जे शिकारी मोठ्या जनावरांच्या शिकारीमधल्या त्यांच्या अपयशाचं खापर नशीबावर फोडतात त्यांच्याशी मी अजिबात सहमत नाही.आपण नेहमी एक गोष्ट विसरतो की श्रवणशक्ती आणि नजर याबाबतीत वन्यपशू माणसापेक्षा कैकपटींनी वरचढ आहेत,त्यातही जे वन्यपशू अन्न व संरक्षण या बाबतीत ह्या दोन गोष्टींवर अवलंबून असतात ते जास्तच ! आपण त्यांच्या हालचाली पाहू किंवा ऐकू शकत नाही याचा आपण असा अर्थ घेतो की त्यांनीही आपल्याला ऐकलेलं किंवा पाहिलेलं नाही.
त्यांच्या या क्षमतेला कमी लेखणे आणि हालचाल तसेच आवाज न करता काही काळ सुद्धा बसता न येणे ही कारणं या अपयशांना जबाबदार असतात.या त्यांच्या क्षमतेचं एक उदाहरण म्हणून आणि त्यासाठी किती काळजी घेणं आवश्यक आहे हे समजावं म्हणून मी माझा अगदी अलीकडचा एक अनुभव तुम्हाला सांगणार आहे.
मार्चचा महिना होता.जमीनीवर पडलेल्या वाळलेल्या पानांच्या आच्छादनावर एखादं पान पडल्याचा आवाज सुद्धा मोठा येत होता अशा वेळी जंगलाच्या एका विशिष्ट भागात मला एका वाघाचा सुगावा लागला.या वाघाचे फोटोग्राफ मला फार दिवसांपासून घ्यायची इच्छा होती.
लंगूरच्या एका कळपाला वाघ पडून राह्यला होता त्या जागेकडे जायला भाग पाडून मला त्या वाघाची जागाही बरोबर समजली होती.वाघापासून साधारण सत्तर यार्डावर एक हिरवळीचा तुकडा होता.हा तुकडा पन्नास यार्ड लांब व तीस यार्ड रुंद होता.या तुकड्याच्या कडेलाच पण वाघाच्या विरुद्ध बाजूला एक मोठं झाड होतं व त्यावर काही वेली चढून अगदी शेंड्यापर्यंत गेल्या होत्या.
जमीनीपासून वीस फूटांवर खोडाला दोन फांद्या फुटल्या होत्या. त्या वाघाने सकाळीच एक सांबर मारलं होतं आणि ते सांबर व त्याची आताची जागा याच्या मध्येच तो हिरवळीचा तुकडा असल्याने तो वाघ दुपारी ती हिरवळ ओलांडणार हे मला नक्की माहीत होतं. भक्ष्याच्या जवळपास दुपारभर पडून राहण्यासारखी दाट झाडी नव्हती व त्यामुळे तो हिरवळ ओलांडून तिकडच्या झुडुपांमध्ये सावलीसाठी गेला होता.याच ठिकाणी मी त्याला लंगूरच्या साहाय्याने शोधून काढलं होतं.वाघ बिबळ्यांसारख्या मांसभक्षी प्राण्याची शिकार किंवा फोटोग्राफी करायची असेल तर त्यांची जागा बरोबर माहीत असणं आवश्यक असतं आणि यासाठी उत्तम मार्ग म्हणजे पक्षी व प्राण्यांची मदत घेणे.जर संयम असेल आणि जंगलवासींच्या सवयीचं ज्ञान असेल तर त्या प्राण्याला किंवा पक्ष्यांना आपण आपल्याला पाहिजे त्या दिशेला जायला भाग पाडू शकतो.यासाठी योग्य असे पक्षी म्हणजे रानकोंबडे,मोर,व्हाईट कॅप्ड बॅब्लर्स (सातभाईंची एक जात, मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन)
आणि प्राण्यांमध्ये भेकर किंवा लंगूर.
अतिशय काळजीपूर्वक दबकत दबकत मी झाडापर्यंत गेलो.खालून वर गेलेल्या वेलींची टोकं वाघ जिथे होता तिथून दिसू शकत होती त्यामुळे वेलींना अजिबात धक्का न लावता मी फांद्या फुटल्या होत्या तिथपर्यंत चढलो.या ठिकाणी मला बसायला बऱ्यापैकी जागाही होती व चांगलं लपणही होतं.
आता मी माझा १६ एमएमचा कॅमेरा काढला व समोरच्या पानोळ्यामधे जरा फट तयार करून अजिबात आवाज न करता बसून राह्यलो.मला त्या फटीतून फक्त समोरची हिरवळ आणि त्याच्या पलीकडच्या जंगलाचा थोडा भाग दिसत होता.
जवळजवळ तासाभरानंतर ब्रॉन्झविंग्ड डोव्हजची एक जोडी त्या जंगलातून अचानक वर उडाली व पंख फडफडवत झुडुपांवरून निघून गेली आणि त्यानंतर मिनिटा दोन मिनिटांनी मगाच्या जागेपासून काही अंतर माझ्या दिशेला अपलँड पिपिट्सचा छोटा थवा जमीनीवरून उडाला,एका निष्पर्ण झाडाच्या फांद्यावर इकडून तिकडे उड्या मारत शेंड्यावर गेला व नंतर तिथून दूर उडून गेला.
या दोन्ही पक्ष्यांना स्वतःचा विशिष्ट असा अलार्म कॉल नाही,पण त्यांच्या वागणुकीवरून सहज कळत होतं की वाघाने झोपण्याची जागा सोडली आहे.मी माझी नजर सावकाश डावीकडून उजवीकडे फिरवायला सुरुवात केली तेव्हा ती एका छोट्या पांढऱ्या वस्तूवर स्थिर झाली.हिरवळीपासून दहा फुटांवर असलेली ती वस्तू एखाद दुसरा चौरस इंच एवढी असेल.यानंतर मी दृष्टीक्षेत्राच्या अगदी उजव्या कडेपर्यंत नजर फिरवली व परत त्या पांढऱ्या वस्तूवर स्थिर केली.काही सेकंदापूर्वी ती वस्तू ज्या ठिकाणी होती तिथे ती आता नाही हे माझ्या लक्षात आलं... वाघाच्या चेहऱ्यावरच्या पांढऱ्या खुणेशिवाय ते दुसरं काही असूच शकत नव्हतं.नक्कीच... मी झाडाकडे येत असताना किंवा चढत असताना मला वाघाने पाहिलं असणार.मी पातळ रबरी सोलचे बूट घातले होते आणि माझ्या परीने अजिबात आवाज न करण्याचा प्रयत्न केला होता.तरीही जेव्हा त्याची भक्ष्याकडे जाण्याची वेळ झाली तेव्हा त्याने दबकत जवळ येऊन त्याला संशय होता त्या जागेचं परत निरीक्षण केलं होतं व त्या संशयाचं मूळ शोधत होता.त्याच स्थितीत अर्धा तास थांबल्यावर तो उठला.हातपाय ताणले,जांभई दिली आणि आता भीती नाही याची खात्री झाल्यानंतर हिरवळीकडे चालत आला.
इथे तो उभा राह्यला,एकदा उजवीकडे तर एकदा डावीकडे तोंड करून त्याने नीट निरीक्षण केलं आणि सावकाशपणे हिरवळ ओलांडायला सुरुवात केली.माझ्याबरोबर खालून तो त्याच्या भक्ष्याकडे गेला.
जंगलात भटकंती करताना मला जेव्हा शिकाऱ्यांनी मचाणं बांधण्यासाठी तोडलेले वासे,नीट दिसावं म्हणून तोडलेल्या फांद्या,खालचा पालापाचोळा दिसावा आणि हे सर्व करताना किती आवाज झाला असेल याचा मनात विचार येतो तेव्हा कळतं की इतक्या वेळा मचाणांवर रात्री जागून त्यांना अपयश का येतं ! आम्हाला आजपर्यंत नरभक्षक बिबळ्याला मारण्यात आलेलं अपयश मात्र नको त्या गोष्टी केल्याने किंवा काही करायचं राहून गेल्यामुळे आलं नव्हतं,तर खरोखरच ते नशीबाचे खेळ होते.माझ्यासाठी पाठवलेला शूटींग लाईट वेळेवर न पोचणे,इबॉटसनच्या पायाला मोक्याच्या क्षणी पेटके येणे,बिबळ्याने सायनाईडचा ओव्हरडोस घेणे आणि आता यावेळेला आमच्या माणसांकडून जिन ट्रॅप खाली पडून त्याचा दात तुटणे याला दुसरं काय म्हणणार?तरीही इबॉटसन पौरीला निघून गेल्यावरही माझ्या आशा शाबूत होत्या कारण आता मला माझ्या शत्रूच्या क्षमतांचा बरोबर अंदाज आला होता.
एक गोष्ट मात्र मला राहून राहून अस्वस्थ करत होती ते म्हणजे ब्रिज बंद करून त्या बिबळ्याला नदीच्या एकाच बाजूला स्थानबद्ध करणे.कोणत्याही दृष्टीकोनातून बघितलं तरी असं करणं म्हणजे डाव्या तीरावरच्या माणसांना नरभक्षकाच्या तोंडी देण्यासारखं व उजव्या तीरावरच्या माणसांना मात्र सुरक्षित ठेवण्यासारखं होतं.
यावेळी आम्ही रुद्रप्रयागला येण्याच्या अगोदर बळी गेलेल्या मुलाला धरून गेल्या काही दिवसांत डाव्या तीरावरच्या तीन लोकांनी आपला जीव गमावला होता व याहीपुढे अशी शक्यता होतीच.तरीही दोन ब्रिज मोकळे करून बिबळ्याला उजव्या तीरावर यायची परवानगी देणे म्हणजे अगोदरच डोंगराएवढ्या असलेल्या आमच्या अडचणींमध्ये दुपटीने भर टाकण्यासारखंच होतं आणि त्याचा फायदा काहीच होणार नव्हता.बळी कुठेही जावो पण दोन्हीकडच्या माणसांच्या आयुष्याचं मोल सारखंच होतं त्यामुळे शेवटी मन घट्ट करून मी ब्रिज बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला.इथे मला डाव्या तीरावरच्या शूर पहाडी माणसांचं कौतुक करावंसं वाटतं.ब्रिज बंद केल्या नंतरचे परिणाम माहीत असून देखील कोणीही त्याचा निषेध केला नाही किंवा ब्रिज मोकळे करण्याची साधी विनंतीही केली नाही.
एकदा दोन्ही पूल बंद केल्यावर मी आसपासच्या सर्व गावांमध्ये धोक्याची व खबरदारीची सूचना देण्यासाठी एक माणूस पाठवला व स्वतःही जितकी पायपीट शक्य होईल तेवढी केली.प्रत्येक ठिकाणी मला पहाडी पाहुणचाराचा अनुभव आला. नरभक्षकाचा पुढचा बळी त्यांच्यापैकीच एखाद्याचा असणार होता याची जाणीव असून देखील त्यांची श्रद्धा अढळ होती की नरभक्षक काल मेला नाही म्हणून काय झालं? तो आज नाहीतर उद्या तरी खतम् होणारच.