* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१३/७/२५

उत्क्रांतीकडे वाटचाल \ Move towards evolution

लिनियसनं सजीवांचं वर्गीकरण केलं.त्यानं सजीवांचं बऱ्यापैकी मोठ्या गटांमध्ये वर्गीकरण केलं होतं.त्या मोठ्या गटांचं पुन्हा लहान लहान गटांमध्ये वर्गीकरण केलं होतं.पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांची त्यानं एक शिडीची कल्पना केली होती.प्रत्येक सजीव या शिडीवरच्या कोणत्या तरी पायरीवर होता आणि तो कायमचाच तिथं उभा आहे.अशी त्याची कल्पना होती. 


अर्थात,ही कल्पना काही त्याची स्वतःची नव्हती,तर ती अनेक धर्मांत सांगितली होती आणि शिवाय ती अ‍ॅरिस्टॉटलनंही मान्य केलेली होती.लिनियसनं एकसारखे असणारे प्राणी एका गटात घातले होते,पण ते पूर्वी कोणत्या तरी एकाच पूर्वजापासून निर्माण झाले असावेत आणि असे दोन सारखे पूर्वज त्याहीपेक्षा आणखी साध्या पूर्वजांपासून निर्माण झाले असावेत, अशी शक्यता त्याच्या गावीच नव्हती.गंमत म्हणजे लिनियसनं प्राण्यांचं वैज्ञानिकदृष्ट्या वर्गीकरण केलं आणि त्यानं त्याच्याच कामातून पूर्वीच्या साध्या प्राण्यांपासून आजचे प्रगत जीव निर्माण झाले असावेत असं वाटावं अशी शक्यता निर्माण केली होती.आणि तो स्वतःच साध्या प्राण्यापासून प्रगत जीव निर्माण होऊ शकतो ही गोष्ट मानत नव्हता..!  बायॉलॉजीच्या क्षेत्रात आता खरं म्हणजे पूर्वी कधीही नव्हता इतका विरोधाभास आता निर्माण झाला नव्हता! त्यामुळेच जीवशास्त्रानं यापुढे जे वळण घेतलं ते बायॉलॉजीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं होतं.('सजीव' अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन)


लिनियस हा स्वतः खरं तर देवभोळा माणूस होता. त्याचा बायबलवर पूर्ण विश्वास होता.त्याच्या दृष्टीनं कोणतीही स्पिशीज नामशेष होऊच शकत नव्हती.आणि नव्यानं निर्माणही होऊ शकत नव्हती.देवानं निर्माण केलेलं विश्व पहिल्यापासून तसंच आहे आणि तसंच राहणार आहे यावर त्याची अढळ श्रद्धा होती. त्यामुळे त्यानं स्वतः जेव्हा सजीवांचं वर्गीकरण केलं तेव्हा त्यानं सजीवांच्या बाह्मगुणांवरून (फिनोटाइपवरून) ठोकळेबाज रीतीनं वर्गीकरण केलं. जनुकीय पातळीवर दोन सजीवांमध्ये काहीतरी नातं असलं पाहिजे या गोष्टीचा त्यानं विचारच केला नव्हता.अर्थात,जेनेटिक्सचा उदय व्हायला एकोणिसावं शतक उजाडावं लागणार होतं.


गंमत म्हणजे त्याच वेळी इतर काही वैज्ञानिक पूर्वीच्या साध्या प्राण्यांपासून आजचेप्रगत प्राणी निर्माण झाले असले पाहिजेत किंवा एकाच कॉमन (सामयिक) पूर्वजापासून पुढे प्राण्यांच्या दोन वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या असल्या पाहिजेत असं आता म्हणायला लागले होते.सुदैवानं नंतरच्या आयुष्यात लिनियस दोन प्राण्यांच्या संकरातून (हायब्रिडायझेशनमधून) तिसरी नवी प्राण्याची जात अस्तित्वात येऊ शकते असं मानायला लागला होता.फ्रेंच बायॉलॉजिस्ट / निसर्ग अभ्यासक जॉर्ज लुई लेने कॉम्टे दे ब्यूफाँ (१७०७ ते १७८८) यानंही यावर अभ्यास सुरू केला होता. हा एक कुतूहल जागृत असणारा,हसतमुख गडी होता.त्यानं पूर्वीच्या निडहॅमच्या आणि स्पॉटेनियस जनरेशनच्या प्रयोगांवर अभ्यास केला होता.त्या काळचा तो बऱ्यापैकी पुढारलेला वैज्ञानिक होता तरी तोही आता सारख्या दिसणाऱ्या प्राण्यांचे पूर्वज आधी कधीतरी एकच असतील असा युक्तिवाद मांडायला धजावला नव्हता.


न्यूफॉनं नॅचरल हिस्ट्रीवर ४४ खंडांचा ज्ञानकोश (एन्सायक्लोपीडिया) लिहिला होता.या ज्ञानकोशामुळे ब्यूफाँला प्लिनीसारखीच प्रसिद्धी मिळाली.पण प्लिनीपेक्षा ब्यूफाँचा ज्ञानकोश जास्त अचूक होता.यामध्ये त्यानं अनेक प्राण्यांना काही अनावश्यक अवयव असतात असं दाखवलं होतं. 


उदाहरणार्थ,डुकरांना दोन उपयोगी खुरांच्या बाजूंना आणखी दोन निरुपयोगी बोटं असतात.कदाचित ते फार फार पूर्वी उपयोगी असतीलही,पण नंतर ते निरुपयोगी झाल्यानंतर खुरटले असतील.असं झालं असावं का? अशाच प्रकारे एखादा संपूर्ण प्राणीच खुरटला नसेल कशावरून? माणूस हा लहान झालेला एप नसेल कशावरून? किंवा गाढव हा खुरटलेला घोडा नसेल कशावरून?


इरॅस्मस डार्विन (१७३१ ते १८०२) हा इंग्लिश डॉक्टर होता.त्यानं प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र यांच्यावर मोठमोठ्या कविता केल्या होत्या.त्यात त्यानं लिनियसचं बरंच कौतुक केलं होतं.त्यात त्यानं वातावरणातल्या परिस्थितीमुळे प्राण्यांच्या स्पिशीजमध्ये बदल होऊ शकतात हेही मान्य केलं होतं.पण हा माणूस काळाच्या ओघात झाकोळला गेला.

याच्याच नातवानं,चार्ल्स डार्विननं पुढे याच विषयात कामगिरी करून उच्चांक गाठला.


ब्यूफाँच्या मृत्यूनंतर झालेल्या फ्रेंच रिव्होल्यूशनमुळे अख्खं युरोप मुळापासून ढवळून निघालं होतं.त्यानंतर नव्या युगात नवी मूल्यं आली.यानंतर धर्म,धर्मगुरू आणि प्रार्थनास्थळं यांची मक्तेदारी कमी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजायला लागला. 


यामुळे वैज्ञानिक थिअरीज सर्वांसमोर मांडणं पूर्वीच्या मानानं अधिक सोपं झालं.त्यामुळे सजीवांच्या उत्क्रांतीबद्दल जास्त काही खोलवर जाऊन विचार करण्याची गरज नाहीये,हा ब्यूफाँचा दृष्टिकोन आता बदलला होता.काही दशकांनी फ्रेंच निसर्गअभ्यासक जाँ बाप्टिस्ट दे मोनेत शैवेलियर दे लॅमार्क (Jean Baptiste de Monet Chevalier de Lamarck) (१७४४-१८२९) यानं उत्क्रांतीचा खोलवर जाऊन अभ्यास करायला हवा असं मत मांडलं.


या पृथ्वीवरचे जीव हे पृथ्वीच्या जन्मापासून तसेच आहेत,त्यांच्यात काहीच बदल घडलेला नाहीये आणि या सर्व जीवसृष्टीत एक शिडी आहे ही धर्मानं आणि अ‍ॅरिस्टॉटलनं शिकवलेली कल्पना अगदी १८व्या शतकापर्यंत दृढ होती.या कल्पनांना जर कोणी प्रथम विरोध केला असेल,तर तो दोन माणसांनी.त्यातला एक होता,जाँ बाप्टिस्ट दी मोने दी लॅमार्क किंवा फक्त लॅमार्क(१७४४-१८२९) आणि दुसरा होता जॉर्ज कुव्हिए.हे दोघं फ्रेंच होते हा काही फक्त एक अपघात नव्हता.त्या काळी पॅरिसमध्ये जीवशास्त्राचा अभ्यास खोलवर चालू झाला होता.याच काळात लॅमार्क आणि कुव्हिए या दोघांनी आपले विचार मांडून पूर्वीच्या कल्पनांना धक्का दिला,


पण गंमत म्हणजे लॅमार्क आणि कुव्हिए हे एकमेकांचे कट्टर शत्रू होते!त्यातला एक होता कणा नसलेल्या प्राण्यांचा (उदा.,गांडूळ) किंवा इनव्हर्टिब्रेट्सचा तज्ज्ञ,तर दुसरा होता कणा असलेल्या प्राण्यांचा (उदा., माकड) किंवा व्हर्टिब्रेट्सचा तज्ज्ञ.


पृथ्वीवरचे जीव हे स्थिर नसून त्यांच्यात कालांतरानं हळूहळू बदल घडत जातो हे प्रथम ओळखलं होतं ते लॅमार्कनंच.हे उत्क्रांतिवादातलं खूपच मोठं पाऊल होतं. खुद्द चार्ल्स डार्विनही ते मान्य करायचा.पण धर्म मात्र याविरुद्ध शिकवत होता.सगळंच विश्व देवानं एकाच क्षणी निर्माण केलं असल्यानं ते बदलेल कसं ?


ते बदलत असेल तर मग देवाची हे जग निर्माण करण्यामध्ये काहीतरी चूक झाली होत की काय? असा सवाल धर्मपंडित लोकांसमोर करीत.त्या काळी धर्माच्या अशा शिकवणीविरुद्ध काही बोलणं म्हणजे धारिष्ट्याचंच होतं.पण असं धाडस दाखवल्याबद्दल लॅमार्कचं कौतुक होण्याऐवजी त्याची चेष्टाच खूप झाली.


लॅमार्क हा १९व्या शतकातला जीवशास्त्रज्ञ होता. त्यानंच जीवशास्त्र (बायॉलॉजी) हा शब्दही प्रथमच वापरला.त्याचा जन्म १ ऑगस्ट १७४४ चा.एका उमराव घराण्यात तो जन्मला असला तरी त्याचे वडील मात्र दरिद्री होते.त्यांच्या ११ मुलांपैकी लॅमार्क हा सगळ्यात लहान होता.त्याच्या वडिलांनी त्यानं पाद्री व्हावं म्हणून जेझूईट कॉलेजात त्याला घातलं.पण वडील वारल्यावर १७६० साली लगेच त्यानं कॉलेज सोडलं.वडिलांनी ठेवलेल्या पैशात एक घोडा विकत घेतला आणि त्यावर टांग मारून स्वारी फ्रेंच सैन्यात दाखल झाली! 


लढाईत फ्रेंच सैन्याचा दारुण पराभव झाला.फक्त १४ सैनिक शिल्लक असताना लॅमार्क अत्यंत कडव्या शौर्यानं लढत राहिला.

त्याला त्याबद्दल सैन्यात बढतीही मिळाली.पण आयुष्याच्या वाटा कशा विचित्र वळणं घेतात बघा! लढाई संपल्यानंतर आपापसात गंमती चालू असताना त्याच्या मित्रांनी कान धरून त्याला उचललं आणि त्यात त्याची मान जायबंदी झाली.त्यावर चक्क शस्त्रक्रिया करावी लागली! त्यामुळे अर्थातच त्याची सैन्यातली नोकरी सुटली.


मग आता करायचं काय? त्यानं मग अनेक उद्योग केले. त्यानं वनस्पतिशास्त्र,वैद्यकशास्त्र आणि संगीत यांचा अभ्यास केला.

बरीच वर्षं स्वतःच्याच अशातशा पद्धतीनं हवामानाचे अंदाज वर्तवून त्यानं ११ वर्षं थोडाफार पैसाही कमावला,पण त्याचे अंदाज बऱ्याचदा चुकायचेच !


याच काळात त्याची मैत्री फ्रेंच विचारवंत जिअँ जॅक्स रुसो याच्याबरोबर झाली. ते दोघं बऱ्याचदा लांबवर फिरायला जात. त्या वेळी ते वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत.लॅमार्कनं वैद्यकशास्त्रावरही दोन पुस्तकं लिहिली आणि बँकेत कारकून म्हणूनही नोकरी केली. म्हणजे काय काय वेगवेगळे उद्योग बघा!


ब्यूफाँचं लक्ष त्या काळात लॅमार्ककडे गेलं.त्यानं लॅमार्कला आपल्या मुलाला शिकवणी देण्यासाठी ठेवून घेतलं.याबरोबरच लॅमार्क हा राजाच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये जाऊन काम करायला लागला.याच काळात त्यानं बराच प्रवास करून अनेक वनस्पतींविषयी सखोल निरीक्षणंही केली.पण याच सुमारास फ्रेंच राज्यक्रांती झाली.ज्या राजवटीनं ब्यूफाँ आणि लॅमार्क यांना नोकरी दिली होती,ती राजवटच मुळी संपुष्टात आली होती.पण योगायोगानं नवीन क्रांतिकारक सरकारला कुणीतरी कीटक आणि इतर अनेक बिगर कण्याच्या प्राण्यांचा तज्ज्ञ हवाच होता.मग त्यांनी ते काम लॅमार्कला दिलं.आणि याच वेळी कणा असलेल्या प्राण्यांचा तज्ज्ञ म्हणून काम मिळालं ते कुव्हिएला. लॅमार्कनं या संधीचा पुरेपूर फायदा उठवून बिनकण्यांच्या प्राण्यांविषयी


'हिस्टरी ऑफ इनव्हर्टिब्रेट्स' हा सात खंडांतला ग्रंथ लिहिला.

कुठल्याशा जिलेटिन किंवा तत्सम बुळबुळीत पदार्थापासून उष्णतेमुळे किंवा विजेमुळे पहिला जीव तयार झाला असावा असं लॅमार्कला वाटे.हे विचार जरी चुकीचे असले,तरी चर्चच्या शिकवणीपेक्षा हे नक्कीच वेगळं होते,त्यामुळेही त्याला विरोध झालाच.. ( शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..)

११/७/२५

मुक्या शतकांचा आवाज - डान्टे / The voice of silent centuries: Dante

०९.०७.२५ या लेखातील पुढील शेवटचा दुसरा भाग 


मध्ययुगातील द्वेष मध्ये थांबत नसे.द्वेष म्हणजे संपूर्ण द्वेष ! शेवटच्या टोकाला जायचे.डान्टे फ्लॉरेन्समधून हद्दपार केला गेला.तो सापडेल,तिथे त्याला जिवंत जाळून टाकावे,अशीही शिक्षा दिली गेली!डान्टेला आता स्वतःचा देश राहिला नाही! 


या ऐहिक जगाने त्याला दूर लोटले.तो आपल्या धीरगंभीर व भीषण प्रतिभेच्या साहाय्याने मृतांच्या जगात - परलोकात वावरू लागला.त्याला आपल्या इटलीमधल्या शत्रूचा प्रत्यक्ष सूड घेता येईना,तेव्हा त्याने त्यांच्यासाठी नरकातील अनेक प्रकारचे काल्पनिक छळ शोधून काढले व त्यांना तिथे नेऊन टाकले ! डान्टेला समाधान वाटावे व ईश्वराचे वैभव वाढावे म्हणून हे सारे शत्रू नरकात लोटले जातात ! डान्टे आपल्या इन्फर्नोची चोवीस सर्कल्स करतो. त्या त्या विशिष्ट प्रकारच्या पापांसाठी छळण्याची ती ती विशिष्ट यंत्रे त्या त्या विशिष्ट सर्कलमध्ये ठेवलेली असतात.डान्टेचे इन्फर्नोचे वर्णन अती दुष्ट व अती भव्य आहे.दूषित व विकृत झालेल्या अशा उदात्त प्रतिभेने निर्मिलेले हे नरकस्थान आहे.अमेरिकन तत्त्वज्ञानी सन्टायना लिहितो, 'डान्टे पुष्कळ वेळा विकारवशतेने लिहितो,शुद्ध बुद्धीने निर्णय घेऊन तो लिहीत नाही.' पण आपण विसरता कामा नये की, डान्टे मध्ययुगाचा नागरिक तद्वतच रोमन कॅथॉलिक चर्चचे अपत्य आहे.तो आपल्या शत्रूचेच नरकात हाल करतो असे नाही;तर त्याला जे जे चर्चचे शत्रू वाटतात,त्या सर्वांना तो तिथे नेतो व त्यांचा छळ मांडतो.

जे जे कॅथॉलिक नाहीत,ते ते सारे चर्चचे शत्रू असे डान्टे समजतो.ख्रिश्चन धर्मात नसलेले असे प्राचीन काळातील कोणीही डान्टेच्या स्वर्गात जाऊ शकत नाहीत.मध्ययुगातील चर्च किती असहिष्णू होते,हे यावरून दिसून येते.त्या प्राचीनांना स्वर्ग का नाही? त्यांचे काय पाप? ते बाप्तिस्मा मिळण्यापूर्वी कित्येक शतके जन्मले हे? ईश्वराची करुणा अनंत असली तरी तिची व्याप्ती फक्त कॅथॉलिकांपुरतीच आहे ! निदान डान्टे तरी असे म्हणतो.डान्टेला नरकातील गुंतागुंतीचे मार्ग दाखविणारा थोर गुरू व्हर्जिलदेखील स्वर्गाकडे येऊ शकत नाही! त्यालाही निराशेच्या चिरंतन आगीत रडत बसावे लागते.त्यालाही उद्धाराची आशा नाही! कारण,तो फार पूर्वी जन्मला. मग तो कसा ख्रिश्चन होणार? 


ही असहिष्णुता,जे जे चर्चच्या मताचे नाहीत,त्या सर्वांना खुशाल नरकाग्नीत खितपत ठेवणे व मनाला काहीही न वाटता त्यांचे हाल व छळ पाहणे याला काय म्हणावे? किती संकुचित,स्वार्थी व असहिष्णू हे मन ? डान्टेच्या डिव्हाइन कॉमेडी या महाकाव्यात ही असहिष्णुता सर्वत्र भरलेली आहे. मी दोनच उदाहरणे देतो,दोनच उतारे दाखवितो- १. इन्फर्नोच्या दुसऱ्या सर्गात बिएट्रिस म्हणते, "ईश्वराच्या कृपेने मला नरकात खितपत पडणाऱ्यांच्या दुःखाचा स्पर्श होत नाही." ही बिएट्रिस स्वर्गात शाश्वत आनंद उपभोगीत असते; तिला नरकाग्नीत जळणाऱ्यांच्या दुःखाची कल्पनाही येत नाही व याला ती ईश्वरी कृपा समजते.त्यांचे दुःख तिला दुःख असे वाटतच नाही. तिला त्यांच्या वेदना कळतील तेव्हा ना तिचे डोळे ओलावणार;तिचा आनंद अस्तास जाणार? हे मध्ययुगातील रानटीपणाचे द्योतक आहे,त्या कालच्या रानटी वृत्तीला धरून आहे.सेंट थॉमस क्विनस हा मध्ययुगातील अत्यंत धार्मिक व अती प्रतिभावान लेखक होऊन गेला.तो त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो, "परमेश्वराची आपल्या भक्तांवर फार कृपा असते.नरकात खितपत पडलेल्या प्राण्यांच्या होणाऱ्या छळांचा विचार करून स्वतःचे सुख वृद्धिंगत करण्यास प्रभू त्यांना परवानगी देतो." दुसऱ्यांचे दुःख पाहून आपण तसे दुःखी नाही असे मनात येऊन अधिक सुखी होणे किंवा "दुसऱ्यांचा कसा छळ होत आहे!"असे मिटक्या मारीत म्हणून आपला आनंद द्विगुणित करणे रानटीपणाचे तर खरेच,पण मध्ययुग जणू रानटीपणाचेच प्रतीक आहे. २. दुसरा उतारा पर्गेटोरियाच्या सातव्या सर्गातला आहे. पर्गेटरीयातल्या सॉर्डेलो नामक एका जिवाला व्हर्जिल नरकातील एका भागाचे वर्णन ऐकवीत आहे.तो म्हणतो, "मी त्या निराशेच्या नरकात खाली खोल खितपत पडलेला असतो. मर्त्य जन्मीच्या पापांपासून सुटका होण्यापूर्वी लहान मुलांना तिथे मृत्यूचे दात सारखे चावीत असतात." डान्टेच्या मते केवळ निधर्मी,नास्तिक व पाखंडीच तेवढे नरकात पडतात,असे नव्हे,तर निष्पाप मुलेही नरकान्नीत हाल भोगतात ! बाप्तिस्मा मिळण्यापूर्वीच जर लहान मुले मेली,तर ती नरकात आलीच पाहिजेत व त्यांनी तेथील यातना भोगल्याच पाहिजेत.ज्या जगात डान्टे राहत होता, ते मूर्खपणाचे जग होते,ते आंधळे,संकुचित,दुष्ट, नष्ट,बेशरम आणि असहिष्णुतेने भरलेले असे होते. डान्टेचे मन आपण जाणू शकलो,तरच क्रूसेड्स् - इन्क्विझिशनसारखी छळण्याची मध्ययुगीन साधने व संस्था आपण समजू शकू.

मध्ययुगे सुंदर होती हे खरेच;ते नाकारता येणार नाही.पण केवळ सौंदर्य पुरेसे नसते.भूकंपातही नसते का एक प्रकारचे सौंदर्य ? एखादा हिमप्रपात,समुद्रावरील एखादे भीषण वादळ,ज्वालामुखीचा एखादा स्फोट, विजेचा एखादा लखलखाट,व्यवस्थित रीतीने योजनापूर्वक पार पाडलेला एखादा खून,दोन रानटी सैन्यांतील एखादे युद्ध,या सर्वांतही एक प्रकारचे सौंदर्य असतेच;पण ही सुंदरता,ही भव्यता विसंवादी असते.हे विनाशाचे,विध्वंसाचे,मूर्खतेचे सौंदर्य होय, हे सौंदर्य भेदांनी विदीर्ण झालेल्या रोगट व फिक्कट जगाचे आहे.डान्टेच्या महाकाव्यातील व तेराव्या शतकातील जगाचे सौंदर्य असे भेसूर आहे.


जवळजवळ हजार वर्षे युरोप या दुष्ट भ्रमात होते की,सर्वांनी ख्रिश्चन तरी व्हावे,नाहीतर कायमचे नरकात तरी पडावे,अशी ईश्वराचीच इच्छा आहे. डान्टेने या भ्रमाचा वारसा घेतलेला होता. इन्क्विझिटरही याच भ्रमात होते.या दुष्ट भ्रमाभोवती

डान्टेने महाकाव्य निर्मिले व छळ कसा करावा, याची माहिती इन्क्विझिटरांनी डान्रेच्या या छळाच्या ज्ञानकोशातून घेतली.डान्टेने चर्चच्या शत्रूना काव्यात केवळ अलंकारिकरीत्या जाळून टाकले; पण इन्क्विझिटर्स कवी नसून प्रत्यक्षवादी व्यवहारी असल्यामुळे त्यांनी चर्चच्या शत्रूना प्रत्यक्षच जाळले! 


व्हॉल्टेअरच्या हिशेबाप्रमाणे चर्चच्या आज्ञेनुसार जवळजवळ एक कोटी माणसे जिवंत जाळली गेली असतील; व ती का? तर ती केवळ परधर्मीय होती म्हणून; कॅथॉलिक ख्रिश्चन नव्हती म्हणून!


डान्टेचे 'डिव्हाइन कॉमेडी' हे जगातील अत्यंत थोर अशा प्रतिभासंपन्न कवीचे,अतिशय उदात्त अशा स्वप्नवीराचे महाकाव्य.त्याच्यासारख्या अत्यंत थोर व प्रतिभासंपन्न कवीला असा विषय मिळावा,असे ध्येय मिळावे;पण असे दृष्ट भ्रम त्याने धर्म म्हणून कवटाळावेत,ही एक दुर्दैवी घटना आहे.डान्टेची ही फार मोठी कीव येण्याजोगी चूक झाली.मानवी इतिहासातील हा भयंकर दैवदुर्विलास होय !


डान्टे इ.स. १३१७ मध्ये मरण पावला व त्याच्याबरोबरच मध्ययुग संपले असे सांगण्यात येते; पण असे वाटेल ते ठोकून देणे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे असते. दुर्दैवाने अद्यापही कोट्यवधी स्त्री-पुरुष मध्ययुगीन असहिष्णू व संकुचित जगातच वावरत आहेत ! आणि त्यामुळे शांती व प्रगती स्थगित झाल्या आहेत.मध्ययुग अजूनही गेलेले नाही. तोच रानटीपणा,तोच आंधळेपणा, तीच संकुचितता,सारे तेच अद्यापिही कायमच आहे !

९/७/२५

मुक्या शतकांचा आवाज - डान्टे / The voice of silent centuries: Dante

सेंट फ्रेंन्सिस रोमन चर्चचा आनुषंगिक पुत्र होता,
तर डान्टे रोमन चर्चचा खरा म्हणजे संपूर्ण अर्थाने पुत्र होता.सेंट फ्रेंन्सिसच्या मोठेपणाशी त्याच्या कॅथॉलिक असण्याचा संबंध नव्हता.तो मुसलमान असता,ज्यू असता वा बुद्धधर्मी असता तरीही त्याने आपल्या जीवनाचे दैवी काव्य लिहिलेच असते. त्याचा मोठेपणा अभिजात होता.तो गुण,ते एका विशिष्ट धर्माचा वा पंथाचा असल्यामुळे आलेला नव्हता.तो कॅथॉलिक होता ही केवळ योगायोगाची गोष्ट होती.पण डान्टेचा मोठेपणा त्याच्या कॅथॉलिक पंथीय असल्यामुळेच आहे.
डान्टे कॅथॉलिक नसता तर त्याला 'इन्फर्नो' हे महाकाव्य लिहिता आले नसते.नरकाची व भीषण शिक्षांची वर्णनेही करता आली नसती.सेंट फ्रेंन्सिस मानवजातीची उत्कृष्टता दाखवितो;तर डान्टे रोमन कॅथॉलिक पंथाची उत्तमता दाखवितो. सेंट अ‍ॅन्सिस हे मानवजातीच्या वेलीवरील सुगंधी व निर्दोष फूल आहे,डान्टे हे कॅथॉलिक धर्माच्या वेलीवरचे फूल आहे.

 कॅथॉलिक,बिन कॅथॉलिक,सर्वांसच सेंट फ्रेंन्सिस वाचवू पाहतो.या जगातील दुःखांतून त्या सर्वांचीच सुटका करण्यास धावतो;पण डान्टे काही अपवादात्मक कॅथॉलिक व्यक्ती सोडून बाकी सर्वांना परलोकीच्या नरकाग्नीत लोटून देतो!

सेंट फ्रेंन्सिसचा आवाज सर्व काळासाठी आहे. त्याची वाणी सर्व युगांसाठी;आहे पण डान्टे केवळ मध्ययुगाची भाषा बोलतो,फक्त मध्ययुगाचा पुरस्कार करतो,त्याचे महाकाव्य चर्चचे गुण,दोष दोन्ही दाखविते...मध्ययुगात मनातील सौंदर्य व कडवेपणा दोहोंचेही संपूर्ण चित्र तो देतो. 

मध्ययुगातील भलेबुरे,दोन्ही रंगवतो.मध्ययुगातील मन डान्टेचे कॅथॉलिकपंथीय मन उत्कट प्रेम करी, तद्वतच उत्कट द्वेषही करी,चर्चमधल्या सर्व गोष्टींवर मन प्रेम करी;पण चर्चबाहेरील जगाचा मात्र द्वेष व तिटकारा करी.तो द्वेषप्रेमामुळेच होता.प्रत्येक कॅथॉलिकास असे शिकविण्यात येत असे की, ईश्वराचे आपल्या लेकरांवर प्रेम असल्यामुळेच तो त्यांना शिक्षा करतो.जे चुकतील.्पदच्युत होतील,त्यांना तो प्रेमाने कठोर शासन करतो.ईश्वराच्या या प्रेमाचे अनुकरण करणारे हे मध्ययुगातील कॅथॉलिकही त्यांना जे चुकलेले वाटत,त्यांचा छळ करीत;त्यांना मार मारीत. 'यांच्या आत्म्यांचा बचाव व्हावा म्हणून,
यांच्यावर आमचे प्रेम आहे,म्हणूनच आम्ही यांना छळतो व ठार करतो',असे ते म्हणत. 

जी. के.चेस्टर्स्टन आपल्या 'सेंट फॅन्सिस' या पुस्तकात लिहितो,"माणसावर प्रेम करणे व त्याला ठार मारणे यात विसंगती नाही." चेस्टर्टन हा आजकालच्या कॅथॉलिसिजमचा आचार्य आहे. चेस्टर्टनच्या मध्ययुगीन मनाला तेराव्या शतकातील ते मन नीट समजते.डान्टेला नरकात पडणाऱ्यां विषयी करुणा वाटे.फॅन्सिस्का ऑफ रिमिनि ही व्यक्ती त्याला लहानपणापासून माहीत होती. त्याचे फ्रेंन्सिस्कावर प्रेम होते; पण त्याने फॅन्सिस्कास नरकातच लोटले आहे. डान्टेला का करुणा नसे वाटत? वाटे;पण आपल्या पापांसाठीच त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे,
त्यांचा अमानुष छळ होत आहे,या विचाराने डान्टेला एक प्रकारचा आनंद वाटतो;तो छळ पाहून त्याचे डोळे ओले होत नाहीत! तो पाहण्यात त्याला नकळत जणू एक प्रकारच दुष्ट समाधान वाटते! आणि त्यांची ती पापे तरी खरीखुरी होती का ? डान्टेच्या मते मात्र ती त्यांची पापेच होती व म्हणून तो त्यांना भराभरा नरकवासाच्या शिक्षा ठोठावतो.त्या सर्वांचा छळ व्हावा अशी प्रभूचीच इच्छा आहे असे त्याला वाटे. डान्टे ज्या चर्चचा प्रतिनिधी होता,त्या चर्चप्रमाणेच तोही ईश्वराची इच्छा काय आहे,एवढे सांगूनच थांबत नसे,तर स्वतः शिक्षा देणारा व ठार मारणारा ईश्वराचा 
अंमलदारही बने.

डान्टेचे हृदय विश्वकवीचे होते;पण त्यांचे मन मात्र मध्ययुगातील पाद्र्याचे होते.

मध्ययुगातील इतिहासाचा आत्मा नीट 
समजावयाला हवा असेल,तर डान्टेचे मन समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.कारण मध्ययुगाचा आत्मा म्हणजेच डान्टे म्हणून या बाबतीत मी जरा विस्ताराने लिहीत आहे.


सेंट फ्रेंन्सिसच्या मृत्यूनंतर एकोणचाळीस वर्षांनी म्हणजे सन १२६५ मध्ये डान्टे जन्मला.बायबल पढविण्यासाठी जनतेला वळवू पाहणारे इनिक्कझिशन त्याच्या जन्मापूर्वी चौतीस वर्षे निर्माण झाले होते.डान्टेचा बाप फ्लॉरेन्स येथे वकील होता.त्याची वकिली छान चालत होती. डान्टेला लहानपणी प्रामुख्याने तीन गोष्टी शिकविण्यात आल्या.... १. आपल्या देवाची पूजा करणे, २. आपल्या शहराशी एकनिष्ठ राहणे, ३. आपल्या चर्चसाठी लढणे.जगात दोन प्रकारचे लोक आहेत.ईश्वराचे आवडते असे ख्रिश्चन व त्याचे नावडते ख्रिश्चनेतर.ख्रिश्चन धर्मी नसलेल्यांनी ख्रिश्चन धर्म सक्तीने वा स्वेच्छेने स्वीकारला,तर देव त्यांच्यावरही प्रेम करील.
ईश्वराच्या लाडक्यांसाठी त्याचा स्वर्ग होता;
ईश्वराच्या नावडत्यांसाठी त्याचा नरक होता.
प्रभूची प्रीती वा प्रभूचा द्वेष होईल तद्नुसार इकडून तिकडे वा तिकडून इकडे पाऊल टाकण्याची पायरी म्हणून स्वर्ग व नरक या दोहोंच्या दरम्यान पर्गेटरी असे.या सर्व गोष्टी डान्टेला शिकविण्यात आल्या;व त्या सर्व त्याला खऱ्या वाटल्या.त्याला त्या म्हणजे केवळ कल्पित कादंबरी असे वाटत नसे.त्याच्या मनासमोर स्वर्ग,
नरक व पर्गेटरी ही जणू नकाशातील निश्चित स्थाने होती! माणसे मरणोत्तर या तीन जागांपैकी कोठे तरी निश्चित जातात,असे त्याला वाटे.
ऑस्टेलिया स्वतः कधीही पाहिला नसतानाही भूगोल वाचणारांना खरा वाटतो,तद्वतच डान्टेला स्वर्ग,नरक व पर्गेटरी ही ठिकाणे वाटत.डान्टेचे भूगोलाचे अचूक पुस्तक म्हणजे बायबल !

मानवजातीची कथा, हेन्री थॉमस, अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन 

बायबलमधील शब्द न् शब्द जसा डान्टेला खरा वाटे,तद्वतच अ‍ॅरिस्टॉटलचे लिहिणेही तो वेदवाक्य समजे ! मध्ययुगातील कॅथॉलिक,प्लेटो व 
अ‍ॅरिस्टॉटल यांचे भक्त होते हे मोठे आश्चर्य होय. 

मध्ययुगातील कॅथॉलिक धर्म म्हणजे बाप्तिस्मा; देवाला जणू प्लेटोचा धर्म आहे.ख्रिश्चनांना ग्रीक तत्त्वज्ञानाचे ज्ञान मुसलमान व ज्यू यांनी करून दिले.अर्थात,कॅथॉलिकांनी या बाबतीत मुसलमान व ज्यू यांचे ऋणी राहिले पाहिजे.मुसलमानांनी सारे ग्रीक ज्ञान अरेबीत आणले होते.अरेबीतून ते ज्यूंनी लॅटिनमध्ये आणले.रोमन कॅथॉलिकांना सुसंस्कृत व प्रगल्भ अशी एकच भाषा समजे,ती म्हणजे लॅटिन, डान्टेने अ‍ॅरिस्टॉटलचा भाषांतराच्या द्वारेच अभ्यास केला.पुष्कळदा तो अ‍ॅरिस्टॉटलच्या अर्थाचा अनर्थही करी.ग्रीकमधून अरेबीच्या द्वारा लॅटिनमध्ये आलेले भाषांतराचे भाषांतर वाचूनच डान्टे ग्रीक विचारांशी परिचित झाला होता.

अ‍ॅरिस्टॉटल व प्लेटो यांच्यापासून डान्टे शिकला की, आत्मा ईश्वरापासून खाली संसारात आला असून पुन्हा ईश्वराकडे माहेराला जाण्यासाठी सदैव धडपडत असतो. "आकाशातून पडणारे पाणी ज्याप्रमाणे बाष्प होऊन पुन्हा आकाशाकडे जाते, तद्वतच या आत्म्याचे आहे.ईश्वराजवळून खाली आलेला हा आत्मा देहाच्या बंधनात पडून अधःपतित होतो;त्याला देहासक्ती जडते व तो खाली जातो,हे जीवन म्हणजे देहाच्या भुका व आत्म्याच्या क्षुधा यांमध्ये सतत चाललेला झगडा होय.आत्म्याचा आवाज व वासनांचा आवाज यांमधील हे चिरंतन युद्ध आहे.इंद्रियांना निर्भयपणे नकार द्या,म्हणजे आत्मा शुद्ध होत जाईल; आत्म्याच्या आशा-आकांक्षा शुद्ध होत जातील. ऐहिक सुखाचा त्याग करून दैवी,
आध्यात्मिक सुखाच्या मागे लागा.या ऐहिक सुखोपभोगांतच रमाल,तर तुमच्या आत्म्यावर इतकी वैषयिक पुटे चढतील की,नरकात घालूनच ती कश्मले जाळावी लागतील.ती जळाल्यानंतरच आत्मा पुन्हा झगमगीत सुवर्णाप्रमाणे होईल.
स्वर्गात प्रभूसमोर जाण्यापूर्वी जाळून घ्यावे लागेल."

अ‍ॅरिस्टॉटल व प्लेटो यांचे तत्त्वज्ञान याप्रमाणे मध्ययुगातील ख्रिश्चन नीतीत मिसळून गेले. स्वर्ग-नरकांचे हे तत्त्व,मानवी आत्मा आपल्याकडे ओढू पाहणारे हे स्वर्ग व नरक यांचे तत्त्वज्ञान डान्टेच्या तरुण व संस्कारक्षम मनावर खोल बिंबवले गेले होते.ग्रीक तत्त्वज्ञान व कॅथॉलिक धर्मशास्त्र यांचा त्याने पुरापुरा अभ्यास केला होता.त्याने विज्ञानाचे ज्ञान बायबलामधूनच घेतले होते. ज्या जगात तो राहतो,त्याची फारशी माहिती त्याला नव्हती.त्याचे या जगाचे ज्ञान जवळजवळ शून्यच होते. पण ज्या जगात मरायला तो जाणार होता, त्याचे ज्ञान आपणास भरपूर आहे असे त्याला वाटत होते.
स्वर्गाची राजधानी,अर्थात सोन्याचे जेरुसलेम शहर,तद्वतच नरकाची राजधानी डिस या दोहोंचीही माहिती त्याला तो राहत असलेल्या फ्लॉरेन्स शहराच्या माहितीपेक्षा अधिक होती.

डान्टे आपल्या शहरातील राजकारणात भाग घेत असे.तेराव्या शतकात फ्लॉरेन्समध्ये पोपच्या व सम्राटाच्या अनुयायांमध्ये लढाया होत असत.
डान्टे पोपच्या बाजूचा होता.कारण,त्याचा बापही त्याच पक्षाचा होता.पण वयाने वाढल्यावर काही पोपांचा अप्रामाणिकपणा तद्वतच त्यांची भीरुता पाहून तो विटला.त्याने पोपचा पक्ष सोडून सम्राटाचा पक्ष धरला.तो राजकीय क्षेत्रात भराभर वर चढत चालला.तो वयाच्या पस्तीसाव्या वर्षीच फ्लॉरेन्समधील प्रमुख न्यायाधीशांपैकी एक निवडला गेला.पण पुढे दोनच वर्षांनी त्याचा पराजय झाला.त्या प्रक्षुब्ध काळात, बुध्दिहिन वासनाविकारांच्या व आंधळ्या भावनांच्या त्या काळात पराभूत होणे म्हणजे हद्दपार होणे,वा मरणेच असे.

शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….

७/७/२५

ओंजळीतलं पाणी / Boiling water

ज्याच्या ताटात हाडं यायची तो म्हणायचा बकरं म्हातारं हुतं,सारी हाडंच वाढली.ज्याला मऊ फोडी यायच्या तो म्हणणार मटण शिजलंच नाय,...०४.०७.२५ या लेखातील शेवटचा दुसरा भाग…


काही केल्या चावंनाच झालंया.शेजाऱ्याच्या लग्नात सुनंचं कौतुक करणारं वाडपी आपल्या ओळखीच्या माणसाला कोपऱ्यात बसवून भात वाढायच्या नावाखाली मटणाची पळी ओतायचे.ते बघून बाजूची मंडळी चिमटा काढायची.त्याकडं दुर्लक्ष करून अंधारात काय वाढलं कळलंच नाय म्हणून वेळ मारून न्यायचे.


घड्याळाचा काटा आकराच्या पुढं गेला तरी पंगती सुरूच होत्या.गोंधळाच्या जेवणाला आलेलं शारदाच्या माहेरचं मुराळी तिला दुसऱ्या दिवशी माहेरी घेऊन जाणार होतं.

कारण,आषाढ सुरू होणार होता आणि आषाढात नववधूनं महिनाभर माहेरीच रहायचं असतं,हा परंपरागत अलिखित नियम अमलात आणला जात होता.तशी तानाजीच्या आयुष्यात आजची रात्र एक नवी पहाट घेऊन येणार होती.

जेवणावळीत आता ही शेवटची पंगत होती.तिथं बाहेरची माणसं बसलेली.त्यानंतर घरातली वयस्कर मंडळी आणि बायका जेवायला बसणार होत्या.तानाजीचं पाहुण्यांसोबत जेवण आटपलं.घरची पंगत बसली.घरच्या मंडळींसाठी आचाऱ्यानं बाजूला काढून ठेवलेली मटणाची परात पुढं केली.इतक्यात लाईट आली आणि सगळ्यांना आनंद झाला.घरचे जेवत असताना तानाजीच्या ध्यानात आलं की,विहिरीवरची पाण्याची मोटर सुरू करून उसाला पाणी सोडून यायचं,म्हणजे रातभर लाईट आहे तोवर शेताला पाणी मिळंल.सकाळी परत लाईट जाणार.कारण,मायबाप सरकारनं तो नियमच केल्याला.शहराला दिवसा आणि शेताला रात्री लाईट मिळायची.शहरात दिवसभर विविध कार्यालयात कामकाज सुरू असतं.त्यामुळं त्यांना दिवसभर सुरळित वीजपुरवठा झाला पाहिजे. दिवसभर काम करून थकून भागून सगळे घरी जाऊन आरामात आपापल्या परिवारासोबत झोपतील तेव्हा शेतकरी शेतात पिकाला पाणी पाजून धान्य पिकवील.ऊस पिकवील.जनतेला अन्न आणि चहाला साखर पुरवील.


खरं तर इतक्या उशिरा शेतात जायची तानाजीची पण इच्छा नव्हती;पण मनगटावर हळकुंड आहे तोवर घरातून बाहेर जायचं नाही म्हणून चार दिवस झालं घरातच बांधून घातल्यागत झालं होतं त्याला. घरची सगळी मंडळी ताटावर बसल्यात तोवर मोटर सुरू करून उसाच्या सरीचं दारं मोडून लगेच यायचं असं त्यानं ठरवलं.जाऊन पटकन् परत यायचं म्हणून त्यानं मोटारसायकल घेतली.आधीच पावसानं दडी मारली हुती आणि लग्नाच्या धांदलीत शेताला पाणी पाजायला उशीर झालेला म्हणून गाडीवर मागच्या सीटवर खोरं घेऊन तानाजीचा दोस्त महेश बसला.


घरच्यांना ही दोघं कुणीकडं चाललीत याचा अंदाज येण्याआधी गाडी अंधार कापत पुढं गेली.इतक्या रात्री शेतावर जाणं तानाजीसाठी नवीन नव्हतं;पण लग्नानंतर पहिल्या रात्री पैपाहुणं घरात असताना आपण जाणं बरं नाय,असं सगळीजण म्हणायला लागली. 


तानाजीच्या घरात त्याच्याशिवाय दसर शेती करणारं कोणीच नव्हतं.मी घरात थांबतो तुम्ही शेतात जावा असं भावकीतल्या कुणाला सांगणार कसं? म्हणून चटकन् जाऊन येऊ म्हणत तानाजी सटाकला. घरात सजवलेली खोली आणि शारदाचा देखणा चेहरा दोन्हीपण त्याच्या डोळ्यांसमोरून हालत नव्हतं.विहिरीच्या काठावर गाडी उभा करून मोटर सुरू केली.परत गाडी सुरू करून उसाच्या बांधाजवळ आला.

पाण्याचा पाट शेतातनं पुढं दुसऱ्याच्या रानात चालला होता.झटकन् दारं मोडून पाणी आपल्या उसात वळवायचं.

मग रातभर पाणी शेतात फिरत बसतंया.सकाळी लाईट गेली की मोटर आपोआप बंद होईल.


पाटात उतरायला तानाजीनं पँट गुडघ्यापर्यंत वर केली.

डोक्याला टावेल गुंडाळला.खोरं हातात घेतलं आणि त्यानं उसाच्या सरीत पाय टाकला.पटापट तीन-चार खोरी ओढून पाट वळविला.पाणी उसाच्या सरीत शिरलं.पुढं जाणारं पाणी आता थांबलं हुतं.तिकडचा गाळ वढून दारं पुन्हा पाण्याच्या दाबानं फुटू नयेत म्हणून हातानं गाळ ओढून लावला.वाहत्या पाण्यात हात-तोंड धुतलं. डोक्याला गुंडाळलेला टावेल सोडून तोंड पुसत खोरं उचललं आणि महेशच्या हातात दिलं.

पाटातला पाय उचलून वाहत्या पाण्यात खंगाळून उसाच्या बुडक्याला वाळक्या जागेत टाकला.दुसरा पाय बांधावर टाकणार तवर उसाच्या बुंध्याला सळकन आवाज आला.

काही कळायच्या आत पायाच्या पोटरीला काय टोचलं म्हणून मागं बघितलं तसा तानाजी ओरडला, "आरं,मह्या साप..." बॅटरी घेऊन उभा असणारा महेश दचकून पुढं आला,तर मनगटाएवढा नाग फणा काढून उसात शिरला. तानाजीच्या पायावर डास चावल्यागत दोन खुणा स्पष्ट दिसू लागल्या.

महेशनं चटकन् टावेल मांडीजवळ घट्ट बांधला आणि मोटरसायकलला किक मारली.खोरं तिथंच टाकून तानाजी गाडीवर बसला.महेशनं गाडी वाऱ्यागत गावाच्या दिशेनं पळवली.गाडीवर बसल्या बसल्या तानाजीनं गावातल्या गुरवाला फोन करून देऊळ उघडायला सांगितलं.महेशच्या भावाला फोन करून त्याच्या घरची कोंबडीची आठ-दहा पिल्लं देवळात आणायला सांगितली.पिल्लांचा आवाज ऐकून गल्लीत कालवाकालव सुरू झाली.गडबडीत महेशचा भाऊ बोलून गेला की,तानाजीला पान लागलंय,विहिरीजवळ पाणी पाजताना नाग चावला.बातमी वाऱ्यागत गावभर पसरली. तानाजीच्या घरची पंगत नुकतीच उठली होती.


बायका जेवणाची भांडी घासत हुत्या.तवर कोणतरी हळूच सांगितलं अन् बायकांनी हंबरडा फोडला.काय झालंय कुणाला कळायच्या आधी सगळा लोंढा देवळाकडं पळायला लागला.गावातल्या कर्त्या माणसांनी बायकांना पुढं येण्यास मनाई केली.अशावेळी शिवाशिव नको अपशकून होईल म्हणाले.कोणतरी गर्दीत बोलून गेलं.अपशकून कसला नागीन पहिल्याच रात्री तानाजीला डसली. निष्पाप पोराचा घात केला.अवदसा कुठनं आली आणि पोराच्या आयुष्यात विष कालवलं. बोलण्याचा सूर शारदाच्या दिशेला चालला. वेळकाळ बघून काहीजण समजूत घालायला लागलं;पण जे काही झालंय याची शारदाला भणकच नव्हती.फक्त काहीतरी अघटित घडलंय इतकंच तिच्या कानावर आलं हुतं.


देवळात पुजाऱ्यानं कोंबडीची पाच-सहा पिल्लं तानाजीच्या पायाला डंख मारला होता तिथं लावली.ती सगळी झटक्यात गप झाली.पिल्लं संपत आली तरी असर कमी येत नव्हता.

अजून पिलांची जुळवाजुळव सुरू झाली.तानाजीच्या बहिणींनी हंबरडा फोडला अन् गावातल्या बायकांच्या सुरात सूर मिसळून शारदाला पांढऱ्या पायाची म्हणून घराबाहेर ओढायला लागल्या.तसा सगळा प्रकार घरातल्या लोकांना कळला. तानाजीची आई आक्रोश करायला लागली. 


पतीच्या जाण्यानं निष्ठूर झालेल्या घरात आता कुठं आनंदाची बासरी वाजली होती,ती या नागिणीसाठी पुंगी वाजली की काय ?


शारदानं स्वतःला सावरत संसारसटातील भांड्यात मांडलेली नवीकोरी सुरी घेतली.काहीजणांना वाटलं आता ही जीव देणार.तिला आडवायला जाणाऱ्यांना तानाजीच्या बहिणींनी मागं ढकललं. 'मरू दे तिला,पण माझा भाऊ जगला पायजे...' हे वाक्य शारदाच्या कानठळ्या बसवून गेलं.ती तडक देवळात घुसली.इतर बायकांना आत येण्यापासनं आडवणारी मंडळी शारदाचा अवतार बघून मागं सराकली.देवळात खांबाला टेकून बसलेल्या तानाजीच्या समोर शारदा उभा राहिली.तिला बघून डोक्याला हात लावून बसलेला तानाजी सावध झाला.शारदानं डोळ्यांत डोळं घालून बघितलं. तानाजीनं गालात हसून आपण ठीक असल्याचं खुणावलं.शारदानं कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता हातातल्या सुरीनं डंक मारलेल्या ठिकाणी कापून जखम मोठी केली.रक्त भळाभळा वहायला लागलं.तसं तानाजीच्या मस्तकात जोराची कळ गेली.दाबून जेवढं रक्त निघंल तेवढं तिनं काढलं. जास्त दाबलं की तानाजीला दुखायला लागलं. शारदानं हातातली सुरी टाकून दिली.जखमेतलं रक्त तोंडानं वढून थुकायला सुरू केलं.बघणाऱ्या लोकांनी मात्र तोंडावर हात ठेवला.तेवढ्यात गर्दीतून कोणतरी बडबडलं.जी नागीन डसलीया तिनंच विष उतरवलं.काय ते पोरीच धाडस, नवऱ्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला.हीच खरी सावित्री. गर्दीत कोणी कौतुक केलं तर कोणी कुचेष्ठा. शारदानं जमेल तेवढं काळंनिळं रक्त काढून टाकलं.घामानं डबडबलेल्या शारदानं शेवटच्या थुकीत निव्वळ लाल रक्त आल्यालं बघितलं आणि नवऱ्याकडं डोळं भरून बघत गालावर एक स्मित आणलं.नवऱ्याच्या गालावरनं हात फिरवत त्याच्या कानात, "जगलो वाचलो तर पुन्हा भेटू..." असं म्हणत शारदानं तानाजीच्या छातीवर डोकं ठेवलं. तिथंच ती बेशुद्ध पडली.दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यावर आपण आषाढ पाळायला माहेरी जाणार नाही असं सांगितलं आणि तानाजीच्या बहिणींना सासरी पाठविलं…


समाप्त…





५/७/२५

ओंजळीतलं पाणी / Boiling water

सकाळपासूनच तानाजीच्या घरात गडबड,गोंधळ सुरू होता.त्याचं लग्न होऊन आज चौथा दिवस होता.अगदी लग्नाच्या आधी दोन दिवस तयारीपासून पोटाला नीट दोन घास वेळेवर नाहीत की,डोळ्याला झोप नाही.अंग नुसतं शिणून गेलं होतं.कधी एकदाचं सगळं विधी संपतायत अन् कधी समाधानानं शांत झोपायला मिळतंय असं त्याला झालेलं.त्यात आज देवीचा गोंधळ घातलेला. सगळ्या गावाला मटणाचं जेवण केलेलं.एरवी घरटी एखादं माणूस जेवायला येतं;पण आज झाडून सारा गाव आलेला.


रीतिरिवाजाप्रमाणं लग्नानंतर देवीचा गोंधळ घालून तिच्या देवळाच्या मागं चार पायाचा बळी दिल्याशिवाय नवरा-नवरी एका खोलीत राहू शकत नव्हतं.मटणाचा रस्सा वरपून गावकरी खूश. जाताना तानाजीला चिमटा काढून जायची,

"काय मग? लय घाई झाली आसल आज झोपायची ? चार-पाच दिवस जागरण झालं नव्हं तुझं? आज झोप नित्रास..."


तानाजीला या बोलण्यानं गुदगुल्या व्हायच्या."पर नित्रास कसला झोपतुया ? लग्नात झालेल्या खर्चाची उद्यापासनं भागवाभागीव करायला लागणार हाय." वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर घरची सगळी जबाबदारी तानाजीवर आली होती. त्यावेळी हा उमदापुरा विशीत होता.दोन बहिणी लग्नाला आलेल्या.वडिलांच्या दवाखान्याच्या खर्चासाठी काढलेलं कर्ज फेडणार तोवर दोन्ही बहिणींची लग्नं.त्यानंतर त्यांची माहेरपणं,जावयांना पहिल्या सणाचा मानपान झाला. - बहिणींची बाळंतपणं झाली.वडिलांच्या माघारी पोरींना काहीही कमी पडलं नाय पायजे म्हणून आईची तळमळ.या सगळ्याचा गाडा ओढायला तानाजीला शेतीचाच काय तो आधार होता.त्यात खतांचा खर्च,पाण्याचा खर्च,कामगारांची मजुरी,कधी मधी पावसानं किंवा टोळधाडीनं दगा दिला की जिवाला घोर.पिकांना,जनावरांना औषधपाण्याचा खर्च जाऊन उरलेल्या पैशातनं घर चालवायचं.वर्षभर पुरंल इतकं ज्वारी,तांदूळ शेतात पिकवायचं.दूध-दुभत्याचा घरखर्चाला मोठा आधार व्हायचा.घरात बाकी कसली उधळपट्टी नसली तरी सणासुदीला कपडालत्ता,तेल-तिखट,मीठ-मसाला तोच काय तो विकत आणायचा.आठवड्याला दोनदा मटण पायजेच असा काही हट्ट नव्हता. देवादिकांच्या नावाखाली कधीच गाडी करून फिरणं नाही.महिनोन्महिने शहराचं तोंड बघायचा नाही.मग गाठीला चार पैसं उरायचं.


काटकसर करून जनावरांसाठी गोठा बांधला. गोबरगॅसही बांधला.घराची डागडुजी करून लग्नाला आलेल्या पाहुण्यांसह नातेवाईकांना बसा उठायला जागा केली.तुमची पोरगी आमच्या घरी खाऊन-पिऊन सुखी राहील याची खात्री पाहुण्यांना वाटंल अशी सोय केली;पण तानाजीचं लग्न काही केल्या ठरत नव्हतं.मुलींच्या मुलाकडून दांडग्या अपेक्षा असायच्या.पोरगा दहा हजार पगारावर कुठंतरी शिपाई असला तरी चालंल पर शेतकरी नको.शहरात नोकरी पाहिजे अन् गावाकडं शेती पाहिजे,अशी मागणी करणाऱ्या पोरी शेती करणाऱ्या तानाजीसोबत लग्नाला तयार होतील का? खेड्यात राहिलं तर शेण काढावं लागणार. शेतात जावं लागणार.त्यापेक्षा शहरात राहिलं की, कसं सासू-सासरा गावात राहून शेती करणार. शहरात भाड्याच्या घरात राजा-राणीसारखं राहणार.मागं सरक म्हणायला सासू जवळ नको... लिपस्टिकनं चोच रंगवून चिमणी पाणीपुरी खाणार, सिनेमाला जाणार.दोघांच्यापुरता स्वयंपाक केला की,राणी टी.व्ही. बघत दिवस घालवणार.मग दोन दिवसांपूर्वी तोडलेली भाजी विकायला भाजीपाला दारावर आला की,रोख पैशानं मिळंल ती भाजी घेणार.कुजलेल्या पेंढीतली मूठभर भाजी निवडणार.पिशवीतलं दूध दारात येतं ते पाणी मिसळून उकळून उकळून पुरवणार.उन्हात जायला नको,

चेहऱ्यावर डाग नको,अंगाला घाम नको,मग घरचं ताजं दूध खरपूस तापवून रबरबीत साय मिळाली नाही तरी चालंल.

बांधावरचा पावटा नको की ताजा शेवगा नको.शेतातल्या ताज्या भाजीपेक्षा फ्रीजमधली फ्रेश भाजी खाऊ;पण शहरात राहू म्हणणारी पोरगी तानाजीला लग्नाला नकारच द्यायची.

शेती करतोय म्हणून पोरी लग्नाला नकार देतायत तर शेती विकून शहरात घर घ्यावं का? शहरातल्या एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या बंगल्यात माळी म्हणून नोकरी करायची.


 तर त्यांच्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त दहा दिवसाला दूधाचं बिल मिळतंया.कुणी मागं सरक म्हणायची धमक नाय.शेतात राबला की पोटाला भूक लागती,रात्रीला शांत झोप लागती.ना रक्तदाब ना साखर वाढती,ना ढेरी सुटती.रोज संध्याकाळी आईच्या सेवेला हजर अन् आईच्या हातच्या जेवणाची चव ढाब्यावरच्या जेवणाला कधीच येणार नाय आसं म्हणत तानाजी कोणतरी मिळंल जिला शेतकरी नवरा आवडंल याची वाट बघत होता.


गेल्या महिन्यात तो योग जुळून आला. शिकल्या सवरल्याली शारदा तानाजीसोबत लग्न करायला तयार झाली.शारदाचं आई-वडील शेतमजूर.चार बहिणींच्या पाठीवर त्यांना मुलगा झाला.पाय ठेवायला स्वतःची शेती नाही तरी पोरींना झेपल तेवढी शाळा शिकविली.थोरल्या तिघींच्या लग्नात खर्चामुळं आधीच घाईला आलेल्या वडिलांनी चौथ्या नंबरच्या शारदाचं लग्न जरा उशिराच करायचं ठरवलं.तोवर तिला पुढं काहीतरी कोर्स कर म्हणून सांगितलं.म्हणून शारदानं नर्सचा कोर्स केला आणि दवाखान्यात नोकरीला लागली.पोरीच्या पगारामुळं आधीच्या लग्नाचा कर्जाचा डोंगर उतरला;पण तिच्या कमाईवर डोळा ठेवून तिचं लग्न मुद्दाम उशिरा करतोय अशी कुजबूज शेजारी-पाजारी करायला लागलं.


स्वाभिमानी बापाला हे खटकायला लागलं म्हणून त्यानं शारदाच्या लग्नाचा विषय सुरू केला.घरची परिस्थिती नसताना माझ्या बापानं मला शिक्षण दिलं,मग मी त्याला हातभार लावला तर बिघडलं कुठं? या शारदाच्या प्रश्नाचं उत्तर तिच्या वडिलांकडं नव्हतं;


पण तुझ्या संसाराची जबाबदारी तू वेळीच तुझ्या खांद्यावर घे.नवरा कमवून आणणार आणि घरात बसून फक्त पीठ मळून खायला घालणार असं न म्हणता,नवऱ्याच्या प्रत्येक सुख-दुःखात न डगमगता बरोबरीनं उभं राहिलं पायजे.सासर हे आपलं माहेरच आहे असं समजून संसार कर,असं संस्कार असणारी शारदा तानाजीच्या नशिबात आली.


आज गोंधळ झाला की,पहिल्यांदा नवरा-नवरी त्यांच्या खोलीत जाणार म्हणून माडीवरच्या खोलीची सजावट सुरू होती.त्यात आज लोडशेडिंगमुळं लाईट नव्हती.कुठं गॅसबत्ती,

कुठं कंदील,मेणबत्ती तर कुठं चार्जिंगच्या बॅटरीचा उजेड पाडून लोकांना जेवायला वाढायचं सुरू होतं. उशिरा जेवायला येणारे काही महाभाग देशीचा डोस चढवूनच आले होते.रश्यात मिळणाऱ्या मटणाच्या फोडीला चापचत रस्साभात वरपत होते.ज्याच्या ताटात हाडं यायची तो म्हणायचा बकरं म्हातारं हुतं, सारी हाडंच वाढली.ज्याला मऊ फोडी यायच्या तो म्हणणार मटण शिजलंच नाय,


शिल्लक दुसरा भाग पुढील लेखामध्ये…वाघीण प्रतिक पाटील स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर,या मधील एकुण ११ कथा प्रकाशित झालेल्या आहेत.आपण त्या आवर्जून वाचल्या त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व धन्यवाद…विजय गायकवाड