एका मोठ्या पार्टीत एक गर्भश्रीमंत स्त्री प्रत्येकावर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत होती.न्यू यॉर्क शहरातील त्या पार्टीत उंची वस्त्रे, हिरे आणि मोती यांनी झगमगणारी तिची श्रीमंती,तिच्या चेहऱ्याच्या बाबतीत मात्र अगदीच कुचकामी ठरत होती.ती किती सुंदर आहे किंवा नाही यापेक्षाही तिच्या चेहऱ्याबाबत लक्षात राहणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावरून ओसंडून वाहणारा रुक्षपणा आणि स्वार्थीपणा. तुमचे कपडे आणि तुमच्या दागदागिन्यांपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील मृदू,
मैत्रीपूर्ण भावच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देतात,ही सामान्यतः प्रत्येकालाच माहिती असलेली गोष्ट बहुधा तिला जाणवलीच नव्हती.
चार्लस स्कॅब हा पूर्वी अजिबात हसत नसे,पण हसण्यात केवढी जादू दडली आहे,हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा तो आमूलाग्र बदलला..! स्कॅबचे आनंदी व्यक्तिमत्त्व,
लोकांनी प्रेम करावे ही त्याची क्षमता,त्याचे मंत्रमुग्ध करणारे हसू यातच त्याच्या असामान्य यशाचे गुपित दडले आहे.शब्दांपेक्षा कृती ही खूप काही बोलून जाते. जेव्हा तुम्ही हसून एखाद्याला भेटता तेव्हा जणू तुम्ही असेच म्हणत असता की,मला तू आवडतोस,तुला भेटून मला आनंद झाला,तू मला सुखी केलेस.
कुत्र्यांच्या लोकप्रियतेमागे हेच कारण असावे,की कुत्र्यांना आपल्याला पाहून इतका आनंद होतो की,ती आपल्या अंगावर उड्या मारतात.साहजिकच आपल्यालाही त्यांना पाहून आनंद होतो.लहान बाळाचे हसूही अत्यंत लोभसवाणे असते.
डॉक्टरांच्या वेटिंगरूममध्ये बसून कंटाळलेल्या इतर पेशंट्सना तुम्ही कधी निरखून पाहिलंय? सगळेजण अत्यंत गंभीर चेहऱ्याने डॉक्टरांना भेटण्यासाठी तिथे ताटकळत बसलेले असतात. प्राण्यांचे डॉक्टर डॉ.स्टिफन मिसुरीतील रेटाउन येथे दवाखाना चालवत असत.त्यांनी वसंत ऋतूतील एका खास दिवसाची आठवण सांगितली.
त्या दिवशी त्यांची वेटिंगरूम प्राण्यांना रोगप्रतिबंधक लस देण्यासाठी जमलेल्या लोकांनी व त्यांच्या प्राण्यांनी खच्चून भरलेली होती.सगळे काही न बोलता शांत बसून होते. साधारण सहा किंवा सात पेशंट्स उरलेले असताना एक तरुण स्त्री आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला आणि एका छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन आली.खूप वेळ बसावे लागल्यामुळे वैतागलेल्या एका सभ्य प्रौढ गृहस्थां शेजारी ती बसली.तेवढ्यात ते छोटे बाळ त्या आजोबांकडे पाहून बोळकं पसरून असं काही हसलं की,त्यानंतर गंभीरपणे किंवा लांब चेहरा करून बसून राहणे कुणालाच शक्य झाले नाही.मग लगेच ते आजोबा त्या बाळाविषयी, त्यांच्या नातवंडांविषयी बोलू लागले आणि त्या हॉलमधील सगळी माणसेच त्यामध्ये सहभागी झाली आणि मग सगळे ताणतणाव,कंटाळा विरून त्या हॉलमध्ये आनंद व उत्साह भरून गेला.खोट्या,यांत्रिक हसण्यामुळे मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच शक्यता जास्त असते.असे हसणाऱ्या माणसांविषयी मनात एक चीड उत्पन्न होते.समोरच्याच्या मनात आनंद लहरी उमटतील असे खरेखुरे,अगदी हृदयातून उमटणारे हसू आयुष्य बदलून टाकू शकते.
मिशिगन विद्यापीठातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ प्रोफेसर जेम्स मॅकोनेल हे हास्य या संकल्पनेबद्दल असे म्हणतात की,हसू शकणारे लोक चांगले व्यवस्थापक असतात, उत्तम शिक्षक असतात आणि त्यांचे विक्रीकौशल्य विशेष उल्लेखनीय असते. ते मुलांनासुद्धा चांगल्या पद्धतीने वाढवतात. नुसतीच नाके मुरडण्याऐवजी एकदा मोकळे हसून पाहा,अनेक चांगल्या भावनांचा उगम त्यातून होतो. शिक्षा करण्यापेक्षा प्रोत्साहन देणे हीच उत्तम शिकवण आहे.एक एम्प्लॉयमेंट मॅनेजर जी न्यूयॉर्कमधील एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करते; तिचे असे म्हणणे आहे की,मला शक्य झाले तर, चेहऱ्यावर उत्साहवर्धक हसू असणारी व्यक्ती जरी अर्धवट शिकलेली असेल तरी गंभीर चेहऱ्याच्या पी.एच.डी. झालेल्या व्यक्तीपेक्षा, अशा व्यक्तीलाच मी पसंत करेन.
जरी काही वेळा आपल्या चेहऱ्यावरचे हसू दिसले नाही,
तरी त्याचा होणारा परिणाम हा अतिशय प्रभावशाली असतो.आपली उत्पादने व सेवा विकण्यासाठी फोन कॉल्स करणाऱ्या लोकांसाठी अमेरिकेत फोनपॉवर नावाचा एक अभिनव उपक्रम केला गेला.त्यात त्यांना असे सांगण्यात आले की,तुमच्या बोलण्यातून तुमचे हास्य समोरच्या व्यक्तीला समजायला हवे आणि याचा त्यांच्या विक्रीवर चांगला परिणाम झाल्याचे लक्षात आले.
ओहियोसिनसिनाटी येथील कंपनीमध्ये संगणक विभागाचा व्यवस्थापक असणाऱ्या रॉबर्ट क्रायरने अभिमानाने सांगितले की,त्यांच्या कंपनीसाठी लायक कॉम्प्युटर इंजिनिअरची नेमणूक त्याने अचूकपणे कशी केली :त्याच्या कंपनीसाठी कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएच.डी.केलेला एक चांगला हुशार उमेदवार ताबडतोब हवा होता.परड्यु युनिव्हर्सिटीतून पदवी घेतलेला,उत्तम क्वालिफिकेशन असलेला उमेदवार शेवटी निवडला गेला.त्याच्याशी बरेचवेळा फोनवर बोलल्यानंतर असे लक्षात आले की,त्याला अनेक कंपन्यांकडून बोलावले गेले होते.त्यांपैकी काही कंपन्या तर आमच्यापेक्षा मोठ्या आणि नावाजलेल्या होत्या.तरीही त्याने मात्र आमच्या कंपनीची निवड केली. मी त्याला विचारले,त्याने इतरांना डावलून आम्हाला का निवडले?तो एक क्षणभर थांबून विचारपूर्वक म्हणाला,मला असे वाटते की,माझ्याशी बोलणाऱ्या इतर मॅनेजर्सचे बोलणे अत्यंत थंड व व्यावहारिक होते;एखादा सौदा केल्यासारखे ते बोलणे होते.पण तुमचा आवाज मला फार आश्वासक वाटला व तुम्ही मला आमंत्रित करत आहात,तुम्हाला माझे बोलणे ऐकायचे आहे आणि तुमच्या संस्थेचा एक भाग म्हणून तुम्हाला मी हवा आहे असे मला जाणवले.
अमेरिकेतील एका खूप मोठ्या रबर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या अध्यक्षाचे निरीक्षण असे आहे,
की कोणतेही काम लोक जेव्हा हसून-खेळून करतात तेव्हाच ते त्यामध्ये यशस्वी होतात.हा मोठा उद्योजक जुन्या काळातील असला,तरी फक्त काबाडकष्ट हीच यशाचे दार उघडण्याची जादूची किल्ली नव्हे,यावर त्याचा विश्वास होता.त्याचे म्हणणे असे होते,मला अशी यशस्वी माणसे माहिती आहेत की,ज्यांनी त्यांचा व्यवसाय अत्यंत आनंदाने केला आहे आणि मी अशीही माणसे पाहिली आहेत की,ज्यांनी मौजमजा विसरून फक्त काम केले आहे;पण मग त्यांच्या व्यवसायात त्यांना मंदी आली, त्यांचा आनंद नाहीसा झाला आणि ते अपयशी ठरले.तुम्ही लोकांना आनंद दिलात, तर निश्चितच ते तुमच्याबरोबर आनंदात वेळ घालवतील.
माझ्या क्लासमधल्या हजारो व्यावसायिकांना मी नेहमी सांगतो एक आठवडाभर तुम्ही सातत्याने प्रत्येक तासाला कोणालातरी स्माईल द्या आणि मग इथे येऊन त्याचे काय परिणाम झाले ते सांगा. हे खरंच शक्य आहे का? न्यूयॉर्कमधील एका स्टॉकब्रोकरचे पत्र आता पाहा :
मि.स्टेनहार्ड लिहितात - अठरा वर्षांपूर्वी माझे लग्न झाले आणि अठरा वर्षांच्या काळात मी माझ्या पत्नीकडे पाहून क्वचितच हसलो असेन किंवा सकाळी उठल्यापासून ते ऑफिसला जाईपर्यंत दोन डझन शब्दसुद्धा मी रोज तिच्याबरोबर बोलत नाही.सतत फक्त कुरकुर करत असे.मी कधी तिच्याबरोबर सिनेमालासुद्धा गेलो नाही.पण जेव्हा तुम्ही मला हसून बोलण्याचा सल्ला दिलात व तो अनुभव कथन करण्यास सांगितलात,तेव्हा मी मनाशी विचार केला की,मी आठवडाभर प्रयत्न करून पाहीन. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच आरशातल्या माझ्या खिन्न,आंबट चेहऱ्याकडे पाहून मी स्वतःला बजावले,बिल तू आता हसणार आहेस आणि या क्षणापासून हसतच राहणार आहेस. मी नाश्ता करताना बायकोला हसून गुड मॉर्निंग म्हणालो.तुम्ही म्हणाला होतात की,ती आश्चर्यचकित होईल;पण कार्नेगी साहेब,तुम्ही चुकलात.
तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे घडले.ती चक्क घाबरली.तिला धक्काच बसला,पण जेव्हा मी तिला विश्वास दिला की यात काहीही अनपेक्षित नाही आणि आता असे नेहमीच घडत राहणार आहे तेव्हा तिला खूप आनंद झाला.आणि खरोखरच त्या दिवसापासून अवघ्या दोनच महिन्यांनी आमचे घर सुखासमाधानाने न्हाऊन निघाले.ऑफिसला जाताना आमच्या लिफ्ट ऑपरेटरलासुद्धा मी गुड मॉर्निंग असे हसून म्हणू लागलो.ऑफिस मधील दरवानालासुद्धा हसून अभिवादन करू लागलो.माझ्या कॅशिअरने माझ्याकडे सुट्टे पैसे मागितले तेव्हाही मी त्याच्याकडे पाहून हसलो.स्टॉक एक्स्चेंजच्या दरबारात उभे राहून तेथे जमलेल्या लोकांकडे पाहून हसताना तर मला कुणीच पाहिले नव्हते.काही दिवसांतच माझ्या लक्षात आले की,प्रत्येकजण माझ्या सुहास्याला हसून प्रतिसाद देत होता.माझ्याकडे काही तक्रारी घेऊन येणाऱ्या किंवा टीका करणाऱ्याचे म्हणणेसुद्धा मी काळजीपूर्वक ऐकू लागलो.त्यावर आनंदाने उपाय सुचवू लागलो आणि माझ्या लक्षात आले की,तडजोडीने अनेक समस्या सुटतात.निदान सोप्या वाटतात.मला असेही जाणवले की,हास्य माझ्याकडे संपत्ती खेचून आणते आहे.
माझा एक मित्र माझा भागीदार होता.त्याच्या स्टाफपैकी त्याचा एक क्लार्क फार उमद्या स्वभावाचा होता.जगाकडे बघण्याच्या माझ्या दृष्टिकोनात बदल केल्यामुळे मला होणारे फायदे त्याला सांगावे म्हणून मी जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा त्याने मला प्रांजळ कबुली दिली की,पूर्वीचे माझ्याबद्दल त्याचे मत,महानालायक,खडूसप्राणी असे होते.पण आता ते बदलले होते.
कामाच्या पद्धतींमधून पूर्णपणे हद्दपार केलेली टीका,
रागाऐवजी कौतुक आणि स्तुती या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात क्रांती घडली.मला काय पाहिजे आहे यावर भर देण्यापेक्षाही मी आता समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून त्या घटनेकडे पाहू लागलो आणि खरे सांगायचे,तर मी आता पहिल्यापेक्षा खूप वेगळा,
अधिक आनंदी,अधिक श्रीमंत आहे.खरेतर मित्रांच्या बाबतीतली ही श्रीमंती,संपत्तीच अधिक टिकाऊ असते.
हसावेसे वाटत नाही तेव्हा दोन गोष्टी कराव्यात.पहिली म्हणजे बळजबरीने स्वतःला हसवा.एकटे असताना मुद्दाम शिट्टी वाजवा किंवा गाणे म्हणा.मग आपोआपच तुम्हाला आनंद होईल.तुम्ही स्वतःला आनंदी मानू लागलात तर नेमकी हीच गोष्ट तुम्हाला अधिक आनंदी करेल.प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व तत्त्ववेत्ता विल्यम जेम्स म्हणतो…।
तो काय म्हणतो ते वाचू पुढील भागात,याच ठिकाणी अगदी न चुकता… तोपर्यंत हसून धन्यवाद व आभार… विजय गायकवाड..!