* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

६/८/२५

अमीन्सचा माथेफिरू भिक्षू / The Monk of Amiens

(संन्यासी पीटर…) रोमन चर्चची संघटना मानवजातीला आशीर्वादरूप व्हावी म्हणून करण्यात आलेली होती.

शांतीच्या निशाणाखाली साऱ्या जगाचे एकीकरण करण्याचा तो ऐतिहासिक कालातील पहिला प्रयत्न होता.चर्चचे पहिले पहिले काही पाद्री व धर्मादेशक खरोखरच देवाचे लोक होते.

नम्रता,सहिष्णुता,निःस्वार्थ जनसेवा,या गोष्टी त्यांच्या जीवनात भरलेल्या दिसत.


ते गॅलिलीच्या थोर दैवी धर्म संस्थापकांचे सच्चे अनुयायी भासत.या अनेक शतकांच्या इतिहासात कॅथॉलिक चर्चने कित्येकदा तरी अन्यायाविरुद्ध न्यायाची बाजू घेतलेली आहे,द्वेष सोडून शांतीची घोषणा केली आहे व युद्धातील विनाशाऐवजी सौंदर्यनिर्मितीवर भर दिला आहे.


पण चर्चचे वरचे पदाधिकारी मात्र नेहमीच हृदयातील देवाचा आवाज ऐकत नसत.त्यांचे दुसरे धंदे असत.बिशप व पोप पुष्कळदा क्षुद्र राजकारणात रंगून जात.पृथ्वीवर न्यायाचे राज्य करण्याऐवजी आपले खिसे सोन्याने कसे भरतील, एवढेच ते पाहत.त्यांच्या हाती चर्च हे दुसऱ्यांना अमानुषपणे छळण्याचे,मारण्याचे व त्यांच्यावर जुलूम करण्याचे साधन मात्र झाले.शार्लमननंतरच्या पाचशे वर्षांचा इतिहास हा मानवजातीच्या इतिहासातला अत्यंत किळसवाणा व लज्जास्पद भाग होय.या काळात चर्चमध्ये सतत स्पर्धा व मत्सरच दिसतात,धर्मवेडेपणास ऊत आलेला दिसतो आणि कत्तली, लुटालुटी व ख्रिश्चन आणि मुसलमान यांमधील धर्मयुद्धे यांचा सुळसुळाट झालेला दिसतो.या पाच शतकांचा इतिहास निरनिराळ्या इतिहासकारांनी निरनिराळ्या दृष्टींनी लिहिलेला आहे.अनेकांनी त्याची ओढाताण केली आहे.या विद्रूप व भेसूर काळाच्या इतिहासावरील रक्ताचे डाग,

त्याच्याभोवती दिव्य तेजोवलये निर्मून लपविण्याचे प्रयत्न कित्येकांनी केले आहेत.वेल्ससुद्धा आपल्या 'जगाच्या इतिहासाची रूपरेषा' या ग्रंथात मध्ययुगासमोर जणू भक्तिभावाने गुडघे टेकताना आढळतो.तो म्हणतो, "ख्रिश्चन चर्चने पवित्र युद्धाच्या नावाने लोकांतील उत्कट भावनांचे संघटित एकीकरण केले,ही फारच मोठी गोष्ट होती. हे काम महत्त्वाचे व फारच चांगले होते. ही 'पवित्र युद्धां' ची चळवळ पेटविणारा पीटर नामक ख्रिश्चन यती होता.तो रक्तपिपासू कोल्हा असूनही वेल्सला जणू हिब्रू प्रेषितच वाटतो! ती धर्मयुद्धे वाचून,त्या हकिकती ऐकून वेल्स नाचू लागतो,

उत्साहाने वेडावून जातो व लिहितो,या काळाचा इतिहास मोठा आकर्षक आहे.लेखणीवर बसून या इतिहास क्षेत्रात खूप रमावेसे वाटते. युरोपजवळ काही ध्येय आहे,असे या काळातच आपणास प्रथम आढळते.युरोपला आत्मा आहे,ही गोष्ट या काळातच प्रथम दिसून येते."


वेल्सला जे 'ध्येय' व जो 'आत्मा' या काळात दिसल्याचा भास झाला,त्याची वास्तविक किंमत काय आहे हे पाहू या.या काळाचे बिनचूक चित्र मी हे थोडक्यात देतो.या मारामाऱ्यांचे सविस्तर वर्णन कंटाळवाणे होईल.मी तर या गोष्टींकडे गंभीरपणे पाहूच शकत नाही.पण जरा फेरफटका मारून येऊ या.या धर्मयुद्धातील पहिले युद्ध उद्भवण्याचे कारण प्रथम पाहू या.शार्लमनने चाबूक मारून नाखूश व हट्टी युरोपला नवधर्माची दीक्षा दिली होती,जुना धर्म लोपला होता व चर्चचे बडे बडे अधिकारी दिवसेंदिवस व्यभिचारी व अधःपतित होत होते. काही उदारात्मे त्या काळीही होतेच.खऱ्या भक्तिप्रेमाने रंगलेले,ख्रिस्ताला शोभेसे काही सौम्य व शांत लोक या काळातही आढळतातच. 


पण अशा लोकांना चर्चमध्ये महत्त्वाचे स्थान नसे. क्षुद्र प्रवृत्तीचीच माणसे बहुधा अधिकाराच्या जागांकडे ओढली जात असतात.धकाधकी करणारे,पुढे घुसणारे,

अहंमन्य,स्वार्थपरायण लोकच सत्तेसाठी हपापलेले असतात.त्यांना झगडे करण्यात कसलीही दिक्कत वाटत नाही.वाटेल ते करायला ते तयार असतात,बिलकूल मागेपुढे पाहत नाहीत.असे लोकच पुष्कळदा चर्चमधल्या बड्या बड्या जागांवर निवडून येत.बहूतेक सर्व पोप मूर्तिमंत पापात्मेच असत.प्राचीन रोमन सम्राटांप्रमाणे पोपही भराभर धर्माच्या गादीवर येत व पुष्कळांचे खून होत.कोणाकोणांवर विषप्रयोगही होत.पोप सहावा स्टीफन,पोप बारावा जॉन,पोप सहावा अलेक्झांडर वगैरे दाखवून देतात की,सत्य हे कादंबरीहूनही विचित्र व कुरूप असू शकते.जरा गंभीर वृत्तीच्या इतिहासकारांनी अनुल्लेखाने या पापात्म्यांच्या दुष्कृत्यांची जगाला विस्मृती पाडली आहे;किंवा रोमन उत्तारे टाळून 'त्यांची कृत्ये जगजाहीर होणार नाहीत' याबद्दल काळजी घेतली आहे.या पोपांची ख्रिश्चन धर्माला न शोभणारी दुष्कृत्ये पुन्हा जिवंत करून सांगणे ठीक होणार नाही;व त्याचा काही उपयोगही नाही.यांचे खासगी जीवन कादंबरीकारास करमणुकीचे वाटेल;पण इतिहासकाराला त्याचा काडीचाही उपयोग नाही. एक गोष्ट आपण ध्यानात घेऊ या की,असल्या लोकांच्या द्वेषमत्सरातूनच रोमन कॅथॉलिक चर्च व ग्रीक चर्च यांच्यामध्ये भीषण मतभेद माजले ! मुळात ख्रिश्चन धर्मातील काही मतभेदांवरच हे दोन्ही संप्रदाय उभे होते;पण पुढे दोन्ही बाजूंस वैयक्तिक महत्त्वाकांक्षा उभ्या राहिल्या. इ.स. १०५४मध्ये रोमन चर्चच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रीक चर्चच्या पदाधिकाऱ्यांना कह्यात ठेवता येत नाही असे पाहून ग्रीक चर्च धर्मबाह्य ठरविले व "ग्रीक चर्चचे सारे पाद्री कायमचे नरकात पडतील."असे उ‌द्घोषिले.ग्रीक चर्चही स्वस्थ बसले नाहीच.त्यानेही त्याच प्रकारे उत्तर दिले.क्रूसेडस् या नावाने जो विनाशाचा भीषण भोवरा पुढे सारखा फिरू लागला.त्यात मिसळलेल्या अनेक प्रवाहांपैकी ग्रीक चर्च व रोमन चर्च यांतील भांडण हा मुख्य प्रवाह होता.क्रूसेडरमधील पहिले युद्ध म्हणजे केवळ ख्रिश्चनांचा मुसलमानांवरील हल्ला नसून त्यात ग्रीक चर्चला शरण आणण्याचाही डाव होता.


क्रूसेड्सचे दुसरे एक कारण म्हणजे,नॉर्मन लोकांनी केलेल्या स्वाऱ्यांमुळे सर्वत्र उत्पन्न झालेली अशांतता तद्वतच बेदिली.हे नॉर्मन लोक युरोपच्या पूर्वेस व पश्चिमेस सर्वत्र लोंढ्याप्रमाणे पसरले.युरोपातील आधीच लोकसंख्या खूप वाढलेल्या देशांत नॉर्मनांची आणखी गर्दी झाली.त्यांनी हजारो घरेदारे बळकावली.त्यामुळे घरादाराला मुकलेले लोक युरोपभर भटकत होते.ते आशियावर स्वारी करून परधर्मीयांना त्यांच्या घरातून हुसकून द्यायला अधीर झाले होते.ते या कामासाठी तयारच होते.तिसरे कारण युरोप व आशिया यांमधील व्यापारी स्पर्धा,क्रूसेडसूच्या नेत्यांना जेरुसलेम क्षेत्र ख्रिश्चनांस सुरक्षित करावे, असे तर वाटत होतेच; पण त्याहीपेक्षा युरोपच्या व्यापारासाठी जग बिनधोक करावे, असे अधिक तीव्रतेने वाटत होते. क्रूसेडस् करणारांना हाच हेतू अधिक उदात्त वाटत होता.


चौथे कारण म्हणजे,पोप दुसरा अर्बन याची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा,आपले जरा डळमळीत झालेले आसन भक्कम करावे असे त्याच्या मनाने घेतले.त्यासाठी त्याने आपल्याभोवती गुंड व पुंड जमवून त्या बाजारबुणग्या लुटारूंना 'धर्मयुद्ध' दिले. तो त्यांना म्हणाला,"तुम्ही तिकडे पूर्वेकडील ज्यू वगैरे विधर्मीयांना ठार कराल तर प्रभू तुम्हांस सर्व पापांपासून मुक्त करील."अशा रीतीने पोप म्हणजे जणू ईश्वराचा शापच झाला! पोप ही चर्चच्या इतिहासातील एक अत्यंत शक्तिसंपन्न व्यक्त झाली.


शेवटचे कारण यती पीटर याचा असहिष्णू स्वभाव.अमीन्सचा भिक्षू पीटर हा पहिल्या क्रूसेडचा आत्मा तो बुटका व अर्धवट होता.त्याने पहिल्या क्रूसेडमध्ये प्राण ओतला.त्यानेच धर्मयुद्धाचे ध्येय दिले.


भिक्षु पीटर हा अकराव्या शतकातला कॅटो होता. कॅटोने कार्थेज धुळीला मिळविण्यासाठी रोमनांना चिथावले,

उठविले;पीटरने 'जेरुसलेम ताब्यात घ्या' अशी ख्रिश्चनांस चिथावणी दिली.दोघेही…(मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,

अनुवाद-साने गुरुजी, मधुश्री पब्लिकेशन)अतिशयोक्तीने बोलणारे व शापवाणी उच्चारण्यात प्रवीण होते.पीटर,पोप दुसरा अर्बन याजकडे गेला व त्याने त्याला 'जेरुसलेममधले तुर्की मुसलमान ख्रिश्चन यात्रेकरूंचा अपरंपार छळ करतात',

असे सांगितले.ते अगदीच खोटे होते असे नव्हे.अकरावे शतक म्हणजे धार्मिक छळाचेच शतक म्हणा ना! सारे जग द्वेषाच्या वावटळीत सापडले होते. मुसलमान ख्रिश्चनांची,तर ख्रिश्चन मुसलमानांची कत्तल करीत होते आणि ज्यूंची कत्तल तर काय, सर्वच करीत ! न्यायासाठी शस्त्र घेण्याला योग्य असे खरोखर कोणाचेच हात नव्हते.सारेच अपराधी व दोषी,सारेच खुनी व गुन्हेगार ! पण पोपने एकांगी दृष्टी ठेवली व ख्रिश्चनांच्या पापांकडे डोळेझाक करून मुसलमानांना मात्र धडा शिकविण्याची पवित्र प्रतिज्ञा केली.त्याने इ.स. १०९५ मध्ये क्लमांड येथे धर्मसभा बोलाविली व ती पुढे जळजळीत द्वेषाचे प्रवचन केले.ते साऱ्या दुष्ट भावना जागृत करणारे व मुसलमानांबद्दल सर्वांस चीड आणणारे भाषण होते.तो म्हणाला,"तुम्ही या पवित्र युद्धात भाग घ्याल तर तुम्ही ईश्वराचीच कृपा मिळवाल असे नव्हे,तर ऐहिक दृष्टीनेही तुमचा फायदाच होईल.मेल्यानंतर ईश्वराचे राज्य,इहलोकी भरपूर लूट ! हे युद्ध अशा रीतीने दोन्ही लोकी फायदेशीर आहे.पॅलेस्टाईन म्हणजे समृद्ध व संपन्न देश.दुधा-तुपाने,

मनाने व द्राक्षांचे भरलेला देश..


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!



४/८/२५

वृक्षाकडून हवामानाचे नियंत्रण / Climate Control by Trees 

झाडांना तापमान,आर्द्रता आणि प्रादेशिक हवामानातील अचानक मोठे बदल हे पसंत नसतात.पण यातून त्यांची सुटकाही नसते,मोठी झाडे पण त्यांच्या तावडीतून सुटत नाहीत.झाडांना कधीतरी एकदा हवामानावर नियंत्रण ठेवता येऊ शकत असेल का,असा विचार तुमच्या मनात कधी आला का? याची प्रचिती मला जर्मनीच्या बांबर्ग गावाजवळच्या कोरड्या,वाळूयुक्त आणि नापीक जमिनीत वसलेल्या एका जंगलात आली.

इथे फक्त पाईनचे वृक्ष तग धरू शकतील असे मत वनतज्ज्ञांनी एकेकाळी मांडलं होतं.केवळ एकसुरी लागवड होऊ नये म्हणून काही बीच वृक्षही मध्ये मध्ये लावले गेले.पाईनच्या सूचीपर्णी पानगळीत तयार होणारे आम्ल बीचच्या पालवीमुळे शमेल,हा त्यामागचा उद्देश.लाकडासाठी पानझडी वृक्षांचा वापर करण्याचा विचार केला नव्हता,त्यांच्याकडे सेवा देणारं झाड म्हणून पाहिलं जात होतं. पण बीच वृक्षांना अशी दुय्यम भूमिका घेण्यात रस नव्हता.काही दशकातच त्यांनी आपला रंग दाखवला.बीच वृक्षांच्या वार्षिक पानगळीबरोबर तयार झालेल्या अल्कलाईन क्षारीय जैविक मालाची भर मातीत पडली.यामुळे मातीत अधिक आर्द्रता साठवली जाऊ लागली.

त्याचबरोबर जंगलातील वातावरण अधिक दमट होत गेले कारण बीचच्या रुंद पानांमुळे हवेचा वेग कमी झाला.संथ हवा म्हणजे कमी बाष्पीभवन, पाणी मुबलक मिळाल्यामुळे बीचची वाढ वेगाने झाली आणि पाईनपेक्षा ते जास्त उंची गाठू शकले. हे सगळं होत असताना जंगलाची जमीन आणि सूक्ष्म हवामान बदलत गेले आणि सूचीपर्णी वृक्षांपेक्षा पानझडी झाडांना अधिक योग्य झाले. झाडे आपल्या आजूबाजूचे वातावरण सोयीस्कररीत्या कसे बदलू शकतात,याचे हे उत्तम उदाहरण आहे.वनरक्षक म्हणतात की, जंगल आपल्याला हवा तसा अधिवास तयार करतात.

वर म्हटल्याप्रमाणे वाऱ्याला शांत करणे हे झाडांना नक्कीच जमते,पण पाण्याच्या नियोजनाचे काय? जंगलातल्या मातीवर घनदाट झाडी असल्यामुळे ती उष्ण वाऱ्यांपासून सुरक्षित राहते आणि पाण्याचे नियोजन शक्य होते.आकेन मधील आरडब्ल्यूटीएचच्या विद्यार्थ्यांनी माझ्या जंगलात एक अभ्यास केला.नियमित छटाई केल्या जाणाऱ्या सूचीपर्णी लागवड क्षेत्रातील आणि नैसर्गिकरीत्या वाढू दिलेल्या रुंदपर्णी बीच वृक्षांच्या क्षेत्रातील तापमानात त्यांना मोठा फरक दिसला. 

ऑगस्टमधील एका अतिशय उष्ण दिवशी सूचीपर्णी जंगलातील पारा ९८ अंश फॅरेनहाईटला पोहोचला होता.त्या दिवशी पानझडी वृक्षांच्या क्षेत्रात सूचीपर्णी क्षेत्रापेक्षा सुमारे पन्नास अंश तापमान कमी होते.तिथे जास्त जैविक माल असल्यामुळे गारवा होता आणि त्यामुळे बाष्पीभवन कमी झाले होते.जंगलात जितके जास्त जिवंत किंवा वठलेले लाकूड असेल तितका जमिनीवर जैविक मालाचा जास्त थर असतो.आणि त्यात जास्त पाणी टिकते. बाष्पीभवनामुळे वातावरण गार पडते आणि गारव्यामुळे बाष्पीभवन कमी होते. हे वेगळ्या पद्धतीने मांडायचे तर सुदृढ जंगलाला उन्हाळ्यात आपल्यासारखाच घाम येतो आणि आपल्यावर होतो तोच परिणाम इथेही होतो.

तुम्हाला एखाद्या घराकडे बघून झाडाला येणारा घाम दिसू शकतो.घराशेजारी ख्रिसमसचे झाड लावलेले आपल्याला सहज दिसून येते.ते विकत घेताना अनेकदा त्याच्या मुळापाशी असलेला गोळा तसाच असतो.ते अगदी घराजवळ लावलेले झाड कालांतराने मालकाच्या अपेक्षेपेक्षा जास्तच वाढत जाते.काही वेळा त्याच्या फांद्या छपरावर जातात आणि अशा परिस्थितीत घरावर त्यांच्या घामाचे डाग स्पष्टपणे दिसतात.ते आपल्या काखेतसुद्धा नकोसे असतात तर घरावर उमटलेले डाग आणखीच खराब दिसतात.झाडांना इतका घाम येतो की,शेजारी असलेल्या भिंतीवर किंवा कौलांवर बुरशी आणि शेवाळं जमू लागतं.
अशामुळे पावसाच्या पाण्याला अडथळा होतो आणि सुटून आलेल्या शेवाळ्यामुळे पन्हाळी तंबून राहतात. 

सतत ओले राहिल्यामुळे घरावरचे प्लास्टर निघून येते.पण जे लोक आपली गाडी झाडाखाली लावतात त्यांना मात्र त्याचा फायदा होतो.प्रचंड थंडी असली की इतरांना त्यांच्या काचेवरून बर्फ काढावा लागतो मात्र झाडाखाली लावलेल्या गाड्यांना तो त्रास होत नाही.झाड जवळ लावून घराला त्रास होतो ही बाब सोडली,तर त्यांच्यामुळे सूक्ष्म हवामान कसे नियंत्रित राहते,याबद्दल फार कुतूहल वाटते.विचार करा,सशक्त जंगलात याचा केवढा परिणाम होत असेल !

(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,
अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)

ज्यांना घाम खूप येतो त्यांना पाणीही बरंच प्यावं लागतं.पावसामध्ये झाडं पाणी पिताना दिसून येतात.मी पावसात जंगलाची फेरी मारायला सूचवणार नाही कारण अनेकदा तेव्हा वादळही असतं.पण जर तुम्ही कामानिमित्त बाहेर असाल तर तुम्हाला हे पाहता येईल.बहुतेकदा बीच वृक्ष आपली तहान शमवताना दिसतात.इतर पानझडी वृक्षासारख्या त्यांच्या फांद्या वरच्या दिशेला वळलेल्या असतात किंवा खालीही झुकतात. 

सूर्यप्रकाश आणि पाऊस पकडायला त्यांचा वरचा डेरा वेळोवेळी उघडतो.पावसाचे पाणी हजारो, शेकडो पानांवरून,फांद्यावरून वाहू लागते. फांद्यांवरून ओघळणारे हे पावसाचे पाणी खोडाकडे येऊन मिळते आणि खोडावरून जमिनीकडे जाताना छोट्या नदीचेच जणू रूप घेते. जेव्हा ते बुंध्याच्या खालच्या भागापर्यंत पोहोचते तेव्हा त्याचा वेग भरपूर वाढलेला असतो.त्यामुळे जमिनीपर्यंत आल्यावर ते फेसाळते.अशा रचनेमुळे मुसळधार पावसात झाडं शे-दोनशे गॅलन पाणी आपल्या मुळांकडे वळवू शकतात.मुळांच्या भोवती पाण्याचा साठा केला जातो आणि कोरड्या परिस्थितीत याचा उपयोग होतो.

स्प्रूस आणि फर वृक्ष मात्र असं करू शकत नाहीत.चतुर फर बीच वृक्षात मिसळून जातात पण स्प्रूस मात्र आपल्याच घोळक्यात असल्यामुळे तहानलेले राहतात.स्प्रूसचा डेरा छत्रीसारखा असतो म्हणून आपण त्या खाली उभे राहिलोच तर पाऊस लागणार नाही.पण यामुळे मुळांनाही पाऊस लागत नाही.एका स्क्वेअर यार्डात अडीच गॅलन पर्यंत पाऊस पडला (हा बऱ्यापैकी पाऊस आहे) तरी पाणी स्प्रूसच्या सुईसारख्या पानांवर आणि फांद्यांवर राहते.ढग जाऊन ऊन पडलं की पानं कोरडी होतात आणि सर्व आर्द्रता निघून जाते.पण स्प्रूस असं का करत असतील,याचं सोपं उत्तर म्हणजे त्यांना दुष्काळासाठी स्वतःला अजून अनुकूल करता आलेले नाही.

स्प्रूस थंड हवेच्या ठिकाणी मजेत असतात. तिथल्या गारव्यामुळे जमिनीतलं पाणी वाळून जात नाही.त्यांना आल्प्सचा प्रदेश आवडतो कारण तिथे भरपूर पाऊस होतो आणि दुष्काळ कधीही पडत नाही.पण तिथं बर्फ जोरदार पडतो.त्यामुळे त्यांच्या फांद्या आडव्या आणि थोड्या खाली झुकलेल्या असतात.यामुळे त्या एकमेकाचा आधार घेत जमलेल्या बर्फाचे वजन पेलू शकतात तसेच

बर्फ खाली पडायलाही मदत होते.पण कोरड्या हवेत किंवा खालच्या भागात या थंड प्रदेशातील अनुकूलनाचा काहीही उपयोग होत नाही.मध्य युरोप मधील बहुतांश सूचीपर्णी जंगले ही एकेकाळी लागवड केलेली आहेत.आपल्याला साजेशा ठिकाणी लोक झाडं लावत असतात.
अशा ठिकाणी सूचीपर्णी झाड नेहमीच तहानलेली असतात.त्यांची पानं एक-तृतीयांश पाऊस अडवून,शोषून घेऊन नंतर त्याचे बाष्पीभवन करून ती वाफ पुन्हा वातावरणात सोडण्याच्या कामात असतात. पानझडी जंगल एकूण पावसाच्या फक्त १५ टक्के पाऊस अडवतात म्हणजेच त्यांना सूचीपर्णी जंगलांपेक्षा १५ टक्के जास्त पाणी मिळते.



२/८/२५

मित्र एक देणगी / Friends a donation 

सोन्याचा हिशोब मांडणाऱ्यापेक्षा मित्र जोडत जाणारा माणूसच खराखुरा श्रीमंत….!!


दुसऱ्या दिवशी सकाळी जेसन येऊन कॉन्फरन्स रूममध्ये वाट पहात बसला असल्याचं मला मागरिटनं सांगितलं.काम आणि पैसा या प्रदेशातली त्याची यशस्वी फेरी झाल्यावर त्याच्या धुमसत राहाण्यामध्ये सुधारणा झाली असेल अशी मला आशा वाटली होती.पण कॉन्फरन्स रूममध्ये आल्या आल्याच तसं काही नसल्याचं मला लगेच लक्षात आलं.मी खाली बसण्याच्या आतच त्यानं माझ्यावर टिकेची सरबत्ती सुरू केली.


"हे बघा,ह्या सगळ्या झंझटातून मला कशाला जायला लावताय ? हास्यास्पद आहे हे.मृत्यूपत्राची प्रत तुमच्याजवळ आहे.मला वारसा म्हणून काय मिळणार ते तुम्हाला ठाऊक असणारच.या केरकचऱ्याला चिवडत बसण्याचं टाळून आपण मूळ मुद्यालाच पोचू या ना ? बॉटमलाइन पर्यंतच पोचू सरळ."


जेसनकडे पाहून मी स्मित केलं.आणि म्हणालो, "सुप्रभात जेसन.तुला भेटून छान वाटलं.तुझ्या थोर काकांच्या पैशाबद्दलच्या धड्यानंतर या प्रक्रियेबद्दलची तुझी समज वाढली असेल अशी मला आशा वाटली होती."


मी हळूहळू उभा राहिलो.ऐंशी वर्षांचे वय झाल्यावर हे नेहमीचेच होऊन जाते.मी त्याच्याकडे रोखून पाहिलं, एक जज म्हणूनच्या कारकिर्दीत तसं बघून मी यशस्वी झालो होती.मी म्हणालो,

"तुझ्यापुढे दोन आणि दोनच पर्याय आहेत गड्या.रेड स्टीव्हन्सनं तुझ्यासाठी सांगून ठेवलेल्या प्रक्रियेतून तू जायचं तरी,किंवा आत्ताच्या आत्ताच तू त्यातून बाहेर पडू शकतोस.पण मी तुला एक गोष्ट सांगतो,तुझ्या वागण्यामुळे तुझ्या चुलत आजोबांनी तुला जी सर्वोत्तम देणगी ठेवली आहे ती घालवण्याच्या तू फार जवळ येऊन ठेपला आहेस."


जेसन खुर्चीत मागे रेलून बसला आणि त्यानं सुस्कारा सोडला.

"ठीक आहे,चालू ठेवू या आपण हे.बोला,पुढचं काय ?"


मागरिटनं खोका आणून माझ्या पुढ्यात ठेवला.मी टेप बाहेर काढली.आणि मागरिटन ती व्हिडिओ प्लेअर मध्ये टाकली.तिनं तो चालू केला. "जेसन,तुझ्या पहिल्या भेटीतच मिस्टर हेमिल्टन हा माझा अगदी जवळचा मित्र असल्याचं तू ऐकलंस.


अर्थ न समजताच मित्र हा शब्द साळढाळपणे वापरला जातो.हल्ली ओळखीच्या कोणाही परिचिताला लोक मित्र म्हणतात.माझ्या एवढा जगलास आणि खरेखुरे मित्र मोजायला दोन्ही हातांची बोटे लागायला लागली तर स्वतःला नशीबवान समज.


"जेसन,तुला मी आत्ता जी गोष्ट सांगणार आहे ती मी जिवंत असेपर्यंत कोणाला न सांगण्याचं ठरवलं होतं. आता तू माझ्या मृत्युनंतर हे पाहातो आहेस आणि सोबत माझ्या विश्वासातला एकजण आहे.मला सांगताना निर्धास्त वाटतंय.तुला ठाउक आहेच की पंचाहत्तरावा वाढदिवस उलटून जाईपर्यंत मी जगलो. आणि बऱ्याच लोकांच्या दृष्टीनं दीर्घ आणि निरामय आयुष्य होतं ते.परंतु कायम ही स्थिती होती असं मात्र नाही.


"मला आठवतंय,मी अठेचाळीस वर्ष नुकतीच ओलांडली असताना गंभीर दुखण्यानं आजारी झालो होतो.नक्की काय झालंय,त्याचं निदान डॉक्टरांना करता येईना.म्हणून त्यांनी देशभरातून तज्ज्ञ आणले.अखेर निदान एका दुर्मिळ किडनीच्या रोगाचं झालं,की जो असाध्य होता.त्यावर एकच आशा होती ती त्या काळात नवीनच निघालेल्या किडनी रोपणाच्या शस्त्रक्रियेची.


"आता तुला हे लक्ष्यात घेतलं पाहिजे की हा सगळा अश्रुतपूर्व प्रकार होता आणि किडनी काढून मिळणं त्या काळात हल्लीच्या सारखं सहज शक्य नसे.मी हॅमिल्टनला बोलावून घेतलं.(तो माझा नेहमीच वकील राहिलेला आहे) आणि त्याला देशभर किडनीचा शोध घ्यायला सांगितलं.मी पुरताच घाबरून गेलो होतो, विशेषज्ञ तर बोलून गेला होता की रोपण केलं नाही तर मी काही आठवड्यांचाच सोबती होतो.दोन दिवसांनी मला पूर्व किनाऱ्याकडून एक किडनी मिळत असल्याचं मिस्टर हॅमिल्टननं सांगितलं आणि माझ्या जीवात जीव आला."शस्त्रक्रिया यशस्वी झाली हे तुझ्या लक्षात आलं असेलच.मला माझं अर्ध,

प्रौढावस्थेतलं आयुष्य मिळालं. ज्याचा तुला अंदाज करता येणार नाही याची मला खात्री आहे,आणि आजपावेतो हे इतर कुणालाही माहीत नाही की मिस्टर हॅमिल्टनने शोधून आणलेली किडनी त्याची स्वतःची होती."


पडद्यावरचा रेड पाणी प्यायला थांबला आणि जेसन माझ्याकडे अविश्वासाने बघायला लागला.मोठ्या पडद्यावर रेडचं बोलणं पुढे सुरू झाल.या जगात अशा घटनेचा उलगडा एकाच गोष्टीनं होतो आणि ती म्हणजे मैत्री.जेसन मला ठाऊक आहे की तुला वाटतं की तुला खूप मित्र आहेत.पण खरं म्हणजे असे खूप जण आहेत की ज्यांना केवळ तुझा पैसा किंवा त्याच्या साह्याने विकत घेता येतील त्या गोष्टी हेच हवं असतं.गस् कॉल्डवेलच्या बरोबर जेवढा काळ तू घालवलास तो काळ सोडला तर तू आयुष्यात एकही दिवस काम केलं नाहीयेस.आणि काही उत्पादक म्हणावं असंही काही तुझ्या हातून घडलं नाहीये.पार्टीमध्ये इतरांची करमणूक करणारा तू तर पार्टीची जान असायचास आणि सहजपणे त्या कंपूतल्या टवाळांना पैसे पुरवणारा तू एक कूळ होतास.(अन् त्यांना तू सहजपणे मित्र म्हणतोस).


"पुढचे तीस दिवस तू विचार करून निरीक्षण करण्यात घालवावीस.या अवधीत खरीखुरी मैत्री कशाला म्हणायचं याची तत्त्वं तू मनाशी ठरवायची आणि मग मिस्टर हॅमिल्टनला तुझी तत्त्वं लागू पडणाऱ्या खऱ्याखुऱ्या मैत्रीचं एक उदाहरण सांगायचं.चांगल्या मैत्रीची समज येऊन तू ती जोपासलीस तर तुझ्या जीवनाचा स्तर खूप उंचावेल,यापरते अन्य जीवनात काही नाही."


व्हिडिओ टेप संपली.आणि जेसन विचारात गढून गेला. शेवटी पुटपुटला,"मला समजत नाहीये.म्हणजे..."


मी मधेच म्हणालो,"तुला समजत नाहीये हे ठाऊक आहे मला,पण तोच तर मुद्दा आहे.मला एवढीच आशा वाटते की तुझ्या चुलत आजोबांचे शब्द तू विसरणार नाहीस आणि तुझ्या हिताचा विचार केला तर महिन्याच्या अखेरपर्यंत तुला जरा समजायला लागेल.मी तुझ्या रिपोर्टची वाट बघतो." मी कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडलो आणि जेसन स्टीव्हन्स या तरूणाला त्याच्या गृहपाठाचा विचार करायला सोडून दिले.


पुढच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिस् हेस्टिंग्जनं माझ्या ऑफिसात येऊन सांगितलं की जेसननं आगाऊ वेळ ठरवून घेतली आहे.आणि तो तासाभरात हजर होणार आहे.मी रेलून खुर्चीत बसल्या बसल्या रेड स्टीव्हन्सचा,माझ्या जीवलग मित्राचा विचार करत होतो. ज्यांनी स्वतः कधी अनुभवलं नाही अशांना खास करून मैत्रीचा खोलवर रूजत जाणारा विचार कसा तुम्ही शिकवणार याची मला शाश्वती नव्हती.रेड स्टीव्हन्सनं जेसनवर जे जिकिरीचं काम सोपवलं होतं.त्यात तो कितपत यशस्वी होतो याबाबत मी चांगलाच साशंक होतो,किंबहुना दुःशंकच होतो.


कॉन्फरन्स टेबलशी आम्ही जमलो तेव्हा मिस हेस्टिंग्ज आणि मी गप्पच होतो.आम्ही दोघं जेसनची अभिव्यक्ती, त्याची रीत यांच निरीक्षण करत होतो.त्याच्या मनावर दडपण असल्या सारखं वाटत होतं.आम्हाला अभिवादन केल्यासारखं करत तो पुटपुटला, "मला वाटतं... मला म्हणायचं... मला की नाही...".


त्याला रोखत मिस् हेस्टिंग्ज म्हणाली,"मैत्रीची भावना तुला कितपत उमजली आहे याचा मिस्टर हॅमिल्टनला आज तू अहवाल द्यायचा असं आपलं ठरलयं."


जेसननं साशंकपणे माझ्याकडे पाहिलं आणि मान हलवून मी त्याला हसून प्रोत्साहन दिलं.


न त्यानं सुरूवात केली."या महिन्यात मी मैत्रीवर खूप विचार केला आणि मैत्रीची व्याख्या करतांना त्याची काही तत्त्वं मला सापडली.

मैत्रीमध्ये निष्ठा,बांधिलकी यांच्याबरोबर दुसऱ्याच्या सुखदुःखात आपली समरसता असते,एवढं मला आज म्हणता येतंय.

यापलिकडचं हे खरंतर असतं.पण शब्दात सांगणं कठीण आहे.


"टेक्ससमध्ये काम करत असतांना गस् कॉल्डवेलने मला एक गोष्ट सांगितली ती मी तुम्हाला माझ्या तत्त्वांचं उत्तम उदाहरण म्हणून सांगू शकतो.त्यानं सांगितलं की तो आणि अंकल रेड यांनी गुराढोरांच्या व्यवसायास सुरूवात केली तेव्हा दोघांच्या रँचेसमध्ये मैलोन मैल अंतर होतं.त्याच दक्षिणोत्तर पसरलेल्या पट्ट्यात इतर रँचेस् होती.प्रत्येक वसंत ऋतुत सर्व रँचेसमध्ये जे राऊण्डअप म्हणतात ते व्हायचं.म्हणजे असं की सगळी नवी वासरं एकत्र करून त्यांच्यावर मालकीच्या खुणा केल्या जायच्या.नवी वासरं म्हणजे आधीच्या राऊण्डअप नंतरची वासरं."मला मिस्टर कॉल्डवेल नं सांगितलं की छोटी वासर नेहमी आपापल्या आयांच्या मागेमागे जात असतात.प्रत्येक रँचच्या मालकांच्या हजेरीतच आई आणि वासर यांच्यावर एकसारखी खूण केली जाते.


"असं दिसतंय की सुरूवाती सुरूवातीला अंकल रेड रँचर म्हणून यशस्वी होईल की नाही याची मिस्टर कॉल्डवेलला फिकीर वाटत होती.गस् नं त्याच्या असलेल्या वासरांपैकी काही वासरांवर अंकल रेडची खूण केली.अशानं त्यानं अंकल रेडला तीस वासरं जास्त दिली होती.असं मला त्यानं सांगितलं.


"पण राऊंडअपच्या शेवटी जेव्हा गसनं आपल्या गुरांची मोजदाद केली तेव्हा तीस वासरं कमी असण्या ऐवजी त्याच्याकडे उलट पन्नास जास्तच होती.तो बुचकळ्यात पडला."या घटनेबाबत तो बरीच वर्षं गोंधळातच होता पण एकदा त्याचा उलगडा झाला.तेव्हा मिस्टर कॉल्डवेल आणि अंकल रेड एकदा मासेमारी करायला गेले होते.अंकल रेडनं त्याला सांगितल की त्यांनी सुरूवात केली तेव्हा गस् ला कसा काय व्यवसाय जमेल,अशी त्याला फिकीर होती.

त्याला शेजारी आणि मस्त मित्र असलेला गस् गमवायचा नव्हता म्हणून त्यानं अगोदरच तीसएक वासरांवर गस् कॉल्डवेलची खूण केली होती."जेसन थांबला आणि मी आणि मागरिटकडे त्यानं संमतीसाठी पाहिलं. त्यानं पुढं बोलणं चालू ठेवलं. "गस् कॉल्डवेलनं अंकल रेडबाबत मला सांगितलेली ही गोष्ट मला समजलेली मैत्रीची तत्त्वं उत्तम प्रकारे दाखवते.अशी मैत्री जमायला खूप वर्ष जावी लागतात हे मला कळलंय पण मला वाटतं ती अगदी वसूल होत असली पाहिजेत."तुम्हाला माहित आहेच की मागच्या महिन्यात मला ब्रायन भेटला,तेव्हा त्याची रस्त्याच्या कडेला गाडी बिघडली होती.त्याच्या गाडीला नवीन इंजिन बसवायला मी मदत केली होती.तेव्हापासून आम्ही खूप गोष्टी एकत्रितपणे केल्या.मला वाटतं की एक दिवस गस् कॉल्डवेल आणि अंकल रेडसारखे आम्ही मित्र होऊ."


(सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल स्वाधारित कलासामग्री- डॉन बिलिंग्ज,अनुवाद-दिशा केळकर)


जेसननं माझ्याकडे रोखून पाह्यलं आणि तो म्हणाला, "आणि मला उमेद आहे की तुम्ही जसे रेड स्टीव्हनसचे मित्र होतात तसा मी एक चांगला मित्र होईन."


मी हसत हसत जेसनला म्हणालो,"मला खात्री वाटते की तू आयुष्यभर पुरेल असा मैत्रीच्या भावनेचा धडा शिकला आहेस.मी तुला इतकंच सांगतो की मैत्रीखातर आपण जे जे करतो त्याचं फळ कैकपटीनं मिळतं."


रेड स्टीव्हन्स आणि गस् कॉल्डवेल यांच्यामधली ती गोष्ट सांगितल्याबद्दल मी जेसनचे आभार मानले पन्नासेक वर्षांपासून मला माहीत आहे की ती दोन उत्तम माणसं, उत्तम मित्र होते.गस् कॉल्डवेलनं सांगितलेली गोष्ट उत्तम मैत्रीचं आणखी एक उदाहरण होतं.मिस् हेस्टिंग्ज जेसनला घेऊन कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडली.आणि जुन्या आठवणीत बुडालेला मी एकटाच राहीलो.मी खुर्चीत मागे टेकून बसलो आणि रेड स्टीव्हन्स माझा जन्मभराचा दोस्त,त्याच्या आठवणी येतच राहिल्या.अगदी सहजगत्या आमची मैत्री जमली. आणि ही दोस्ती पुढे इतकी गहिरी बनेल याची आम्हाला सुरूवातीला कल्पनाही नव्हती.


मित्र कसं व्हावं हे समजायची जेसनची आत्ताच कुठे सुरूवात होती.मला वाटायला लागलं की रेड स्टीव्हन्स आणि मी जसा मैत्रीचा आनंद अनुभवला तसा जन्मभर मैत्रीचा आनंद जेसनला मिळो.

३१/७/२५

पक्ष्यांच्या जन्माचे गुढ / The mystery of bird birth

आपल्या पिलांना भरवत पक्षी दिवसादिवसांनी त्यांना वाढवत असतात.परंतु मौज कशी ते पहा.चातक व पावशा हे कोकिळ कुळातील पक्षी मात्र आपली अंडी कसाई-खाटिक-पक्षी व सात बहिणीच्या घरट्यात घालतात.ते मोठे चतुर असतात. एका घरट्यात एकच अंडे ठेवतात.
कसाई पक्षी केवढे क्रूर- पण देवाची करणी पहा.हा खाटिक पक्षी पावशा पक्ष्याच्या पिलाच्या रूपाने जगत असतो.सात बहिणी चातकाच्या पिलावर मायेची पाखर घालतात.कटुकर्कश कोल्हाळ माजविणाऱ्या पक्ष्यांत ह्या सुस्वर गाणाऱ्या,अरण्यातील भाटाचा जन्म व्हावा हा केवढा चमत्कार.

हा सृष्टीतील चमत्कार घडताना स्वयंभू जलाशयाचा प्रकाश आसमंतात पडलेला असतो.वरून धो-धो पाणी वर्षत असते.इतर वेळी सारी झाडेझुडपे मेघांच्या प्रावरणात लपलेली असतात.या पक्ष्यांच्या घरट्यांवर हिरव्या-निळ्या दाट पानांचे छत्र उभे असते.टिटवी क्षणाक्षणाला धोक्याची सूचना देत असते.कोतवाल पक्ष्यांचा जागता पहारा असतो.

पळसाची सारी झाडे-झुडपे सातसाईंच्या रूपाने बोलू लागतात.एक-दोन-तीन अशी एकामागून एक सहा-सात उदी-भुऱ्या रंगाची,मैनेच्या आकाराची,लांब शेपटीची ही पाखरं झाडाखाली उतरू लागत,चक्-चक् करीत,किलबिल करीत आणि एकाएकी कोल्हाळाने सारे रान उठून जाई.जमिनीवरून पुन्हा जडपणे उडत,दुसऱ्या झुडपात शिरून दिसेनासे होत.

एकदा एक जोडी एकमेकांना बिलगून फांदीवर बसली होती.ओली पिसे फुलवून,पिसातून चोची फिरवत,एका तालात शेपटी वरखाली हलवत,एकमेकांच्या पंखांत-चोचीत हळुवार चोच घालीत चक् चक् आवाज करीत. गोंडी भाषेत त्यांना खेवा म्हणतात.खेव म्हणजे आलिंगन.

फार वर्षांपूर्वी त्या एकत्र राहणाऱ्या सात पाखरांचे मोठे गूढ वाटे.सातच का ?.सहा का नाही? मग सातवा कोण? नंतर कळले की,त्यात चारपाच त्यांची पिले असतात.एकूण ती क्वचितच सात असतात.परंतु सात ही संख्या भारतीयांना फार प्रिय.परंतु इंग्रजांनीदेखील आपलेच अनुकरण केले.तेही ह्या पक्ष्यांना 'सेव्हन सिस्टर्स' म्हणतात.ती सारी पिले विलक्षण स्वरात केकाटायची.कोकणात तर त्यांना कोकाट्या-जंगल बँबलर म्हणतात.

परंतु त्या दिवशी त्यांच्या केकाटण्याला चातकाचे एक शावकही साथ देत होते.डोक्यावर नुकतीच फुटू लागणारी शेंडी-पंखावर पांढरा शुभ्र ठिपका.किंचित लांब शेपटी,शेपटीवरचे पांढरे ठिपके मात्र दिसत नव्हते. नंतर क्षीण स्वरात पी-पीचा आवाज करीत त्या व्रात्य पिलांपासून दूर एका फांदीवर जाऊन बसले.
बराच वेळ त्याचे पी-पी-पी चालले होते.शेवटी त्या पिलांच्या आईला दूर बसलेल्या त्या अजाण पक्ष्याची कीव येऊन तिने त्याच्या चोचीत चारा भरला.पंख थरथरवत पी-पी-पी करीत चोच वासून त्याने तो चाराघेतला. बाकीच्या पोरांनी पुन्हा एकदा केकाटत तिच्याभोवती गदारोळ घातला.ती कावून जी उडाली तशी ती पिले तिच्या मागोमाग पळसाच्या झुडपात दिसेनाशी झाली.चातकाचा परिचय झाला तो कालिदासाच्या काव्यातील चातक व्रताने.त्याच्या दर्शनाला मी उत्सुक असूनही तो कधी फारसा दिसायचा नाही.समोर नवेगावचे विस्तीर्ण जलाशय त्याच्या काठची सुंदर वनराजी.त्या बांधावरून फिरत असताना एकमेकांचा पाठलाग करीत असलेले चातक दिसले.केवढे देखणे रूप त्यांना लाभले होते.लांब काळ्याशार शेपटीवरचे पांढरे शुभ्र ठिपके.ते उडताना मोठे अलौकिक वाटायचे. या त्यांच्या वैशिष्ट्यांवरूनच त्यांची ओळख पटावयाची. इतर वेळी ते बांधावरच्या मोहावर बसलेले असायचे तर कधी आंब्यातून मधुर आवाजात गायचे.पिंपळाच्या मंद सळसळणाऱ्या पानांना संथ गतीत साथ द्यायचे. जलाशयावरील लाटा किनाऱ्यावर आंदुळायच्या.त्या आनंदकल्लोळात पियु-पियु-पी-पी-पियु-पी-पी-पियु मोठे अद्भुत वाटायचे.


आकाशातील मेघांची छाया जलाशयात पडून तो जलाशय अधिकच गहिरा-खोल-निळा विस्मयजनक दिसायचा.वर पाण्याने भरलेले ढग आहेत.खाली विस्तीर्ण जलाशय आहे.तरी चातक तहानेलाच आहे.
त्यांचा पियु-पियूचा नाद अरण्यात भरला आहे.
देवाने त्यांची प्रार्थना ऐकली वाटते.नंतरच्या काही दिवसांत सतत वर्षाव होत होता. तुडुंब भरलेल्या जलाशयाचे पाणी बांधावरून वाहू लागले.रामटेकवर आले ते आफ्रिकेतून.तेथून मेघदूताबरोबर येणाऱ्या या पक्ष्यांची वीण इथे नवेगाव बांधावर होते.

सात बहिणीचे घरटे हेरून चातकाची मादी त्यात एखादे अंडे ठेवते.कदाचित सात बहिणीचे एखादे अंडे बाहेरही टाकून देत असावी.भारतीय साहित्यात अलौकिकत्व पावलेल्या ह्या पक्ष्यांची प्रजनन भूमी इथं या बांधावरच आहे.

कसाई पक्ष्यांची श्रीक्-श्रीक् तर कधी चीर्-चीर् चाललेली असावयाची.बुलबुलाएवढे लांब शेपटीचे, माथ्यावर काळी पट्टी असलेले हे पक्षी एखाद्या पापाचे ओझे वाहून न्यावे तसे जडपणे इकडून तिकडे झाडांच्या शेंड्यावरून उडताना दिसत.तरुशिखरावर बसून त्यांची श्रीक्-श्रीक् चाले.त्यांची पिलेही आता जाणती झाली होती.चिमणीएवढी-करड्या,उदी रंगाची,कुशीत किंचित ठिपके असलेली ही पिले कित्येकदा स्वतंत्रपणे चरताना दिसत.सारा परिवार एकत्र आला की कसला विलक्षण कोल्हाळ करायची.पंख थरारून,अंगाचा कंप करीत 

आपल्या मातापित्यांकडून चारा मागावयाची.परंतु त्यांना पोटच्या पिलाकडे पाह्यला कुठला वेळ ! त्यांचा सारा वेळ पावश्याच्या पिलाला भरविण्यात जाई.पावश्याची मादी मोठी चतुर.प्रत्येक घरट्यात ती एकच अंडे घाली.तिची इतर सारी पिले बांधावरच मोठी होत होती.इतर साऱ्या पिलांची भूक घेऊन तिप्पट आकाराचे पावश्याचे हे पिलू तिच्या कुशीत जन्माला आले होते.दिवसभराचा सारा वेळ ह्या खादाड पिलाला भरविण्यात जाई.एरवी दुसऱ्या पक्ष्यांची अंडी,पिले निर्दयपणे खाणाऱ्या या खाटकाला ही कुठून दया आली ?

आकाशात ढग आले आहेत अधूनमधून रिमझिम पाऊस येतो.बांबूची वने आता सुस्नात होऊन त्यांना वैडूर्य मण्यांचे सौंदर्य प्राप्त झाले आहे.आकाशाला भिडणाऱ्या उंचच उंच सुसरीच्या पाठीसारखी साल असलेले ऐन वृक्षात लपलेले पपिया-पावशा-गात आहेत.दिव्याने दिवा लावावा तसा त्यांच्या आवाजाने सर्वत्र आवाज लागत होता.गव्याचा मागोवा घेत भटकत असताना त्या खोऱ्यात पपियाचा आवाज भरून राहिला होता.चंद्राच्या आड दाट व पाण्याने भरलेले ढग आल्यावर धड अंधार ना प्रकाश असे झावळे झावळे झाले आहे.अशा या रात्रीच्या वेळी पपिया पिया कहा है, पिया कहा है अशा स्वरात गाऊ लागतो.एखाद्या दर्दभरी रागासारखे ते गाणे मनाची बेचैनी वाढविणारे-मनाला अनामिक हुरहूर लावणारे असते.(जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,प्रकाशक मकरंद भास्कर कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र, सिताबर्डी)


लहानपणी नंदीवाला घरापुढे येऊन गुबू गुबू गुबू वाजवत उभा राही.तोच तो आवाज.आता सूर्योदयापूर्वी भारद्वाज पक्षी करीत असलेल्या आवाजाने मी जागा होई. अनेकदा मी लपतछपत हा विलक्षण आवाज तो काढतो कसा हे पाहण्याचा प्रयत्न करीत असता मान खाली वर हलवून चोचीचा जवळच्या फांदीवर स्पर्श करीत त्या अद्भुत ध्वनिलहरी बाहेर येत.चोच कधी उघडलेली मी पाहिली नाही.बंद चोचीतून तो कसा आवाज काढत असावा,याचे आश्चर्य वाटे.ते अद्भुत स्वर कंठातून कसे बाहेर येत,हे समजत नसे.कधी कधी तो वानरासारखा हुप्प-हुप्प-हुप्प आवाज काढी.त्या दूर खोल दरीत त्याचा आवाज भरून राही.

पण आज आणखी वेगळ्याच आवाजाची किमया त्याने दाखविली.खकु-खकु चक्-चक् असा पळसाच्या दाट पानातून आवाज येत होता.येणारा आवाज आगळा वाटल्याने मी त्या आवाजाचा मागोवा घेतघेत जवळ जाताच तो अकस्मात पंख फडफडवत वेगाने उंच सागाच्या सुकलेल्या डहाळीवर जाऊन बसला.
दुसरे बसले खालच्या फांदीवर.मधूनच ती चीर-चीरचा आवाज करी तर नर खकु खकुचा स्वर काढी.त्याने जीवजीवक पक्ष्याच्या शेपटीप्रमाणे असलेल्या पुच्छाची पिसे एखाद्या सुंदर जपानी युवतीच्या हातातील नाजूक-मुलायम पंख्यासारखी पसरली होती.पंखांची तपकिरी वर्णाची पिसे हळुवारपणे उन्हात पसरून तो त्या पिसांत चोच घालत होता.त्याच वेळी त्याच्या आवाजाची किमया ऐकू येत होती.तो मादीचा अनुनय करीत होता.इतक्यात त्यांचे सागाच्या रुंद पानात ते बांधत असलेले घरटे दिसले.

गूढ आणि अद्भुत असे. सौराष्ट्र व कर्नाटक देशात ह्या पक्ष्यांच्या घरट्याविषयी गूढ लोककथा आहेत.ह्या पक्ष्यांच्या घरट्यातील मुलायम अस्तर संजीवनी काड्यांनी केलेले असते.त्या खोप्यातील काड्या जलप्रवाहात फेकल्या की इतर काड्या प्रवाहाबरोबर वाहून जातात.मात्र संजीवनी काड्या प्रवाहाविरुद्ध वाहू लागतात.ह्या अलौकिक कथेचा उगम कसा झाला हे माहीत नाही.विष्णुपुराणात भारद्वाज मुनींच्या जन्मकथेत ह्या पक्ष्यांचा संबंध असल्याने त्याच्या घरट्याबद्दलही हा प्रवाद असावा असे वाटते.ह्या पक्ष्याचे दर्शनही चास पक्ष्याप्रमाणे शुभ मानले जाते.

२९/७/२५

‘जावा मॅन'चा शोधकर्ता’-’Inventor of Java Man’

पाडांगच्या आजूबाजूच्या भूप्रदेशात फारसे पुराजीव मिळण्याची शक्यता नाही हे कळल्यावर युजीनने सुमात्राच्या राज्यपालांना आर.सी.जोएसनना निखळलेल्या मानवी दुव्याचं महत्त्व सांगणारं एक पत्र पाठवलं.त्यांनी त्याला मदत करायचं आश्वासन दिलं. त्याचबरोबर,युजीनची बदली पाजाकोंबोच्या पठारी प्रदेशात करावी,असं त्याच्या वरिष्ठांना कळवलं. पाजाकोंबो ही एक छोटी छावणी होती.त्यामुळे युजीनला पुराजीव शोधायला भरपूर वेळ उपलब्ध होता. इथेच त्यांच्या मुलाचा जन्म झाला.अ‍ॅना मात्र तिथे कंटाळली.कारण तिथे इतर कुठलीही युरोपीय स्त्री नव्हती.युजीन मात्र खुषीत होता.कारण लिडाअडयेर इथे त्याला बरेच पुराजीव सापडू लागले होते.त्यात बरेचसे कपींचेही होते.


त्यामुळे लवकरच मानवी अवशेषही सापडणारच याबद्दल युजीनला खात्री वाटू लागली होती.दरम्यान,युजीनचा एके काळचा सहकारी आणि मित्र मॅक्स वेबर एका शास्त्रीय मोहिमेवर पूर्वेकडील डच वसाहतींमध्ये येऊन गेला होता.त्याने डच प्रशासनाला युजीनच्या संशोधनाचं महत्त्व पटवून दिलं.त्यामुळे हॉलंड सरकारने आदेश काढला, की डच वसाहतींच्या प्रशासनाने युजीनला संशोधनासाठी त्याच्या पगाराव्यतिरिक्त दरमहा २५० गिल्डर द्यावे.दुसरीकडे,द्युबुआ कुटुंबीय अधूनमधून हिवतापाने आजारी पडायला लागले होते.युजीन तर सतत रानावनात फिरत असल्याने एकदा मृत्यूचं दार ठोठावून परतला होता.पाडांग पठारावरचे आदिवासीजन त्याच्या मोहिमांकडे संशयाने पाहू लागले होते.आपल्याला सुमात्रा बेटावर आता नवं यश मिळणं शक्य नाही असं युजीनला वाटू लागल्याने त्याने राज्यपालांना विनंती करून जावा बेटावर बदली करून घेतली होती.२४ नोव्हेंबर १८९० या दिवशी युजीनला बेडोइंग ब्रोयबस इथे मानवी जबड्याच्या खालच्या बाजूचा काही अंश मिळाला.मे १८९२मधे ट्रिनिल नावाच्या खेड्याजवळ युजीनने उत्खनन सुरू केलं.तिथे खणता खणता एका मजुराची कुदळ एका झाडावर आदळली. प्रत्यक्षात ते आदिमानवाच्या मांडीचं हाड असावं असं युजीनला खात्रीपूर्वक वाटत होतं.त्याला जावा बेटावर आदिमानवी स्त्रीचे तीन मानवी जीवाश्म मिळाले होते.


संशोधनाच्या कामात हळूहळू अपेक्षित गोष्टी हाती लागत असताना एकीकडे युजीनच्या संसाराची मात्र वाताहत व्हायला सुरुवात झाली होती.३० ऑगस्ट १८९३ ला अ‍ॅना तिसऱ्यांदा बाळंत झाली,पण ती मुलगी मृतावस्थेत जन्मली.अ‍ॅना तो मृतदेह कवटाळून बसली. ती मुलगी जिवंत आहे,असं ती सर्वांना सांगत होती.तो मृतदेह पुरल्यानंतर ती भ्रमिष्ट बनली. रात्री जंगलातून वाऱ्याचा आवाज येऊ लागला की 'माझी मुलगी मला बोलावते आहे' असं म्हणत ती बंगल्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असे.तिला त्यामुळे कोंडून ठेवणं भाग पडू लागलं. यूजीन आणि त्याच्या दोन मुलांवरही यामुळे एक विचित्र सावट पसरलं.या सावटाची छाया दूर करण्यासाठी मग एका स्थानिक मांत्रिकाची मदत घेण्यात आली.युजीन आणि अ‍ॅना हे आता आपापल्या वेगळ्याच विश्वात वावरू लागले.त्यांच्यातलं पती-पत्नीचं नातं संपलं होतं.युजीनने 'पिथेकैथ्रॉपस इरेक्टस' ऊर्फ हरवलेल्या दुव्यासंबंधीचा आपला प्रबंध लिहून पूर्ण केला.प्रबंधाच्या प्रती त्याने तत्कालीन प्रमुख पुराजीव शास्त्रज्ञांकडे पाठवून दिल्या. जगभरातून त्याच्यावर स्तुतीचा वर्षाव झाला. १८९४ अखेर त्याला भारतास भेट देण्याचं आमंत्रण मिळालं.


भेटीदरम्यान कलकत्त्याच्या वस्तुसंग्रहालयातील भारतीय जीवाश्मांचा साठा बघण्याची परवानगीही मिळाली.अ‍ॅना व मुलांना जावामधेच ठेवून युजीन भारत भेटीवर निघाला.

जानेवारीच्या मध्यास तो कलकत्त्याला पोहोचला.फ्रँक फिन आणि अ‍ॅलन अल्कॉक या संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याचं स्वागत केलं.


या संग्रहालयात तेव्हा थॉमस हॉलंड,मॉल यांच्यासारखे भूशास्त्रज्ञही काम करत होते.त्यांना युजीन भेटल्यामुळे आनंद झाला.आपल्या संशोधनाची कीर्ती भारतात आणि युरोपात पसरली आहे हे युजीनला प्रथमच कळत होतं.तो जवळजवळ सहा महिने भारतात राहिला.त्यादरम्यान तो शिवालिक टेकड्यांमध्ये पोहोचला.भारतातच त्याला 'नेचर' या वैज्ञानिक नियतकालिकाने त्याच्या प्रबंधाचं केलेलं परीक्षण वाचायला मिळालं.त्या वेळी अंदमान बेटावरच्या काही आदिवासींना कलकत्त्यात आणण्यात आलं होतं,तेही त्याला पाहायला मिळालं.युजीन भारतात असताना त्याचा मित्र आणि उत्खननातील सहकारी अ‍ॅनडाम प्रेंटीस याचे आणि अ‍ॅनाचे संबंध असल्याची कुणकुण त्याच्या कानावर आली होती.तो डच ईस्ट इंडियात परतला तेव्हा संशयाचं धुकं दाट झालेलं होतं;पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं.तरीही युजीन परत हॉलंडला जायला निघाला तेव्हा प्रेंटीसने त्याला प्रत्यक्ष भेटून निरोप घेण्याचं टाळलं.आपल्या एखाद्या शब्दाचा नाही तर वाक्याचाही युजीनकडून गैरअर्थ लावला जाईल अशी त्याला भीती वाटत होती.त्याने युजीनला एक पत्र लिहून तो मुद्दा स्पष्ट केला आणि पत्रातूनच त्याचा निरोप घेतला.


अ‍ॅनाला नवऱ्याने आपल्यावर अनाठायी संशय घेतल्याचा जो राग आला होता तो पुढे कधीच कमी झाला नाही.त्यातून त्यांच्यातला दुरावा आणखी वाढला. त्यांच्या परतीच्या प्रवासातल्या एका घटनेमुळे या दुराव्यात भरच पडली.त्यात ना युजीनची चूक होती ना अ‍ॅनाची.झालं असं,की परतीच्या प्रवासात युजीनने गोळा केलेले सर्व महत्त्वाचे जीवाश्म त्यांच्या केबिनमध्ये इतर सामानासोबतच ठेवण्यात आलेले होते.जहाज हिंदी महासागरातून सुवेझच्या दिशेने निघालेलं असताना एका जबरदस्त सागरी तुफानात सापडलं.प्रचंड पाऊस पडत होता.वादळाचा जोर,लाटांची उंची आणि जहाजाचे हेलकावे वाढत होते.अखेरीस प्रवाशांनी जीवरक्षक नौकामध्ये जाऊन बसावं,असं कप्तानाने फर्मान काढलं.अजून या नौका सागरात उतरवायचा निर्णय झाला नव्हता;तरी असं केल्याने उतारूंना तयारी करायला वेळ मिळाला असता.हळूहळू सर्व उतारू आवश्यक तेवढं सामान घेऊन त्या नौकांमध्ये येऊन बसले.

त्यात द्युबुआ कुटुंबाचाही समावेश होता.अचानक युजीन त्या जीवरक्षक नौकेतून उडी मारून जहाजावरच्या आपल्या केबिनकडे पळाला.निदान पिथेकँथ्रॉपसचे अवशेष त्याला वाचवणं आवश्यक वाटत होतं.त्याच्या आयुष्याच्या धडपडीचं ते सार होतं.ते या जहाजाबरोबर सागरतळी गेलं असतं तर त्याचे सर्व परिश्रम खरोखरच पाण्यात जाणार होते.तो का पळाला ते अ‍ॅनाच्या लक्षात आलं.बायको-मुलांपेक्षाही युजीनला 'जावा मॅन'चे जीवाश्म महत्त्वाचे वाटत होते.अ‍ॅनाने त्या अनोख्या बेटांवर कसे दिवस काढले याच्याशी त्याला काहीही देणंघेणं नव्हतं.तो उत्खननाला गेला असताना स्थानिकांच्या साहाय्याने तिने काढलेल्या खस्तांना त्याच्या लेखी किंमत नव्हती.त्याच्या दृष्टीने काही लाख वर्षांपूर्वी मेलेल्या त्या स्त्रीची हाडं त्याला फार महत्त्वाची वाटत होती.

थोड्याच वेळात ते जीवाश्म असलेली पेटी छातीशी कवटाळून युजीन परतला आणि अ‍ॅनाला म्हणाला,"अ‍ॅना मला काही झालं तर तू मुलांची काळजी घे.मला या जीवाश्मांची चिंता आहे." तो पट्टीचा पोहणारा होता.जीवरक्षक नौकेला काही झालं असतं तर तो आपले ते लाडके जीवाश्म वाचवायचा प्रयत्न करणारा होता.अ‍ॅना मुलांना जवळ घेऊन निमूट बसून राहिली.तिच्या डोळ्यांत अश्रू होते.युजीनला ते लक्षात येतीलच याची तिला खात्री नव्हती.हे सागरी वादळ शमलं;कप्तानाने सर्व उतारूंना केबिनमध्ये जायचा आदेश दिला.युजीनने ते जीवाश्म परत सुखरूप केबिनमध्ये ठेवले.सागरी वादळ शमलं,पण एक प्रचंड विध्वंसक वादळ अ‍ॅनाच्या मनात थैमान घालू लागलं. युजीनला त्याचा पत्ताच नव्हता.द्युबुआ कुटुंब 'द नेदरलँड्स'ची राजधानी 'द हेग' इथे राहू लागलं.इथेही त्यांना शांतता लाभली नाही. त्यालाही 'जावा मॅन'ची हाडंच कारणीभूत होती.युजीनने आणलेले जीवाश्म अत्यल्प आहेत,त्यावरून 'हरवलेला दुवा' सापडला असं म्हणणं योग्य होणार नाही,असं काही विरोधक म्हणत होते;तर रुडॉल्फ व्हर्चेसारखे काही संशोधक ही हाडं माणसाचीच आहेत हेच मान्य करायला तयार नव्हते.सुदैवाने लेआँस-पीएर मॅनुव्रिएसारखे काही शास्त्रज्ञ युजीनच्या बाजूचे होते. या वादात घर लावणं, घरखर्च भागवणं, मुलांच्या शिक्षणाची सोय करणं या बाबींकडे लक्ष द्यायला युजीनला वेळच नव्हता.


दुसरीकडे,घरी त्याच्या कार्याचं महत्त्व समजेल अशी कुणीही व्यक्ती नव्हती.आठ वर्षांपूर्वी निघताना त्याचं वडिलांशी भांडण झालं होतं.वडिलांना अभिमान वाटेल असा शोध आपण लावल्याने परतल्यावर ते मागचा राग विसरतील असं त्याला वाटत होतं;पण त्याचे वडील आता हयात नव्हते.युजीनने आपल्यामुलाचा,जाँचा प्रतिरूप म्हणून वापर करून एक पुतळा तयार केला होता.

त्याच्या चेहरेपट्टीत आणि शरीरयष्टीत हवा तसा बदल करून हा पिथेकैथ्रॉपॉसचा पुतळा त्याने इ.स. १९०० मधल्या पॅरिस इथल्या प्रदर्शनात पाठवला.जाँला तो पुतळा यूजीनचाच आहे असं वाटायचं.तसं तो इतरांना सांगतही असे.


शालेय शिक्षण संपताच युजीनच्या मुलांनी उच्च वसाहतींमध्ये जायचं ठरवलं.त्यांना लगेच नोकऱ्याही मिळाल्या.त्यांना निरोप देताना युजीन म्हणाला,"तुम्ही ज्या भागात जाताय त्या भागातल्या प्राण्यांच्या कवट्या मला पाठवा.सध्या मी कवट्यांच्या आकारावर संशोधन करतोय." मुलांनीही पुढच्या काळात वडिलांची आज्ञा शिरोधार्ह मानली.युजीन द्युबुआ विसाव्या शतकात ४० वर्षं जगला.या काळात त्याने बरंच संशोधन केलं. त्याच्या संशोधनाशी खेळ करणाऱ्यांशी आणि त्याचं संशोधन खोटं ठरवणाऱ्यांशी झगडण्यातच त्याला बहुतेक काळ खर्च करावा लागला.अनेकांनी त्याच्या संशोधनाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.पहिल्या महायुद्धकाळात भूशास्त्र आणि मानवशास्त्राकडे कुणीच फारसं लक्ष दिलं नाही.नंतरच्या काळात वयोमानामुळे युजीनची वाद घालण्याची क्षमता ओहोटीस लागली. नवी पोरं लबाड्या करतात,हे त्याने दाखवूनही उपयोग नव्हता.तो एकटा एकटा राहू लागला.दुसरीकडे फॉन कोएनिग्जवाल्ड, वायडेनरिख आणि बोनर्ट हे मानसशास्त्रज्ञ म्हणतील तेच सत्य,असं युरोपात म्हटलं जाऊ लागलं.नोव्हेंबर १९४० मध्ये युजीनने या तिघांमुळे मानवशास्त्राचं नुकसान होतंय,असं लिहिलं खरं;पण युद्धाच्या धामधुमीत त्याच्याकडे कुणाचं लक्ष जाणार ?


१६ डिसेंबर १९४० या दिवशी डॉयुजीन द्युबुआचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आणि मानवी वंशाचा दुवा शोधणारा हा अवलिया शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला.


२७.०७.२५ या लेखातील दुसरा शेवटचा भाग..