* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: अंधारातला नेम A name in the dark

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/२/२५

अंधारातला नेम A name in the dark

एकदा दरवाजा फोडून तो आत घुसला होता,पण आतल्या माणसाच्या सुदैवाने त्या घराला दोन खोल्या होत्या व आतल्या खोलीच्या दरवाजाने मात्र बिबळ्याच्या ताकदीपुढे टिकाव धरला.

आंब्याच्या झाडावरच्या त्या मचाणावरची,दहावी रात्र काढून मी परत आलो आणि इबॉटसनशी पुढे काय करायचं याबद्दल चर्चा केली.

देशभरातल्या कोणत्याही शिकाऱ्यांकडून पुढे काही संपर्क झाला नव्हता आणि कोणीही नव्याने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नव्हता.इबॉटसन किंवा मी दोघांनाही आणखी काही दिवस रुद्रप्रयागला घालवणं शक्य नव्हतं.


इबॉटसन फार दिवस त्याच्या हेडक्वॉर्टर्सपासून दूर राहीला होता आणि त्याला तातडीच्या कामासाठी पौरीला जावं लागणार होतं.मलाही काही कामासाठी आफ्रिकेला जावं लागणार होतं.मी अगोदरच तिथलं काम तीन महिने पुढे ढकललं होतं आणि यापेक्षा जास्त उशीर करणं परवडणार नव्हतं.पण हेही तितकच खरं होतं की आम्हाला दोघांनाही गढवाली जनतेला नरभक्षकाच्या दयेवर जगायला,वाऱ्यावर सोडून निघून जायची इच्छा नव्हती.आहे त्या परिस्थितीत निर्णय घेणं फार अवघड होतं.इबॉटसनने रजेसाठी अर्ज करणे व माझं आफ्रिकेला जाणं रद्द करून नुकसान कमी करणे हा एकमेव पर्याय होता.शेवटी आम्ही ठरवलं की उद्या या विषयावर निर्णय घ्यायचा व पुढे काय करायचं ते ठरवायचं.एकदा या निर्णयावर आल्यावर मी इबॉटसनला सांगितलं की ही शेवटची रात्र मी आंब्याच्या झाडावर काढणार आहे.या अकराव्या व शेवटच्या दिवशी संध्याकाळी इबॉटसन माझ्याबरोबर आला. गुलाबराईत आल्या आल्याच आम्हाला आंब्याच्या झाडापलीकडे रस्त्याच्या कडेला एका शेताच्या दिशेने बघत असलेली काही माणसं दिसली.त्यांनी आम्हाला पाहिलं नव्हतं.आम्ही तिथं आल्यावर ते वळले व शेल्टर्सकडे जायला लागले.त्यातल्या एकाने जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा मी त्याला बोलावलं. आमच्या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला की तो आणि त्याचे सोबती जवळजवळ तासभर दोन सापांची लढाई चाललेली पाहत होते.जवळ जवळ वर्षभर तरी त्या शेतात काही लागवड झाली नव्हती.ते साप त्या शेताच्या मध्यावर असलेल्या एका मोठ्या खडकाकडे गेलेले त्यांनी शेवटचं पाहिलं होतं.त्या खडकावर रक्ताचे फरकाटे होते व त्या माणसाच्या म्हणण्याप्रमाणे ते सापाचंच रक्त होतं कारण त्यांनी एकमेकांना खूप ठिकाणी चावे घेतले होते.


जवळच्याच झुडुपाची एक काठी तोडून मी शेतात उडी मारली आणि त्या खडकाजवळ काही बिळं वगैरे दिसतायत का ते बघायला गेलो.तेवढ्यात रस्त्याच्या खालच्या एका झुडुपात ते दोन साप मला दिसले. इबॉटसननेही मधल्या काळात एक काठी पैदा केली होती आणि त्यातला एक साप रस्त्यावर चढून जात असताना त्याने तो मारला.दुसरा मात्र बांधावर एका बिळात अदृश्य झाला.इबॉटसनने मारलेला साप जवळजवळ सात फूट लांबीचा होता आणि एकसारख्या गवती रंगाचा होता.त्याच्या मानेवर चावे घेतल्याचा बऱ्याच जखमा होत्या.ती धामण तर नक्कीच नव्हती आणि त्याला विषाचे दात होते त्यावरून आम्ही निष्कर्ष काढला की ही कोणती तरी बिनफण्याची नागाची जात असावी.


थंड रक्ताच्या प्राण्यांना विषाची बाधा होते हे नक्की,कारण साप चावलेला एक बेडूक काही मिनिटात मेलेला मी पाहिला आहे.पण एकाच जातीच्या दोन सापांना एकमेकांपासून विषबाधा होते की नाही ते मात्र मला माहीत नाही.त्यामुळे जो साप बिळात अदृश्य झाला होता तो काही मिनिटात मेला असेल किंवा त्याला पुढे केव्हातरी नैसर्गिक मृत्यू आला असेल.


इबॉटसन निघून गेल्यानंतर पंडित हातात दुधाच्या किटल्या घेऊन पिलग्रिम शेल्टर्सकडे जाताना माझ्या झाडाजवळूनच गेला.जाताना त्याने सांगितलं की आज जवळजवळ दीडशे यात्रेकरू आलेत आणि आजची रात्र इकडेच काढण्याचा त्यांचा निश्चय आहे आणि या क्षणीतरी त्याबाबत काहीही करणं शक्य नाहीये.मलाही काही करता येणं शक्य नव्हतं तेव्हा मी त्याला एवढंच सांगितलं की सर्वांना एकमेकांच्या जवळ राहायला सांग व कोणत्याही परिस्थितीत अंधार पडल्यावर बाहेर पडू नका असं बजाव ! काही मिनिटांनी जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने मला सांगितलं की मी सांगितल्याप्रमाणे त्याने यात्रेकरूंना तशी सूचना दिली आहे.रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात,माझ्या झाडापासून शंभर यार्डावर एक काटेरी झुडुपाचं कुंपण होतं आणि त्यात एका ओझीवाल्याने (आपला तो जुना मित्र नव्हे) आज संध्याकाळीच त्याचा शेळ्यामेंढ्यांचा कळप घेऊन मुक्काम ठोकला होता. त्याच्याबरोबर त्याचे दोन कुत्रे होते.आम्ही इकडे येत असताना आणि मला सोडून इबॉटसन बंगल्याकडे परत जात असताना ते खूप जोरजोरात भुंकले होते.


पौर्णिमा होऊन काही दिवसच झाले होते व गंगेचं खोरं अजूनही अंधारातच होतं.तेवढ्यात साधारण नऊ वाजल्यानंतर मला पिलग्रिम शेल्टरमधून कंदील घेऊन बाहेर पडणारा एक माणूस दिसला.त्याने रस्ता ओलांडला व मिनिटा दोन मिनिटांनी परत रस्ता ओलांडला.

शेल्टरमध्ये परतल्यावर त्याने कंदील विझवला आणि त्याचक्षणी ते ओझीवाल्याचे कुत्रे जोरजोरात भुंकू लागले.हे कुत्रे बिबळ्याला पाहूनच भुंकत होते यात शंकाच नव्हती;बिबळ्याने बहुतेक कंदील घेऊन रस्त्यावर आलेल्या माणसाला पाहिलं असणार आणि आता तो पिलग्रिम शेल्टरकडेच जात असणार.


प्रथम भुंकताना ते कुत्रे रस्त्याकडे बघत होते पण थोड्यावेळाने ते वळून माझ्याच दिशेला बघत भुंकायला लागले.याचा अर्थ बिबळ्याने बोकडाला पाहिलं असणार आणि दबकत झाडाकडे येत असल्याने कुत्र्यांच्या दृष्टिआड झाला असणार कारण आता ते कुत्रे भुंकायचे थांबले होते.मला माहीत होतं की बिबळ्या आलाय.मला हेही कळलं होतं की तो बोकडाकडे दबा धरून येताना लपंण म्हणून माझ्याच झाडाचा वापर करतोय.जशी जशी मिनिटं जात होती तसा तसा मला एकच प्रश्न अस्वस्थ करत होता की तो बोकडाला ओलांडून एखाद्या यात्रेकरूला मारणार की बोकडाला मारण्याच्या प्रयत्नात मला संधी देणार !त्या मचाणावर इतक्या रात्री घालवल्यावर मी अशा विशिष्ट स्थितीत बसण्याची सवय करून घेतली होती की कमीत कमी हालचालीत आणि कमीत कमी वेळात मी रायफलचा ट्रिगर दाबू शकेन.बोकड व माझं मचाण यात फक्त वीस फूट अंतर होतं,पण झाडाच्या पानोळ्याच्या सावलीमुळे इतका अंधार होता की मला तेवढ्या अंतरावरचं सुद्धा दिसू शकत नव्हतं... म्हणून मी डोळे मिटले आणि आता सर्व लक्ष आवाजावर केंद्रित केलं.


माझ्या रायफलला मी छोटा विजेचा टॉर्च लावला होता आणि रायफलच्या नळीचं तोंड बोकडाच्याच दिशेला होतं.आता हा बिबळ्या (तो नरभक्षकच आहे असं गृहीत धरलं तर) शेल्टरपर्यंत पोचला असेल व नरबळीची निवड करत असेल असा विचार मी करतोय तेवढ्यात माझ्या झाडाखाली काहीतरी धडपड झाली आणि बोकडाच्या गळ्यातल्या घंटेचा झाला.टॉर्चचं बटन दाबल्यावर साईट्स बिबळ्याच्या खांद्यावरच रोखल्या गेल्या आहेत.तेव्हा रेसभरही रायफल न हलवता मी ट्रिगर दाबला... त्याचक्षणी टॉर्च बंद झाला !


त्याकाळी आजच्या इतके टॉर्चेस सर्रास वापरले जात नव्हते.मीही हा टॉर्च पहिल्यांदाच वापरत होतो.कित्येक वेळेला मी तो माझ्याबरोबर घेऊन फिरलो होतो,पण वापरायची वेळच आली नव्हती.मला बॅटरीचं लाईफ माहीत नव्हतं आणि ते तपासायचं असतं याचीही कल्पना नव्हती.यावेळी मी बटन दाबल्यावर टॉर्चमधून मंद प्रकाश बाहेर पडला व तो बंद झाला.परत एकदा माझ्या डोळ्यासमोर अंधारच अंधार झाला. आता माझ्या शॉटचं काय झालंय हेही मला कळेना. माझ्या शॉटचे प्रतिध्वनी खोऱ्यात घुमताहेत तेवढ्यात पंडितने त्याच्या घराचा दरवाजा उघडला व काही मदत पाहिजे का असं ओरडून विचारलं.


बिबळ्याकडून काही आवाज येतोय का हे मी इतकं कानात तेल घालून ऐकत होतो की मी त्याला काही उत्तर दिलं नाही तसा त्याने दरवाजा लावून घेतला.मी जेव्हा ट्रिगर दाबला होता तेव्हा बिबळ्या रस्त्यावरच माझ्यापासून दूर तोंड करून होता व शॉट मारल्याबरोबर बोकडाच्या अंगावरून उडी मारून तो डोंगराखाली गेल्याचं मला पुसटसं दिसलं होतं आणि पंडितने हाक मारण्याच्या जरासं अगोदर मला घशातल्या घशात गुरगुरल्यासारखा आवाजही ऐकल्यासारखा वाटत होता. पण तो आवाज नक्की बिबळ्याचाच आहे किंवा नाही याबद्दल मला खात्री वाटत नव्हती.शॉटच्या आवाजामुळे यात्रेकरूंची झोप जरा मोडली होती,पण काही मिनिटं कुजबुज करून झाल्यावर ते सर्वजण परत झोपी गेले.


बोकड मात्र ठणठणीत होता कारण गळ्यातल्या घंटेच्या आवाजावरूनच कळत होतं की तो इकडे तिकडे फिरून आम्ही त्याच्यासाठी ठेवलेलं गवत खातोय.


मी दहा वाजता शॉट मारला होता.अजून काही तास तरी चंद्र उगवणार नव्हता आणि त्या काळात मला काहीच करता येणार नसल्याने कान लावून ऐकत,सिगरेट ओढत मी जरा आरामशीर बसलो.काही तासांनी गंगेपलीकडच्या डोंगरशिखरावर चंद्रप्रकाश चमकू लागला आणि हळूहळू खोऱ्यात सर्वत्र पसरू लागला.चंद्र डोक्यावर आल्यावर मी झाडाच्या शेंड्यापर्यंत चढलो,पण पसरलेल्या फांद्यामुळे खालचं काहीच दिसेना.


१५.०१.२५ या लेखातील पुढील दुसरा भाग..राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….