ज्या राष्ट्रांनी ज्ञानदेवांची,धर्म-प्रेषितांची थोर विभूती म्हणून,हेच खरे महावीर म्हणून पूजा केली अशा राष्ट्रांचे आपण धावते दर्शन घेतले.आता आपण अशा एका देशाकडे वळू या,की जेथे योद्धा म्हणजेच परमश्रेष्ठ मनुष्य मानला जाई,जेथे विषयलंपटता,पशुता व स्वार्थ हेच परमोच्च सद्गुण मानवी सद्गुण मानले जात. हिंदुस्थान व चीन यांना इतर आशियापासून अलग करणाऱ्या पर्वतांना ओलांडून आपण पलीकडे जाऊ या.आपण पश्चिमेकडे जाऊ या. ते पहा इराणचे मैदान.आपण मागे पाहिले आहे, की काही आर्यशाखा येथे वसाहती करून राहिल्या होत्या.या सर्व शाखांना 'मेडीज' किंवा 'पर्शियन' असे संबोधण्यात येते.हे अर्धवट जंगली,साहसी,रक्ततृषार्त असे लोक होते.
पायांपासून डोक्यापर्यंत ते कातड्यांचा पोशाख करीत,
अती ओबडधोबड असे अन्न खात.दोनच गोष्टी ते शिकत.घोड्यांवर बसणे व लढणे, शांततेने शेती किंवा व्यापार करणे ही गोष्ट त्यांना कमीपणाची वाटे.त्यांना ज्या गोष्टीची जरूर वाटे, ती ते खुशाल लुटीत.
स्वतःला लागणाऱ्या वस्तू जे विकत घेत,त्यांना ते दुबळे म्हणून संबोधित;बावळट म्हणून ते त्यांचा उपहास करीत.सर्वत्र लूटमार करीत ते दौडू लागले.
ठायीठायी त्यांनी पुरे-पट्टणे धुळीस मिळविली.सारे आशिया खंड उध्वस्त व दग्ध नगरांच्या धुळीने व राखेने भरून गेले.आतापर्यंत एवढे मोठे साम्राज्य कोणी मिळविले नव्हते,अशी शेखी ते मारू लागले.
प्रचंड साम्राज्य बांधणारे मेडीज हे पहिले होत.त्याचे अनुकरण पर्शियाने केले.खि.पू.६०६ मध्ये मेडीज लोकांनी निनवी शहर घेतले. असीरियन लोकांची सत्ता त्यांनी कायमची नष्ट केली.भूतलावरून त्यांनी त्यांचे उच्चाटन केले. त्यानंतर छप्पन वर्षांनी सम्राट सायरस पुढे आला.सायरसने मेडिजी लोकांच्या वैभवाचा बुडबुडा फोडला.पर्शियाच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षाच्या मोठ्या बुडबुड्याचा धक्का लागून मीडियन सत्तेचा बुडबुडा नष्ट झाला.ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकाच्या मध्याला ही गोष्ट झाली. यात शतकात चीनमध्ये आणि हिंदुस्थानात लाओत्से,कन्फ्युसियस व बुद्ध झाले.इतिहासाच्या ग्रंथातून या तीन शांती प्रधान महात्म्यांविषयी फारसे लिहिलेले नसते.कारण ते रणधुमाळी वाजवणारे नव्हते.ते स्वप्नसृष्टित रमणारे अवलिय होते प्रचंड सैन्य घेऊन त्यांनी कधी राष्ट्रावर स्वाऱ्या केल्या नाहीत.परंतु सायरस आदळआपट करणारा वीर होता.तो जागतिक साम्राज्याचा निर्माता होता.तो आपल्या पायांखाली सारे आशिया खंड तुडविणारा सेनानी होता.यासाठी मूर्ख इतिहासकारांनी त्याला 'मोठा' ही पदवी दिली आहे.थोर सम्राट,असे त्याला संबोधण्यात येते.सायरस मोठा होता.
परंतु कशात? तो अहंकाराने मोठा होता; कारस्थाने गाजविण्यात मोठा होता;भोगलालसेत मोठा होता.इतर कशातही तो मोठा नव्हता.सायरसच्या जन्माविषयी, त्याच्या आरंभीच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पर्शियन दंतकथा सांगतात,की त्याच्या आईबापांस एक स्वप्न पडले.ते एक दुष्ट स्वप्न होते.ते स्वप्न सायरसविषयीचे होतेआईबापांनी भीतीने सायरसचा त्याग केला.त्याला त्यांनी रानावनात नेऊन सोडले.तिथे तो वास्तविक मरावयाचाच.परंतु एका कुत्रीने त्याला पाळले आणि अत्यंत आश्चर्यकारक रीतीने तो जगला, वाचला.
नंतर एका धनगराला तो आढळला.त्याने त्याला मुलगा म्हणून पाळले.तो मोठा झाला.पुढारीपणाचे गुण जन्मजातच त्याच्याजवळ होते.ते दिसून येऊ लागले.
पुढारी अर्थातच लोक समजतात,त्या अर्थान पुढारीपणाचे गुण म्हणजे पहिल्या नंबरचे दुष्ट असणे,गुंड असणे.
सायरसने स्वयंसेवकाचा संघ गोळा केला.आजोबा अस्त्यगस यांना त्याने पदच्युत केले,आणि मेडीज व पर्शिया यांचा तो राजा झाला.परंतु एवढ्याने त्याचे समाधान झाले नाही.सुखी व समाधानी अशा लहानशा राज्याचा राजा होऊन राहणे हे त्याला पुरेसे वाटेना.त्याची महत्त्वाकांक्षा अमर्याद होती.कॅन्सरच्या रोगाप्रमाणे,
काळपुळीप्रमाणे आपले साम्राज्य सर्व खंडभर पसरावे असे त्याला वाटत होते. अत्युष्ण कटिबंधापासून ते अती शीत कटिबंधापर्यंत आपले सम्राज्य पसरले पाहिजे असे त्याला वाटत होते,ते त्याला पर्शियाविषयी खूप प्रेम वाटत होते म्हणून नव्हे;पर्शियाचे नाव सर्वत्र व्हावे म्हणून नव्हे;
त्याला फक्त स्वतःविषयी प्रेम हाते.तो स्वतःचा पुजारी होता. त तृष्णांध होता,लालसोन्मत्त होता.सायरसने पर्शियाचे राज्य बळाकावले,त्याच्या आधी दहाच वर्षे क्रोशियस हा लीडियाचा राजा झाला होता. आशिया मायनरमधील ग्रीक वसाहतींच्या समुदायाला 'लीडिया' म्हणत.एजियन समुद्राच्या पूर्व बाजूस ह्या वसाहती पसरल्या होत्या.राजा क्रोशियस हा प्राचीन काळातील जणू कुबेर होता!प्राचीन काळातील जे.पी.मॉर्गन होता.स्वतःजवळच्या संपत्तीचा त्याला अत्यंत अभिमान होता.तो प्रत्येक देशातील यात्रेकरूंस बोलावी.हेतू हा,की त्यांनी आपल्या या संपत्तीची कीर्ती सर्वत्र न्यावी.तो त्या परदेशीय पाहुण्या समोर आपली सारी माणिकमोती,सारे जडजवाहीर मांडी आणि नंतर त्यांना विचारी,
पृथ्वीवरील सर्वांहून सुखी प्राणी मी नाही का?" त्याच्या या अहंकारी प्रश्नाला ग्रीक तत्त्वज्ञानी सोलोन याने स्पष्ट उत्तर दिले होते,मनुष्य मेल्याशिवाय त्याला सुखी म्हणता येणार नाही. मनुष्य जन्मभर सुखी होता की दुःखी हे त्याच्या मरणकाळच्या स्थितीवरून कळते.जेव्हा सायरसने आपले दिग्विजय सुरू केले, तेव्हा क्रोशियसला मनात वाटले,की त्याच्याआधी आपणच दिग्विजयाची दौड मारावी म्हणून त्याने देवाला कौल लावून विचारले,इराणच्या सम्राटाबरोबर लढाई पुकारली तर ते शहाणपणाचे होईल की मूर्खपणाचे?परंतु देवाने नेहमीप्रमाणे दूयर्थी उत्तर दिले.देवाने सांगितले, जर तू सायरसच्याविरुद्ध जाशील तर मोठे साम्राज्य नष्ट करशील.'याचा अर्थ सायरसचे साम्राज्य नष्ट होईल किंवा स्वतः क्रोशियसच आपले साम्राज्य गमावील असा होतो.देवाने दिलेला निर्णय निर्दोष होता.या ना त्या बाजूने देवाचे म्हणणे खरेच होणार होते.देवाने दिलेला कौल नेहमीच खरा होत असतो.परंतु देवाने दिलेल्या उत्तराचा क्रोशियसने स्वतःला अनुकूल असा अर्थ लावला, क्रोशियसने असा अर्थ लावला,की,जर आपण सायरसशी लढाई केली,तर आपण विजयी होऊ व सायरसचे साम्राज्य रसातळास जाईल.
समतोल विचारसरणीच्या व डोके शाबूत असलेल्या त्याच्या एका प्रधानाने युद्ध करू नका,असे सांगितले,
तो म्हणाला,युद्ध करून काहीही मिळणार नाही.उलट सारे गमावून बसाल.युद्ध ही भयंकर गोष्ट आहे,तशीच ती मूर्खपणाचीही आहे.युद्ध ही गोष्ट निसर्गाच्या
व्यवस्थेच्या विरुद्ध आहे.कारण युद्धामुळे बापांना मुलांची प्रेतक्रिया करावी लागते.वास्तविक मुलांनी वडिलांना मूठमाती द्यायची असते, परंतु युद्धामुळे हे असे विपरित प्रकार होतात.युद्ध ही अनैसर्गिक वस्तू आहे." परंतु क्रोशियसने तो उपदेश झिडकारला.त्याने सायरसवर स्वारी केली.त्याचा पराजय झाला. घाईघाईने तो आपल्या सार्डिस राजधानीस परत आला.परंतु सायरस पाठीवर होताच.त्याने सार्डिस शहराला वेढा घातला व फार त्रास न पडता ती राजधानी जिंकली.( मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन)
सायरसने क्रोशियसला कैद केले. आशियामायनरमधील ग्रीकांना शरण आणण्यासाठी हार्पागॉस (या नावाचा अर्थ 'लुटणारा' असा आहे.) नावाच्या आपल्या अधिकाऱ्यास मागे ठेवून सायरस पूर्वेस खाल्डिआकडे दिग्विजयार्थ निघाला.बांबिलोन ही खाल्डियाची राजधानी बाबिलोन अती सुंदर शहर होते.किती भव्य प्रासाद,किती उद्याने उपवने ! तेथील स्त्री-पुरुष अत्यंत सुसंस्कृत होते.लंडनच्या आकाराची पाच शहरे मावतील एवढा बाबिलोनचा विस्तार होता.आजच्या न्यूयॉर्कमधील सुधारणा व संस्कृती यांच्याशी शोभतील अशा तेथील सुधारणा व संस्कृती होत्या.बाबिलोनमध्ये न्यूयॉर्कपेक्षा धावपळ कमी असेल, गती, वेग जरा कमी असेल, परंतु सदभिरूची व सुसंस्कृतपणा यांत ते कमी नव्हते. ते शहर एका विस्तृत मैदानाच्या मध्यभागी वसलेले होते.शहराभोवती साठ मैल घेराच्या प्रचंड भिंती होत्या.त्या भिंतींना धातूंचे भक्कम दरवाजे होते.ते शहर चुना व पितळ यांच्या एखाद्या प्रचंड मनोऱ्याप्रमाणे आकाशात उंच गेले होते.शहरातील अत्यंत उंच अशा इमारतीहूनही उंच जागी शहरातील झुलत्या बागा होत्या. कृत्रिम बागांचे मजल्यावर मजले उभारण्यात आले होते.आधीचा राजा नेबुचद्रेझ्झर याने आकाशाला मिठी मारायला जाणारी अशी ती उद्यानांची इमारत उभारली होती.बागांचा फुलता-झुलता असा हा मनोरा मोठा अपूर्व होता.जणू फुललेल्या वृक्षवेलींचा घवघवीत असा प्रचंड पुष्पगुच्छ बाबिलोन शहर आकाशातील प्रभूच्या चरणी अर्पित होते.शहराच्या मध्य भागातून युफ्रेटिस नदी वाहात होती.तिच्यावर प्रचंड दगडी पूल होता.अफाट दळणवळणात व्यवस्था असावी म्हणून नदीखालूनही एक बोगदा होता.नदीच्या खालून व नदीच्या वरून असे हे रस्ते होते.नदीतीरावरच्या राजवाड्यात सुंदर ग्रंथालय होते.तिथे खाल्डियाचा ज्ञानोपासक राजा नबोनिडस आपल्या राष्ट्राच्या इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास करीत बसे;आणि मातीच्या विटांवर तो लिहून ठेवीत असे.युद्धाच्या गोष्टींपासून त्याचे विचार दूर होते.सभोवतालचे राजे युद्ध व कारस्थाने करीत असताना राजा नबोनिडस ज्ञानोपासनेत रमला होता.आणि अकस्मात सायरस आला! प्रचंड वादळाप्रमाणे तो आला. त्याने शहरातील सैनिकांना व भटाभिक्षुकांना लाचलुचपती दिल्या.ते धर्माधिकारी लाचलुचपतीला बळी पडले.फितुरीस यश आले. लढाई शिवायच सायरस राजधानीच्या दरवाज्यातून आत आला.बाबिलोनिया जिंकून सायरसने इजिप्तकडे दृष्टी वळविली.पहिले पाऊल म्हणून त्याने बाबिलोनमधील ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये परत पाठविले.बाबिलोनमध्ये
जवळजवळ सत्तर वर्षे हे ज्यू कैदी म्हणून राहात होते.त्यांना सायरस जणू उद्धारकर्ता वाटला ! परंतु सायरसने ज्यूंना त्यांची मातृभूमी परत दिली,ती उदारपणाने व निरपेक्षपणाने दिली नव्हती.पर्शियाच्या साम्राज्यशाही धोरणातील तो एक भाग होता.
पॅलेस्टाईनमध्ये मित्रराष्ट्र असण्याची सायरसाला फार जरूर होती.
कारण घुसण्याचा मागचा दरवाजा म्हणजे पॅलेस्टाईन.
सायरसच्या डोळ्यांसमोर आयुष्यभर एकच ध्येय होते.ते म्हणजे साम्राज्यनिर्मितीचे.ही एकच महत्त्वाकांक्षा त्याला होती.पर्शियन साम्राज्याच्या बाहेर सूर्य कोठे प्रकाशणार नाही.एवढे मोठे साम्राज्य त्याला स्थापावयाचे होते.
परंतु इजिप्त जिंकून घेण्यापूर्वीच सायरस मारला गेला.
एका युद्धात तो स्वतः जातीने लढत होता. आपला भव्य देह त्याने शत्रूच्या शस्त्रास्त्रांसमोर उभा केला आणि तो ठार झाला.प्रदेश,आणखी प्रदेश,असे करणाऱ्या सायरसला शेवटी योग्य ते उत्तर मिळाले.त्याच्या तृप्त न होणाऱ्या तृष्णेला अंतिम जवाब मिळाला.सहा फूट लांबीच्या त्याच्या देहाला भरपूर पुरेल असा जमिनीचा तुकडा मिळाला.मर्त्यलोकींचा पुरेपूर वाटा त्याला लाभला.
सायरसने आरंभलेले दिग्विजयाचे कार्य त्याच्या मुलाने कंबायसिसने पुढे चालविले आणि कंबायसिसचे काम पुढे डरायसने हाती घेतले. कंबायसिसने इजिप्त उद्ध्वस्त केला,डरायसने बाबिलोनचा पुरा विध्वंस केला.एक हजार वर्षांची पुंजीभूत होत आलेली संस्कृती त्यांनी धुळीस मिळविली.त्या संस्कृतीला मागे खेचून पुन्हा आपल्या रानटीपणाशी त्यांनी ती आणून ठेवली.त्यांना यापेक्षा अधिक चांगले काही माहीत नव्हते.कारण ते वेडेपीर होते.सारे लष्करी आक्रमक-सायरस,अलेक्झांडर,हॅनिबॉल, सीझर, नेपोलियन सारे एकजात वेडेपीर होते, मूर्खशिरोमणी होते,ज्याचे म्हणून डोके ठिकाणावर असेल,तो कधीही आपल्याच मानवबंधूच्या कत्तली करून आपली कीर्ती वाढवावी अशी इच्छा करणारा नाही;रक्ताचे पाट वाहवून तो स्वतःचा गौरव वाढवू इच्छिणार नाही. आपले हे जग अद्याप अर्धवट रानटी स्थितीतच आहे.
अजूनही,दिग्विजय करू पाहणाऱ्या या भूतकाळातील खाटकांची आपण पूजा करीत असतो.मागील जेत्यांना आपण भजतो व आजचे जे जेते आहेत त्यांना तरुणांच्या डोळ्यांसमोर अनुकरणीय आदर्श म्हणून आपण ठेवतो.
आपण जेव्हा खरोखर सुधारू,सुसंस्कृत होऊ,तेव्हा जग जिंकू पाहणाऱ्या या साऱ्या तलवारबहाद्दरांना आपण वेड्यांच्या दवाखान्यात ठेवू अत्याचारी अशा माथेफिरू वेड्यांच्यामध्ये त्यांना ठेवू,कारण या संहारकारी सैतानांचे खरे स्थान तेच होय.
ज्याने साम्राज्य मिळवले पण संस्कृती विध्वंसली असा सायरस…