गावातला बापूंचा वाडा प्रसिद्ध वाड्यांपैकी एक होता. गल्लीच्या मध्यभागी चौसोपी असा भव्य वाडा प्रथमदर्शनीच मोठा प्रेक्षणीय वाटे.बघताक्षणीच त्याची छाप पडे.गल्लीत महादेवाचं,दत्ताचं आणि मारुतीचं अशी तीन देवळं होती.पण गावात दुसऱ्या एका परदेशी गल्लीच्या जवळच्या गल्लीतसुद्धा तीन देवळं होती. म्हणून तिला 'तीन देवळांची गल्ली' म्हणत.पूर्वी बापूंच्या वाड्याच्या गल्लीला 'देशपांड्यांची गल्ली' असं नाव होतं.बहुदा पूर्वी गल्लीत बहुसंख्य देशपांड्यांची घरं असावीत.बापूंचा वाडा हा खरं तर त्यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचा.त्यांचंही आडनाव देशपांडेच.ते गेल्यावर हा एवढा मोठा वाडा सुनसान पडला होता. बापू रेव्हेन्यू खात्यात होते.त्यामुळे दर पाच वर्षांनी त्यांच्या बदल्या होत.
जिल्ह्यातल्या एकूण एक तालुक्याच्या गावी त्यांचं वास्तव्य झालं.रिटायरमेंटनंतर सध्याच्या गावी राहायला जायचा विचार असल्याने बापूंनी तो कुलूपबंद ठेवला होता.गावातल्याच काही उपद्रवी मुलांनी बाहेरच्या भिंतींवर खोडसाळपणे मोठ्या अक्षरांत 'भुताचा वाडा' असं लिहून ठेवलं होतं.
बापू चांदवडला मामलेदार म्हणून काम करत असतानाची गोष्ट.
एका रविवारी ते माईंबरोबर बोलत असताना सकाळीसकाळी दोन तरुण भेटायला आले. त्यांनी त्यांची ओळख सांगितली.बापूंना जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या महत्त्वाच्या कुटुंबांची माहिती होती.शिवाय त्यांची स्मरणशक्तीसुद्धा विलक्षण तीक्ष्ण असल्याने त्यांची माहिती सविस्तर आणि विश्वसनीय असे.ह्या तरुणांनी ओळख सांगताच ते भाईजींच्या पाच मुलांपैकी दोन मोठे असल्याचं बापूंच्या लगेच लक्षात आलं.भाईजी हे मारवाडी समाजातील एक सज्जन व्यापारी होते.सध्या धंद्यातील चढउतारांमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती.भाईजींच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडल्याचंही बापूंच्या कानावर आलं होतं.त्या काळी जिल्ह्यामध्ये एका दरोडेखोराने भयंकर उच्छाद मांडला होता.तो व्यापाऱ्यांच्या कुटुंबावर दरोडे घाली.लुटालूट करी. नुसतीच लुटालूट करत नव्हता तर जाताना कुटुंबप्रमुखाचं नाक वस्तऱ्याने कापून मगच तिथून निघून जात असे. 'त्या नाकांची माळ करून ती मी नासिक इथल्या सरकारवाड्याला घालीन!' असा पण त्याने केला होता म्हणे ! एका छोट्याशा गावात सचोटीने व्यापार करणाऱ्या भाईजींच्या घरावर त्या दरोडेखोराने दरोडा घातला.लुटीबरोबर त्याने भाईजींचं नाकही कापून नेलं.त्या दोघांनी आपलं इथे येण्याचं कारण बापूंना सांगितलं. त्यांना राहायला जागा हवी होती.बापूंनी विचार केला, कुटुंब माहितीतलं आणि चांगलं आहे.त्यांच्या इथे राहण्यामुळे वाडाही वावरता राहील.आपोआपच देखभालही होईल.म्हणून त्यांनी वाडा भाड्याने दिला. मात्र काही वर्षांनी आपण निवृत्त झाल्यावर इथेच राहायला येणार हे लक्षात घेऊन त्यांनी वाड्याचा दर्शनी भाग स्वतः साठी राखून ठेवला आणि मागचा अर्धा भाग त्या मुलांना भाड्याने दिला.बापू निवृत्त होऊन तिथे राहायला जाईपर्यंत ते मारवाडी कुटुंब तिथे चांगलं स्थिरावलं.
नुसतंच स्थिरावलं असं नाही तर विस्तारलंसुद्धा.भाईजी आणि आजी ह्यांना एकूण पाच मुलं.त्या मुलांनाही बरीच मुलं.त्यात बापूंच्या तिघांची भर पडून अंदाजे पंधराएक मुलं तरी त्या वाड्यात झाली.गावगोत - माधव सावरगांकर,प्रकाशक संजय शिंदे,अष्टगंध प्रकाशन,ठाणे…!
भाईजींच्या थोरल्या मुलाला घरात बाबाजी म्हणत.बापू आणि गावातले काही लोकही त्यांना बाबाजीच म्हणत. बापूंची मुलं कधी त्यांना बाबाजी तर कधी मामाजी म्हणत.बाबाजी एक आदर्श कुटुंबप्रमुख होते.आपल्या आणि आपल्या भावांच्या कुटुंबात किंवा त्यांच्या मुलांत त्यांनी कधीच भेदभाव केला नाही.मधल्या दालनात भिंतीला टेकून बसलेले आणि आजूबाजूच्या वेगवेगळ्या वयांच्या आणि इयत्तांच्या मुलांचा अभ्यास घेणारे बाबाजी आजही यशाच्या डोळ्यांसमोर येतात.पाची भावांचा आपसातला एकोपाही वाखाणण्याजोगा होता.एवढ्या मोठ्या कुटुंबात बायका-बायकांत अथवा मुलांमध्ये कुरबुरी होणं स्वाभाविक होतं.पण त्या भावांपर्यंत कधीच पोहचत नसत आणि पोहचल्या तरी पाची भाऊ त्याचा ना आपसात उल्लेख करत ना त्यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधावर कधी परिणाम झाला.
सगळ्यात मोठी सून म्हणजे बाबाजींची पत्नी.म्हणजे मोठ्या बिन्नी.सगळी मुलं त्यांना 'मोठी माँ' म्हणत. बापूंची मुलं त्यांचा उल्लेख 'मोठ्या बिन्नी' असा करत असली तरी त्यांना संबोधताना 'मोठी माँ' असंच म्हणत.
पिवळा किंवा लाल घागरा,त्यावर तशीच गर्द रंगाची ओढणी असा मोठी माँचा पेहराव असे.सगळ्या वाड्यात आणि कुठल्याही विषयांत त्यांचा मुक्त संचार असे. मोठी माँच्या हालचालीदेखील खूप चपळ असत. त्यामुळे बापू त्यांना गमतीने 'पंजाब मेल' म्हणत.बापूंचा सगळ्या वाड्यात चांगलाच दरारा असे.कुठे बाहेरगावी जाताना किंवा जाऊन आल्यावर अथवा कुठल्याही सणावाराला त्यांच्या घरातलीच काय,पण मारवाडी कुटुंबातली सगळी मंडळी प्रथम बापूंना नमस्कार करत. बापूंना नमस्कार करणं हासुद्धा एक समारंभच असे.
बापू ओसरीवर बनियन-धोतर नेसून पेपर वाचत अथवा पान खात बसलेले असत.कुणी नमस्कार करायला आला की,बापू सावकाश उठत.खुंटीवरची टोपी काढून डोक्यावर ठेवत.नंतर नमस्कार स्वीकारून तोंड भरून आशीर्वाद देत.मोठी माँचा मात्र खाक्याच वेगळा.त्या नेहमीप्रमाणे घाईघाईने येत.
खुंटीवरची टोपी काढून बापूंच्या डोक्यावर ठेवत.
नमस्कार करीत आणि बापूंच्या डोक्यावरून टोपी काढून परत खुंटीवर ठेवत.कधी कधी बापूंचा आशीर्वाद संपेपर्यंत मोठी माँ वाड्याच्या बाहेरच्या अंगणात गेलेल्या असत.
सर्व मुलांवर सुलतानाप्रमाणे मोठी माँची अनिर्बंध सत्ता चालत असे.परसदारी आडाजवळच्या मोरीत मुलांना आंघोळी घालणं हा तर जुल्माचा अतिरेक असायचा. दिसलं पोरगं की,धर त्याला नि घाल दोन तांबे त्याच्या अंगावर,असा मोठी माँचा कार्यक्रम असे.
शंकर तर म्हणे, 'ह्या कामाच्या सपाट्यात कधी एखादुसऱ्या मुलाला त्या दोनदोनदा आंघोळ घालत असतील !'
मोठी माँ स्वभावाने मात्र फारच मऊ होत्या.एवढ्या तेवढ्या गोष्टींनी त्यांच्या डोळ्यांत टचकन् पाणी येई. माँचं वाड्याच्या बाहेर पडणं फारसं होत नसे.फक्त गावात गुरुमहाराज आले की,त्या प्रवचनाला, स्थानकात (जैनांचं प्रार्थनास्थळ) नियमित जात.दर शिवरात्रीला मात्र वाड्यातल्याच पंधरावीस मुलांचा घोळका बरोबर घेऊन त्या एसटी स्टँडजवळच्या गुऱ्हाळात उसाचा रस प्यायला घेऊन जात.मोठी माँ स्वतः फारशा शिकलेल्या नव्हत्या.पण बाबाजींचं सगळ्या मुलांना दररोजचं जवळ बसवून शिकवणं आणि घरातल्या दहाबारा मुलांचं शाळेला जाणं किंवा मुलांचं घरातल्या मोकळ्या आणि शांत जागी अभ्यास करत असलेलं दृश्य नेहमी दिसत असल्यामुळे माँना शिक्षणाचं महत्त्व चांगलंच माहीत होतं. त्यांचा स्वतःचा मुलगा शांतिलाल आणि मुलगी पुष्पा खूप हुशार होते. शिवाय प्रकाश आणि मदन हे दोघे पुतणेही अभ्यासात फार पुढे होते.शांतिलाल आणि प्रकाश हे यशाच्या बरोबरीचे.प्रकाश तर बहुतांशी बापू राहत असलेल्या भागातच असायचा.त्याला यशाच्या घरची कालवणं आवडायची.प्रकाश त्याच्या घरातून ताट वाढून घेऊन यायचा आणि यशाच्या पंक्तीला बसायचा. दोन्ही घरांचा घरोबा दृष्ट लागण्यासारखा होता.पुढच्या पिढीनेही तो जपला.एकदा फारच मजेशीर प्रसंग घडला. वार्षिक परीक्षा जवळ आली होती.
वाड्यावरची सगळी मुलं कसून अभ्यासाला लागली होती.मोठी माँ सगळ्या मुलांची काळजी स्वतःघेत होत्या किंवा इतर जावांकडून करवून घेत होत्या.त्यात पहाटे उठणाऱ्या मुलांना चहा देणं,त्यांच्या जेवणाची वेळ सांभाळणं,रात्री त्यांना आठवणीने दूध देणं वगैरे बाबी असत.परीक्षा एका दिवसावर आली होती.
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!