'वाचून वाचून डोळे दुखायला लागलेत' असं कुणी तरी म्हणाल्याचं मोठी माँनी ऐकलं मात्र,लगेच त्याच्यावर उपचार करण्याचं त्यांच्या मनाने घेतलं.शोधता शोधता त्यांना कधी तरी,कुणातरीसाठी आणलेली डोळ्यांच्या मलमाची ट्यूब सापडली.ट्यूब पाचसात वर्षांपूर्वी आणलेली होती. .माँना औषधांच्या एक्सपायरी डेटची माहिती असण्याचं काहीच कारण नव्हतं.त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांच्या डोळ्यांना आराम मिळावा ह्या प्रेमळ हेतूने त्या ट्यूबचं मलम मुलांच्या डोळ्यांत घालण्याचा घाऊक कार्यक्रम माँनी हाती घेतला.डोळे दुखणाऱ्या वा न दुखणाऱ्या प्रत्येक डोळ्यात ट्यूबचं मलम घातलं गेलं.ट्यूबमधलं मलम संपेपर्यंत माँ थांबल्या नाहीत.सगळ्यांच्या डोळ्यांची त्यांच्या दृष्टीने त्यांनी काळजी घेतल्यानंतरच त्यांनी समाधानाने श्वास घेतला.डोळ्यांत मलम घालून मुलं जरा लवकरच झोपली.दुसरा दिवस परीक्षेचा होता.
सकाळी पहिला मुलगा उठला तो चाचपडतच.त्याला काहीच दिसत नव्हतं.भरभर बाकीची मुलंही उठली किंवा उठवली गेली असावीत.कुणालाच काहीही दिसत नव्हतं.वाड्यात सगळीकडे हलकल्लोळ माजला.ही बातमी थोड्याच वेळात गल्लीत आणि आणखी थोड्या वेळात गावभर पसरली.सगळीकडे एकच खळबळ माजली.गावात आय स्पेशालिस्ट नव्हताच.म्हणून जनरल डॉक्टरांना बोलावलं.त्यांनी सगळ्यांचे डोळे तपासले.
औषध दिलं. 'डोळ्यांत जाऊन बसलेला चिकट मलम हळूहळू बाहेर पडल्यावर दोन दिवसांनंतर व्यवस्थित दिसू लागेल' असं त्यांनी म्हटलं,तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
पाचच मिनिटांत पुढचा प्रश्न सगळ्यांना आठवला तो म्हणजे आजच्या आणि उद्याच्या परीक्षेचं काय ? सकाळी सकाळीच बाबाजी आणि बापू शाळेच्या हेडमास्तरांना आणि संस्थेच्या विश्वस्तांना भेटायला गेले. विचारान्ती प्रत्येक मुलाला एक एक लेखनिक देण्याचं ठरलं आणि मग एकच धांदल उडाली.दहाबारा लेखनिकांच्या शोधार्थ घरची मंडळी बाहेर पडली. सुदैवाने गावात असलेल्या दुसऱ्या शाळेच्या परीक्षा मागच्या आठवड्यातच संपल्या होत्या. त्यामुळे थोड्याशा शोधानंतर प्रत्येकाला लेखनिक मिळाला. दहाबारा लेखनिक एका एका मुलाला धरून रांगेत वाड्याबाहेर पडण्याचं विलक्षण दृश्य पाहण्यासाठी सगळी गल्ली जमली होती. ही ऽऽऽ लांबलचक प्रभात फेरी शाळेत पोहचली तेव्हा कुठे सगळ्या वाड्याला हायसं वाटलं.मारवाडी समाज सर्वत्र पसरला असला तरी त्याची मुळं राजस्थानात आहेत.
यशाच्या लहानपणी मारवाडमधून त्या समाजाचे भाट यायचे.ह्या भाट लोकांचं बोलणं वैशिष्ट्यपूर्ण असायचं.ते गाण्याच्या स्वरूपात बरंचसं संभाषण करायचे.येताना ते चॉकलेटच्या फ्लेवरचा चहा वगैरे वस्तू विकायला आणायचे.ह्या भाटांना सुमारे पंचवीस कुटुंबं नेमून दिलेली असत.त्या त्या कुटुंबात दोनदोन दिवस राहून ते त्या कुटुंबांच्या वंशावळीची त्यांच्या जवळच्या चोपड्यांत नोंद करीत.
भाट परत जाताना त्यांना कुटुंबातील लोक धान्य,पैसे वगैरे देत.
हळूहळू भाट येण्याची पद्धत कमी कमी होत गेली.त्यामुळे काही कुटुंबांत कुटुंबातलीच एखादी व्यक्ती वंशवृक्षाची नोंद करते.
यशाच्या वाड्यात राहणाऱ्या कुटुंबाच्या नोंदी यशाचा मित्र शांतिलाल करायला लागला.यशाच्या माहितीप्रमाणे त्याच्याजवळ भाटाकडून लिहून घेतलेल्या नोंदीवरून कुटुंबाच्या सुमारे तीनशे वर्षांपासूनच्या पूर्वजांची नावं लिहिलेली आहेत.वाड्यातली दोन्ही कुटुंबं इतकी एकरूप झाली की,एकमेकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील अंगीकारल्या गेल्या.पापडांची मेथ्या घालून केलेली भाजी किंवा डालबाटी आता यशाच्या वाड्यावरही सर्रास होऊ लागली.कणकेत गूळ घालून भज्यांसारखे गोळे करून तळलेले गुलगुले यशाला आणि त्याच्या बहिणींनाही फार आवडत.बाबाजी त्यांच्या समाजाच्या तुलनेने त्यावेळी आर्थिकदृष्ट्या अति समृद्ध नसले तरी नियत,दिलदारी ह्या निकषांवर त्यांना समाजात फार मान होता.दर रंगपंचमीला समाजातील प्रतिष्ठित मंडळींना बाबाजी घरी बोलवत.सगळे एकत्र पोटभर भजे-गुलगुले खात.प्रकाश आणि शांतिलालमुळे मारवाडी समाजाच्या धार्मिक गोष्टींची यशाला बरीच माहिती झाली.त्याची धाकटी बहीण मुक्ता तर बाबाजींच्या बरोबर बऱ्याच वेळा स्थानकातदेखील जाई.
नवकार मंत्रासारखे छोटे छोटे धार्मिक श्लोक / मंत्र तिचेही पाठ झाले होते.नवकार मंत्रात भगवान महावीर, गुरू अशा आराध्य दैवतांना वंदन करून शेवटी सर्वे सुखिनःसन्तु अशी पसायदानासारखी प्रार्थना केलेली आहे.जैन धर्मियांचे धर्मासंबंधी नियम 'आगम' ह्या ग्रंथात नमूद केले आहेत.बाबाजींच्या आदर्शाखाली सगळं कुटुंब हे नियम पाळत असतं.
सामाईक म्हणजे तोंडाला मुँहपत्ती बांधून नवकार किंवा इतर मंत्रांचं पठण होत असे.ह्या सामाईकाचा वेळ 'आग्रम' मध्ये नमूद केल्यानुसार ४८ मिनिटांचा असे. माणसाचं शरीर आणि मन हे ४८ मिनिटांपर्यंत स्थिर राहू शकतं असा समज असल्याने सामाईकचा वेळ तेवढाच ठेवलेला आहे.
बाबाजींप्रमाणेच मोठी माँसुद्धा फार धार्मिक होत्या. त्यांची दररोजची सामाईक कधीच चुकली नाही. सूर्यास्ताच्या आत जेवणं करणं,त्याला ते ब्याळू म्हणत,हा नियमसुद्धा त्या बारा महिने पाळत.स्थानकात गुरुमहाराजांचा मुक्काम असला की,त्यावेळी मोठी माँ नियमितपणे प्रवचन ऐकायला जात.हे गुरुमहाराज घरोघरी जाऊन भिक्षा मागून जेवत असत.
असेच एकदा एक गुरुमहाराज स्थानकात वस्तीसाठी आले होते.पावसाळा असल्याने त्यांचा मुक्काम नेहमीपेक्षा मोठा होता.
जैन मुनींच्या समूहातल्या मुख्य मुनींनी मनात एक संकल्प सोडला होता आणि तो पूर्ण होईपर्यंत अन्नग्रहण करणार नाही असं ठरवलं होतं. दररोज गावात आलेले चार जैन मुनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर भिक्षेसाठी घरोघरी जात.वेगवेगळ्या घरातील कुटुंबीय मुनींचा उपवास आपल्यामुळे सुटावा ह्या भावनेने वेगवेगळे अंदाज बांधत.कुणी दहा अनाथांना सांभाळेल तर कुणी धर्मशाळा बांधील वगैरे सांगून प्रयत्न करीत.पण मुनींच्या संकल्पाचा अंदाज कुणालाच येत नव्हता.सर्व समाजात हा चर्चेचा विषय झाला होता. किंबहुना चिंतेचा विषय झाला होता.
मुख्य मुनींच्या अन्नत्यागाचा आजचा बारावा दिवस होता.दुपारी बाराच्या सुमारास चारही जैन मुनी इतर प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर वाड्यात शिरले.बाबाजी आणि मोठी माँबरोबर सगळं कुटुंब त्यांच्या स्वागतासाठी उभं होतं.यशाच्या घरचेही सगळे तिथे उत्सुकतेने गेले. अचानक बुरख्याच्या आडून मोठी माँ म्हणाल्या,
"महाराज आपण आमच्या घरी अन्न घेतल्यास आम्ही दोघे ह्यापुढे आयुष्यभर ब्रह्मचर्य व्रत पाळू !"
✓ मुनींच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं.ते म्हणाले,"हाच माझा संकल्प होता.तुम्ही दोघे आज एकमेकांशी बोला. आम्ही उद्या परत येऊ.तुमचा निर्णय पक्का असेल तर उद्या आम्ही तुमच्याकडचं अन्न घेऊ."
मोठी माँ तेव्हा फक्त पंचेचाळीस वर्षांच्या होत्या आणि बाबाजी पन्नाशीचे.एकदा मुनींचा संकल्प समजल्यावर त्यासाठी आणखी चोवीस तास थांबणं साध्याभोळ्या आणि निष्पाप प्रेमळ माँना अयोग्य वाटलं. त्या म्हणाल्या,"उद्यापर्यंत कशाला थांबायचं ?
तुमच्या सगळ्यांच्या समक्षच त्यांना विचारते,त्यांना माझा हा विचार मान्य आहे का म्हणून.गावातल्या प्रतिष्ठितांसमोर अवघडलेल्या बाबाजींनी माँना नकार दिला नाही.मुनींनी माँच्या हातून अन्नदान स्वीकारून आपला उपवास सोडला.
महात्मा गांधींच्या ब्रह्मचर्यव्रताची आणि सत्याच्या प्रयोगाची जगभर चर्चा झाली.वाहवा झाली. आजही होतेय. पण यशाच्या लहानशा गावातील नव्हे,यशाच्या वाड्यातील सात्त्विक मोठी माँनी एका सात्त्विक अतिथीच्या अन्नग्रहणासाठी आयुष्यातला मोठा निर्णय घेऊन अतिथिधर्माचा एक आदर्श सर्वांच्यापुढे ठेवला होता !
१४.०२.२५ या लेखातील शेवटचा दुसरा भाग…।!