॅचेव्हस्की वयाच्या आठव्या वर्षी शाळेत गेला.त्याला लॅटिन भाषेत आणि गणितात चांगलीच गती होती.लोबॅचेव्हस्कीच्या बुद्धिमत्तेमुळे शिक्षक प्रभावित झाले.याच सुमारास रशियातल्या कझान इथे एक नवीन विद्यापीठ सुरू झालं होतं.लोबॅचेव्हस्कीला आणि त्याच्या मोठ्या भावाला तिथे प्रवेश मिळाला आणि शिष्यवृत्तीही मिळाली.लोबॅचेव्हस्की जेव्हा विद्यापीठात शिकायला होता तेव्हा तिथे पुरेसे शिक्षकच नव्हते आणि जे थोडेसे होते त्यांनाही स्वतःच्या विषयाचं फारसं ज्ञान नव्हतं.याचा परिणाम म्हणजे सुरुवातीला

प्राध्यापकांना जर्मनीतून बोलवावं लागे.असं असलं तरी थोड्या कालावधीतच हे विद्यापीठ भरभराटीला आलं. लोबॅचेव्हस्कीनं खरं तर वैद्यकीय शिक्षणासाठी या विद्यापीठात प्रवेश मिळवला होता.पण त्याला गणिताची खूपच आवड होती. 


त्यामुळे त्यानं गणिताचा अभ्यासही चालू ठेवला.

कालांतरानं त्याचा गणित विभागातला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी असा बहुमानही करण्यात आला.हा बहुमान मिळाल्यावर मात्र लोबॅचेव्हस्कीचा अहंकार जागृत झाला.दुसऱ्याची टिंगलटवाळी करणं, शिक्षकांना चिडवून त्रास देणं असे उद्योग तो करायला लागला.

एकदा तर वर्गात त्यानं चक्क फटाके फोडले होते.

यामुळे कंटाळून जाऊन प्राध्यापकांनी त्याच्या विरुद्ध तक्रार केली.त्याला 'सर्वश्रेष्ठ विद्यार्थी' असा जो बहमान मिळाला होता तोही त्याच्याकडून काढून घेण्यात आला.त्याला कॉलेजमधून काढून टाकावं असाही विचार सुरू झाला. पण एवढ्या बुद्धिमान मुलाला कॉलेजमधून काढू नये असं तक्रार करणाऱ्या प्राध्यापकांनाच वाटल्यामुळे त्याला कॉलेजात ठेवलं गेलं.तिथे त्याला गणित शिकवायला एम. सी. बार्टेकस नावाचे एक जर्मन गृहस्थ होते.ते गाऊसला ओळखत असत.समांतर रेषांच्या युक्लिडच्या त्या पाचव्या गृहीतकावर गाऊस विचार करतोय हे या बार्टकसनंच लोबॅचेव्हस्कीला सांगितलं.


यामुळेच याविषयीचा किडा लोबॅचेव्हस्कीच्या डोक्यात वळवळायला लागला आणि त्यानं यावर सखोल विचार करायला सुरुवात केली.यानंतर त्यानं युक्लिडचं पाचवं (सेल्फ कन्सिस्टंट) अशी नॉन-युक्लिडियन जॉमेट्री रचली.सर्वसाधारणपणे ज्या वयात मुलं पदवी शिक्षणाला सुरुवात करतात त्या वयात लोबॅचेव्हस्की चक्क एम.ए. झाला. 


पण त्याच्या बेशिस्त आणि बेमुर्वतखोर वागण्याला कंटाळून जाऊन विद्यापीठानं त्याला पदवीच दिली नाही.लोबॅचेव्हस्कीनं आपल्या दुर्वर्तनाबद्दल माफी मागितली तेव्हा कुठे त्याला पदवी देण्याचा पुनर्विचार करण्यात आला.लोबॅचेव्हस्कीला विद्यापीठानं शिष्यवृत्ती दिली होती.त्यामुळे ती वाया घालवणंही शक्य नव्हतं.या सर्वांवर विद्यापीठाने एक वेगळाच पण भन्नाट असा निर्णय घेतला.त्यांना वाटलं या कुशाग्र बुद्धीच्या मुलाला वर्गात बसवून खोडकरपणा करायला वाव देण्याऐवजी त्याला प्राध्यापकच करावं,म्हणजे त्याचा वात्रटपणा कमी होऊन त्याच्या बुद्धीचा फायदाही सगळ्यांना होईल.अशा प्रकारे लोबॅचेव्हस्की वयाच्या चक्क अठराव्या वर्षी कझान विद्यापीठात प्राध्यापक बनला.आणि आश्चर्य म्हणजे जबाबदारी अंगावर पडताच लोबॅचेव्हस्कीनं आपला व्रात्यपणा सोडून देऊन अतिशय उत्कृष्टपणे काम करायला सुरुवात केली.


लोबॅचेव्हस्कीचा विद्यापीठाबरोबरचा करार सहाच वर्षांचा असला,तरी त्यानं तिथे पुढे तब्बल २२ वर्ष काम केलं! त्याची कार्यक्षमता अफाट होती.पुढे त्यानं चांगला प्रशासक म्हणूनही नाव कमावलं.१८१९ ते १८२५ या सहा वर्षात लोबॅचेव्हस्कीनं अक्षरशः ढोर मेहनत केली.वयाच्या फक्त एकविसाव्या वर्षी त्यानं कझान परिसरातल्या सगळ्या प्राथमिक,माध्यमिक शाळा आणि विद्यापीठं यांच्या आर्थिक आघाडीवरही काम केलं आणि तिथल्या मुलांची नोंद करण्याचं काम एकट्या लोबॅचेव्हस्कीनं केलं.याशिवाय लोबॅचेव्हस्कीला मुलांच्या एकंदरीत प्रगतीविषयी रिपोर्ट पाठवावे लागत.यात बहुतांशी मुलांची राजकीय मतं काय आहेत हे लोबॅचेव्हस्कीला लिहन पाठवावं लागे. वयाच्या अड्डठ्ठाविसाव्या वर्षी विद्यापीठातल्या सगळ्या वर्गांना तो गणित आणि भौतिकशास्त्र शिकवत असे. एवढं सगळं कमीच होतं म्हणून की काय पण ग्रंथपाल म्हणूनही तोच काम करे.त्यापूर्वी विद्यापीठाचं ग्रंथालय अतिशय अव्यवस्थित होतं.त्यातली पुस्तकं नीट लावण्याचं कामही लोबॅचेव्हस्कीनं एकट्यानं कोणाचीही मदत न घेता केले.एकदा एक माणूस त्याचं ग्रंथालय बघण्यासाठी आला असताना त्या वेळी लोबॅचेव्हस्की पुस्तक लावण्यात मग्न होता. त्याचे केस विस्कटलेले होते.त्याचा हा अवतार बघून त्या माणसाला लोबँचेव्हस्की ग्रंथालयातला नोकर असावा असं वाटलं.त्यामुळे त्यानं लोबॅचेव्हस्कीला चांगलं काम केल्याबद्दल बक्षिसीही दिली! कहर म्हणजे लोबॅचेव्हस्कीनं ती स्वीकारलीही। (गणिती- गणिताची आवड निर्माण करणारे एक रसिली सफर,अच्युत गोडबोले,डॉ.माधवी ठाकूरदेसाई, मनोविकास प्रकाशन)


लोबँचेव्हस्कीनं ग्रंथालयाबरोबरच विद्यापीठाचं अतिशय अस्ताव्यस्त असलेलं म्युझियमही नीट लावायला घेतलं. 


ग्रंथपालाबरोबर तो म्युझियमचा क्युरेटरही झाला.१८२५ साली झार अलेक्झांडरचा मृत्यू झाल्यावर सरकारनं नवा क्युरेटर नेमला आणि लोबॅचेव्हस्कीची म्युझियमच्या कामातून सुटका झाली.लोबॅचेव्हस्कीच्या विद्यापीठात राजकारण मात्र बरंच चालत असे.त्याला कंटाळून बरेचसे जर्मन प्राध्यापक विद्यापीठ सोडून गेले.त्यामुळे लोबॅचेव्हस्कीवर खूप जबाबदाऱ्या पडल्या. त्यानं त्याही चांगल्या प्रकारे निभावल्या. त्यामुळे अगदी लहान वयातच लोबॅचेव्हस्की विद्यापीठाचा मुख्य संचालक बनला.या पदाबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव लोबॅचेव्हस्कीला होती.त्यानं मन लावून काम केलं.त्याच्या कारकिर्दीत विद्यापीठ वाढलं, समृद्ध झालं आणि भरभराटीला आलं.


लोबॅचेव्हस्कीचं आपल्या विद्यापीठावर एवढं प्रेम होतं,की ज्या वेळी सरकारनं विद्यापीठाचं नूतनीकरण करायचं ठरवलं त्या वेळी लोबॅचेव्हस्कीनं स्वतः आर्किटेक्चर शिकून घेतलं आणि सगळ्या इमारतींचा आराखडा स्वतः तयार केला.त्यानं या इमारती नंतर इतक्या सुंदर बनवल्या की त्या सरकारी इमारती वाटूच नयेत ! लोबॅचेव्हस्कीनं स्वतः जातीनं लक्ष घातल्यामुळे या इमारतींना लागणारा खर्चही कमी झाला.लोबॅचेव्हस्की उत्कृष्ट व्यवस्थापक होता.१८६० मध्ये युरोपमध्ये कॉलऱ्याची साथ पसरली.सगळीकडे माणसं पटापट मरायला लागली.त्याबरोबर लोबॅचेव्हस्कीनं आपल्या विद्यापीठात आणि शहरात बाहेरच्या इतर माणसांना यायला बंदी केली. त्या काळी पुस्तकावरच्या बाइंडिंगमुळे कॉलरा पसरतो असा एक समज सर्वत्र पसरला होता.त्यामुळे त्यानं बाइंडिंग नसलेली हस्तलिखित पुस्तकं मागवली. कझान विद्यापीठाच्या वाचनालयात ती पुस्तकही निर्जंतुक केली जात असत.या सगळ्यांमुळे यूरोपभर,रशियात सगळीकडे कॉलरा पसरत असतानाही विद्यापीठ त्यातून वाचवलं.लोबॅचेव्हस्की अफाट काम करे.तो कधीही थकत नसे.


विद्यापीठातर्फे तो एक रिसर्च जर्नलही प्रकाशित करत असे.त्याचं नाव 'कझान मेसेंजर' असं होतं.युक्लिडच्या भूमितीला शह देणारी भूमिती त्यानं याच कझान मेसेंजरमध्ये १८२३-२४ मध्ये प्रकाशित केली.लोबॅचेव्हस्कीनं एक वेधशाळाही उभारली होती.एक व्लोबचेव्हस्कीकडे चांगली गुणग्राहकता होती.एकदा एका दुकानात काम करणारा माणूस गणिताचं पुस्तक वाचताना त्यानं बघितला.गणितावर प्रेम करणाऱ्या माणसाचं आयुष्य अस दुकानात काम करून फुकट जाऊ नये म्हणून त्यानं लगेच त्याला विद्यापीठात घेतलं.पुढे शिकून हा मुलगा भौतिकशास्त्राचा प्राध्यापक झाला. 


मजुरांसाठी गणिताचे वर्ग घेण्याची कल्पना लोबॅचेव्हस्कीच्याच डोक्यातून आली.


ज्या मुलाला वात्रटपणाबद्दल विद्यापीठातून काढून टाकणार होते,त्याच मुलानं विद्यापीठाची एवढी भरभराट केली हे बघून संस्थाचालक अचंबित झाले! लोबॅचेव्हस्कीनं संस्थेच्या विकासासाची स्वतःला वाहून घेतल्यामुळे त्याला पुढे गणितावर संशोधन करायला वेळच मिळाला नाही.त्यानं लग्नही चाळिसाव्या वर्षी केलं.


दुर्दैवानं १८४२ च्या सुमारास विद्यापीठाला आग लागली.त्यात त्याला अभिमान वाटणाऱ्या सगळ्या इमारती जळाल्या. इतकंच नाही तर त्याची अत्यंत आवडती वेधशाळाही जळून राख झाली.पण लोबॅचेव्हस्कीचा आशावाद एवढा दुर्दम्य होता की दोन वर्षांत त्यानं विद्यापीठ पुन्हा पहिल्यासारखं उभं केलं आणि आगीचं कुठे नामोनिशाणही राहिलं नाही.याच वर्षी गाऊसमुळे लोबॅचेव्हस्कीची रॉयल सोसायटी ऑफ गॉटिंजेन इथे त्याच्या नॉन-युक्लिडियन जॉमेट्रीवरच्या कामामुळे फॉरेन करस्पाँडंट म्हणून नेमणूक झाली.अतिशय व्यस्त असून आणि प्रशासकीय आणि शिकवण्याच्या कामाचं जबरदस्त ओझं स्वतःच्या डोक्यावर असूनही गणिताच्याच नाही तर माणसाच्याच इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी भूमिती लोबॅचेव्हस्कीनं शोधली हे विशेष !


लोबॅचेव्हस्कीचं हे छाती दडपून टाकणारं काम बघून त्याला सरकारकडून वाहवा मिळाली असेल किंवा त्याच्यावर बक्षिसांची खैरात झाली असेल असं कोणालाही वाटेल. पण लोबॅचेव्हस्कीला या सगळ्या कामाचा मोबदला म्हणून सरकारकडून 'त्याची सेवा आता नकोय' असं पत्र मिळालं.याचं कोणतंही कारण त्याला सरकारकडून सांगितलं गेलं नाही.


लोबॅचेव्हस्कीसारखा माणूस मिळणार नाही,त्याला काढू नका, असं त्याच्या सहकाऱ्यांनी पदोपदी सांगूनसुद्धा लोबॅचेव्हस्कीला घरी बसवलं गेलं.हा अपमान आणि ही वंचना सहन करणं लोबॅचेव्हस्कीच्या ताकदीपलीकडचं होतं. लोबॅचेव्हस्की त्यामुळे पूर्णपणे खचून गेला. ज्या संस्थेसाठी आपण आयुष्य वेचलं त्याच संस्थेपासून आपल्याला दूर राहावं लागणं ही कल्पनाच सहन करणं त्याला शक्य झालं नाही.


सेवामुक्तीनंतर लोबॅचेव्हस्कीला विद्यापीठात फार फार तर गणिताचा अभ्यास करण्याची मुभा मिळाली.यानंतर त्याच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली.हळूहळू त्याची दृष्टी अधू होत गेली.१८५५ साली कझान विद्यापीठानं सुवर्णजयंती साजरी केली.त्या वेळी झालेल्या समारंभात लोबॅचेव्हस्कीनं पँजिओमेट्री नावाचं आपलं संपूर्ण गणितावरचं एक पुस्तक सादर केलं. या वेळेपर्यंत तो पूर्णपणे आंधळा झाला होता.हे पुस्तक त्यानं दुसऱ्याकरवी लिहून घेतलं होतं.


पुढील शिल्लक राहिलेला भाग…३०.०८.२४ या दिवशीच्या लेखामध्ये…


वाचणीय नोंद:-अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत हुक्केरी हे एक मोठं शहर होतं. त्याच्या अंतर्गत अनेक छोटी शहरं होती.इथला महसूलही मोठा होता. शिवाय इतरही अनेक फायदे होते.इथल्या सुभेदाराला खूप सोयीसुविधा होत्या इथं. इथं सुभेदार म्हणून विजापूरच्या आदिलशहानं रूस्तुम इ जमानला नामजद केलं होतं.या भागात शिवाजीराजांच्या कुरबुरी वाढल्या होत्या. इथले काही प्रदेशही त्यांनी ताब्यात घेतले होते. अंगी असणारं धाडस आणि ते योजत असलेल्या नव नव्या युक्त्या यामुळं त्यांना सतत यश मिळत होतं.अनेक युक्त्या

प्रयुक्त्या करून ते शत्रूला बरोबर अडचणीत आणत असत.कधी गनिमीकाव्यानं तर कधी अगदी समोरासमोर हल्ला करत असत.प्रसंगी दोन पावलं मागंही जात असत.

ते आपल्या सैन्याला खूप जपत असेत विनाकारण त्यांचे प्राण संकटात टाकत नसे.कधी धूर्तपणाची खेळी करून तर कधी समोरच्या सरदाराला एखादं मोठं अमिष दाखवून ते आपला डाव साधत असत.त्यांची प्रत्येक चाल अगदी आश्चर्यकारक अशीच असे.रूस्तुम इ जमान मोठ्या सैन्यासह चालून येत असल्याच्या खबरा शिवाजीराजांना अगोदरच लागल्या होत्या.तरीही तो राज्याच्या सीमेपर्यंत येईतोवर त्यानी कोणतीही हालचाल केली नव्हती.त्याला अगदी सहज येऊ दिलं होतं. त्याच्या सैन्याला अन्न,पाणी,

घोड्यांना चारा कसलीही रसद मिळणार नाही अशा ठिकाणापर्यंत येऊ द्यायचं त्याचं धोरण होतं. अशी रसद त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता शिवाजी

राजांनी घेतली होती.जेव्हा आपल्या सैन्यासह रूस्तुम इ जमान अगदी जवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी आपला एक सरदार त्याच्याकडे पाठवला.या सरदारावर शिवाजीराजापाची कामगिरी सोपविली होती आणि तो रुस्तुम इ जमानचा मित्र होता.हा सरदार स्वराज्यात येण्यापूर्वी विजापूरच्या दरबारातच होता.त्याच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे त्याला तिथून हाकलून लावण्यात व्याल होत.नंतर तो शिवाजीराजांच्या आश्रयाला आला होता.हा सरदार अतिशय हुशार होता, चाणाक्ष होता.अशा वाटाघाटी करण्यात त्याचा हातखंडा होता.समोरच्याला तो आपल्याला हवा तसा निर्णय घ्यायला भाग पाडत असे असा त्याचा लौकिक होता.शत्रूला बोलतं करण्यात कुणीही त्याचा हात धरू शकत नव्हता. याला त्याच्यावर सोपविलेले काम नीट समजावून देत शिवाजीराजांनी शत्रुच्या गोटात पाठवून दिले. रूस्तुम इ जमाननं त्याचं अगदी प्रेमानं आगत स्वागत केलं.त्या दोघांत बराच वेळ बोलणीही झाली.शिवाजीराजांच्या सरदारानं आपल्याला हवं ते त्याच्या गळी उतरवलं.सद्यःस्थितीत शिवाजी

राजांवर विजय मिळवणं अतिशय कठीण आहे याचं भान ठेवून रूस्तुम इ जमाननं त्याच्याकडून आलेली ३०००० पॅगोडा ची भलीभक्कम रक्कम भेट म्हणून स्वीकारली आणि आपलं सैन्य मागं घेतलं.खरं तर अतिशय चातुर्यानं हा निर्णय घ्यायला त्याला भाग पाडण्यात आलं होतं. (५ मे १६६० च्या एका डच पत्रानुसार आपलं सैन्य मागं घेण्यासाठी रूस्तुमजमाननं शिवाजीराजांकडून ४०००० पॅगोडाची लाच घेतल्याचा उल्लेख आहे.) परंतु ही गोष्ट विजापूरच्या अदिलशहापासून फार दिवस लपून राहिली नाही.त्यानं रूस्तुम इ जमानला विजापुरच्या दरबारात बोलावून घेतलं आणि त्याचा शिरच्छेद केला.या सगळ्या घडामोडीत रूस्तुम इ जमानच्या मुलाचा हात नसल्याची खात्री पटल्यावर अदिलशहाने हुक्केरीचा सरदार म्हणून त्याची नियुक्ती केली. पण त्याच्या अधिकारावर मात्र मर्यादा घालण्यात आली रूस्तुम इ जमानकडे असणारे महसूल वसुलीचे आणि इतर महत्त्वाचे अधिकार बादशहानं काढून घेतले होते.यानंतर त्यानं दुसरा एक सरदार मोठ्या सैन्यासह शिवाजीराजांवर पाठवून दिला.शिवाजीशी लढाई करण्यासाठी त्याला सर्व त्या सुविधा पुरविल्या होत्या.


वाचता.. वाचता.. वेचलेले !!

२६/८/२४

सावधगिरीचा धडा - A lesson of caution !

जे शिकारी मोठ्या जनावरांच्या शिकारीमधल्या त्यांच्या अपयशाचं खापर नशीबावर फोडतात त्यांच्याशी मी अजिबात सहमत नाही.आपण नेहमी एक गोष्ट विसरतो की श्रवणशक्ती आणि नजर याबाबतीत वन्यपशू माणसापेक्षा कैकपटींनी वरचढ आहेत,त्यातही जे वन्यपशू अन्न व संरक्षण या बाबतीत ह्या दोन गोष्टींवर अवलंबून असतात ते जास्तच ! आपण त्यांच्या हालचाली पाहू किंवा ऐकू शकत नाही याचा आपण असा अर्थ घेतो की त्यांनीही आपल्याला ऐकलेलं किंवा पाहिलेलं नाही.

त्यांच्या या क्षमतेला कमी लेखणे आणि हालचाल तसेच आवाज न करता काही काळ सुद्धा बसता न येणे ही कारणं या अपयशांना जबाबदार असतात.या त्यांच्या क्षमतेचं एक उदाहरण म्हणून आणि त्यासाठी किती काळजी घेणं आवश्यक आहे हे समजावं म्हणून मी माझा अगदी अलीकडचा एक अनुभव तुम्हाला सांगणार आहे.


मार्चचा महिना होता.जमीनीवर पडलेल्या वाळलेल्या पानांच्या आच्छादनावर एखादं पान पडल्याचा आवाज सुद्धा मोठा येत होता अशा वेळी जंगलाच्या एका विशिष्ट भागात मला एका वाघाचा सुगावा लागला.या वाघाचे फोटोग्राफ मला फार दिवसांपासून घ्यायची इच्छा होती.

लंगूरच्या एका कळपाला वाघ पडून राह्यला होता त्या जागेकडे जायला भाग पाडून मला त्या वाघाची जागाही बरोबर समजली होती.वाघापासून साधारण सत्तर यार्डावर एक हिरवळीचा तुकडा होता.हा तुकडा पन्नास यार्ड लांब व तीस यार्ड रुंद होता.या तुकड्याच्या कडेलाच पण वाघाच्या विरुद्ध बाजूला एक मोठं झाड होतं व त्यावर काही वेली चढून अगदी शेंड्यापर्यंत गेल्या होत्या.

जमीनीपासून वीस फूटांवर खोडाला दोन फांद्या फुटल्या होत्या. त्या वाघाने सकाळीच एक सांबर मारलं होतं आणि ते सांबर व त्याची आताची जागा याच्या मध्येच तो हिरवळीचा तुकडा असल्याने तो वाघ दुपारी ती हिरवळ ओलांडणार हे मला नक्की माहीत होतं. भक्ष्याच्या जवळपास दुपारभर पडून राहण्यासारखी दाट झाडी नव्हती व त्यामुळे तो हिरवळ ओलांडून तिकडच्या झुडुपांमध्ये सावलीसाठी गेला होता.याच ठिकाणी मी त्याला लंगूरच्या साहाय्याने शोधून काढलं होतं.वाघ बिबळ्यांसारख्या मांसभक्षी प्राण्याची शिकार किंवा फोटोग्राफी करायची असेल तर त्यांची जागा बरोबर माहीत असणं आवश्यक असतं आणि यासाठी उत्तम मार्ग म्हणजे पक्षी व प्राण्यांची मदत घेणे.जर संयम असेल आणि जंगलवासींच्या सवयीचं ज्ञान असेल तर त्या प्राण्याला किंवा पक्ष्यांना आपण आपल्याला पाहिजे त्या दिशेला जायला भाग पाडू शकतो.यासाठी योग्य असे पक्षी म्हणजे रानकोंबडे,मोर,व्हाईट कॅप्ड बॅब्लर्स (सातभाईंची एक जात, मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन)

आणि प्राण्यांमध्ये भेकर किंवा लंगूर.


अतिशय काळजीपूर्वक दबकत दबकत मी झाडापर्यंत गेलो.खालून वर गेलेल्या वेलींची टोकं वाघ जिथे होता तिथून दिसू शकत होती त्यामुळे वेलींना अजिबात धक्का न लावता मी फांद्या फुटल्या होत्या तिथपर्यंत चढलो.या ठिकाणी मला बसायला बऱ्यापैकी जागाही होती व चांगलं लपणही होतं.

आता मी माझा १६ एमएमचा कॅमेरा काढला व समोरच्या पानोळ्यामधे जरा फट तयार करून अजिबात आवाज न करता बसून राह्यलो.मला त्या फटीतून फक्त समोरची हिरवळ आणि त्याच्या पलीकडच्या जंगलाचा थोडा भाग दिसत होता.

जवळजवळ तासाभरानंतर ब्रॉन्झविंग्ड डोव्हजची एक जोडी त्या जंगलातून अचानक वर उडाली व पंख फडफडवत झुडुपांवरून निघून गेली आणि त्यानंतर मिनिटा दोन मिनिटांनी मगाच्या जागेपासून काही अंतर माझ्या दिशेला अपलँड पिपिट्सचा छोटा थवा जमीनीवरून उडाला,एका निष्पर्ण झाडाच्या फांद्यावर इकडून तिकडे उड्या मारत शेंड्यावर गेला व नंतर तिथून दूर उडून गेला.


या दोन्ही पक्ष्यांना स्वतःचा विशिष्ट असा अलार्म कॉल नाही,पण त्यांच्या वागणुकीवरून सहज कळत होतं की वाघाने झोपण्याची जागा सोडली आहे.मी माझी नजर सावकाश डावीकडून उजवीकडे फिरवायला सुरुवात केली तेव्हा ती एका छोट्या पांढऱ्या वस्तूवर स्थिर झाली.हिरवळीपासून दहा फुटांवर असलेली ती वस्तू एखाद दुसरा चौरस इंच एवढी असेल.यानंतर मी दृष्टीक्षेत्राच्या अगदी उजव्या कडेपर्यंत नजर फिरवली व परत त्या पांढऱ्या वस्तूवर स्थिर केली.काही सेकंदापूर्वी ती वस्तू ज्या ठिकाणी होती तिथे ती आता नाही हे माझ्या लक्षात आलं... वाघाच्या चेहऱ्यावरच्या पांढऱ्या खुणेशिवाय ते दुसरं काही असूच शकत नव्हतं.नक्कीच... मी झाडाकडे येत असताना किंवा चढत असताना मला वाघाने पाहिलं असणार.मी पातळ रबरी सोलचे बूट घातले होते आणि माझ्या परीने अजिबात आवाज न करण्याचा प्रयत्न केला होता.तरीही जेव्हा त्याची भक्ष्याकडे जाण्याची वेळ झाली तेव्हा त्याने दबकत जवळ येऊन त्याला संशय होता त्या जागेचं परत निरीक्षण केलं होतं व त्या संशयाचं मूळ शोधत होता.त्याच स्थितीत अर्धा तास थांबल्यावर तो उठला.हातपाय ताणले,जांभई दिली आणि आता भीती नाही याची खात्री झाल्यानंतर हिरवळीकडे चालत आला.

इथे तो उभा राह्यला,एकदा उजवीकडे तर एकदा डावीकडे तोंड करून त्याने नीट निरीक्षण केलं आणि सावकाशपणे हिरवळ ओलांडायला सुरुवात केली.माझ्याबरोबर खालून तो त्याच्या भक्ष्याकडे गेला.


जंगलात भटकंती करताना मला जेव्हा शिकाऱ्यांनी मचाणं बांधण्यासाठी तोडलेले वासे,नीट दिसावं म्हणून तोडलेल्या फांद्या,खालचा पालापाचोळा दिसावा आणि हे सर्व करताना किती आवाज झाला असेल याचा मनात विचार येतो तेव्हा कळतं की इतक्या वेळा मचाणांवर रात्री जागून त्यांना अपयश का येतं ! आम्हाला आजपर्यंत नरभक्षक बिबळ्याला मारण्यात आलेलं अपयश मात्र नको त्या गोष्टी केल्याने किंवा काही करायचं राहून गेल्यामुळे आलं नव्हतं,तर खरोखरच ते नशीबाचे खेळ होते.माझ्यासाठी पाठवलेला शूटींग लाईट वेळेवर न पोचणे,इबॉटसनच्या पायाला मोक्याच्या क्षणी पेटके येणे,बिबळ्याने सायनाईडचा ओव्हरडोस घेणे आणि आता यावेळेला आमच्या माणसांकडून जिन ट्रॅप खाली पडून त्याचा दात तुटणे याला दुसरं काय म्हणणार?तरीही इबॉटसन पौरीला निघून गेल्यावरही माझ्या आशा शाबूत होत्या कारण आता मला माझ्या शत्रूच्या क्षमतांचा बरोबर अंदाज आला होता.


एक गोष्ट मात्र मला राहून राहून अस्वस्थ करत होती ते म्हणजे ब्रिज बंद करून त्या बिबळ्याला नदीच्या एकाच बाजूला स्थानबद्ध करणे.कोणत्याही दृष्टीकोनातून बघितलं तरी असं करणं म्हणजे डाव्या तीरावरच्या माणसांना नरभक्षकाच्या तोंडी देण्यासारखं व उजव्या तीरावरच्या माणसांना मात्र सुरक्षित ठेवण्यासारखं होतं.


यावेळी आम्ही रुद्रप्रयागला येण्याच्या अगोदर बळी गेलेल्या मुलाला धरून गेल्या काही दिवसांत डाव्या तीरावरच्या तीन लोकांनी आपला जीव गमावला होता व याहीपुढे अशी शक्यता होतीच.तरीही दोन ब्रिज मोकळे करून बिबळ्याला उजव्या तीरावर यायची परवानगी देणे म्हणजे अगोदरच डोंगराएवढ्या असलेल्या आमच्या अडचणींमध्ये दुपटीने भर टाकण्यासारखंच होतं आणि त्याचा फायदा काहीच होणार नव्हता.बळी कुठेही जावो पण दोन्हीकडच्या माणसांच्या आयुष्याचं मोल सारखंच होतं त्यामुळे शेवटी मन घट्ट करून मी ब्रिज बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला.इथे मला डाव्या तीरावरच्या शूर पहाडी माणसांचं कौतुक करावंसं वाटतं.ब्रिज बंद केल्या नंतरचे परिणाम माहीत असून देखील कोणीही त्याचा निषेध केला नाही किंवा ब्रिज मोकळे करण्याची साधी विनंतीही केली नाही.


एकदा दोन्ही पूल बंद केल्यावर मी आसपासच्या सर्व गावांमध्ये धोक्याची व खबरदारीची सूचना देण्यासाठी एक माणूस पाठवला व स्वतःही जितकी पायपीट शक्य होईल तेवढी केली.प्रत्येक ठिकाणी मला पहाडी पाहुणचाराचा अनुभव आला. नरभक्षकाचा पुढचा बळी त्यांच्यापैकीच एखाद्याचा असणार होता याची जाणीव असून देखील त्यांची श्रद्धा अढळ होती की नरभक्षक काल मेला नाही म्हणून काय झालं? तो आज नाहीतर उद्या तरी खतम् होणारच.