* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: अनपेक्षित…/ Unexpected

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१०/२/२५

अनपेक्षित…/ Unexpected

" हे बघ आकाश,एकदाच सांगून ठेवते.यापुढं परत फोन करून मला छळलंस तर याद राख.थेट पोलिस ठाण्यात जाऊन तुझ्याविरुद्ध तक्रारच करते.तुझ्याकडून होणारा मानसिक छळ यापुढं सहन करणार नाही.हा तुझा मला शेवटचा फोन असेल.पुन्हा कधी फोन करायचं धाडस करूच नकोस.आतापर्यंत मी तुला जास्तच सहन केलंय, यापुढं सहन करणार नाही,"असं म्हणून अनितानं रागारागानं फोन कट केला.मनातल्या मनात आकाशला झणझणीत शिवी हासडली आणि मनाचं समाधानं करून घेतलं.


आजचा दिवस अनितासाठी तसा त्रासदायकच होता. खरं तर वटपौर्णिमा म्हणजे महिलांसाठी आनंदाचा उत्सव.सजण्याचा दिवस.हौस-मौज पूर्ण करण्याचा दिवस.अनिताचा नवरा रमेश तिचा महाविद्यालयातील मित्र.दिसायला गव्हाळ वर्ण असला,तरी उत्तम खेळाडू असल्यामुळं शरीरयष्टी भारदस्त.अभ्यासात हुशार, त्यामुळं बऱ्याच मुली त्याच्यावर मरायच्या.अनिता बॅडमिंटन खेळायची.शिक्षण पूर्ण करून सरकारी अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं.अनिता आणि रमेशनं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.दोघांनीही अभ्यासाला चांगलाच जोर दिला.योगायोगानं दोघंही एकाच ग्रंथालयात अभ्यास करायचे.अधून-मधून अभ्यासाबद्दल चर्चा होत राहिली.मधल्या वेळात चहाच्या निमित्तानं मैत्री वाढली.अभ्यासात्मक चर्चा आणि विचारांच्या देवाण-घेवाणीचा दोघांनाही फायदा झालाच, शिवाय एकमेकांविषयी आदरासह मनात ओढही निर्माण झाली.दरम्यानच्या काळात परीक्षा होऊन पहिल्याच प्रयत्नात रमेश तहसीलदार झाला आणि तो प्रशिक्षणासाठी निघून गेला.ग्रंथालयात एकटीनं अभ्यास करताना अनिताला मात्र रमेशची उणीव भासू लागली.


मन त्याच्याच विचारात रुळत होतं.या नात्याला प्रेमाचं नाव द्यावं की मैत्रीच म्हणाव,असं द्वंद्व तिच्या मनात सुरू होतं.काही दिवसांनी एका नातेवाईकानं अनिताच्या घरच्यांना नेमकं रमेशचंच स्थळ सुचविलं.त्यांच्याकडून रमेशबद्दल सविस्तर माहिती कळल्यानंतर आणि मुलगा अधिकारी आहे म्हटल्यावर अनिताच्या घरच्यांनी तिच्या लग्नाचा विचार जास्तच उचलून धरला. अगोदरच अनिताच्या मनात रमेशबद्दल ओलावा होताच, त्यातच घरच्यांकडून रमेशचंच स्थळ आल्याचं कळल्यावर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.ती मनातल्या मनात खूपच सुखावली. त्यामुळे लग्न सहजचरीत्या पार पडलं.अनिताचं पाऊल सासरी पडलं आणि तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली.रमेशचे वडील गावातील प्रतिष्ठित शेतकरी आणि मुलगा अधिकारी,संसारात रमलेल्या अनिताला पुढील शिक्षण घेण्यासाठी घरातून बाहेर पडणं जमलं नाही.लग्नानंतर वर्षभरातच अनिता बाळंतपणासाठी माहेरी गेली.इकडं रमेश आपल्या कामात मग्न राहिला;पण अनिताची ओढ असावी की आणखी काहीही,त्याची नजर कार्यालयातील शीतलकडं आकर्षित झाली. 


कार्यालयीन कामकाजासाठी दररोज भेटणं,दौऱ्यावर सोबत फिरणं वाढलं.रमेश सारखा रुबाबदार अधिकारी आपल्याकडं आकर्षित होत आहे,हे शीतलच्या ध्यानात आलं.काही काळातच त्या दोघांची घनिष्ठ मैत्री आणि नंतर त्याचं रूपांतर प्रेमात झालं.रमेशनं मात्र आपलं लग्न झाल्याचा मागमूसही शीतलला लागू दिला नाही. प्रकरण इतकं पुढं गेलं की,ती गरोदर राहिली.मग मात्र तिनं रमेशच्या मागं लग्नासाठी तगादा लावला.पहिली पत्नी असताना दुसऱ्या लग्नाच्या बंधनात अडकणं शक्य नव्हतं.रमेश दुहेरी कोंडीत सापडला होता.इकडं अनिताला सांगू शकत नव्हता आणि तिकडं शीतलला थांबवू शकत नव्हता.त्याचा परिणाम त्याच्या कामकाजावर होऊ लागला.द्विधा मनःस्थितीमुळं त्याचं कुठंच लक्ष लागेना.वडिलांची गावातील प्रतिष्ठा पणाला लागत होती.अनिताशी प्रतारणा केल्याची भावनाही त्याच्या मनाला टोचत होती,शिवाय कार्यालयातसुद्धा आपल्याविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.या सगळ्या गोंधळातून त्याला काही केल्या बाहेर पडण्याचा मार्ग सुचेना.आपली बदनामी होईल,गावात वडिलांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पत्रकारांना कळलं की,कारवाईला सामोरं जावं लागेल.या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग त्याला दिसत नव्हता. 


शेवटी रमेशनं आत्महत्येचाच पर्याय स्वीकारला.त्याच्या आकस्मित जाण्यामुळं अनिता पुरती हादरून गेली. आपला काहीही दोष नसताना आपल्या वाट्याला असं काही येईल,हे तिला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं. विधवा झालेल्या अनिताच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता.वाट्याला आलेलं दुःख पचवून अनितानं नोकरी करून संसाराची जबाबदारी खांद्यावर घेतली.एकीकडं बाळाचं सूख आणि दुसऱ्या बाजूला नवऱ्याचा वियोग, यामुळं तिचं जग सीमित झालं होतं.नवरा जाऊन सहा-सात महिने झाले.रोजचा दिवस उगवला तसाच मावळत होता.अनिताचं रहाटगाडगं सुरूच होतं. मिरगाच्या पावसाच्या सरी कोसळायला लागल्या,तशा अनिताच्या मनात रमेशच्या आठवणी अधिकच जागू लागल्या.

तोंडावर वटपौर्णिमा आली होती.लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेला रमेशनं केलेलं कौतुक तिला आठवू लागलं.अखेर तो दिवस उजाडला आणि अनिताच्या मनाची घालमेल वाढली.

आजूबाजूच्या सगळ्या सुवासिनी नटूनथटून हिरवी साडी नेसून वडाच्या पूजेला चालल्या होत्या.त्यांच्या समोरूनसुद्धा जायला अनिताला बंधन होतं;पण नोकरीच्या निमित्तानं तिला बाहेर पडावंच लागलं.ती कामावर निघाली असताना सकाळी सकाळी गल्लीतला - आकाश आपल्या गाडीतून सोडतो असं म्हणून तिला भुलवत होता.कामावर सोडण्याच्या बहाण्यानं फिरायला जाऊ असा त्याचा बेत असायचा.रमेश गेल्यानंतर अनिता नोकरीला बाहेर पडल्यापासून आकाशची नजर तिच्याभोवती फिरत होती.

तिलाही ते जाणवत होतं. मदत करण्याच्या बहाण्यानं तो जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा.त्यामुळं अनिता त्याला जाणीवपूर्वक टाळायची.तरीही तिला तो गाडीतून सोडतो म्हणून आग्रह करायचाच.अनिता मात्र एस.टी.नं जाणं पसंत करायची.

एस.टी.तसुद्धा गर्दीत चिमटे काढणारे आणि शेजारी खेटून बसणारे काही कमी नव्हते.तसं या बोचणाऱ्या नजरा अन् काटेरी स्पर्श अनितासाठी नवीन नव्हतं.अनिता जरा जरी कुणा पुरुषासोबत बोलताना दिसली की,गावभर चर्चा सुरू व्हायची. 


पुरुषच काय गावातील बायकासुद्धा तिला टोचून बोलायच्या.घरची परिस्थिती चांगली असताना अनितानं नोकरी करायची गरजच काय,असं गल्लीतल्या लोकांना वाटायचं.एवढं शिक्षण झाल्यावर घरी बसून राहणं अनिताला कठीण जात होतं.तिच्या विधवा होण्यात तिचा किती आणि काय दोष होता? नवऱ्याच्या माघारी सासरे शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर चालविणार आणि त्यांच्या माघारी अनिताला शेती करणं जमणार नव्हतं म्हणून त्यांनीच अनिताला नोकरी करायला सुचविलं.खेडेगावातून रोज एस.टी.नं शहरात येऊन नोकरी करायची आणि परत जाऊन घर सांभाळायचं अनितासाठी सोपं नव्हतं.


आयुष्याच्या बागेतून वावरताना सगळ्यांनी मुलायम गालीच्यावरून चालावं आणि विधवांनी मात्र काटेरी तारेवर कसरत का करीत जगावं ? हे समाजानं बांधलेलं कुंपण अनिताच्या मनाला रोज रक्तबंबाळ करायचं.नेहमीप्रमाणं संध्याकाळी ऑफिस संपल्यावर उदास मनानं अनितानं घरची वाट धरली.घरी तिचा मुलगा आतुरतेनं वाट पाहतोय,हीच तिच्यासाठी एक जगण्याची उमेद होती.अनिता उंबऱ्यातून आत पाऊल टाकताच तिच्या लेकरानं दुड्डूदुडू पळत येणं,तिच्या पायाशी बिलगनं,कडेवर बसणं हेच काही तिच्यासाठी सुखाचं क्षण होतं.आज मात्र घरात येताच तिचा मुलगा धावत पायाशी आला नाही.आश्चर्यानं तिनं समोर बघितलं तर नातू आजीच्या कडेवर बसून हसत होता. आई येताच त्यानं तिच्याकडं झेप घेतली.


वाघीण,प्रतिक पाटील,स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर


घरात अनिताचं आई-वडील आलेलं.बैठकीच्या खोलीत रमेशचा मित्र सुरेशपण बसलेला.सुरेश गेल्याच वर्षी फौजदार झाला होता.अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून कष्ट करणाऱ्या अनेक मराठा तरुणांपैकी एक असलेला सुरेश मेरीटच्या शर्यतीत कधीच मागं पडत नव्हता;पण आरक्षणाचं अडथळं पार करता करता बऱ्याचदा तो ठेचकाळून पडला.त्यामुळं यशाची सीमारेषा पार करायला त्याला आयुष्याची अठ्ठाविशी गाठावी लागली.

अधिकारी झाल्यानंतर सुरेशनं लग्नासाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला;तो म्हणजे त्याच्या बालपणापासूनचा मित्र रमेशची विधवा पत्नी अनिताशी लग्न करून तिच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायचा.

त्यासाठी प्रथम त्यानं स्वतःच्या आई-वडिलांची समजूत घातली.अनिताच्या आई-वडिलांची संमती घेतली आणि चौघांनी मिळून अनिताच्या सासू-सासऱ्यांना अनिताचं सुरेशशी लग्न लावून देण्याबाबत समजावलं.शेतकरी असलेले अनिताचे सासरे गावातील आपल्या घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी सुरुवातीला या गोष्टीसाठी तयार नव्हते. अनिताचं आई-वडील आग्रह करू शकत नव्हतं;पण सुरेशच्या आई-वडिलांनी अनिताच्या सासू-सासऱ्यांची मनधरणी केली.पंचविशीत विधवा झालेल्या अनिताला आयुष्यभर वाळवंटात चालायला सोण्यापेक्षा तिचा हात सुरेशच्या हातात सोपवून एक क्रांतिकारी पाऊल उचलावं,या मतावर अनिताचे सासरे तयार झाले. मुलाची जबाबदारी त्यांनी स्वतःकडं घेतल्यामुळं अनिताला सुरेशसोबत लग्न करण्यास नकार द्यायला कारणच उरलं नाही.सकाळपासून मनात खच्चून भरलेला ताण संध्याकाळी मात्र निघून गेला.पण अनपेक्षित घडलेल्याया प्रकारामुळे तिला त्या दिवशी हसावं की रडावं,समजत नव्हतं.