* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/२/२५

मोठी माँ / elder mother

'वाचून वाचून डोळे दुखायला लागलेत' असं कुणी तरी म्हणाल्याचं मोठी माँनी ऐकलं मात्र,लगेच त्याच्यावर उपचार करण्याचं त्यांच्या मनाने घेतलं.शोधता शोधता त्यांना कधी तरी,कुणातरीसाठी आणलेली डोळ्यांच्या मलमाची ट्यूब सापडली.ट्यूब पाचसात वर्षांपूर्वी आणलेली होती. .माँना औषधांच्या एक्सपायरी डेटची माहिती असण्याचं काहीच कारण नव्हतं.त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांच्या डोळ्यांना आराम मिळावा ह्या प्रेमळ हेतूने त्या ट्यूबचं मलम मुलांच्या डोळ्यांत घालण्याचा घाऊक कार्यक्रम माँनी हाती घेतला.डोळे दुखणाऱ्या वा न दुखणाऱ्या प्रत्येक डोळ्यात ट्यूबचं मलम घातलं गेलं.ट्यूबमधलं मलम संपेपर्यंत माँ थांबल्या नाहीत.सगळ्यांच्या डोळ्यांची त्यांच्या दृष्टीने त्यांनी काळजी घेतल्यानंतरच त्यांनी समाधानाने श्वास घेतला.डोळ्यांत मलम घालून मुलं जरा लवकरच झोपली.दुसरा दिवस परीक्षेचा होता.


सकाळी पहिला मुलगा उठला तो चाचपडतच.त्याला काहीच दिसत नव्हतं.भरभर बाकीची मुलंही उठली किंवा उठवली गेली असावीत.कुणालाच काहीही दिसत नव्हतं.वाड्यात सगळीकडे हलकल्लोळ माजला.ही बातमी थोड्याच वेळात गल्लीत आणि आणखी थोड्या वेळात गावभर पसरली.सगळीकडे एकच खळबळ माजली.गावात आय स्पेशालिस्ट नव्हताच.म्हणून जनरल डॉक्टरांना बोलावलं.त्यांनी सगळ्यांचे डोळे तपासले.

औषध दिलं. 'डोळ्यांत जाऊन बसलेला चिकट मलम हळूहळू बाहेर पडल्यावर दोन दिवसांनंतर व्यवस्थित दिसू लागेल' असं त्यांनी म्हटलं,तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.


पाचच मिनिटांत पुढचा प्रश्न सगळ्यांना आठवला तो म्हणजे आजच्या आणि उद्याच्या परीक्षेचं काय ? सकाळी सकाळीच बाबाजी आणि बापू शाळेच्या हेडमास्तरांना आणि संस्थेच्या विश्वस्तांना भेटायला गेले. विचारान्ती प्रत्येक मुलाला एक एक लेखनिक देण्याचं ठरलं आणि मग एकच धांदल उडाली.दहाबारा लेखनिकांच्या शोधार्थ घरची मंडळी बाहेर पडली. सुदैवाने गावात असलेल्या दुसऱ्या शाळेच्या परीक्षा मागच्या आठवड्यातच संपल्या होत्या. त्यामुळे थोड्याशा शोधानंतर प्रत्येकाला लेखनिक मिळाला. दहाबारा लेखनिक एका एका मुलाला धरून रांगेत वाड्याबाहेर पडण्याचं विलक्षण दृश्य पाहण्यासाठी सगळी गल्ली जमली होती. ही ऽऽऽ लांबलचक प्रभात फेरी शाळेत पोहचली तेव्हा कुठे सगळ्या वाड्याला हायसं वाटलं.मारवाडी समाज सर्वत्र पसरला असला तरी त्याची मुळं राजस्थानात आहेत. 


यशाच्या लहानपणी मारवाडमधून त्या समाजाचे भाट यायचे.ह्या भाट लोकांचं बोलणं वैशिष्ट्यपूर्ण असायचं.ते गाण्याच्या स्वरूपात बरंचसं संभाषण करायचे.येताना ते चॉकलेटच्या फ्लेवरचा चहा वगैरे वस्तू विकायला आणायचे.ह्या भाटांना सुमारे पंचवीस कुटुंबं नेमून दिलेली असत.त्या त्या कुटुंबात दोनदोन दिवस राहून ते त्या कुटुंबांच्या वंशावळीची त्यांच्या जवळच्या चोपड्यांत नोंद करीत.

भाट परत जाताना त्यांना कुटुंबातील लोक धान्य,पैसे वगैरे देत.

हळूहळू भाट येण्याची पद्धत कमी कमी होत गेली.त्यामुळे काही कुटुंबांत कुटुंबातलीच एखादी व्यक्ती वंशवृक्षाची नोंद करते.


यशाच्या वाड्यात राहणाऱ्या कुटुंबाच्या नोंदी यशाचा मित्र शांतिलाल करायला लागला.यशाच्या माहितीप्रमाणे त्याच्याजवळ भाटाकडून लिहून घेतलेल्या नोंदीवरून कुटुंबाच्या सुमारे तीनशे वर्षांपासूनच्या पूर्वजांची नावं लिहिलेली आहेत.वाड्यातली दोन्ही कुटुंबं इतकी एकरूप झाली की,एकमेकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील अंगीकारल्या गेल्या.पापडांची मेथ्या घालून केलेली भाजी किंवा डालबाटी आता यशाच्या वाड्यावरही सर्रास होऊ लागली.कणकेत गूळ घालून भज्यांसारखे गोळे करून तळलेले गुलगुले यशाला आणि त्याच्या बहिणींनाही फार आवडत.बाबाजी त्यांच्या समाजाच्या तुलनेने त्यावेळी आर्थिकदृष्ट्या अति समृद्ध नसले तरी नियत,दिलदारी ह्या निकषांवर त्यांना समाजात फार मान होता.दर रंगपंचमीला समाजातील प्रतिष्ठित मंडळींना बाबाजी घरी बोलवत.सगळे एकत्र पोटभर भजे-गुलगुले खात.प्रकाश आणि शांतिलालमुळे मारवाडी समाजाच्या धार्मिक गोष्टींची यशाला बरीच माहिती झाली.त्याची धाकटी बहीण मुक्ता तर बाबाजींच्या बरोबर बऱ्याच वेळा स्थानकातदेखील जाई. 


नवकार मंत्रासारखे छोटे छोटे धार्मिक श्लोक / मंत्र तिचेही पाठ झाले होते.नवकार मंत्रात भगवान महावीर, गुरू अशा आराध्य दैवतांना वंदन करून शेवटी सर्वे सुखिनःसन्तु अशी पसायदानासारखी प्रार्थना केलेली आहे.जैन धर्मियांचे धर्मासंबंधी नियम 'आगम' ह्या ग्रंथात नमूद केले आहेत.बाबाजींच्या आदर्शाखाली सगळं कुटुंब हे नियम पाळत असतं.


सामाईक म्हणजे तोंडाला मुँहपत्ती बांधून नवकार किंवा इतर मंत्रांचं पठण होत असे.ह्या सामाईकाचा वेळ 'आग्रम' मध्ये नमूद केल्यानुसार ४८ मिनिटांचा असे. माणसाचं शरीर आणि मन हे ४८ मिनिटांपर्यंत स्थिर राहू शकतं असा समज असल्याने सामाईकचा वेळ तेवढाच ठेवलेला आहे.


बाबाजींप्रमाणेच मोठी माँसुद्धा फार धार्मिक होत्या. त्यांची दररोजची सामाईक कधीच चुकली नाही. सूर्यास्ताच्या आत जेवणं करणं,त्याला ते ब्याळू म्हणत,हा नियमसुद्धा त्या बारा महिने पाळत.स्थानकात गुरुमहाराजांचा मुक्काम असला की,त्यावेळी मोठी माँ नियमितपणे प्रवचन ऐकायला जात.हे गुरुमहाराज घरोघरी जाऊन भिक्षा मागून जेवत असत.


असेच एकदा एक गुरुमहाराज स्थानकात वस्तीसाठी आले होते.पावसाळा असल्याने त्यांचा मुक्काम नेहमीपेक्षा मोठा होता.

जैन मुनींच्या समूहातल्या मुख्य मुनींनी मनात एक संकल्प सोडला होता आणि तो पूर्ण होईपर्यंत अन्नग्रहण करणार नाही असं ठरवलं होतं. दररोज गावात आलेले चार जैन मुनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर भिक्षेसाठी घरोघरी जात.वेगवेगळ्या घरातील कुटुंबीय मुनींचा उपवास आपल्यामुळे सुटावा ह्या भावनेने वेगवेगळे अंदाज बांधत.कुणी दहा अनाथांना सांभाळेल तर कुणी धर्मशाळा बांधील वगैरे सांगून प्रयत्न करीत.पण मुनींच्या संकल्पाचा अंदाज कुणालाच येत नव्हता.सर्व समाजात हा चर्चेचा विषय झाला होता. किंबहुना चिंतेचा विषय झाला होता.


मुख्य मुनींच्या अन्नत्यागाचा आजचा बारावा दिवस होता.दुपारी बाराच्या सुमारास चारही जैन मुनी इतर प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर वाड्यात शिरले.बाबाजी आणि मोठी माँबरोबर सगळं कुटुंब त्यांच्या स्वागतासाठी उभं होतं.यशाच्या घरचेही सगळे तिथे उत्सुकतेने गेले. अचानक बुरख्याच्या आडून मोठी माँ म्हणाल्या,


"महाराज आपण आमच्या घरी अन्न घेतल्यास आम्ही दोघे ह्यापुढे आयुष्यभर ब्रह्मचर्य व्रत पाळू !"


मुनींच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं.ते म्हणाले,"हाच माझा संकल्प होता.तुम्ही दोघे आज एकमेकांशी बोला. आम्ही उद्या परत येऊ.तुमचा निर्णय पक्का असेल तर उद्या आम्ही तुमच्याकडचं अन्न घेऊ."


मोठी माँ तेव्हा फक्त पंचेचाळीस वर्षांच्या होत्या आणि बाबाजी पन्नाशीचे.एकदा मुनींचा संकल्प समजल्यावर त्यासाठी आणखी चोवीस तास थांबणं साध्याभोळ्या आणि निष्पाप प्रेमळ माँना अयोग्य वाटलं. त्या म्हणाल्या,"उद्यापर्यंत कशाला थांबायचं ?


तुमच्या सगळ्यांच्या समक्षच त्यांना विचारते,त्यांना माझा हा विचार मान्य आहे का म्हणून.गावातल्या प्रतिष्ठितांसमोर अवघडलेल्या बाबाजींनी माँना नकार दिला नाही.मुनींनी माँच्या हातून अन्नदान स्वीकारून आपला उपवास सोडला.


महात्मा गांधींच्या ब्रह्मचर्यव्रताची आणि सत्याच्या प्रयोगाची जगभर चर्चा झाली.वाहवा झाली. आजही होतेय. पण यशाच्या लहानशा गावातील नव्हे,यशाच्या वाड्यातील सात्त्विक मोठी माँनी एका सात्त्विक अतिथीच्या अन्नग्रहणासाठी आयुष्यातला मोठा निर्णय घेऊन अतिथिधर्माचा एक आदर्श सर्वांच्यापुढे ठेवला होता !


१४.०२.२५ या लेखातील शेवटचा दुसरा भाग…।!

१४/२/२५

मोठी माँ / elder mother

गावातला बापूंचा वाडा प्रसिद्ध वाड्यांपैकी एक होता. गल्लीच्या मध्यभागी चौसोपी असा भव्य वाडा प्रथमदर्शनीच मोठा प्रेक्षणीय वाटे.बघताक्षणीच त्याची छाप पडे.गल्लीत महादेवाचं,दत्ताचं आणि मारुतीचं अशी तीन देवळं होती.पण गावात दुसऱ्या एका परदेशी गल्लीच्या जवळच्या गल्लीतसुद्धा तीन देवळं होती. म्हणून तिला 'तीन देवळांची गल्ली' म्हणत.पूर्वी बापूंच्या वाड्याच्या गल्लीला 'देशपांड्यांची गल्ली' असं नाव होतं.बहुदा पूर्वी गल्लीत बहुसंख्य देशपांड्यांची घरं असावीत.बापूंचा वाडा हा खरं तर त्यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचा.त्यांचंही आडनाव देशपांडेच.ते गेल्यावर हा एवढा मोठा वाडा सुनसान पडला होता. बापू रेव्हेन्यू खात्यात होते.त्यामुळे दर पाच वर्षांनी त्यांच्या बदल्या होत.

जिल्ह्यातल्या एकूण एक तालुक्याच्या गावी त्यांचं वास्तव्य झालं.रिटायरमेंटनंतर सध्याच्या गावी राहायला जायचा विचार असल्याने बापूंनी तो कुलूपबंद ठेवला होता.गावातल्याच काही उपद्रवी मुलांनी बाहेरच्या भिंतींवर खोडसाळपणे मोठ्या अक्षरांत 'भुताचा वाडा' असं लिहून ठेवलं होतं.


बापू चांदवडला मामलेदार म्हणून काम करत असतानाची गोष्ट.

एका रविवारी ते माईंबरोबर बोलत असताना सकाळीसकाळी दोन तरुण भेटायला आले. त्यांनी त्यांची ओळख सांगितली.बापूंना जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या महत्त्वाच्या कुटुंबांची माहिती होती.शिवाय त्यांची स्मरणशक्तीसुद्धा विलक्षण तीक्ष्ण असल्याने त्यांची माहिती सविस्तर आणि विश्वसनीय असे.ह्या तरुणांनी ओळख सांगताच ते भाईजींच्या पाच मुलांपैकी दोन मोठे असल्याचं बापूंच्या लगेच लक्षात आलं.भाईजी हे मारवाडी समाजातील एक सज्जन व्यापारी होते.सध्या धंद्यातील चढउतारांमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती.भाईजींच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडल्याचंही बापूंच्या कानावर आलं होतं.त्या काळी जिल्ह्यामध्ये एका दरोडेखोराने भयंकर उच्छाद मांडला होता.तो व्यापाऱ्यांच्या कुटुंबावर दरोडे घाली.लुटालूट करी. नुसतीच लुटालूट करत नव्हता तर जाताना कुटुंबप्रमुखाचं नाक वस्तऱ्याने कापून मगच तिथून निघून जात असे. 'त्या नाकांची माळ करून ती मी नासिक इथल्या सरकारवाड्याला घालीन!' असा पण त्याने केला होता म्हणे ! एका छोट्याशा गावात सचोटीने व्यापार करणाऱ्या भाईजींच्या घरावर त्या दरोडेखोराने दरोडा घातला.लुटीबरोबर त्याने भाईजींचं नाकही कापून नेलं.त्या दोघांनी आपलं इथे येण्याचं कारण बापूंना सांगितलं. त्यांना राहायला जागा हवी होती.बापूंनी विचार केला, कुटुंब माहितीतलं आणि चांगलं आहे.त्यांच्या इथे राहण्यामुळे वाडाही वावरता राहील.आपोआपच देखभालही होईल.म्हणून त्यांनी वाडा भाड्याने दिला. मात्र काही वर्षांनी आपण निवृत्त झाल्यावर इथेच राहायला येणार हे लक्षात घेऊन त्यांनी वाड्याचा दर्शनी भाग स्वतः साठी राखून ठेवला आणि मागचा अर्धा भाग त्या मुलांना भाड्याने दिला.बापू निवृत्त होऊन तिथे राहायला जाईपर्यंत ते मारवाडी कुटुंब तिथे चांगलं स्थिरावलं.

नुसतंच स्थिरावलं असं नाही तर विस्तारलंसुद्धा.भाईजी आणि आजी ह्यांना एकूण पाच मुलं.त्या मुलांनाही बरीच मुलं.त्यात बापूंच्या तिघांची भर पडून अंदाजे पंधराएक मुलं तरी त्या वाड्यात झाली.गावगोत - माधव सावरगांकर,प्रकाशक संजय शिंदे,अष्टगंध प्रकाशन,ठाणे…!


भाईजींच्या थोरल्या मुलाला घरात बाबाजी म्हणत.बापू आणि गावातले काही लोकही त्यांना बाबाजीच म्हणत. बापूंची मुलं कधी त्यांना बाबाजी तर कधी मामाजी म्हणत.बाबाजी एक आदर्श कुटुंबप्रमुख होते.आपल्या आणि आपल्या भावांच्या कुटुंबात किंवा त्यांच्या मुलांत त्यांनी कधीच भेदभाव केला नाही.मधल्या दालनात भिंतीला टेकून बसलेले आणि आजूबाजूच्या वेगवेगळ्या वयांच्या आणि इयत्तांच्या मुलांचा अभ्यास घेणारे बाबाजी आजही यशाच्या डोळ्यांसमोर येतात.पाची भावांचा आपसातला एकोपाही वाखाणण्याजोगा होता.एवढ्या मोठ्या कुटुंबात बायका-बायकांत अथवा मुलांमध्ये कुरबुरी होणं स्वाभाविक होतं.पण त्या भावांपर्यंत कधीच पोहचत नसत आणि पोहचल्या तरी पाची भाऊ त्याचा ना आपसात उल्लेख करत ना त्यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधावर कधी परिणाम झाला.


सगळ्यात मोठी सून म्हणजे बाबाजींची पत्नी.म्हणजे मोठ्या बिन्नी.सगळी मुलं त्यांना 'मोठी माँ' म्हणत. बापूंची मुलं त्यांचा उल्लेख 'मोठ्या बिन्नी' असा करत असली तरी त्यांना संबोधताना 'मोठी माँ' असंच म्हणत.


पिवळा किंवा लाल घागरा,त्यावर तशीच गर्द रंगाची ओढणी असा मोठी माँचा पेहराव असे.सगळ्या वाड्यात आणि कुठल्याही विषयांत त्यांचा मुक्त संचार असे. मोठी माँच्या हालचालीदेखील खूप चपळ असत. त्यामुळे बापू त्यांना गमतीने 'पंजाब मेल' म्हणत.बापूंचा सगळ्या वाड्यात चांगलाच दरारा असे.कुठे बाहेरगावी जाताना किंवा जाऊन आल्यावर अथवा कुठल्याही सणावाराला त्यांच्या घरातलीच काय,पण मारवाडी कुटुंबातली सगळी मंडळी प्रथम बापूंना नमस्कार करत. बापूंना नमस्कार करणं हासुद्धा एक समारंभच असे.


बापू ओसरीवर बनियन-धोतर नेसून पेपर वाचत अथवा पान खात बसलेले असत.कुणी नमस्कार करायला आला की,बापू सावकाश उठत.खुंटीवरची टोपी काढून डोक्यावर ठेवत.नंतर नमस्कार स्वीकारून तोंड भरून आशीर्वाद देत.मोठी माँचा मात्र खाक्याच वेगळा.त्या नेहमीप्रमाणे घाईघाईने येत.

खुंटीवरची टोपी काढून बापूंच्या डोक्यावर ठेवत.

नमस्कार करीत आणि बापूंच्या डोक्यावरून टोपी काढून परत खुंटीवर ठेवत.कधी कधी बापूंचा आशीर्वाद संपेपर्यंत मोठी माँ वाड्याच्या बाहेरच्या अंगणात गेलेल्या असत. 


सर्व मुलांवर सुलतानाप्रमाणे मोठी माँची अनिर्बंध सत्ता चालत असे.परसदारी आडाजवळच्या मोरीत मुलांना आंघोळी घालणं हा तर जुल्माचा अतिरेक असायचा. दिसलं पोरगं की,धर त्याला नि घाल दोन तांबे त्याच्या अंगावर,असा मोठी माँचा कार्यक्रम असे.

शंकर तर म्हणे, 'ह्या कामाच्या सपाट्यात कधी एखादुसऱ्या मुलाला त्या दोनदोनदा आंघोळ घालत असतील !'


मोठी माँ स्वभावाने मात्र फारच मऊ होत्या.एवढ्या तेवढ्या गोष्टींनी त्यांच्या डोळ्यांत टचकन् पाणी येई. माँचं वाड्याच्या बाहेर पडणं फारसं होत नसे.फक्त गावात गुरुमहाराज आले की,त्या प्रवचनाला, स्थानकात (जैनांचं प्रार्थनास्थळ) नियमित जात.दर शिवरात्रीला मात्र वाड्यातल्याच पंधरावीस मुलांचा घोळका बरोबर घेऊन त्या एसटी स्टँडजवळच्या गुऱ्हाळात उसाचा रस प्यायला घेऊन जात.मोठी माँ स्वतः फारशा शिकलेल्या नव्हत्या.पण बाबाजींचं सगळ्या मुलांना दररोजचं जवळ बसवून शिकवणं आणि घरातल्या दहाबारा मुलांचं शाळेला जाणं किंवा मुलांचं घरातल्या मोकळ्या आणि शांत जागी अभ्यास करत असलेलं दृश्य नेहमी दिसत असल्यामुळे माँना शिक्षणाचं महत्त्व चांगलंच माहीत होतं. त्यांचा स्वतःचा मुलगा शांतिलाल आणि मुलगी पुष्पा खूप हुशार होते. शिवाय प्रकाश आणि मदन हे दोघे पुतणेही अभ्यासात फार पुढे होते.शांतिलाल आणि प्रकाश हे यशाच्या बरोबरीचे.प्रकाश तर बहुतांशी बापू राहत असलेल्या भागातच असायचा.त्याला यशाच्या घरची कालवणं आवडायची.प्रकाश त्याच्या घरातून ताट वाढून घेऊन यायचा आणि यशाच्या पंक्तीला बसायचा. दोन्ही घरांचा घरोबा दृष्ट लागण्यासारखा होता.पुढच्या पिढीनेही तो जपला.एकदा फारच मजेशीर प्रसंग घडला. वार्षिक परीक्षा जवळ आली होती. 


वाड्यावरची सगळी मुलं कसून अभ्यासाला लागली होती.मोठी माँ सगळ्या मुलांची काळजी स्वतःघेत होत्या किंवा इतर जावांकडून करवून घेत होत्या.त्यात पहाटे उठणाऱ्या मुलांना चहा देणं,त्यांच्या जेवणाची वेळ सांभाळणं,रात्री त्यांना आठवणीने दूध देणं वगैरे बाबी असत.परीक्षा एका दिवसावर आली होती.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!

१२/२/२५

ओक अजस्र भेदरट / oak eternal tree

मी ज्या जंगलाची व्यवस्था सांभाळतो त्यातून हिंडताना मला काही धोक्यात सापडलेले ओक वृक्ष दिसतात. काही वेळा ते खरंच खूप त्रासात असतात.त्यांच्या पायाकडच्या भागात शोषण करणाऱ्या पानाच्या तुऱ्यांची वाढ चालू झाली की ओक वृक्षाची मृत्यूशी झुंज चालू झाली असे समजावे.यातून ओक बिथरलेला, घाबरलेला असल्याचे दिसते.झाडांच्या बुंध्याला जमिनीच्या बाजूकडे पाने फुटे लागतात.हे पानांचे झुबके बुंध्याला चहूबाजूंनी घेरून उगवतात.पण जास्त काळ ती टिकू शकत नाही,लवकरच गळून पडतात.कारण तिथे सूर्यप्रकाश पोचत नाही.त्यांना फक्त लख्ख प्रकाशात प्रकाशसंश्लेषण करता येते.त्यामुळे या अंधारात वाढणाऱ्या पानांना सूर्यप्रकाश मिळत नाही आणि लवकरच ती गळून जातात.एखादं सशक्त झाड अशा प्रकारची बुंध्याशी वाढ करण्यात शक्ती वाया घालवत नाही.आपली उंची वाढवण्यात त्याला अधिक रस असतो.झाडाला शांतता मिळाली की त्याची उंची वाढत राहते.पण मध्य युरोपीय जंगलातून ओक वृक्षांना तशी शांतता नसते.कारण या इथे बीच वृक्षांचे राज्य चालते.स्वजातीयांबरोबर बीच मनमिळावू असतात,पण ओक सारख्या इतर प्रजातींना ते छळून कमकुवत करतात.


जो पक्षी बीचचे बीज मातीत पुरून ठेवतो आणि तिथून त्या बीच वृक्षांची अरेरावी सुरू होते.त्या पक्ष्याला भरपूर खाद्य मिळत असल्यामुळे काही बिया तो पुरून ठेवतो. काही काळानंतर ती बी रुजते आणि बीचचे रोपटे जमिनीतून वर डोकावते.काही दशकं ते शांतपणे वाढत राहते,तोपर्यंत त्याची जाणीव होत नाही.त्या रोपट्याची आई कुठेतरी दूरवर असते पण ओक वृक्ष त्याला निरागसपणे सावली आणि सुरक्षा पुरवीत असतो. जमिनीवर सलोख्याचे संबंध असलेले भासते मात्र बीच आणि ओक वृक्षात जमिनीखाली जगण्याची झटापट चालू होते.


ओकची मुळे नसतील तिथे सगळीकडे बीच आपली मुळे पसरवत राहते.त्यातून अन्न आणि पाणीपुरवठा स्वतः कडे खेचून घेतला जातो आणि यामुळे ओक वृक्ष कमकुवत व्हायला लागतो.साधारण दीडशे वर्षांत त्या बीचची उंची ओकहून जास्त होते.आता त्याला सूर्यप्रकाश थेट मिळू लागतो आणि जोमाने वाढ होण्याची शक्ती येते.आपल्या डौलदार पसाऱ्याचा उपयोग करून घेत ९७ टक्के सूर्यप्रकाश तो स्वतःकडे खेचून घेतो आणि ओक वृक्ष दुय्यम दर्जाचा होऊन जातो.त्याचे साखर उत्पादन एकदम कमी होऊ लागते, बचत केलेली ऊर्जा वापरावी लागते आणि हळूहळू ओक अन्नापासून वंचित राहतो.


आता त्याला लक्षात येते की आपल्याला बीचहून उंच वाढता येणार नाही.या भीतीपोटी ओककडून एक चूक होते.ती म्हणजे तो आता नियमाविरुद्ध जाऊन आपल्या पायाशी नवीन फुटवे आणि पाने उगवू लागतो. ही पालवी मोठी आणि मऊ असते व त्याला कमी सूर्यप्रकाश चालून जातो.पण ३ टक्के सूर्यप्रकाश फारच कमी पडतो,कारण तो ओक वृक्ष आहे,बीच नव्हे.आणि काही काळातच ही पालवी झडून जाते व त्यांना तयार करण्याची शक्ती वाया जाते.अशा उपासमारीच्या स्थितीत ओक अजून काही दशकं तग धरू शकतो पण त्यानंतर मात्र त्याची ताकद संपते.आता लाकडात भोक पाडणारे कीटक (वुड बोरिंग बीटल) त्याची सुटका करून देण्यास सरसावतील.हे बीटल आपली अंडी ओकच्या सालात घालतात आणि त्यातून निघणाऱ्या अळ्या झाडाची त्वचा फस्त करण्यास सुरुवात करतात.


तर मग हा खरंच एक अजस्र ओक आहे का एक अगडबंब भित्रा आहे? इतकं दुर्बळ झाड अविचल आणि दीर्घायू असल्याचं कसं भासतं? बीचच्या वृक्षांमध्ये ओक कितीही दुर्बल दिसत असला तरी स्पर्धक नसले की मात्र तो एकदम राकट असतो.आपल्या स्वजातीयांच्या कुशीत उगवलेला बीच फार फार तर दोनशे वर्षे जगतो. पण शेताच्या कडेला उघड्यावर उगवणारा ओक वृक्ष मात्र पाचशेच्या वर वर्ष जगू शकतो.ओक वृक्षाला जर विजेचा धक्का बसून मोठी जखम झाली किंवा त्याचं खोड दुभंगलेलं असेल तर काय होते?


ओकला याचा फार त्रास होत नाही कारण त्यात टॅनिन नावाचे रसायन तयार होते ज्यामुळे जखमेत बुरशीला पोषक वातावरण नसतं आणि बुरशीची विघटन प्रक्रिया संथ होऊन जाते.या टॅनिनमुळे अनेक कीटकही परावृत्त होतात आणि याच टॅनिनमुळे वाइनची चवही खुलते (ओकच्या लाकडापासून बनवलेल्या पिपात वाईन मुरायला ठेवली जाते). जरी मुख्य फांद्या तुटल्या आणि झाडाला खोल जखमा असल्या तरी ओक वृक्ष पुन्हा आपली पालवी पुनरुज्जीवित करू शकतात


आणि अजून एखादं शतकभर तरी तग धरतात.बहुतांश बीच वृक्ष असे करू शकणार नाहीत आणि स्वतःच्या जंगलाच्या बाहेर तर नक्कीच नाही.वादळाने झोडपलेलं कमकुवत झालेलं बीच झाड फार-फार तर एखाद दोन दशकं जगते.मी काम करतो त्या जंगलातील ओक वृक्ष आपण खूप कणखर आहोत असे मिरवितात.तिथे दक्षिणेकडे तोंड केलेल्या एका उबदार उतारावरच्या दगडांना घट्ट पकडून ठेवणारे काही ओक वृक्ष आहेत.उन्हाळ्याचा तीव्र सूर्यप्रकाश त्यावरील सर्व आर्द्रता सुकवून टाकतो आणि थंडीत बोचऱ्या बर्फाने दगड झाकले जातात.त्यामुळे तिथे दगडफूल 'लायकेन' ही वनस्पती अतिशय तुरळक उगवलेली दिसतात आणि पण तिच्यामुळे तापमान नियंत्रित होऊ शकत नाही. याचा परिणाम म्हणजे एका शतकानंतरही त्या उतारावरच्या छोट्या छोट्या झाडांची वाढ जेमतेम आपल्या मनगटाएवढी होते आणि उंची पंधरा फुटापेक्षाही कमी वाढते.त्यांचे स्वजातीय ओक इतरत्र अनुकूल वातावरणात जोमात वाढून कमीत कमी शंभर फूट उंची गाठतात,पण इथल्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांना झुडपांइतक्या उंचीवर समाधान मानावे लागते. पण ते जगतात,काटकसरीने तग धरून राहतात.अशा अस्तित्वाचा मोठा फायदा म्हणजे इतर स्पर्धक टिकत नाहीत.तर असंच म्हणावं लागेल की अभावाच्या जगण्यातही काही फायदा नक्कीच असतो.


बलाढ्य ओक का अजस्त्र भेदरट द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद - गुरुदास नूलकर,

अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन


ओक वृक्षाचे जाड साल हे बीचच्या गुळगुळीत पातळ सालापेक्षा अधिक घाव सहन करू शकते.यावरून जर्मनमध्ये एक म्हण आहे 'जर रानडुकराला ओक वृक्षाच्या खोडावर आपली पाठ घासावी वाटली तर भल्या थोरल्या ओक वृक्षाला काहीच चिंता नसते, त्याला काहीच इजा होणार नाही.


महत्वाची नोंद…


अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ निअरली एव्हरीथिंग,बिल ब्रायसन,अनुवाद-प्रसन्न पेठे,मंजुल पब्लिकेशन


आपलं अस्तित्वच नव्हतं तिथपासून ते आज आपण येथे असेपर्यंतचा सारा प्रवास..


अणू म्हणजे खरं तर प्रचंड मोठे मोकळे अवकाश आहे आणि आसपास जी एक घनता किंवा दरवाजा दिसतो ते खरं म्हणजे मायाच आहे! जेव्हा खऱ्याखुऱ्या सत्यतेच्या जगात दोन वस्तू जवळ येतात (बऱ्याचदा या उदाहरणासाठी बिलीयर्डचे चेंडू वापरले जातात.) ज्या एकमेकांवर आपटत नाहीत. उलट टिमथी फेरीसने समजावून दिल्यानुसार 'उलट ऋणभाराने भारीत असलेली त्यांची क्षेत्रं एकमेकाला एकमेकांपासून दूर ढकलतात! जर त्यांच्यात कुठलाच धन वा ऋण भार नसता, विद्युतक्षेत्र नसतं, तर त्यांनी एकमेकांवर न आदळता उलट दोन आकाशगंगांप्रमाणे एक दुसऱ्यातून आरपार पलीकडे प्रवेश केला असता. ओरखडा न उमटता !' जेव्हा तुम्ही खुर्चीत बसता,तेव्हा तुम्ही खरं तर त्यात बसलेले नसता, तर त्या खुर्चीपासून वर एक अँगस्ट्रॉम (एका सेंटिमीटरचा एक दशलक्ष शंभरावा भाग) इतक्या उंचीवर तरंगत असता! कारण तुमच्यातले इलेक्ट्रॉन्स आणि खुर्चीतले इलेक्ट्रॉन्स एकमेकांना अगदी दृढनिश्चयाने विरोध करत असतात!


स्टीफन हॉकिंग्ज यांनी निरीक्षण नोंदवल्या

नुसार (तेही काहीशा उत्तेजित होऊन), 


'जोपर्यंत आपण विश्वाची सद्यःस्थिती अचूकपणे मोजू शकत नाही,तोपर्यंत आपण भविष्यात काय घडणार आहे,तेही सांगू शकत नाही!


असाही एक हळवा टप्पा


१८०८ साली लेक तुर्कानाच्या परिसरात किमेयुला 'KNM-ER' ही साधारणपणे १७ लाख वर्षांपूर्वीची स्त्री सापडली (सांगाडा) ज्यामुळे शास्त्रज्ञांना हे कळून चुकलं की,होमो इरेक्टस हा मानवसदृश प्राणी फारच कुतूहलपूर्ण आणि गुंतागुंतीचा आहे.आधी वाटला त्यापेक्षाही ! त्या स्त्रीची हाडं ही वेडीवाकडी झालेली होती आणि खडबडीत वाळूखाली झाकली गेली होती. हा परिणाम 'हायपरविटॅमिनॉयीस-ए' नावाच्या एका अत्यंत वेदनादायी स्थितीचा!आणि हे घडतं जेव्हा तुम्ही एखाद्या मांसभक्षी प्राण्याचं यकृत खाता तेव्हा ! याचा अर्थच असा होता की,होमो इरेक्टस हे मांसाहारी होते आणि त्या हाडांची ती विचित्र वाढ दर्शवत होती की,त्या स्त्रीने तो आजार अंगावर बाळगत काही आठवडे किंवा काही महिने काढले असावेत! कदाचित,कुणीतरी तिची देखभाल केली असावी! जिव्हाळा-कणव दाखवण्याच्या मानवी स्वभावाचा पैलू दर्शवणारी त्या मानवसदृश्य प्राण्याच्या उत्क्रांती मधला एक हळवा टप्पा.



१०/२/२५

अनपेक्षित…/ Unexpected

" हे बघ आकाश,एकदाच सांगून ठेवते.यापुढं परत फोन करून मला छळलंस तर याद राख.थेट पोलिस ठाण्यात जाऊन तुझ्याविरुद्ध तक्रारच करते.तुझ्याकडून होणारा मानसिक छळ यापुढं सहन करणार नाही.हा तुझा मला शेवटचा फोन असेल.पुन्हा कधी फोन करायचं धाडस करूच नकोस.आतापर्यंत मी तुला जास्तच सहन केलंय, यापुढं सहन करणार नाही,"असं म्हणून अनितानं रागारागानं फोन कट केला.मनातल्या मनात आकाशला झणझणीत शिवी हासडली आणि मनाचं समाधानं करून घेतलं.


आजचा दिवस अनितासाठी तसा त्रासदायकच होता. खरं तर वटपौर्णिमा म्हणजे महिलांसाठी आनंदाचा उत्सव.सजण्याचा दिवस.हौस-मौज पूर्ण करण्याचा दिवस.अनिताचा नवरा रमेश तिचा महाविद्यालयातील मित्र.दिसायला गव्हाळ वर्ण असला,तरी उत्तम खेळाडू असल्यामुळं शरीरयष्टी भारदस्त.अभ्यासात हुशार, त्यामुळं बऱ्याच मुली त्याच्यावर मरायच्या.अनिता बॅडमिंटन खेळायची.शिक्षण पूर्ण करून सरकारी अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं.अनिता आणि रमेशनं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.दोघांनीही अभ्यासाला चांगलाच जोर दिला.योगायोगानं दोघंही एकाच ग्रंथालयात अभ्यास करायचे.अधून-मधून अभ्यासाबद्दल चर्चा होत राहिली.मधल्या वेळात चहाच्या निमित्तानं मैत्री वाढली.अभ्यासात्मक चर्चा आणि विचारांच्या देवाण-घेवाणीचा दोघांनाही फायदा झालाच, शिवाय एकमेकांविषयी आदरासह मनात ओढही निर्माण झाली.दरम्यानच्या काळात परीक्षा होऊन पहिल्याच प्रयत्नात रमेश तहसीलदार झाला आणि तो प्रशिक्षणासाठी निघून गेला.ग्रंथालयात एकटीनं अभ्यास करताना अनिताला मात्र रमेशची उणीव भासू लागली.


मन त्याच्याच विचारात रुळत होतं.या नात्याला प्रेमाचं नाव द्यावं की मैत्रीच म्हणाव,असं द्वंद्व तिच्या मनात सुरू होतं.काही दिवसांनी एका नातेवाईकानं अनिताच्या घरच्यांना नेमकं रमेशचंच स्थळ सुचविलं.त्यांच्याकडून रमेशबद्दल सविस्तर माहिती कळल्यानंतर आणि मुलगा अधिकारी आहे म्हटल्यावर अनिताच्या घरच्यांनी तिच्या लग्नाचा विचार जास्तच उचलून धरला. अगोदरच अनिताच्या मनात रमेशबद्दल ओलावा होताच, त्यातच घरच्यांकडून रमेशचंच स्थळ आल्याचं कळल्यावर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.ती मनातल्या मनात खूपच सुखावली. त्यामुळे लग्न सहजचरीत्या पार पडलं.अनिताचं पाऊल सासरी पडलं आणि तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली.रमेशचे वडील गावातील प्रतिष्ठित शेतकरी आणि मुलगा अधिकारी,संसारात रमलेल्या अनिताला पुढील शिक्षण घेण्यासाठी घरातून बाहेर पडणं जमलं नाही.लग्नानंतर वर्षभरातच अनिता बाळंतपणासाठी माहेरी गेली.इकडं रमेश आपल्या कामात मग्न राहिला;पण अनिताची ओढ असावी की आणखी काहीही,त्याची नजर कार्यालयातील शीतलकडं आकर्षित झाली. 


कार्यालयीन कामकाजासाठी दररोज भेटणं,दौऱ्यावर सोबत फिरणं वाढलं.रमेश सारखा रुबाबदार अधिकारी आपल्याकडं आकर्षित होत आहे,हे शीतलच्या ध्यानात आलं.काही काळातच त्या दोघांची घनिष्ठ मैत्री आणि नंतर त्याचं रूपांतर प्रेमात झालं.रमेशनं मात्र आपलं लग्न झाल्याचा मागमूसही शीतलला लागू दिला नाही. प्रकरण इतकं पुढं गेलं की,ती गरोदर राहिली.मग मात्र तिनं रमेशच्या मागं लग्नासाठी तगादा लावला.पहिली पत्नी असताना दुसऱ्या लग्नाच्या बंधनात अडकणं शक्य नव्हतं.रमेश दुहेरी कोंडीत सापडला होता.इकडं अनिताला सांगू शकत नव्हता आणि तिकडं शीतलला थांबवू शकत नव्हता.त्याचा परिणाम त्याच्या कामकाजावर होऊ लागला.द्विधा मनःस्थितीमुळं त्याचं कुठंच लक्ष लागेना.वडिलांची गावातील प्रतिष्ठा पणाला लागत होती.अनिताशी प्रतारणा केल्याची भावनाही त्याच्या मनाला टोचत होती,शिवाय कार्यालयातसुद्धा आपल्याविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.या सगळ्या गोंधळातून त्याला काही केल्या बाहेर पडण्याचा मार्ग सुचेना.आपली बदनामी होईल,गावात वडिलांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पत्रकारांना कळलं की,कारवाईला सामोरं जावं लागेल.या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग त्याला दिसत नव्हता. 


शेवटी रमेशनं आत्महत्येचाच पर्याय स्वीकारला.त्याच्या आकस्मित जाण्यामुळं अनिता पुरती हादरून गेली. आपला काहीही दोष नसताना आपल्या वाट्याला असं काही येईल,हे तिला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं. विधवा झालेल्या अनिताच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता.वाट्याला आलेलं दुःख पचवून अनितानं नोकरी करून संसाराची जबाबदारी खांद्यावर घेतली.एकीकडं बाळाचं सूख आणि दुसऱ्या बाजूला नवऱ्याचा वियोग, यामुळं तिचं जग सीमित झालं होतं.नवरा जाऊन सहा-सात महिने झाले.रोजचा दिवस उगवला तसाच मावळत होता.अनिताचं रहाटगाडगं सुरूच होतं. मिरगाच्या पावसाच्या सरी कोसळायला लागल्या,तशा अनिताच्या मनात रमेशच्या आठवणी अधिकच जागू लागल्या.

तोंडावर वटपौर्णिमा आली होती.लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेला रमेशनं केलेलं कौतुक तिला आठवू लागलं.अखेर तो दिवस उजाडला आणि अनिताच्या मनाची घालमेल वाढली.

आजूबाजूच्या सगळ्या सुवासिनी नटूनथटून हिरवी साडी नेसून वडाच्या पूजेला चालल्या होत्या.त्यांच्या समोरूनसुद्धा जायला अनिताला बंधन होतं;पण नोकरीच्या निमित्तानं तिला बाहेर पडावंच लागलं.ती कामावर निघाली असताना सकाळी सकाळी गल्लीतला - आकाश आपल्या गाडीतून सोडतो असं म्हणून तिला भुलवत होता.कामावर सोडण्याच्या बहाण्यानं फिरायला जाऊ असा त्याचा बेत असायचा.रमेश गेल्यानंतर अनिता नोकरीला बाहेर पडल्यापासून आकाशची नजर तिच्याभोवती फिरत होती.

तिलाही ते जाणवत होतं. मदत करण्याच्या बहाण्यानं तो जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा.त्यामुळं अनिता त्याला जाणीवपूर्वक टाळायची.तरीही तिला तो गाडीतून सोडतो म्हणून आग्रह करायचाच.अनिता मात्र एस.टी.नं जाणं पसंत करायची.

एस.टी.तसुद्धा गर्दीत चिमटे काढणारे आणि शेजारी खेटून बसणारे काही कमी नव्हते.तसं या बोचणाऱ्या नजरा अन् काटेरी स्पर्श अनितासाठी नवीन नव्हतं.अनिता जरा जरी कुणा पुरुषासोबत बोलताना दिसली की,गावभर चर्चा सुरू व्हायची. 


पुरुषच काय गावातील बायकासुद्धा तिला टोचून बोलायच्या.घरची परिस्थिती चांगली असताना अनितानं नोकरी करायची गरजच काय,असं गल्लीतल्या लोकांना वाटायचं.एवढं शिक्षण झाल्यावर घरी बसून राहणं अनिताला कठीण जात होतं.तिच्या विधवा होण्यात तिचा किती आणि काय दोष होता? नवऱ्याच्या माघारी सासरे शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर चालविणार आणि त्यांच्या माघारी अनिताला शेती करणं जमणार नव्हतं म्हणून त्यांनीच अनिताला नोकरी करायला सुचविलं.खेडेगावातून रोज एस.टी.नं शहरात येऊन नोकरी करायची आणि परत जाऊन घर सांभाळायचं अनितासाठी सोपं नव्हतं.


आयुष्याच्या बागेतून वावरताना सगळ्यांनी मुलायम गालीच्यावरून चालावं आणि विधवांनी मात्र काटेरी तारेवर कसरत का करीत जगावं ? हे समाजानं बांधलेलं कुंपण अनिताच्या मनाला रोज रक्तबंबाळ करायचं.नेहमीप्रमाणं संध्याकाळी ऑफिस संपल्यावर उदास मनानं अनितानं घरची वाट धरली.घरी तिचा मुलगा आतुरतेनं वाट पाहतोय,हीच तिच्यासाठी एक जगण्याची उमेद होती.अनिता उंबऱ्यातून आत पाऊल टाकताच तिच्या लेकरानं दुड्डूदुडू पळत येणं,तिच्या पायाशी बिलगनं,कडेवर बसणं हेच काही तिच्यासाठी सुखाचं क्षण होतं.आज मात्र घरात येताच तिचा मुलगा धावत पायाशी आला नाही.आश्चर्यानं तिनं समोर बघितलं तर नातू आजीच्या कडेवर बसून हसत होता. आई येताच त्यानं तिच्याकडं झेप घेतली.


वाघीण,प्रतिक पाटील,स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर


घरात अनिताचं आई-वडील आलेलं.बैठकीच्या खोलीत रमेशचा मित्र सुरेशपण बसलेला.सुरेश गेल्याच वर्षी फौजदार झाला होता.अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून कष्ट करणाऱ्या अनेक मराठा तरुणांपैकी एक असलेला सुरेश मेरीटच्या शर्यतीत कधीच मागं पडत नव्हता;पण आरक्षणाचं अडथळं पार करता करता बऱ्याचदा तो ठेचकाळून पडला.त्यामुळं यशाची सीमारेषा पार करायला त्याला आयुष्याची अठ्ठाविशी गाठावी लागली.

अधिकारी झाल्यानंतर सुरेशनं लग्नासाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला;तो म्हणजे त्याच्या बालपणापासूनचा मित्र रमेशची विधवा पत्नी अनिताशी लग्न करून तिच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायचा.

त्यासाठी प्रथम त्यानं स्वतःच्या आई-वडिलांची समजूत घातली.अनिताच्या आई-वडिलांची संमती घेतली आणि चौघांनी मिळून अनिताच्या सासू-सासऱ्यांना अनिताचं सुरेशशी लग्न लावून देण्याबाबत समजावलं.शेतकरी असलेले अनिताचे सासरे गावातील आपल्या घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी सुरुवातीला या गोष्टीसाठी तयार नव्हते. अनिताचं आई-वडील आग्रह करू शकत नव्हतं;पण सुरेशच्या आई-वडिलांनी अनिताच्या सासू-सासऱ्यांची मनधरणी केली.पंचविशीत विधवा झालेल्या अनिताला आयुष्यभर वाळवंटात चालायला सोण्यापेक्षा तिचा हात सुरेशच्या हातात सोपवून एक क्रांतिकारी पाऊल उचलावं,या मतावर अनिताचे सासरे तयार झाले. मुलाची जबाबदारी त्यांनी स्वतःकडं घेतल्यामुळं अनिताला सुरेशसोबत लग्न करण्यास नकार द्यायला कारणच उरलं नाही.सकाळपासून मनात खच्चून भरलेला ताण संध्याकाळी मात्र निघून गेला.पण अनपेक्षित घडलेल्याया प्रकारामुळे तिला त्या दिवशी हसावं की रडावं,समजत नव्हतं.

८/२/२५

अंधारातला नेम A name in the dark

एकदा दरवाजा फोडून तो आत घुसला होता,पण आतल्या माणसाच्या सुदैवाने त्या घराला दोन खोल्या होत्या व आतल्या खोलीच्या दरवाजाने मात्र बिबळ्याच्या ताकदीपुढे टिकाव धरला.

आंब्याच्या झाडावरच्या त्या मचाणावरची,दहावी रात्र काढून मी परत आलो आणि इबॉटसनशी पुढे काय करायचं याबद्दल चर्चा केली.

देशभरातल्या कोणत्याही शिकाऱ्यांकडून पुढे काही संपर्क झाला नव्हता आणि कोणीही नव्याने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नव्हता.इबॉटसन किंवा मी दोघांनाही आणखी काही दिवस रुद्रप्रयागला घालवणं शक्य नव्हतं.


इबॉटसन फार दिवस त्याच्या हेडक्वॉर्टर्सपासून दूर राहीला होता आणि त्याला तातडीच्या कामासाठी पौरीला जावं लागणार होतं.मलाही काही कामासाठी आफ्रिकेला जावं लागणार होतं.मी अगोदरच तिथलं काम तीन महिने पुढे ढकललं होतं आणि यापेक्षा जास्त उशीर करणं परवडणार नव्हतं.पण हेही तितकच खरं होतं की आम्हाला दोघांनाही गढवाली जनतेला नरभक्षकाच्या दयेवर जगायला,वाऱ्यावर सोडून निघून जायची इच्छा नव्हती.आहे त्या परिस्थितीत निर्णय घेणं फार अवघड होतं.इबॉटसनने रजेसाठी अर्ज करणे व माझं आफ्रिकेला जाणं रद्द करून नुकसान कमी करणे हा एकमेव पर्याय होता.शेवटी आम्ही ठरवलं की उद्या या विषयावर निर्णय घ्यायचा व पुढे काय करायचं ते ठरवायचं.एकदा या निर्णयावर आल्यावर मी इबॉटसनला सांगितलं की ही शेवटची रात्र मी आंब्याच्या झाडावर काढणार आहे.या अकराव्या व शेवटच्या दिवशी संध्याकाळी इबॉटसन माझ्याबरोबर आला. गुलाबराईत आल्या आल्याच आम्हाला आंब्याच्या झाडापलीकडे रस्त्याच्या कडेला एका शेताच्या दिशेने बघत असलेली काही माणसं दिसली.त्यांनी आम्हाला पाहिलं नव्हतं.आम्ही तिथं आल्यावर ते वळले व शेल्टर्सकडे जायला लागले.त्यातल्या एकाने जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा मी त्याला बोलावलं. आमच्या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला की तो आणि त्याचे सोबती जवळजवळ तासभर दोन सापांची लढाई चाललेली पाहत होते.जवळ जवळ वर्षभर तरी त्या शेतात काही लागवड झाली नव्हती.ते साप त्या शेताच्या मध्यावर असलेल्या एका मोठ्या खडकाकडे गेलेले त्यांनी शेवटचं पाहिलं होतं.त्या खडकावर रक्ताचे फरकाटे होते व त्या माणसाच्या म्हणण्याप्रमाणे ते सापाचंच रक्त होतं कारण त्यांनी एकमेकांना खूप ठिकाणी चावे घेतले होते.


जवळच्याच झुडुपाची एक काठी तोडून मी शेतात उडी मारली आणि त्या खडकाजवळ काही बिळं वगैरे दिसतायत का ते बघायला गेलो.तेवढ्यात रस्त्याच्या खालच्या एका झुडुपात ते दोन साप मला दिसले. इबॉटसननेही मधल्या काळात एक काठी पैदा केली होती आणि त्यातला एक साप रस्त्यावर चढून जात असताना त्याने तो मारला.दुसरा मात्र बांधावर एका बिळात अदृश्य झाला.इबॉटसनने मारलेला साप जवळजवळ सात फूट लांबीचा होता आणि एकसारख्या गवती रंगाचा होता.त्याच्या मानेवर चावे घेतल्याचा बऱ्याच जखमा होत्या.ती धामण तर नक्कीच नव्हती आणि त्याला विषाचे दात होते त्यावरून आम्ही निष्कर्ष काढला की ही कोणती तरी बिनफण्याची नागाची जात असावी.


थंड रक्ताच्या प्राण्यांना विषाची बाधा होते हे नक्की,कारण साप चावलेला एक बेडूक काही मिनिटात मेलेला मी पाहिला आहे.पण एकाच जातीच्या दोन सापांना एकमेकांपासून विषबाधा होते की नाही ते मात्र मला माहीत नाही.त्यामुळे जो साप बिळात अदृश्य झाला होता तो काही मिनिटात मेला असेल किंवा त्याला पुढे केव्हातरी नैसर्गिक मृत्यू आला असेल.


इबॉटसन निघून गेल्यानंतर पंडित हातात दुधाच्या किटल्या घेऊन पिलग्रिम शेल्टर्सकडे जाताना माझ्या झाडाजवळूनच गेला.जाताना त्याने सांगितलं की आज जवळजवळ दीडशे यात्रेकरू आलेत आणि आजची रात्र इकडेच काढण्याचा त्यांचा निश्चय आहे आणि या क्षणीतरी त्याबाबत काहीही करणं शक्य नाहीये.मलाही काही करता येणं शक्य नव्हतं तेव्हा मी त्याला एवढंच सांगितलं की सर्वांना एकमेकांच्या जवळ राहायला सांग व कोणत्याही परिस्थितीत अंधार पडल्यावर बाहेर पडू नका असं बजाव ! काही मिनिटांनी जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने मला सांगितलं की मी सांगितल्याप्रमाणे त्याने यात्रेकरूंना तशी सूचना दिली आहे.रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात,माझ्या झाडापासून शंभर यार्डावर एक काटेरी झुडुपाचं कुंपण होतं आणि त्यात एका ओझीवाल्याने (आपला तो जुना मित्र नव्हे) आज संध्याकाळीच त्याचा शेळ्यामेंढ्यांचा कळप घेऊन मुक्काम ठोकला होता. त्याच्याबरोबर त्याचे दोन कुत्रे होते.आम्ही इकडे येत असताना आणि मला सोडून इबॉटसन बंगल्याकडे परत जात असताना ते खूप जोरजोरात भुंकले होते.


पौर्णिमा होऊन काही दिवसच झाले होते व गंगेचं खोरं अजूनही अंधारातच होतं.तेवढ्यात साधारण नऊ वाजल्यानंतर मला पिलग्रिम शेल्टरमधून कंदील घेऊन बाहेर पडणारा एक माणूस दिसला.त्याने रस्ता ओलांडला व मिनिटा दोन मिनिटांनी परत रस्ता ओलांडला.

शेल्टरमध्ये परतल्यावर त्याने कंदील विझवला आणि त्याचक्षणी ते ओझीवाल्याचे कुत्रे जोरजोरात भुंकू लागले.हे कुत्रे बिबळ्याला पाहूनच भुंकत होते यात शंकाच नव्हती;बिबळ्याने बहुतेक कंदील घेऊन रस्त्यावर आलेल्या माणसाला पाहिलं असणार आणि आता तो पिलग्रिम शेल्टरकडेच जात असणार.


प्रथम भुंकताना ते कुत्रे रस्त्याकडे बघत होते पण थोड्यावेळाने ते वळून माझ्याच दिशेला बघत भुंकायला लागले.याचा अर्थ बिबळ्याने बोकडाला पाहिलं असणार आणि दबकत झाडाकडे येत असल्याने कुत्र्यांच्या दृष्टिआड झाला असणार कारण आता ते कुत्रे भुंकायचे थांबले होते.मला माहीत होतं की बिबळ्या आलाय.मला हेही कळलं होतं की तो बोकडाकडे दबा धरून येताना लपंण म्हणून माझ्याच झाडाचा वापर करतोय.जशी जशी मिनिटं जात होती तसा तसा मला एकच प्रश्न अस्वस्थ करत होता की तो बोकडाला ओलांडून एखाद्या यात्रेकरूला मारणार की बोकडाला मारण्याच्या प्रयत्नात मला संधी देणार !त्या मचाणावर इतक्या रात्री घालवल्यावर मी अशा विशिष्ट स्थितीत बसण्याची सवय करून घेतली होती की कमीत कमी हालचालीत आणि कमीत कमी वेळात मी रायफलचा ट्रिगर दाबू शकेन.बोकड व माझं मचाण यात फक्त वीस फूट अंतर होतं,पण झाडाच्या पानोळ्याच्या सावलीमुळे इतका अंधार होता की मला तेवढ्या अंतरावरचं सुद्धा दिसू शकत नव्हतं... म्हणून मी डोळे मिटले आणि आता सर्व लक्ष आवाजावर केंद्रित केलं.


माझ्या रायफलला मी छोटा विजेचा टॉर्च लावला होता आणि रायफलच्या नळीचं तोंड बोकडाच्याच दिशेला होतं.आता हा बिबळ्या (तो नरभक्षकच आहे असं गृहीत धरलं तर) शेल्टरपर्यंत पोचला असेल व नरबळीची निवड करत असेल असा विचार मी करतोय तेवढ्यात माझ्या झाडाखाली काहीतरी धडपड झाली आणि बोकडाच्या गळ्यातल्या घंटेचा झाला.टॉर्चचं बटन दाबल्यावर साईट्स बिबळ्याच्या खांद्यावरच रोखल्या गेल्या आहेत.तेव्हा रेसभरही रायफल न हलवता मी ट्रिगर दाबला... त्याचक्षणी टॉर्च बंद झाला !


त्याकाळी आजच्या इतके टॉर्चेस सर्रास वापरले जात नव्हते.मीही हा टॉर्च पहिल्यांदाच वापरत होतो.कित्येक वेळेला मी तो माझ्याबरोबर घेऊन फिरलो होतो,पण वापरायची वेळच आली नव्हती.मला बॅटरीचं लाईफ माहीत नव्हतं आणि ते तपासायचं असतं याचीही कल्पना नव्हती.यावेळी मी बटन दाबल्यावर टॉर्चमधून मंद प्रकाश बाहेर पडला व तो बंद झाला.परत एकदा माझ्या डोळ्यासमोर अंधारच अंधार झाला. आता माझ्या शॉटचं काय झालंय हेही मला कळेना. माझ्या शॉटचे प्रतिध्वनी खोऱ्यात घुमताहेत तेवढ्यात पंडितने त्याच्या घराचा दरवाजा उघडला व काही मदत पाहिजे का असं ओरडून विचारलं.


बिबळ्याकडून काही आवाज येतोय का हे मी इतकं कानात तेल घालून ऐकत होतो की मी त्याला काही उत्तर दिलं नाही तसा त्याने दरवाजा लावून घेतला.मी जेव्हा ट्रिगर दाबला होता तेव्हा बिबळ्या रस्त्यावरच माझ्यापासून दूर तोंड करून होता व शॉट मारल्याबरोबर बोकडाच्या अंगावरून उडी मारून तो डोंगराखाली गेल्याचं मला पुसटसं दिसलं होतं आणि पंडितने हाक मारण्याच्या जरासं अगोदर मला घशातल्या घशात गुरगुरल्यासारखा आवाजही ऐकल्यासारखा वाटत होता. पण तो आवाज नक्की बिबळ्याचाच आहे किंवा नाही याबद्दल मला खात्री वाटत नव्हती.शॉटच्या आवाजामुळे यात्रेकरूंची झोप जरा मोडली होती,पण काही मिनिटं कुजबुज करून झाल्यावर ते सर्वजण परत झोपी गेले.


बोकड मात्र ठणठणीत होता कारण गळ्यातल्या घंटेच्या आवाजावरूनच कळत होतं की तो इकडे तिकडे फिरून आम्ही त्याच्यासाठी ठेवलेलं गवत खातोय.


मी दहा वाजता शॉट मारला होता.अजून काही तास तरी चंद्र उगवणार नव्हता आणि त्या काळात मला काहीच करता येणार नसल्याने कान लावून ऐकत,सिगरेट ओढत मी जरा आरामशीर बसलो.काही तासांनी गंगेपलीकडच्या डोंगरशिखरावर चंद्रप्रकाश चमकू लागला आणि हळूहळू खोऱ्यात सर्वत्र पसरू लागला.चंद्र डोक्यावर आल्यावर मी झाडाच्या शेंड्यापर्यंत चढलो,पण पसरलेल्या फांद्यामुळे खालचं काहीच दिसेना.


१५.०१.२५ या लेखातील पुढील दुसरा भाग..राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….